मराठी दिवस २०२०

वाईच्या कृष्णाबाई उत्सवाची माहीती कायप्पावरुन साभार

Primary tabs

जालिम लोशन's picture
जालिम लोशन in जनातलं, मनातलं
22 Jul 2019 - 1:11 pm

उत्सव बालपणीचा

मीरा फाटक

माझे बालपण वाईमध्ये गेले. वाई हे कृष्णाकाठी वसलेले तालुक्याचं गाव. गाव लहान असले तरी जुने आणि इतिहास असलेले. शाळेत ’माझे गाव’ निबंध लिहिताना कृष्णा नदी, नदीवरील घाट यांचा उल्लेख यायलाच पाहिजे असा बाईंचा आग्रह असायचा. पण तो का यायला पाहिजे हे मात्र खूप उशिरा कळले. मी जेव्हा प्रथम पुण्याला गेले आणि तिथली घाटाशिवाय ओकीबोकी दिसणारी नदी पाहिली तेव्हा कसेतरीच वाटले. मग कळाले, बहुतेक नद्यांना घाट नसतातच! म्हणून आमच्या घाटांचे अप्रूप! पण फक्त घाट हेच काही आमच्या कृष्णेचे वैशिष्ट्य नाही, आणखीही काही आहेत. तेच तर सांगायला बसले आहे!

कृष्णाकाठचा घाट

गाव नदीच्या दुतर्फा वसलेले. लोक नदीचे पाणी आणीत, नदीवर जाऊन कपडे धूत, पोहायला जात, संध्याकाळी नदीकाठी हवा खायला जात. त्याकाळी जनजीवन खरोखरच नदीवर अवलंबून होते. काही जुनी मंडळी तर तिला कृष्णा न म्हणता ’गंगा’ म्हणत असत. एवढेच नव्हे तर तिला देवीच मानत. प्रतापगडावर अफझलखानाचा वध झाला हे सर्वांना इतिहासातून माहीत असते. पण इतर तपशील माहीत नसतो. तर तो असा : त्यावेळी खानाचा तळ प्रतापगड/महाबळेश्वर पासून केवळ वीसेक मैलावर असणाऱ्या आमच्या वाईत होता! शिवाजी-अफझलखान भेटीत काय होणार याची सगळ्यांना काळजी लागली होती. त्यावेळी वाईतील शेंडे घराण्यातील नरसिंहभट शेंडे यांनी अनुष्ठान केले आणि कृष्णेला विनवले, "शिवबाला विजयी कर, मी तुझा उत्सव करीन."

कृष्णाबाई

तेव्हापासून वाईत हे कृष्णाबाईचे उत्सव सुरू झाले ते अजूनही चालू आहेत! हे उत्सव माघ महिन्यात सुरू होतात. नदीची म्हणजेच कृष्णाबाईची सुरेख मूर्ती असते. ती वर्षभर आळीतल्याच एका घरात असते. प्रत्येक आळीचा उत्सव असतो आणि तो चार ते पाच दिवस चालतो. उत्सवाची व्यवस्था, जमाखर्च, हिशेब, महत्त्वाचे निर्णय इत्यादी पाहण्यासाठी पंच असतात. (पंच म्हणजे ’अम्पायर’ नाहीत! ही पंच मंडळी म्हणजे ’कृष्णाबाई संस्थाना’चे कार्यकारी मंडळच.) उत्सवाचा खर्च पूर्वी फक्त आळीकरांकडून गोळा केलेल्या वर्गणीतूनच भागवावा लागत असे. आता भाविक लोक कृष्णाबाईच्या उत्सवासाठी आर्थिक मदतही करतात. वाईत एकूण सात ’आळ्या’ आहेत. त्यामुळे हे उत्सव जवळजवळ दोन महिने चालतात. नरसिंहभट शेंडे हे रामडोह आळीमध्ये राहात होते आणि आम्हीही त्याच आळीत राहात होतो. इतकेच नव्हे तर नरसिंहभटांच्या खापरखापर....पतवंडाच्या वाड्यात आमचे बिर्‍हाड होते.

आमच्या आळीची कृष्णाबाई महाशिवरात्रीनंतर तीन दिवसांनी बसते. पण त्याच्या कितीतरी दिवस आधी तयारी सुरू होते. मुहूर्तमेढ हा शब्द मला अगदी तिसरी/चौथीत असताना माहीत झाला, कारण उत्सवासाठी मांडव घालण्याची सुरुवात मुहूर्तमेढ रोवून होत असे. शिवरात्रीच्या काही दिवस आधी चांगला दिवस पाहून, एक कळक (बांबू) विशिष्ट ठिकाणी रोवून त्याची पूजा केली जात असे. नंतर सवडीने पण वेळाचे भान ठेवून मांडव घातला जात असे. ही सर्व कामे आळीकर उत्साहाने आणि घरातले कार्य समजून करत असत. कृष्णाबाईच्यासाठी देखणे मखर केले जाई. कृष्णाबाई बसते त्यादिवशी आधी तिची पालखीतून मिरवणूक काढत. पालखी संपूर्ण आळीत फिरत असे. प्रत्येक घरापुढे पालखी थांबत असे, घरातील सवाष्ण बाई कृष्णाबाईची भक्तिभावाने ओटी भरत असे आणि पालखी पुढे जात असे. असे करत करत जवळ जवळ दहा बारा तासांनी पालखी मांडवात पोहोचत असे. त्यानंतर ’मक्ता’ घेतला जायचा. (ह्या मक्त्याचा आणि गझलेतील मक्त्याचा काही संबंध असेल असे वाटत नाही!) मक्ता कुणी घ्यायचा हे कसे ठरवतात? ते फार मनोरंजक आहे. आळीतील एखादा जबाबदार माणूस स्वेच्छेने हे काम करायला सुरुवात करत असे. कृष्णाबाईपुढे आलेले ओटीचे खण, नारळ, तांदूळ, गहू, पैसे आणि इतर गोष्टी यांची साधारण किंमत काय होईल ते ठरवून तो ती जाहीर करत असे. हे सर्व सामान त्या मक्ता घेणाऱ्याला मिळणार असे. त्यानंतर अगदी बोली लावून, एखादी वस्तू किंवा वास्तू विकत घ्यावी त्या पद्धतीने हे होत असे. कुणी तरी सुरुवात करायचं आणि मग तो आकडा वाढत, वाढत जायचा. बोली जरा स्थिरावली आहे असं वाटल्यावर त्या व्यक्तीच्या नावानं, उदा: ’शंकरराव जोशी- एक वार, शंकरराव जोशी- दोन वार’ असा पुकारा केला जाई. त्यानंतरही कोणी बोली लावली नाही तर ’शंकरराव जोशी-तीSSSSSन वार’ असे म्हणून झांजांच्या खणखणाटात त्यावर शिक्कामोर्तब व्हायचे! मग शंकरराव जोशी किंवा जे कोणी असतील त्यांनी ती रक्कम कृष्णाबाई संस्थानला दिली की मक्ता घेण्याची प्रक्रिया पुरी होत असे. त्यानंतर कृष्णाबाईची प्रतिष्ठापना होई. मक्ता घेणाऱ्या माणसावर कृष्णाबाईच्या पूजेअर्चेची जबाबदारी असे. तसेच कृष्णाबाईपुढे भक्तगणांनी टाकलेले पैसे, नारळ किंवा दिलेल्या साड्या,खण ह्यातील काही भाग मक्तेदाराला मिळत असे. लहानपणी आम्हाला त्या ’एक वार, दोन वार’ याची फार गंमत वाटत असे.

पण खरी गंमत तर कृष्णाबाई बसल्यावर सुरू होई. मग रोज संध्याकाळी शाळेतून आल्यावर आम्ही मैत्रिणी घाटावर खेळायला जात असू. मांडवात खेळायला मजा येई. मांडवात काही बांबू कठड्याने जोडून इंग्रजी ’यू’ अक्षरासारखी रचना केलेली असे. त्याला ’मधलं तबक’ असं म्हणत आणि त्याबाहेरील जागा म्हणजे बाहेरचे तबक. माझ्या लहानपणी कृष्णाबाईपुढे रोज रात्री कीर्तन (आमच्या भाषेत कथा!) होत असे. पुरुषांनी मधल्या तबकात बसायचे आणि बायकांनी बाहेरच्या, असा संकेत होता. त्यात कुणालाच काही वावगे वाटत नसे. स्त्रीपुरुषसमानतेचे वारे सोडा, साधी झुळूकही तेव्हा वाहात नव्हती! मांडवात खेळून आल्यावर पुन्हा रात्री कथेला जाण्याचा कार्यक्रम असायचा. त्यातले निरूपण वगैरे काही तेव्हा कळायचे नाही. त्यामुळे पूर्वरंग कंटाळवाणा व्हायचा पण त्या वेळात मैत्रिणींशी काही तरी खुसुखुसू चालायचे आणि मजा यायची. पूर्वरंग संपल्यावर मध्यांतर किंवा दूरचित्रवाणीच्या भाषेत ’थोडी विश्रांती’. त्या मधल्या वेळात कोणी होतकरू गायक-गायिका एखादे गाणे म्हणत. त्यानंतर सर्वजण कृष्णाबाईचे पुढील भजन म्हणत:

स्फटिकविमलजलदायिनी
श्रीकृष्णे अघमलहरिणी
महाबळेश्वरनंदिनी
दीर्घ-आयुरारोग्यखनी

भजन झाले की उत्तररंग सुरू होई. त्यात बुवा कुणाचे तरी आख्यान लावत. पण आमच्या दृष्टीने मात्र ती केवळ एक गोष्ट असे. अर्थातच गोष्ट ऐकायला आवडायचेच. त्यावेळी काही श्रीमंत घाटांवर गोविंदस्वामी आफळे यांचीही कीर्तने होत (गरीब आळ्यांना आफळेबुवांची बिदागी परवडत नसे!) आणि ती त्यांनी राजकारण्यांवर परखड भाषेत केलेल्या टीकेमुळे चांगलीच गाजत. त्यांनी लावलेली, स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके अशांची आख्याने ऐकताना अगदी स्फुरण चढत असे.

त्या चार पाच दिवसात एखाददुसऱ्या दिवशी, शक्यतो मंगळवार, शुक्रवार या दिवशी, बायका हळदीकुंकू करीत. बरेच लोक आपल्या सवडीनुसार कृष्णाबाईला नैवेद्यही करीत. शेवटून दुसऱ्या दिवशी ’प्रेजन’ असे. म्हणजे सर्व आळीला जेवण असे. (’प्रेजन’ शब्दाची व्युत्पत्ती मला माहीत नाही. कुणीतरी सांगितले, तो ’प्रयोजन’ शब्दाचा अपभ्रंश आहे. पण मला मात्र भोजनाच्या कार्यक्रमात प्रयोजनाचे काय प्रयोजन हे अजूनपर्यंत कळलेले नाही!) आळीतले लोकच स्वयंपाक करत. आम्ही मुलीही त्यात लुडबूड करत असू. त्यात एखादी, दुसऱ्या गावाहून वाईला सासरी आलेली नवविवाहिता असेल आणि त्यातून ती ’गोरी गोरी पान, फुलासारखी छान’ असेल तर आम्ही शाळकरी मुली तिच्याभोवती ’वहिनी, वहिनी’ करत घोटाळत असायचो. प्रेजनाला सगळी आळी लोटत असे. मांडवात पंक्ती बसत. बादल्या, वेळण्या यांच्यातून पदार्थ वाढले जात. पूर्वी जेवणाचा बेत साधाच असायचा. वरणभात, आमटी, वांगी-बटाटा रसभाजी, त्या भाजीत आदल्या दिवशीच्या हळदीकुंकवाच्या वेळी ओटीसाठी आणलेले हरभरेही असत. गोड म्हणून बहुतेक वेळा गव्हाची खीर किंवा शिरा असायचा. हल्ली मात्र जिलबी, लाडू असेही पदार्थ असतात. पण आमच्या आळीच्या प्रेजनातला हुकमी एक्का म्हणजे आमटी! रामडोह आळीची आमटी सबंध वाईत प्रसिद्ध होती आणि अजूनही आहे. तशा चवीची आमटी मी अजूनपर्यंत दुसरीकडे कुठेच खाल्ली नाही! आमच्या आळीतल्या बायका पूर्वी सांगत की त्या आमटीच्या मसाल्याच्या फक्त दोन याद्या आहेत, एक यादी आपल्या पंचांजवळ आणि दुसरी एका किराणामालाच्या दुकानदाराजवळ! तो दुकानदार रामडोह आळीतला नसूनही ती यादी तो ’फोडत’ नसे. त्याच्या ह्या प्रामाणिकपणाचे मला विशेष वाटत असे! जेवणात चटण्या, कोशिंबिरी फारश्या नसत. म्हणजे प्रेजनाच्या स्वयंपाकात त्या केल्या जात नसत. पण आळीतले लोकच आपली हौस म्हणून म्हणा किंवा तेवढंच आपलं उत्सवात योगदान म्हणून म्हणा घरून कोशिंबिरी करून आणत. दुकानदार लोक स्वयंपाकासाठी तेल, तूप, गुळाच्या ढेपा हेही देत.

