फायनल डिल - कथा - काल्पनीक
फायनल डिल - कथा - काल्पनीक
रात्रीचा अंधार अधिकच दाट होत चालला आहे . रातकिड्यांची किरकिरही वाढत चालली आहे . सगळीकडे काळोख वेढुन राहिला आहे . रस्त्यांवरची वर्दळ कधीच थांबली आहे . कुठेतरी दुरवर रात्रीची गस्त घालत फिरत असलेल्या गुरख्याचे काठी आपटणे आणी त्याची "जागते रहो" हि आरोळी , एवढाच काय तो आवाज या शांत वातावरणात ऐकु येत आहे .
आपल्या घराच्या वरच्या खोलीत खुर्चीवर बसुन तो एकाग्रपणे काहितरी लिहितो आहे . घड्याळात किती वाजले याची त्याला काहिच जाणीव नाही . आपल्या मनातल्या कल्पना तो मन लावुन हातातल्या लेखणीने समोरच्या टेबलावरील डायरीमध्ये भराभरा उतरवतो आहे . आपणच निर्माण केलेल्या कल्पनाराज्यात त्याची स्वारी रंगुन गेली आहे . प्रकाश येण्यासाठी त्याने लावलेला एक बारिकसा दिवा बाजुला मिणमिणतो आहे . एवढासा मंद प्रकाश आणी भरीला बाजुच्या खिडकीतुन येणारा फिकट चंद्रप्रकाश त्याला त्याच्या लिखाणासाठी पुरेसा आहे .
हा बारीकसा प्रकाश सोडला तर बाकी सर्व घरात मात्र अंधारच आहे . घरातल्या खालच्या दिवाणखान्यामधे मिट्ट काळोख आहे . दिवाणखान्यामधील भिंतींवर अनेक तसबिरी , छायाचित्रे आहेत . या तसबिरींमध्ये घरातीलच काहि लोकांची तैलचित्रे आहेत . पण आत्ता या क्षणी , या अंधारामध्ये , या तसबिरी स्पष्ट दिसायला काहिच वाव नाही. तसबिरींमध्ये या चित्रांच्या जागी केवळ सावल्या दिसत आहेत . केवळ निर्जीव सावल्या .
पण नाही ..त्या सावल्यांमधली एक सावली अचानक सजीव झाल्याचा भास होतो आहे . ती सावली हळुवारपणे हालचाल करु लागली आहे . भिंतीवरुन उतरुन ती दिवाणखान्यामधे इकडे तिकडे हिंडु फिरु लागली आहे . आता ती आजुबाजुच्या इतर खोल्यांमध्येही डोकावते आहे . जणु काही ती कुणाला तरी शोधते आहे .
अचानक तिचे लक्ष वरच्या खोलीतुन येत असलेल्या मंद प्रकाशाकडे जाते . झरझर जिना चढुन ती वरच्या खोलीमध्ये जाते . आत शिरताच तिला तो समोरच्या खुर्चीवर बसलेला पाठमोरा दिसतो . ती त्यालाच शोधत असते . तो मात्र लिखाणात मग्न झालेला आहे . ती हलकेच पाय न वाजवता पाठीमागुन त्याच्या जवळ जाते आणी त्याच्या खांद्यावर हात ठेवते . तो चमकुन तिच्याकडे पाहतो . तिला पाहुन त्याच्या चेह-यावर क्षणभर ओळखीचे हसु येते. परत तो आपले लेखन सुरु करतो .
थोडा वेळ वाट पाहुन ती त्याला विचारते - " आज एवढं काय लेखन चाललंय लेखक महाशयांचं ? चांगलीच समाधी लागलेली दिसतीय ."
तो किंचीत हसुन उत्तर देतो - " एक चांगली कल्पना सुचली आहे . परत ती विसरु नये म्हणुन लगेच लिहायला सुरुवात केली ."
"असं . म्हणुन लेखक महोदयांनी लगेच या डायरीमध्येच लिहायला सुरुवात केली वाटतं ? तेही पेन्सिलीने ? तुमचं नेहमीचं पेन कुठे गेलं ? "
"काय करणार ? माझी नेहमीची वही आणी पेन काहि सापडेना . शेवटी या टेबलच्या ड्रॉवरमध्ये हि डायरी आणी पेन्सील सापडली . तेव्हा त्यांनीच लिहायला सुरुवात केली . "
" उद्या आपण शोधली असती तुमची वही आणी लाडकं पेन . मग लिहायचं ना सावकाश ? आणी एवढं मग्न होउन असं लिहिताय तरी काय ? "
"माझ्यासारख्या गुढकथा लेखकाला एकदा कथाकल्पना सुचली की चैन पडत नाही . त्यामुळे लगेच लिहायला सुरुवात केली . कथेचं नाव आहे - "रात्र आहे थांबलेली" .."
"अरे वा ... अगदी या वातावरणाला साजेसं नाव आहे तुमच्या कथेचं .." ती हसुन दाद देत म्हणते .
तिच्या हसण्यामुळे त्यालाही हसु आले आहे . दोघांच्याही हसण्याचा आवाज बराच वेळ खोलीभर व्यापुन राहतो .
--------------------------------------------------------------------------------------
सकाळचे नऊ वाजले होते . म्हातारा जनोबा आपले मुंडासे सावरत घराचे गेट उघडुन आतमध्ये आला . त्याने बरोबर हातात एक झाडुही आणला होता . आतमध्ये येताच त्याने घराच्या व्हरांड्यात पडलेला पालापाचोळा झाडायला सुरुवात केली . पालापाचोळा झाडुन त्याने एका बाजुला गोळा केला . मग त्याने घराचा मुख्य दरवाजा आपल्याजवळच्या किल्लीने उघडला . आतल्या दिवाणखान्यामध्ये बराच केर झाला होता . दिवाणखान्यातील भिंती , भिंतींवरील तसबिरी , छायाचित्रे यांच्यांवर कोळीष्टके साठली होती . बाजुच्या खोल्यांमधेही तीच अवस्था होती .
"आं ..मागच्याच महिन्यात तर हे घर चांगलं लख्ख झाडलं होतं . परत एवढा केर कसा काय झाला ? " जनोबाला क्षणभर प्रश्न पडला . पण जास्त वेळ न घालवता त्याने सफाईला सुरुवात केली . थोड्याच वेळात त्याने दिवाणखाना , बाजुच्या खोल्या आणी जिना झाडुन काढल्या . आता त्याने आपला मोर्चा वरच्या खोलीकडे वळवला .
वरची खोली त्यामानाने स्वछ होती . त्यामुळे ती झाडायला त्याला फार त्रास आणी वेळ पडला नाही . खोली झाडतानाच त्याचे लक्ष टेबलावर असलेल्या डायरीकडे गेले .
"अरेच्चा .. हि डायरी .. मागच्या महिन्यात आपण या खोलीची आवराआवर केली तेव्हा इथली सगळी वह्या पुस्तकं बांधुन शेल्फात ठेवली . हि डायरी तेवढी राहिली म्हणुन या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवली . मग आता हि परत टेबलावर कशी काय आली ? का गडबडीत आपणच ड्रॉवरमध्ये ठेवायचं विसरुन गेलो कि काय ? खरच जनोबा .. तु आता म्हातारा झालास .." तो स्वताशीच पुटपुटत होता .
------------------------------------------------------------------------------------------------------
सकाळचे अकरा वाजत आले होते . श्री . दळवी हे एक नामांकित इस्टेट एजंट आज आपल्या ऑफिसमध्ये अधीरतेने बसले होते . ते एका कस्टमरच्या फोनची वाट पाहत होते . त्यांचा फोन वाजला . त्यांना हवा तो फोन आला होता . आपले सर्व व्यावसायिक कौशल्य वापरुन श्री . दळवी कस्टमरशी बोलु लागले .
" हॅलो..नमस्कार साहेब ..मी आपल्याच फोनची वाट पाहत होतो . आपल्या बोलण्याप्रमाणे आजच सकाळी मी आमच्या एका माणसाला त्या बंगल्याची साफसफाई करायला पाठवले आहे . मीही आता तिकडेच चाललो होता . तुम्हीही लवकर या . म्हणजे तुम्हालाही हा बंगला प्रत्यक्ष बघता येईल . मला खात्री आहे..तुम्हाला हा बंगला नक्की आवडेल . तुम्हाला हवा तसा अगदी पारंपारीक स्टाइलचा बंगला आहे . तुम्हाला बघता यावा म्हणुन या बंगल्यातील तसबिरी , फ्रेम्स आम्ही अगदी जशी होती तशीच ठेवली आहेत . एकदम इथिनीक लूक आहे या घराचा ."
तिकडुन कस्ट्मरनी बंगल्याबद्दल काहितरी प्रश्न विचारला . तेव्हा श्री . दळवी हे परत उत्साहात माहिती देउ लागले .
"साहेब , या बंगल्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एकेकाळचे प्रसिद्ध लेखक मनोहरराज वर्तक हे इथेच राहात होते . काय म्हणता..ते तुमचे फेवरीट गुढकथा लेखक आहेत ? मी सुद्धा त्यांच्या गुढकथांचा फॅन आहे . मग तर हा बंगला तुमच्यासाठी एकदम खास असेल . हो.. हा त्यांचाच बंगला . दोन वर्षांपुर्वी त्यांच्या मिसेस आजारपणात गेल्या . त्यानंतर ते एकटेच इथे राहत होते . एका वर्षानंतर वयोमानामुळे तेही गेले . अलिकडेच हा बंगला पुढच्या प्रोसेसिंगसाठी आमच्या एजन्सीकडे आला . तुमच्या रिक्वायरमेंटला हा बंगला अगदी बरोबर जुळत होता . म्हणुन मी हा तुम्हाला सजेस्ट केला . आज तुम्ही बघाच . तुम्हालाही नक्की आवडेल . जर आवडला तर हे डिल आपण आजच फायनल करुन टाकु. "
--------------------- समाप्त ----------- काल्पनीक ------------------------------------------------------------------------------------
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वातावरणनिर्मिती छान झाली, पण
सहमत..
कल्पना आवडली.
कल्पना खूप छान आहे. पण कथा
कथा आवडली
धन्यवाद . आभार .
छान आहे! आवडली!!
कथा आवडली
गूढ अजून गडद होत जायला हवे