दुपारची झोप..
लेखनविषय (Tags)
जगातली सर्वोत्तम सुखे फुकटात मिळतात असं कोणीतरी म्हटलं आहेच. तर फुकट मिळणाऱ्या सुखांपैकी "दुपारची झोप" ही मला अत्यंत प्रिय आहे. माझ्या दृष्टीने ती एक जीवनावश्यक गोष्ट आहे. दुपारचे असे मस्त जेवण झालेले असावे. पोट तृप्त असावे. मन अर्धसमाधी अवस्थेत गेलेले असावे. डोळ्यावर हलकेच झोप उतरावी आणि पापण्या अलगद मिटाव्यात.
फक्त अर्धा तास!... अर्धा तास ब्रह्मानंदी टाळी लागावी आणि आपण निद्रादेवीच्या अधीन व्हावे.
तेवढी अर्धा तास झोप मिळाली की कसे फ्रेश वाटते. मला दुपारच्या वेळी २/२ तास झोपणे पसंत नाही. फक्त अर्धा तास झोप बस झाली. रात्री अकरा पर्यन्त फ्रेश राहायला होते या झोपेमुळे.
एकदा माझी एक "आरोग्यप्रेमी रामदेवबाबा" मैत्रीण दुपारची जेवायला आली. जेवणे झाली. मला रोजच्याप्रमाणे झोप यायला लागली. मी तिच्याशी त्याच पेंग आलेल्या अवस्थेत गप्पा मारण्याचा प्रयत्न करत होते. मधूनच अतिशय जोरात डुलकी येऊन असंबद्ध बोलत होते.
"आपण जरा पडूया का?पडल्यापडल्या गप्पा मारूया का?" मी भीड सोडून तिला हताश स्वरात विचारले. त्यावर ती निक्षून म्हणाली. "छे छे. दुपारी अजिबात झोपायचं नाही. वजन वाढतं."
माझ्या वाढलेल्या वजनाकडे बघूनच ती बोलत होती हे उघड होतं. दुपारच्या झोपेने वजन वाढणार असेल तर ते मला "सर आंखोपर" होतं.
मी अपमान गिळून म्हणाले, "म्हणजे डायरेक्ट झोपायचं नाही गं . उगीच जरा पाठ टेकायची. सकाळपासून कामं चालली आहेत न! एक माणूस जेवायला आलं तरी पान सजवावे लागतं."
कसं कुणास ठाऊक तिला पाझर फुटला. म्हणाली,"चल पडूया. पण झोपायचं नाही. दुपारी झोपलं की बुद्धी मंद होते.
मला आता मी "विशेष" चॅलेंज्ड व्यक्ती वाटायला लागले. दुपारच्या साध्या झोपेची एवढी मोठी किम्मत ?
ती पुढे म्हणाली,"इतक्या दिवसानी भेटतोय. मला तर किती गप्पा मारू आणि किती नको असे झालंय. झोपतेस कसली?"
नुसतं पडायच ह्या विचारनेही मी प्रफुल्लित झाले. तिच्याबद्दल प्रेमाचं भरतं आले. तिने अशा वेळी मला नवीन श्वसनप्रकार शिकवायला न घेतल्याबद्दल मी पेंगत्या डोळ्यांनी तिचे मनात आभार मानत म्हटलं,"ओके. नुसतं पडूया तर पडूया. झोपायचं नाही."
आम्ही पडलो. कसल्या गप्पा नि कसले काय? तिसर्या मिनिटाला मी झोपून गेले. उठल्यावर बघितले तर मैत्रीणही गाढ झोपली होती. घोरणं हा एकमेव श्वसनप्रकार चालू होता. मला डोळाभर आनंद झाला. कसली वजनवाढ नि कसली मंद बुद्धी.. !!
दुपारची झोप बुडू नये म्हणून मी दुपारी कुणाकडे जात नाही. दुपारचा सिनेमा, दुपारचे नाटक पाहत नाही. एखाद्या लग्नघरात जेवण झाले की लगेच झोपायला स्वताच्या घरी येते. एवढं कशाला, मी नोकरी करत असतांनाही,माझी झोप मॅनेज केली. ओ हो होहो. मी कामावर असताना झोपा काढत होते असा गैरसमज करून घेऊ नका. कसं ते सांगते. दुपारचा डबा खाऊन झाला की, मी माझ्या केबिनच्या दाराला आतून कडी लावून घ्यायची आणि टेबलावर डोके ठेवून दहा मिनिटे झोप काढायची. सुदैवाने वेगळी केबिन असल्यामुळे ते शक्य होतं.
मग लंच अवर संपण्याच्या वेळी केबीनचे दार उघडायची.
आमच्या ऑफिसात वॉशरुमखेरीज खरोखरची "रेस्ट"रूम नव्हती, लेडीज रूम नव्हती. म्हणून हा खटाटोप मला करायला लागायचा. अर्थात ऑफिसात आडवे न होता बसून झोपावे लागायचे ही एक गैरसोय होती. पर चलता है. मी कुठेही ,कशीही, सरळ, उभी ,आडवी, तिरकी झोपू शकते ही तर माझी खासियत आहे. माझी कसलीच अडचण होत नाही. मी प्रेमात पडले तेव्हाही माझी "मुझे नींद न आये "अशी अवस्था झाली नाही. किंवा "डोळ्याला डोळा म्हणून लागला नाही बाई" अशी त्रासिक तक्रार मी कधीच करत नाही. बोरिंग कार्यक्रमांचा ,भाषणांचा, मला त्रास होत नाही. कारण मी त्यावेळी मस्त झोप काढते. आय लव दुपारची झोप. पूर्णब्रह्म असे अन्न पोटात गेल्यानंतर येणारी दुपारची झोप माझी जीवाभावाची सखी आहे.
तळटीप: याखेरीज रात्रीची झोप ही हवीच हं..
प्रतिक्रिया
मस्तं खुसखुशीत लिहिलंय :)
पॉवर नॅप आवश्यक आहे.
घोरणं हा एकमेव श्वसनप्रकार
मस्त
बाकी लेख मस्तच. आणि त्याची तळटिपही :)
+1
"आरोग्यप्रेमी रामदेवबाबा" मैत्रीण
खुसखुशीत लेख
प्रत्यक्ष झोपेपेक्षा जडत्वाचा
आजीबाई द्या टाळी...माझा जिव्हाळ्याचा विषय काढलात.
मस्तच लिहीलय
नशीबवान आहात..
जीवाभावाच्या विषयावरचा
कसली वजनवाढ नि कसली मंद बुद्धी.. !!+१,००,००० उर्फ लाखाची गोष्ट. दुपारची झोप न येणार्या आणि/किंवा न घेऊ शकणार्या मंडळींनी पसरवलेली अंधश्रद्धा आहे ती ! रात्रीची आणि दुपारची, दोन्हीही झोपा नियमितपणे घेऊनही, कोणीही माझ्यावर वरील आरोप करू शकलेला नाही ! ;)दुपारची झोप
लय भारी लिहिलंय जिव्हाळ्याचा
हायला
प्रेयसी ठेवावी तशी
मूळ लेख आणि
दुपारच्या झोपेचा मला
आभार..
जिव्हाळ्याचा विषय आहे माझ्या
लेख छानच लिहीलाय.
नशीबवान आहात. मला दुपारची काय
ज्या लोकांना पडल्या पडल्या
सुमेरियन- मलाही अनेकदा
ज्या लोकांना अंथरुणावर पडल्या
अगदी अगदी
झोप वाटता येते का?
मस्तच!