बन्दे की मेहनत को किस्मतका सादर परनाम है प्यारे.. दंगल दंगल!
दंगल पाहिला. आवडलाच..
अगदी शतकोत्तर कलाकृती नसली तरी पिक्चर उत्तमच आहे. आणि मला आमीर खान देशद्रोही वाटत नाही, म्हणुन मला त्याचं कौतुक करायलाही काही त्रास नाही.
दंगल मध्ये आमिर, फातिमा, सान्या, सांक्षी तंवर आणि अपारशक्ति खुराणा म्हणजेच ओंकार.. सगळ्यांचेच काम उत्तम आहे. त्यांनी त्यांच्या लुक्सवर घेतलेली मेहनत, त्यासाठी केलेला व्यायाम.. हे तर महत्वाचं आहेच. पण खास करुन आमीरने वजन वाढवुन, ते पुन्हा कमी केलंय. आणि खरंच त्याच्या आयुष्याची २०-२५ वर्ष आपण पहातोय असं वाटावं इतका तो एकाच सिनेमात तरूणही दिसलाय आणि म्हाताराही. नुसतं शरीरच नाही, तर डोळे सुद्धा! आमीर भारी आहे.. वादच नाही..
एक गोष्ट नोंदवुन ठेवलीच पाहिजे. इंग्रजी सबटायट्ल्स फार विचार करुन लिहीलेले होते. अगदीच भाषांतराच्या पाट्या न टाकता, अर्थ समजुन घेऊन "भावांतर" केलंय. दंगल दंगल हे गाणंही जमुन आलंय..
पण ह्या सगळ्यात मला पिक्चर मध्ये सर्वात जास्त काय आवडलं..?
काय आहे की, मला जगात दोन प्रकारची माणसं "सेक्सी" वाटतात (हो..सेक्सी हा माझा आवडता शब्द आहे. मुव्ह ऑन!)
एक म्हणजे संपुर्ण स्वयंपाक करुन स्त्रियांना गरम गरम जेवण वाढु शकणारा पुरुष आणि दुसरं म्हणजे जिममध्ये वजनं उचलुन आपले "मस्कल्स" टरारुन फुगवु शकणारी स्त्री! थोडक्यात ती जनता, जी आपले स्टिरीओटाईप्स मोडुन अत्यंत आत्मविश्वासानी जगु शकते.. असले लोक मला भयंकर आकर्षक वाटतात.
इथेही महावीरसिंग आपल्या मुलींना "पोरींच्या जातीला.." मधुन बाहेर काढतो आणि आपल्याही डोक्यातले अनेक स्टिरिओटाईप्स खाळकन फोडतो. गीता जेव्हा मुलांसोबत कुस्ती खेळायला जाते, तेव्हा तिथे उभे असणारे अनेक पुरुष अर्थातच गलिच्छ कमेंट्स करतात. मला तर कुस्तीमध्ये असं आपल्या शरीराला दुसर्या मुलाला हात कसा लावु देणार, कपडे फाटले तर काय? इकडे तिकडे हात लागला तर काय? वगैरे भरपुर "टिपीकल" खयाल आले. पण पुढच्या सेकंदाला गीता ह्या सगळ्याच्या पलीकडे जाउन कुस्तीसाठी उठली आणि शांतपणे मैदानात गेली. मलाच माझी लाज वाटली. कितीही फेमिनिस्ट म्हणलं तरी स्वतःच्या शरीराचं भान सुटत नाहीच. अजुनही स्त्री अवयव काही तरी वेगळे आहेत. त्यांचं भान सांभाळतच आयुष्य जगायचं. कुणाचा स्पर्श झाला तर?? म्हणुन नकोच बाई.. वाली मानसिकता मोडून काढणं सोप्पं नाही. अशात बघणार्यांच्या गलिच्छ नजरा तुडवत कुस्तीला जाणं काही औरच!
हे जे गीता आणि बबितानी हरयाणासारख्या जागी, जिथे "छोरी हुई है" म्हणल्यावर तोंडं पडतात, तिथे करुन दाखवणं भारीच आहे.. वादच नाही.. आणि म्हणुनच मला "म्हारी छोरीयाँ छोरोंसे कम है के?" हे वाक्यही खटकलं नाही. हरयाणातला बाप असंच बोलत असतो. पुरुषाशी तुलना केली (पक्षी : आधीच स्त्रीला कमी लेखलं) म्हणुन तो स्त्रीवादी नाही असं म्हणणं असेल तर पिक्चर पुन्हा बघा.
ह्या पोरींनी केलेली बेसुमार मेहनत, खास करुन कुस्तीचे शॉट्स, मोठ्या पडद्यावर बघण्याची गोष्ट आहे. शेवटच्या शॉट मध्ये गीता ऑस्ट्रेलियन रणगाडा (म्हणजे तिची प्रतिस्पर्धी हो!) डोक्यावरुन उचलुन आपटते, ते जरं तिने खरोखर केलं असेल तर, साष्टांग नमन माझे!
अजुन एक मुद्दा म्हणजे, पिक्चर पहाण्याआधी फेसबुकवर खुप काही चर्चा वाचली होती. अर्थात पिक्चर बहुतेकांना आवडलेलाच आहे. पण आपली स्वप्नं अशी मुलांवर लादावीत का? वगैरे चर्चाही वाचल्या. अनेकांना ह्या कारणासाठी पिक्चर पटलेला नाही.
मला पिक्चर पाहुनही त्या कथेत तसं काही घडलं असं वाटत नाही. महावीरसिंगने सगळ्याच आशा सोडुन दिलेल्या असतात. त्याला त्या मुलींमध्ये कुस्ती शिकु शकण्याची चमक दिसते म्हणुन तो त्यांच्यावर वर्षभर मेहनत घ्यायचं ठरवतो. इथुन पुढचा भाग अनेकांना "जुलुम" वाटत असेल. तो पोरींना अबरचबर खाऊ देत नाही, सकाळी पाचला उठुन पळवतो, व्यायाम करायला लावतो, केस कापतो. हे बघतानाही त्या मुलींसारखाच मलाही राग आला होता. पण ह्या जगात कोणताही यशस्वी खेळाडु हे सगळं न करताच मेडल मिळवु शकलेला नाही. हो मुलांना त्रास होतो.. त्यांना झोपावं वाटतं ८ पर्यंत, त्यांना खावं वाटतं तळकट, त्यांना पहावा वाटतो टिव्ही. पण "जे मुलांना हवंय ते करु देणं" हेच सुजाण पालकत्व असतं का?
आजकाल "तू जे हवं ते करं. ताण घेऊ नकोस. आपल्याला स्पर्धेतला उंदीर व्हायचं नाही" हे पालकांच मुलांसाठी असलेलं धोरण आहे. उगाच उर फुटुस्तोवर धावणं मलाही मंजुर नाही, पण म्हणुन स्पर्धाच नको?? ताणच नको घेऊस?? ते बाळ १५-१७ वर्ष राहिल तुमच्या पदराखाली, पण कधी तरी तर बाहेर पडेल ना? कधी तरी तर त्याला स्वतःचा नोकरी धंदा शोधावा लागेल ना? तिथे काय पायघड्या टाकलेल्या असतात का? शंभरातुन दहा घेतात, ती स्पर्धा नसते? डेडलाईन्सवर काम करुन द्यायची असतात, तो ताण नसतो?
अरे ताण कसा घ्यायचा, कधी घ्यायचा, किती घ्यायचा हे पोरांना शिकवा की! स्पर्धेत उतरुच नकोस हे काय नाटक आहे?
आणि तुला जे हवं ते कर काय? मला माझ्या ८-१० वर्षाच्या मुलात अमुक एक स्किल दिसतंय, तर मी त्यावर मेहनत घेऊ नको? "आठ" वर्षाच्या मुलाला सांगु की "तू ठरव"? मुलांमध्ये नसलेला कल आणि बळंच निर्माण केलेली आवड त्यांच्यावर लादुन त्यांना "सर्वांगीण विकासा"च्या नावाखाली राबवणं चुक आहे हे मलाही कळतं. पण मी त्या पोरापेक्षा २५ वर्षानी मोठी आहे ना? मी सांगायला नको का त्याला की बाबारे हे तुला जमतंय, ह्याचा आयुष्यात तुला उपयोग होईल, हे कर. पोरांवरच १००% निर्णय सोडायचे तर तुम्ही कशाला हवे मग? काय पोरांना ठरवु द्यायचं आणि काय पालकांनी ठरवायचं हे "पालकांना" समजायला हवं. जगातलं कोणतंही मुल सकाळी पाचला उठुन व्यायाम करत नसतं किंवा पोळीभाजीच खात नसतं. तिथे मायबापच लागतात.. करडी नजर रोखुन उभे..
इथे असंही अर्ग्युमेंट होऊ शकतं की हे महावीरसिंगने स्वतःच्या स्वप्नांना मुलींवर लादणं आहे. पण कसंय की माणुस म्हणुन मला ठराविकच गोष्टींची माहिती असते. माझ्या समजुती-विचार-माहिती ह्यातुनच मी मुलांसाठी निर्णय घेणार. आपल्याला तरी १०-१५ प्रोफेशन्स सोडून काय फार महिती असतं? मग हरयाणातल्या पैलवान बापाला पोरींना पैलवानच करायचं सुचणार ना?
महावीरसिंग मुलींमधला गुण हेरतो, त्याच्या मुलींवर मेहनत घेतो आणि पोरी त्या मेहनतीच चीज करुन दाखवतात, तर ह्यात चुक काय? पैलवानानी पोरींना पैलवानच का बनवलं ही? जर ही कथा पुढे जाऊन मुली नैराश्यात गेल्या वगैरे दाखवत असती तर ते चुकच होतं. पण गीता स्वतःहुन त्याला येऊन विचारते की पुढची कुस्ती कधी लढायची. इथे ती मुलगी गोल्ड मेडल घेतेय तरी केवळ पैलवान बापाने आपले स्वप्न मुलीमार्फत पुर्ण केले म्हणुन हे सगळा जबरदस्तीचा मामला? मुलांनी क्षेत्र "निवडलेलं" नसलं तरी पालक सुद्धा व्यवस्थित निर्णय घेत असतात. प्रत्येक वेळेस "तुला काय करायचंय ते कर" हीच पद्धत बरोबर असेल असं नाही.
आणि तसंही, आपले वडील आपल्यालासाठी जे कष्ट करतात, त्याची जाणीव ठेवुन, त्यांच्या आनंदासाठी एखाद्या क्षेत्रात यशस्वी होणं हे वाईट आहे का? पालक तर कायमच आपल्या पाल्याचा विचार करतात. पण असा विचार मुलांनीही आईवडीलांचा करायला हवा. मुलांना कसे वाढवावे ह्यावर जशा चर्चा होतात, तसंच मुलांनीसुद्धा काही किमान गोष्टी आईबापासाठी करायला हव्यात.
पालकांनी मुलांच्या आयुष्यात किती ढवळाढवळ करावी किंवा करु नये ह्यापेक्षाही मुलांनी आपल्या आईवडीलांसाठी एक ध्यय जोपासणं, त्यांच्या आनंदासाठी मेहनत घेणं हे ह्या कथेत मला जास्त भावलं. "हो, माझ्या तुझ्याकडुन काही अपेक्षा आहेत, कारण तुझ्यात ती क्षमता आहे." हे एका पालकानी आपल्या मुलाला सुनावणं भावलं.. कितीही त्रास होत असला तरीही आपल्या मुलींना "मेहनतीला पर्याय नाही" हे ठासुन सांगणारा बाप मला भावला..
पण हे सगळं सोडुनही, दोन अडीच तास एक चांगली कथा मांडणारा हा चित्रपट आहे. बघायला नक्कीच हरकत नाही. वर्गीकरण
प्रतिक्रिया
उत्तम
आवडेश ....
पिक्चर छान आहे