फसता फसता जमलेली गोष्ट-२

शाली's picture
शाली in जनातलं, मनातलं
30 Apr 2018 - 6:16 pm

प्रवासाचा ऊद्देश फक्त खादाडी असल्याने ताम्हीणी घाटाला टांग मारुन सरळ एक्सप्रेस-वेने पेण-वडखळ करीत अलीबाग गाठायचे ठरले. माझ्याकडे फरसाण-फळे होतीच. स्वातीनेही दशम्या, चटणी, लोणचे आणि फोडणी घातलेला दहीभात घेतला होता. त्यामुळे नाष्ट्यासाठी हॉटेल शोधायचा वैताग नव्हता. हवाही छान होती. कुमारांचे ‘अवधुता, गगन घटा गहरानी रे’ लावले आणि निघालो. चार तासाचा तर प्रवास होता. त्यामुळे रमत गमत निघालो. एक्सप्रेसवेवर यायच्या अगोदर ईंद्रायणी नर्सरी जवळ गाडी बाजूला घेतली. शेतात मस्त चटई टाकली आणि सकाळचा नाष्टा ऊरकला. कुणाच्या हातात काय जादू असते कळत नाही. आता दही-भातात काय करायचे असते? पण स्वातीने आणलेला दही-भात काय सुंदर लागला. अप्रतिम. अर्धा तास तिथेच वेळ घालवत बसलो. घाई नव्हतीच. साडेनऊ झाले होते. पण ऊन्हाचा चटका जाणवायला लागला होता. मग सगळे आवरुन, चटई व बुडे झटकून ऊठलो. दहाच मिनिटात आम्ही एक्सप्रेसवेवर होतो. आता कुठे थांबायचं नव्हते. मागे बायकांच्या मस्त गप्पा रंगल्या होत्या. पुढे आम्ही कुमार गंधर्वांसोबत गुंगलो होतो. टोलनाका आला. टोल भरुन पुढे सरकलो. आता दहा मिनिटे बायकांचे “ईतका कुठे टोल असतो का? रस्ते तरी करा निट मग. एसटीने गेलेले काय वाईट.” हे चालले. जणू काही या मुद्द्यांवर बोलले नाही तर शिक्षा होईल, अशा पद्धतीने ही चर्चा होतेच होते. जेजूरीला गेल्यावर जसा भंडारा लावावाच लागतो, तसा टोल दिल्यावर ही चर्चा करावीच लागते. असो. पोयनाडला आलो तसे मित्राला विचारले “सांग कोकण्या, कोठे घ्यायची गाडी?” कारण मी कैकदा कोकणात भटकत असतो. पण काहीही कारण नसताना आजवर अलीबाग वगळले होते. मी साधारण तिन टप्यात फिरतो. त्यातला एक म्हणजे, ताम्हीनीमार्गे उतरुन रोह्यावरुन रेवदंडा ऊजवीकडे टाकून कोर्लईवरुन सरळ काशीदला मुक्काम. सकाळी ऊठून मुरुड, राजापुरी, फेरीने दिघी. दिवेआगार, भरडखोल, शेखाडी, अरावी करत सरळ हरिहरेश्वरला मुक्कामी. दिवेआगार-शेखाडी-अरावी हा माझ्यासाठी स्वर्गाचा रस्ता. या पन्नास-पंचावन्न किलोमिटरसाठी मला दिवस सुध्दा लागू शकतो. सॅंडी मालवनचा. पण त्याचाही अलिबागशी काही संबंध नाही. त्यानेही हात वर केले. मग काय करणार. गाडी थांबवून नेटवर शोध घेतला. ‘हॉटेल सन्मान’चा बऱ्याच ठिकाणी ऊल्लेख दिसला. ‘हायवे ऑन माय प्लेट’नेही ट्राय कराच असे सांगीतले होते. रिव्ह्यू बरे होते. डेस्टीनेशन सेट केले. अलिबाग नगरपरिषदेची पावती भरुन आम्ही सगळे दिड वाजता सन्मानला पोहचलो. ज्या साठी हा सगळा अट्टाहास केला होता ते समोर होते. बऱ्यापैकी भुक लागली होती. हात-पाय धुवून, जरा साईटचा निवांत टेबल निवडून बसलो. मेन्यूकार्ड सॅंडी आणि स्वातीकडे सरकवले. तेच सगळ्यांची ऑर्डर देणार होते. त्याने एक व्हेज, एक सुरमई, एक पॉंफ्रेट आणि एक जिताडा थाळी मागवल. तिसऱ्या मसाला आणि बोंबिल फ्राय मागवले. एक पुलाव राईस जास्तीचा मागवला. जिताडा हा प्रकार मला नविनच होता. पंधरा मिनिटात प्लेटस् आल्या. पाहूनच डोळे निवले. मी आमटी भाताचा एक घास घेतला आणि सोलकढीचा घोट घेतला….आणि माझ्या भ्रमाचा भोपळा फुटला. तरीही मी सुरमईचा एक तुकडा तोंडात टाकला. परत तेच. मी थोडे बोंबील ट्राय केले. पुन्हा तेच. माझंच चुकतय की काय म्हणून मी स्वातीकडे पाहीले तर तिचे तोंड माझ्यापेक्षाही वाईट झाले होते. एकून आमचा चांगलाच पोपट झाला होता. माझे एक वेळ ठिक आहे पण स्वाती-सॅंडीने तोंड वाकडे केल्यावर मात्र माझी खात्री झाली की सगळी कामे सोडून या माश्यांच्या नादात, भर ऊन्हात जो दोनशे किलोमिटर प्रवास केला होता तो चक्क व्यर्थ झाला होता. आमच्या मत्स्यवारीचा पार ‘पोपट’ झाला होता. बायको मात्र मनापासुन जेवत होती. तिच्या व्हेज थाळीतील भाज्या तिला आवडल्याचे दिसत होते. शेवटी मी भातात सुकट चटणी टाकली, बायकोच्या ताटातील वरण घेतले आणि बोंबील तोंडी लावत कसे तरी जेवण ऊरकले. सँडी-स्वातीनेही जेवण संपवले. सँडी हात धुवून परस्पर गाडी काढायला गेला. मी बिल पेड केलं. दहा पंधरा रुपये टिप म्हणून ठेवले आणि निघालो. स्वातीने मात्र न चुकता टिप म्हणून ठेवलेले पैसे परत घेतले होते. सँडीने गाडी दारातच ऊभी केली होती आणि कांऊटंरवरच्या माणसाकडे रागाने पहात थांबला होता. मी डिक्कीतील क्रेटमधून चार पाण्याच्या बाटल्या काढून चारही दरवाजांच्या बोटल होल्डरमध्ये ठेवल्या. एसी वाढवला आणि सँडीला गाडी एखाद्या ‘रसवंती’वर घ्यायला सांगुन गाडीत बसलो. सगळ्यांचीच तोंडे बारीक झाली होती. वर हजार बाराशे पाण्यात गेले होते ते वेगळेच. पाच दहा मिनिटातच रस्त्याच्या ऊजवीकडे आईस्क्रीम पार्लर पाहून सँडीने गाडी थांबवली. निमुटपणे ऊतरलो. ज्याने त्याने आपापली ऑर्डर दिली. एव्हाना बायकोला झाल्या गोष्टीचं फारच वाईट वाटत होतं. नवरा भर ऊन्हात एवढ्या लांब आला आणि जेवण हे ‘असं’ मिळाले हे तिने फारच मनाला लावून घेतलं होतं बहूतेक. नको नको म्हणत असताना तिने रुक्मीणीला फोन लावला. तिला थोडक्यात सगळं सांगीतलं आणि फोन माझ्या हातात दिला. हॅलो म्हणताच रुक्मीणी जी सुरु झाली की मला बोलूच देईना. तिच्या आवाजातला आनंद लपत नव्हता. म्हणाली “दादा, आता काही विचार करु नका. ताईंनी सांगीतलय मला सगळं. सरळ ईकडे गाडी वळवा. अजिबात काहीही कारणे मी ऐकणार नाही. सोबत कुणी आहे का अजून?” मी सांगीतले “हो, मित्र आणि त्याची बायको आहे” “मग निघा लवकर, सावकाश या” म्हणत काहीही बोलायच्या आत रुक्मीणीने फोन ठेवून दिला.

नाथा आणि रुक्मीणी. रत्नागिरीजवळच्या छोट्या गावातील जोडपे. दोघेहे ग्रॅज्यूएट. रुक्मीणी नाथाच्या मामाचीच मुलगी. घरच्यांच्या पसंतीने लग्न झालं. लग्नानंतर दोघांनीही मुंबईत नशिब आजमवायचा प्रयत्न केला पण मुंबई काही दोघांनाही मानवली नाही. दोन वर्षातच दोघेही गावी परतले. मग रत्नागिरीतच एक बंद पडलेले छोटे हॉटेल चालवायला घेतले. वर्षभरातच चांगला जम बसला. याच काळात कोकण भटकंतीत त्याची आणि माझी ओळख झाली. पुढे ओळख मैत्रीत बदलली. आता तर नाथा आणि रुक्मीणी कुटूंबातील सदस्यच झाले होते. असो. वर्षभरातच मालकाने हॉटेल सोडायला लावले. दोघेही पुन्हा बेरोजगार. एक दिवस नाथा माझ्याकडे पुण्याला आला. आम्ही रात्रभर विचार करुन शेवटी ‘नाथाने स्वतःचे हॉटेल सुरु करावे’ असे ठरवले. काशीदमध्ये त्याच्या एका नातेवाईकाची अर्धा एकर जमीन होती समुद्रावर. रुक्मीणीने दागीने गहाण ठेवले. त्याच्या आईनेही जमवलेली पुंजी याच्या हवाली केली. ऊरलेली गरज मी पुर्ण केली. पुन्हा नव्याने श्रीगणेशा केला. मस्त कुंपण घातले, चार खोल्या बांधल्या, एक ऐसपैस ओपन किचन बांधले. कष्ट करायची तयारी, प्रामाणिकपणा, रुक्मीणीच्या हाताची चव आणि नाथाचे आपुलकीच्या वागण्याने नाथा लवकरच स्थिरावला. माझे पैसेही त्याने हट्टाने वर्षभरातच परत केले. गावाकडचे घर सुधरवले. अतिशय साधी आणि प्रेमळ जोडी. मी वर्षातनं एकदाच नाथाकडे चक्कर मारतो. तो पैसे घेत नाही आणि त्याच्या व्यवसायात ऊगाच अडचण नको म्हणून मीही टाळतो. म्हणूनच त्याच्याकडे जायच्या ऐवजी मी अलिबागला जायचा मुर्खपणा केला होता. आणि शेवटी नाथाकडेच यावे लागले होते. तर हेही असो.

माझा चेहरा पाहून सँडीला काही समजले नाही. त्याला आणि स्वातीलाही नाथा हे ‘प्रकरण’ माहीत नव्हते. त्याला काही स्पष्टीकरण देत न बसता मी एखादे सुपर मार्केट शोधायला सांगीतले आणि गाडीत बसलो. पाच दहा मिनिटातच ‘सुपर मॉल’ असा बोर्ड असलेले ‘किराणा मालाचे’ दुकान सापडले. तेथून पाच किलोचा दावत तांदळाचा पॅक, टिश्यू पेपरचे बॉक्स, टुथपिक्सचे बॉक्स, बडीशेप असं हॉटेलला लागणारे काय काय ऊचलले आणि निघालो. चौल रेवदंडा करत सव्वा तासात आम्ही नाथाच्या ‘गेस्ट हाऊस’च्या गेटवर पोहचलो.

मी नेहमीच्या स्टाईलमध्ये हॉर्न वाजवला आणि आतुन काळूने भुंकतच प्रतिसाद दिला. मागोमाग रुक्मीणीने गेट ऊघडले. तिच्या चेहऱ्यावरुन आनंद नुसता ओसंडत होता. तिने हातातला भाजलेला पापड गाडीवरुनच ओवाळला आणि बाजूला चुरडून टाकला. “आता या आत मध्ये” म्हणत ती घाईने परत आत गेली. तिचा हा ऊत्साह पाहूनच मला फार बरं वाटले. सँडीने गाडी आत घेतली आणि अगदी बाजूला, अडचण होणार नाही अशी पार्क केली. तोवर रुक्मीणी पाण्याची बादली घेवून बाहेर आली. मी जरा गम्मत करायची म्हणून म्हटले “काय मणी, एवढी शिकली आणि नजर काय ऊरतवते?”
ती हसुन म्हणाली “असुद्या आमचं आमच्या जवळ. अगोदर पाणी घ्या पायावर. चहा घ्या अन् मग करा अंघोळी.”
मी विचारलं “नाथा दिसेना ग कुठे. बाहेर गेलाय का?”
तर म्हणाली “तुमचा फोन झाला आणि गाडी घेवून बाहेर पडले लगेच. ‘काही मिळतय का पहातो म्हणाले’ येतील ईतक्यात.” मला माहीत होतं नाथा काय मिळवायला गेला होता. एक नविनच २२-२३ वर्षांचा पोरगा दिसला. रुक्मीणी त्याला गाडीतले सामान काढायला मदत करत होती. आम्ही हातपाय धुतले. चार खोल्यांना काटकोणात एक गवताची सुबक खोपी ऊभारली होती. पाच सहा टेबल मांडले होते. मी आणि सँडी खुर्च्यांवर मस्त पाय ताणून बसलो. समोरच समुद्राला भरती सुरु झाली होती. बायको आणि स्वाती रुक्मीणीच्या मागे मागे किचनमध्येच गेल्या होत्या. थोड्याच वेळात मघाचा पोरगा ताटात चहाचे तिन कप घेवून आला.
त्याला म्हणालो “अरे दोघेच आहोत, एक घेवून जा”
तर म्हणाला “अक्का म्हणाली, लांबून आलेत, लागेल जास्तीचा”
काहीही म्हणा पण बायका हुशारच. खरच मला दोन कप चहाची गरज होतीच. त्याला नाव विचारलं, म्हणाला “प्रसाद पण सगळे बाबूच म्हणतात.”. काळू सारखा पायत घोटाळत होता. त्यालाही आनंद झाल्याचं दिसत होतं. अस्सल अल्सेशीअन ब्रिडचं हे पिल्लू मी नाथाला पुण्यावरुन आग्रहाने आणून दिले होते. चांगला मोठा झाला होता गडी. अल्सेशिअन असुन नामकरण मात्र ‘काळू’. त्याची बिस्कीटे घ्यायला मात्र विसरलोच. चहा पित होतो तोवर बाबूने बॅग आणि बास्केट शेवटच्या खोलीत नेवून ठेवली होती. मी आणि सँडीने अंघोळी ऊरकल्या. साडे पाच वाजले होते. बायकाही फ्रेश होवून, कपडे बदलून आल्या. आम्ही समुद्रावर निघालो. समुद्रावर काय जायचे, तो तर जवळ जवळ अंगणातच होता. आज आठ वाजता बरेच लोक जेवायला येणार होते त्यामुळे रुक्मीणी आणि नाथा कामात होते. मग आम्हीच निघालो. मी आणि सँडी मस्त वाळूत बसलो. बायका वॉटरस्पोर्ट्सकडे वळाल्या. छान हवा सुटली होती. आम्ही बराच वेळ वाळूत बसुन निवांतपणाचे सुख अनुभवित होतो. थोड्यावेळातच सुर्यास्त झाला. अंधारुन आले. नाथाने सगळ्या लाईट लावल्याचे दिसत होते. बायको आणि स्वाती आल्या. पुर्ण भिजलेल्या, दमलेल्या. चेहरे प्रसन्न, आनंदी. भरपुर हुंदडल्या असणार पाण्यात. सँडी म्हणाला “अप्पा, आपला खादाडीचा बेत फसला पण यांच्याकडे पाहून ‘बरं झालो आलो’ असं वाटतय. वैतागते रे स्वाती दिवसभर ऑफीस आणि घरचे काम करुन” मग मी ऊठताऊठताच म्हणालो “आता रडू बिडू नको बाबा. चल जावू”

स्वातीने आणि बायकोने किचनमध्ये रुक्मीणीच्या कामात लुडबूड सुरु केली. मी रुक्मीणीला म्हणालो “मणी, आम्ही परत समुद्रावर चाललोय. तिथेच ‘बसणार’ आहोत बराचवेळ. तुमचं सावकाश होवू द्या मग जेवायला हाक मार आम्हाला” बाहेर येवून नाथाला ‘सोय’ करायला सांगीतली आणि आम्ही दोघेहे परत समुद्रावर निघालो. नाथाने बाबूकडे चार पाच ओंडके दिले, स्वतः एका हातात बास्केट व दुसऱ्या हातात हातभर लांबीची फळी घेतली. अंधार पडला होता. नुकताच चंद्र ऊगवला होता. दोन दिवसांनी पौर्णीमा असावी. बाबूने जरा खड्डा केला वाळूत, लाकडे रचली. तेलाचा बोळा टाकून पेटवला. बाजूला मोठी चादर अंथरली, फळी ठेवली. ग्लास, बाटली बाहेर काढून ठेवली. (मला आता कळाले नाथाने फळी कशासाठी आणली होती.) पाण्याच्या बाटल्या ठेवल्या. “काही लागले तर बाबूला हाक मारा. मी होईन तास दिडतासात मोकळा. मग बसू गप्पा मारत” म्हणत नाथा परत गेला. मस्त वातावरण होते. चांदणे मस्त पडले होते. लाटांवर चांदणे आणि खोपीतल्या दिव्यांचा मिळून केशरी पांढरा रंग चमकत होता. सँडीने बऱ्याच वेळाने ग्लास भरले. (खरंतर गरजच नव्हती वाटत आज त्याची) तेव्हढ्यात बाबूने स्टिलच्या दोन प्लेट आणल्या. वाळूत छोटा खड्डा करुन चार निखारे टाकून बुजवला आणि प्लेट त्यावर ठेवल्या. पाँफ्रेट फ्राय, आणि बटरवर फक्त काळीमिरी, मिठ टाकून परतलेले प्रॉन्स होते. हे रुक्मीणीचे डोके. सँडीने साऊंड काढून अभिषेकीबुवांचे ‘तपत्या झळा ऊन्हाच्या’ लावलं. समुद्राची गाज होतीच साथ द्यायला. आम्ही ‘चांगभलं’ करुन एक एक घोट घेतला. प्रॉन्स तोंडात टाकले. आहाsहा! काय मस्त वाटलं म्हणून सांगू. दिवसभराचा सगळा शिणवटा, वैताग क्षणात कुठच्या कुठे पळाला.

आम्ही मासळीचा आणि अधूनमधून वारुणीचा आस्वाद घेत होतो. हळुहळू मन कसं तरल व्हायला लागलं होतं. अभिषेकीबुवांवरुन आम्ही किशोरींच्या ‘सहेला रे’ वर आलो होतो. गप्पा फारशा होत नव्हत्याच. अधूनमधून एखाद्या ‘जागेला’ मस्त दाद फक्त जात होती दोघांची. मध्ये बाबू येवून सुरमईच्या तुकड्या देवून, पाण्याच्या बाटल्या बदलून गेला होता. दिड तासात आम्ही किशोरींवरुन मेहदी हसनच्या ‘चिरागे तुर जलावो’वर घसरलो, गुलाम अलींच्या ‘शिशमहल’ ची मजा घेतली. जगजितच्या ‘इश्ककी दास्तसाँन है प्यारे’ ऐकले. शेवटी नुसरतसाहेंबांवर आलो. एक एक नोटेशन ऐकताना अंगावर अक्षरशः रोमांच ऊभे राहीले. हवा आता जास्तच सुखद वाटत होती. समुद्राची गाज एका समेवर आदळते, ती सम सापडली होती. नुसरतचा आवाज आज जरा जास्तच काळजाला भिडत होता. वारुनीची मेहरबाणी, दुसरं काय.
इश्क की चोट का कुछ दिल पे असर हो तो सही
दर्द कम हो या जियादा हो मगर हो तो सही
या शेरवर सँडीची जोरदार शिट्टी आणि माझी टाळी पडली. चांदणं अजून ठळक झाले होते. ऊजवीकडे समुद्रात घुसलेली टेकडी दिसायला लागली होती. आत दुर कुठेतरी एक दोन होड्यांवर दिवे दिसत होते. चादरीखाली वाळूचा ढिग करुन त्यावर मी रेललो होतो. नुसरतसाहेबांनी दुसऱ्या कव्वालीला हात घातला होता. अगोदरची गझल विनासंगीत ते आळवीत होते.
आग को खेल पतंगोने बना रख्खा है
सबको अंजाम का डर हो ये जरुरी तो नही
‘ह्या! भारी!’ म्हणून मागून दाद आली. वळून पाहीलं तर बाबू आला होता. या शेर ला दाद म्हणजे पोरगं दर्दी होतं तर. त्याला म्हणालो बस तर “फक्त बसतो” म्हणत शेजारी टेकला. म्हटला “लेका, नुसताच बस. नाहीतर मणीच्या शिव्या खाव्या लागतील”
त्याला विचारले “गेले कारे सगळे कस्टमर्स जेवून?”
बाबू म्हणाला “हो, आत्ताच गेले. नाथाभाऊ येईल दहा मिनिटात सगळं आवरुन. माझं काम ऊरकलं म्हणून आलो.”
महीलामंडळ काय करतय विचारल्यावर म्हणाला “दोन्ही ताईंना मगाशीच जेवायला लावलं अक्काने. एव्हाना झोपल्याही असतील त्या.”
ही रुक्मीणी एका छोट्या खेड्यात वाढली. पण शहरी लोकांपेक्षा जास्त जवळून मानूस वाचायची कला मात्र तिला फार छान साधलीये. मला खात्री होती की ती बायकोला आणि स्वातीला अंघोळ वगैरे करायला लावून म्हणाली असणार “तुम्ही त्या दोघांच्या नका नादी लागू आज. तुम्ही घ्या जेवून अगोदर आणि झोपा निवांत.” किती दिवसांनी आज बायको साडेनवूलाच झोपली. मग बाबूबरोबर जरा गप्पा माराव्यात म्हणून विचारले नुसरत आवडतो का तुला? तर म्हणाला “नाही ऐकलं जास्त. पण जगजीत सिंग, किशोरकुमार, संदिप-सलील आवडतात ऐकायला. शायरीही आवडते.” मग गडी जरा खूलला. मी साऊंड बंद केला. बाबूच पुढे म्हणाला “काय खरं नसतं दादा ती शायरी न् कविता. परवा परवा पर्यंत मुकेश ऐकला की रडायला यायचं. मी नाथाभाऊच्याच गावातला. गावातल्याच मुलीवर प्रेम होतं माझं. घरच्यांना कळालं. मग वडिलांनी मला ईकडे नाथाभाऊकडे पाठवलं कामाला. पाच सहा महीने झाले. ईथेच समुद्रावर बसुन रडायचो रात्री. मागच्या महिन्यात वडिलांनी परस्पर लग्न ठरवलं माझं. मग आणखीच राग आला. पण अक्का म्हणाली म्हणून गेलो भेटायला मुलीच्या घरी. या महिन्यात दोनदा भेटलो आम्ही. फोन रोज असतो दुपारी. खरं सांगतो दादा, या मुलीच्या प्रेमातच पडलोय मी पार. अगोदरचं काय खरं नव्हतं बघा. बावळटपणा होता नुसता. मे महिन्यात लग्न आहे. तुम्हाला पत्रीका देईनच. त्यावेळेस असे शेर ऐकले की डोळ्यात पाणी यायचं. पण आता खरी शायरीची मजा यायला लागलीय बघा.” बाबूला वाटलं, आपण जरा जास्तच बोललो की काय? मग त्याने विषय बदलला. “दादा एक कविता ऐकवू का? माझी नाहीये. पुरींची आहे. मागे खुप गाजली होती.” म्हटलं होवून जावूदे. नाहीतरी ईतकावेळ आम्ही जे ऐकत होतो त्याने जरा मेंदूवर तानच पडला होता. मग बाबूने आवाज लावला. ‘तु तुळशीवानी सत्वशिल, मी आग्याबोंड वेताळ प्रिये’ ‘तु सुप चायनिज चटकदार, मी झेडपीची सुगडी खिचडी’ ‘तु विडा रंगीला ताराचा न् मी रसवंतीचा चोथा गं’ बाबू कडक आवाजात गात होता आणि आम्ही पोटधरुन हसत होतो. शेवटी ध्रुवपद तर आम्ही तिघांनीही मोठ्याने कोरसमध्ये म्हणालो
प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग
ऊखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंबळ रट्टा ग
धमाल! धमाल! धमाल! काही विचारु नका. बाबूही खुशित होता. साहेबलोकांनी त्याला आपल्या सोबत बरोबरीने घेतलं होतं ना, म्हणून. त्याला काय सांगू की बाबारे तु आम्हाला सोबत घेतलं, ऊपकार झाले. असो. ईतक्यात नाथाही आला. आल्या आल्या म्हणाला “ऐकली का बाबूची लव्हस्टोरी? पहिला भाग आणि दुसराही भाग?” बाबू चक्क लाजला. मी नाथापुढे ग्लास सरकावला. त्याने एकच पटीयाला बनवला व बॉटल बाबूकडे दिली. म्हणाला “बाबूशेठ, आवरा सगळं. बास्केट ठेव किचनमध्येच.” बाबूने निखाऱ्यांवर राख टाकली, सगळे सामान आवरले आणि गेला. मग दहा पंधरा मिनिटे नाथाचा अहवाल ऐकला. गावाकडची खुशाली ऐकली. रुक्मीणीचा फोन आला ‘ताटं केलीत’ हे सांगायला. मग मात्र ऊठलो. साडेअकरा वाजून गेले होते. नाथाने चटई गुंडाळली. आम्ही हातपाय धुतले आणि खोपीत आलो. बाबूने टेबल एकावरएक रचुन बाजूला ठेवले होते. खाली मोठी प्लॅस्टीकची चटई अंथरली होती. रुक्मीणी ताटे करत होती. आम्ही कोंडाळे करुन बसलो. सगळी भांडी मध्ये ठेवली होती. ज्याला जे हवं ते घेण्यासाठी. रुक्मीणीने माझं ताट वाढलं. अगदी मला हवं तसे. मध्ये भाताचा मोठा ढिग, एका बाजूने पापलेट-सुरमईच्या तुकड्या, शेजारी सुक्के मसाला प्रॉन्स, घट्ट बटाट्याची भाजी, सुकट चटणी, भातावर तुरीची तिखट आमटी, लपथपीत बिरडं. (बायको शाकाहारी, त्यामुळे तिच्यासाठी केलं असणार रुक्मीणीने.) वाटीत फिशकरी, बशीत कांदा, टॉमेटो, काकडी, कोथींबीर आणि ऊकडलेले चणे मिक्स करुन भरपुर लिंबू पिळलेले सलाड. ताट काय भरगच्च दिसत होतं. कुणी असं मिक्स घेवून खात नाही पण मला भयानक आवडते. गेल्या चार तासात ईतके चरलो होतो तरीही ताट पाहून भुक लागल्यासारखं झालं. सँडीचे ताट नेहमी हॉटेलमध्ये असते तसे भरले होते. बाबूनेही फक्त भात आणि आमटी घेतली. नाथा आणि रुक्मीणी एकाच ताटात बसले होते. मग गणपतीनंतर काय काय वाढवायचय गेस्ट हाऊसमध्ये, गावाकडे काय नविन करायचय, रुक्मीणीच्या भावाचं काय चाललय अशा वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारत, एकमेकांना आग्रह करत, हसत जेवण सुरु झाले. दोन घासानंतर रुक्मीणीने डोळे मोठे करुन माझ्याकडे पाहीलं. मी हसुन मान डोलावली. तिने विचारलं होतं कसं झालय जेवण आणि मी ऊत्तर दिले होते “निव्वळ अप्रतिम”

बाबूने पटकन सगळं आवरलं. भांडी आत नेवून ठेवली. नाथाला म्हणालो “यार, ईथेच टाका अंथरुने. पडू ईथेच. रुममध्ये नको. मग अंथरुणे पडली. सँडी नाथाला पहिल्यांदाच भेटत होता. त्यामुळे गप्पांमध्ये त्याला फारसा भाग घेता येत नव्हता. दोन रुममध्ये मुंबईची जोडपी होती. त्यामुळे आमच्या हलक्या आवाजातच गप्पा चालल्या होत्या. “मला झोप आली बाई खुप” म्हणत मधूनच रुक्मीणी ऊठून गेली. नाथाही “सकाळी लवकर ऊठायचय” म्हणत गेला.
सँडी म्हणाला “अप्पा, काल तुला म्हणालो ना की मावशीचा फोन आला होता म्हणून”
मी म्हणालो “त्याचं काय आता ईथे?”
“फोन आला होता एवढच खरय. बाकी सगळ्या मी तुला थापा मारल्या. कामामुळे जायला जमलच नाही रे. मग तुला पेटवलं. माझ्या अंदाजाप्रमाणे तु लगेच निघालाही. म्हणून तर तु ‘येतो का?’ विचारल्यावर पंधरा मिनिटात आलो. नाहीतर ऐनवेळी नाष्टा वगैरे तयारी कशी झाली असती?”
आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. त्याला म्हणालो “पण हे सारं तु आता का सांगतो आहेस?”
सँडीवर व्हिस्कीचा अंमल होता. म्हणाला “मला वाटलं कुठे तरी चांगल्या हॉटेलात जेवू, संध्याकाळी घरी जावू. पण वहिनीमुळे ईकडे आलो. तुझ्या नाथाचे, त्याच्या बायकोचे हे ईतकं निर्व्याज प्रेम पाहून, आदरातिथ्य पाहून मला माझीच लाज वाटली तुला फसवल्याची. त्यांनाही फसवल्यासारखं वाटतय. म्हणून बोलल्यावाचून रहावेना.”
म्हटलं “लेका सँडी, तुला झालीय वाटतं. झोप बरं मस्तपैकी. सकाळी परतायचय पुण्यात.”
तरीही सँडी काहीतरी बोलत राहीला, मी हां हूं करत राहीलो. सँडी अगोदर झोपला की मी, ते काही आठवत नाही. एक वाजून गेले असावेत. झोप अगदी गाढ लागली. सकाळी सातलाच जाग आली एकदम.

रुक्मीणी-नाथा कधिच ऊठले होते. बाबू आणि रुक्मीणीची सकाळची लगबग चालू होती. बाबू आम्ही ऊठायची वाटच पहात होता. त्याने पटकण अंथरुने काढून टेबल मांडायला घेतले. रुममध्ये डोकावले तर कुणीच नव्हते. बाबूने सांगितले की त्या सहालाच समुद्रावर गेल्यात. नाथाही गावात गेला होता. रुक्मीणीची मासेवाली आली होती गेटवर. ती तिकडे गुंतली होती. मग आम्हीही समुद्रास्नानाला निघालो. समुद्रावर रात्री मुंबईची आलेली जोडी म्हणजे नुकतीच एंगेजमेंट झालेली जोडी, त्यांचे मित्र आणि एक कॅमेरामॅन होता. नविन फॅशनप्रमाणे त्यांचे ‘गोल्डन लाईट’मध्ये फोटो सेशन चालले होते. दुर स्वाती आणि बायको पाण्यात खेळताना दिसत होत्या. बाकी कुणी नव्हते किनाऱ्यावर. समुद्रस्नान ऊरकले. आम्ही चौघेही रुमवर आलो. अंघोळी ऊरकल्या. नाथाही आला होता. नाष्टा करायला किचनमध्येच गेलो. रात्री नाथाने भरपुर शहाळी आणली होती. (त्याला वाटले नेहमीप्रमाणे व्होडका असेल म्हणून पाण्यासाठी.) नाष्ट्याला शहाळ्याच्या मलईची तिखट-गोड रस्साभाजी आणि आंबोळ्या होत्या. सँडी खुष. पक्का कोकण्या ना तो. पोटभर नाष्टा झाला. बाबूने सामान गाडीत भरले. निघायची वेळ झाली. रुक्मीणीच्या डोक्यावर थोपटल्यासारखं करुन मनापासुन आशिर्वाद आणि शुभेच्या दिल्या. नाथाला मिठी मारली. त्याची छोटी मुलगी सुट्टीला आज्जीकडे गेली होती तीची भेट तेव्हढी राहीली. आतमध्ये हळदी कुंकू लावून झाल्यावर स्वातीने हट्टाने रुक्मीणीच्या हातात दोन हजारची नोट कोंबली, बाहेर मी नाथाच्या खिशात घातली. “पिल्लूसाठी ड्रेस घे” म्हटल्यावर घेतले त्याने पैसे. बाबूला खिशातलं पेन काढून दिले. सगळे गाडीत बसलो तेंव्हा नाथा म्हणाला “गाडीत कडवेवाल, कुळीथ, कांदा, करंदी, सोडे, आईचे लोणचे सगळं सगळं टाकलय. चिंचेचा गोळा आहे सिटखाली. रस्त्यात कुठे थांबून घेवू नका काही. चार शहाळी आहेत, फक्त शेंडा ऊडवा. सरप्राईजही आहे. फोन करुन कळवा कसं वाटले ते.” रुक्मीणी घाईत किचनमधून आली. हातात झाकणासहीत कापडात बांधलेले पातेले होते. बहुतेक सरळ गॅसवूरुनच आणले असावे. म्हणाली “ताई जावून काही लगेच चुलीशी लागणार नाही. तिखट सांजा दिलाय. पातेलं गरम पाण्यात ठेवून मग खा.” बाबूने गेट ऊघडले. काळूची शेपटी काही हलायची थांबत नव्हती. प्रत्येकवेळेप्रमाणे आजही नाथा रुक्मीणीच्या डोळ्यात पाणी होते. वेडी माणसे. स्वातीचेही डोळे भरले होते. मला जड वाटत होतच. “गणपतीला येऊ नेहमीप्रमाणे” म्हणत मी गाडी बाहेर काढली. मागे न पहाता गती वाढवली. मला माहीत होते, गाडी वळनावर दिसेनाशी होत नाही तोवर माझे नाथा-रुक्मीणी हात हलवत असणार.

समाप्त

वावरप्रकटन

प्रतिक्रिया

शब्दानुज's picture

30 Apr 2018 - 6:32 pm | शब्दानुज

म्या पहिला..

शाली's picture

30 Apr 2018 - 8:21 pm | शाली

:)

सुंदर हे अन्डरस्टेट्मेन्ट आहे या लिखाणासाठी. जियो!!!

शाली's picture

30 Apr 2018 - 8:22 pm | शाली

थँक्यू!

Ranapratap's picture

30 Apr 2018 - 7:10 pm | Ranapratap

नाथा भाउच्या गेस्ट हाउस चा पत्ता दया

एकनाथ जाधव's picture

3 May 2018 - 1:36 pm | एकनाथ जाधव

+१

मीता's picture

30 Apr 2018 - 7:24 pm | मीता

अप्रतिम

शलभ's picture

30 Apr 2018 - 7:30 pm | शलभ

खूप सुंदर

गामा पैलवान's picture

30 Apr 2018 - 8:10 pm | गामा पैलवान

क्रमश: आहे का? की समाप्त होतेय?

-गा.पै.

शाली's picture

30 Apr 2018 - 8:19 pm | शाली

हे वाढऊ तेवढे वाढेल.
समाप्त लिहायला विसरलो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Apr 2018 - 8:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

भयानक आवडले, अनुभव कथन, कथा, जे काय आहे ते ! लिहित रहा, वाचायला आवडेल.

“फोन आला होता एवढच खरय. बाकी सगळ्या मी तुला थापा मारल्या. कामामुळे जायला जमलच नाही रे. मग तुला पेटवलं. माझ्या अंदाजाप्रमाणे तु लगेच निघालाही. म्हणून तर तु ‘येतो का?’ विचारल्यावर पंधरा मिनिटात आलो. नाहीतर ऐनवेळी नाष्टा वगैरे तयारी कशी झाली असती?”

हे ओळखले होते. मागच्या भागातल्या प्रतिसादात, "स्वतःला मासे खाण्याची इच्छा झाली म्हणून तुमच्या मित्राने तुमच्यावर माशांचे गारूड टाकले की काय असे उगाचच वाटून गेले ! :)" असे लिहिले होते. :) पण त्याने वाचनातली मजा कमी झालेली नाही.

शाली's picture

30 Apr 2018 - 9:08 pm | शाली

हो तुम्ही ओळखले होते. वाटलं नको लिहायला आता. पण लिहिलेच शेवटी.
थँक्यू!

लई भारी's picture

30 Apr 2018 - 8:25 pm | लई भारी

लिखाण आवडलं आणि तुमच्याप्रमाणेच अवस्था झालीय; कधी एकदा कोकणात जातोय असं वाटतंय :)
नाथा भाऊंचा पत्ता/नंबर द्या की!

रच्याकने, आय.डी. प्रोफाइल मध्ये 'female' दिसतय; काल्पनिक नाही आहे ना? :)

शाली's picture

30 Apr 2018 - 9:16 pm | शाली

आय.डी. च्या स्टोरीच्या गोष्टीची मज्जाच आहे माझ्या.
:)

सांरा's picture

1 May 2018 - 12:50 am | सांरा

मी थोडा अंदाज लावतो. तुम्ही पहिली जी कथा लिहिली, वडिलांवरची, ती मुलीच्या दृष्टीकोणातून ने लिहिली असावी. त्यामुळे तुम्हाला ती प्रकाशित करतांना स्त्री आय डी घ्यावासा वाटलं असेल. त्या गोष्टीवर प्रतिसाद देतांनाही तुम्ही ती भूमिका कायम ठेवली होती.
अनेक गोष्टींच्या साईट्सवर लेखक वाचकांना 4D अनुभब देण्यासाठी अशा गोष्टी करतात. रेडिट वर नवीन गोष्टींसाठी नवीन आय डी घेऊन. वाचकांना एखादा क्लू देऊन मग प्रतिसादातून गोष्टी फुलवणारे लेखक मी वाचलेले आहेत.
जर तसे असेल तर मराठीत असे करणारे तुम्हीच प्रथम असाल.

अशीही शक्यता आहे की तुम्ही स्त्री असून ही गोष्ट पुरुषाच्या दृष्टिकोनातून लिहिलेली असावी. हाकानाका.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

तुम्ही फारच विचार केलाय बुवा. एक पाकृ शोधताना सौला ही साईट सापडली. ऊत्साहात खातेही ऊघडले. पण लिहायला काही जमेना. ‘तु सुरवात करून दे’ म्हणाली म्हणून पहिला लेख लिहून दिला. पण ‘मला नाही जमत लिहायला, मी वाचकच बरी’ म्हणत तिने विषय सोडून दिला. माहितीत काहीही बदल न करता याच आयडीवर मी लिहिने कंटीन्यू केले. बस ईतकच.असो.
धन्यवाद!

कपिलमुनी's picture

30 Apr 2018 - 8:38 pm | कपिलमुनी

साधासा विषय पण तुम्ही कोकणातला वातावरण , मायेचा ओलावा , आणि व्यक्तिचित्रण खूप सुंदर केले आहे.

फार छान वाटलं वाचून! जियो...!

महेश हतोळकर's picture

30 Apr 2018 - 10:48 pm | महेश हतोळकर

तुमचे दोन्ही दोस्त झक्कास आहेत. नशीबवान आहात.

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 May 2018 - 9:30 am | ज्ञानोबाचे पैजार

सुरेख.... मस्त....
आवडली तुमची गोष्ट
पैजारबुवा,

अनिंद्य's picture

1 May 2018 - 10:42 am | अनिंद्य

@ शाली,

सुंदर लिहिलं आहे तुम्ही. असे पटकन ऐनवेळी ठरवून रात्री दोनला निघून २००-३०० किलोमीटरवर फक्त सूर्योदय पाहण्यासाठी जाणे वगैरे स्वतः केले असल्यामुळे एकदम रिलेट झाले.

जेवतांना फक्त डोळ्यांनी प्रश्न विचारणारी रुख्मिणी आणि तसेच उत्तर देणारा लेखक - फार म्हणजे फार आवडला तो प्रसंग.

पुढील लेखनास शुभेच्छा,

अनिंद्य

शाली's picture

1 May 2018 - 10:53 am | शाली

धन्यवाद!

मित्रहो's picture

1 May 2018 - 2:37 pm | मित्रहो

दोन्ही भाग एकसाथ वाचले. दुसरा भाग अधिक सुंदर. मस्त होता प्रवास.

गामा पैलवान's picture

1 May 2018 - 5:49 pm | गामा पैलवान

शाली,

कथा उत्कट आहे. फक्कड जमलीये. प्रसंग आणि माणसं अगदी डोळ्यासमोर उभी राहतात आणि खाद्यपदार्थ नाकासमोर अवतरल्याचा भास होतो. नाथाच्या हाटीलाचा पत्ता द्याच.

आ.न.,
-गा.पै.

अप्रतिम, सुंदर अनुभव जियो भाई

चांदणे संदीप's picture

1 May 2018 - 6:42 pm | चांदणे संदीप

क्या बात है!

Sandy

प्रचेतस's picture

2 May 2018 - 9:18 am | प्रचेतस

खूप छान, ओघवतं सहज लेखन

शाली's picture

2 May 2018 - 4:57 pm | शाली

धन्यवाद!

श्वेता२४'s picture

2 May 2018 - 5:51 pm | श्वेता२४

शेवट अपेक्षित होता. पहिला भाग वाचतानाच लक्षात आलं होतं. पण तुम्ही खूप अप्रतीम लिहीलय. अगदी जिवंत चित्रण वाटतंय हे सगळं. पहिला भाग जितका सुुरेख तितकाच हादेखील वाचनिय होता. कथा अगदी गुंतवून ठेवणारी वाटली. अजुन वाचायला आवडेल.

प्रदीप's picture

2 May 2018 - 6:13 pm | प्रदीप

तुमचे हे लिखाण मला अचंबित करून गेले. अगोदरचे अगदी संवेदनशील लिखाण करणारी व्यक्ति हे असले लिखाण करू शकते हे आश्चर्यकारक आहे. ह्या लिखाणात सर्वच 'पॉप्युलर' एलमेंट्स भरलेली आहेत-- सहज गप्पा मारता, मारता स्वतःच्या व मित्राच्या कुटुंबियासमवेत दूर सहलीला जाणे, तिथेही जे डोक्यात घेऊन गेले होते ते मनाजोगे न झाल्याने, माहितीच्या लोकांकडे जाणे, मग मासळीच्या जेवणाची, व त्याहून म्हणजे 'अति-पॉप्युलर' दारू पिण्याची वर्णने इत्यादी सगळा मसाला ठासून भरलेला आहे. तुम्ही हे निव्वळ पॉप्युलर व्हावे म्हणून लिहीले असेल असे मी म्हणत नाही. पण, अगोदरच्या लेखातील संवेदनशील, हळूवार, चिंतनशील व्यक्तिच, हे असे काही चवीने अनुभवू शकते व ते तितक्याच चवीने लिहू शकते, हे मला अगम्य वाटले.

हे लिखाण तुम्ही लिहीलेले आवडले नाही, हे माझे मत नमूद करतो. का एकाच आयडीच्या मागून दोन भिन्न व्यक्ति इथे लिहीत आहेत?

अभ्या..'s picture

2 May 2018 - 7:11 pm | अभ्या..

अगदी सहमत प्रदीपजी,
कुमार आले म्हणल्यावर एका सेकंदात विचार आला की "सहेला रे" कसे आले नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रश्न पडतो ह्या सार्‍या आवडी एकाच दिशेने कशा जातात. आवडीनिवडींचे रेजिमेंटेशन ठिकाय पण स्वप्नांचे पण?
एनीवे रंगवलेय उत्तम ह्यात वाद नाही.

भिन्न नाही, या आयडीवरील लिखान माझेच आहे. जे घडले ते थोड्याफार फरकाने, अधिकचे तपशिल घालून लिहिले आहे ईतकेच. हे 'मी' लिहावे हे आवडले नाही आपल्याला. यावर काय बोलू? आपल्याला आवडेल असे लिहायचा प्रयत्न करेन नक्की.
असो. आवर्जून प्रतिसाद दिलात, धन्यवाद.

प्रदीप's picture

2 May 2018 - 8:39 pm | प्रदीप

दखलीबद्दल धन्यवाद. पण 'मला आवडेल असे लिहायचा प्रयत्न' कृपया अजिबात करू नका. मी एक क्षुल्लक व्यक्ति आहे. तुम्हाला स्वतःला जे लिहावेसे वाटेल, ते लिहीत चला.

शाली's picture

2 May 2018 - 8:31 pm | शाली

अभ्या..
"कुमार आले म्हणल्यावर एका सेकंदात विचार आला की "सहेला रे" कसे आले नाही"
यातच ऊत्तर आहे की. निर्गुनी भजनानंतर तुम्हालाही सहेलाच का आठवावे? आवड अशीच वाढत जाते. नुसरत ऐकनारा अबिदा ऐकनार नाही असं होऊच शकत नाही शक्यतो. एकुन लेख तुम्हाला ऊत्तम वाटला, धन्यवाद.

नाखु's picture

2 May 2018 - 10:18 pm | नाखु

माहित नाही पण हे लिखाण आवडलं,आणि खरोखरच नाथाचा ढाबा असेलच तर नक्कीच संपर्क क्रमांक देण्यात यावा

वाचक नाखु

इष्टुर फाकडा's picture

10 May 2018 - 11:14 pm | इष्टुर फाकडा

खंग्री लिहिता तुम्ही. आधी, 'लिहायचं वेगळच होतं पण...' हा वाचला आणि आत्ता याचे दोन्ही भाग वाचून काढले. दुसरा जास्त भावला. शेवट करण्याची तुमची हातोटी धोनीला देखील मन खाली घालायला लावेल अशी आहे.
अजून येउद्या :)

शाली's picture

11 May 2018 - 6:15 am | शाली

@ इष्टुर फाकडा
धन्यवाद!