पोळ्यानिमित्त...
खरंतर कालच या आठवणींना उजाळा आलेला पण इथं लिहायचं राहून गेलं.
लहानपणी म्हणजे ४त असताना आमच्या घरी जानी गाय होती. माझ्या गावापासून ११ किमीवर बहिणीचे गाव होते. त्यांच्याकडे दुभते जनावर नसल्याने वडिलांनी त्यांना दिलेली. पण गाय इतकी खतरनाक होती की चुकून जरी सुटली तर थेट माझ्या घरी पोहोचून जायची. तीच वासरू नसताना सुद्धा. तीनचार वेळा असं झाल्यावर राहूदे म्हणून नंतर तिकडे पाठवलीच नाही.
नंतर तिने एका खोंडाला जन्म दिला. आम्ही त्याच नाव दगड्या ठेवलं. शाळेत दुपारी १२ वाजता १५ मिनिटाची सुट्टी असायची तेव्हा मी येऊन त्याला वैरण हिबाळून पळायचो. दुपारी जेवायच्या सुट्टीत त्याला वैरण+पाणी. ४ वाजता शाळा सुटली की मग एकदम त्याची मजा. त्याने काय खाल्लं काय नाही खाल्लं हे पाहत त्याला बोलत त्याची मसाज करायचो. मसाज करतानाच शेजारी मित्र जमा व्हायचे. सगळे जमा होईपर्यंत त्याची मसाज. नंतर खेळ.
एकदिवस दुपारी १२ वाजता आलो वाड्याचं दार उघडताना दगड्याचा हंबा ऐकायलाच नाही आला. मनात वाटलं आज आजारी पडला की काय? दार उघडून पाहतो तर दगड्याच नाही घरात. मन कासावीस झालं पण मुलाणी मास्टर उलट्या हातावर छडी हाणणार या भितीपोटी शाळेत पोहोचलो. काय झालं असेल? आबांनी गायीसोबत दगड्याला पण नेलं असेल का? नेलं असेल तर आज आबांची लै पायपीट करेल. असे मनात बरेच विचार यायला लागले. संध्याकाळी शाळा सुटताच दप्तर शेजारच्या चिऊताई(शिवकन्या नाव होत तीच)कडे देऊन थेट शेतात गेलो. पाहतो तर दगड्या नाहीये. आता मात्र काळजात चर्रर्र झालं होतं. विचारल्यावर कळलं की सकाळी पांडुमामा(दलाल) ने घेऊन गेला. आता मात्र मी रागात रडायलाच लागलो. "संभाळलो असतो की मी. तुम्हाला काय चावत होतं. मी त्याच्यावरच शेती करणार हुतो. तुम्हाला त्याचं काडीचं तरी कष्ट देत होतु का म्या." असं म्हणत रडायला लागलो. कहर तर अजून पुढे. त्या सांच्याला मी घरी येताना रडतच एका उसाच्या फडात घुसलो. जाऊन त्या पंड्याच्या बाल्याला(बालाजी, पांडुमामाचा मुलगा)लै हाणणार मी. आबाला बोलणारच नाही. आईनेपण का न्हिऊ दिलं? अशा विचारांत कधी मावळलं कळलंच नाही अन झोपी गेलो. सकाळी जाग आली मी फडात पाचोळ्यावर दंडात झोपल्याने मान आवटळली होती. राग अजूनही तसाच. नै जाणार आज साळत असं मनाशी ठरवलं. घरी सगळे हैराण. सकाळीच एक भाऊ बहिणीकडे मी गेलोय का पाहायला रवाना. आईने आबांना वैताग आणलेला. आबांनी पांडुमामा ला बोलावणं धाडलेलं. मी हळूच मळक्या कपड्यानं वाड्यात जसा पाऊल ठेवतो लग्गे आबा कडाडले. "घ्या, आले कारभारी.. कुटं खपला होतास गुइन्द्या? तिकडच खपला अस्ता की. काह्यला आला घर्ला?"
मी भिताडाला खेटत खेटत आईकडे. आईनं पोटाला लाऊन घेताच माझ्यात ताकद आली आबाला बोलायची. "खपणारच हुतो, हिरीत पडणार हुतो, आईला भेटापायी आलुय... काय घोडं मारलं होत तुमचं दगड्यान?" एवढ्यात पांडुमामाची एंट्री पाहिली. आता मी औटॉफ कंट्रोल.. "ह्या पांड्याच्या बाल्याचा मी मुडदाच बशिवणार. माझ्या दगड्याला आणा नाहीतर काही खरं न्हाई कुणाचं"..
आई डोक्यावरून हात फिरवत मला समजावत होती. "येईल येईल दगड्या. पांडू कुठाय दगड्या? तुमचे सहाशे घेऊन जा अन परत आणा त्याला."
आता तर माझा रुद्रावतारच "क्काय फकस्त सहाशे रुपड्यात इकलाय. थांबा, माझ्या गल्ल्यात जास्तीचे निघतील तीबी घ्या पर दगड्या पाह्यजे मला. ह्यो पांड्या खाटकाला इकतो जनावर(अनुस्वार लागला नाही, कीबोर्ड प्रॉब्लेम)"
हिबाळला ना गल्ला पांडुमामाच्या पायावर.. :)
पण शक्य नव्हतं. त्यांनी ते लातूरच्या मोठ्या दलालाला इकलेलं..
