(मी सध्या काय करते?)
लेखनविषय (Tags)
प्रेरणा अर्थातच. आमचा एक क्षीण प्रयत्न! म्हटलं तर विडंबन, म्हटलं तर दुसरी बाजू...
मी सध्या काय करते?
नुकत्याच आलेल्या "ती सध्या काय करते?" या चित्रपटामुळे अश्या अनेक "तीं"वरचे जोक आंतरजालावर धुमाकूळ घालत आहेत. 'तेव्हाच अमके केले असते तर आज हा प्रश्न पडलाच नसता' अशा आशयाचे कित्येक फॉरवर्ड्स कित्येकांना 'ती'च्या आठवणी व्याकूळ करुन सोडत असतील!
एवढ्या सगळ्या आठवणींत माझी आठवण आमच्या गल्लीतही कुणालाच येणार नाही, हे मी आधीच कळून चुकले. कारण खरं तर आमचं घर कुठल्या गल्लीत नव्हतंच. भर चौकात तेवीस दुकानांपैकी एक असलेल्या आमच्याच दुकानाच्या मागे आमचं घर! गरज पडलीच तरी विरजणासाठी दही आणायलाही आई मला कुठे पाठवायची नाही! असं असताना, माझ्याबाबतीत "ती सध्या काय करते?" असा प्रश्न एखाद्या मुलालाच काय एखाद्या काकूंनाही पडण्याची काहीही शक्यता नाही. एवढंच काय! अनेक वर्षांनी एखाद्या ठिकाणी गर्दीत मी दिसलेच तर 'देवा, ही अजूनही अशीच आहे का?' असा प्रश्न पडण्याची शक्यता जास्त आहे. आता माझ्याविषयी असणाऱ्या ह्या सार्वत्रिक अनास्थेचं एकमेव कारण, 'मी तेव्हा तरी अभ्यासाव्यतिरिक्त काय करायचे?' या प्रश्नाच्या उत्तरात आहे!
माझ्या लहानपणी लोकसंख्येचा उद्रेक थोडाथोडा व्हायला सुरुवात झालेली असल्यामुळे एका वर्गात 'नव्वद-शंभरच'(!) मुलं असायची. अश्यावेळी मधल्या ओळीत पहिल्याच बाकावर बसलेल्या माझ्याकडे शिक्षकांचं चांगलंच लक्ष असायचं. त्यासाठी लहानपणीपासून असलेला आईचा धाक आणि अभ्यासाकडेच लक्ष देण्याचे संस्कार ह्या दोन्ही गोष्टी कारणीभूत होत्या. त्यामुळे कर्मधर्मसंयोगाने बाईंनी विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं देण्यासाठी हात वर नाही केला तरी त्या मला उत्तर द्यायला उठवत. वर्गात प्रश्नाचं उत्तर देणं हे ब्राउनी पॉईंट्स मिळवण्यासारखं असतं, पण त्याचा अप्रत्यक्ष उपयोग असला तरी प्रत्यक्ष फायदे काहीही नसतात. तर ब्राउनी पॉईंट आमच्या नशिबात होते, पण हाडांचा सापळा आणि टीव्ही न पाहताच लागलेला चष्माही होता! मग एखादा मुलगा आमच्याकडे का बघणार? आणि “मी सध्या काय करते” हा प्रश्न त्याला कसा पडणार?
तसं आमच्याही शाळेतल्या पद्धतीप्रमाणे, तिमाही-सहामाही परीक्षेचा निकाल सांगताना वर्गात त्या त्या विद्यार्थ्याला पुढे बोलावून मोठ्याने सांगायचे. इथे फेमस व्हायचा थोडाबहुत चान्स होता. पण आमचा रोल नंबर पहिलाच आणि परीक्षेतही पहिलाच!! त्यामुळे पुढे जाऊन निकाल घ्यायला गेल्यावर कॉम्प्लेक्स आल्यासारखी मुलं नजराच चुकवायची! मग तीसुद्धा संधी गेली. तसं वर्गात जोड्या लावण्याचे प्रकार भरपूर चालायचे. पण जोडी 'लावण्यायोग्य' अशीही स्वतःची ओळख मी कधी निर्माण करू शकले नाही. आणि मी स्वतः जोड्याबिड्या लावलेलं आईला कळलं असतं तर जोडी लागण्यायोग्य राहिलेही नसते. शाळेत गायन, वादन, वक्तृत्व स्पर्धा दर वर्षी असायच्या. तिथेही आमची वर्णी कधी लागली नाही. फार तर फार निबंध स्पर्धेमध्ये मला बसवायचे. (अभ्यासाठी खाली मान घालायची जी सवय लागली, ती इथेच उपयोगी पडायची). बरं शाळेत जाऊद्या, पण रस्त्याने येता-जाता एखाद्या मुलाशी नजरानजर व्हावी तर बाबाच आणायला-सोडायला यायचे (माझ्या या परिस्थितीला कारणीभूत फक्त आईच नाही बरं). परीक्षेच्या निकालानंतर नजरा चुकवणारी मुलं बाबांना बघून तर रस्ताच बदलायची! अश्या प्रकारे आमचं शालेय जीवन तर 'त्या'च्याविनाच गेलं.
भरमसाठ मार्क मिळवून मी शालेय शिक्षण पूर्ण केलं. पण मधल्या या कालखंडात जग किती बदललंय हे माझ्या ध्यानातच आलं नाही. "एक्सक्यूज मी प्लीज" म्हणत मुलांना ओलांडून जाणार्या मुलींना साळकाया-माळकाया म्हणत मी त्यांच्यापासून दहा हात लांबच राहत होते. थ्रेडींग, वॅक्सिंग करणं पाप समजून बारीक आवाजात पार्लरवालीला "तुम्हांला आवडेल तसा करा" सांगून तीन महिन्यांतून एकदा फक्त हेअरकट करत होते. (तीच मान खाली घालून बसायची सवय!), आणि वर केस कंडिशन वगैरे करण्याऐवजी माक्याचे तेल लावून फिरत होते. "फॅशन टेलर्स" कडून फॅशनेबल कपडे शिवून घेण्याऐवजी आईबरोबर जाऊन ती सांगेल तो ड्रेस घेऊन फिटींग-बिटींगच्या भानगडीत न पडता, हॅंगरवर लटकवल्यासारखा कॉलेजला घालून जात होते. एक्स्ट्रा लेक्चर अटेंड करून ब्राउनी पॉइंट्स मिळाले तरी, मुलांचा असे लेक्चर अटेंड करण्यावर विश्वास नसल्याने त्याचा प्रत्यक्ष फायदा अजूनही नव्हताच! त्यातल्या त्यात समाधान म्हणजे आख्ख्या प्रॅक्टिकलच्या बॅचला २५ जणांत मी एकटीच मुलगी. पण त्याच कारणाने बाई माझी सतत पाठराखण करायच्या. दुसरं काही सुचवायला घरात बहिणी, वहिनी, जवळपास मैत्रिणी असं कुणी नव्हतंच. शेवटी 'नजरेत येण्यासाठी' कधी लग्नसमारंभांत हजेरी, तर कधी बाजारात चकरा वाढवल्या. पण "शेजारी आई आणि नाकावर चष्मा" बघता मुलांची कायम हुलकावणीच मिळायची. उलट एखाद्या काकूच त्यांच्या मुलीचा हात धरुन तिला माझ्यासारखं "हुशार" व्हायला सांगायच्या. वर "हिच्याकडे बघूनच ही अभ्यासाशिवाय दुसरं काहीच करत नसेल हे कळतं" असं म्हणायच्या! ती मुलगीही तिच्यावर दहा मुले फिदा असल्यासारखी माझ्याकडे बघून तिरकस हसायची. कॉलेजच्या त्या चार वर्षांत एखाद्या मुलाने मदत मागितलीच तर ती जास्तीत जास्त "हा प्रोग्रॅम कसा लिहायचा?" एवढं विचारण्यापुरती असे! शेवटी माझं कॉलेजही "त्याच्या"विनाच गेलं.
अर्थात या सगळ्यासाठी इतर कोणाला दोष देऊन उपयोग नाही. पण आत्यंतिक अभ्यासूपणा, बारीक शरीरयष्टी आणि ड्रेसिंग सेन्सचा अभाव परमेश्वराने माझ्यातच का भरावा हे कोडं काही सुटता सुटत नाही. बरं एवढं असताना मुलांनी चुकून एकदा जरी आमच्याकडे बघितलं तर आपण निदान नजरेला नजर तरी द्यावी, तर नाही ना! लहानपणीपासूनच्या सवयीनं आपणच घाबरुन खाली पाहावं! नंतर हीच मुलं माझ्या मैत्रिणींवर लाइन मारत असलेली मी पाहिली.
या परिस्थितीत 'तो सध्या काय करतो' हा प्रश्न मला शंभर मुलांच्या बाबतीत पडत असला तरी मी सध्या काय करते असा प्रश्न एक शंभरांश मुलालाही पडणार नाही. आणि पडलाच तर त्याचे त्याच्या मनातले संभाव्य उत्तरं खालीलप्रमाणे नसावे एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना!
"ती सध्या काय करते?.... पुस्तकातून मान वर आली असेल ना आता तरी?"
प्रतिक्रिया
हाहा!
लई म्हंजे लईच भारी!
मस्त लिहिलंय..:D
क्या बात है! रुपीताईंकडून
अडुसष्टास बारा? मला आधी वाटलं
हाहाहा. तो आमच्या शाळेने त्या
मस्त प्रतिसाद! =))
ती / तो सध्या काय करते/करतो
एकदम दणदणीत जमलंय..
उत्कृष्ट लेख !
+१
सुंदर लिहीलं आहे , आवडले !
विडंबन नाही स्वतंत्र म्हणवून
लोल =))
क्या बात है, अमेझिंग !!!
तुम्हाला "फील" कसा होणार?
मस्त जमलंय ! थोडा वेगळ्या
लय भारी!
रुपी,
मस्तच!
लय भारी लिहिलंय!
=)) मस्त जमलाय लेख.
खी खी खी !!
हा हा..
मस्त लिहीलय
हेहेहे
+१०००
ह्ही ही ही ह्ही!
मस्त लिहिलंय !
खतरनाक!!
आवडलं सुडंबन.
लेख आवडला
वा! शाळेचे दिवस आठवले
सर्वांना धन्यवाद! :)
दोन्ही लेख मस्त
मस्त
खूप सुंदर लेख! तुमच्या
छान प्रतिसाद!
मस्त लेख वाचून मजा आली.
अग्गागा !!!!! रुपडे लय भारी
भट्टी मस्त जमली आहे.
धन्यवाद :)
ति एक विसरोलोच नाही "आत्माबदल"