✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सोडियम : मीठ तारी, मीठ मारी !

ह
हेमंतकुमार यांनी
Wed, 08/15/2018 - 11:55  ·  लेख
लेख
सर्वांना परिचित असणारे सोडियम(Na) हे मूलद्रव्य शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. निसर्गात ते विविध खानिजांत आढळते. त्यापैकी NaCl म्हणजेच मीठ हे आपल्यासाठी सर्वात महत्वाचे खनिज. आपल्या शरीरातही सोडियम काही क्षारांच्या रुपात अस्तित्वात असते आणि जगण्यासाठी मूलभूत स्वरूपाची कामे करते. सोडियमचे आहारातील स्त्रोत व प्रमाण, शरीरातील चयापचय व कार्य, त्याची रक्तपातळी आणि संबंधित आजार या सर्वांचा आढावा या लेखात घेतला आहे. आहारातील स्त्रोत व प्रमाण: स्वयंपाकाच्या बहुतेक पदार्थांत आपण चवीसाठी मीठ घालतो. त्यामुळे प्रथमदर्शनी असे वाटेल की ‘वरून घातलेले मीठ’ हाच सोडियमचा स्त्रोत आहे. पण तसे नाही. दूध, मांस आणि मासे या नैसर्गिक पदार्थांतही ते आढळते. याव्यतिरिक्त आपण अनेक प्रक्रिया केलेले, साठवलेले आणि खारावलेले पदार्थ मिटक्या मारीत खातो. त्यांत तर सोडियम दणकून असते. ब्रेड, वेफर्स, लोणची, sauces.... यादी तशी संपणारच नाही ! त्यामुळे आधुनिक खाद्यशैलीत आपण सगळेच गरजेपेक्षा जास्तच सोडियम खातो. रोज नक्की किती सोडियम शरीराला आवश्यक आहे, हा तसा लाखमोलाचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर तसे सरळ नाही आणि त्याबाबत थोडे मतभेदही आहेत. एका अभ्यासानुसार त्याची रोजची खरी गरज ही जेमेतेम अर्धा ग्रॅम आहे. जगभरातील अनेक वंश आणि खाद्यशैलींचा अभ्यास केल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने एक शिफारस केली आहे. त्यानुसार रोजची सोडियमची गरज २ ग्रॅम आहे आणि याचाच अर्थ असा की ५ ग्रॅम मीठ (NaCl) हे पुरेसे आहे. हा जो आकडा आहे त्याला ‘वरची’ पातळी समजायला हरकत नाही. त्यापेक्षा जरा कमीच खाल्ले तर तब्बेतीला ते चांगलेच आहे असा सर्वसाधारण वैद्यकविश्वातला सूर आहे. अतिरिक्त खाल्ले असता आपली तब्बेत बिघडवणाऱ्या “पांढऱ्या विषां”पैकी ते प्रमुख आहे असे प्रतिपादन काही जण करतात. शरीरातील अस्तित्व आणि कार्य: शरीरातील ७५% सोडियम हा विविध क्षारांच्या रुपात पाण्यात विरघळलेल्या स्थितीत असतो. शरीरातील एकूण द्रव हे दोन गटांत विभागलेले आहेत: १. पेशी अंतर्गत द्रव आणि २. पेशी बाह्य द्रव सोडियम हा मुख्यतः पेशीबाह्य द्रवांत असतो. रक्त हे प्रमुख पेशीबाह्य द्रव होय. त्यातील सोडियम हा मुख्यतः क्लोराईड व बायकार्बोनेटशी संयुगित असतो. त्याची मुख्य कार्ये अशी आहेत: १. पेशींतील मूलभूत प्रक्रियांत आवश्यक २. रक्ताचे एकूण आकारमान(volume) स्थिर राखणे ३. रक्तातील हायड्रोजनचे प्रमाण (pH) स्थिर राखणे ४. मज्जातंतूंच्या संदेशवहनात मदत. शरीरातील चयापचय: आहारातील सर्व सोडियम रक्तात शोषले जाते. त्याचे शरीरातून उत्सर्जन हे लघवी, शौच आणि घामाद्वारे होते. त्यांपैकी सर्वात जास्त उत्सर्जन लघवीतून होते आणि ते आहारातील प्रमाणाशी थेट निगडीत असते. हे उत्सर्जन व्यवस्थित होण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य नॉर्मल असले पाहिजे आणि या कामात Aldosterone हे हॉर्मोन महत्वाची भूमिका बजावते. सोडियमचे घामाद्वारे उत्सर्जन हे अत्यल्प असते. अगदी उष्ण व दमट हवामानात देखील ते विशेष वाढत नाही हे लक्षात घ्यावे. दीर्घकाळ अशा हवामानात राहिल्यास शरीर हळूहळू या प्रक्रियेस जुळवून घेते आणि शरीरातील सोडियमचा समतोल राहतो. आहारातील मीठ आणि रक्तदाब: pict समाजात बहुचर्चित असा हा विषय