✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तू मने गमे छे !

भ
भन्नाट भास्कर यांनी
गुरुवार, 05/03/2018 - 13:15  ·  लेख
लेख
म्हणजे तिला मी पहिल्यांदा पाहिलेले तेव्हाच आतून काहीतरी हललेले. पण सांगतोय कोणाला. सारेच हसले असते. मी अगदीच पोरसवदा भासत होतो तिच्यासमोर. ती अगदीच गोलमटोल नव्हती, पण पुरेशी धष्टपुष्ट होती. अगदीच गोरी नसली, तरी गव्हाळ उजळ कांतीची होती. अगदीच मराठी नाही, पण मराठी बोलता येणारी होती. आयुष्यात पहिल्यांदा मी एका गुजराती मुलीच्या प्रेमात पडलो होतो, अगदी पहिल्याच नजरेत पडलो होतो. तिलाही माझ्यात नक्कीच काहीतरी आवडले होते, ते ही पहिल्याच नजरेत. तिची नजरच तसे सांगत होती. पण माझा तो पहिल्या जॉबचा पहिलाच दिवस होता. आणि ती तिथे आधीच सरावलेली खेळाडू होती. मागाहून समजले की तिलाही जॉईन करून चारच महिने झाले होते. तिचाही तो पहिलाच जॉब होता. पण तरीही तिच्यामानाने मी नवखाच होतो. कोणीतरी मग दुसर्‍याच दिवशी चिडवाचिडवीत माझी तिच्याशी जोडी जमवली. आणि पुढे त्या चिडवण्याला आणखी कोणी खतपाणी घालू नये म्हणून उगाचच, अगदी उगाचच मी तिच्याशी एकदा तुसडेपणाने वागलो. फक्त एकदाच.. बस्स ! मग ज्या मुलांनी मला तिच्यावरून चिडवायला घेतले होते, तेच आता आमच्यातील खुन्नसचे किस्से रंगवू लागले. आमच्यात तसे काहीही नसताना आमच्यातील शीतयुद्धाच्या कहाण्या रचू लागले. मी देखील वेड्यासारखा, कसेही का होईना, तिच्यासोबत आपले नाव जोडले जातेय यातच आनंद मानू लागलो. कधीतरी फटक्यात या सर्व अफवांतील फोलपणा जगासमोर येईल आणि आमच्यातील तथाकथित शत्रुत्व प्रेमात बदलेल या विचारांत रमू लागलो. हळूहळू मला जाणवत होते, की मी तिच्यात आता गुंतू लागलो होतो. जेव्हा ती माझ्याकडे बघायची, रागानेच बघायची. मी सुद्धा माझी नजर कोरडीच ठेवायचो. पण नेहमी माझ्या नजरेला नजर मिळेल, अश्याच जागी ती बसायची. माझ्या अगदी शेजारून जायची. तिच्यासाठी मी अस्तित्वातच नाही असे दर्शवून जायची. पण ज्या दिवशी मी ऑफिसला यायचो नाही, तेव्हा हलकेच माझी चौकशीही करायची. मी कधी तिची खोडी काढल्यास, थेट माझ्याशी भांडायलाही लाजायची. पण तिच्यावरून मला चिडवणार्‍या, माझ्या मित्रांशी लाजत लाजत बोलायची. एक वेगळीच केमिस्ट्री होती आमच्यात. तिचे नाव घेताच लोकांना मी आठवायचो, माझे नाव घेताच ती आठवायची.. वर्ष गेले अश्यातच.. आणि मग ठरवले आता बोलायचे.. निमित्त होते दिवाळीनिमित्त ऑफिसमधील एका कार्यक्रमाचे. प्रत्येकाला दहाबारा कागदांचे चिटोरे वाटण्यात आले होते. आणि ठरले असे होते की प्रत्येकाने आपल्या आवडत्या वा नावडत्या व्यक्तींबद्दल त्या कागदावर लिहून तो चिटोरा त्यांच्यात्यांच्या डेस्कवर लावायचा. स्वत:चे नाव मात्र लिहायचे नाही. आपल्याबद्दल लोकं काय विचार करतात याचा थेट फिडबॅक.. मला फक्त एकाच कागदात ईंटरेस्ट होता. काय लिहू, आणि काय नको... अशी संधी पुन्हा येणार नव्हती... थेट भिडायचेच ठरवले ! ठरलं ! लिहून यायचे, तू मला आवडतेस ! पण भावना नेहमी मातृभाषेतच पोहोचतात. मराठी लिहिता बोलता येणारी असली तरी होती मात्र ती गुजरातीच.. मग मेहुलची मदत घेतली.. आणि गुजराती भाषेतील सर्वात गोड वाक्य त्या कागदावर अवतरले, "तू मन्ने गमे छे ! " दुपारच्या सत्रात बाहेर सारे कार्यक्रमात मग्न असताना मी हळूच तो कागद तिच्या डेस्कवर डकवून आलो. जणू काळजाचा छोटासा तुकडाच तिथे ठेवून आलो. आता प्रतीक्षा होती ते तिने माझे काळीज वाचण्याची. प्रतीक्षा संपली. ती जागेवर आली. आम्ही टोळके करून जवळपासच उभे होतो. तिने तो डकवलेला कागद काढला. तो तसाच हातात घेऊन मुद्दामच आमच्या ग्रूपसमोर आली. आणि आम्हाला स्पष्ट दिसेल असे दोन्ही हातांत धरून तो टर्राटरा फाडला.. जरा धक्का लागल्यास खळ्ळकन फुटावे अश्या काचेच्या हृदयावर कोणीतरी तीक्ष्ण खिळ्याने कर्रकचून ओरखडा ओढावा असे झाले.. पण ते शेवटचेच ... त्यानंतर मन कोडगे करून घेतले. पुन्हा त्याला नजरांचे चुकीचे अर्थ काढण्यापासून परावृत्त केले. साधारण दिडदोन महिन्यातच मला नवीन जॉब लागला आणि मी तिथून बाहेर पडलो. तेथील काही मित्र नंतरही संपर्कात होते. पण पुन्हा कधी तिचा विषय निघाला नाही. पुढे तिचे लग्न झाले हे मात्र उडत ऊडत कानावर आले. पण फारसे काही वाटले नाही. कारण एव्हाना माझेही झाले होते. पण जगही किती छोटे असते ना.. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेत अखेर आमची पुन्हा एकदा एकाच कंपनीत गाठ पडली. बावरलेली नजर आम्हा दोघांची. काय बोलावे, कसे बोलावे. कि बोलूच नये. एक अवघडलेपण. तरी सहा वर्षे झाली.. पण फरक असा काहीच नाही.. शेवटी मीच ठरवले, दोघांचीही लग्ने झाली आहेत. जे होते ते माझे एकतर्फी होते. उत्तरही तेव्हाच मिळाले होते. म्हणून संकोच सोडून हसतच तो विषय काढला, आणि जे झाले ते विसरून जाऊया म्हणालो.. चेंडू मी तिच्या कोर्टात ढकलला होता. आता अवघडून जायची वेळ तिची होती. पण तिच्या डोळ्यात अविश्वास होता ! ते.. ते.. तू लिहिलं होतंस?? पण असं कसं.. तू मन्ने गमे छे.. ते अक्षर तर मेहुलचे होते ना .... थोडसं गरगरलं मला.. आणि ते तर होणारच होते. क्षणात जे एवढ्या वर्षांची कॅसेट रिवाईंड होत माझ्याच डोक्यावर आदळली होती... - भन्नाट भास्कर
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
8810 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

अर्र्...=))) मस्तं लिहिल आहे.

पद्मावति
गुरुवार, 05/03/2018 - 13:26 नवीन
अर्र्...=))) मस्तं लिहिल आहे.
  • Log in or register to post comments

मस्त लिहीलय

श्वेता२४
गुरुवार, 05/03/2018 - 13:29 नवीन
आवडली स्टोरी
  • Log in or register to post comments

Such a cute story आवडली :-)

अनिंद्य
गुरुवार, 05/03/2018 - 13:30 नवीन
Such a cute story आवडली :-)
  • Log in or register to post comments

आरारारारा रारा!!!

तुषार काळभोर
गुरुवार, 05/03/2018 - 14:05 नवीन
सरळ आपलं विंग्रजी टाकायचं ना राव... आय लौ यु!!!
  • Log in or register to post comments

मन्ने

राही
गुरुवार, 05/03/2018 - 14:25 नवीन
कथा छानच आहे. पण शीर्षकातला ' मन्ने' शब्द खटकला. तो ' मने' असा असायला हवा होता. खरे तर या चुकीवरून त्या मुलीला हे कळायला हवे होते की ती चिठ्ठी कोणा ' प्रॉपर' गुजरातीभाषकाने लिहिलेली नसणार. किंवा मेहुलने मुद्दामच ती चूक राहू दिली असावी आपली ओळख झाकायला.
  • Log in or register to post comments

@ राही,

अनिंद्य
गुरुवार, 05/03/2018 - 14:45 नवीन
@ राही, हेच लिहिणार होतो, पण रसभंग होईल असे वाटल्याने थांबलो. 'मन्ने - तन्ने' ही हरयाणवी बोली बॉलिवूडमुळे सध्या पॉप्युलर आहे. बाकी कथा आवडली आहेच :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

रुखरुख वाटली राव वाचून . लेखन

खिलजि
गुरुवार, 05/03/2018 - 16:29 नवीन
रुखरुख वाटली राव वाचून . लेखन फारच सुंदर झाले आहे . काहीतरी सकारात्मक शेवट पाहिजे होता . जस कि गुजरातला साखरपुडा आणि मुंबईला विवाह . शिवसेना आणि मनसेचा विरोध , बीजेपीचा छुपा पाठिंबा आणि पळून जाताना बुलेट ट्रेनची मदत , चौथ्या स्टेशनवर उडी घेऊन परत विरार फास्टने मुंबई गाठली आणि लग्नाची गाठ बांधली . असं काहीतरी जगावेगळं . पण एक सांगू तुम्ही जे लिहिलंय ना त्यामुळे डोळ्यासमोर सर्व काही उभे राहत होते वाचताना . सुंदर लिखाण . सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments

हा हा छान कल्पनाविलास.

भन्नाट भास्कर
Fri, 05/04/2018 - 03:22 नवीन
हा हा छान कल्पनाविलास. दुनियादारी चित्रपट आठवला. शेवटी डब्याला डबे जोडत बसले होते. आपली मालगाडी ईथेच थांबलेली बरी. तरी कधी शतकी प्रतिसादांचा धागा काढावासा वाटला तर नक्की हे असले संदर्भ जोडेन. प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि

भन्नाटच रे भास्करा.

अभ्या..
गुरुवार, 05/03/2018 - 16:41 नवीन
भन्नाटच रे भास्करा. भारी लिहिलंय
  • Log in or register to post comments

भारीच लिहिलंय.

प्रचेतस
गुरुवार, 05/03/2018 - 16:57 नवीन
भारीच लिहिलंय.
  • Log in or register to post comments

अर्र!!

सूड
गुरुवार, 05/03/2018 - 17:30 नवीन
अर्र!!
  • Log in or register to post comments

अर्र र्र !

सस्नेह
गुरुवार, 05/03/2018 - 17:33 नवीन
अर्र र्र ! नाव तरी लिहाल की नै !! :(
  • Log in or register to post comments

तेवढं नाव नका विचारू, लेखात

भन्नाट भास्कर
Fri, 05/04/2018 - 03:18 नवीन
तेवढं नाव नका विचारू, लेखात लिहिले नाही तर प्रतिसादात तरी का बदनाम करावे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

मस्तच

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 05/03/2018 - 19:30 नवीन
छन लिहिले आहेस रे भास्करा. "आणि आम्हाला स्पष्ट दिसेल असे दोन्ही हातांत धरून तो टर्राटरा फाडला." ह्या नंतर जरा एकदा बोलायला हवे होते. कारण आधी लेखात म्हंटल्याप्रमाणे-
तिची नजरच तसे सांगत होती.
  • Log in or register to post comments

माई आयुष्यात अश्या सर्व

भन्नाट भास्कर
Fri, 05/04/2018 - 03:17 नवीन
माई आयुष्यात अश्या सर्व नजरांना पुढाकार घेत बोलायची हिंमत दाखवली असती तर किमान ७-८ प्रकरणं असती माझी :) तेवढं जमायचे नाही म्हणून हा चिठ्ठीचपाटीचा उद्योग !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

भारीच

केवळ_विशेष
गुरुवार, 05/03/2018 - 21:41 नवीन
गुगली
  • Log in or register to post comments

खुसखुशीत किस्सा

पिवळा डांबिस
गुरुवार, 05/03/2018 - 22:49 नवीन
आवडला...
  • Log in or register to post comments

तिन्नेचे लग्न मेहूलसोबत झाले

सतिश गावडे
गुरुवार, 05/03/2018 - 23:09 नवीन
तिन्नेचे लग्न मेहूलसोबत झाले का?
  • Log in or register to post comments

नाही.

भन्नाट भास्कर
Fri, 05/04/2018 - 03:14 नवीन
नाही. हा किस्सा लिहिताना तसा शेवटाला ट्विस्ट द्यायचा मोह झालेला. पण बळंच वाटले असते म्हणून टाळला. प्रत्यक्षात असे झाले असते तर खूनच केला असता नक्कीच मेहुलचा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

१ वर्ष???? मग दुसरे काय होणार

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/03/2018 - 23:14 नवीन
१ वर्ष???? मग दुसरे काय होणार
  • Log in or register to post comments

अश्या नाजूक बाबतीत मुखदुर्बळ

भन्नाट भास्कर
Fri, 05/04/2018 - 03:12 नवीन
अश्या नाजूक बाबतीत मुखदुर्बळ असलेल्यांसाठी १ वर्षे हा काळ फार नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

प्रतिसादांबद्दल धन्यवाद :)

भन्नाट भास्कर
Fri, 05/04/2018 - 03:10 नवीन
प्रतिसादांबद्दल धन्यवाद :) तू मने गमे छे यात मने बरोबर आहे, मन्ने चुकीचे आहे. बरीच वर्षे झाली त्या किस्स्याला. माझे गुजराती भाषेचे ज्ञान शून्यच. त्या गुजराती मित्राने मने च लिहिले असणार. मी हा किस्सा लिहिताना मला जे आठवले, बरोबर वाटले ते लिहिले. संपादनाची सोय असल्यास दुरुस्त करून घेतो. तेवढ्यासाठी ज्याचे गुजराती चांगले आहे अश्याचा रसभंग व्हायला नको. चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

गोड

सविता००१
Fri, 05/04/2018 - 12:05 नवीन
किती गोड आहे किस्सा.. आवडला
  • Log in or register to post comments

अरेरे. नेहमी प्रेमभंगा च्या

अमरेंद्र बाहुबली
Fri, 05/04/2018 - 14:24 नवीन
अरेरे. नेहमी प्रेमभंगा च्या कथांचा विनोद करणारा मी आज खरच हलहळलो. लै वाईट झालं. पण अश्या गोष्टीत रिस्क नाही घ्यायची. सरळ काय ते बोलून टाकायचं.
  • Log in or register to post comments

वाईट झालं!

एस
Fri, 05/04/2018 - 15:09 नवीन
वाईट झालं!
  • Log in or register to post comments

कथा आवडली पण तुमच्या

मराठी कथालेखक
Fri, 05/04/2018 - 16:53 नवीन
कथा आवडली पण तुमच्या लिहिण्यावरुन वाटतंय की ती तुमच्या आयुष्यातली सत्यघटना आहे म्हणून हळहळ पण वाटली. असो, आवडत्या व्यक्तीशी कोणत्याही नात्याने जवळीक करायला मिळणं हा आनंदच असतो असं मला वाटतं आता तुमची मैत्री होत असेल तर मागे सरु नका.
  • Log in or register to post comments

म्हणून भास्कराचार्य मातृभाषा उत्तम!

जेम्स वांड
Fri, 05/04/2018 - 22:50 नवीन
सरळ लवशिप देती का? विचारलं असतं तर आज खमण ढोकळा तांबड्या पांढऱ्यात बुडवून खायची फ्युजन हौस अन मिजास पुरवून घेता आली असती! काल्पनिक कथा असेल तर लैच भारी लेखन, सत्यकथन असेल तर अरेरे मित्रवर्य भास्कराचार्य लैच वंगाळ झालं, जल्ला झालं गेलं विसरा आज निवांत एक चिल्ड बियर मारा अन सूशेगाद झोपा, उद्या सकाळी उठून आयुष्य आपोआप पुढं ढकलून नेईल.
  • Log in or register to post comments

धन्यवाद,

भन्नाट भास्कर
गुरुवार, 05/10/2018 - 11:50 नवीन
धन्यवाद, १०० टक्के काल्पनिक आणि १०० टक्के सत्यकथन काहीच नसते. हे देखील या दोघांच्याच अध्येमध्ये... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

खूप मनापासून लिहीले आहे

पुष्कर जोशी
Sat, 05/05/2018 - 18:22 नवीन
खूप मनापासून लिहीले आहे एक प्रश्न आहे तिने तुम्हास काही चिठ्ठी नाही दिली का..?
  • Log in or register to post comments

प्रत्येकाने प्रत्येकालाच

भन्नाट भास्कर
गुरुवार, 05/10/2018 - 11:52 नवीन
प्रत्येकाने प्रत्येकालाच द्यावे असे काही जरूरी नव्हते .. थोडक्यात आपल्या शाळाकॉलेजातील रोज डे, चॉकलेट डे सारखे.. मुलांना संधी आणि मुलींची चंगळ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्कर जोशी

हा हा!

तिमा
Sun, 05/06/2018 - 11:24 नवीन
गोष्ट खूपच आवडली. त्यावरुन एक विनोदी किस्सा आठवला. मी गुजरातमधे नोकरीसाठी गेलो होतो. गुजराती भाषा, तेंव्हा नीट येत नव्हती. तरीही दिसणारी प्रत्येक पाटी वाचायचा अट्टाहास्/संवय लागली होती. एक दिवस स्कूटरवर जात असताना, पुढे चाललेल्या बसच्या मागे, वस्त्राप्रावरणांची जाहिरात होती. लिहिले होते, ' गमे मनने, फावे तनने". गुजराती लिपीशी परिचय नसल्याने, मी ते भलतेच वाचले. फावे हा शब्द गुजरातीत जसा लिहितात तो जाणकारांनी डोळ्यासमोर आणावा, म्हणजे फावे च्या ऐवजी मी काय वाचले ते तुमच्या लक्षांत येईल. समझनेवालोंको इशारा काफी है!!!
  • Log in or register to post comments

(No subject)

जेम्स वांड
Sun, 05/06/2018 - 18:14 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

:-) :-) :-)

अनिंद्य
Mon, 05/07/2018 - 13:57 नवीन
:-) :-) :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

ढोकळा

नाखु
Mon, 05/07/2018 - 09:50 नवीन
मिळता मिळता प्रेमाचाच फापडा झाला !!! अखिल मिपा लोच्या झाला रे संघाच्या "झोलझपाटा काव्य फुपाटा" या पाक्षिकातून साभार
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा