शाली आणि तो

vaibhav deshmukh's picture
vaibhav deshmukh in जनातलं, मनातलं
29 Aug 2019 - 4:28 pm

तब्बल तीस वर्षांनी तो त्याच्या गावाला चालला होता. तीस वर्षात सगळ काही बदलल होत. तो बदलला होता. भोवतालचा परिसर बदलला होता. गाव बदलला होता. एवढच काय पायाखालची वाटही बदलली होती. कच्च्या रस्त्याच्या जागी पक्का रस्ता आला होता. काळाच्या प्रवाहात सगळ काही बदलल होत.
     
मनात विचार करतच तो चालला होता. अंगात सैल कुडता, त्याखाली तशीच सैल आणि ढगळ पँट, वीतभर वाढलेली दाढी. ती त्याने मुद्दाम वाढवली होती. दाढीला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि खांद्याला अडकवलेली शबनम पिशवी. एकंदरीत सगळा साधा आणि सरळमार्गी पेहेराव होता त्याचा. पेहरावाला शोभेल असा गरीब आणि भोळा चेहरा. वयाने आलेले प्रौढपण चेहऱ्यावर दिसून येत होते.
    
तीस वर्षात त्याच्यात आता खूप बदल झाला होता. आता गावात त्याला कोणी ओळखणार नव्हते. एव्हाना त्याला तेच हवे होते. कोणी ओळखू नाही याची त्याने पुरेपूर काळजी घेतली होती. वीतभर वाढवलेली दाढी आणि सैल, ढगळ कपडे त्यामुळेच त्याने परिधान केले होते.
  
काळोख वाढत होता. रस्तावर तो एकटाच होता. रस्ता अपरिचित असला तरी, तीस वर्षांपूर्वी तो या रस्त्यावरून किती तरी वेळा गेला होता. त्यामुळे त्याला तो रस्ता खूपसा अपरिचित असा वाटत नव्हता. परिसर बदलला असला तरी परिसराची मूळ चौकट तशीच होती. त्यामुळे त्याला परिसर परिचित वाटत होता.
  
हवेत गारवा जाणवु लागला. त्याने थैलीतून मफलर काढून कानाला गुंडाळली, खांद्यावरची पिशवी सरळ केली आणि संथ पावले टाकीत तो चालू लागला. चालता चालता पुन्हा तो भूतकाळालात बुडून गेला.
 
त्याच नाव भीमा. गावातील महादू सुतार आणि लता सुतारिन यांचा एकुलता एक मुलगा. लहानपणीच आईचा मृत्यू झाला होता. त्यामुळे बिना माईचा पोरगा म्हणून गावातील सगळे त्याच्यावर माया करायचे. नुकतीच बारावी होऊन शाळा सोडली होती. वीस - बावीस वर्ष वय झाल होत. बाप पिढीजात सुतारकाम करायचा. आणि हा पाटलाकडे सालगडी म्हणून कामाला लागला. लग्नाच वय झाल होत. पण घरच्या गरिबीकडे बघून कोणी पोरगी द्यायला तयार नव्हत. सकाळी सकाळी पाटलाच्या शेतात जायचे, तिथे राब राब राबायचे आणि संध्याकाळी घरी यायचे एवढच नशिबात होत.
 
आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. पाटलाचा सोपान सकाळीच सांगायला आला, "भीम्या लवकर उरक आज पेरणी करायची हाय. पाऊस उघडल आज. तेव्हा पुन्हा जोरात पाऊस पडण्याअगोदर पेरणी उरकून घ्यायची हाय. मी पुढ जातो तू मागून लवकर ये."
  "मी उरकतो लवकर. भाकरी बांधली की निघतो मी. तू हो पुढ, मी आलोच." भाकरी बांधत भीमा त्याला म्हणाला.
   त्याने भाकरी बांधली. घराचा दरवाजा लाऊन तो बाहेर आला. बाजूला रघु धोब्याच घर होत. धोब्याची शाली बाहेर कुडाच्या न्हाणीत आंघोळ करत होती. अचानक ती उभी राहीली. तिची उघडी पाठ भीमाला दिसली. भीमाची वासना चाळली गेली. तिची उघडी गोरी पाठ बघून त्याला कसतरी झाल. अंगात वासनेची मोठी कळ उमटून गेली. शालीने लुगड गुंडाळल. तिने भीमाकडे पाहिल आणि घरात निघून गेली.

पाटलाची पेरणी चार - पाच दिवस चालली. पेरणीमुळे कशालाच सवड मिळत नव्हती. अंगाचा पार मुरडा पडला होता. पण राहून राहून भीमाच्या नजरेपुढे शालीची उघडी पाठ येऊ लागली. त्याच कामात लक्ष लागेना. भूक मेल्यासारखी झाली होती. हातून सारख्या चुका होऊ लागल्या. शालीची उघडी पाठ त्याचा पिच्छा पुरवित होती. एक दोनदा सोपान ने हाटकल पण,"भीम्या तुझ ध्यान कुठ हाय. काम नीट करीना,जेवण पण धड करीना. काय आजारी हायस का?" पण सोपानला कसतरी त्याने निभावून नेल.
  
पाच दिवसानंतर तो घरी आला. कामामुळे अंग दुखत होत. गोधडीत पडल्या पडल्याच त्याला झोप लागली. सकाळ झाली. बाहेर येऊन ओट्यावर बसुन तो दात घासू लागला. धोब्याची शाली आंघोळीची बकेट घेऊन न्हाणीत गेली. तिला भिमान पाहिल. भीमा तिथच बसुन राहीला. कुडाच्या खिंडीतून तो शालीचा देह न्याहाळू लागला. शालीही त्याच्याकडे बघू लागली. शाली एकदम उभी राहिली. भीमा दचकलाच. यावेळेस शालीची पाठ नाही तर तोंड भीमाकडे होत. शाली उसासे टाकून त्याच्याकडे बघू लागली. शालीला पण आता वासनेने ग्रासले होते. ती टक लाऊन भीमाकडे बघू लागली. घरातूनच रघु धोबी बाहेर आला. तशी शाली लुगड गुंडाळून घरात निघून गेली.
 
दिवसभर भीमा घरात झोपून होता. त्याला राहून राहून शालीचा दोन्ही बाजूचा उघडा देह दिसू लागला. त्याचे कशात मन रमेना. खाण्या पिण्यात लक्ष लागेना. फक्त शालीचा देह डोळ्यासमोर येऊ लागला.
    
दिवस मावळला. अंधार पडला. भीमाचा बाप शेतावर मुक्कामाला निघून गेला. भीमा एकटाच गोधडीत पडून होता. रात्रीचे अकरा वाजले असतील, दारावर थाप पडली. भीमाला जाग आली. कोणीतरी बाहेर आले होते. त्याने अंगावरची गोधडी बाजूला केली आणि दरवाजा उघडला. बाहेर शाली उभी होती. तिला पाहून भीमाला नवल वाटल. ती आत आली. त्याने दरवाजा लाऊन घेतला.
"तू मला न्हाणीत उघडी असताना पाहील ना?" शालीन त्याला विचारल.
"नाही. मी नाही पाहील." तो चाचरत उत्तरला.
"भीम्या खोट बोलू नको. मी पाहिल तुला माझ्याकडे हपापलेल्या नजरेने बघताना." ती लाजत म्हणाली. तो ओशाळून हो म्हणाला.
    शाली त्याच्या गळ्यात पडली. भीमान तिला जवळ ओढून घेतल. भीमाच्या मिठीतल्या गरमीने तिचे चित्त उल्हसित झाले. तिची ओढ वाढू लागली. तिने भीमाला घट्ट मिठी मारली. बाहेर पावसाचा जोर वाढू लागला. वातावरणात थंडावा जाणवु लागला. तशे दोघ उल्हासीत होऊ लागले. रात्री उशीरापर्यंत पावसाचा जोर टिकून होता. साखर झोपेच्या वेळेला पाऊस शांत झाला आणि शालीही. पहाटे पहाटे शाली घरी निघून गेली. भीमा सकाळी उशीरापर्यन्त गोधडीतच पडून होता.

  त्या दिवसापासुन रोज रात्री शाली येऊ लागली. ती येण्याची भीमा वाटतच पहात असे. ती आली की भीमाच्या गळ्यात पडायची. सकाळी साखर झोपेच्यावेळी शांत, आनंदी चेहर्‍याने निघून जायची. दोघही मनसोक्त सुख उपभोगु लागली.

पावसाळा संपत आला होता. भीमाला पाटलाच्या वाड्यात काम लागल. भीमा सात - आठ दिवस वाड्यावरच मुक्कामाला थांबला. रात्री झोपताना त्याला शालीची आठवण होत असे. राहून राहून शालीचा देह त्याला आठवू लागला. इकडे शालीला पण झोप लागत नसे. दोघांना रोज एकमेकांच्या मिठीत झोपायची सवय लागली होती.
  
सात-आठ दिवसाच्या कामाने भीमा थकून भागून घरी आला. आज पाटलाने पैसे दिले होते. भिमाने घरी येऊन आंघोळ केली. दुकानात जाऊन शालीसाठी एक गजरा आला. रात्र पडण्याची तो वाट बघू लागला. रात्रीच कसबसं जेवण उरकल. त्याचा बाप शेतावर मुक्कामाला निघून गेला.
    
रात्री दहाच्या सुमारास शाली आली. आल्या आल्या भीमाच्या गळ्यात तिने मिठी घातली. लटक्या रागात त्याला म्हणाली, "किती दिवस त्या पाटलाच्या वाड्यावरच थांबणार होता? इथ तुझी वाट पाहून पाहून माझे डोळे भरून येत होते." भिमा तिला मिठीत घेऊन म्हणाला, "अग पाटलाच्या वाड्यावर काम होत, म्हणुन थांबलो होतो. पण तुझी लई आठवण येत होती मला. तुझ्यासाठी काहीतरी आणल आहे मी."
  ती आनंदाने म्हणाली," काय आणल हाय दाखव?"
तो लाडक्या स्वरात म्हणाला," आधी डोळे बंद कर? "
तिने दोन्ही हातात डोळे बंद केले. त्याने खिशातून गजरा काढला आणि तिच्या केसात लावला. तिला तो गजरा पाहून खूप आनंद झाला. तिने त्याला घट्ट मिठी मारली. दोघांचे देह कधी एकमेकात मिसळले हे त्यांना कळलेच नाही.
  थोड्यावेळाने शाली त्याला म्हणाली, "भीमा तुला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. दोन दिवसापूर्वीच सांगणार होते पण; तू तिकडे पाटलाकडे मुक्कामाला होता, म्हणून नाही सांगता आल."
  "कसली आनंदाची गोष्ट, सांग ना." भीमा तिला म्हणाला.
"भीमा मी गरोदर राहीली हाय." शाली लाजत म्हणाली.
शाली गरोदर आहे हे ऐकताच भीमा चिंताग्रस्त झाला. त्याला भीती वाटू लागली.
" काय रे भीमा काय झाल, तुला आनंद नाही झाला? " ती म्हणाली.
" नाही तस काही नाही. झाला ना आनंद." भीमा अडखळत म्हणाला.
" भीमा आता आपण लवकर लग्न करू. म्हणजे समद्या गावाला हे कळण्या अगोदर आपल्याला लग्न करावच लागेल. नाहीतर माझा बा तुला आणि मला मारूनच टाकीन." शाली चिंताग्रस्त नजरेने त्याला म्हणाली.
" शाले आपण हे सगळ उद्या बोलू, तू आता घरी जा. लई उशीर झाला आहे. उद्या लवकर ये मग आपण  बोलू. " तो विचारमग्न होऊन म्हणाला.
  
