✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गांजाला भारतात कायदेशीर मान्यता मिळावी का?

प
पुंबा यांनी
Wed, 04/11/2018 - 21:07  ·  लेख
लेख
गांजाचे व्यसन असणारी शरीराचे खोके झालेली, डोळे निस्तेज झालेली समाजाच्या निम्न स्तरातली मंडळी नेहमी दिसून येत, तेव्हा त्यांच्याविषयी अनुकंपा वाटत असे. समाजात नेहमीच त्यांची गांजाडा म्हणूनच संभावना होत असे, दारूड्यांपेक्षा वाईट प्रतीचे व्यसनाधीन म्हणून त्यांची घृणा केली जाई. मी लहानपणी 'लोकमत' या वृत्तपत्रात डॉ. कल्याण गंगवाल यांची ड्रग्जचे दुष्परीणाम सांगणारी एक लेखमालिका वाचली होती, तीतदेखिल गांजाचे भरपूर दुष्परीणाम सांगितले होते, जे वाचून अंगावर काटा आल्याचे आठवते. आता मात्र ऑफिसमधील कलिग्ज किंवा कॉलेजमधले मित्र यांच्याकडून गांजाविषयी निराळीच माहिती समजते. एक तर ह्या सगळ्याच लोकांत गांजा हे निरूपद्रवी व्यसन असल्याबद्दल खात्री आहे. ह्यांच्या तब्येतीवर किंवा कार्यक्षमतेवर कुठला वाईट परीणाम झाल्याचे दिसत नाही. (माझा सँपल सेट खुप छोटा आहे याची जाणीव निश्चित आहे.) अमेरिकेत झालेल्या संशोधनाचा किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या गांजाच्या सुरक्षीत आणि अंमली पदार्थ नसण्याबद्दलच्या रिपोर्टचा(संदर्भ) हवाला देत ते भारतात गांजा कायदेशीररीत्या उपलब्ध असावा अशी मागणी करत असतात. अमेरिकेत ९ राज्यांत डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गांजा सेवन करण्याची परवानगी २१ वर्षांपुढील व्यक्तिस आहे. २९ राज्यात मेडिकल प्रिस्क्रिप्शन असेल तर गांजा मिळू शकतो. पॉप्युलर कल्चरमधूनदेखिल गांजा सेवन केल्याचे उल्लेख(एआयबी किंवा टिव्हीएफच्या वेबसीरीजमधून वगैरे) होताना दिसतात. गांजा बर्‍याचदा अ‍ॅंटी- एस्टॅब्लिशमेंटचे चिन्ह म्हणून देखिल मिरवले जाते. गांजा हे अगदीच निरूपद्रवी आणि व्यसन न लागू शकणारी वनस्पती आहे असे मत वैद्यकिय क्षेत्रात देखिल बहुसंख्य तज्ञांत आढळेल. मात्र मानसरोगतज्ञांत व मेंदूतज्ञातील काही वर्तुळात गांजाच्या दुष्परीणामांबद्दल भिन्न मते असल्याचे आढळते. इतर अंमली पदार्थांच्या सोबत गांजा असणे हे सिगारेट व दारू कंपन्यांचे कारस्थान असल्याचे बंदीविरोधकांचे म्हणणे दिसते. बंदीविरोधकांचे युक्तिवाद खालीलप्रमाणे: १. गांजामुळे उलट इतर अंमली पदार्थाकडे वळण्याचे प्रमाण कमी होईल. २. सिगारेट ओढण्याचे किंवा तंबाखूचे दुष्परीणाम सर्वांसमोर आहेत, ते शास्त्रिय संशोधनातून सिद्ध देखिल झाले आहेत. तंबाखू सेवनाने ७० लाखांहून अधिक व्यक्ति एका वर्षात मरतात(स्रोतः वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) मात्र तरीही तंबाखुवर बंदी नाही मात्र गांजाच्या थेट सेवनामुळे मृत्यू झाल्याचे उदाहरण नसतानासुद्धा गांजावर बंदी हे तंबाखू लॉबीचे कारस्थान आहे. तसेच दारूमुळे झालेल्या मृत्यूंशी देखिल तुलना केली जाते. ३. बंदी असूनसुद्धा नार्कोटिक्स डिपार्टमेंट आणि अंमली पदार्थाचे व्यापारी-स्मगलर्स यांच्या संगनमताने भारतात निर्धोकपणे गांजा मिळतो. मात्र त्याचे पैसे दहशतवादी व समाजविरोधी तत्वांना मनी लाऊंडरींगस्वारे मिळतात. एक नगदी पिक जे शेतकर्‍यांना बरेचसे उत्पादन मिळवून देऊ शकते त्यापासून शेतकर्‍यांना वंचित ठेवले जाते. ४. भारतात गांजाच्या परीणामांवर फारसे सम्शोधन न होताच बंदी घातली गेली आहे. जे अन्याय्य आहे. ५. टिपिकल लिबर्टेरियन युक्तिवादः लोकांच्या वैयक्तिक बाबीत जसे व्यसन ढवळाढवळ करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला असू नये. तर बंदी चालू ठेवण्याच्या बाजूच्या लोकांचे मुख्य युक्तिवाद खालीलप्रमाणे असतातः १. गांजा ही इतर अंमली पदार्थाच्या सेवनाची पहिली पायरी असू शकते. किंबहूना बर्‍याच केसेसमध्ये तसेच असते. २. गांजामुळे होणारे भास- भ्रम हे मेंदूला हानीकारक ठरतात असेदेखिल काही संशोधनात सिद्ध झाले आहे. मेंदूतील पेशी मरण्यासंबंधीचे संशोधन बर्‍यापैकी गाजले आहे. संदर्भ ३. अंमली पदार्थावर बंदी असणेच योग्य, खरे तर सिगारेट- दारूवरदेखिल बंदी असावी पण गांजावरील बंदी उठवू नये. ४. भारत आणि अमेरिकेत फरक आहे, तिथे मेडिकल मरियुवानाचे नियम्ट्रण व्यवस्थित होऊ शकते मात्र भारतातल्या भ्रष्ट व्यवस्थेत त्याची पायमल्लीच होईल. त्यामुळे परवानगी नकोच. ५. गांजा तंबाखूप्रमाणे प्रक्रिया करून मग सेवन करायचा नसतो, थेट वापरता येतो. अधिकृत परवानगी दिली तर किती मोठ्या प्रमणात गांजा सेवन करण्याचे प्रमाण वाढेल? शिवाय देशासाठी अतीमौल्यवान असणारे मनुष्यतास गांजाच्या नशेत वाया जातील त्यामुळे हे आजिबात करू नये. आणखी एक उपमुद्दा: सत्पुरूष, संत किंवा सदगुरू वगैरे म्हणून पुज्य असणार्‍या धार्मिक गुरूंच्या हातातील चिलिम हे गांजाच्या गौरवीकरणाचं उदाहरण वाटतं का? या विषयावर मिपाकरांची मते जाणून घ्यायला आवडतील. चर्चा गांजा व त्याचे उपप्रकार जसे भांग इत्यादीपर्यंतच मर्यादीत रहावी. शक्यतो राजकिय सुंदोपसुंदी टाळाच. १. या विषयावर द हिंदूत झालेला वादविवादः इथे २. गांजाविषयीची WHO वरील माहिती इथे: http://www.who.int/substance_abuse/facts/cannabis/en/ ३. क्वोरावर या विषयावर ढिगार्‍याने चर्चा झाल्या आहेत त्यातील महत्वाच्या चर्चा: इथे व इथे ४. अमेरिकेतील गांजासंबंधी: इथे
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
77448 वाचन

💬 प्रतिसाद (158)

प्रतिक्रिया

गांजाबरोबर,

पगला गजोधर
Wed, 04/11/2018 - 21:18 नवीन
गांजाबरोबर, इच्छामृत्युसही कायदेशीर मान्यता मिळावी. गांजास जर मान्यता दिली, तर ड्रायव्हिंग लायसन्स सरेंडर व्हावं, शस्त्र परवाना रद्द व्हावा, आरोग्य विमा मधे, गांजासेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणाम उपचार कव्हर नल व्हॉईड.
  • Log in or register to post comments

साक्षात प्रलयपिता शिवाचा प्रसाद

जेम्स वांड
Wed, 04/11/2018 - 23:50 नवीन
बमबोले म्हणायचं अन एक घच्च कश मारायचा!.
  • Log in or register to post comments

गांजा अन शंकर!!

अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 04/12/2018 - 09:08 नवीन
हे नव्हत ऐकलं. भांगेचा संबंध जोडला जातो, कधीकधी प्रसादाशी, ते ठाऊक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

गांजा शिवाचा प्रसाद आहे

जेम्स वांड
गुरुवार, 04/12/2018 - 10:13 नवीन
असे हल्लीच उज्जैन कुंभात एक शैव अघोरी बाबाजी बोलले होते, अर्थात ह्याला आधार देण्यास काहीही विदा वगैरे माझ्याकडे नाहीये. फिरता फिरता त्यांच्यासमोर बसून गप्पा मारल्या होत्या तेव्हा त्यांनी गप्पांच्या ओघात बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या त्यातली ही एक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

ओक्के!!

अनिरुद्ध.वैद्य
Fri, 04/13/2018 - 11:48 नवीन
अर्थात प्रसाद वगैरे गोष्टींना विदा नसतोच :) नशिबवान आहात अघोरी साधुंशी भेट घेतलीत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

थोडी माहिती

गामा पैलवान
गुरुवार, 04/12/2018 - 01:48 नवीन
गांजासंबंधी थोडी माहिती इथे आहे : http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-42-09/7283-2013-02-06-10-16-22 वरील दुव्यानुसार गांजा कायदेशीर करायला हरकत नसावी. -गा.पै.
  • Log in or register to post comments

हे भलतेच रोचक आहे..

पुंबा
गुरुवार, 04/12/2018 - 12:22 नवीन
हे भलतेच रोचक आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

माझ्या मते

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 04/12/2018 - 07:30 नवीन
माझ्या मते माझ्या मते गांजा हे अगदीच निरुपद्रवी व्यसन आहे. पण समाजाने उगाचच टॅबु करुन ठेवल्यामुळे लोकं घाबरतात त्याला ! अमेरिकेत गांजा का बेकायदा केला ह्याचे विषयी ह्या विडीओ मधुन कळाले तेव्हा तर माझा विश्वासच बसला नव्हता ! The Sinister Reason Weed is Illegal भारतात गांजा लीगलाईझ करु नये तर डिक्रिमिनलाईझ करावा असे माझे मत आहे ! लिगलाईझ केला की सरकार त्याचावर कर लादणार . त्यापेक्क्षा लीगलायझेशन नकोच ! डिक्रिमिनलाईझ केल्यास कसे कि गांजा पिणे गुन्हा मानण्यात येवु नये , विक्टिमलेस क्राईम समजुन सोडुन द्यावे ! गांजा पिवुन गाडी चालवल्यास लायसन्स जप्त करवा अन नाममात्र फाईन करावा ! वगैरे वगैरे ! असो. खरे तर गांजा सर्वसामान्यीकरण ह्या विषयावर पुरोगामी आणि परंपरावादी अशा दोन्ही समुदायांचे एकमत व्हायला हवे. पण तसे होईल अशी काही चिन्हे नाहीत ! अवांतर : भांग हा प्रकार तर निव्वळ स्वर्गीय असतो , त्यातही स्वतःच्या हाताने बनवल्यास थंडगार दुधात काजु बदाम पिस्ता वाटुन घालणे , अन स्वतःच्या हाताने वाटुन अन गाळुन गांजा घालणे हे सारे शौक करता येतात ! त्यातही एक औरच मजा आहे :) आणि पिल्यानंतर तर काय दोन दिवस ब्रह्मानंदी लागली टाळी तेथे देहा कोण सांभाळी !! शंभो!!
  • Log in or register to post comments

अहाहा

जेम्स वांड
गुरुवार, 04/12/2018 - 08:48 नवीन

मलाना क्रीम सारखी अस्सल वाक्यं!

Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

शेमत!

अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 04/12/2018 - 09:14 नवीन
इन फॅक्ट मध्यप्रदेश अन राजस्थान आदी भागांमध्ये भांग कायदेशीर असतांना महाराष्ट्रात बंदी का असावी ते कळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

गांजाचे सेवनच केवळ वैध करावे

पुंबा
गुरुवार, 04/12/2018 - 12:27 नवीन
गांजाचे सेवनच केवळ वैध करावे की विक्री, विपणन, लागवड, व्यापार? सध्या गांजा पुण्यातच अगदी आरामात कुठल्याही टपरीवर मिळतो, पार एसपीपर्यंत गांजा पुरवणार्‍यांचे लागेबांधी आहेत. हप्ते व्यवस्थित पोचतात, ज्यांना हवा आहे त्यांना मिळण्यात कुठलीच अडचण दिसत नाही. कायदेशीर केले तर हा भ्रष्टाचार थांबण्याची शक्यता तरे दिसेल. निदान गांजाचे दुष्परिणाम यावर आधुनिक संशोधन तरी व्हावे. कायदेशीर मान्यतेचे पुढे बघू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

तेच तर म्हणतोय.

विजुभाऊ
गुरुवार, 04/12/2018 - 10:20 नवीन
तेच तर म्हणतोय. भांग गांजा अफू चरस मारीज्युआना या सगळ्यानाच कायदेशीर ठरवावे. ते पिऊन अ‍ॅक्सीडेंट झाले तर ते कायदेशीर समजावे. लोकसंख्या नियम्त्रणाला मदतच होईल पर्यायाने देशाच्या प्रगतीला
  • Log in or register to post comments

वा!

जेम्स वांड
गुरुवार, 04/12/2018 - 10:42 नवीन
उत्तम विचार, अपघात पण कायदेशीर ठरले म्हणजे मागे उरलेल्या परिवारास अजून गांजा प्यायला एकरकमी मदत राशी मिळेल अशी सोयच म्हणा ना! लोकसंख्या नियंत्रणाचे अजून काही कट्टर इलाज आले होते डोक्यात पण असोच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मी एकदा वडला होता गांजा, सगळ

सतिश पाटील
गुरुवार, 04/12/2018 - 11:40 नवीन
मी एकदा वडला होता गांजा, सगळ दुनिया स्लो मोशन मध्ये चालतीये अस वाटत होत.
  • Log in or register to post comments

पाटलाव ब्रूबर बोललात!

जेम्स वांड
गुरुवार, 04/12/2018 - 12:47 नवीन
गांजा वडून एकदा आपण सोमाटणे फाट्याव टोल नाक्याव बसलो हुतो, अहाहा एकतर तिच्यायला तळेगाव वडगाव डिसेंम्बर थंडी त्यात गांजा, अरारा, १५० च्या स्पीड न जाणारी एक्सप्रेस हायवे वरली बीएमडब्ल्यू धाच्या स्पीड न चालल्या गत दिशी. मागच्या मागं गवताव पहुडलं का आकाशात सगळी नक्षत्रे अन तारे ठसठशीत दिसून येत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश पाटील

नक्किच

जाबाली
गुरुवार, 04/12/2018 - 11:45 नवीन
शत प्रतिशत कराव !! अच्छे दिन आलेच कि !
  • Log in or register to post comments

भारीय!

पैसा
गुरुवार, 04/12/2018 - 11:58 नवीन
भांग पिउन १२ तास नमस्कार घालणे किंवा लेझिम खेळणे याने बर्‍याच मोठ्या जन्तेचे फुकटात मणोरंजण होईल हा एक मोट्ठा फायदा आहे. एक इतकुसे खुस्पट डॉक्यात आले ते म्हणजे गांजाचे समर्थन करणार्‍या मंडळीला त्यांची यत्ता ५ व्वीत शिकणारी मुलगी, किंवा इंजिनिअरिंगला शिकणारा मुलगा, किंवा आयटीत लेट आवर्स शिफ्ट करणारी बहीण, शिक्षिका असलेली बायको यापैकी कोणी, किवा इव्हन घरातले नको तर मुलांचे शिक्षक गांजाच्या तारेत दिवसाचा बराच काळ असतात असे कळले तर त्यांचे हेच मत कायम असेल का ये रे डिअर, दोघेही बसू म्हणून गळ्यात गळे घालून जोडीने कारेक्रम होईल. जस्ट कुतुहल बरं का!
  • Log in or register to post comments

वयाचे बंधन असेलच ना

पुंबा
गुरुवार, 04/12/2018 - 12:34 नवीन
वयाचे बंधन असेलच ना विक्रीसाठी. ५ वीला शिकणार्‍या विद्यार्थी/विद्यार्थीनीला मिळणारच नाही. किशोरवयापासून गांजा घेणार्‍यांबद्दल: When marijuana use begins in the teen years, it can have a significant impact on brain development, including decreased brain activity, fewer neural fibers in certain areas and a smaller than average hippocampus, which controls learning and memory functions. लिंकः https://www.livescience.com/g00/24558-marijuana-effects.html?i10c.encReferrer=aHR0cHM6Ly93d3cuZ29vZ2xlLmNvLnVrLw%3D%3D&i10c.ua=1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

लगीच लगीच लागलीच

जेम्स वांड
गुरुवार, 04/12/2018 - 12:43 नवीन
द ग्रेट इंडियन फॅमिली सिस्टिम मदी आणणे म्हणजे एकतर मुद्द्यांचा दुष्काळ, किंवा गांजाच्या दुःपरिणामांस अजून भडकरित्या रंगवायचा एक केविलवाणा प्रयत्न, ह्या दोनपैकी एकच काहीतरी असू शकते, हे प्रतिसाद म्हणजे थेटरात सिनेमा सुरू व्हायच्या अगोदर 'मैं प्रकाश हूं मुझे मूह का कॅन्सर है, मैं गुटका खाता था' वाल्या जाहिराती सारखे असतात, करणारा समाजसेवा करून जातो अन पाहणारा ती ऍडही खुर्चीखाली पिचकारी मारून पाहतो :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हेहे!

पैसा
गुरुवार, 04/12/2018 - 12:54 नवीन
गांजा कधी ओढला असता तर कपाळाचे मुद्दे मिळाले असते ना! आम्ही फक्त ते लावून बसलेल्यांचे तमाशे बघितलेत इतकंच. पण तुम्ही सांगा ना, तुमचं पोर किंवा बायको गांजा ओढते असं कळलं तर तुमची रिअँक्शन काय असेल? माझ्या घरात कोणी असे व्यसनी नाही हे सोडा. पण मी आकाश पाताळ एक करून अशा व्यक्तीला त्यातून बाहेर काढीन. बाकी काही नाही तरी पैशाचा अपव्यय हा फार मोठा मुद्दा आहे. गरीब घराला तर कोणतेच व्यसन परवडणारे नसते. गरज, आराम आणि चैन यातल्या कोणत्याच कॅटेगरी मध्ये जी गोष्ट येत नाही ती इकॉनॉमी ला परवडणारी नाही हे माझे मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

पैसा ताई

सुबोध खरे
Fri, 04/13/2018 - 12:05 नवीन
पैसा ताई आपण भारतीय लोक (पुरुष) दांभिक आहोत. मी पुरुष आहे तेंव्हा मी विकांताला प्यायला बसणार पण माझ्या बायकोने जर सांगितले कि मला पण विकांत एन्जॉय करायचा आहे मी पण मैत्रिणींबरोबर शुक्रवारी किंवा शनिवारी संध्याकाळी "बसणार" आहे. एक वीकांती तुम्ही आणि एका वीकांती आम्ही घराघरातून गहजब होईल कि नाही ते पहा. "संस्कृती बुडाली" "उदात्त विचार" "स्त्री हि क्षणाची पत्नी आहे आणि अनंत कालची माता आहे" असे सर्व आरोळ्या ठोकायला मोकळे होतील. येथे गांजा किंवा भांग पिऊन आम्ही कसे तर्रर्र झालो होतो याच्या सुरस आणि चमत्कारिक कथा सांगणाऱ्या आणि त्याचे उदात्तीकरण करणाऱ्या लोकांना जर आपल्या बायकोने कॉलेजात असंच केलं होतं असा सांगितलं तर ९० % लोकांना अप्स्माराचा झटका येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अगदी अगदी!

पैसा
Fri, 04/13/2018 - 12:21 नवीन
म्हणूनच पुन्हा पुन्हा विचारते आहे की तुमची काय प्रतिक्रिया असेल! तर कोणी बोलत नाहीत. जर भांग/गांजा एका माणसाला चांगली असेल तर ती त्याच्या बायको मुलांना पण चांगली असायला पाहिजे ना! प्रमाण कमी जास्त असेल एवडंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अरे रे

जेम्स वांड
Fri, 04/13/2018 - 13:39 नवीन
हम प्रतिसाद मे लेट क्या हो गये आप तो नथ मे से तीर मारणे लगे! माझी, बायको, मुलगी, मुलगा, बहीण, इत्यादी तुम्हाला आठवतील त्या सगळ्या नात्यांनी गांजाचे नव्हे तर कुठलेही व्यसन केले तर, भूतकाळात केले असले तर अन भविष्यात करायचे असले तरी, माझी काहीच हरकत नाहीये फक्त काही अटी (नातलग माझे त्यामुळे अटी माझ्या, वैयक्तिक आहेत उगाच सर्वत्रिकरण करू नये ही नम्र विनंती) १. आपल्या नशेने कोणालाही बाधा (सामाजिक, आर्थिक, भावनिक) यायला नको २. नशेचे पैसे स्वतः कमावलेले असावे, दुसऱ्याच्या जीवावर स्वतःच्या जीवाशी खेळ नामंजूर ३. कोणाचीही कोणावरही कुठल्याही प्रकारे जबरदस्ती नसावी, पियर प्रेशर मध्ये येऊन नशा करू नये. बस, बाकी काही खास मागणे नाहीये अवंतारात, तुम्ही लैच मनावर घेतलेला दिसतो पैसा जी आमचा प्रतिसाद, वैयक्तिक लागले असेल तर माफी मागतो, तसं मी काही लंच मध्ये अर्धी चपाती कमी खाल्ली नाहीये, तरी कोणाला मुद्दाम वैयक्तिक बोलण्याचा मानस नसतो म्हणून पुन्हा एकदा मनःपूर्वक माफी. बाकी स्त्रीमुक्तीचा झेंडा खांद्यावर घेऊन पूर्ण जगालाच अपस्मार पेशंट समजणाऱ्या प्रतिसाद शृंखलेस महत्व द्यावे इतके काही वाटत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

झकास!

पैसा
Fri, 04/13/2018 - 13:46 नवीन
हा प्रतिसाद प्रामाणिकपणे अन गांजाच्या नशेत लिहिलेला नसावा एवढीच अपेक्षा! =))
अवंतारात, तुम्ही लैच मनावर घेतलेला दिसतो पैसा जी आमचा प्रतिसाद, वैयक्तिक लागले असेल तर माफी मागतो,
हे कशासाठी म्हणे? तुम्ही मला काही अपमानास्पद बोलला आहात का की जे मला कळले नाहीये?
बाकी स्त्रीमुक्तीचा झेंडा खांद्यावर घेऊन पूर्ण जगालाच अपस्मार पेशंट समजणाऱ्या प्रतिसाद शृंखलेस महत्व द्यावे इतके काही वाटत नाहीये.
हे लैच्च मणोरंजक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

नाय सहज वाटलं म्हणून माफी मागून टाकली

जेम्स वांड
Fri, 04/13/2018 - 13:51 नवीन
माफी मागितल्याने माणूस झिजत नाही हो, फक्त वृत्ती हवी, गिरे तो भी टांग उपर अन मेरे मुर्गेकी एकही टांग छाप लोकांना जड पडते खरे पण जमले तर अप्रतिम शांतता मिळते.
हा प्रतिसाद प्रामाणिकपणे अन गांजाच्या नशेत लिहिलेला नसावा एवढीच अपेक्षा! =))
हा जर विनोद असेल तर अतिशय हीन अन बीभत्सरसाच्या अंगाने जाणारा विनोद आहे इतके खेदाने नमूद करतो. एखाद्याला 'प्रोफाइल' करणे म्हणजे किती चूक असते हे सोदोहारण दाखवणारा प्रकार म्हणजे हा 'विनोंद' होय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

विनोद आहेच्च

पैसा
Fri, 04/13/2018 - 14:03 नवीन
बाकी स्त्रीमुक्तीचा झेंडा खांद्यावर घेऊन पूर्ण जगालाच अपस्मार पेशंट समजणाऱ्या प्रतिसाद शृंखलेस महत्व द्यावे
हा जेवढा विनोद आहे तेवढाच तो विनोद आहे. मी स्मायली तरी टाकली आहे. तुम्ही तीही विसरलात. काही फॉर्म्स वगैरे भरताना" मी पूर्णपणे शुद्धीत असताना, नशापाणी न करता सही करत आहे" असे आपण लिहितो तोही तुमच्या मते बीभत्स विनोद आहे का? का काय गंभीर आणि काय विनोद यात तुमची गल्लत होते आहे? गांजाच्या नशेत कोणी मिपावर लिहू शकेल असे मला तरी वाटत नाही. पण लिहिताना तुम्ही काही विचार केला असेल असे वाटत नाही. तुमचा किंवा कोणाचाही मुलगा/मुलगी/बायको/भाऊ नशेत २ २ दिवस तर्र रहाणार असेल तर त्याच्या/तिच्या जबाबदार्‍या, कामे अभ्यास, परीक्षा कशा काय पार पाडणार ते? आपल्या जवळच्या माणासाने व्यसन केले तरी हरकत नाही म्हणणे हा उच्च प्रतीचा बेजबाबदारपणा झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

माझ्या अटी नीट वाचल्यात का?

जेम्स वांड
Fri, 04/13/2018 - 14:19 नवीन
तुमचा किंवा कोणाचाही मुलगा/मुलगी/बायको/भाऊ नशेत २ २ दिवस तर्र रहाणार असेल तर त्याच्या/तिच्या जबाबदार्‍या, कामे अभ्यास, परीक्षा कशा काय पार पाडणार ते? मुलगा/मुलगी - माझ्यावर अवलंबून असतील, कायदेशीर सज्ञान नसतील तर नशेला परवानगी नसेल, स्वतः कमाई करून त्यांनी वाटेल ते करावे. तोवर जर माझ्या पैशावर जगणार असतील तर माझ्या टर्म्सवरच जगायला हवे बायको/भाऊ - तुम्हाला रोज गांजा ओढायचा ओढा, स्वतः कमवता , हरकत नाही, पण त्याचे इफेक्ट अन त्यामुळे तुमचे होणारे नुकसान (कामातील दिरंगाई, नशा इत्यादी मुळे) तुमचेच, ते निस्तरायला मी येणार नाही. माझ्यामते हे पुरेसे स्पष्ट आहे आता पुढे, शालजोडीतले हाणायचा आव आणून कोणी कोणाला चक्क अप्समराचा पेशंट वगैरे म्हणत असेल, मेल शोव्हेनिस्ट म्हणून प्रोफायलिंग करत असेल (बहुसंख्य भारतीय पुरुषांचे) तर अजून काही संयुक्तिक प्रतिसाद सुचत नाही, स्वतः झेंडे घेऊन मग कोणी हसले तर इतके दुखायचे कारण नाही. इथे मात्र माझ्याबद्दल शष्प माहिती नसताना तुम्ही चक्क माझे 'गंजेकास' असे प्रोफायलिंग करून टाकलेत, फरक आला लक्षात तर पहा. इत्यलम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अवघड आहे

पैसा
Fri, 04/13/2018 - 14:47 नवीन
अवघड आहे. चालू दे तुमचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

विनोद आहेच्च

पैसा
Fri, 04/13/2018 - 14:04 नवीन
बाकी स्त्रीमुक्तीचा झेंडा खांद्यावर घेऊन पूर्ण जगालाच अपस्मार पेशंट समजणाऱ्या प्रतिसाद शृंखलेस महत्व द्यावे
हा जेवढा विनोद आहे तेवढाच तो विनोद आहे. मी स्मायली तरी टाकली आहे. तुम्ही तीही विसरलात. काही फॉर्म्स वगैरे भरताना" मी पूर्णपणे शुद्धीत असताना, नशापाणी न करता सही करत आहे" असे आपण लिहितो तोही तुमच्या मते बीभत्स विनोद आहे का? का काय गंभीर आणि काय विनोद यात तुमची गल्लत होते आहे? गांजाच्या नशेत कोणी मिपावर लिहू शकेल असे मला तरी वाटत नाही. पण लिहिताना तुम्ही काही विचार केला असेल असे वाटत नाही. तुमचा किंवा कोणाचाही मुलगा/मुलगी/बायको/भाऊ नशेत २ २ दिवस तर्र रहाणार असेल तर त्याच्या/तिच्या जबाबदार्‍या, कामे अभ्यास, परीक्षा कशा काय पार पाडणार ते? आपल्या जवळच्या माणासाने व्यसन केले तरी हरकत नाही म्हणणे हा उच्च प्रतीचा बेजबाबदारपणा झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

लई भारी जेम्स भाऊ

सिद्धार्थ ४
Fri, 04/13/2018 - 17:57 नवीन
>>आपल्या नशेने कोणालाही बाधा (सामाजिक, आर्थिक, भावनिक) यायला नको आता मला एक सांगा नशेत असलेला कुठला मनुष्य हे भान ठेवेल? पण तुम्ही म्हणाले तसे हे सगळे कायदेशीर झाले तर सरकारचा प्रचंड खर्च वाचेल. म्हणजे कोणी नशेत १० लोकांना उडविले तर ते कायदेशीर होऊन खटले चालवण्याच्या खर्च वाचेल. पैसे ताई अँड डॉक्टर खरे ह्यांचे प्रतिसाद आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

वांड साहेब

सुबोध खरे
Fri, 04/13/2018 - 18:17 नवीन
वांड साहेब तुम्ही हा प्रतिसाद वैयक्तिक का घेतलात ते समजले नाही. शिवाय त्यात स्त्रीमुक्तीचा झेंडा खांद्यावर घेण्याचाही संबंध नाही. पूर्ण जगाला अप्स्माराचे रुग्ण समजणे हा अर्थ तुम्ही कुठून काढलात हे समजले नाही. "अपस्माराचा झटका" याला सध्या मराठीत "फेफरं येणं" म्हणतात. आणि हा शब्दप्रयोग श्री पु ल देशपांडे यांनी सुद्धा केलेला आहे ( म्हणजेच प्रचलित आहे) खाली मी साध्या सरळ शब्दात म्हटले आहे कि कोणत्याही व्यसनाचे/ मादक द्रव्याचे उदात्तीकरण नको कारण काही तरी थ्रिलच्या नावाखाली संवेदनशील तरुण मुले त्याला बळी पडू शकतात. बाकी बहुसंख्य भारतीय लोक या बाबतीत दांभिक आहेत याला मिपावरही बहुसंख्य लोक दुजोराच देतील कारण बहुसंख्य लोकांना आपल्या बायको किंवा मुलीने दारू /गांजा /चरस सार्वजनिक ठिकाणी उघडपणे प्यायलेली चालणार नाही. व्यसनमुक्ती केंद्रावर काम केलेअसल्याने या प्रश्नाच्या मुळापर्यंत ( एके काळी) मी गेलो होतो आणि माझी मते काही वैद्यकीय ज्ञानातून, काही अनुभवातून आली आहेत. ती परिपूर्ण आहेत असाही माझा दावा नाही. बाकी आपण माझ्या प्रतिसादाला फाट्यावर मारलेत काय किंवा महत्व दिलेत काय मला काहीच फरक पडत नाही कोठेतरी काहीतरी खोल जखम झाली असावी असे वाटते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

विशेष प्रतिसाद

जेम्स वांड
Fri, 04/13/2018 - 13:46 नवीन
मी गांजा/भांग,
चांगलं असल्याचं कुठेच बोललो नाहीये, त्यामुळे तत्सम शब्द माझ्या तोंडी घुसडू नका ही विनंती
, गांजाचा कुतुहलवश अनुभव घेऊन मी फक्त इतकं म्हणतोय की एवीतेवी गांजा विक्री, नशा, इत्यादींचे अर्थकारण काळ्या अर्थव्यवस्थेत राजरोस सुरूच आहे, टेरर फंडिंग सारखी त्याची साईड इफेक्ट बेक्कार आहेतच, तर त्याला सरळ दारू, तंबाकू प्रमाणे कायदेशीर करून टाकावे, आपण उलट त्यावर नीट टॅब ठेऊ शकू. बाकी गांजा भांगेतून महसूल वगैरे विषय सोडूनच देऊया. टीप- मध्यप्रदेश राज्यात, देशी दारूचे अड्डे असतात तसे सरकारी अनुज्ञाप्राप्त भांग थंडाई दुकानेही असतात, ओंकारेश्वर क्षेत्री ती सहज दिसून येतील, त्यामुळे हा प्रयोग (भांग गांजा कायदेशीर करणे) आधी इतरत्र झालेला नाहीये अन आम्ही पूर्ण समाजाची वीण उसवेल असलं काहीतरी एनार्किस्ट बोलतोय असे अजिबात नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

एवढेच कारण असेल तर

पैसा
Fri, 04/13/2018 - 13:51 नवीन
इतर आधुनिक ड्रग्ज पण कायदेशीर करावीत असे लॉजिक पुढे येऊ शकते ना! कायदेशीर करण्यापेक्षा मुळावर घाव घालणे जास्त चांगले नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

भले

जेम्स वांड
Fri, 04/13/2018 - 13:57 नवीन
अहो, जगातील सगळ्यात आधुनिक तंत्रज्ञान, कायदे-पोलीस-न्याय व्यवस्था असून जे अमेरिका, नेदरलँड सारख्या अतिप्रगत देशांना जमले नाहीये ते नवऔद्योगिक भारताला जमेल? तुम्ही म्हणताय तो आदर्शवाद म्हणून बेस्ट आहे पण प्रॅक्टिकल नाहीये. लोकशाही देश सोडाच फायद्याचे गणित पाहून दुबई, बहरिन, सारख्या ठिकाणी नशापाणी आजही मिळते (हातपाय कलम व्हायची भीती असूनही) तेव्हा आपण कुठल्या मुळावर घाव घालू शकतो हे तुम्हीच प्रमाणिकपणे विचार करून सांगा. ह्याला कडक रेग्युलेटरी प्रोसेस लावून थोडं कंट्रोल करू शकतो आपण अन मी तेच करायचं म्हणतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

+१

अनुप ढेरे
Fri, 04/13/2018 - 14:25 नवीन
सहमत आहे. जितक्या जास्तं गोष्टी इल्लिगल तितका जास्तं भ्रष्टाचार आणि ऑर्गनाइज्ड क्राईम. गांजा लिगलाइज करावा याच्याशी सहमत आहे. ( भारतीय परिप्रेक्ष्यात एक उदाहरण आहे म्हणतात. १९९० पर्यंत सोने आयात करण्यावर बंदी होती. या बंदीमुळे हाजी मस्तान दाऊद इब्रहीम इत्यादी लोकांनी सोने स्मगलिंगच्या धंद्यातून मिळणार्‍या प्रचंड पैशाने पॉवर कमावली आणि आख्या देशाला डोईजड झाले. गुजरातमधल्या दारुबंदीमुळे गब्बर झालेल्या माणसावर अलिकडेच पिच्चर आलेला. शाहरुख खानचा. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

बरोबर!

जेम्स वांड
Fri, 04/13/2018 - 14:33 नवीन
आता कायदेशीर करा म्हणणे म्हणजे कोणाला उदात्तीकरण वाटत असेल तर आपला नाईलाज होय भाऊ. तुम्ही उदाहरणे भारी दिलीत. आवडलं आपल्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

कसे चालेल?

पैसा
Fri, 04/13/2018 - 14:42 नवीन
पोलिस आळा घालू शकत नाहीत म्हणून बाकी सगळे ड्रग, बिट कॉइन, वगैरे कायदेशीर करावे का? मला हे लॉजिक खरेच कळत नाही. अवैध दारू पिऊन मेलेल्याना पैसे वाटतात असले आपले अगाध लोक आणि सरकार आहेत. अमली पदार्थ लीगल केले तर काय परिणाम होतील याची फक्त कल्पनाच करून बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

आता बघा ताई

जेम्स वांड
Fri, 04/13/2018 - 15:01 नवीन
गांजा एखादवेळ ओढलाय मी, म्हणजे अनुभव म्हणून नंतर काही ती वाट धरली नाही, पण संगतीत काही मित्र आहेत त्यांच्यासोबत फिरून एक कळले १. इतर ड्रग - प्रचंड जास्त महाग, हा एकच मुद्दा त्यांचं ट्रिकल डाऊन अरेस्ट करतो, कोकेन, मेथ, एलएसडी वगैरे तर अक्षरशः तोळ्यास हजारो रुपये वगैरे भावात असतात, अगदीच हुच्चभ्रु किंवा येणारे फिरंगी पर्यटक सोडून इतरांना सहसा ती परवडत नाहीतच, त्यांना मुळाशीच कंट्रोल करणे सोपे असते ते ह्यामुळेच अन ते व्हावे ही. २. गांजा/भांग - घरच्या कुंडीतही लागवड करून घरच्या घरी प्रोसेस करता येईल (अर्थात सध्याच्या प्रचलित कायद्यानुसार पोलीस बांबू मारतील). साधारण पन्नास ग्रॅम हलक्या प्रतीचा गांजा २०₹/पुडी हिशेबाने मिळतो , (किंवा २०१२-१३ मध्ये ) मिळत असे, उत्तम म्हणजे पार कळीचा माल म्हणतात तसलं घेतलं तर १००₹/ पन्नास ग्रॅम. ही किफायतीशीर किंमतच धोकादायक आहे. दुसरे हे, की हिमाचल, उत्तराखंड, सिक्कीम कडे गेलात तर विविक्षित ठिकाणी नाही तर पार रस्त्याच्या कडेला भांग/गांजा उगवलेला असतो, ह्याच्या मुळावर घाव घालायचा म्हणजे काय करावे? आता असले सार्वत्रिक नशापाणी जर सरकारी कंट्रोल मध्ये आणले तर किमान कुठून कुठं पैसा जातोय ते तरी कळेल, झिरपण्याचा वेग कंट्रोल करता येईल, पक्षी कधी भाव वाढवणे कधी घटवणे हे सरकारी अखत्यारीत राहील, शिवाय लीगल केले तर आज ड्रग अब्युज मध्ये जी मोठी लिस्ट आहे सबस्तानसेसची ती कल होऊ शकते, लीगल म्हणल्यावर कितीतरी लोक गांजावर स्वीच होतील अन आपसूकच सरकारी मॉनिटरिंग मध्ये येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बिट्कॉइन बेकायदेशीर करायचं

अनुप ढेरे
Fri, 04/13/2018 - 16:13 नवीन
बिट्कॉइन बेकायदेशीर करायचं नक्की कारण काय? मला वाटतं अमुक गोष्ट लिगलाईज का करायची या जस्तिफिकेशनपेक्षा यापेक्षा अमुक एक गोष्ट इल्लिगल का असावी याचं जस्तिफिकेशन हवं? आणि गांजा/ड्रग यावर उपाय म्हणजे उदात्तीकरण थांबवणे हे आहे. बंदी आणणे हे नाही. इथेच कोणीतरी लिहिलय. सिगारेटप्रमाणे वार्निग द्याव्यात पॅकवर. ( सिगारेट प्याकवरच्या वॉर्निंगचा भरपूर फरक पडतो असं वाचनात आलेलं कुठेशी. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अनुपराव, सगळे दुराचार लिगल

arunjoshi123
Fri, 04/13/2018 - 17:21 नवीन
अनुपराव, सगळे दुराचार लिगल करावे मंता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

दोन सज्ञान व्यक्तींमधला

अनुप ढेरे
Fri, 04/13/2018 - 18:12 नवीन
दोन सज्ञान व्यक्तींमधला कोणताही व्यवहार इल्लिगल नसावा. एखादी व्यक्ती इतरांना त्रास न देता काही करत असेल तर ते इल्लिगल नसावं. उदा: वेश्याव्यवसाय बेकायदेशीर नसावा या मताचा मी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

बंदुकीचा व्यापार पण कायदेशीर

सुबोध खरे
Fri, 04/13/2018 - 18:26 नवीन
बंदुकीचा व्यापार पण कायदेशीर करावा काय? म्हणजे ए के ४७ ए के ५६ इ. दोन व्यक्तीमध्ये आपसात विनिमय होत असेल तर सरकारने का त्यात पडावे? शिवाय दहशतवाद हि थांबवता येत नाही मग तो पण कर लावून कायदेशीर करावा काय? म्हणजे एखाद्याला "ओलीस" ठेवायचे असेल तर सरकारला ३० % कर भरला कि झाले वेश्या व्यवसाय कायदेशीर असणाऱ्या देशात सुद्धा वेश्यांच्या "शोषणाची आणि अनारोग्याची" फार मोठी समस्या आहे. थायलंडच्या समस्ये बद्दल श्री बाजीप्रभू यानी थोडे फार लिहिलेले आहे. जग हे केवळ काळे आणि पांढरे नसते करड्या रंगाच्या बऱ्याच छटा असतात आणि त्यात कुठले चांगले आणि कुठले वाईट याची एक सुस्पष्ट रेषा असतेच असे नाही. कायदे पंडितांना स्थळ काळ संस्कृती आणि लोकमानसाचा विचार करूनच कायदे करावे लागतात. अर्थात चरस कायदेशीर करावा कि न करावा यालाही बरेच पैलू आहेत. मी फक्त त्यातील वैद्यकीय पैलूचा थोडासा भाग पाहिला / वाचला/ अनुभवला आहे तेवढेच मत मी मांडतो. तरीही संपूर्ण स्वातंत्र्य हे स्वैराचाराकडे झुकते त्यामुळे स्वातंत्र्य थोडेसे मर्यादेत ठेवले पाहिजे अशी माझी मनोवृत्ती झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

अतिशय निरुपयोगी उदाहरणं आहेत.

