आईसक्रीम

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
22 Feb 2017 - 2:40 pm

‘टबुडी टबुडी’ चाच (http://www.misalpav.com/node/26051) हा पुढचा भाग आहे असे समजावे, म्हणजे पुन्हा सर्व पात्रांची ओळख करुन द्यायची आवश्यकता नाही.
तो वेडा जागा सोडून गेल्यावर तिथे दुसरे एक श्रीमंत गुजराती कुटुंब रहायला आले. त्यांचा बहारिनला मोठा धंदा होता. कुटुंब मोठे, मुख्य मोटाभाई म्हणजे आसुभाई, दोन तीन महिन्यांनी कधी एखादा आठवडा घरी यायचे. त्यांचे धाकटे भाऊ, नवीन आणि खिमन, मुंबईतला बिझिनेस सांभाळायचे. एक बहीण, बायको आणि दोन मुली आणि तीन मुले, शिवाय एक म्हातारी दमेकरी आई. त्यांचा सर्वात धाकटा मुलगा माझ्या बरोबरीचा असल्यामुळे, आम्ही दोघं खूप खेळायचो. ते खूपच श्रीमंत असल्यामुळे आमच्यापासून थोडे अंतर राखून असायचे. आईनेही आम्हाला त्यांच्या घरांत, बोलावल्याशिवाय कधी जायचे नाही, अशी सक्त ताकीद देऊन ठेवली होती. मात्र, बिनाका गीतमाला ऐकायला ते आम्हा मुलांना बोलवायचे आणि आम्ही तिन्ही भावंडे तो एक तास, अतिशय आनंदात घालवायचो. आमच्या सर्व शेजार्‍यांचा एक चांगुलपणा म्हणजे, दर रविवारी आमच्या घरी जी 'रविवारची सकाळ' भरायची, त्यातले गवई कितीही जोरात गायले, तबला भरपूर बडवला, तरी कधीही तक्रार करत नसत. आमच्या दारासमोरच्या गॅलरीत चपला-बुटांचा खच पडलेला असे, तोही मुकाटपणे ओलांडून जाण्याचे सौजन्य त्यांच्यापाशी होते, किंबहुना, त्याकाळी व्यक्तिस्वातंत्र्य, पर्यावरण इत्यादी गोष्टींची गळवे समाजात फार दिसत नसत.
त्यांच्याकडे एक, हाताने फिरवायचे आईसक्रीम मशीन होते आणि त्यांत ते बर्‍याच वेळा आईसक्रीम करत असत. त्यांच्या मुलांबरोबर जवळच्या बर्फाच्या फॅक्टरीत, बर्फ आणायला आम्हीही जात असू. आईची ताकीद असल्यामुळे, आईसक्रीम खायला मात्र आम्ही कधीच जायचो नाही. एकदा, आम्ही आईकडे हट्ट धरला की आपल्याकडे आईसक्रीम करुया. बर्‍याच दिवसांच्या चालढकलीनंतर, आईने शेजारच्या 'बेन' ला आईसक्रीम पॉट देण्याची विनंती केली. त्यांनीही, 'कस्सु वांदो नथी' म्हणत, पाहिजे तेंव्हा ते देण्याचे कबूल केले. झालं, आम्ही अत्यंत आनंदाने, एका सुट्टीच्या दिवशी बेत ठरवला. बर्फ कुठे मिळतो ते आधीच माहीत होते. सकाळी आईने जास्त दूध घेऊन ते आटवायला सुरवात केली. सकाळपासून आम्ही भावंडे आनंदावर तरंगत होतो. मी साधारण पांच वर्षांचा होतो. बाहेरच्या कॉमन गॅलरीत माझी तीनचाकी चालवत होतो. त्याकाळी सगळ्यांची दारे दिवसा उघडीच असायची. अचानक, शेजारच्या घरातून त्यांचा खिमन, हातात आइसक्रीम पॉट घेऊन बाहेर पडताना दिसला. मी सायकल थांबवून आ वासून त्याच्याकडे पहायला लागलो. तो झपाट्याने माझ्या बाजूने चालत गेला पण, आमच्या घरांत न शिरता, वेगाने जिन्याच्या पायर्‍या अलगद उतरुन गेला. मी पटकन कठड्याशी येऊन बघितले तर तो वाडीच्या गेटबाहेर पडलेला दिसला. मी दुसर्‍या क्षणी घरांत धूम ठोकली आणि आईला, बघितलेला सर्व प्रकार सांगितला. प्रथमतः तिचा विश्वासच बसला नाही. त्याच्या हातात नक्की आईसक्रीम पॉटच होतं का, हे पुन्हापुन्हा विचारले. मी मात्र, माझ्या सांगण्यावर ठाम होतो. आई म्हणाली, "अरे, ते श्रीमंत लोक आहेत, त्यांच्याकडे दोन मशीन सुद्धा असतील." थोडावेळ ती बाकीचे काम करत राहिली. मग मात्र, तिला रहावेना. तिने शेजारी जाऊन सरळ बेन ला विचारले. बेनचा चेहेरा पडला होता. त्या म्हणाल्या, " सूं करु मालतीबेन, आमच्या जवळचे नातेवाईक आहेत, त्यांनाही आजच आईसक्रीम करायचं आहे. म्हणून पाठवावं लागलं." बेन ना, आईच्या नजरेला नजर देणे जड जात होते. आई निमूटपणे परत आली. तिने आम्हाला तिघांना जवळ बोलावून सत्य परिस्थिती सांगितली. आम्ही तिघांनीही कसलाही हट्ट केला नाही. त्या रात्री आम्ही आटीव दूध पिऊन 'कोजागिरी' साजरी केली. दुसरा दिवस उजाडला. नाना ऑफिसला गेले, बहिणी शाळेत गेल्या. मीही दिवसभर खेळलो. संध्याकाळी परवचा म्हटल्यावर, अर्ध्या तासात नाना घरी येत. त्यादिवशी मात्र एक तास झाला तरी ते आले नाहीत. आई मात्र वाट पहात नव्हती. रात्री नऊ वाजता जिन्यावर पावले वाजली. नाना घरांत शिरले. त्यांच्या हातात, एक कागदात गुंडाळलेली जड वस्तु दिसत होती. त्यंनी आधी दरवाजा बंद केला. आम्हाला जवळ बोलावले आणि कागद बाजूला केले. आंत, नवे कोरे आईसक्रीम पॉट होते. आम्ही आश्चर्याने दोघांच्या तोंडाकडे बघत होतो. आई-नानांच्या चेहेर्‍यावर मंद स्मित आणि समाधान होते.
आयुष्यातला एक मोठा धडा आम्ही तिघं शिकलो होतो, शेजार्‍यांकडून आणि आई-नानांकडूनही!

कथासमाजरेखाटनप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

कथा आवडली. बऱ्याचदा लहान मुलांना समजावणं अवघड जातं.

सिरुसेरि's picture

22 Feb 2017 - 4:42 pm | सिरुसेरि

छान +१००

पद्मावति's picture

22 Feb 2017 - 5:39 pm | पद्मावति

मस्तच!

विशाखा राऊत's picture

22 Feb 2017 - 6:53 pm | विशाखा राऊत

आवडली

उत्तरा's picture

22 Feb 2017 - 7:12 pm | उत्तरा

कथा आवडली.

हेमंत८२'s picture

23 Feb 2017 - 12:56 pm | हेमंत८२

छान

विनिता००२'s picture

23 Feb 2017 - 4:04 pm | विनिता००२

किती नालायक शेजारी :(
लहान मुलांच्या भावनांचा असा चुराडा केला.

नाना मात्र एकदम माझ्या वडिलांसारखेच भासले. जे हवे ते विकत घेवून यायचे, कुणाला मागायची गरज पडायला नको. :)

किती नालायक शेजारी :(
लहान मुलांच्या भावनांचा असा चुराडा केला. >> :O your kids n their 'bhawana' is entirely your problem! Not your neighbours'.

पर्णिका's picture

1 Mar 2017 - 8:00 am | पर्णिका

मस्त सुरु आहे ही लेखमाला... लिहित रहा.
आयुष्यातला एक मोठा धडा आम्ही तिघं शिकलो होतो, शेजार्‍यांकडून आणि आई-नानांकडूनही!>> हे तर खासच !

यशोधरा's picture

1 Mar 2017 - 8:11 am | यशोधरा

वाचते आहे. आर्थिक स्थिती आयुष्यात बरेच धडे देऊन जाते..
अजून लिहा.

निरु's picture

2 Mar 2017 - 2:27 pm | निरु

दोन्ही कथा भावल्या. डोळ्यान्समोर चित्र उभं राहील इतकं साधं सुटसुटीत वर्णन! पु.भा.प्र.