शाली निघून गेली. भीमा चिंताग्रस्त झाला. त्याला शालीच बोलण खटकू लागल. त्याला आता त्याच्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला. त्याला शालीच्या बापाचा रागीट स्वभाव माहीत होता. त्याला हे समजल तर तो आपल्याला जिवंत सोडणार नाही. शालीच आपल्याबरोबर तो लग्न पण लाऊन देणार नाही. तिची आणि आपली जात वेगळी आहे. गाव हे लग्न मान्य करणार नाही. उद्या गावात हे कळाल तर गाव पण आपल्याला जिवंत सोडणार नाही. त्याच डोक विचार करून करून सुन्न झाल. काही केल्याने काही मार्ग सापडत नव्हता. त्याच्या डोळ्यात पाणी तरळल. बापाची आठवण काढून त्याला रडू आल. मनात काहीतरी पक्का निश्चय करून त्याने डोळे पुसले आणि तो जाग्यावर उभा राहिला.

पाटलाने दिलेले पैसे त्याने खिशात कोंबले. घरावर एकदा सर्वत्र नजर फिरवली आणि भिमाने गावातून पोबारा केला. तो गावातून पळून गेला. आपल्या मागे आपल्या बापाचे आणि शालीचे काय होईल याचा विचार न करता त्याने पलायन केले. दूरच्या एका शहरात तो आला. गावापासून जेवढ दूर जाता येईल तेवढ तो दूर आला होता. आधी एका हॉटेलात आणि नंतर एका लॉजवर  तो कामाला लागला. पोटभर खायला आणि झोपायला जागा मिळाल्यामुळे त्याला समाधान वाटल. पुढे बापाच काय झाल? शालीच काय झाल? एव्हाना गावाच काय झाल? याची कधीच त्याने विचारपूस केली नाही. आधी आधी त्याला सगळ्यांची आठवण यायची. बापाच्या चिंतेने त्याला झोप यायची नाही. पण शालीच्या प्रकरणामुळे त्याला भीतीने कसतरी व्हायचे. हळू हळू तो सगळ विसरून केला. लॉज वरची नोकरी त्याला चांगलीच भावली. अंग मेहनत काहीच नव्हती. चोरून येणारे जोडपे किंवा प्रवासी लॉज वर थांबायचे. त्यांची सगळी सोय घेण्याच त्याच काम होत. पगार तर मिळायचाच पण वर कमाई पण मिळायची. त्यामुळं त्याला ती नोकरी चांगली मानवली होती. नंतर तो गाव कायमचाच विसरून गेला.
 
महिने, वर्ष सरत गेले. आता तब्बल तीस वर्षांनंतर त्याला गावाची आठवण झाली होती. गावाची ओढ त्याला जाणवु लागली. लॉज वरची हीनकस नोकरी करून करून तो कंटाळला होता. गावात जाऊन पहावे. बाप, शाली जिवंत असतील का? गावाचे काय झाले असेल? असे प्रश्न त्याला आता राहून राहून पडू लागले. त्याला आता गावाकडे जाण्याची तीव्र ओढ लागली. आणि त्याने गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. पण गावाकडे गेल्यावर आपल्याला कोणी ओळखू नाही याची खबरदारी घेण्याचे त्याने ठरवले. कारण शालीच्या प्रकरणाची अजून ही त्याला धास्ती वाटत होती. त्याने वीतभर दाढी वाढवली,तशाच झुपकेदार मिशा वाढवल्या आणि सैल, ढगळ कपडे परिधान केले. आता त्याला कोणीच ओळखू शकणार नव्हते. तसपण त्याने गाव सोडला तेव्हा तो चोवीस वर्षांचा होता. आणि आता तो चौपन- पंचावन वर्षाचा झाला होता. चेहरा, शरीर बदले होते. प्रौढपणा चेहर्‍यावर आला होता. त्याचा बाप पण त्याला आता ओळखले याची शाश्वती नव्हती. त्यामूळे आपल्याला कोणी ओळखेल हे त्याला शक्य वाटत नव्हते. तो निर्धास्त होऊन गावाकडे मार्गस्थ झाला होता.
      