अनुप ढेरे
Fri, 04/13/2018 - 22:38 नवीन
अतिशय निरुपयोगी उदाहरणं आहेत. ओलीस आणि दहशतवाद यात कंसेंट नाहीये. सर्व इन्वॉल्व्ह्ड लोकांची मर्जी नाही या उदाहरणात. सो ओलिस/दशतवाद कायदेशीर करणे हे माझ्या वरील प्रतिसादातुन इम्प्लाय होत नाही. दोन सज्ञान व्यक्तींमधील कंसेंटने होणारा कोणताही व्यवहार ज्याने इतरांना थेट त्रास होत नाही असे सर्व व्यवहार लीगल असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मला वैयक्तिकरित्या उदाहरणे

बिटाकाका
Sat, 04/14/2018 - 17:31 नवीन
मला वैयक्तिकरित्या उदाहरणे तुमच्या वाक्याला धरूनच आहेत असे वाटले. ******************* तुमचं वक्तव्य अतिशय बेसलेस आहे आहे असे वाटते. दोन व्यक्तींमधील व्यवहाराचे नियम हे त्या दोन व्यक्तींच्या गुणधर्मांवर आधारित नाही तर ज्याचा व्यवहार त्या जिन्नसावर आधारित असतात आणि असायलाच हवे. ****************** गांजाच्या व्यवहाराने इतरांना त्रास होतो की नाही? आणि म्हणून तो लिगल करणे योग्य की नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

मी आत्ता चिलम पेटवली आहे.

अनुप ढेरे
Sat, 04/14/2018 - 22:09 नवीन
मी आत्ता चिलम पेटवली आहे. तुमचं काय बिघडलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका

असलं बेसलेस उत्तर तुमच्याकडून

बिटाकाका
Sun, 04/15/2018 - 14:30 नवीन
असलं बेसलेस उत्तर तुमच्याकडून अपेक्षित नव्हतं, पण असो! -------------------------------- आता पेटवलेली चिलीम ओढून रिकामी केल्यावर माझं किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांचं बिघडणारच नाही याची गॅरंटी देता येते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

ओलीस आणि दहशतवाद यात कंसेंट

सुबोध खरे
Sat, 04/14/2018 - 19:03 नवीन
ओलीस आणि दहशतवाद यात कंसेंट नाहीये. सर्व इन्वॉल्व्ह्ड लोकांची मर्जी नाही या उदाहरणात. मान्य. उदाहरणे चुकलीच म्हणायची दोन सज्ञान व्यक्तींमधील कंसेंटने होणारा कोणताही व्यवहार ज्याने इतरांना थेट त्रास होत नाही असे सर्व व्यवहार लीगल असावेत. उत्तम गर्द, हेरॉईन, कोकेनसुद्धा कायदेशीर करून टाका. मग बंदूक, ए के ४७, रॉकेट लॉन्चर विकत घेणे आणि विकणे अधिकृत करून टाका. तसेच सार्वजनिक ठकाणी प्रेमाचे प्रदर्शन, संभोग करणे इ सुद्धा कायदेशीर करायला काय हरकत आहे? हा पण दोन सज्ञान व्यक्तीमध्ये संमतीने होणारा व्यवहारच आहे कि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

गर्द, हेरॉईन, कोकेनसुद्धा

अनुप ढेरे
Sat, 04/14/2018 - 22:08 नवीन
गर्द, हेरॉईन, कोकेनसुद्धा कायदेशीर करून टाका.
+१
मग बंदूक, ए के ४७, रॉकेट लॉन्चर विकत घेणे आणि विकणे अधिकृत करून टाका.
अजुन पूर्ण विचार नाही केला पण इथे इतर अन्रिलेटेड लोक मरण्याची शक्यता प्रचंड आहे. सो ठाम मत नाही.
तसेच सार्वजनिक ठकाणी प्रेमाचे प्रदर्शन, संभोग करणे इ सुद्धा कायदेशीर करायला काय हरकत आहे?
पुण्यात झ पुलावर, किंवा एम्प्रेस गार्डनावर या एकदा. किंवा हुंबईमध्ये मरीन ड्राईव्हला. सभोग नाही पण प्रेमाचे प्रदर्शन भरपुर चालु असतं. उलट हे असले अमुक-तमुक बेकायदेशीर सारख्या नियमांमुळे पोलिस छळतात जोडप्यांना. बंदी घालणे हा अयशस्वी आणि काहीही अचिव न करू शकलेल्या राजकारणी लोकांचा केविलवाणा प्रयत्न असतो आपण काहीतरी केलं आहे हे दाखवण्याचा. प्लास्टीक बंदी, दारु बंदी, हुक्का बंदी, पॉर्न बंदी इत्यादी इत्यादी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

चिल माडी

पैसा
Fri, 04/13/2018 - 14:36 नवीन
चांगलं असल्याचं कुठेच बोललो नाहीये, त्यामुळे तत्सम शब्द माझ्या तोंडी घुसडू नका ही विनंती
इथे अहाहा ओहोह म्हणणारे दुसरे लोक आहेत. तुम्ही सगळ्यांच्या वाटच्या प्रतिक्रिया कशाला देताय! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

असंय व्हय!

जेम्स वांड
Fri, 04/13/2018 - 14:48 नवीन
असंय व्हय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा