✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जिवंत पण जाणीवरहित

ह
हेमंतकुमार यांनी
Wed, 05/29/2019 - 07:21  ·  लेख
लेख
बेशुद्ध पडलेला रुग्ण हा त्याच्या कुटुंबीयांसाठी धडकी भरवणारा विषय असतो. अचानक आलेली बेशुद्धी ही तर अधिक चिंताजनक असते. ही अवस्था नक्की कशामुळे येते हे सामान्यांना नीट समजले नाही तरी तिचे गांभीर्य कळते. तिच्या मुळाशी मेंदूच्या कार्यातील विशिष्ट बिघाड असतो. या बिघाडाची अनेक कारणे असतात. त्यामध्ये विविध आजार, गंभीर अपघात, व्यसनांचा अतिरेक आणि काही औषधांचे प्रमाणाबाहेर सेवन यांचा समावेश होतो. बेशुद्ध रुग्णास शुद्धीवर आणणे हे डॉक्टरसाठी एक आव्हान असते. ते पेलत असताना त्याला आपले वैद्यकीय कौशल्य अगदी पणाला लावावे लागते. बेशुद्धावस्थेची विविध कारणे, संबंधित रुग्णतपासणी व त्याचे निष्कर्ष आणि अशा रुग्णाचे भवितव्य या सगळ्यांचा आढावा या लेखात घेत आहे. सुरवातीस आपली जागृतावस्था आणि मेंदूचे संबधित कार्य यांची माहिती देतो. त्यातून पुढे माणूस बेशुद्धावस्थेत कसा जातो हे समजेल. pict लेखातील विवेचन खालील मुद्द्यांच्या आधारे असेल: १. जागृतावस्था आणि मेंदूचे कार्य २. बेशुद्धावस्थेची कारणे ३. रुग्णतपासणी ४. उपचार, आणि ५. रुग्णाचे भवितव्य जागृतावस्था आणि मेंदूचे कार्य: हे समजण्यासाठी मेंदूची संबंधित रचना जाणली पाहिजे. ढोबळपणे मेंदूचे ३ भाग असतात: मोठा मेंदू, छोटा मेंदू आणि मेंदूची नाळ (stem). मोठ्या मेंदूच्या बाहेरील आवरणाला cortex असे म्हणतात. हा भाग जैविकदृष्ट्या सर्वात उत्क्रांत असतो. तिथे सर्व मज्जातंतूंच्या संदेशांचे एकीकरण होते. pict याउलट मेंदूची नाळ ही जैविकदृष्ट्या सर्वात प्राचीन भाग आहे. तिच्यामध्ये RAS नावाची एक ‘सक्रीय यंत्रणा’ असते. तिच्यातील मज्जातंतूंत सतत काही रासायनिक क्रिया होतात. त्यातून cortexला संदेश जातात. RAS आणि Cortex यांच्या समन्वयातून आपली जागृतावस्था टिकवली जाते. जेव्हा कुठल्याही कारणाने या यंत्रणेवर विपरीत परिणाम होतो, तेव्हा संबंधिताची शुद्ध जाऊ शकते. बेशुद्धावस्थेची कारणे: अनेक प्रकारचे आजार आणि डोक्याला जबरी मार बसणारे अपघात यांमध्ये व्यक्ती बेशुद्ध होते. काही प्रमुख कारणे आता समजून घेऊ. १. मेंदूच्या रक्तपुरवठ्यातील अडथळा: याची दोन कारणे आहेत : अ) रक्तवाहिन्या त्यांच्यात साठलेल्या मेद-थरांमुळे आकुंचित वा बंद होणे (Stroke) आ) रक्तवाहिनी फुटणे. या कारणामुळे येणारी बेशुद्धी ही बरेचदा अचानक येते. बऱ्याचदा अशा रुग्णांना लकवा / पक्षाघात झालेला असतो. २. अपघात : बऱ्याच वाहन अपघातांत डोक्यास जबरी मार लागतो. तसेच डोक्यावर कठीण वस्तूचा जोराचा प्रहार हेही महत्वाचे कारण आहे. ३. औषधांची विषबाधा: मेंदूला गुंगी आणणारी औषधे (प्रामुख्याने opium गट) आणि अन्य घातक पदार्थ अतिरिक्त प्रमाणत घेणे. हे मुख्यतः व्यसनी लोकांत आढळते. तसेच आत्महत्या वा खून करण्यासाठी देखील यांचा वापर होतो. जवळपास ४०% बेशुद्ध रुग्णांत हे कारण सापडते. ४. हृदयक्रिया बंद पडणे: हृदयविकाराचा तीव्र झटका व अन्य काही आजारांत जर हृदयस्पंदन थांबले (arrest) तर मेंदूचा रक्तपुरवठा खंडित होतो. जवळपास २५% बेशुद्ध रुग्णांत हे कारण सापडते. ५. जंतूसंसर्ग: विशिष्ट जिवाणू आणि विषाणूंमुळे मेंदूदाह किंवा मेंदूच्या आवरणांचा दाह होतो. हे आजार गंभीर असतात. ६. ग्लुकोजच्या रक्तपातळीचे बिघाड: मेंदूला ग्लुकोजचा योग्य प्रमाणात पुरवठा सतत आवश्यक असतो. रक्तातील ग्लुकोजची पातळी अति वाढणे अथवा कमी होणे या दोन्ही कारणांमुळे बेशुद्धावस्था येते. आता ही दोन्ही कारणे विस्ताराने बघू. अ) ग्लुकोजची पातळी अति वाढणे : याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अनियंत्रित मधुमेह. जेव्हा ग्लुकोजची पातळी खूप वाढते तेव्हा शरीरातील भरपूर पाणी मूत्रावाटे निघून जाते (dehydration). त्यातून एकूण रक्तपुरवठा खूप मंदावतो(shock). तसेच अशा रुग्णास खूप उलट्याही होत असतात. त्यातून दुष्टचक्र होऊन परिस्थिती अजून बिघडते. आ) ग्लुकोजची पातळी खूप कमी होणे: जेव्हा ही पातळी ४० mg/ dL चे खाली जाऊ लागते तेव्हा मेंदूच्या कार्यात बिघाड होऊ लागतो. जर का ती २० mg इतकी खाली गेली तर रुग्ण बेशुद्ध होतो. ही पातळी कमी होण्याची प्रमुख कारणे अशी: मधुमेहीने घेतलेला इन्सुलिनचा अतिरिक्त डोस, स्वादुपिंडातील अति-इन्सुलिन निर्माण करणाऱ्या गाठी, यकृत आणि मूत्रपिंडाचे तीव्र आजार आणि फाजील मद्यसेवन. मद्यपी लोकांत मद्यपानाच्या जोडीला अन्य व्यसनी पदार्थांचे सेवन सुद्धा असू शकते. तसेच असे लोक जबरी वाहन अपघातालाही आमंत्रण देतात. ७. चयापचयातील अन्य बिघाड: यामध्ये रक्तातील सोडियमची पातळी खूप कमी वा जास्त होणे आणि काही हॉरमोनचे बिघाड यांचा समावेश आहे. ८. अपघाती विषबाधा: यामध्ये मुख्यतः कार्बन मोनोऑक्साइड व शिसे यांचा समावेश आहे. खाणी किंवा गटारातील कामे करणाऱ्यांना कार्बन मोनोऑक्साइडची विषबाधा होऊ शकते. हा वायू आपल्या रक्तात हिमोग्लोबिनला घट्ट चिकटतो आणि त्यामुळे असे हिमोग्लोबिन ऑक्सिजनचे वहन करू शकत नाही. रुग्णाची शारीरिक तपासणी: सर्वप्रथम रुग्णाचे नातेवाईकांकडून त्याचा इतिहास जाणून घेणे महत्वाचे असते. यात व्यसनाधीनता, पूर्वीचा आजार, औषधे आणि अपघात या माहितीचा समावेश होतो. प्रत्यक्ष तपासणी करताना डोक्याला मोठी जखम आहे का आणि हातापायाच्या त्वचेवर सुया टोचल्याच्या खुणा पाहतात. मग रुग्णास चिमटे काढून तो काही प्रतिसाद देतो का अथवा डोळे उघडतो का, हे पाहतात. तसेच मनोरुग्णांचे बाबतीत ते बेशुद्धीचे सोंग करीत नाहीत ना, हेही पहावे लागते. शरीर-तापमान पाहणे महत्वाचे. रुग्णाच्या नाडी आणि श्वसनाची गती आणि ताल हे काळजीपूर्वक पहिले जाते. दोन्ही डोळ्यातील बाहुल्यांचा आकार आणि त्यांनी टॉर्चच्या प्रकाशाला दिलेला प्रतिसाद पाहणे हेही महत्वाचे ( विशेषतः ओपियम गटातील रसायनांची विषबाधा झाली असल्यास). निरोगी डोळ्याच्या बाहुल्या : pict ओपियम गटातील रसायनांची विषबाधा : डोळ्याच्या बाहुल्या : pict याव्यतिरिक्त रुग्णाचे विविध प्रतिक्षिप्त प्रतिसाद तपासले जातात. पूर्ण शारीरिक तपासणीनंतर बेशुद्धीची खात्री केली जाते आणि तिची तीव्रता ठरवली जाते. आता पुढची पायरी म्हणजे बेशुद्धीचे कारण ठरवणे. त्यासाठी विविध प्रयोगशाळा आणि प्रतिमाचाचण्या कराव्या लागतात. प्रयोगशाळा चाचण्या १. रक्त: यावरील चाचण्या ३ गटांत मोडतात. रक्तनमुन्यात खालील रासायनिक घटक गरजेनुसार मोजले जातात. अ) ग्लुकोज, कॅलशियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, युरिआ आणि क्रिअ‍ॅटिनिन. आ) ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण, अमोनिआ इ) विशिष्ट औषधांचे प्रमाण २. पाठीच्या मणक्यातील द्रव (CSF) : जेव्हा मेंदूच्या जंतूसंसर्गाची शक्यता वाटते तेव्हा ही तपासणी केली जाते. त्यात जंतूंचा शोध घेणे आणि काही रासायनिक चाचण्या करतात. प्रतिमा चाचण्या यात मुख्यत्वे CT अथवा MRI स्कॅन आणि EEG (मेंदू-विद्युत आलेख) यांचा समावेश असतो. त्यातून मेंदूला झालेल्या इजेबद्दल सखोल माहिती मिळते. वरीलपैकी योग्य त्या चाचण्या झाल्यावर बेशुद्धीचे निदान केले जाते. आता त्यानुसार उपाय केले जातात. उपचार आणि रुग्णाचे भवितव्य अशा रुग्णांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ठेवले जाते. त्यांच्यावर उपचार करताना प्रथम त्यांच्या श्वसन व रक्ताभिसरण या मूलभूत क्रियांवर लक्ष केंद्रित केले जाते. गरजेनुसार रुग्णाच्या श्वासनलिकेत नळी घातली जाते. तिचा उपयोग कृत्रिम श्वसन देण्यासाठी होतो. बेशुद्धीच्या कारणानुसार शिरेतून औषधे देऊन उपचार केले जातात. आता रुग्ण शुद्धीवर कधी येणार हा कळीचा प्रश्न असतो. त्याचे उत्तर मेंदूस किती प्रमाणात इजा झाली आहे, यावर ठरते. ती मध्यम स्वरूपाची असल्यास काही दिवसांत रुग्ण शुद्धीवर येतो. मात्र ती गंभीर स्वरूपाची असल्यास तो महिनोंमहिने बेशुद्धीत राहू शकतो. त्यानंतर पुढे ३ शक्यता असतात: १. काही रुग्ण बरे होतात २. काही मृत्यू पावतात, तर ३. काही vegetative अवस्थेत राहतात. vegetative अवस्था आता ही अवस्था आणि निव्वळ बेशुद्धावस्थेतील फरक समजून घेऊ. बेशुद्ध माणूस निद्रिस्त आणि जाणीवरहित असतो. तर vegetative अवस्थेतील माणूस हा “जागा” असला तरी पूर्णपणे ‘जाणीवविरहित’ असतो. असे रुग्ण हे वेळप्रसंगी डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल करू शकतात. तसेच ते ‘झोपी जाणे’ आणि ‘जागे होणे’ या अवस्थांतून जाऊ शकतात. पण, त्यांना कुठलेही आकलन (cognition) होत नाही. एक प्रकारे ही ‘जागृत बेशुद्धावस्था’ (coma vigil) असते ! म्हणजेच असा रुग्ण हा केवळ कागदोपत्री जिवंत पण काहीही समजण्यास वा करण्यास असमर्थ असतो. असा रुग्ण जर या अवस्थेत १ महिन्याहून जास्त काळ राहिला तर तो कायमच्या अशा अवस्थेत गेल्याची नोंद होते. त्यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांना त्या रुग्णावरील सर्व ‘जीवरक्षक उपाय यंत्रणा’ बंद करण्याची कायदेशीर परवानगी (काही देशांत) मिळते. *** अनेक प्रकारचे अपघात, गंभीर आजार, व्यसनांचा अतिरेक अशा अनेक प्रसंगांत माणूस बेशुद्ध होतो. आपल्या कोणाच्याही कुटुंब अथवा परिचयातील व्यक्तीवर अशी वेळ येऊ शकते. अशा दुःखद प्रसंगाला सामोरे जाताना आपल्याला मनोबल वाढवावे लागते. त्या दृष्टीने बेशुद्धावस्थेची मूलभूत माहिती या लेखात दिली आहे. वाचकांना ती उपयुक्त वाटेल अशी आशा आहे. ************************************************************* 'vegetative ' (अवस्था) साठी मराठी शब्द जरूर सुचवावा ही वि.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
आरोग्य

प्रतिक्रिया द्या
66452 वाचन

💬 प्रतिसाद (106)

प्रतिक्रिया

'vegetative ' (अवस्था) साठी

प्रकाश घाटपांडे
Wed, 05/29/2019 - 09:28 नवीन
'vegetative ' (अवस्था) साठी मराठी शब्द जरूर सुचवावा ही वि.>>>वानस्पत्यावस्था असा प्रतिशब्द दिल्यास मराठीची दुरावस्था का झाली हे समजू शकते :)
  • Log in or register to post comments

आसन्नमरण हा शब्द कदाचित जवळ

सुबोध खरे
Wed, 05/29/2019 - 09:40 नवीन
आसन्नमरण हा शब्द कदाचित जवळ जाईल
  • Log in or register to post comments

उत्तम व सोपा शब्द

प्रकाश घाटपांडे
Wed, 05/29/2019 - 11:12 नवीन
उत्तम व सोपा शब्द
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बरोबर !

हेमंतकुमार
Wed, 05/29/2019 - 10:12 नवीन
प्रकाश, म्हणूनच मी मूळ इंग्लिश शब्द तसाच ठेवला आहे. पण कोणी सोपा सुचवल्यास जरूर आवडेल. सुबोध, चांगला शब्द.
  • Log in or register to post comments

अचेतन ?

अनिता
Wed, 05/29/2019 - 10:17 नवीन
अचेतन ?
  • Log in or register to post comments

....

हेमंतकुमार
Wed, 05/29/2019 - 10:24 नवीन
चेतन = सजीव मग, ‘अचेतन’ हा विरुद्धार्थी होईल ना? = निर्जीव. ‘लोळागोळा’ अवस्था असा एक सुचला.
  • Log in or register to post comments

"गतभान" असा शब्द योजता यावा.

गवि
Wed, 05/29/2019 - 12:14 नवीन
"गतभान" असा शब्द योजता यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

मृतप्राय हा एक शब्द होऊ शकतो.

आनन्दा
Wed, 05/29/2019 - 11:14 नवीन
मृतप्राय हा एक शब्द होऊ शकतो.
  • Log in or register to post comments

यात जवळ जवळ मेल्यात जमा आहे

प्रकाश घाटपांडे
Wed, 05/29/2019 - 12:12 नवीन
यात जवळ जवळ मेल्यात जमा आहे अशी छटा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

" भाजीपाल्यावत " हा शब्द

विजुभाऊ
Wed, 05/29/2019 - 11:17 नवीन
" भाजीपाल्यावत " हा शब्द अर्थाच्या अधीक जावळ जातो
  • Log in or register to post comments

याच्या उलट अवस्थाही असते.

गवि
Wed, 05/29/2019 - 12:19 नवीन
याच्या उलट अवस्थाही असते. अतीव भयानक. सर्व जाणिवा पूर्ण शाबूत, जागृत मन आणि शरीराची कणभरही हालचाल करता न येणे. लोक आधी ब्रेन डेड समजतात. पण आत माणूस जागा असतो. बघत ऐकत असतो (श्रवण आणि दृश्य हे डोक्याच्या आतून थेट मेंदूत जोडलेले असल्याने). पण मी जिवंत आहे असं तो सांगू किंवा दर्शवू शकत नाही. त्याविषयी लिहा असं तरी कसं म्हणावं? पण रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती असावं म्हणून लिहा. "Locked in सिन्ड्रोम"
  • Log in or register to post comments

गवि,

हेमंतकुमार
गुरुवार, 05/30/2019 - 10:56 नवीन
Locked-in syndrome (LIS) बद्दल थोडक्यात: १. याला ‘आभासी’ बेशुद्धावस्था असे म्हणता येईल. हे रुग्ण जागृत असतात, पण ते बोलू शकत नाहीत. ते डोळ्यांच्या हालचाली व्यतिरिक्त कुठल्याही हालचाली करू शकत नाहीत. २. हा आजार दुर्मिळ आहे. त्याचे मूळ कारण मेंदूचा रक्तपुरवठा खंडित होणे किंवा त्यात रक्तस्त्राव होणे, हे आहे. ३. अशा प्रसंगी मेंदूच्या नाळेतील ‘Pons’ या भागाला इजा होते. ४. सुरवातीस हे रुग्ण अर्धवट बेशुद्ध असतात. नंतर ते ‘जागे’ होतात पण आता बोलू शकत नाहीत आणि त्यांना पक्षाघात होतो. ५. भवितव्य: असे रुग्ण उठून हिंडूफिरू लागणे अवघड असते. पण त्यांना काही विशिष्ट वैद्यकीय सुविधा पुरवल्यास ते डोळ्यांच्या द्वारा “संवाद” साधू शकतात ! ६. अशा आधुनिक उपचारांत word processor, speech synthesizer आणि संगणकीकृत संवादांचा समावेश होतो. ७. म्हणजेच, अशा रुग्णांत जर वरील उपचारांनी बरी प्रगती झाली तर ते महाजालावर वावरू शकतात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

धन्यवाद

गवि
Fri, 05/31/2019 - 06:53 नवीन
धन्यवाद Diving bell & the butterfly हे पूर्ण पुस्तक अशा अवस्थेतल्या व्यक्तीने एकेक अक्षर डोळा हलवून सिलेक्ट करत करत लिहिलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

कौतुकास्पद !

हेमंतकुमार
Fri, 05/31/2019 - 09:42 नवीन
हे पूर्ण पुस्तक अशा अवस्थेतल्या व्यक्तीने एकेक अक्षर डोळा हलवून सिलेक्ट करत करत लिहिलं आहे. >>>> हे जबरी आहे ! गवि, आपणास या पुस्तकाबद्दल काही माहिती असल्यास जरूर लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

स्टीफन हॉकिंग्जचं संशोधन आणि

गवि
Fri, 05/31/2019 - 10:05 नवीन
स्टीफन हॉकिंग्जचं संशोधन आणि लेखनही या अवस्थेतच केलेलं आहे. फक्त ती अवस्था अचानक न येता हळूहळू येत गेली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

मस्त ..

हेमंतकुमार
Sat, 07/04/2020 - 18:06 नवीन
आज ही चर्चा आठवायचे कारण .. The theory of everything हा स्टीफन हौकिंग यांच्यावरील चित्रपट प्राईमवर पाहिला. छान, जरूर पाहा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

Diving bell & the butterfly

टर्मीनेटर
Sun, 06/09/2019 - 13:05 नवीन
Diving bell & the butterfly हे पूर्ण पुस्तक अशा अवस्थेतल्या व्यक्तीने एकेक अक्षर डोळा हलवून सिलेक्ट करत करत लिहिलं आहे.
विलक्षण माहिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

काय!

नगरी
गुरुवार, 05/05/2022 - 06:26 नवीन
जबरदस्त,पराकोटीची चिकाटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हा एक काय प्रकार आहे

मराठी_माणूस
Fri, 05/31/2019 - 16:49 नवीन
हा एक काय प्रकार आहे https://en.m.wikipedia.org/wiki/Sleep_paralysis
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

मराठी माणूस,

हेमंतकुमार
Fri, 05/31/2019 - 17:20 नवीन
झोपेतील पक्षघात हा एक निद्राविकार आहे. पूर्ण झोप आणि जाग यांच्यामधली ती अर्धवट अवस्था आहे. त्याच्यामागे काही जनुकीय कारणे आहेत. तसेच एखाद्याच्या रोजच्या झोपेच्या वेळेत आणि काळात जर वारंवार अडथळे येऊ लागले तर असे प्रकार होऊ शकतात. या विशिष्ट अवस्थेत व्यक्ती जागृत असते पण, तिला बोलणे वा हालचाली करता येत नाहीत. अर्थात हे तात्पुरते असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

डेंजर प्रकार आहे हा.

वरुण मोहिते
Mon, 06/03/2019 - 21:01 नवीन
अगदी 2-5 मिनिटांसाठी होतो पण आपण मेलो असेच वाटते. मी गेलोय ह्या प्रकारातून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

सर्वांना धन्यवाद.

हेमंतकुमार
Wed, 05/29/2019 - 12:22 नवीन
शब्द-अर्थछटा छान आहेत. लेखातील मजकुरापेक्षा वाचकांना त्यातील तळटीपेचे वाटलेले आकर्षण बघून अंमळ मजा वाटली ! गवि, सूचनेबद्दल आभार !
  • Log in or register to post comments

वैद्यकिय-आरोग्य विषयावरच्या

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 05/29/2019 - 13:39 नवीन
वैद्यकिय-आरोग्य विषयावरच्या तुमच्या लेखनाच्या टोपीवर अजून एक दिमाखदार पिस खोचले गेले आहे. किचकट वैद्यकिय विषय, सर्वसामान्य जनतेला समजेल अश्या भाषेत समजून देण्याची तुमची हातोटी, वाखाणण्याजोगी आहे !
  • Log in or register to post comments

हे शब्द कोडे काय आहे

Rajesh188
Wed, 05/29/2019 - 13:40 नवीन
मेंदूच्या कार्यातील विशिष्ट बिघाड असतो. विशिष्ट म्हणजे काय समजायचं . ते स्पष्ट होईल का की त्या विषयात अजुन संशोधन चालू आहे
  • Log in or register to post comments

हे शब्द कोडे काय आहे

Rajesh188
Wed, 05/29/2019 - 13:40 नवीन
मेंदूच्या कार्यातील विशिष्ट बिघाड असतो. विशिष्ट म्हणजे काय समजायचं . ते स्पष्ट होईल का की त्या विषयात अजुन संशोधन चालू आहे
  • Log in or register to post comments

राजेश,

हेमंतकुमार
Wed, 05/29/2019 - 15:04 नवीन
** विशिष्ट बिघाड असतो. विशिष्ट म्हणजे काय समजायचं . ते स्पष्ट होईल का >>>> याचे उत्तर लेखात दिलेले आहे, ते असे: …..तिच्यामध्ये RAS नावाची एक ‘सक्रीय यंत्रणा’ असते. तिच्यातील मज्जातंतूंत सतत काही रासायनिक क्रिया होतात. त्यातून cortexला संदेश जातात. RAS आणि Cortex यांच्या समन्वयातून आपली जागृतावस्था टिकवली जाते. जेव्हा कुठल्याही कारणाने या यंत्रणेवर विपरीत परिणाम होतो, तेव्हा संबंधिताची शुद्ध जाऊ शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

The reticular activating

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 05/29/2019 - 15:26 नवीन
The reticular activating system (RAS) is a network of neurons located in the brain stem that project anteriorly to the hypothalamus to mediate behavior, as well as both posteriorly to the thalamus and directly to the cortex for activation of awake, desynchronized cortical EEG patterns.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

कोमामध्ये रुग्णाच्या अन्न

अभ्या..
Wed, 05/29/2019 - 13:54 नवीन
कोमामध्ये रुग्णाच्या अन्न पाण्याचे कसे करतात? नळीवाटे द्रव का? रुगणाच्या वजनावर किती परिणाम होतो. त्याचे काही सेपरेट डाएट असते की फक्त जीवनावश्यक द्रव्य दिले जाते? शारीरिक हालचाल नसल्याने सांधे वगैरे कमकुवत होतात का? त्याची मधल्या काळातली म्हणजे अपघात होऊन बेशुद्ध झाला ते शुध्दवर आला ही मेमरी टोटल लॉस असते का?
  • Log in or register to post comments

वरील सर्वांचे

हेमंतकुमार
Wed, 05/29/2019 - 14:28 नवीन
मनापासून आभार ! विचारल्या गेलेल्या प्रश्नांना सबुरीने यथाशक्ती उत्तरे देईन.
  • Log in or register to post comments

अभ्या,

हेमंतकुमार
Wed, 05/29/2019 - 16:45 नवीन
१. कोमामध्ये रुग्णाच्या अन्न पाण्याचे कसे करतात? नळीवाटे द्रव का? त्याचे काही सेपरेट डाएट असते की फक्त जीवनावश्यक द्रव्य दिले जाते? >>>>> अशा रुग्णास अन्न देण्याच्या २ पद्धती आहेत: १. पचनसंस्थेत वरून घातलेल्या नळीद्वारे आणि २. रक्तवाहिनीतून बहुतेक रुग्णांत पहिला पर्याय आधी निवडतात. अन्न किती द्यायचे हे शास्त्रीयदृष्ट्याठरवले जाते. रुग्णाचे वजन आणि अन्य काही निकष लावून उष्मांक गरज गणिताने काढली जाते. शरीरास सर्व पोषक घटक मिळतील अशा प्रकारे द्रव पदार्थ दिले जातात (Isotonic formulas). सुरवातीस ही नळी नाकातून पचनसंस्थेत पोचवली जाते. पण जर बेशुद्धावस्था दीर्घकाळ राहिल्यास विशेष नळी इंडोस्कोपीद्वारा त्वचेतून आतड्यांत घातली जाते. डोके व मानेस जबरी इजा झालेल्या रुग्णांत हे नळी प्रकरण अवघड असते. मग त्यांना रक्तवाहिनीतून पोषण दिले जाते (TPN). ही एक स्वतंत्र विकसित वैद्यकशाखा आहे. विविध पोषणद्रव्ये त्या तज्ञाचे सल्ल्यानुसार दिली जातात.
  • Log in or register to post comments

डोके व मानेस जबरी इजा

गवि
Wed, 05/29/2019 - 16:53 नवीन
डोके व मानेस जबरी इजा झालेल्या रुग्णांत हे नळी प्रकरण अवघड असते. मग त्यांना रक्तवाहिनीतून पोषण दिले जाते (TPN). ही एक स्वतंत्र विकसित वैद्यकशाखा आहे. विविध पोषणद्रव्ये त्या तज्ञाचे सल्ल्यानुसार दिली जातात.
निव्वळ रक्तवाहिनीतून पोषण दिल्यास (पचनसंस्था बायपास करुन), जठर आतडी वगैरे अवयव वापराअभावी सुकून जात नाहीत का? (निकामी होणे या अर्थाने).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

अभ्या,

हेमंतकुमार
Wed, 05/29/2019 - 19:16 नवीन
२. शारीरिक हालचाल नसल्याने सांधे वगैरे कमकुवत होतात का? >>> होय, त्यांना विविध अस्थिसमस्या आणि फुफ्फुसव्याधी होऊ शकतात. त्या येऊ नयेत म्हणून नियमित फ़िजिओ-उपचार दिले जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

अभ्या,

हेमंतकुमार
गुरुवार, 05/30/2019 - 09:16 नवीन
३. त्याची मधल्या काळातली म्हणजे अपघात होऊन बेशुद्ध झाला ते शुध्दवर आला ही मेमरी टोटल लॉस असते का? >>> अपघाती बेशुद्धावस्थेनंतर होणारे विस्मरण हे तात्पुरते असते. पण ते किती काळ टिकेल हे अपघाताच्या तीव्रतेवर अवलंबून असते. साधारणपणे जितका काळ व्यक्ती बेशुद्ध होती त्याच्या ३-४ पट काळ विस्मरण टिकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

हे सांगितले ते बरे झाले, साला

आनन्दा
गुरुवार, 05/30/2019 - 22:49 नवीन
हे सांगितले ते बरे झाले, साला सिरीयल मध्ये एकदा अपघात झाला की माणूस 4 दिवस कोमामध्ये आणि 4 महिने मेमरी लॉस मध्ये असतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

चित्रपट आणि मालिकांमधील काही

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 05/31/2019 - 11:36 नवीन
नव्या-जुन्या चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय विनोदी प्रकार म्हणजे... १. २४ तासांत शुद्धीवर आला नाही तर काही खरे नाही. २. डोक्याला लागलेल्या मारामुळे स्मृतीभ्रंश होणे आणि अनेक वर्षांनी डोक्याला तसाच मार लागल्यावर क्षणभरात सगळे लख्ख आठवू लागणे. ३. कालपरवाच, "माझ्या बायकोचा नवरा" या मालिकेत नायक जिन्यावरून गडगडत जाऊन बेशुद्ध होतो. "तो जर दिवसाभरात शुद्धीवर आला नाही तर कोमात जाईल" अश्या अर्थाचे वाक्य एका पात्राच्या तोंडी आहे. ते लिहिणार्‍याचे डोके तपासून पहायची गरज आहे. =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

इनोदनिर्मिती !

हेमंतकुमार
Fri, 05/31/2019 - 11:59 नवीन
ते लिहिणार्‍याचे डोके तपासून पहायची गरज आहे. >>>> + १११११ ... बाकी असल्या लई मालिकांमुळे भरपूर इनोदनिर्मिती होते !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

म्हात्रेकाका चक्क "माझ्या

अभ्या..
Fri, 05/31/2019 - 12:17 नवीन
म्हात्रेकाका चक्क "माझ्या बायकोचा नवरा(की नवऱ्याची बायको?) " असल्या शिरेल्स बघतात? . . . . . मैं कहा हुं............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

इतर अनेक घरांत चालू असतात

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 05/31/2019 - 22:32 नवीन
इतर अनेक घरांत चालू असतात तश्याच सिरियल्स आमच्याही घरात बाय डीफॉल्ट चालू असतात. सिरियल्स चालू असताना मी लॅपटॉपवर काम करायला बसतो, तेव्हा डोळ्याच्या कोपर्‍याने असे अनेक ईनोदी प्रकार सहज टिपले जातात... तेवढीच करमणूक. ;) :) माझ्या बायकोचा नवरा(की नवऱ्याची बायको?) नावात काय आहे? आपला ईनोदाशी मतबल. भावनाओंको समजो. बाकी, सिरियलचे बरोबर नाव ताबडतोप सांगितल्यामुळे, तू मराठी सिरियल्स मन लावून पाहतोस (किंवा त्या पहाव्या लागतात) हे सिद्ध झाले आहे. =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मूळ अधोरेखित पाहता:

गवि
Fri, 05/31/2019 - 07:00 नवीन
मूळ अधोरेखित पाहता:
अपघात होऊन बेशुद्ध झाला ते शुध्दवर आला ही मेमरी
याविषयी म्हणत असाल तर या काळातली मेमरी नोंदवली न गेल्याने पुढे कधीही परत येत असेल हे शक्य वाटत नाही. अपघात होण्याच्या जस्ट आधीची काही मिनिटं किंवा शुद्धीवर आल्यानंतरचा काही काळ हा भाग आधी दीर्घ स्मृतीतून गायब आणि नंतर हळुहळू परत येऊ शकत असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

अपघात आणि ‘विस्मरण’..

हेमंतकुमार
Fri, 05/31/2019 - 09:59 नवीन
आता हा विषय वरील चर्चेत आल्याने नवीन संशोधनाची भर घालतो. १. अपघातानंतरचे विस्मरण (amnesia) ही पूर्वापार कल्पना होती. परंतु आता हा शब्द तितकासा बरोबर नसल्याचे तज्ञांचे मत आहे. २. अपघात झाल्याझाल्या ‘लक्ष’(attention) पूर्णपणे विचलित झालेले असते. त्यामुळे तेव्हा कुठलीही नवी माहिती मेंदूत साठवली जात नाही. ३. म्हणून आता या स्थितीला अपघातानंतरचा मानसिक ‘गोंधळ’ (confusional state) असे म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

शतशः धन्यवाद

अभ्या..
Fri, 05/31/2019 - 10:04 नवीन
खुप खुप धन्यवाद डॉक्टरसाहेब, तुमची लेखमाला तर अप्रतिम आहेच शिवाय प्रतिसाद प्रश्नाचे उत्तरें देऊन अजून माहितीपूर्ण करीत आहात. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

गवि,

हेमंतकुमार
Wed, 05/29/2019 - 17:44 नवीन
निव्वळ रक्तवाहिनीतून पोषण दिल्यास (पचनसंस्था बायपास करुन), जठर आतडी वगैरे अवयव वापराअभावी सुकून जात नाहीत का? (निकामी होणे या अर्थाने). >>> चांगला प्रश्न. TPN दीर्घकाळ दिल्यास पचनसंस्थेवर काही विपरीत परिणाम होतात. ते असे: १. यकृताचे कार्य मंदावते. काही रुग्णांत ते अखेर खूप क्षीण होऊ शकते. २. पित्ताशय (gall b.) ‘निद्रिस्त’ होते व त्यातून पित्तखड्यांची निर्मिती होते. ३. आतडी ‘सुकून’ जात नाहीत. पण त्यांचा रक्तप्रवाह, पेशींची वाढ, एन्झाइम्स निर्मिती, हालचाली, उपयुक्त जिवाणूनिर्मिती यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, जमेल तेव्हा नळीतून पोषणाचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जातो.
  • Log in or register to post comments

अतिशय कठिण विषयाचे उत्तम

शेखरमोघे
गुरुवार, 05/30/2019 - 01:08 नवीन
अतिशय कठिण विषयाचे उत्तम विश्लेषण आणि शन्कानिरसन. अभिनन्दन!
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

लई भारी
गुरुवार, 05/30/2019 - 21:08 नवीन
खूप उपयुक्त माहिती सोपी करून सांगितल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

सर्व नवीन प्रतिसदकांचे

हेमंतकुमार
Fri, 05/31/2019 - 06:40 नवीन
प्रतिसाद व प्रोत्साहनाबद्दल आभार !
  • Log in or register to post comments

'vegetative ' (अवस्था) साठी

शेखरमोघे
Fri, 05/31/2019 - 07:12 नवीन
'vegetative ' (अवस्था) साठी मराठी शब्द जरूर सुचवावा ही वि. आपला "लोळागोळा" हा शब्द त्या अवस्थेच्या जवळचा आहे. पण vegetative हाच शब्द थोडासा खटकतो. अनेकानी (न खुडलेली) vegetables "जिवन्त" असतात हे नक्कीच सिद्ध केलेले आहे. आणखी पर्याय- मृतवत, मृतप्राय, अचेतन, मज्जासन्वेदनाहीन (जरा बोजडच शब्द)
  • Log in or register to post comments

शेखर, पूर्ण सहमत.

हेमंतकुमार
Fri, 05/31/2019 - 07:45 नवीन
शेखर, पूर्ण सहमत. मलाही तो मूळ इंग्लिश शब्द खटकतो. पण अधिकृत वैद्यकीय भाषेत तो नोंदवला असल्याने तो वापरला जातो. त्यानुसार त्याचा अर्थ 'functioning unconsciously' असा आहे.
  • Log in or register to post comments

वजन १.५ किलो पण नाही

Rajesh188
Fri, 05/31/2019 - 14:54 नवीन
वजन दीड किलो पण नाही पण करामत केवढी मोठी आहे मेंदूची.
  • Log in or register to post comments

अजब...

हेमंतकुमार
Fri, 05/31/2019 - 16:27 नवीन
राजेश, सहमत . मेंदूचे वजन शरीराच्या जेमतेम २% आहे. पण आपल्या एकूण ऑक्सिजन वापरातील तब्बल २०% वाटा त्याचा आहे. मुलांत वयाच्या पहिल्या दशकात तर तो ५०% आहे. मेंदूचा सतत रक्तपुरवठा चालू लागतो. जर तो काही कारणाने पूर्ण थांबला, तर अवघ्या काही सेकंदांत बेशुद्धावस्था येते.
  • Log in or register to post comments

माहितीपुर्ण लेख

मराठी कथालेखक
Sun, 06/02/2019 - 20:46 नवीन
आणि प्रतिसादांतूनही चांगली माहिती मिळाली आहे
त्यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांना त्या रुग्णावरील सर्व ‘जीवरक्षक उपाय यंत्रणा’ बंद करण्याची कायदेशीर परवानगी (काही देशांत) मिळते.
भारतात याबद्दल काय कायदे आहेत ?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा