आमचा पण पुस्तक दिन

ए ए वाघमारे's picture
ए ए वाघमारे in जनातलं, मनातलं
2 May 2018 - 11:06 am

पुस्तक दिन
आज सकाळी सकाळीच आपल्या बावळट बाळूला कळलं की आज पुस्तक दिन आहे ते. सकाळी सकाळी म्हणजे असं की त्याच्या फेसबुक क्रश मातकट माऊने रात्रभरात कुठकुठल्या पोस्टला लाईक केले हे बघायला त्याने गोपाळमुहुर्तावर फेस्बुक उघडल्यावर. पण ही ‘प्रोसेस’ आम्ही जितकी सांगितली तितकी सहज नसते. ती समजण्यासाठी त्याआधी त्याने काय केलं हेही जाताजाता बघून घेऊ.

म्हणजे झोपेतून उठल्यावर त्याने आधी डोळे उघडले हे महत्वाचं. मग सुरभीवाल्यांनी ढिगातून पत्र काढावं तसं त्याने आंथरूण, पांघरूण, उशा एकत्र करत अंगाखालचा मोबाइल काढला. हे करताना शरीराच्या मध्यभागाची निरनिराळ्या कोनातली उचलखाचल झाल्यामुळे अनायसे योगाही घडून गेला. मग त्याने सेल्फी कॅमेरा ऑन करून आधी स्वदर्शन केलं. कालच केलेला स्पाइक कट नीट आहे की नाही ते पाहिलं (त्यासाठी तो उशीत तोंड न खुपसता सरळ निजला होता. काय करता, नाहीतर गेले दोनशे रुपये पाण्यात!). तो व्यवस्थित होता तरी केसात हात फिरवून स्पाइक अधिक टोकदार करून घेतला. डोळ्यातल्या चिप्पडांमुळे त्याला काही नीट दिसत नव्हतं, पण ब्रश केल्यावर पाण्याने ते निघणारच आहेत मग कशाला डोळे चोळा म्हणून मग शेवटी त्याने मिचमिचे डोळे करत मोबाइल स्क्रीनचा पडदा खाली ओढून नोटिफिकेशने पाहिली. ती पाहून बाळूला एवढंच कळलं की आज फेस्बुकवर कुठल्यातरी पुस्तकाचा फोटो काढून टाकणं आवश्यक आहे. कारण माऊने सुद्धा तसंच केलं होतं. माऊ लाइक्स धिस...माऊ लाइक्स दॅट… वर कुणाकुणाच्या कसल्याकसल्या फोटोजला तिने लाइकलेलं होतं. बाळूने त्यातल्या तीन चार पुस्तकांची नावं वाचण्याचा प्रयत्न करून पाहिला.

‘क्वार्टर टू सिक्स गर्लफ्रेण्ड’, ‘माणूस महाढोंगी कसा बनला?’, ‘शिंप्याच्या हातातून निसटलेली बॉबिन’, ‘झरथ्रुष्ट्रांचा बहुराष्ट्रगामी इतिहास’, ‘इंग्रजीमधून चोरा पटकन- एक साहित्यिक मार्गदर्शिका’, ‘एक होता बार्बर’ असली नावं वाचून बाळू नखस्पाईकांत हादरला. आपण वर्गात मागच्या बेंचावर बसत असल्याने जगाच्या मागे तर पडत नाही आहोत ना असाही एक साहित्यिक विचारही त्याच्या कुमारमनाला चाटून गेला. त्यामुळे रासवट राऊने (हा बाळूचा स्पर्धक, तज्ज्ञ वाचकांच्या लक्षात आलंच असेल) चान्स मारायच्या आत काहीतरी हालचाल करणं त्याला ‘क्रमप्राप्त’ वगैरे होतं. (रासवट राऊ लेकाचा खूपच लौकर उठतो साला!). मग त्याने ‘हालचाल’ केली. एकदा मान डावीकडे वळवली. एकदा उजवीकडे वळवली. एक लांब आळस दिला. मग अंगावरचं पांघरूण पायातली चप्पल फेकावी तसं स्टाईलने ‘टुणकन्’ उडवून पलंगाबाहेर टोलवलं. आता तो पूर्णपणे उठला होता.

त्याने आधी शाळेची सॅक उपसली. त्यातली पुस्तकं चाळली. पण शाळेच्या सगळ्या पुस्तकांना कव्हरं घातली होती. फेस्बुकवर ते चालणार नव्हतं. पुस्तकाचं कव्हर दिसणं महत्वाचं, इतकं तर त्याच्याही ध्यानात आलं होतं, बावळट असला म्हणून काय झालं? किंवा एका फोटोत न मावणारी खूप पुस्तकं असतील तर त्या पुस्तकांची थप्पी करून त्याचा ‘पिक’ काढायचा असंही त्याला कळलं होतं. प्रोव्हायडेड, त्या पुस्तकांच्या बाइंडींगवर छापलेलं नाव दिसलं पाहिजे. म्हणजे पुस्तकं तेवढी जाड हवीत. आता इतकी जाड पुस्तकं कुठनं आणायची? त्याने बाबांना कित्येकदा म्हटलं होतं की आपण एक छान बुक्केस आणि त्यात ठेवायला पुस्तकं घेऊ बरं. माऊकडे बघा किती छान बुक्केस आहे ती! तसे बाळूचे बाबा त्याचे अगदी फ्रेण्डसारखेच होते. कारण दुष्मन का दुष्मन अपना दोस्त होता है, दोघंही अक्षरशत्रू! मग ते काय ऐकताहेत.

खूप विचकवाचक केल्यावरही त्याला एकही चांगलं पुस्तक मिळालं नाही. शेवटी थकून तो पलंगावर पडला तेव्हा आपल्याच फेस्बुक प्रोफाइलचा स्क्रीनशॉट काढून पोस्ट करावा असाही विचार त्याच्या मनात आला. कारण शेवटी ‘फेसबुक’मध्येही एक ‘बुक’ आहेच ना! पण नको, खरंखुरं पुस्तकच हवं म्हणून त्याने तो विचार रहित केला.

पडल्यापडल्या त्याची नजर माळ्यावर गेली. तिथे एक जुनी हॅण्डलतुटकी कुलुपलेस ब्रीफकेस पडली होती. त्याचे डोळे चमकले. तो टुणकन् उठला. खुर्ची खर्रखर्र ओढली. चढला. तरी त्याची उंची पुरत नव्हती. मग पत्रपेटीत हात घालावा तसा टाचांवर उभं राहून त्याने त्या ब्रीफकेसमध्ये हात घातला. हातानेच आतल्या वस्तूंची चाचपणी केली. आत खूप कागद, जुन्या फायली होत्या. शेवटी त्याच्या हाताला पुस्तकासारखं काहीतरी लागलं. ती डायरी निघाली, शिट! मग त्याने पुन्हा चाचपडलं. आता त्याच्या हातात खरोखर एक पुस्तक लागलं. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. ते बाबांचं एक जुनं पुस्तक होतं. ती ब्रीफकेस तशीच ‘आ’ वासत सोडून त्याने खाली उडी मारली.

खिडकीवरचा पडदा बाजूला करून उजेड केला. पटकन त्या पुस्तकाचा एक पिक काढून फेस्बुकवर शेअर केला. ते करताना ‘आजची खरेदी.. हॅप्पी पुस्तक डे’ अशी कमेंट टाकायला तो विसरला नाही. चला, दिवसाची सुरुवात तर चांगली झाली म्हणून त्याचा जीव भांड्यात पडला. मग तो समाधानाने टॉयलेटमध्ये गेला.

इकडे मातकट माऊसुद्धा ऑनलाईन होतीच. तिनेही लगेच बाळूचा अपडेट पाहिला आणि त्याने पोस्ट केलेल्या ‘जय जय भिकाराम ग्रामीण बिगरशेती बहुउद्देशीय सहकारी पतसंस्थे’च्या ‘खाते पुस्तका’च्या फोटोवर लोल हसत कमेंट केली.

“अरे...बावळटा!...”

**************

ब्लॉगवरून

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

एस's picture

2 May 2018 - 2:54 pm | एस

:-D

पद्मावति's picture

2 May 2018 - 4:27 pm | पद्मावति

=)) मस्तं.

दुर्गविहारी's picture

2 May 2018 - 5:30 pm | दुर्गविहारी

;-)))))))) भारी लिहलयं.

अभ्या..'s picture

2 May 2018 - 6:43 pm | अभ्या..

मस्तच की.

उपयोजक's picture

2 May 2018 - 8:30 pm | उपयोजक

o//__/\_\_

सस्नेह's picture

2 May 2018 - 10:15 pm | सस्नेह

=)) =)).

सुखीमाणूस's picture

3 May 2018 - 7:52 am | सुखीमाणूस

झाली ही गोष्ट वाचून....

पैसा's picture

3 May 2018 - 9:56 am | पैसा

भारी लिहिलंय! Lol लोळ

वामन देशमुख's picture

4 May 2018 - 7:06 pm | वामन देशमुख

भारी लिहिलंय राव!

ए ए वाघमारे's picture

11 Jun 2018 - 2:32 pm | ए ए वाघमारे

सर्व प्रतिसादकांचे व वाचकांचे आभार !

जेम्स वांड's picture

12 Jun 2018 - 7:42 am | जेम्स वांड

फारच उत्तम, काणेकर स्टाईल!!