वाळूचे विरहगीत

Primary tabs

मायमराठी's picture
मायमराठी in जे न देखे रवी...
7 Aug 2019 - 10:21 pm

।। वाळूचे विरहगीत ।।

उन्हात चमके साज रुपेरी,
खेचत नेई ओढ ना टळे।

पसरुनी चमचम धरतीवरती,
पाहुनी रात्री चांदही चळे।

उधाण घेऊनी नायक येई,
भिजवुनी जाई अंगही बळे।

राग न यावा यात तिलाही,
सरसर लाटेमागुनी पळे ।

अर्ध्यामुर्ध्या खुणांत रुतवी,
निरोपांचे शंखशिंपले ।

जीव मोहरे येता भरती,
युगायुगांचा नवस फळे।

सुना किनारा होता ओहोटी,
मुकी वेदना गात्रं छळे ।

सोडुनी जाई घाव जिव्हारी,
त्या लाटांना हे न कळे ।

वाहत येई गाळ सुगंधी,
ज्या वासाचे तिस लळे ।

खेळ मांडला पृथ्वीवरती,
खेळणी वाळू सागर सगळे ।

रित्या नद्या होत तरीही,
गोड होई खारे सगळे ।

अजाण सागर याच रहस्यी,
वाळूमधुनी विरह ओघळे ।

पाय आपले जात रुतुनी,
मन होई मोकळे मोकळे ।

दिसात होती दोनच भेटी,
अन् दोनदाच विरे सगळे।

मिसळुनी जाई कणाकणाने,
सदेह मुक्ती उगा न मिळे ।

- अभिजीत श्रीहरी जोगळेकर

कविता

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

8 Aug 2019 - 8:59 am | चौथा कोनाडा

वाह, छान. सुरेख ! आवडली.
( कवितेतील मात्रा, वृत्त, गेयता यातले फारसे काही कळत नसल्यामुळे माझा पास, जाणकार प्रकाश टाकतीलच !)


अर्ध्यामुर्ध्या खुणांत रुतवी,
निरोपांचे शंखशिंपले ।


हे भारी !

(एक शणखा: - अभिजीत श्रीहरी जोगळेकर हे कोण आहेत ? मिपाकर आहेत ? की ही कविता कॉ-पे आहे ?)

मायमराठी's picture

8 Aug 2019 - 11:15 am | मायमराठी

मी अभिजीत श्रीहरी जोगळेकर, मिपाकर आहे मायमराठी या नावाने. मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मात्रा, वृत्त, गेयता यातलं मलाही फारसं कळत नाही. आवडत्या शब्दांना नकळत ठेका धरला जातो, मान डोलू लागते, मुखातून 'वा!' बाहेर पडतो, बस्स एवढंच. भावनांना कागदावर खेळायला सोडलं, झालं.

पद्मावति's picture

8 Aug 2019 - 10:14 pm | पद्मावति

मस्तं आहे कविता. आवडली.

मायमराठी's picture

8 Aug 2019 - 10:45 pm | मायमराठी

हुरूप दिल्याबद्दल आभार...

आवडली. छान आहे. काही ठिकाणी मीटर आणिक सांभाळता आले असते, पण जे आहे त्यात आशय हलत नाही कुठे. म्हणून छान.

भावनांना कागदावर खेळायला सोडलं, झालं.

हे खास. :-)

मायमराठी's picture

9 Aug 2019 - 11:19 pm | मायमराठी

कोण जाणकार संगीतकार जवळपास असता तर मीटर पण जमला असता. थोडं काव्याकडून गीताकडे झुकता आलं असतं. प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार.

मायमराठी's picture

9 Aug 2019 - 11:20 pm | मायमराठी

कोण जाणकार संगीतकार जवळपास असता तर मीटर पण जमला असता. थोडं काव्याकडून गीताकडे झुकता आलं असतं. प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार.

मायमराठी's picture

9 Aug 2019 - 11:20 pm | मायमराठी

कोण जाणकार संगीतकार जवळपास असता तर मीटर पण जमला असता. थोडं काव्याकडून गीताकडे झुकता आलं असतं. प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार.

मन्या ऽ's picture

13 Aug 2019 - 5:21 pm | मन्या ऽ

अप्रतिम लिहिलीये कविता..
आवडली..पु.का.शु!

मायमराठी's picture

13 Aug 2019 - 10:14 pm | मायमराठी

आपल्या सर्वांच्या शुभेच्छा गुंफून नवीन रचना घेऊन येईन _/\_