शेवटच्या दिवशी कृष्णाबाईची रथातून मिरवणूक निघत असे. ती तर पर्वणीच!हा रथ जगन्नाथाच्या रथाप्रमाणेच माणसे ओढत आणि अजूनही ओढतात. शिक्षण किंवा नोकरीनिमित्ताने परगावी गेलेली मुले काहीही करून रथाच्या दिवशी वाईला येतच! त्यावेळी सर्व वातावरणच भारल्यासारखे होत असे. आम्हीही रथाबरोबर शक्य तेवढे अंतर जात असू. रथ गावातून फिरत असताना दोन्ही बाजूला असलेल्या घरातून लोक रथावर शेंगा, रेवड्या उधळत. त्या रस्त्यावरच्या शेंगा, रेवड्या आम्ही वेचून खात असू. आता आठवले की कसेतरीच वाटते! शेंगांचे एक वेळ ठीक आहे. त्या टरफले काढून खायच्या असतात पण रेवड्या?! पण तेव्हा कधी त्यामुळे कुणाचे पोट बिघडल्याचे काही आठवत नाही! रथाचा मार्ग ठरलेला असे. आळीतील प्रत्येक घरासमोर तो थांबे. तेव्हा पुन्हा बायका कृष्णाबाईची ओटी भरत. रथाच्या वेळी कृष्णाबाईची पहिली ओटी भरण्याचा मान एका जोशी नावाच्या कुटुंबाचा आहे. तर शेवटची ओटी भरण्याचा मान नरसिंहभट शेंड्यांच्या वंशजांचा आहे. एकदा शेंड्यांनी रथाची ओटी भरल्यावर दुसऱ्या कुणालाही ओटी भरता येत नाही. संध्याकाळी निघालेला रथ जवळजवळ अर्ध्या गावातून फिरून रात्री दोन अडीचपर्यंत परत येत असे. रथ ठिकाणावर पोहोचला की पुन्हा सगळे मांडवात जात. तिथे ’लळिताची कथा’ होत असे आणि ती संपता संपताच मखराचे कागद फाडल्याचा फट्फट्फट्फट आवाज ऐकू येई. कारण सूर्योदयाच्या आत मांडव उतरला गेला पाहिजे असा अलिखित नियम होता.

सर्व घाटांवर थोड्याफार फरकाने अशाच तर्‍हेने उत्सव होत असत आणि अजूनही होतात. पण तरी प्रत्येक आळीचे आपले असे वैशिष्ट्य आहेच. सर्व आळ्यांच्या कृष्णाबाईची प्रतिष्ठापना रात्री होते पण आमच्या आळीतल्या नरसिंहभटांनी उत्सव सुरू केले, त्याचे स्मरण म्हणून आमच्या आळीची कृष्णाबाई दिवसा बसते. तसेच फक्त मधल्या आळीच्या कृष्णाबाईची मूर्ती बसलेली आहे, बाकी सर्व उभ्या आहेत. ब्राह्मणशाहीत कृष्णाबाई नसते तर मुरलीधर असतो. कृष्णाबाई उठताना रथातून मिरवणूक फक्त रामडोह आळीचीच असते. रथात कृष्णाबाईबरोबरच गरुडाची सुबक आणि गोजिरवाणी मूर्ती असते. गरूड नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. कृष्णाबाईला लोक साड्या देतात तशा गरुडाला कुंच्या देतात. ह्या साड्या-कुंच्यांचा नंतर लिलाव होतो. लेकुरवाळ्या बायका गरुडाची कुंची विकत घेऊन श्रद्धेने आपल्या बाळाला घालतात.

गरूड

माझी शाळा संपल्यानंतर मी पुढील शिक्षणासाठी वाई सोडली. मग नोकरी, लग्न यामुळे वाई सुटली ती सुटलीच. पण तरीही आईवडील, बहिणी तिथे असल्याने अनेकदा वाईला जाणे व्हायचे. पण उत्सवाच्या दिवसांत मात्र कधी जाणे झाले नाही. तरी पण त्याबद्दल बहिणींकडून कळत असे. बदलत्या काळानुसार उत्सवाचा आकृतीबंधही थोडाफार बदलला आहे. पूर्वी मनोरंजन, प्रबोधन हे लोकांना फक्त कीर्तनातूनच मिळायचे. आता कीर्तने फारशी नसतात पण निरनिराळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची व्याख्याने असतात. प्रथितयश कलाकारांचे कार्यक्रम असतात. विविध स्पर्धा असतात. बहुतेक स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व मुलांसाठी खुल्या असतात. शिवाय कृष्णाबाईच्या साड्यांचा लिलाव, धनिकांनी ’कृष्णाबाई संस्थान’ला दिलेल्या देणग्या इत्यादीमधून मिळालेल्या पैशाचा विनियोग सामाजिक कार्यासाठीही केला जातो