चालता चालता त्याला ठेस लागली. तसा तो गतकाळातून जाग्यावर आला. त्याने हातातल्या घडीकडे पाहिले. रात्रीचे दहा वाजून गेले होते. हवेतला गारवा अजून वाढला होता. काळोख बराच दाटला होता. अजून एक मैलाचे अंतर बाकी असेल अस मनाशीच बोलून, तो जोरात पावले टाकीत चालू लागला. गावातील पिवळ्या लाईटचे दिवे दिसू लागले. गाव नजरेच्या टप्प्यात आला होता. गावात आपण कशासाठी आलो आहोत? इथे राहून काय करायचे? अस काहीच त्याने ठरवले नव्हते. केवळ ओढ म्हणून तो पुन्हा गावात परतला होता.

गाव नजरेच्या टप्प्यात आला. रात्रीचे अकरा वाजून गेले होते. आता गावात कोणी जागे नसेल. रात्रभर कोठे थांबावे? याचे कोडे त्याला पडले. मग अचानक त्याला आठवले. गावातील मठात आपली राहण्याची सोय होईल. तो तडक गावात मध्यभागी असलेल्या मठात आला. मठाचे रूंद आणि जाड दार आतून बंद होते. त्याने बाहेरील कडी जोरात आपटली. कडीचा मोठा आवाज सगळीकडे घुमला. बराच वेळ वाट पाहून त्याने पुन्हा जोरात कडी वाजवली. आतून कोणीतरी दरवाजा जवळ आल्याचे जाणवले. कर्कश्श आवाज करत एका भगवे वस्त्र धारण केलेल्या माणसाने आतून दार उघडले.
  "कोण तुम्ही काय हवे?" त्या भगवे वस्त्र धारण केलेल्या माणसाने विचारल.
" मी जयदेव गायके. तिकडे सातपुडा भागातून आलोय. ज्योतिषी आहे मी."
   त्याने आपली ओळख ज्योतिषी म्हणून सांगितली. त्याने त्याला आत घेतले. आणि दरवाजा लाऊन घेतला. मठ मोठा आणि अवाढव्य होता. तिथल्या एका रूम मध्ये त्याच्या मुक्कामाची सोय करण्यात आली. जेवण करून तो रूम मध्ये झोपी गेला. दिवसभरचा प्रवास आणि रात्रीची पायपीट याने तो दमला होता. अंथरुणात पडल्या पडल्या त्याला झोप लागली.
  
मध्यरात्री अचानक उठून तो बाहेर आला. मठाचे ते रूंद दार उघडून तो बाहेर आला. सगळीकडे अंधार पसरला होता. तो नेमका बाहेर कशाला आला याच त्याला कोड पडल होत. हवेत गारवा वाढला होता. त्याने खांद्यावरची मफलर कानाला गुंडाळली आणि संथ पावलं टाकीत पुढे चालू लागला. तो चालत चालत बराच पुढ आला. त्याला पुढे थोड्या अंतरावर एक शेकोटी पेटलेली दिसली. शेकोटी भोवती चार माणसे शेकत होती. शेजारीच एक झोपडी होती. त्याला शेकोटी बघून हायस वाटल. या अशा गारव्यात चांगल अंग गरम करायला शेकोटी भेटली या आनंदात तो झपाझप पावले टाकीत तिथे पोहोचला. शेकोटी भोवती चार माणसे होती. त्यातल्या एकाने त्याला विचारल, "काय पाव्हणे नवीन दिसताय इकडे? एवढ्या रात्रीला इकड
कसे काय?"
"हो नवीन मी आहे या भागात. तिकडे सातपुडा भागातून आलोय. ज्योतिषी आहे मी. भविष्य बघतो लोकांचे. फिरतीवर असतो सारखा. असाच फिरत फिरत आलो इकडे. मठात उतरलोय मुक्कामाला. झोप लागेना म्हणून आलो इकडे जरा फिरत. " तो त्या चारही जणांचे चेहरे न्याहाळीत बोलला. त्याला ते चेहरे परिचित वाटत होते. त्याच्या अगदी समोर बसलेला म्हातारा शालीचा बाप रघू धोबी होता. दुसरा उजव्या अंगाला बसलेला त्याचा पोरगा पांडू धोबी होता. डाव्या अंगाला गावातील वारीक बंड्या होता. आणि चौथ्या माणसाचा चेहरा पाहून तर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. तो चौथा माणूस त्याचा बाप होता. महादू सुतार. त्या चौघाला पण त्याने ओळखले होते. पण एका गोष्टीचे त्याला राहून राहून आश्चर्य वाटत होते की, तीस वर्ष झाले तरी त्यांच्या चेहऱ्यात बदल झाला नव्हता. गाव सोडला तेव्हा दिसत होते तसेच अजुनही त्यांचे चेहरे दिसत आहे. त्याने डोक्याला खूप ताण दिला पण याचे उत्तर त्याला सापडेना. शेवटी त्याने तो नाद सोडला. होत कधी कधी, नाही बदलत काही चेहरे अशी मनाची समजूत घालून तो शेकू लागला. शेकता शेकता आपल्याला कोणी ओळखत का? याचा तो अंदाज घेऊ लागला. पण कोणीच त्याला ओळखल नाही. कोणाच्याही चेहर्‍यावर त्याला ओळखीचे भाव दिसले नाही. त्याला ते बघून आनंद झाला. दाढी, मिशा आणि सैल कपडे याचा फायदा झाला हा विचार त्याच्या मनात दाटून गेला. तो त्याने मनोमन सुखावला.
   
