रोहनची परीक्षा .
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
रोहनची परीक्षा
आज रोहनचा दिवस खूप गडबडीचा होता. तसा त्याचा प्रत्येक दिवसच गडबडीचा असतो.सकाळी आईबाबा ऑफिसला जायच्या वेळेपर्यंत त्याची आंघोळ वगैरे होऊन त्याचा ब्रेकफास्ट चालू असतो .आताशा तो आपली आपण आंघोळ करतो आणि आपले कपडे पण घालतो. मग त्याचे बाबा त्याला शाळेत सोडतात.दुपारी शाळा सुटली कि तो रिक्शाकाकांबरोबर डे केअर मध्ये जातो. दुपारचे जेवण तिथल्या मावशीच देतात. मग संध्याकाळी रिक्षा काका त्याला खेळाच्या मैदानावर सोडतात. हि त्याची खूप आवडीची जागा! त्याला तिथे खूप हुंदडायला मिळते. तो मैदानावर खूप खूष असतो. मग सहा वाजता त्याची आई येवून त्याला घरी घेऊन जाते.
असा त्याचा खूप धावपळीचा दिवस असतो.
पण आजचा दिवस वेगळाच होता. आज त्याचे आई आणि बाबा या दोघांनीही रजाघेतली होती. त्याच्या आईबाबांनी सकाळपासून त्याला भंडावून सोडले होते!आज एका शाळेत त्याचा इंटरव्ह्यू होता म्हणे! तो आता पहिलीत या नव्या शाळेत जाणार होता. खरंम्हणजे तो सध्या जात असलेली शाळा त्याला खूप आवडत होती. त्याला तिथे खूप मित्र मैत्रिणी होत्या.पण त्याच्या आई आणि बाबांनी हे एक नवीन खूळ डोक्यात घेतले होते!गेले अनेक दिवस त्यांच्यात सारख्या चर्चा (हा त्यांचाच शब्द) चालू होत्या.रोहनला या शाळेत घालायचे का त्या शाळेत?रोहनने दोन तीन वेळा त्यांना सांगून बघितलं!” माझी हि शाळा खूप चांगली आहे!मला दुसऱ्या शाळेत कश्याला घालता? “
पण छे! ते काहीच ऐकायच्या मूड मध्ये नव्हते. केव्हा तरी नंतर त्याच्या आईने त्याला सांगितले कि तो म्हणे आता मोठा झाला होता आणि त्याला आता नव्या शाळेत जायला हवे!......असंआईनेच सांगितल्यावर आपण काही बोलून उपयोग नसतो हे त्याला आता अनुभवाने समजायला लागले होते.
मग गेल्या महिन्यापासून त्याला शिकवायला एक काका यायला लागले होते. त्याला शिकवणी असे म्हणतात हे हि रोहनला आता माहित झाले होते. खरे तर मैदानावरून आल्यावर भरपूर काही तरी खाऊन त्याला आईशी गप्पा मारायच्या असायच्या!पण हे नवीन काका यायला लागल्यापासून रोहनला ते पण जमत नव्हते. नवीन शाळेत त्याचा इंटरव्ह्यू कसा घेतला जाणार आणि त्यांनी कोणत्या प्रश्नाची कोणती उत्तरे द्यायला हवीत हे ते नवे काका त्याला परत परत सांगायला लागले. आता त्याला सर्व प्रश्नांची उत्तरे इंग्रजी मधून द्यायला लागणार होती असे त्याचे बाबा आणि हे नवे मास्तर सागायला लागले. रोहनला खरं तर खूप राग यायचा! पण हे सगळे त्याला सहन करायला लागायचं .
“तुझे पूर्ण नाव काय?
तुझे बाबा काय करतात?
तुझी आई काय करते?
तू सध्या कोणत्या शाळेत जातोस?
तुझ्या घराचा पत्ता काय?
तुला काय आवडते? चित्र काढायला आवडते का? गाणं म्हणायला आवडते का? “
असे किती तरी प्रश्न आणि त्याची उत्तरे ! बापरे त्याला कंटाळा यायला लागला! तो शेवटी एकदा आईला म्हणाला,
“अग आई मला एकदा सांगितलं कि समजतं! माझ्या लक्षात पण राहते. हे सर मला पुन्हा पुन्हा तेच तेच का सांगायला लावतात? “
“ अरे या शाळेत खूप हुशार मुले आहेत.तुझी चूक होऊन तुला या परीक्षेत त्यांनी नापास करू नये म्हणून हि सगळी धडपड आहे. ते असूदे तू आता थोडा वेळ टीवी बघ! मला थोडे ऑफिसचे काम करायचे आहे.” त्याची आई म्हणाली.
हे एक रोहनला अजिबात आवडत नसे. दिवसभर ऑफिसला जायचं आणि घरी आल्यावर सुद्धा ऑफिसचे काम करायचे! त्याच्याशी खेळायला कुणालाच वेळ नसायचा! बाबांचे सारखे फोन आणि आईचे ऑफिसचे काम!
शेवटी आज तो दिवस उगवला! आज ते सर्व इंटरव्ह्यू साठी शाळेत वेळेवर पोचले. शाळेत त्याच्या सारखी बरीच मुले आली होती . त्यांचे आईबाबा सुद्धा गंभीर चेहऱ्याने तिथे बसलेले दिसत होते. बऱ्याच वेळाने रोहनला आणि त्याच्या आईबाबांना ऑफिस मध्ये बोलावले. एक खूप मोठ्या टेबलाच्या मागे खूप मोठा चष्मा घातलेल्या एक मैडम बसल्या होत्या. खरं तर या एवढ्याशा बाई आणि त्यांना एवढे मोठे टेबल कश्यासाठी हे काही रोहनला कळले नाही. त्या खोलीत एक टीवी होता पण आता तो बंद होता!त्या बाईच्या मागे एका टेबलावर बक्षीस मिळाल्यावर मिळतात तसे बरेच कप ठेवले होते.
“अरे बापरे केवढी बक्षिसे तुम्ही मिळवली आहेत ? “ रोहन चटकन म्हणाला.
आईनं डोळे मोठे करून रोहनला दटावलं. त्या टेबलामागच्या बाई मात्र मनापासून हसल्या.
“ अरे मी नाही काही ही बक्षिसं मिळवली! आमच्या शाळेच्या मुलांनी शाळेसाठी ही बक्षीसे मिळवली आहेत. “
मग त्या बाई (त्यांना माम म्हणायचं असे रोहनच्या आईने त्याला सांगून ठेवले होते. ) आता त्याचाशी इंग्रजीमध्ये बोलू लागल्या.
“ तुझे नाव सांग बघू!”
रोहनला त्याच्या घरी त्याला शिकवायला येणाऱ्या काकांचे शिकवणे आठवले. त्याला या प्रश्नाचे काय उत्तर द्यायचे हे माहित होते पण का कोणास ठाऊक रोहनला या बाई खूप म्हणजे खूपच आवडल्या. त्याला वाटल यांना आपण खरं खरं सांगितले पाहिजे,
“ मला माझे बाबा बबल्या म्हणतात आणि आई पिल्लू म्हणते “ त्या बाई हसल्या त्या मुळे धीर येऊन रोहन पुढे म्हणाला,
“ पण माझे पूर्ण नाव आहे ,रोहन दिवाकर राजाध्यक्ष.”
“ वा! छान आहे कि नाव तुझे! आता तू राहतोस कुठे ते सांग. त्या आता इंग्रजी बोलत होत्या त्या मुळे रोहन सुद्धा आता इंग्रजी मध्ये बोलायला लागला,त्याने मग त्याच्या घरचा पूर्ण पत्ता इंग्रजी मध्ये सांगितला.
“ रोहन मला सांग तुला काय काय आवडतं? “
“ मला चित्रं काढायला आवडतात ,मला खूप खूप खेळायला आवडतं,क्रिकेटची match पाहायला आवडते ,टीवीवर कार्टून्स बघायला आवडतात” हे सगळे त्यानं अगदी त्याच्या शिकवणीच्या सरांनी शिकवल्या प्रमाणे सांगितलं पण नंतर त्याला वाटलं कि या बाई खूप चांगल्या आहेत त्यांना आणखी काही सांगायला हवं, तो पुढे म्हणाला,
“ मला अजून पण खूप काही आवडतं,मला पावसात भिजायला आवडतं,मला कुत्रा फार आवडतो,पण आई कुत्रा पाळायचा नाही असे म्हणते!” रोहन आता उत्साहात सांगत होता. त्याच्या आईबाबांचा चेहरा जरा गंभीर झाला होता.
“ का रे? का कुत्रा पाळायचा नाही? “ त्या बाई आता सरळ मराठीत बोलू लागल्या होत्या.
“ आई बाबा दोघेही ऑफिसला जातात ना? मग त्या कुत्र्याकडे कोण बघणार? “
“हो कि !”
“मला आता सांग तुला काय काय आवडत नाही?”
“ मला आई बाबा सारखं ऑफिस मध्ये जातात आणि घरी आल्यावर सुद्धा सारखं फोनवरून कुणाशी तरी बोलत असतात आणि माझ्याशी खेळत नाहीत हे अजिबात आवडतं नाही !” रोहनला एकदम जाणवलं कि त्याचे आई बाबा एकदम जरा रागावल्यासारखे वाटले,पण त्या माम मनपासून हसल्या.
“ मला सांग तुला आणखीन काय काय आवडत नाही?”
“ मला दुपारी त्या मावशीच्या घरी जायला अजिबात आवडतं नाही . “ रोहन म्हणाला. त्या बाईनी रोहनच्या आई कडे पाहिलं.
“मावशी म्हणजे त्याच्या पाळणाघर चालवणाऱ्या !” रोहनची आई म्हणाली.
“का रे? का आवडत नाहीत त्या?”
रोहन थोडा वेळ गप्प बसला पण नंतर कसला तरी विचार करून म्हणाला,
“त्या मावशींना मी खूप दंगा करतो ते आवडतं नाही!त्या माझ्या पाठीवर आणि पोटावर जोरात चिमटे काढतात. “
“ त्या मावशी दररोज तुला चिमटे काढतात का रे?”
“ हो दररोज काढतात. मग मी खूप रडतो. “
त्या शाळा वाल्या बाई आता खूप गंभीर झाल्या.
“ मला दाखवशील कुठे चिमटा काढतात ते?”
मग रोहन उभा राहिला आणि त्यानं आपला शर्ट वर केला. त्याच्या पाठीवर आणि पोटावर चिमटे काढल्याचे बरेच काळे निळे डाग होते.
रोहनची आई आणि बाबा पण आता उभे राहिले आणि त्या चिमटे काढलेल्या जागेकडे विस्फारित नजरेने पाहायला लागले.
“ अरे रोहन, हे तू मला का सांगितले नाहीस?” त्याची आई त्याला थोडीशी रागावून म्हणाली . पण त्याने बघितले कि ती रडत पण होती.रोहन आता घाबरला .
“ त्यांनी मला सांगितले होते कि जर आई बाबांना सांगितलेस तर तुला डाग देईन . पण या शाळेतल्या बाईना सांगू नको असे त्या म्हणाल्या नाहीत . म्हणून त्यांना सांगितले. “
त्या बाईनी आता हळूच आपले डोळे पुसले. त्याची आई तर जास्तच रडायला लागली. बाबांनी रोहनला हळूच जवळ घेतले आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवला.
ह्या सगळ्या मोठ्या लोकांना रडताना बघून रोहनला पण रडायला यायला लागलं. त्याने चोरून ईकडे तिकडे बघितले आणि हळूच आईच्या पदराला डोळे पुसले. त्याला मग खूप खूप बरं वाटलं.
तेवढ्यात त्या मोठ्या चष्मेवाल्या बाई रोहन जवळ आल्या आणि त्याचा हात हातात घेऊन त्या म्हणाल्या
“ Welcome to our school रोहन!”
रोहनच्या आईबाबांच्या रडवेल्या चेहऱ्यावर थोडे हसू आले. त्या बाईंचे आभार मानून ते सगळे बाहेर आले. आपल्या गाडीत बसे पर्यंत कोणीच काही बोलले नाही. गाडीत बसल्यावर रोहनच शेवटी म्हणाला,
“बाबा मी या परीक्षेत पास झालो ना? “
बाबांनी गाडी सुरु केली . त्यांनी मग एकदा आई कडे बघितलं आणि एकदा रोहन कडे. मग रस्त्याकडे बघत स्वताशीच बोलल्यासारखे म्हणाले,
“ होय रोहन तू पास झालास पण आम्ही दोघे नापास झालो. “
रोहनला काहीच कळले नाही . ही मोठी माणसे केव्हातरी त्याला काहीच कळणार नाही असे बोलतात. आई बाबा कोणत्या परीक्षेत नापास झाले होते कुणास ठाऊक?
प्रतिक्रिया
छान!
छान लिहिलंय.
छान लिहिलंय...
+१
शेवट सुन्न करतो .
छान लिहिलंय असं म्हणवत नाही.
छान लिहिले आहे,
चटका लावणारे लेखन
धन्यवाद
कथा आवडली.. फक्त एक कच्चा दुवा आहे
रोहनची परीक्षा - कच्चा दुआ.
कथा आवडली.
हेच
महत्वाच्या विषयाला वाचा
कथा कल्पना चांगली आहे पण पाच
संवाद.
कथा आवडली. विभक्त
एका आईची प्रतिक्रिया
आपली कथा मला खूप आवडली. या
धन्यवाद.