मराठी दिवस २०२०

चंद्रिका

Primary tabs

किल्ली's picture
किल्ली in जनातलं, मनातलं
6 Feb 2019 - 3:00 pm

राधिका भाजी आणण्यासाठी घरातून निघाली होती. गल्लीच्या बाहेर मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावर ती वळली. रस्ता ओलांडत असताना एक कार तिच्या बाजूला येऊन थांबली. त्या आलिशान कार मधून अति उच्चभ्रू महिला खाली उतरली. उंची कपडे, गॉगल अशा पेहरावात ती एखाद्या राणीसारखी शोभत होती. राधिकाला पाहून तिने ओळखीचे स्मित केले आणि हलकेच तिच्या पाठीवर थाप मारली. राधिकाने वळून पाहिले. ती तिची शाळेतली मैत्रीण नीता होती.
"कित्ती बदलली ही, श्रीमंतीची झाक तेव्हाही तिच्या वावरण्यात दिसायची. किंचित गर्वही होता तिला. पण आजचं हिचं रूप जरा सुखावह आहे."मनात विचार भर्रकन येतात ना, तसंच झालं राधिकाला!
खूप दिवसांनी भेटल्यामुळे किती बोलू अन किती नको असं झालं होतं दोघीनाही! त्यांनी तिथेच थांबून खूप गप्पा मारल्या. आपण भाजी आणण्यासाठी बाहेर पडलो ह्याची आठवण झाली तशी राधिका भानावर आली. दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला तोच घरी येण्याचे आग्रहयुक्त आमंत्रण देऊनच! असंही त्यांना आता तरी ह्या क्षणी आपआपल्या दिनक्रमाची गोळाबेरीज करायची होतीच. तिथे शाळेतल्या बेरजेच्या आठवणींना उजाळा देण्यास वेळ नव्हता.
ठरल्याप्रमाणे एके दिवशी नीताच्या घरी जाण्यास राधिका छान जांभळी साडी नेसून तयार झाली. नाही म्हटलं तरी तिच्या श्रीमंतीला पाहून तिचं साधं मध्यमवर्गीय मन थोडंसं बुजलं होतंच. म्हणून त्यातल्या त्यात भारीची साडी नेसून, मोजकेच अलंकार लेऊन ती नीताने पाठवलेल्या कारमध्ये जाऊन बसली. त्या वातानुकूलित रथामध्ये तिला कससंच होत होतं. गाडी एका मोठ्या बंगल्यासमोर थांबली. राधिका आत जाताच नीताने तिला मायेने आत नेले. तिची अगत्याने चौकशी केली. गप्पा सुरु झाल्या. पण राधिकाला नीताच्या बोलण्यात 'मी' पणा खूपच जाणवत होता.
तिने विचार केला, "खरं तर आहे हिचं सगळं, ही सांगतेय ती सगळी कौतुकं खरीच आहेत. आपण मुकाट ऐकावं." राधीकालाही बरंच काही बोलायचं होतं पण तिच्या ह्या grand आनंदापुढे आपले अनुभव काहीच नाहीत असे वाटून ती गप्प बसली. थोड्या वेळाने नीताचा नवरा, नीता आणि राधिका असे तिघे जेवायला बसले. मोजकंच बोलून जेवण झाल्यावर तो त्याच्या खोलीत गेला. जेवण बाहेरून मागवलं होतं. चमचमीत, मसालेदार पंजाबी जेवण होतं. एरवी ह्या अशा restaurant style जेवणाचं राधीकाला खूप अप्रूप होतं! पण आज ते आवडत नव्हतं तिला! कसेबसे ४ घास तिने पोटात ढकलले. काय बोचतंय नीताच्या घरात हेच तिला कळत नव्हतं. मैत्रिणीला भेटून घरी परतत असताना खुश होण्याऐवजी राधिका सैरभैर झाली होती. ह्या अस्वस्थतेची कारणं स्वतःशीच धुंडाळत ती घरी पोचली. विचारचक्रात हरवलेल्या तिला नवरा आलेला देखील समजलं नाही. तोही शांतपणे त्याचं काम करत राहिला. पण थोड्या वेळाने तिची काळजी वाटून शामने (राधिकाचा नवरा) विचारले , "काय झालं? गप्प का? कशी झाली तुमची भेट?"
राधिका: "छान झाली, गप्पा झाल्या. भारी आहे नीताच घर. "
एरवी भरभरुन बोलणाऱ्या राधिकेला संक्षिप्त उत्तर देताना पाहून शामने विचारले,
"काय गं, बरीयेस ना. चहा घेणार का, मी बनवत आहे?"
राधिका:"अर्धा कप"
श्यामने आल्याचा चहा बनवला, तो वाफाळता कप तिच्या हातात दिला. तिने न बोलता कप हातात घेतला. चहाचा पहिला घुटका घेताच "वा!" अशी दाद आपसूकच उमटली. फॉर्मुला कामी आला, म्हणून शाम मनात हसला. आता मॅडम बोलणार म्हणून सावरून बसला. पण राधिका विचार करतच होती. अचानक तिला काहीतरी क्लिक झालं आणि ती बोलू लागली:
"अरे आपण अस्वस्थ झालो, कारण आपण असं समजलो की नीताच्या आयुष्यात खूप आनंद आहे आणि आपल्या नाही. उलट कितीतरी आनंदाचे क्षण असेच चालत बोलता वेचतो आपण आपल्या आयुष्यात. तिच्याकडे असणारे श्रीमंती तिची सांपत्तिक स्थिती दर्शवते, पण त्याने आनंद आणि दुःख ह्या भावनांवर काय फरक पडतो ? काहीच नाही. आपण प्रगती जरूर करावी. पण पैसे असो किंवा नसो, आपली सांपत्तिक स्थिती कशीही असो, मन प्रसन्न ठेवावं म्हणजे विश्वात जो आनंद व्यापून राहिला आहे तो अनुभवता येतो. माझं आयुष्य तर किती छान आहे, कसली फिकीर नाही, प्रेमळ माणसांचा सहवास आहे. आयुष्यातल्या प्रत्येक कठीण प्रसंगावर मात करण्यासाठी कणखर मन करण्याची ताकद आहे. आज मी तिच्याकडे गेले म्हणून भरकटायला नको होतं. मनाला लगाम घालायला हवा होता."
"लगाम तर तू घातलास राधिका, आत्ताच!! रात्रीच्या अंधारातही चांदणं वेचणारा तुझा स्वभाव आहे. कधीतरी अंधारात चाचपडायला होणारच ना! शेवटी महत्वाचं हे आहे की तू चांदणं शोधलस! "
श्यामचे हे बोल ऐकताच राधिका मनमोकळं प्रसन्न हसली. नेहमीप्रमाणे आजही त्या दोघांची सायंकाळ चहाबरोबर ताजीतवानी होऊ पाहत होती.

आकाशात एकीकडे सूर्य मावळत असला तरी दुसरीकडे चंद्र आणि चांदण्या शीतल प्रकाशाची उधळण करण्यास सज्ज झाल्या होत्या.
--------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
--------------------------------------------------------------------------------------------------------

kathaaलेख

प्रतिक्रिया

राधिका म्हणल्यावर मला वाटलं दुसरी व्यक्ती शनया की काय :P

सविता००१'s picture

7 Feb 2019 - 7:33 pm | सविता००१

आवडली