लेडी सीमोर- कुंती, द्रौपदी आणि सीता
लेडी सीमोर वर्सली या १८व्या शतकातील इंग्लंडच्या नैतिकतेच्या कल्पनांची धूळदाण उडवणाऱ्या बाईबद्दल ऐकून तिला तसंच विसरून जाणं कठीण आहे. तिच्यावरचा अख्खा बीबीसी २ चा 'द स्कँडलस लेडी डब्ल्यू' हा एपिसोड पाहून तर लिहिल्याशिवाय राहवणारच नव्हतं. ज्या काळात स्त्रीला तिच्या नवऱ्याच्या मालकीची वस्तू समजलं जायचं, तिची संपत्ती लग्नानंतर पूर्णपणे तिच्या नवऱ्याच्या ताब्यात जायची,आणि तिला स्वतःची बाजू मांडायलाही मज्जाव होता, त्या काळात प्रचंड बदनामी पत्करून आपल्या नवऱ्याने प्रियकरावर चालवलेल्या खटल्यात संपूर्ण निकाल फिरवून दाखवून त्या बदनामीसहित ताठ मानेने जगणारी ही व्यक्ती खरंच होऊन गेली यावर विश्वासच बसत नाही. पण विचार केला, तर स्त्री आणि स्त्रीचा पायदळी तुडवला गेलेला सन्मान यांचे अविश्वसनीय संदर्भ द्यायला आपल्या जनमानसात रुजलेल्या कथा तरी कुठे कमी आहेत? कुंती, द्रौपदी, आणि सीता या आपल्या अग्निशिखांचे नशीब घेऊन त्याचा वणवा करणाऱ्या या मनस्विनीबद्दल लिहिणे म्हणूनच क्रमप्राप्तच होते.
लेडी सीमोर फ्लेमिंग या प्रचंड श्रीमंत सौंदर्यवतीने तिच्या प्रतिष्ठेला साजेशा रिचर्ड वोर्सलीशी लग्न केले आणि तिचं माणूस असणं संपलं. ती आता नवऱ्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यास बांधील असलेली एक वस्तू होती. आणि तिच्या नवऱ्याच्या इच्छांसाठी तिने जे केलं, ते आजच्या काळातपण अंगावर शहारे आणेल. रिचर्ड हा ‘voyeur’ होता. तिला अन्य पुरुषांशी प्रणय करताना दाराच्या छिद्रातून बघणे ही त्याची अपेक्षा होती. आणि त्याने तिला यासाठी अक्षरश: वापरले. नवऱ्याचा आदेश पाळणे हे तिचे कर्तव्य समजले जात असल्याने तिने ही गोष्ट सहन केली. नवऱ्याच्या इच्छेने आपले शरीर इच्छेविरुद्ध दुसऱ्याला समर्पित करणारी कुंती इथे मला दिसली.
या कुंतीची द्रौपदी झाली, ती रिचर्डचा जिवलग मित्र, कॅप्टन बिसेट आल्यावर. आतापर्यंत ती कोणत्याही मित्राला वापरू देण्याची वस्तू होती. पण बिसेटच्या ती खरीखुरी प्रेमात पडली होती. त्यांच्या बहरलेल्या प्रणयाने रिचर्डला अजून विकृत आनंद मिळत असल्याने त्याची ना असायला हरकतच नव्हती. आता ती दोन जिवलग मित्रांची ‘पतिव्रता’ झाली. एक लग्नात तिला जिंकून घेणारा ‘मालक’ आणि दुसरा, ज्याच्यावर तिचं प्रेम होतं. पण प्रेम म्हणजे शरीरापलीकडे जे काही असतं त्याचे तरंग आता सीमोरच्या आसुसलेल्या अंतरंगात उमटायला लागले होते. या आयुष्याचा तिला मनस्वी कंटाळा आला होता. बिसेटसोबत, तिच्या खऱ्या प्रेमासोबत त्याच्यापासून झालेल्या मुलीला घेऊन तिला संसार थाटायचा होता. हे लोढणं गळ्यात घेण्याचं बिसेटने कुठच्या नशेच्या क्षणी ठरवलं काय माहीत, पण त्या दोघांनी पळून जाण्याचं धाडस केलं. कदाचित सीमोरला वाटलं असेल की रिचर्डची या सगळ्यालाच संमती असल्याने तो तिला सहज घटस्फोट देईल. पण इतक्या पुरुषांना ओळखूनही तिला पुरुषी अहंकार काय चीज असते त्याची ओळख व्हायची होती.
ते दोघं पळून गेले आहेत हे कळल्यावर रिचर्डने थयथयाट केला. सीमोर आणि बिसेट यांच्या प्रेमाला तो मान्यता देत होता तो त्याच्या आनंदासाठी, तिच्या नव्हे हे ते दोघंही विसरून गेले होते. रिचर्ड हे राजकारणातील बडं धेंड होतं. त्याची नाचक्की त्याला कदापि सहन झाली नसती. त्याने बिसेटवर कोर्टात केस टाकली, आणि त्याच्या मालकीची बायको पळवल्याबद्दल त्याच्यावर तब्बल २०००० पाऊंडचा दावा ठोकला. आता बिसेट हबकला. हे असं काही त्याला अपेक्षितच नव्हतं. एवढी मोठी नुकसानभरपाई देऊन तो रस्त्यावर आला असता. लग्नबाह्य संबंधाबद्दलचे कायदे बघता तो सरळ सरळ दोषी होता. आणि इथे उभी राहिली ती अग्निदिव्याची तयारी असणारी सीमोरमधली सीता. तिला कोर्टात जाऊन साक्ष देणं शक्य नव्हतं. म्हणून तिने तिला ज्यांच्यासोबत शय्यासोबत करायला रिचर्डने भाग पाडलं होतं त्या लोकांना कोर्टात उभं केलं. बिसेटला वाचवण्यासाठी तिने आपली अब्रू पणाला लावली. इतका रसभरीत विषय मिळाल्यावर त्याचं चर्वितचर्वण होणारच. या केसची अनेक वर्णनं, त्यावरची व्यंगचित्रं अतिशय प्रसिद्ध झाली. सीमोरच्या आयुष्यात एकूण २७ पुरुष होते अशी वर्णनं इंग्लंडमधे प्रसिद्ध झाली. इतका वणवा पेटवलेल्या सीमोरने शेवटी निर्णय फिरवला. गुन्ह्यात जर आरोपीला दावेदाराची साथ असेल, तर गुन्ह्याची तीव्रता कमी होते. त्यामुळे केसचा निर्णय लागला तेव्हा कोर्टाने नुकसानभरपाई म्हणून बिसेटने रिचर्डला १ शिलिंग एवढी रक्कम द्यावी असा निर्णय दिला. जिला जवळपास वेश्येसारखं वागवलं गेलं, तिने स्वतःचा उलटा लिलाव करून स्वतःची किंमत २०००० पाऊंडवरून १ शिलिंग करवून घेतली.
प्रचंड नाचक्की सहन केली सीमोरने, तिच्या प्रियकरासाठी, एक सामान्य आयुष्य जगण्यासाठी. पण जगात धोब्याच्या शब्दावरूनपण स्त्रीला टाकता येतं, इथे तर सगळ्या जगासमोर तिने चारित्र्याच्या कल्पनांचे बुरखे टराटरा फाडले होते. त्या बिसेटने तिला काही काळातच सोडून दिलं. त्यानंतर तिने वाईट परिस्थितीत दिवस काढले. अजून सूड पूर्ण न झालेल्या रिचर्डने तिला घटस्फोट दिलाच नव्हता. त्यासाठी त्याने तिला फ्रान्सला ४ वर्षे जाण्याची अट घातली. सीमोर फ्रान्सवरून परत आली आणि रिचर्डचा मृत्यू झाला. तिला विधवा म्हणून तिच्याच राहिलेल्या हुंड्यामधली शिल्लक मिळाली.
सीमोरने आयुष्यभर शारीरिक आणि मानसिक प्रचंड त्रास सहन केला. पण तिच्या लग्नाच्या भयाण वास्तवातून बाहेर पडल्यावर तिने जगाला काही किंमतच दिली नाही असं दिसतं. हुंड्याची रक्कम मिळाल्यावर रॉयल लायसन्सने तिने आपलं लग्नापूर्वीचं आडनाव परत मिळवलं आणि स्वतःपेक्षा दोन दशकांनी लहान असणाऱ्या एका संगीतकाराशी लग्न केलं. तिच्या या नवऱ्याने लग्नानंतर तिचं आडनाव घेतलं होतं..
सीमोरची कथा हादरवून टाकते. ही घटना घडून दीड शतकपण लोटलं नाहीये, हे अजून हादरवून टाकतं. जे रामायण-महाभारतातले संदर्भ माझ्या भारतीय मनात पक्कं मूळ धरून होते, त्यांना गदागदा हलवते सीमोर. कुंती काय, द्रौपदी काय, सीता काय, समाजाने ठरवून दिलेल्या नियमांसाठी आपला आत्मसन्मान गिळाव्या लागलेल्या स्त्रिया. त्यांच्या, आणि असमानतेच्या इतिहासातील अनेक व्यथांना चव्हाट्यावर आणणारी सीमोर कधीच विसरली जाणार नाही.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
सिमोर ची कहाणी अत्यंत र्
त्यातही काही अगदी "टीप्पीकल
लेडी सीमोरची कर्मकहाणी वाचून
१००!!
लेडी सीमूर आणि इंग्लंडमधली पत्नीविक्री