आठवणी दाटतात: किस्से क्रिकेटचे
हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छच्या रणापासून ते अरुणाचलच्या जंगलापर्यंत पसरलेल्या भारतासारख्या विशाल देशाला एकत्रं आणणार्या ज्या काही मोजक्या गोष्टी आहेत त्या म्हणजे भारतीय सैन्य, राजकारण आणि क्रिकेट! भारतीय सैन्य हा उभ्या देशाच्या अत्यंत आदराचा तर राजकारण हा सामान्यतः तिरस्काराचा विषय.परंतु दहा वर्षांच्या पोरापासून ते जराजर्जर म्हातार्यांपर्यंत सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि चवीने चघळण्याचा विषय म्हणजे क्रिकेट! भारताचा राष्ट्रीय खेळ भले हॉकी असला आणि ऑलिंपिकमध्ये भारताने त्यात सुवर्णपदकं पटकावलेली असली, लिएंडर पेस - महेश भूपती यांनी ग्रँडस्लॅम जिंकले असले आणि अभिनव बिंद्रा, राजवर्धन राठोड, मेरी कोम, सिंधू आणि अनेक कुस्तीपटूंनी ऑलिंपिक मेडल्स जिंकली असली तरी भारतीयांना क्रिकेटइतकं दुसरं कशाचंही वेड नाही! पैसा आणि ग्लॅमर यांच्याबाबतीत इतर सर्व खेळांवर क्रिकेटने मात केली आहे.
जगभरात पसरलेल्या प्रत्येक क्रिकेटरसिकाच्या काही खास आठवणी असतात. कधी एक इनिंग्ज, फास्ट बॉलर किंवा स्पिनरचा खतरनाक बॉलिंग स्पेल, कधी कॅप्टनच्या चाणाक्षपणाची चुणूक तर कधी एखादा तोंडावर आपटवणारा निर्णय, कधी दोन खेळाडूंमधलं स्लेजिंग तर कधी मॅचपूर्वी किंवा मॅचनंतर केलेली एखादी कॉमेंट, कधी एखादी आख्खी संस्मरणीय मॅच.. अशा अनेक आठवणी प्रत्येकाच्या मनात कुठे ना कुठे तरी घर करुन असतात. बहुतांशी या आठवणी सुखद असल्या तरी अनेकदा हातात आलेली मॅच गमावल्यामुळे पदरी निराशा येणार्या असतात तर कधी कधी फिल ह्यूजच्या दुर्दैवी मृत्यूसारख्या चटका लावणार्याही असतात.
मी क्रिकेटमध्ये इंट्रेस्ट घेऊन मॅच पाहण्यास सुरवात केली ती १९८५ मधल्या ऑस्ट्रेलियातल्या वर्ल्ड सिरीज कप पासून. १९८३ मध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकला असला तरी त्याचं महत्वं कळण्याइतकं माझं वय नव्हतं (वय वर्ष ८)! परंतु वर्ल्ड कप विजेत्या भारतीय टीमचा वर्ल्डकपच्या ट्रॉफीसह एक पोर्टरसाईझ फोटो बाबांनी विकत घेऊन दिलेला मला आठवतो. त्या फोटोत अजिबात ओळख नसलेला एक खेळाडू म्हणजे सुनिल वालसन! वर्ल्ड कपमधली एकही मॅच न खेळता लखपती झालेला नशिबवान माणूस! मात्रं १९८५ मध्ये भारताने जिंकलेली ही वर्ल्ड सिरीज आणि रवी शास्त्रीला मॅन ऑफ द सिरीज म्हणून मिळालेली ऑडी कार आजही लख्खं आठवते!
अशीच एक आठवण १९८७ मधल्या पाकिस्तान संघाच्या भारतीय दौर्यातल्या चौथ्या टेस्टची. ही टेस्ट म्हणजे पाकिस्तानी बॅट्समन प्रेक्षकांचा किती अंत पाहू शकतात याची परिक्षा होती. टॉस जिंकून बॅटींग घेतल्यावर पाकिस्तानने पहिल्या इनिंग्जमध्ये ३९५ रन्स काढण्यासाठी तब्बल १८८ ओव्हर्स बॅटींग केली होती! पाकिस्तानी बॅट्समनच्या या कासवछाप बॅटींगला प्रेक्षक वैतागले होतेच, पण त्यापेक्षा सर्वांना जास्तं उत्सुकता होती ती सुनिल गावस्कर बॅटींगला येण्याची.
सुमारे साडेतीन तासात ५७ रन्स काढल्यावर गावस्करने एजाज फकीच्या बॉलवर लेट कट मारुन ५८ वी रन काढली...
अहमदाबादच्या स्टेडीयमधे फटाक्यांचा कडकडाट झाला
आणि आसेतुहिमाचल भारतात टाळ्यांचा पाऊस पडला!
