एक मोहक दुनिया..एक खेळ..पोकर

सजन's picture
सजन in जनातलं, मनातलं
15 Jan 2019 - 9:33 pm

पोकर म्हटले कि लगेच डोळ्यासमोर येतो तो ओशन ११ किंवा जेम्स बॉण्डच्या सिनेमांमधून आपल्या समोर आलेला पोकर, वाळवंटातली मायानगरी लास वेगस (Las Vegas) ज्याच्या जीवावर चालते तो पोकर, कोट्यावधींची ज्या खेळात उलाढाल चालते तो पोकर, ज्याच्या अनुशंघाने नकळत ज्याचे समीकरण गुन्हेगारी
वर्तुळाशी लावले जाते तो अपनेही आपमें एक गूढ वलय बाळगणारा पोकर.

भारतीयांनाही पोकर तसा नवा नाही. घरोघरी दिवाळी-गणपतीत चालणाऱ्या पत्ते-पार्टीज् असो की, रस्त्याच्या बाजूला कोंडाळे करून, तोंडात काडी धरून खेळलेला तीन पत्ती असो, पोकर म्हणजे जुगारच. तरीही सिनेमांत जेव्हा
पोकरच्या चिप्स म्हणजे नाणी दाखवत, बेटिंग करत जेव्हा नायक-नायिका लाखो करोडोंच्या बोली लावत असतात तेव्हा ते नक्की काय खेळतायंत याबद्दल सर्वसामान्य भारतीय तसा अनभिज्ञच असतो.

पोकरचे मूळ कुठले पाहायला गेलं तर पार दहाव्या शतकातल्या चीन मधल्या राजांपासून पासून ते सोळाव्या शतकात पर्शिया मधे खेळल्या जाणाऱ्या 'As Nas' (अस नाज) मधे मिळते. हजारो वर्षे आणि अनेक संस्कृतींनी आपलासा केला गेलेला दिसतो. तरीही पोकरचा सगळ्यात जवळचा पूर्वज म्हणजे फ्रांस मधला Poque. तिथून सुरु झालेला पोकरचा प्रवास आज कुठपर्यंत आलाय हे बघता भलताच विस्मय वाटतो.

अमेरिकेत पोकर तसा बराच नंतर आला. १९३० साली काम सुरु बोल्डर धरणाच्या कामासाठी मोठ्या संख्येने पुरुष कामगार लास वेगास च्या वाळवंटात आले आणि हे कोणतेही जबाबदारी किंवा कुटुंब नसलेले पुरुष, त्यांच्या बरोबर त्यांच्या मनोरंजनाच्या साधनांनाही आकृष्ट करू लागले. स्थानिक उद्योजकांच्या बरोबरीने माफिया लॉर्ड्सनी पैसे ओतून वाळवंटात कॅसिनो तयार झाले. हा पोकर उत्तम पैसे आणणारा धंदा
आहे याची जाणीव होताच सरकारने १९३१ साली नेवाडा राज्याने जुगाराला/पोकरला कायदेशीर मान्यता दिली. अमेरिकेतल्या ओसाड वाळवंटात तयार झालेल्या जादुई आणि मायावी नगरीचा
कर्ता-धर्ता पोशिंदा अजून कोणी नसून खुद्द पोकर आहे.

आपली नजर पोचेल तिथपर्यंत बनलेल्या या कृत्रिम नगरी लास वेगस मधे कित्येक प्रकारचे पोकर खेळले जातात. पत्त्यांवर पैसे लावून खेळणे हा मूलभूत नियम असला तरीही पत्त्यांमध्ये जसे पाच-तीन-दोन, बदाम सात, मेंडीकोट असे प्रकार असतात तसेच पोकर मधे टेक्सास-होल्ड-एम (Texas Hold'em), ओमाहा होल्ड-एम (Omaha Hold'em), फाईव्ह कार्ड ड्रॉ, सेव्हन कार्ड स्टड हे काही प्रसिद्ध पोकरचे प्रकार. यातला टेक्सास होल्ड-एम हा त्यातला सगळ्यात आवडीने खेळाला जाणारा आहे असे म्हणायला हरकत नाही.

