संतापाचा रीटेक
अडखळत अडखळत चालताना फार पारा चढतो
असं वाटतं जो तो येऊन माझ्याच पुढ्यात अडतो
ट्रॅफिकमधे गाडी स्कूटर, गर्दीमधे माणसं
हॉर्न वाजवून, ओरडून बिरडून बदलत नाही फारसं
वाटतं एकेकाला कुदवावं, किंवा सरळ साला उडवावं
काय म्हणजे मला चायला ज्याने त्याने अडवावं?
पण कुदवताही येत नाही, उडवताही येत नाही
मनाला जे हवं ते घडवताही येत नाही
आता आम्ही सलमान खान नाही, की कुणी लोकल डॉन नाही
आणि बघताच जगाने बाजू व्हावं, अशी आमची शान नाही
बरं उडत बिडत जाऊ शकू तर आम्ही ब्याट म्यान नाही
मग आहेच आपली चरफड, शिव्या-शाप नि खळखळ
यंत्रवत गर्दीमधे आम्हीच होतोय अडगळ
मग कुणीतरी म्हणून जातं, इथे असंच असतं
जखमेवरती मीठ टाकावं, तसं हे वाक्य झोंबतं
असंच असतं म्हणजे काय आपण तेच करायचं का
सगळ्यांसारखंच चूक वागायचं, वेगळं नाही ठरायचं का?
गाडीची लेन बदलता तशी स्वतःची का नाही बदलत तुम्ही?
प्रॉब्लेमनुसार बदलत जाता, प्रॉब्लेम का नाही बदलत तुम्ही?
या प्रश्नांनीही त्रासच होतो, घुसमट होते आपलीच
कालसारखाच उद्या येतो, पुन्हा तडफड आपलीच
कुदवावं वाटतं, कुदवत नाही
उडवावं वाटतं, उडवत नाही
आम्ही ठरवत नाही, आम्हाला करवत नाही
आम्हाला सोडवत नाही, आम्हाला धरवत नाही
केलं काही तर फुकटची लफडी
नुसतं म्हटलं तरी भुवई वाकडी
'असं मी करेन का???' हेही पटवावं लागतं
त्याच्यासाठीही रक्त आटवावं लागतं
'उडवून टाकेन' असं नुसतं म्हणणं सुद्धा एवढी चोरी
आमच्या संतापाचा रोजच रीटेक, पुढेच सरकत नाही स्टोरी
- अपूर्व ओक
आवडली
झकास लिहिलीय!
वा!
क्या बात है! मस्तच!
छान लिहिलंय!
मस्त!
मस्त लिहीलंयस... वैताग टोटली
कधीकधी असं वाटतं खरं.
मस्त लिहिलंय.
ह्म्म.. होतं असं ! तू
पुण्याची गर्दी पण लय भारी