अँडी रॉबर्ट्स, मायकेल होल्डींग, जोएल गार्नर, कॉलिन क्रॉफ्ट, माल्कम मार्शल, डेनिस लिली, जेफ थॉमसन, जॉन स्नो, बॉब विलीस, इयन बोथम, डेरेक अंडरवूड, इमरान खान, सर्फराज, सिकंदर बख्त अशा जगभरातल्या बॉलर्सना स्ट्रेट ड्राईव्हने नामोहरम करत गावस्करने टेस्ट क्रिकेटमध्ये १०००० रन्सचं एव्हरेस्ट गाठलं होतं!
१९८७ मध्येच रिलायन्स वर्ल्ड कपमध्ये नवज्योत सिंग सिद्धूने पहिल्याच वनडेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मद्रासला मारलेल्या पाच सिक्स आणि चेतन शर्माने न्यूझिलंडविरुद्ध घेतलेली हॅटट्रीक या आणखीन दोन अविस्मरणीय आठवणी. त्याआधी चेतन शर्माने एकदा चक्क चौथ्या नंबरवर बॅटींगला येऊन वनडे मध्ये सेंच्युरी ठोकलेलीही आठवते. हातात असलेला वर्ल्डकप गमावणारा माईक गॅटींगचा रिव्हर्स स्वीपही आठवतो, पण त्यापेक्षा दु:खदायक आठवण म्हणजे सेमीफायनलमध्ये आरामात खेळत असलेल्या चंद्रकांत पंडीतला एलबीड्ब्ल्यू देणारा अंपायर टोनी क्राफ्टरचा साफ चुकीचा निर्णय.
परंतु त्या वर्ल्डकपमधली डोक्यात घर करुन राहिलेली एक आठवण म्हणजे न्यूझीलंड - झिंबाब्वे मॅचमधली. न्यूझीलंडच्या २४२ रन्सचा पाठलाग करताना १०४ /७ अशा अवस्थेत असताना डेव्हिड हौटनने मार्टीन स्नेडन, इवान चॅटफिल्ड, विली वॉटसन, दीपक पटेल, जॉन ब्रेसवेल यांची यथेच्छ धुलाई करत न्यूझीलंडच्या तोंडाला फेस आणला. हौटन आणि इयन बुचार्टच्या ११४ रन्सच्या पार्टनरशीपमुळे अद्याप टेस्ट दर्जा न मिळालेला झिंबाब्वेचा संघ न्यूझीलंडला चकवणार असं वाटत असतानाच..
मार्टीन स्नेडनचा बॉल हौटनने मिडॉनवरुन उचलला आणि नक्कीच बाऊंड्री मिळणार या हिशेबाने हौटनच काय पण हैद्राबादच्या मैदानावर असलेले प्रेक्षकांच्या नजराही लाँगऑफच्या दिशेला वळल्या, परंतु मिडॉनला असलेल्या मार्टीन क्रोची नजर मात्रं पोपटाच्या डोळ्यावर नजर रोखलेल्या अर्जुनाप्रमाणे बॉलवर पक्की होती. बाऊंड्रीच्या दिशेत धावत जात आणि झेप घेत त्याने अफलातून कॅच घेतला! हौटन अवाक् झाला! न्यूझीलंडच्या खेळाडूंचाच काय पण खुद्दं मार्टीन क्रोचाही स्वत:वर विश्वास बसला नसावा! न्यूझीलंडने अवघ्या ३ रन्सनी ही मॅच जिंकली!
आजकालच्या इंटरनॅशनल मॅचेसच्या वेळापत्रकामुळे भारतीय संघातील खेळाडू फार क्वचितच रणजी किंवा दुलीप ट्रॉफीत खेळताना दिसतात. परंतु काही वर्षांपूर्वी मात्रं रणजीत खेळण्यासाठीही खेळाडू जीवाचं रान करीत असत. केवळ बिशनसिंग बेदीचे समकालीन असल्यामुळे पद्माकर शिवलकर आणि राजिंदर गोयलची करीअर रणजीपुरती मर्यादीत राहिली. अशीच एक अविस्मरणीय मॅच म्हणजे १९९१ मधली रणजी ट्रॉफीची फायनल! वानखेडेवर झालेल्या या मॅचचं दूरदर्शनच्या दुसर्या चॅनलवर लाईव्ह टेलीकास्ट झालं होतं. आजही या मॅचचा शेवटचा दिवस लख्ख आठवतो..
कपिल देवच्या हरीयाणाने पहिल्या इनिंग्जमध्ये ५२२ पर्यंत मजल मारल्यावर मुंबईला ४१० मध्ये गुंडाळल्याने पहिल्या इनिंग्जमधल्या लीडच्या जोरावर मॅच ड्रॉ झाली तरी हरीयाणा रणजी ट्रॉफी जिंकणार हे नक्की होतं. हरीयाणाच्या दुसर्या इनिंग्जमध्ये १५४ / ८ अशा अवस्थेत असताना प्रदीप जैन आणि योगिंदर भंडारी यांच्या सहाय्याने अभिषेक बॅनर्जीने मुंबईला तंगवत ८८ रन्सची भर घातली. शेवटी पाचव्या दिवशी लंचच्या आधी हरीयाणाची इनिंग्ज संपल्यावर रणजी ट्रॉफी जिंकण्यासाठी मुंबईला साडेचार तासात ३५५ रन्सची आवश्यकता होती!
लालचंद राजपूत, शिशीर हट्टंगडी आणि मुंबईचा कॅप्टन संजय मांजरेकर लवकर आऊट झाल्याने लंचला मुंबईची अवस्था ३४ / ३ अशी झाली होती. लंचनंतर दिलीप वेंगसरकरबरोबर खेळायला आला १८ वर्षांचा सचिन तेंडुलकर!
कपिलच्या पहिल्याच बॉलवर सचिनने सरळ सिक्स मारली आणि त्यानंतर तो शब्दशः उधळला! प्रदीप जैन, योगिंदर भंडारी, चेतन शर्मा आणि खुद्दं कपिल सर्वांची त्याने अक्षरश: धुलाई करायला सुरवात केली! सचिन 'सुटल्याची' बातमी मुंबईभर पसरली आणि हा-हा म्हणता वानखेडेवर १८००० प्रेक्षकांची हजेरी लागली! दुसर्या बाजूने वेंगसरकर कमालीच्या थंड डोक्याने स्ट्राईक रोटेट करत होता! कपिलने सर्व प्रयत्नं करुनही सचिनला आवरणं जमत नव्हतं! वेंगसरकरबरोबरच्या १३४ रन्सच्या पार्टनरशीपमध्ये ९६ रन्स एकट्या सचिनच्या होत्या! ७५ बॉलमध्ये ९६ रन्स झोडपल्यावर भंडारीचा फुलटॉस नेमका सचिनने कव्हरला अजय जाडेजाच्या हातात मारला!
सचिन परतल्यावर वेंगसरकर - कांबळी यांनी ८१ रन्सची पार्टनरशीप केली. एव्हाना वेंगसरकरला क्रॅम्प्सचा त्रास जाणवायला लागल्याने राजपूत रनर म्हणून आला पण त्याच्या फटकेबाजीत किंचीतही फरक पडला नाही. कपिलला त्याने दोन दणदणीत सिक्स मारल्यावर मुंबई मॅच जिंकण्याचा आकांती प्रयत्नं करणार हे स्पष्टं होतं. कांबळी, चंद्रकांत पंडीत, राजू कुलकर्णी, सलील अंकोला एकापाठोपाठ एक आऊट होऊन परतले तरी वेंगसरकर मैदानात असेपर्यंत कपिललाही विजयाची खात्री नव्हती. शेवटचा बॅट्समन अॅबी कुरुविला खेळायला आला तेव्हा तो ९८ वर होता. मॅच जिंकण्यासाठी मुंबईला अद्याप ५० रन्स हव्या होत्या! अद्याप ९ ओव्हर्स बाकी होत्या. शेवट्च्या ८ ओव्हर्ससाठी कपिल आणि चेतन शर्मा बॉलिंगला येणार हे चाणाक्षं वेंगसरकरच्या ध्यानात आलं होतं. परिणाम?
योगिंदर भंडारीवर त्याने अविस्मरणीय हल्ला चढवला! त्याच्या ओव्हरच्या दुसर्या बॉलवर त्याने साईटस्क्रीनवर सिक्स मारली. तिसर्या बॉलवर लेटकटची बाऊंड्री मारल्यावर चौथ्या आणि पाचव्या बॉलवर त्याने पुन्हा दोन सिक्स खेचल्या! शेवट्च्या बॉलवर एक रन काढून स्ट्राईक स्वतःकडे ठेवावा का सिक्स मारुन आणखीन रन्स कराव्या या द्विधा मनस्थितीत असताना भंडारीच्या शेवटच्या बॉलवर त्याने मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह तुफान वेगाने बाऊंड्रीपार गेला! भंडारीच्या त्या एका ओव्हरमध्ये २६ रन्स निघाल्या होत्या!
वेंगसरकरच्या या आतषबाजीला कुरुविलानेही तितकीच खमकेपणाने साथ देत कपिल - चेतन शर्माचे २५ बॉल खेळून काढले होते. रणजी ट्रॉफी जिंकण्यासाठी मुंबईला १५ बॉलमध्ये केवळ ३ रन्सची आवश्यकता होती!
कुरुविलाने चेतन शर्माचा बॉल फाईन लेगला खेळला. नॉनस्ट्रायकर एंडला असलेला राजपूत रन काढ्ण्याच्या हेतूने धावत सुटला. कुरुविलाचं अद्यापहॉ बॉलकडेच लक्षं होतं. राजपूत रन काढण्यासाठी येत असलेला पाहून भानावर आलेला कुरुविला धावत सुटला खरा पण एव्हाना उशीर झाला होता! फाईन लेगवरच्या अमरजीत केपीच्या थ्रोने कुरुविला रन आऊट झाला! कपिलच्या हरियाणाने केवळ २ रन्सनी रणजी ट्रॉफी जिंकली होती!
रणजी ट्रॉफी जिंकल्याच्या आनंदात कपिल आणि हरीयाणाचे इतर खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये परतले. कुरुविला, राजपूत आणि दोन्ही अंपायर्सही परतले, पण वेंगसरकर?
स्क्वेअरलेगला वेंगसरकर आपल्या दोन्ही गुडघ्यांवर कोसळला होता!
तो ओक्साबोक्षी रडत होता!
कोणत्याही शब्दांनी त्याचं सांत्वन होणं अशक्यं होतं!
प्रशांत देसाईने अखेर त्याची समजूत घालून ड्रेसिंग रुममध्ये आणलं पण वेंगसरकरला अश्रू आवरत नव्हते!
१३७ बॉल्समध्ये ९ बाऊंड्री आणि ५ सिक्ससह त्याने १३९ रन्स फटकावल्या होत्या, पण त्याच्या दृष्टीने त्या कवडीमोलाच्या होत्या! जीव तोडून प्रयत्नं करुनही रणजी ट्रॉफी जिंकण्यात अपयश आल्याने तो अक्षरशः उध्वस्तं झाला होता.
१९८६ मध्ये जावेद मियांदादने चेतन शर्माला शेवटच्या बॉलला सिक्स मारल्यावर भारताच्या दृष्टीने शारजा म्हणजे हारजा हे समीकरण झालं होतं. पाकिस्तानची टीम उत्तम असली तरी त्यांच्या मदतीला अंपायर्सही सदैव तत्पर असत! अनेकदा तर न्यूट्रल अंपायर्स असूनही भारताविरुद्ध आणि पाकिस्तानच्या बाजूने कित्येक निर्णय दिले जात. १९९१ मध्ये अशाच खराब अंपायरींगचा फायदा उठवत अकीब जावेदने हॅटट्रीकसह भारताविरुद्धंं ७ विकेट्स घेतल्या. त्याच्या हॅटट्रीकमधल्या शास्त्री, अझरुद्दीन, तेंडुलकर या तिघांपैकी अझरुद्दीन आणि तेंडुलकरला अंपायरने सरळसरळ 'ढापलं' होतं! अझरच्या बॅटची इनसाईड एज लागून बॉल पॅडला लागला होता तर सचिनला एलबीड्ब्ल्यू देणार बॉल चौथ्या स्टंपच्याही बाहेरुन गेला असता!
१९९१ च्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्यात ऑस्ट्रेलियाने टेस्ट सिरीज ४-० अशी जिंकली असली तरी या सिरीजमधली एक न विसरणारी आठवण म्हणजे सचिनची पर्थ टेस्टमधली सेंच्युरी! क्रेग मॅकडरमॉट, मर्व्ह ह्यूज, माईक व्हिटनी, पॉल रायफल, टॉम मूडी यांना फटकावत त्याने ११४ रन्स फटकावल्या पण तो भारताचा पराभव टाळू शकला नाही. ब्रिस्बेनच्या पहिल्या टेस्टमध्ये कपिलने ३ बॉलमध्ये अॅलन बॉर्डर आणि डीन जोन्सला बोल्ड करताना टाकलेले दोन अप्रतिम बॉल असेच स्पष्टपणे आठवतात. याच सिरीजमधल्या सिडनी टेस्टमध्ये रवी शास्त्री आणि सचिनने पहिल्याच टेस्टमध्ये खेळणार्या शेन वॉर्नची यथेच्छ धुलाई केली होती!
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिरीजनंतर १९९२ च्या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा प्रथम सामना झाला. या मॅचमधला एक अविस्मरणीय प्रसंग म्हणजे किरण मोरे आणि जावेद मियांदादची बाचाबाची आणि त्यानंतर जावेदने मोरेची नक्कल करत मारलेल्या बेडूकउड्या! याच वर्ल्डकपच्या लीग मॅचमध्ये इयन बोथमने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचे एकहाती बारा वाजवले होते! मार्टीन क्रोची दीपक पटेलला बॉलिंग आणि ग्रेटबॅचला बॅटींग ओपन करायला लावण्याची अफलातून चाल, फायनलमध्ये वासिम अक्रमने लागोपाठच्या बॉलवर अॅलन लॅम्ब आणि क्रिस लुईसची उडवलेली दांडी आणि सेमीफायनलला न्यूझीलंड संघाचं महिन्याभराचं कर्तृत्व कचर्यात भिरकावणारी इंझमामची इनिंग्ज सुद्धा न विसरण्यासारखी.
पण मोमेंट ऑफ द वर्ल्ड कप म्हणजे जाँटी र्होड्सने इंझमामला रन आऊट करताना बॉलसकट स्टंप्सवर मारलेली झडप! या एका रनआऊटमुळे जागतिक क्रिकेटमधला फिल्डींगचा दर्जा आरपार बदलून गेला! टोनी ग्रेगने र्होड्सबद्दल काढलेले "Two-thirds of the globe is covered by water; the rest is covered by Jonty Rhodes!" हे उद्गार किती सार्थ होते हे र्होड्सने सिद्धं करुन दाखवलं!
१९९३ मध्ये इंग्लंडचा संघ भारतीय दौर्यावर आला होता. गूच, आर्थर्टन, गॅटींग, स्ट्युअर्ट, रॉबिन स्मिथ असे एकापेक्षा एक बॅट्समन असल्याने आणि नुकताच ऑस्ट्रेलियात आणि वर्ल्डकपमध्ये भारत साफ अपेशी ठरल्यामुळे इंग्लंड सहज भारताला धूळ चारेल अशी बर्याच जणांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात अनिल कुंबळेच्या २१ विकेट्सनी इंग्लंडची अक्षरशः ससेहोलपट झाली. पण कुंबळे इंग्लंडला गुंडाळत असतानाही लक्षात राहण्यासारखा स्पेल टाकला तो मनोज प्रभाकरने. मुंबईच्या टेस्टमध्ये चार ओव्हर्समध्ये प्रभाकरने गूच, आर्थर्टन, स्ट्युअर्ट यांना अत्यंत डोकेबाजपणाने गंडवलं होतं! याच टेस्टमध्ये विनोद कांबळीने २२४ तर ग्रॅम हिकने १७८ रन्सची अप्रतिम इनिंग्ज खेळली होती.
शारजाचीच आणखीन एक आठवण सांगण्यासारखी आहे. १९९४ मध्ये पाकिस्तानच्या २५० रन्सचा पाठलाग करताना सचिन, अजय जाडेजा, सिद्धू आणि अझर आऊट झाल्यावर भारताची अवस्था ८३ / ४ अशी होती. स्टेडीयममध्ये असलेल्या पाकिस्तानी सपोर्टर्सचा आवाज टीपेला पोहोचला होता. विनोद कांबळीला रन्स काढताना अक्षरशः घाम गाळावा लागत होता. मात्रं काही मिनीटांतच शारजाच्या मैदानावर अक्षरशः पिनड्रॉप सायलेन्स पसरला. याला कारण होता अतुल बेदाडे! अक्रम रझा - आमिर सोहेल यांना दोन ओव्हर्समध्ये चार सिक्स ठोकत त्याने अचानक फ्यूज उडाल्यासारखा पाकिस्तानी सपोर्टर्सचा आवाज बंद करुन टाकला!
वन डे क्रिकेटमध्ये आज फिनीशर ही खास आवश्यकता मानली जाते. स्लॉग ओव्हर्समध्ये फटकेबाजी करुन रन्स वाढवणं आणि सुरवातीला विकेट्स गेल्या तर इनिंग्ज बिल्ड करणं ही फिनीशरची जबाबदारी. महेंद्रसिंग धोणी, एबी डिव्हीलीअर्स, माईक हसी हे यातले वाकबगार लोक. पण फिनीशर ही संस्था अस्तित्वात आणली ती ऑस्ट्रेलियाच्या मायकेल बेव्हनने! कमालीच्या थंड डोक्याने आणि सुरवातीच्या विकेट्स गेल्यावर बॉलर्सना हाताशी धरुन बेव्हनने ऑस्ट्रेलियाला किती मॅचेस जिंकून दिल्या असतील याची गणतीच नाही!
अशीच एक मॅच १९९६ च्या ट्रँग्युलर सिरीजमधली वेस्ट इंडीज विरुद्धची. फिनीशर म्हणून या मॅचपासूनच बेव्हनला जगभरात मान्यता मिळाली. वेस्ट इंडीजच्या १७२ रन्सचं लक्ष्यं समोर असताना कर्टली अँब्रोज आणि ओटीस गिब्सन यांनी ऑस्ट्रेलियाची अवस्था ३८ / ६ अशी करुन टाकली. रॉजर हार्परने इयन हिलीची दांडी उडवल्यावर बेव्हनने पॉल रायफलसह ८३ रन्सची पार्टनरशीप केली. मॅचच्या शेवटच्या बॉलवर जिंकायला ४ रन्स हव्या असताना थंड डोक्याने बाऊंड्री मारत बेव्हनने मॅच जिंकली!
१९९६ च्या वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये अँब्रोज आणि इयन बिशप यांनी ऑस्ट्रेलियाची अवस्था १५ / ४ अशी केलेली असताना बेव्हननेच स्ट्युअर्ट लॉ बरोबर १३८ रन्सची पार्टनरशीप करुन ऑस्ट्रेलियाला २०७ पर्यंत पोहोचवलं होतं. रिची रिचर्ड्सन आणि शिवनारायण चँडरपॉल यांनी आरामात खेळत वेस्ट इंडीजला १६५ / २ अशा सुस्थितीत आणलं होतं, परंतु ग्लेन मॅकग्राथने चँडरपॉलला चकवल्यावर वॉर्न आणि डॅमियन फ्लेमिंगने वेस्ट इंडीजला २०२ मध्ये गुंडाळलं! रिची रिचर्ड्सन एका बाजूला नॉट आऊट राहीला पण तो वेस्ट इंडीजला फायनलमध्ये नेऊ शकला नाही! याच वर्ल्डकपमध्ये केनियाविरुद्धची मॅच अपमानास्पद रितीने हारल्यावर ग्रूपमधल्या आपल्या पाचही मॅचेस आरामात जिंकणार्या दक्षिण आफ्रीकेचं ब्रायन लाराने क्वार्टरफायनलमध्ये साफ वाटोळं केलं होतं!
पण १९९६ च्या वर्ल्डकपमधली खास आठवण म्हणजे बँगलोरला झालेली भारत - पाकिस्तान मॅच!
अजय जाडेजाने वकार युनुसची केलेली अभूतपूर्व धुलाई आणि प्रत्येक बॉलला उत्साहाने सुरु असलेली टोनी ग्रेगची कॉमेंट्री आजही कोणी विसरलं असेल असं वाटत नाही. Waqar Younus is being slaughtered आणि त्यापेक्षाही Kumble is playing a blinder (उच्चार कुंबली!) असं बापजन्मात कोणाच्या स्वप्नातही येऊ न शकणारं वक्तव्यं तोच करु जाणे. परंतु यापेक्षाही मोमेंट ऑफ द मॅच म्हणजे...
वेंकटेश प्रसादने आमिर सोहेलचा उखडलेला ऑफ स्टंप!
आणि
"Fuck off" असा खास शब्दांत दिलेला सेंड ऑफ!
रवी शास्त्रीच्या क्रिकेट करीअरमधल्या कोणत्याही शॉटपेक्षा कॉमेंट्री बॉक्समध्ये इतका वेळ सोहेलवर स्तुतीसुमनं उधळणार्या इमरान खानला रवी शास्त्रीने Thats the best way you can answer a batsman! हे सुनावताना साधलेलं टायमिंग अचूक होतं! या एका विकेटने वेंकटेश प्रसाद भारतीय प्रेक्षकांच्या दृष्टीने अजरामर झाला! जन्मभरात त्याने इतर काहीही केलं नसतं तरी कोणी त्याला एका शब्दाने विचारलं नसतं!
१९९६ च्याच इंग्लिश मोसमातली आठवणारी एक मॅच म्हणजे बेन्सन अॅन्ड हेजेस कपमधली लँकेशायर विरुद्ध यॉर्कशायर ही सेमीफायनल! भारतात मुंबई विरुद्ध दिल्ली आणि ऑस्ट्रेलियात न्यू साऊथ वेल्स विरुद्ध व्हिक्टोरीया यांच्या तोडीस तोड पुरानी दुष्मनी म्हणजे लँकेशायर विरुद्ध यॉर्कशायर! ईएसपीएन किंवा स्टार स्पोर्ट्सच्या कृपेने ही मॅच पाहण्यास मिळाली होती. यॉर्कशायरने ४६ ओव्हर्समध्ये १९८ रन्स काढल्यावर पाऊस आला, पण या मॅचचं वैशिष्ट्यं म्हणजे वन डे असूनही यात रिझर्व्ह डे ची सोय होती! दुसर्या दिवशी ४ ओव्हर्समध्ये बेव्हन (९५*) आणि रिचर्ड ब्लॅकी (८०*) यांनी ५२ रन्स झोडपत यॉर्कशायरला २५० पर्यंत पोहोचवलं! लँकेशायरची अवस्था ९७ / ५ अशी झाली होती, पण बेव्हनच्या आधी वन डे स्पेशालिस्ट म्हणून नावाजला गेलेला नील फेअरब्रदर आणि विकेटकीपर वॉरन हेग यांनी ६२ रन्सची पार्टनरशीप करत मॅच फिरवली. फेअरब्रदर (५९) परतल्यावरही हेगने गॅरी येट्सबरोबर ६६ रन्स फटकावल्या! शेवटच्या बॉलवर पीटर मार्टीनने एक रन काढत लँकेशायरला मॅच जिंकून दिली! वॉरन हेगची ती ८१ रन्सची इनिंग्ज अविस्मरणीयच!
१९९७ मध्ये कलकत्त्याच्या ईडन गार्डन्सवर अझरने दक्षिण आफ्रीकेची, खासकरुन लान्स क्लूसनरची केलेली धुलाई अशीच कायमची मनावर कोरली गेली आहे. ७७ बॉलमध्ये १०९ रन्स झोडपताना लंचनंतर एकाच ओव्हरमध्ये क्लूसनरला ५ बाऊंड्री तडकावतानाचा त्याच्या बेदरकारपणा निव्वळ लाजवाब!
१९९७ मध्ये केपटाऊनला ५८ / ५ अशी अवस्था झालेली असताना सचिन (१६९) आणि अझर (११५) यांनी जेमतेम ३ तासांत २२२ रन्स कुटल्या! अझरने त्याचं गिर्हाईक असलेल्या क्लूसनरला तर सचिनने अॅलन डोनाल्डला पद्धतशीरपणे धुतलं होतं! याच सिरीजमध्ये डोनाल्डला द्रविडने सिक्स मारल्यावर आणि डोनाल्डने त्याला मनसोक्तं शिव्या घातल्यावर पुढच्याच बॉलला द्रविडने पुन्हा बाऊंड्री तडकावल्यावर रागाने धुमसणारा डोनाल्डही विसरणं अशक्यंच!
१९९७ मध्येच कराचीच्या नॅशनल स्टेडीयमवर राजेश चौहानने सकलेनला मारलेली सिक्स ही आणखीन एक अविस्मरणीय आठवण! जेमतेम वर्षभराने पुन्हा सकलेनलाच हृषिकेश कानेटकरने शेवटच्या ओव्हरमध्ये मारलेली बाऊंड्री अशीच कायम लक्षात राहणारी! वन डे मधला तो वर्ल्ड रेकॉर्ड चेस होता आणि तो सुद्धा ४८ व्या ओव्हरमध्ये!
१९९८ मध्ये दक्षिण आफ्रीकेचा संघ इंग्लंडच्या दौर्यावर आलेला असताना माईक आर्थर्टन आणि अॅलन डोनाल्ड यांची नॉटींगहॅमशायरच्या ट्रेंट ब्रिज मैदानात रंगलेली अशीच एक अफलातून जुगलबंदी आठवते. आर्थर्टनच्या ग्लव्ह्जला बॉल लागूनही अंपायरने नॉटआऊट दिल्यावर आणि त्याच्या चेहर्यावरचे मिस्किल भाव पाहून भडकलेल्या डोनाल्डने टाकलेला तो स्पेल आजही अंगावर काटा आणतो! कर्टली अँब्रोजने इंग्लंडची अनेकदा वाताहात केलेली मी पाहिली आहे, पण डोनाल्डचा तो स्पेल निव्वळ खतरनाक होता!
परंतु १९९८ मधली आणि खरंतर आतापर्यंतच्या पाहिलेल्या अगणित मॅचेसमधली मनावर कोरली गेलेली सर्वोत्कृष्टं आठवण म्हणजे सचिनने शारजात लागोपाठच्या मॅचेसमध्ये केलेली ऑस्ट्रेलियाची अभूतपूर्व धुलाई!
डेझर्ट स्टॉर्म!
शेन वॉर्नला स्वप्नातही भिती घालणार्या आणि स्टीव्ह वॉला "We did not loose to team India, we lost to Sachin Tendulkar!" अशा शब्दांत पराभव मान्य करायला लावणार्या या दोन सेंच्युरीबद्द्ल जितकं बोलावं तितकं कमी आहे. अशा वेळेस कॉमेंट्रीबॉक्समध्ये टोनी ग्रेगच हवा! शारजात तो होता आणि या दोन इनिंग्जच्या दरम्यान त्याची कॉमेंट्री सचिनच्या बॅटींग इतकीच तुफान होती!
"When it gets tough, the tough gets going and Tendulkar has set himself to get a hundred!"
"Sachin Tendulkar has taken it to Australians and Indians are through to final!"
"This little man is nearest thing to Bradman!"
"Oh its a six! What a player! What a wonderful player!"
"The little man has hit big fellow for Six! He is half his size!"
१९९९ मध्ये मद्रासला पाकिस्तानविरुद्ध चौथ्या इनिंग्जमध्ये सचिनची सेंच्युरी ही अशीच एक भळभळणारी जखम! दिल्लीच्या पुढच्या टेस्टमध्ये कुंबळेने इनिंग्जमध्ये १० विकेट्स घेऊन जिम लेकरची बरोबरी केली असली तरी कायम चुटपूट लावून जाते ती सचिनच्या सेंच्युरीनंतरही भारताने हातात असूनही गमावलेली मद्रासची ही टेस्ट!
पाकिस्तान विरुद्धच्या सिरीजच्या आधी ऑस्ट्रेलियन संघ भारतात आलेला असताना सचिन विरुद्ध वॉर्न ही रंगलेली जुगलबंदी आणि सचिनने केलेली वॉर्नची धुलाई अशीच अविस्मरणीय! पहिल्या टेस्टच्या आधीच मुंबईकडून खेळताना सचिनने वॉर्नला फटकावत २०० रन्स झोडपल्या होत्या, पण टेस्ट मॅचेसमध्ये वॉर्नला पहिला डोस दिला तो सिद्धूपाजींनी! वॉर्नला सिद्धूचा हा हल्ला इतका अनपेक्षित होता की तो शेवटपर्यंत त्यातून सावरला नाही. याच सिरीजमध्ये सिद्धूबरोबर ओपनिंगला आलेल्या व्हीव्हीएस लक्ष्मणने ९५ रन्स फटकावत पुढे येणार्या संकटाची ऑस्ट्रेलियाला वॉर्निंग दिली होती!
२००१ मध्ये ईडन गार्डन्सला राहुल द्रविडसह लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाची दादागिरी संपवली आणि भारतीय क्रिकेटने एका नव्या युगात प्रवेश केला!
गेल्या तीसेक वर्षांत क्रिकेट पाहत असतानाच्या या काही आठवणी. २००१ नंतर गेल्या पंधरा वर्षातल्या आणि आधीच्याही कित्येक आठवणी यात आलेल्या नाहीत. १९९९ च्या वर्ल्डकपमध्ये दादा गांगुली आणि द्रविड यांनी टाँटनला श्रीलंकेची केलेली धुलाई आणि रचलेली ३१८ रन्सची पार्टनरशीप, ब्रायन लाराने ऑस्ट्रेलियात फटकावलेली २७७ रन्सची इनिंग्ज, अँब्रोजने १ रन मध्ये घेतलेल्या ७ विकेट्स, डेव्हन माल्कमचा दक्षिण आफ्रीकेविरुद्धचा खतरनाक स्पेल, वॉरीकशायरकडून खेळताना शॉन पोलॉकने लेस्टरशायरविरुद्ध ४ बॉलमध्ये घेतलेल्या ४ विकेट्स, थर्ड अंपायरने रन आऊट दिलेला पहिला बॅट्समन सचिन अशा कितीतरी आठवणी... आठवाव्या तेव्हढ्या थोड्याच!
- क्रिकेटमधील स्लेजिंगचे किस्से
- ब्रायन क्लोज - द मॅन ऑफ स्टील!
- टॉम ग्रेव्हनी - महा 'हलकट' माणूस!
- क्रिकेट मधली घराणेशाही!
- चंद्रास्तं! - शिवनारायण चँडरपॉल निवृत्त!
- It's a Tie !!
- फॉलोऑन आणि नंतर..
Book traversal links for आठवणी दाटतात: किस्से क्रिकेटचे
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
+१
टोनी मॅन
नसीम-अल-घनी
जबरी आठवणी ! ९१ मधली कर्नलची
त्याला कर्नल का म्हणायचे?
सी के नायडूंशी साम्य होते
ओह ओके. थँक्स. मला वाटलं
दिनांक - ३० ऑगस्ट १९७९
डेव्हीड बेअरस्टो
याच डेव्हिड बेअरस्टोने १९९८
क्या बात है !!
तो सामना हृषिकेश कानिटकरने
तरीही तो सामना लक्षात आहे,
त्यावेळेस अंधुक प्रकाशामुळे
http://www.espncricinfo.com
लॉर्डसवरील १९७४ चा सामना का?
नाही नाही. हा तो सामना नाही.
रडीचा डाव
अरे वा!!
मला आठवतंय हे मॅगझीन... संदीप
अष्टपैलू हेही होतं ....
हो हो. एकच षट्कार.. लुप्त
१९८३ चा विश्वचषक भारताने
अष्टपैलू
अक्षर प्रकाशनाने एकच षट्कार
पॅट सिमकॉक्स
१९९७ मधल्या वेस्ट इंडिज
कर्नल...
मस्त धागा! आणि सुंदर किस्से.
खेळीयाड
एक वेगळा किस्सा.
खरे दर्दी आहात गुरुजी
मज्जा आणि हेवा वाटतो
_/\_
@ गुरुजी
१९९२ विश्वचषकादरम्यान अफवा
हो अशी अफवा पसरली होती.