आता हा पोकर खेळायचा म्हणजे नक्की काय करायचे. आपल्या हातातले पत्ते आणि समोर टेबलवर असलेले पत्ते याचा अंदाज घेऊन त्याचबरोबर समोरच्या बसलेल्या सगळ्या खेळाडूंकडे कोणते पत्ते असतील याचा कयास बांधून लावलेली बोली म्हणजे पोकर. इंग्रजी
मधे एक वाक्य आहे, In Poker, they say you play the players and not the
cards. याचा अर्थ, समोरच्याच्या देहबोलीतून, त्याच्या नजरेतून, चेहऱ्यावरून त्याचा अंदाज बांधत, स्वत:च्या हातात काय डाव याचा
थांगपत्ताही लागू न देता शिताफीने आणि निर्विकार चेहऱ्याने समोरच्या माणसाला आपल्याला हवे तसे खेळवणे हा आहे पोकर चा गाभा. राजनीतीच आहे ही, साधे सुधे काम नव्हेच.

यात खेळात अनेक गमती-जमती आहेत. काही खेळाडू त्यांच्या नकळत हातातली पाने कशी आहेत त्यानुसार एखादी हालचाल किंवा आवाज करतात जी बरेचदा समोरचा खेळाडू तुमची नस ओळखायला वापरू शकतो. उदा., एक बऱ्यापैकी नावाजलेला पोकर खेळाडू, त्याच्या उमेदीच्या काळात हातात चांगली पाने असतील तर आपसूक एक हात कानावर ठेवत असे आणि याचा त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनी किती वापर करून घेतला असेल हे सांगायला नकोच.

अगदी याच कारणांनी आपल्या हातातल्या कार्ड्स अंदाज समोरच्याला येऊ नये म्हणून जो आणि जितका निर्विकार चेहरा ठेवला जातो त्याला प्रसिद्ध 'पोकर फेस' (Poker Face) म्हणतात. आणि हे लिहायला सोपे आहे पण त्या पोकरच्या टेबल वर जेव्हा हजारो-लाखो-करोडोंची बोली लागते तेव्हा हा असा चेहरा ठेवणे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हेच.

आपल्या देशात जशा क्रिकेटच्या किंवा कोणत्याही खेळाच्या होतात तशाच पोकरच्या देखील अगदी स्थानिक पातळी पासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा आणि सामने होत असतात. आणि हे आंतराष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाणार्या सामन्यांत लावल्या जाणाऱ्या बोली या हजारो तर कधी लाखो डॉलर्सच्या असतात. श्रीमंत लोक या सामन्यांसाठी उत्तम खेळाडूंचे प्रायोजकही बनतात. पैसे या श्रीमंत माणसांचे आणि हुशारी किंवा कौशल्य
खेळाडूंचे असाही एक व्यवसाय अस्तित्वात आहे. नुसते पत्ते कुटणे किंवा नशिबावर विसंबून बोली लावणे एवढीच या खेळाची बाजू नसून, या खेळात एक प्रोबॅबिलिटी (Probability) किंवा संभवनीयता आहे, त्याचे शास्त्र आहे, त्याचे एक गणित आहे, काही आडाखे आहेत. या सगळ्याचा उत्तम अभ्यास असलेले लोक आहेत. कोणत्याही खेळात प्राविण्य मिळवायला करायला लागते तशी मेहनत ह्यातले खेळाडूही करतात. ही मेहनत, परिश्रम म्हणजे मेंदूची आणि मनाचा कस लावणारी असते.

परदेशात पोकरला जे एक वलय प्राप्त झालंय ते वलय भारतात अजून तरी नाही हे खरे. उद्या कोणी आमचा मुलगा/मुलगी काय करते यावर पोकर खेळते हे उत्तर आले तर समोरच्याचा चेहरा आणि त्यानंतर होणारी कुजबुज याचा विचारच न केलेला बरा. पण सत्य परिस्थिती आहे की, परदेशात आज कित्येक पोकर खेळाडू एक करिअर म्हणून पोकर कडे बघतात. साधारण चारचौघात कळूनही येणार नाही असा एखादा
हुडी (जॅकेट) घातलेला बावळा दिसणारा चष्माधारी मुलगा या पोकरच्या दुनियेतील महा-बिलंदर खेळाडू असू शकतो.

अमेरिकेत हा खेळ घरोघरीही खेळला जातो. आपला गल्लीतला पत्त्यांचा ग्रुप
असावा तसा पोकरचा ग्रुप असणे बराच प्रचलित प्रकार आहे. महिन्यातून एखादा सुट्टीचा
दिवस पकडून बिअर पीत मित्रांबरोबर रात्री पोकर खेळणे हा सामान्य शिरस्ता आहे.

हा पोकर जिथे मोठ्या प्रमाणावर खेळला जातो ते कॅसिनो/कसिनो (Casino) या एक अत्यंत मनोरंजक जागा असतात, जणू आत आलेला कोणताही माणूस (स्त्री आणि पुरुष) या गारूडातून सुटून जाणे अवघड व्हावे. इथे गंभीरपणे मोठ्या बोली लावत पोकर खेळणाऱ्या लोकांच्या खोल्या थोड्या आतल्या बाजूला असतात, तिथे मुक्त दारूचे वाटप केले जाते. कधी कधी एखाद्या खेळाडूमागे ललनांचा गराडा
दिसला तर ते देखील नवल नाही. त्याचबरोबर अगदी एक सेंट ची बोली लावू देणारी
स्लॉट मशीन्स (slot machines) जिथे टुकूर-टुकूर एक एक पैसा खेळत बसता येतो. बरेचदा म्हातारे आजी-आजोबा एकाच वेळी खूप पैसे लावायची रिस्क घेण्याऐवजी या स्लॉट मशीन्स ना जास्त प्राधान्य देतात. दिवस-रात्र खेळत
बसलेले म्हातारे सगळ्या कसिनोमधले सामान्य दृश्य आहे. एकदा मला एका कसिनोत एक गुजराती आज्जी भेटली होती, खमकी म्हातारी स्लॉट मशीन्सवर बक्कळ कमवत होती.

आजही कित्येक ठिकाणी पोकर बेकायदेशीर आहे, त्यामुळे नकळतच या खेळाला एक
गुन्हेगारीचे वलय प्राप्त झालंय यात शंका नाही. आणि कितीही सोनेरी मुलामा चढवला
तरी हा जुगार आहे आणि ह्याचे कोणत्याही गोष्टीचे लागते तसे व्यसनही लागू शकते नव्हे तर हे व्यसन लागलेले अन् त्यामुळे बरबाद झालेली कित्येक कुटुंबेही आहेत. कोणत्याही गोष्टीची असते तशी या मोहक आणि चकचकीत दुनियेची ही एक अत्यंत दुर्दैवी बाजू आहे जी नाकारता येणारच नाही.

आता हे वाचून हे कोणालाही समजा वाटले की, हा खेळ फक्त परदेशी किंवा अमेरिकेतली
माणसे खेळतात काय? मी एक अस्सल भारतीय आहे, महाराष्ट्राच्या मातीत वाढलेली आणि मी अत्यंत सिरिअसली पोकर खेळते. माझ्या ओळखीतला एक अत्यंत हुशार भारतीय मुलगा अमेरिकेत शिकायला आला तेव्हा वर्षातून एकदा वेगासला जाऊन पोकर खेळून त्याची त्या वर्षाची फी मिळवत असे, हे सत्य आहे.
अजून एक किस्सा सांगते. लास वेगस (Las Vegas) च्या बेलाजीओ (Bellagio) या
सगळ्यात महागड्या कॅसिनो/हॉटेल मधे एकदा सकाळी ६ वाजता मी कॉफी घ्यायला २७ व्या मजल्यावरून लिफ्ट मधे शिरले. १६व्या मजल्यावर माझ्या लिफ्ट मधे एक
व्हिएतनामी माणूस चढला. त्याच्या हातात अत्यंत उंची दारूची उघडी बाटली होती. त्याच्या पॅन्टच्या दोन्ही खिशांतून १०० डॉलरच्या नोटांच्या गड्ड्या डोकावत होत्या. हा भाई खेळायला निघायलाय हे उघड होते, मी त्याला उपचार म्हणून गुड मॉर्निंग म्हटले आणि म्हातारा बाबा बोलू लागला. त्याने
आदल्या रात्री ६०,००० डॉलर्स कमावले होते आणि त्याच्या आदल्या दिवशी ४०००० डॉलर्स तो हरलाही होता. मी मलाच काय तर माझ्या खानदानाला विकले तरी असल्या पैशाच्या गोष्टींची स्वप्नेही पडणे मला शक्य नसल्याने मी आपले त्याला, गुड लक फॉर टुडे (तुझ्या आजच्या खेळासाठी शुभेच्छा) असे म्हणून
सटकत होते तर बाबाने मला त्यावर थांबवून म्हटले, की मी जिंकीन किंवा हरीन ते
महत्वाचे नाहीच, महत्वाचे आहे ते खेळणे आणि खेळत राहणे, कॅसिनो च्या खेळात आणि आयुष्याच्याही. त्या बाबाने फुकट पाजलेली कॉफी आणि हे वाक्य कायम लक्षात राहील.

असेच कोणत्यातरी कसिनो मधे वाचलेले एक वाक्य आठवले, while playing poker, you learn a lot about yourself and other players too, well, life really isn't that much different. खरंच तर आहे, आयुष्यात काय नि पोकर मधे काय, माणसं कळणं महत्वाचं. वाटायला सोपं पण प्रत्यक्षात महाकठीण. आपल्या कल्पनेतही नसणाऱ्या एका
अनोख्या, मोहमयी पण तितक्याच फसव्या दुनियेत डोकावून येण्यासारखी मजा नाही हे हि तितकेच खरे. ज्याला ही दुनिया पावली त्याला ती लखलाभ असो.

वावरसंस्कृतीप्रकटनविचारलेखअनुभवमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

16 Jan 2019 - 7:54 am | तुषार काळभोर

मराठीत कदाचित पहिल्यांदा पोकरवर ललित लिहिलं गेलं असेल.
अजून वाचायला आवडेल.

ता.क.
अवांतर आशियाई/कॉमनवेल्थ स्पर्धामध्ये बहुधा ब्रिज असतो. त्यात भारतातर्फे किरण नादर यांच्या नेतृत्वात संघ गेला होता. आणि भारताने त्यात सुवर्णपदक जिंकले होते.
किरण नादर या HCLच्या शिव नादर यांच्या पत्नी आहेत.

सजन's picture

16 Jan 2019 - 7:44 pm | सजन

लिहिते अजून

प्रचेतस's picture

16 Jan 2019 - 8:43 am | प्रचेतस

वेगळ्याच विषयावरील लेख.
वर पैलवान म्हणतात तसंच, मराठीत ह्या विषयावर पहिल्यांदाच काही वाचनात आलं.

सजन's picture

16 Jan 2019 - 7:46 pm | सजन

सही! glad to know that!

आनन्दा's picture

16 Jan 2019 - 8:43 am | आनन्दा

छान लेख.. आवडला.

अनिंद्य's picture

16 Jan 2019 - 9:46 am | अनिंद्य

पोकर, रॉलेत, गोल्फ, बिलियर्ड्स हे सर्व प्रकार सिनेमात दाखवण्यासाठीच जन्माला आले असावेत :-)
लेख उत्तम, आवडला.

टर्मीनेटर's picture

16 Jan 2019 - 10:55 am | टर्मीनेटर

मस्त लेख.

कॅसिनो/कसिनो (Casino) या एक अत्यंत मनोरंजक जागा असतात, जणू आत आलेला कोणताही माणूस (स्त्री आणि पुरुष) या गारूडातून सुटून जाणे अवघड व्हावे.

अगदी खरं! आणि हा अनुभव घेण्यासाठी लास वेगास वा माकाव येथे जाण्याचीही गरज नाही, भारताच्या भूमीवर बेकायदेशीर असलेला जुगार गोवा सरकारने मांडवी नदीत आणि मिरामार बीच येथे कॅसिनोच्या रुपात अधिकृतपणे पाण्यावर तरंगता करून दाखवला आहे. तीन-चार वर्षांपूर्वी दोनच कंपन्यांच्या प्रयेकी २ क्रुझ वर असलेल्या कॅसिनोंची संख्या आता १० च्या पुढे गेली आहे. पोकर, रुलेट, ब्लॅक जॅक, बॅकरॅट, स्लॉट मशीन्स आणि काही देशी पत्त्यांचे खेळ तसेच IPL च्या सामन्यांवर बेटींगहि येथे चालते. जुगार खेळण्यासाठी म्हणून नाही पण तिथले वातावरण अनुभवण्यासाठी कॅसिनोला नक्की भेट द्यावी.

बाप्पू's picture

16 Jan 2019 - 10:59 am | बाप्पू

मी जिंकीन किंवा हरीन ते
महत्वाचे नाहीच, महत्वाचे आहे ते खेळणे आणि खेळत राहणे, कॅसिनो च्या खेळात आणि आयुष्याच्याही.

आवडले.

सजन's picture

16 Jan 2019 - 7:47 pm | सजन

Thanks for your encouraging words

लई भारी's picture

16 Jan 2019 - 3:28 pm | लई भारी

नेहमीच कुतूहल वाटलंय या प्रकाराविषयी :)
लिखाण आवडलं!
दोन्ही quotes आवडल्या.

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2019 - 4:53 pm | टवाळ कार्टा

आहहाहा...1 वर्ष लै खेळलोय टेक्सास होल्डएम पोकर...1 1 रुपया बोली लावून :) ...कमीत कमी 10 ते जास्तीत जास्त 25 जण असायची....कधी कधी व्होडका शॉटच्या बोली लावायचो ;)
यात बोली लावायचा अज्जून एक लोकप्रिय प्रकार आहे तो अजून खेळायचा बाकी आहे ;)

समीरसूर's picture

16 Jan 2019 - 5:04 pm | समीरसूर

अगदी वेगळ्या विषयावरचा लेख! आवडला!

खरंय! खेळत राहणं हे महत्वाचं. कितीही पैसे असले तरी कसिनोमध्ये (तसं पाहिलं तर कशावरही) तब्येतीत उधळणं याला खूप जिगर लागत असावी. मी एकदाच एका कसिनोमध्ये गेलो होतो. मला काहीच झेपलं नाही. एक चक्कर टाकून बाहेर पडलो.

माझा एक मित्र अमेरिकेत नेहमी कसिनोमध्ये जायचा. चिक्कार जिंकायचा, दणकून हरायचा. मुलं होईपर्यंत त्याने अमेरिकेत उपलब्ध असलेली सगळ्या प्रकारची ऐष केली. अर्थात, काही बाबतीत मर्यादा ओलांडल्या नाहीत पण बाकी हेवा वाटावी अशी लाईफस्टाईल होती त्याची. अगदी १२-१५ वर्षे! बक्कळ म्हणजे सॉलीडच बक्कळ कमाई करून ठेवलीये त्याने. अजूनही अमेरिकेतच आहे पण सध्या दोन मुले असल्याने लाईफस्टाईल बर्‍यापैकी बदलेली आहे त्याची.

आणि मी अशी ही उदाहरणे पाहिली आहेत ज्यांच्याकडे खूप मर्यादित पैसे आहेत पण तरीही तब्येतीत जगतात. झेपेल तेवढी ऐष नक्कीच करतात.

अर्थात असेही आहेत ज्यांच्याकडे बक्कळ आहे पण इतरांना पाच रुपयाचा चहादेखील पाजतांना शंभरवेळा विचार करतात. घरातली प्रत्येक जुनी वस्तू विकून पैसे कसे वसूल करता येतील याचा विचार करतात पण उदार मनाने एखादी फुटकळ वस्तू घरात काम करणार्‍या बाईला देऊन टाकत नाहीत.

असो. खेळत रहायला पाहिजे हे खरं....तब्येतीत!

प्रमोद देर्देकर's picture

16 Jan 2019 - 5:13 pm | प्रमोद देर्देकर

टर्मिने टर - त्यासाठी गोवा कशाला हवा.
आमची मरीन ट्रीप मुंबई परिसरात झाली त्या बोटीवर सुध्दा केसिनो होता हो.
टक्या - कसं खेळतात ते लिही की बैजवार.

टर्मीनेटर's picture

16 Jan 2019 - 6:36 pm | टर्मीनेटर

त्या बोटीवरचा तुमचा अनुभव कसा होता ते वाचायला आवडेल (अगदी थोडक्यात लिहिलात तरी चालेल).
जवळ असल्याने एखाद्या विकांताला फेरी मारायला एक ठिकाण उपलब्ध होईल.

गवि's picture

16 Jan 2019 - 5:20 pm | गवि

द गॅम्बलर..

You've got to know when to hold 'em
Know when to fold 'em

Know when to walk away
And know when to run

You never count your money
When you're sittin' at the table

There'll be time enough for countin'
When the dealin's done

मराठी कथालेखक's picture

16 Jan 2019 - 6:44 pm | मराठी कथालेखक

हा पोकर जिथे मोठ्या प्रमाणावर खेळला जातो ते कॅसिनो/कसिनो (Casino) या एक अत्यंत मनोरंजक जागा असतात, जणू आत आलेला कोणताही माणूस (स्त्री आणि पुरुष) या गारूडातून सुटून जाणे अवघड व्हावे

माझा किस्सा सांगावासा वाटतो
मी एकदा गोव्याला कॅसिलोत गेलो. बोटीवरील कॉसिनो बघण्याचे आकर्षण असल्याने १५०० रु प्रत्येकी असे माझे व पत्नीचे ३००० रुपयांचे तिकीट घेतले. त्यात खेळण्याकरिता ४ कुपन्स घेतली. तिथले विविध खेळ समजून घेण्याचा प्रयत्न केला. सोबत मिळणार्‍या (फुकट तर म्हणता येणार नाही !!) व्हिस्कीचा आनंद घेतला
व्हिस्कीचे दोन पेग झाल्यानंतरही 'तिकिटाव्यतिरिक्त अधिक पैसे जुगारात घालवायचे नाही' हा निर्धार कायम ठेवत कुपन्सवर खेळून वाचवता आलेले शंभर रुपये खिशात घातले ..