या घटनेनंतर घरातल्या जनवारांचा सौदा माझ्या समोरच व्हायचा. का विकतोय. सांभाळायला काय अडचण आहे. मला सगळं समजावलं जायचं.
पोळा
पोळ्याला लै म्हणजे लै उल्हास. शेतातला एक बंधारा खास पोळ्यासाठी ठेवायचो. म्हणजे त्याच्यावर जनावरं चारायचंच नाही. म्हशीला तर हुंगू बी द्याचो न्हाई. श्रावणातल्या २ सोम्मार पासून बैलं त्याच बंधाऱयाला चारायचो.
वारणेस अन पोळ्याला लागायचं सगळं मी माझ्या लिंबू इक्लेल्या पैशातून आणत असत. आबा बोलायचे "उत्मात करतुया निस्ती" .. माझं उत्तर तयारच.. "तुम्हाला का कराच? मी मागतुय का तुमास्नी? कदर नै तुम्हाला.."
सकाळचं दैवार पडलेलं गवत बैलाला लैच भारी खुराक असतो. अन म्या भल्या पाट्ट् बैलं घेऊन शेतात. सकाळी शाळा भारुस्तोवर चांगलं दोन अडीच घंटे बैलांना चाराचो. अन शाळा सुटली की पुन्हा त्यांच्यापाशी मी हजर. बैल सुधारला म्हणजे पोट फुगले नव्हे तर त्याच्या मांड्या चमकल्या पाहिजे. वस्वनंड पावलासंग डुलली पाहिजे मस्त!!
पोळा तीन दिवसावर असताना शाळेला दांडी हणणार अन फक्त बैलांवर फोकस. पोळ्यादिवशी सकाळी बैलं चारून, पवनी घालायचो. तेव्हा चिक शॅम्पू ५०पैशाला मिळायचा. ते लाऊन चमकवायचो बैलाला. पूजेसाठी गावात आणण्यापूर्वी सजवायची कामं. बैलाला सजवायचो खरं पण पावसाळा असल्याने कुठं ना कुठं पाण्यातून जावं लागायचं. गुडघ्याइतक्या पाण्यात गेलो की बैलांची शेपटी चिखलात माखायची. अन पट्ठ्याने माशा हाणायला इकडच्या पोटाला अन तिकडच्या पोटाला शेपूट हाणला एकदाचा की अजून भारी दिसायचा :) पूजा झाली की दोघांना एकेक पोळी खाऊ घालून(म्हशीकडं डुंकूनबी बघाचो न्हाई) मगच उपवास सोडायचा.
आठवणीतल्या जोड्या
खिलाऱ्या-फुलार्या!!
नववीपासून शेतातली सगळी कामं करायला लागलो. तेव्हा हट्ट करून दोन वासरं घेतली. आबा म्हणले अरे बैल आणला की बकरे दिसनातबी तुरीच्या बाहेर. कारण त्यांची दावण मी तुरीत खळाभर तूर कापून केलेली. ईरवाड, मका, ऊस अन सगळ्यात महत्वाचं बाटूक(ज्वारी ज्याला पोटरी येईल म्हणजे कणीस येईल असं वाटत नाही ती बैलांसाठी जबरा खुराक) बैलांना खाऊ घातला. नावं ठेवली खिल्लाऱ्या अन फुलार्या.
उन्हाळ्यात पहाटेच पेटवायचो कारण लोकं मला येडं समजून हसायचे अन बोलायचे की ही पारडं आंवदा काय पेटणार नाही. बैलाला पेटवणे म्हणजे काम शिकवणे. मी ना पेटवता सोडणार नव्हतो. फुलार्या आगाव होता पट्ठ्या उर्पन्डयचा. पण पेटवलंच शेवटी. दहावीचा वर्ष असताना सकाळ संध्याकाळ शेतात जाणे बैलांची मसाज नित्यनियमाने करणे चालूच. मोडातली कुळवणं मारायला आबा चिडाचे नवीन पारडं आहेत म्हणून. मग मी सुट्टी घेऊन जात असत अशा लवचिक कामाला.
मी माझ्या मोठया भावाला लैच घाबरायचो. येडपट होता अजूनही तसाच आहे. त्याचा बक्कळ मार खाल्लाय मी. एक दिवस फुलार्याने काही तरी आगावपणा केला म्हणून इतकं मारलं होत भावानी की इचारून नगा. त्यात आबाचा बोलण्याचा राग बी काढलेलं. मी जसा शेतात जातो तसा फुलार्याने आवाज दिला. जाऊन पाहतो तर वळ उटले व्हते. आईने झाला प्रकार सांगताच मी फुलार्याच्या गळ्यात पडून रडलेलो. :(
आबा म्हशी चारत व्हते एकदा तेव्हा खिलाऱ्या अचानक आबांवर धावला मारायला. मी लांब व्हतो. रागात निस्त " खिल्लार हट्ट" म्हणताच बैल गपगुमानं माघार फिरलेला. आबा मनले"किती मारतुस बैलाला काय म्हाईत, निस्त्या आवाजाने टरकला गडी" पर आबाला काय म्हाईत की माझा किती जीव असायचा.
गेलसालचा फुटू...
सोन्या-रुप्या!!!
बारावीत नापास झाल्यावर शेतकडं जास्तीचं लक्ष दिलं. घरची चार एक्कर च होती अन माझं त्यात भागणार नाही म्हणत २०एक्कर शेजाऱ्याची बटईने वडायचं ठरविलं. मग एवढी जमीन खिलाऱ्या-फुलार्यावर वड्डन शक्य नाही अन वडलच तर बैलांचं मात्र व्हनार हे कळलं.
गावतल्या दलालाकडं जोडी महिनाभरापासून आहे असं कानावर आलेलं. मारकी बैलं असल्याने कोणीच घेत नव्हतं त्येन्ला. ७० हजाराची जोड होती. खतरनाक. मला लै आवडले. खिलाऱ्या-फुलार्या काकांना विकले. अन दलालाला ७० हजारावरून ४५ वर आणलो. कोणी घेतच नव्हते मारकी बैलं आहेत म्हणून. दोन दाव्यानी बांधलेली बैलं रागानं लालभडक होती. जोडी एवढी रागीट होती की समोरच्या दगडाच्या भिताडाला शिंगान कोरून टाकलेली. मला थोडंसं भि वाटलं पण डेरिंग कराच म्हणून केला सौदा.
पुन्हा एकडाव लोकांना मला येडं बोलाचा चानस दिऊन टाकला. चार दिवस शेतातच मुक्काम ठोकला अन पाचव्या दिशी एका कासऱ्याने सांच्यापारीच भर तळ्याहून मिरवत घरी आणलो.(तळ म्हणजे तळ्याकाठी मंदिर, बसस्थानक, गावातलं हर्ट सिटी च म्हणा की)
सोन्या-रुप्या मोठी बैलं. ते दोन पावलं चालले तर आपणाला चार पावलं चालायला लागायचे. दिवसभरात ३ एक्कर टिपणीवर पेरून व्हायचो इतका त्यांचा स्पीड.
डॉक्टरांकडून चिमटा घेतलेला. एका व्हाट्सअप ग्रुपात एक जण डोकं लावत होते की बैलावर अन्याय आहे हा. लग्गे काल डाक्तरला फोन करून वेदना किती होतात इचारलं. डाक्टर म्हणे "अरे बाळन्त बाईला होतात त्याहून कमी असतात.. आपण दोन दिवस आधीपासून इंजेक्शन त्यासाठीच चालू ठिवतो.. नको डोकं लाउस अतिशहाण्यांसोबत." :)
यावर्षी मराठवाड्यात पाऊसपाणी नसल्याने जनावरांकडं बघितलं जात नाहीये. पोटात गोळा येतो त्यांकडं पाहून. हे देवा निदान त्यांच्यासाठी तरी पाऊस पाड ___/\___
डावीकडच्या बैलाला माहित आहे की मन सरळ केल्यावर फोटोफ्रेमबाहेर जाणार :)
अजून खूप लिहू शकतो या विषयावर पर लोकं वाचायचा कंटाळा करून मला येडं म्हणतील म्हणून आवरतो. :)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
खूप छान लिहिलं आहे .. मन
मस्त... फारच आवडले तुमचे बैल...
भारी अनुभव
मस्त लिहिलंय हो. जनावरांची
अजून खूप लिहू शकतो या विषयावर....
लिवा की
धन्यवाद.. __/\__
लेख आवडला
खिलाऱ्या फुलाऱ्याला का विकले हो नवीन जोडीसाठी :((
ते समजते हो :((
खुप सुरेख लिहिलंय.
अपेक्षेप्रमाणेच छान लिहीले
+1
मस्त. आजोळची बैलं
लय भारी लिव्लय पाउस पडु दे रे
सुंदर
सगळ्यांचे आभार...
पोळ्यानिमित्य
पोळ्यानिमित्य
सुंदर लेखन लिहिते राहा
काय सुंदर लिहीले आहे!
मस्त लिहिलंय
अजून एक जिवाभावाची गोष्ट
नेमकं झाड किती मोठं होतं ते यात कळेल
फटूवाले, शब्दा शब्दातून तुमचे
+१११११
सुंदरच लिहिलंय
फुटूवाल्यांच्या निमिताने
@ फुटूवाला काय बोलू ? शब्दच
प्राण्यांना तुमचा
छान लिहलय
जाहिरातींनी वेडे बनवलं
1% लोकांची 30000000 कोटी
30000000 कोटी ?
हृदयस्पर्शी
खुप छान . "टिन्ग्या "
मस्तच
लिखाण मनापासून आणि सरळ-सोपे
लहानपणी नेहेमी बैलोबा असा होणारा उध्दार आणि क्वचितच होणारे कौतुक