आहे. त्यातून उच्च-रक्तदाब असणाऱ्यांसाठी तर विशेष महत्वाचा. गरजेपेक्षा जास्त सोडियम रक्तात साठू लागला की त्याबरोबर जास्त पाणीही साठवले जाते. परिणामी रक्ताचे आकारमान (volume) वाढते. त्यातून हृदयावरील भार वाढतो आणि अधिक दाबाने त्याला रक्त ‘पंप’ करावे लागते. त्यातून रक्तदाब वाढतो. आहारातील सोडीयम आणि रक्तदाब यांचा थेट संबंध (directly proportional) आहे. प्रौढांमध्ये केलेल्या अनेक अभ्यासांतून हे सिद्ध झाले आहे की : १. अधिक सोडियम >>> रक्तदाब वाढणे आणि २. कमी सोडियम >>>> रक्तदाब कमी होणे. असे प्रयोग निरोगी आणि उच्चरक्तदाब असलेले, अशा दोघांत करून झाले आहेत आणि त्यातून वरील निष्कर्ष निघतो. त्यामुळे उच्चरक्तदाबाच्या रुग्णांनी ‘वरून घातलेले’ मीठ आणि प्रक्रियाकृत साठवलेले पदार्थ टाळावेत अशी शिफारस आहे. स्वयंपाकात समाविष्ट मिठाचा मात्र बाऊ करू नये. ते आवश्यकच आहे. (दीर्घ मूत्रपिंड विकाराने बाधित व रुग्णालयात दाखल झालेल्यांबाबत मात्र त्याचे काटेकोर मोजमाप असते). काही प्रगत देशांत सोडियमचे प्रमाण कमी केलेले खाण्याचे मीठ उपलब्ध असते. हाही एक सोडियम-नियंत्रणाचा उपाय होय. आजच्या घडीला जगभरातील सुमारे निम्मे प्रौढ लोक उच्चरक्तदाबाने बाधित आहेत. यातून आहारातील सोडियम नियंत्रणाचे महत्व अधोरेखित होते. आहारातील मीठ आणि इतर आजार: अधिक सोडियमचा करोनरी हृदयविकार आणि Stroke यांच्यातील संबध तपासण्यासाठी बरेच संशोधन झालेले आहे. निष्कर्ष उलटसुलट आहेत. दीर्घकाळ सोडियम अधिक्याने या आजारांचा धोका वाढतो असे म्हणता येईल. तसेच वर्षानुवर्षे असे अधिक्य राहिल्यास त्याचा मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. सोडियमची रक्तपातळी : निरोगीपणात ती १३५ ते १४५ mmol/L इतकी असते. इथे एक मुद्दा ध्यानात घ्यावा. सामान्य आजारांत ती बिघडत नाही आणि ती मोजण्याची गरज नसते. ही चाचणी रुग्णालयात दाखल केलेल्या बऱ्याच रुग्णांत मोजली जाते. डीहायड्रेशन, मूत्रपिंड विकार, हृदयविकार, अतिदक्षता विभागातले रुग्ण आणि शस्त्रक्रिया झालेले रुग्ण इत्यादींमध्ये त्याचे महत्व असते. इथे सोडियमबरोबरच पोटॅशियम आणि क्लोराईड यांची एकत्रित मोजणी करतात. या गटाला ‘Electrolytes’ असे म्हणतात. आता कोणत्या आजारांत ही पातळी कमी/जास्त होते त्याचा आढावा घेतो. रक्तातील सोडियम कमतरता : रुग्णालयात दाखल रुग्णांत खूप वेळा आढळणारी ही स्थिती विशेषतः खालील आजारांत दिसते: १. हृदयकार्याचा अशक्तपणा (failure) २. मूत्रपिंड विकार ३. तीव्र जुलाब व उलट्या होणे वरीलपैकी आजारानुसार रुग्णात लक्षणे दिसतात. सोडियम-पातळी कमी होणे हे मेंदूसाठी धोकादायक असते. त्यामुळे या पातळीवर बारकाईने लक्ष द्यावे लागते. पातळी १२० च्या खाली गेल्यास ती गंभीर अवस्था असते. रक्तातील सोडियम अधिक्य: ही स्थिती तुलनेने कमी रुग्णांत आढळते. मूत्रपिंडाच्या व्यवस्थित कामासाठी Aldosterone व ADH या हॉर्मोन्सचे कार्य व्यवस्थित असणे महत्वाचे असते. अनुक्रमे Adrenal व Pituitary ग्रंथींच्या आजारांत ते बिघडते आणि त्यामुळे ही अवस्था येते. वाढत्या पातळीचाही मेंदूवर विपरीत परिणाम होतो. ती १६०चे वर गेल्यास ते गंभीर असते. तेव्हा रुग्ण बेशुद्ध पडतो. …. तर असे हे धातूरुपी मूलद्रव्य – सोडियम. मिठाच्या खाणी, समुद्राचे पाणी आणि संपूर्ण जीवसृष्टीत आढळणारे. आपल्यासाठी जीवनावश्यक आणि आहारात माफक प्रमाणात हवेच. मात्र जिभेचे चोचले पुरवण्याच्या नादात त्याचा आहारातील अतिरेक मात्र नको. ***********************************************

Book traversal links for सोडियम : मीठ तारी, मीठ मारी !

  • ‹ खनिजांचा खजिना : लेखमाला प्रारंभ
  • Up
  • पोटॅशियम : पेशींच्या रंगमंचाचा सूत्रधार ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
आरोग्य

प्रतिक्रिया द्या
36220 वाचन

💬 प्रतिसाद (56)

प्रतिक्रिया

हगवणीवर बहुगुणी मीठ साखर पाणी

चामुंडराय
गुरुवार, 10/20/2022 - 00:23 नवीन
"हगवणीवर बहुगुणी मीठ साखर पाणी" ही जुनी भित्ती-घोषणा आठवली.
  • Log in or register to post comments

हगवणीवर बहुगुणी मीठ साखर पाणी

चामुंडराय
गुरुवार, 10/20/2022 - 00:23 नवीन
"हगवणीवर बहुगुणी मीठ साखर पाणी" ही जुनी भित्ती-घोषणा आठवली.
  • Log in or register to post comments

होय,

हेमंतकुमार
गुरुवार, 10/20/2022 - 07:31 नवीन
आमचे पूर्ण वैद्यकीय शिक्षण त्या घोषणेच्या सहवासातच झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय

होय,

हेमंतकुमार
गुरुवार, 10/20/2022 - 07:31 नवीन
आमचे पूर्ण वैद्यकीय शिक्षण त्या घोषणेच्या सहवासातच झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय

होय,

हेमंतकुमार
गुरुवार, 10/20/2022 - 07:31 नवीन
आमचे पूर्ण वैद्यकीय शिक्षण त्या घोषणेच्या सहवासातच झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय

'सत्याग्रह'

हेमंतकुमार
Sun, 03/26/2023 - 08:50 नवीन
एक चांगला लेख: नवा 'मिठाचा सत्याग्रह'</strong>
आपल्या देशातील नागरिकांच्या आहारातील मिठाचे-सोडियमचे प्रमाण मर्यादेत राहावे, यासाठी नव्याने अन्न व आहार धोरण तयार करणाऱ्या अवघ्या नऊ देशांची नावे पाहा. ब्राझील, चिली, चेक रिपब्लिक, लिथुआनिया, मलेशिया, मेक्सिको, सौदी अरेबिया, स्पेन आणि उरुग्वे हे ते नऊ देश आहेत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा