माझे अपहरण ...
मी पोते, सुतळी, दाभण घेऊन तयार आहे..
मी वाट पहात, दबा धरून बसलेय.
मला माझेच अपहरण करायचे आहे..
कुत्रा माग काढणार नाही,
भिकारी चुकून माझी एखादी खुण लक्षात ठेवणार नाही,
गाड्यावरचा भाजीवाला ओळख दाखवणार नाही,
शाळेत जाणारे पोर मला बघून हसणार नाही,
नाक्यावरचा फुटकळ तरुण मला बघून, न बघितल्यासारखा करणार नाही,
कुणी रिक्षावाला माझ्या अगदी जवळून रिक्षा नेणार नाही,
....... असे सगळे जुळून आले कि ,
मी माझेच अपहरण करेन ....
स्वतःतून बाहेर पडून मी
निर्धास्तपणे चालू लागले कि,
झडप घालून मी माझ्यावर पोते टाकेन
माझी झटापट झटापट होईल,
पोत्याचे तोंड करकचून आवळले कि
मी आपोआप गुदमरेन,
हळूहळू माझी धडपड मंद होईल,
मग मी मलाच उचलून
खांद्यावर टाकेन.....
मग मी मला लपवून ठेवेन.
स्वतः कडेच खंडणी मागेन....
खंडणी दिली तर माझी सुटका करीन
नाही केली तर जीवानिशी मारीन.....
धमक्या देईन, वाट पाहीन.
खंडणी देण्याची ऐपत नाही,
पोत्यात बंदिस्त राहण्याची शक्ती नाही,
असे एकंदर दिवस आले कि ,
माझी उलघाल होईल, डोके फुटून जाईल,
हे पण अपहरण फसले असे वाटून उदास होईन,
थोडे दिवस मी सगळ्यांना दोष देईन,
माझ्या अपहरणात काय चूक राहिली?
शोध घेईन.....
पुढच्या वेळेस मी काळ्या काचेची कार, मास्क, पिस्तुल घेऊन तयारीत राहीन,
मी बाहेर पडले कि
पुन्हा नव्याने माझे अपहरण करेन...
यंदा तरी माझे अपहरण यशस्वी होवो
आणि
मला माझ्यातली खंडणी मिळो.
-शिवकन्या
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
शिव शिव शिव!!!
मस्तिभंजक लिखाण
असं होतं कधीकधी. आपल्या मनात काहीतरी करण्याचं आहे पण ते तसं करता येतं नाही मग आपण नकळत दबा धरून बसतो पुढच्या संधीच्या शोधात. आपलेच अपहरण ही कल्पना कदाचित त्यातूनच आकारास येत असावी.
तुम्हांला तुमच्यातली खंडणी लवकरात लवकर मिळो हीच त्या मिपावरच्या काळ्या मावशीकडे प्रार्थना! ;)
Sandy
ईस्कटून सांगितल्याबद्दल
In reply to मस्तिभंजक लिखाण by चांदणे संदीप
ईस्कटून सांगितल्याबद्दल धन्यवाद.
एक कवीचं हे जाणू शकतो
संदीप चांदणे
In reply to मस्तिभंजक लिखाण by चांदणे संदीप
इस्कटून सांगायचा मस्त प्रयत्न..... मला ही हे नव्याने उमगले. अनेक अर्थ असूच शकतात. धन्यवाद.
चमत्कृतीपूर्ण कल्पना.
चमत्कृतीपूर्ण कल्पना.
बादवे, आमेन! :-)
(No subject)
स्वतःकडे मागायची खंडणी
स्वतःकडे मागायची खंडणी
आणि
त्यामुळे होणारी सुटका दोन्ही एकच -
मुक्ती, Freedom !
कविता समजण्यास वेळ लागला
कविता समजण्यास वेळ लागला तरी बहुधा समजली (किंवा तसा माझा गैर समज असेल ) आणि पोचल्यासारखी वाटली. कवितेत अजून काही बाजू येण्याच्या शिल्लक नाही ना असे वाटून एखादी कविता पाडण्याची संधी आहे का वाटून गेले . बहुतेक एक कविता पाडावी म्हणतो योग केव्हा येईल माहित नाही.
इथे पण निसटत्या बाजू आहेतच का
In reply to कविता समजण्यास वेळ लागला by माहितगार
इथे पण निसटत्या बाजू आहेतच का
एकदा स्वभाव छिद्रान्वेषी झाला
In reply to इथे पण निसटत्या बाजू आहेतच का by आनन्दा
एकदा स्वभाव छिद्रान्वेषी झाला की सगळीकडे सारखाच नै का :) बाकी निसटत्या आणि सुटलेल्या/राहीलेल्या/शिल्लक मध्ये अल्पसा फरक असावा असे वाटते
माहितगार
माहितगाराला पाडायला..... म्हणजे कविता पाडायला किती वेळ लागतो असा! घ्या पाडायला.... वाचू आम्ही.
एक नै रतीबाच्या दोन दोन
In reply to माहितगार by शिव कन्या
एक नै रतीबाच्या दोन दोन जिलब्या झाल्या. प्रेर्ना आपल्याकडेच :)
मुक्तक आवडलं.
मुक्तक आवडलं.
स्वतःच स्वतःचं अपहरण करण्याची कल्पना छान आहे.
भारी लिहिलय
मला लागलेला अर्थ
काहितरी नवीन शिकण्याचा ध्यास व तळमळ म्हणजे अपहरण.
आणि त्यासाठीचे करावे लागणारे कष्ट म्हणजे खंडणी.
जर यश नाही मिळाले तर प्रयत्न वाढवावे लागणारच.....
+१
In reply to भारी लिहिलय by सुखीमाणूस
+१
या आठवड्यातली ही दुसरी डोक्याला शॉट देणारी कविता
पहिली संदीपची....
आता रविवारी या दोन्ही कवितांवर "उतारा" घेणे आले
पैजारबुवा,
मस्तच की!!
मस्तच की!!
कविता आवडली.
कविता आवडली.