ओंकार पत्की - काही आठवणी....
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
ओंकारवर लेख लिहायला घेतला होता, पण काय लिहू आणि काय नाही असं झालं....
या केवळ त्याच्या आठवतात तशा आठवणी....
त्याची आणि माझी मैत्री गेल्या तीस - बत्तीस वर्षांची. मला आठवतं आम्ही सहावीत असताना तो आमच्या शाळेत आला आणि पहिल्या दिवसापासून असा काही रमला होता की जणू माँटेसरीपासूनच आमच्याबरोबर होता! तेव्हापासूनच तो असा बिनधास्त आणि काहीसा विक्षिप्त होता. पुढे सातवी - आठवी दोन वर्ष आम्ही एका बेंचवर शेजारी बसत असल्याने बडबड केल्यामुळे कित्येकदा एकत्रं शिक्षा भोगली असेल याचा हिशेबच नाही!
मला आठवतं सातवीत असताना त्याच्या हात फ्रॅक्चर झाला होता. दुसर्या दिवशी हाताला प्लॅस्टर घालून हे महाशय वर्गात आले आणि आल्याआल्या माझ्यासमोर पेन धरुन म्हणाले,
"घे, याच्यावर सही कर!"
"सही? प्लॅस्टरवर?" मला काहीच कळेना.
"कर रे! सगळ्यांच्या सह्या घेणार आहे आणि डॉक्टरला दाखवणार आहे!"
दहावीला ८७% मार्क असूनही (१९९१ मध्ये) आणि सर्वांनी सायन्सला जाण्याचा आग्रह करुनही तो हट्टाने आर्ट्सला पोतदार कॉलेजला गेला. कॉलेजमध्ये असताना तिथे नाटक आणि पुढे असिस्टंट डायरेक्टर आणि लेखक म्हणून मनोरंजन क्षेत्रात गेला. किती जणांना कल्पना आहे माहित नाही, पण 'चार दिवस सासूचे' या सिरीयलचा तो असिस्टंट डायरेक्टर होता आणि सुमारे दीडेकशे भाग त्याने लिहीलेले होते. या महारटाळ सिरीयलवरुन आम्ही सगळेच त्याची चेष्टेने सतत खेचायचो. त्याच्यासारखा मनस्वी आणि अत्यंत सृजनशिल माणूस पुढे या क्षेत्रातून बाहेर पडला आणि कॉर्पोरेट ट्रेनिंगसारख्या रुक्ष क्षेत्रात गेला हे काहिसं अनाकलनियच होतं. त्याबद्दल त्याला विचारलं तेव्हा तो इतकंच म्हणाला,
"कॅमेरा हे माझं काम नाही, माझं काम आहे लिहीण्याचं, मी त्यातच कम्फर्टेबल आहे. पण सिरीयल्समधला भंपकपणा आणि चॅनल्सच्या सूचना मला पटत नाहीत, आणि मला हवं तस मी लिहू शकत नसेन तर त्याचा काय उपयोग आहे? मी दुसर्यांच्या समाधानासाठी माझी क्रिएटीव्हीटी मारु शकत नाही!"
मला आठवतं आम्ही सलग चारचार - पाचपाच तास अशा अनेक विषयांवर फोनवर गप्पा मारत बसायचो. मी डलासमध्ये आणि तो मुंबईत असल्याने शेवटी दोघांपैकी कोणाला तरी झोप अनावर झाली की मग गप्पा आवरत्या घेतल्या जायच्या. सिनेमे, क्रिकेट, इतिहास, राजकारण त्याला कोणताही विषय वर्ज्य नव्हता. त्याचं वाचन अफाट होतं आणि नुसतं वाचन अफाट नव्हतं तर त्यातला नेमका संदर्भ नेमक्या वेळेस आठवण्याची तीव्र स्मरणशक्ती होती. तो किती सिद्धहस्तं लेखक होता हे मी कोणाला सांगण्याची जरुरच नाही.
मला आठवतंय, २०१२ मध्ये माझे वडिल काहीही होत नसताना अचानक गेले. हा माणूस दादरहून मला भेटायला रात्री नऊ वाजता माझ्या घरी कल्याणला आला. तासभर गप्पा मारत बसला आणि मग बाहेर पडला तो बोरीवलीला जाण्यासाठी!
त्याला कॅन्सरचं निदान झाल्यावरही त्याची प्रतिक्रीया त्याच्या स्वभावाप्रमाणेच होती.
"कॅन्सरला मी झालोय!"
गेल्या नोव्हेंबरमध्ये मी मुंबईला आलो होतो तेव्हा आम्ही शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर तास - दीडतास गप्पा मारत बसलो होतो. त्याची केमोथेरपीची ट्रीटमेंट पूर्ण झाली होती आणि त्यानंतरच्या चेकअपमध्ये कॅन्सरच्या कोणत्याही सिमटर्म्स आढळलेल्या नव्हत्या, त्यामुळे तो खूप रिलॅक्स होता. तो तळेगावला शिफ्ट झाला होता, पण नेमका त्या दिवशी काहीतरी कामानिमित्ताने मुंबईत आला होता. बोलताबोलता म्हणाला,
"च्यायला एकदाची ही कॅन्सरची कटकट आटपली ते बरं झालं. माझं मोसाद तसंच अर्धवट पडलं आहे. गिरीशबरोबर एक नवीन सिरीजही सुरू करायची आहे. आता त्याच्या मागे लागतो...."
त्यानंतर बातमी आली ती त्याचा कॅन्सर पुन्हा उपटल्याची... त्यानंतर एकापाठोपाठ एक वाईटच बातम्या येत राहिल्या. गेल्या तीन - चार महिन्यांत तर तो पूर्णपणे अंथरूणाला खिळला होता. डॉक्टरांनी स्पष्टपणे सर्वांना कल्पना दिली - इट्स मॅटर ऑफ टाईम!
यावर्षीच्या खरंतर भारतात येण्याचा काहीही प्लॅन नव्हता, पण अचानकच काही कामानिमित्ताने जेमतेम दहा - बारा दिवसांसाठी घाईघाईत भारतात येणं झालं. सुरवातीचे तीन - चार दिवस जेट लॅग आणि इतर काही कामांमध्ये गेल्यावर शुक्रवारी २३ तारखेला मी आणि अंजली त्याला भेटायला तळेगावला गेलो. अवघ्या वर्षाभराने झालेली ही भेट पण त्याची अवस्था पाहून काय बोलावं सुचत नव्हतं. स्वत:चा पाय हलवण्याचीही त्याच्यात ताकद राहिली नव्हती. तो मात्रं एकदम उत्साहात होता. नेहमीप्रमाणे गप्पा सुरु होत्या. त्याचा हजरजबाबीपणा आणि बोलण्यातला मिस्कीलपणा कणभरही कमी झालेला नव्हता. बोलताबोलता एकदम म्हणाला,
"बरं झालं आलास ते! पुढल्या वेळेला येशील तेव्हा मी नसेन बहुतेक!"
चर्र होणं म्हणजे काय हे त्या क्षणी पुरेपूर कळून चुकलं...
दोघांनाही वेळेचं बंधन होतं त्यामुळे निघायचं जिवावर आलेलं असूनही बाहेर पडलो.
जेमतेम आठवड्याभरातच त्याने आपले शब्दं खरे केले...
प्रतिक्रिया
भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
कुठेही कधीही प्रत्यक्षात न
बोका-ए-आझम यांना भावपूर्ण
भावपूर्ण श्रध्दांजली.
भावपूर्ण श्रध्दांजली.
बोका भाऊं ना श्रद्धांजली
Pagination