कृष्णाकाठचा घाट

सध्याची प्रसिद्ध गायिका विभावरी आपटे-जोशी ही जेव्हा शाळकरी विभावरी आपटे होती तेव्हा तिने कृष्णाबाई उत्सवातील अशाच एका गाण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता आणि पहिले बक्षीस मिळवले होते. विभावरीची आठवण गोड आहे पण एक कटू आठवणही आहे. भक्ती बर्वे हिला एक कार्यक्रम करायला बोलावले होते. कार्यक्रम रात्री होता, तो झाला आणि ती वाईहून मुंबईला परत जात असताना तिच्या गाडीला अपघात होऊन त्यात तिचा मृत्यू झाला! भक्ती बर्वेसारख्या कलावंताच्या मृत्यूने सर्वच मराठी रसिक हळहळले पण हे आपल्या इथून ती जाताना झाले याचेही वाईकरांना दु:ख झाले! त्या आळीच्या लोकांनी दुसऱ्या दिवशीचा प्रेजनाचा कार्यक्रम रद्द केला. ज्यांनी ’सरगम’ चित्रपट पाहिला आहे त्यांना त्यातील ’रामजी की निकली सवारी, रामजी की लीला है न्यारी’ हे गाणे आठवत असेल. त्या गाण्याचे चित्रीकरण वाईत, आमच्या रामडोह आळीत झालेले आहे. इतकेच नव्हे तर त्यातील रथ हा आमच्या आळीच्या कृष्णाबाईचा रथ आहे! ’सरगम’कारांनी तो रथ आम्हाला सुंदर रंगवून दिला पण त्यात आमच्या लहानपणची एक छान गंमत नाहीशी झाली! रथ आधी ज्यांनी रंगवला होता त्या बाबुराव पेंटरांनी आपले नाव ’बाबुराव पेंटर, वाई’ असे रथावरील पानाफुलांच्या वेलबुट्टीत बेमालूमपणे गुंफले होते आणि ते शोधून काढणे हा आमचा खेळ होता, तो आता उरला नाही!

तर असा तो बालपणीचा उत्सव! काळानुरूप आता त्यात बरेच बदल झाले आहेत. ते स्वागतार्हही आहेत. पुढील काळात आणखीही बदल होतील. पण इतक्या सगळ्या बदलांमध्ये एक गोष्ट मात्र कायम राहाणार आहे. ती म्हणजे हे उत्सव!

संस्कृतीइतिहाससमाजमाहितीसंदर्भविरंगुळा

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

22 Jul 2019 - 1:41 pm | श्वेता२४

वेगळी माहिती.

कंजूस's picture

22 Jul 2019 - 1:45 pm | कंजूस

झकास.
----
१) आमटी पिण्याची स्पर्धा होत असे
२) धरण नव्हते तेव्हा पहिला पूर आला की त्यात उडी टाकुन पोहत काठावर जाण्याची। पैज लागे.
३) कृष्णेचे असे वेगळे देऊळ मला दिसले नाही मग कळले शंकराच्या देवळातच मंडपात दगडी मूर्ती आहे.
४) कृष्णेचा उत्सव शिवरात्रिला का होते हे आता कळले.

काय सुरेख लिहिले आहे! वाचताना त्यात रंगून जायला झाले.
मस्त एकदम!

जॉनविक्क's picture

22 Jul 2019 - 7:03 pm | जॉनविक्क

मुक्त विहारि's picture

22 Jul 2019 - 7:51 pm | मुक्त विहारि

धन्यवाद. ..

आता उत्सव टाळूनच वाईला जायला पाहिजे. ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतो.

जॉनविक्क's picture

22 Jul 2019 - 9:10 pm | जॉनविक्क

दुपारी 12 ते 4 यावर बंदी घालायचा पर्याय कसा वाटतो सर ? :D :D :D

मुक्त विहारि's picture

23 Jul 2019 - 6:13 am | मुक्त विहारि

देवाच्या नावाखाली प्रदूषण करणे हा माणसाचा अधिकार झाला आहे.

धृव ही गेला आणि वाल्या ही गेला....

आता हिमालयात जरी गेलात तरी प्रदुषणा पासून मुक्ती नाही...

असो....

कृपया मुवि म्हणा, ही नम्र विनंती. ..साधा दहावी पास शेतकरी आहे. ...

जॉनविक्क's picture

24 Jul 2019 - 4:54 pm | जॉनविक्क

देवाच्या नावाखाली प्रदूषण करणे हा माणसाचा अधिकार झाला आहे.

धृव ही गेला आणि वाल्या ही गेला....

थोडी सुधारणा, प्रदूषणाचा अधिकार फक्त माणसालाच आहे.

आता हिमालयात जरी गेलात तरी प्रदुषणा पासून मुक्ती नाही...

उप्रचे मुख्यमंत्रीहि हेच म्हणत होते, अगर आप जंगल जॉगे (जाओगे) तो भी आवाजे आयेनगी मन भटकेगा तो शांती तो जँगलमे भी नही है. हिमालय मे भी नही. बेक्कार हसलो होतो डवायलोक ऐकुनी.

कृपया मुवि म्हणा, ही नम्र विनंती. ..साधा दहावी पास शेतकरी आहे. ...

आपले प्रतिसाद फार छान असतात त्यामुळे मी तुम्हाला मुविकाका म्हणले तर चालेल का ?

मी_आहे_ना's picture

23 Jul 2019 - 9:19 am | मी_आहे_ना

खूप सुंदर माहिती आणि वर्णन. लहानपणी कृष्णामाईच्या उत्सवातच बाबासाहेब पुरंदरे, चारुदत्त आफळे, वपु इ. इ. ऐकायला मिळाले. उत्सवाची तयारी म्हणून मांडव, पताका लावणे, वर्गणी अशी खूप धमाल येत असे आणि संपताना एक अनामिक हूरहूर!

चौकटराजा's picture

23 Jul 2019 - 10:00 am | चौकटराजा

माझ्या ६६ वर्षाच्या आयुष्यातील ७ वर्षे वाईत गेली. माझया मते वाई इतके सुरेख तालुक्याचे गाव महाराष्ट्रात नाही. वाईत मात्र घाटावर रस्त्यात स्वछता जितके हवी तितकी नाही. येथील उत्सवयाची मजा काही औरच ! इथेच गणपती आळीत बेला शेंडे चा आजी कुसुम शेंडे यांचे शास्त्रीय गायन ऐकले ,आजही आठवतेय शाम कल्याण गायल्या , विश्वनाथ बागुल यांचे नाट्यगीत इथेच. भीमकुंड आळी च्या उत्सवात वपु काळे ( यांचे एक नातेवाईक वाईकर होते ).धर्मपुरीत नूतन पेंढारकर ( दामले -हे पुन्हा वाईकर च ) यांचे " मधुकर वन वन फिरत करी " हे नाट्य गीत आजही आठवत आहे. लहानपणी धर्मपुरी उत्सवांच्या सजावटीत रात्र घालवल्याचे आठवतेय . एकूणात काय " कृष्णाबाई महाराज की जय " !

वरील आठवणीतील रामजीकी निकली सवारी याचे शुटींग मी जिथे राहात होतो त्या घरासमोरच झाले. त्यावेळी श्री असराणी यांनी कोल्ड ड्रिंक दिल्याचे आठ्वतेय . मस्त रम्य काळ होता तो !

कंजूस's picture

23 Jul 2019 - 10:09 am | कंजूस

१)वाई विश्वकोश मंडळ , २)पुस्तकांचे गाव, ३)मांढरादेवी, ४) नानासाहेबांचं गाव मेणवली व तिथे होणारे भोजपुरी सिनेमांचे शुटिंग हे का गाळलं आहे?

Wai शेजारीच माझे गाव आहे .12 वी पर्यंत शिक्षण वाई मध्येच किसन वीर ला.
आम्ही लहान असताना रात्रीचे गणपती ची सजावट बघायला वाई मध्ये जात असू ते पण चालत खूप लोक असायची अगदी स्त्रिया ,मुल सुद्धा .
तेव्हा सेल वर चालणाऱ्या विजेऱ्या सर्वांकडे नव्हत्या .
मग टीन चा डब्बा मध्ये मेणबत्ती लावायची आणि त्या डब्बा ला पकडण्या साठी वरती दोरी आणि त्या प्रकाश मध्ये वाई ला जायचो.
त्या वेळी सुद्धा खूप सजावट असायची आणि महत्वाचे म्हणजे पडद्या वर पिक्चर असायचा तो पूर्ण बघूनच घरी परतायचे