मग त्यांच्या सोबत तो इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागला. त्याने चांगल अंग शेकून घेतल. पाठ जाळाकडे करून पाठही चांगली शेकून घेतली. आपल्याच बापासमोर आपण बसलो आहोत. त्याला आपण ओळखल पण; त्यानी आपल्याला थोडपण ओळखल नाही. या विचाराने त्याला मनातल्या मनात हसू येऊ लागले. त्याने पुन्हा जाळाकडे तोंड केले.
"पाव्हन चहा घेणार का?"
शालीच्या बापाने त्याच्याकडे पाहात विचारल.
त्याने मानेनेच होकार दिला.
" ये पोरी पाव्हन आल हायेत चहा घेऊन ये." रघू धोब्याने झोपडीकडे तोंड करून आवाज दिला.
  
त्याची उत्सुकता चाळली गेली. धोब्याची पोरगी म्हणजे शाली चहा घेऊन तर नाही येणार? असा प्रश्न मनात उमटून गेला. थोड्या वेळाने एक वीस-बावीस वर्षाची पोट वाढलेली पोरगी हातात चहा घेऊन आली. पोटुशी असल्यामुळे पोट मोठ वाढलेल होत. ती जवळ आली. शेकोटीच्या उजेडात तिचा चेहरा पाहून त्याला प्रचंड धक्का बसला. सगळ जग आपल्या भोवती गरगर फिरत असल्याचा त्याला भास होऊ लागला. हे कस शक्य आहे? हा प्रश्न मनाला हजारो इंगळ्या डसाव्यात तसा डसु लागला. ती शाली होती. अगदी होती तशीच होती. गाव सोडला तेव्हा होती अगदी तशीच होती. एव्हाना त्याला चांगल आठवत, त्या दिवशी तिने घातलेले कपडे पण तेच होते. सगळी तशीच होती. फक्त आता पोट वाढल होत. तिच्या हातून चहा घेताना त्याचा हात थरथर कापू लागला. एवढ्या थंडीत पण घाम आला होता अंगाला. त्याला तिच्या डोळ्यात कुठलेच ओळखीचे भाव दिसले नाही. त्याला सगळ्या गोष्टी कोड्यात टाकू लागल्या. या चारही लोकांच्या वयात फरक दिसत नव्हता,शाली ही तशीच दिसत होती. त्याने डोक्याला खूप ताण दिला. पण काहीच उत्तर सापडेना.
" पाव्हन ही माझी लेक शाली हाय. पोटुशी हाय. देवाण लई वाईट केल तिच्यासोबत."  रघू धोबी हताश स्वरात म्हणाला.
"हा महादू सुतार हाय, त्याच घर आहे इथे बाजूला."
तो महादू सुताराकडे बोट दाखवित सांगू लागला, "त्याचा पोरगा होता भीमा. तसा तो लई गुणी होता अस सगळ गाव म्हणायचा पण ;तो तर महा चलाख निघाला. त्याच सूत जमल होत या शालीसंग. ती दोघ रोज रात्रीला मुकाट्याने एकमेकांना भेटायचे. मग शालीला त्यापासून दिवस गेले. शालीने त्याला तस सांगितल. हे ऐकून तो गडी घाबरून गेला. आणि कशाचाच विचार न करता शालीला पोटुशी करून गाव सोडून पळून गेला."
म्हातार्‍याला एवढ सांगताना पण धाप लागली. जरा दम काढून तो पुढ बोलू लागला.
"तो पळून गेला पण इकडे शालीच पोट दिवसागणिक वाढू लागल. सगळ्या गावाला कळाल ती पोटुशी हाय म्हणून. लग्नाआधी पोरगी पोटुशी राहिल्यामुळे सगळा गाव आम्हाला    छि-थु करू लागला. घराबाहेर पडण अवघड झाल आम्हाला. तीला मार देऊन विचारल्यावर तिने पोराचा बाप भीमा आहे अस सांगितल. तो हरामी तर पळून गेला होता. आमच जगन वंगाळ झाल होत. एक दिवस शेजारच्या पाटलाच्या जुन्या विहिरीत शालीच फुगलेल मढं सापडल. शालीन जीव दिला होता. तिचा तो देह पाहून आम्हाला लई दुःख झाल. आम्ही सगळ्यानी औषध पिऊन जीव दिला. आमचा सगळ खानदान संपल. त्या भीम्याला तर काही करता आल नाही याच दुःख होत. मेल्यावर आम्ही भीम्याच्या बापाचा जीव घेतला. घरात झोपलेला असताना या महादू सुताराचा मी गळा दाबून जीव घेतला. त्याला आमच्या सोबत या अनोख्या जीवनात घेऊन आलो. आम्ही सगळे तीस वर्षापासुन रोज इथ रात्री शेकोटी पेटून बसतो. रोज तुझी वाट बघत असतो. एक ना एक दिवस तू येशील हे माहीत होत आमच्या सगळ्याना. तीस वर्षाची आमची मेहनत आज पुरी झाली. भीम्या तू इथ आलाच."
म्हातार्‍याचे ते बोलणं ऐकून त्याला सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. त्याला भीतीने ग्रासून टाकले. आपण फसलो आहोत याची जाणीव त्याला झाली. हळूहळू ते चौघ आणि शाली त्याच्या जवळ येऊ लागले. आता त्यांचे चेहरे हिडीस आणि भयानक दिसू लागले. शाली पाण्याने फुगून मोठ झालेल दढ घेऊन त्याच्याकडे सरकू लागली. अचानक त्या सगळ्यांनी त्याच्यावर एकदम झडप घातली.
   तो अचानक झोपेतून उठला. घामाने सगळ अंग भिजल होत. एवढ भयानक स्वप्न त्याला कधी उभ्या आयुष्यात पडल नव्हत. तो मठाच्या खोलीत झोपलेला होता. त्याला पडलेल्या त्या स्वप्नाचा काहीच बोध होईना. रघू धोबी, त्याचा बाप आणि शाली त्याला स्वप्नात दिसली होती.
  सकाळी सकाळी मठातील आरतीने त्याला जाग आली. रात्रीच्या स्वप्नाचे मळभ काही प्रमाणात कमी झाल्यासारखे जाणवले. रात्रीचा तो भगवे वस्त्र धारण केलेला माणूस त्याच्याकडे आला.
"काय ज्योतिष बुवा झोप झाली का? चांगली झोप लागली ना?" त्याने सहज विचारल.
"हो झाली ना झोप. चांगली लागली झोप." तो आळस देत म्हणाला.
त्याने आंघोळ केली. मठातील देवाच दर्शन घेऊन तो गावात फेरफटका मारायला निघून गेला.
  गावातल्या मारुतीच्या मंदिराजवळ तो आला. बरेच लोक मंदिराच्या ओट्यावर बसलेले होते. तो त्यांच्यात जाऊन बसला. तो ज्योतिषी आहे हे कळल्यावर त्याच्या भोवती सगळेजण गोळा झाले. त्याला भविष्य सांगा म्हणू लागले. इथेच त्याने भाव खाल्ला. त्याला गावचा सगळा इतिहास माहित होता. सगळ्यांची माहिती होती. त्याचा फायदा घेऊन तो सगळ्यांचा भूतकाळ अचूक सांगू लागला. पुढे भविष्यात काय होईल हेही अंदाजाने सांगू लागला. लोक त्याच्या बोलण्याला भुलून गेले. भूतकाळातील सगळ्या गोष्टी त्याने अचूक सांगितल्या होत्या. लोक त्याला संत, महात्माचा अवतार समजू लागले. हळु हळु सगळ्या गावात त्याची ख्याती पसरली. त्याला सगळा भूतकाळ, भविष्यकाळ समजतो यावर त्यांचा विश्वास बसला. त्याला मठात रहायला जागा मिळाली. त्याला आनंद झाला. पुढील आयुष्याची चिंता मिटली होती. आता उरलेले सगळ आयुष्य इथेच काढाव असा पक्का निर्धार त्याने केला. गाव आपल्याला मोठा संत समजू लागले आहेत. आता मस्त संत-महात्म्या सारख आयुष्य जगायच. गावाकडे येऊन आपण चांगलच केल याची त्याला मनोमन खात्री पटली. तो आता भगवे कपडे परिधान करू लागला. मठात पण त्याला मान सन्मान मिळू लागला. रोज त्याच्याकडे गावातील, परगावातील लोक भविष्य बघायला येऊ लागले. त्याच्या दर्शनाला लोक लांबून लांबून येऊ लागले. त्याची बरीच कीर्ती पसरली होती.
   असाच एका सकाळी तो त्याच्या खोलीत बसला होता. एका म्हातारा काठी टेकत टेकत त्याच्याकडे आला. त्याच बरच वय झाल होत. त्याने त्याच दर्शन घेतल आणि शेजारी बसला. " ज्योतिष बुवा तुमच लई नाव हाय म्हणून आलो तुमच्याकडे. म्हणलं दर्शन घ्याव तुमच. थोड पुढच भविष्य पण बघाव म्हणून आलोय काठी टेकत टेकत." म्हातारा त्याच्याकडे बघत म्हणाला.
त्याला त्या म्हातार्‍याचा चेहरा काहीसा ओळखीचा वाटत होता. त्याने थोडा डोक्याला ताण दिला. आणि त्याला आश्‍चर्य वाटल. तो म्हातारा शालीचा बाप होता. रघू धोबी होता तो.
रघू धोब्याचा हात त्याने हातात घेतला. त्याने रघू धोब्या सगळा मागचा इतिहास सांगितला. शालीच सगळ सांगितल. म्हातारा अवाक होऊन त्याच्याकडे बघत होता..

त्याने हळूहळू म्हातार्‍याला शालीच आणि त्याच्या बापाच काय झाल हे विचारल. म्हातारा बोलू लागला, "शाली गरोदर होती. लांब शहरात जाऊन तिच्या पोटातल पोरग आम्ही पाडून आणल. गावात लई अब्रू गेली आमची. पण काळाच्या ओघात सगळ विसरून गेलो आम्ही. त्यानंतर शाली या मठात कामाला लागली. मठात पाणी भरण, झाडून काढण, स्वयपाक करन अशी ती कामं करू लागली. पण या मठात विचित्र घटना घडू लागल्या. एका दिवशी शालीचा सगळा उघडा असलेला देह सापडला. तिच्यावर कोणीतरी अत्याचार करून तिला मारून मठाच्या पाठीमागे टाकल होत. शालीनंतर गावातल्या चार पोरी अशाच मठाच्या पाठीमागे उघड्या मरून पडलेल्या सापडल्या. मला लई दुःख झाल. माझ्या पोरीच्या नशिबात फक्त दुःखच लिहिल होत. आधी त्या भीम्याने तिला पोटुशी करून पोबारा केला, आणि त्यानंतर कोणीतरी तिच्यावर बलात्कार करून तिचा खून केला. " म्हातारा डोळ्यात पाणी आणून सांगत होता. पाण्याने म्हातार्‍याचा सगळा चेहरा ओला झाला. डोळे पुसून म्हातारा पुढे बोलू लागला,"
माझ्या पोरीचा त्या भीमावर लई जीव होता. तो एवढा तिला पोटुशी करून पळून गेला पण तिची त्यावरची माया थोडीपण कमी झाली नव्हती. ती सारख म्हणायची," माझा भीमा एकदिवस नक्की परत येईन. आल्यावर माझ्यासंग लगीन करीन. तो येइन परत." माझी पोरगी मरेपर्यंत त्याची वाट पाहत होती. पण त्या भीम्याला काही पाझर फुटला नाही. तो एकदा गेला तो कधीच परत आला नाही."
म्हातार्‍याचा एक एक शब्द त्याला अतीव दुःख देऊ लागला. त्याला शालीच्या प्रेमाची आठवण होऊ लागली. शालीसाठी आपण थांबायला पाहिजे होत अस राहून राहून त्याला वाटू लागल. त्याने डोळ्यात येणारे अश्रू मोठ्या मुश्किलीने थोपवले. शालीचा खून ज्याने पण केला असेल त्याला अजिबात सोडणार नाही. मठातील जे काही काळेबेरे आहे ते मी शोधून काढील. माझ्या शालीला न्याय देईल. त्याने मनात पक्का निर्धार केला. तेव्हा त्याला बर वाटल.
   म्हातारा जागेवरून उठला. हात जोडले आणि त्याला म्हणाला, " ज्योतिष बुवा माह्या शालीचा खुनी शोधून काढा. मेल्यावर तरी तिला न्याय मिळून द्या." एवढ बोलून म्हातारा चालू लागला. त्याने म्हातार्‍याला थांबून त्याच्या बापाविषयी विचारल. म्हातारा म्हणाला, "भीम्या पळून गेल्यावर दोन वर्षानी त्याचा बाप आजारपनाने गेला. भीम्या पळून गेल्यापासून लई हाय खाल्ली होती त्याने." अस सांगुन म्हातारा निघून गेला. त्याच्या डोळ्यात बापाच्या आठवणीने पुन्हा एकदा पाणी दाटून आले.
म्हातारा निघून गेल्यावर त्याने अश्रू पुसले. मनात एक पक्का निर्धार केला. काही झाल तरी मठात घडणार्‍या घटनांचा मागोवा घेणार. जे काही प्रकरण असेल ते उकरून काढणार. एका निर्धाराने तो झोपेच्या आधीन झाला...

रात्रीच्या दोन वाजले असतील कसल्यातरी आवाजाने त्याला जाग आली. त्याने डोळे उघडले. खोलीभर कसलातरी प्रकाश पसरला होता. त्याने दिव्याकडे पाहिले पण दिवा विझलेला होता. मग हा प्रकाश कोठून येत आहे? त्याला आश्‍चर्य वाटल. तो जागेवरून उठला. सगळया खोलीत त्याने एक चक्कर मारली. पण त्याला कुठेच काही सापडेना की, ज्यातून तो प्रकाश येईल. अचानक पाठीमागे एक अंधुक आकृती त्याला प्रकट होताना दिसू लागली. तो घाबरून पाठीमागे सरकला. त्याला काय होतय काहीच कळेना. तो घाबरून गेला. त्या अंधुक आकृतीला आता एक रूप येऊ लागले. पुढचे दृश्य पाहून त्याला आश्‍चर्य वाटले. ती शाली होती. पोट वाढलेल आणि चेहर्‍यावर असणारा निरागसपणा त्याला दिसला. अचानक ती आकृती हालू लागली. तिच्यामधून आवाज येऊ लागला, "भीमा मला वाचव! भीमा लवकर ये, हे नराधम माझ्या अब्रूला हात घालत आहेत. भीमा धाव!" अचानक आवाज शांत झाला. आणि पुन्हा एकदम एक जोरात आर्त किंकाळी शालीने फोडली. पुन्हा सगळीकडे शांतता पसरली. त्या शांततेला चिरत कोणाच्यातरी कण्हण्याचा आवाज त्याला ऐकू येऊ लागला. तो जोरात धावत त्या आवाजाकडे गेला. तिथले दृश्य पाहून त्याला ढवळून आल. तिथे शाली निर्वस्त्र पडली होती. तिच्या अंगावर जागोजागी जखमा दिसत होत्या. कोणीतरी अत्याचार केल्याच्या खुणा तिच्या अंगभर दिसत होत्या. ती वेदनेने तडफडत होती. तिने इशार्‍याने त्याला जवळ बोलावलं. तो जवळ गेला. "भीमा मला वाचव,मला जगायच हाय. मला तुझ्यासोबत रहायच हाय. मला वाचव. तुझी लई वाट पाहिली. मला वाचव." ती हताश होऊन म्हणू लागली. तिने भीमाला मिठी मारली आणि त्याच्या मिठीत तिने दम तोडला.
    भीमा हडबडून जागा झाला. अजून एक स्वप्न त्याला पडल होत. त्या स्वप्नाचा अर्थ तो लाऊ लागला. शाली आपल्याला काहीतरी सांगत आहे. तिला काहीतरी सांगायच आहे. तिच्यावर जो अत्याचार झाला आहे. त्याच्याबद्दल तिला काहीतरी सांगायच आहे. अप्रत्यक्षपणे तिच्या मारेकऱ्यांचा  शोध घ्यायला ती सांगत आहे. तो जागेवरून उठला. बाहेर देवळात आला. देवाच्या मूर्तीकडे बघून मनात काहीतरी निर्धार केला आणि तो मठाचे ते रूंद दार उघडून बाहेर पडला..

                        (क्रमशः)

तुमचा अभिप्राय नक्की कळवा.
 
     - वैभव नामदेव देशमुख.
    

कथालेख

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

29 Aug 2019 - 5:05 pm | टवाळ कार्टा

वाचतोय

तमराज किल्विष's picture

29 Aug 2019 - 5:41 pm | तमराज किल्विष

भारी आहे.

कुमार१'s picture

29 Aug 2019 - 6:04 pm | कुमार१

चांगली आहे.

पियुशा's picture

29 Aug 2019 - 6:39 pm | पियुशा

मस्त !

जॉनविक्क's picture

29 Aug 2019 - 7:20 pm | जॉनविक्क

आधी नेहमीच्या रूळावरून गाडी जातेय असे वाटत होते पण आता काही सांगता येत नाही. लेखन शैलीओघवती आहे त्यानेच निम्मी बाजी मारली.

उपेक्षित's picture

29 Aug 2019 - 8:22 pm | उपेक्षित

उत्तम कथा लिहिताय, पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

vaibhav deshmukh's picture

29 Aug 2019 - 9:01 pm | vaibhav deshmukh

सर्वांचे मनापासून आभार..

जॉनविक्क.. सर.. आता धन्यवाद सर म्हणू शकतो ना? . बाकी आता STA नाही टाकलं बर का?.. लोभ असावा..

धर्मराजमुटके's picture

29 Aug 2019 - 9:07 pm | धर्मराजमुटके

ही कथा अगोदर कोठे प्रकाशित केली आहे काय ? वाचल्यासारखी वाटते म्हणून विचारले. कथा आवडली. मागील कथांवर वा चकांचे अभिप्राय लक्षात घेऊन आवश्यक बदल करत आहात ही चांगली गोष्ट आहे.

vaibhav deshmukh's picture

29 Aug 2019 - 9:28 pm | vaibhav deshmukh

हो, pratilip app आणि Facebook वर टाकलेली आहे.
अभिप्राय लक्षात घेऊन जमतील तेवढे बदल करतोय... धन्यवाद..

जालिम लोशन's picture

29 Aug 2019 - 9:12 pm | जालिम लोशन

+१

जालिम लोशन's picture

29 Aug 2019 - 9:12 pm | जालिम लोशन

+१

नँक्स's picture

30 Aug 2019 - 9:39 am | नँक्स

चांगली आहे.

संजय पाटिल's picture

30 Aug 2019 - 9:59 am | संजय पाटिल

वाचतोय...

भारी लिहिताय, दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत

भारी लिहिताय, दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत

स्वलिखित's picture

31 Aug 2019 - 3:11 pm | स्वलिखित

आवडले लेखन
मध्ये मध्ये उगीव्ह एक लक्षाचा चित्रपट आठवून गेला
असो

vaibhav deshmukh's picture

31 Aug 2019 - 5:33 pm | vaibhav deshmukh

सर्वांचे आभार..

दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत

दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत

श्वेता२४'s picture

22 Sep 2022 - 2:37 pm | श्वेता२४

पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे.

कर्नलतपस्वी's picture

24 Sep 2022 - 5:17 pm | कर्नलतपस्वी

भारीच वळणे आणी पिळे (twist and turn) आहेत.

शेकोटीवर गोष्ट संपेल असे वाटले होते पण पुन्हा कुतूहल चाळवले. पहिल्यांदा वाचली वाटते. तुम्ही खुलासा केला आहेच.

एवढे झाले तरी पुढील भागाची उत्सुकता टिकून आहे.
लेखनशैली मस्त. पुढचा भाग टाका. काळ्या शक्तीचा विजय होऊ न देता भिम्याला पटकणी देता येते का बघा. शालीच्या बापाचा डबल रोल हाय का?

वाचकाच्या डोक्याचा गोइदां होणे हेच तुमच यश आहे.

नेहमीप्रमाणे गूढ व भितीदायक.पण आता ही शैली खूपच लक्षात आल्यामूळे कंटाळा आलाय . जरा अद्भूत व भयंकर घडणे थांबवून दुसरे विषय लिहिल्यास बदल वाटेल. शेवट धक्कातंजत्राच्या कथा मला खूप आवडतात, मग गूढकथा असो किंवा प्रेमकथा छान वाटतात वाचायला.

vaibhav deshmukh's picture

26 Sep 2022 - 8:55 am | vaibhav deshmukh

ही कथा जुनी आहे.
नवीन टिपण्या आल्यामुळे वर आली असेल बहुतेक.