इंदिराजी

जॉनी's picture
जॉनी in जनातलं, मनातलं
19 Nov 2016 - 11:12 pm

'गत हजार सालोंका युद्ध हमने जित लिया है.'

माजी पंतप्रधान इंदिराजी यांचा आज जन्मदिवस. यानिमित्तानं त्यांच्या कारकीर्दीबद्दल थोडंसं...

कित्येक वर्षं नेहरूंची मुलगी यापेक्षा वेगळं स्थान नव्हतंच इंदिराजींचं. गुंगी गुडीया वगैरे म्हणायचे त्यांना. आणि बरंच तथ्य पण होतं त्यात. केरळ सरकार खाली खेचणं सोडलं तर अत्यंत साधारण असाच कार्यकाळ राहिला होता त्यांचा. झंझावाती कारकिर्दीला सुरवात झाली 70-71 साली.

जानेवारी 1971 मध्ये आपलं जम्मू ते श्रीनगर विमान हायजॅक करून लाहोर ला उतरवण्यात आलं आणि अतिरेक्यांनी काही मागण्या केल्या. इंदिराजींनी ठाम भूमिका घेऊन दहशतवादासमोर झुकण्यास ठाम नकार दिला. अतिरेक्यांना प्रवाश्यांना सोडावं लागलं पण त्यांनी विमान पेटवून दिलं. तरी इंदिराजींनी पाकिस्तानी विमानांना आपल्या आकाशात बंदी घातलीच. हे काही पहिले पहिले प्रसंग होते.

पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान मधला बराचसा अनागोंदी कारभार भारताला डोकेदुखी ठरत होता. इंदिराजींनी या प्रश्नाचा काय तो निकाल लावायचाच असं ठरवलं होतं. यात लक्ष घालायला सुरवात केल्यावर त्यांना लवकरच लक्षात आलं की हा प्रश्न काही चर्चातून सुटणारा नाही. त्यांनी याबाबतीत वातावरण निर्मिती करायला सुरुवात केलीच होती. अनेक देशाना भेटी देऊन पाकिस्तान प्रश्न, भारताची बाजू आणि भूमिका याबद्दल माहिती देऊन आंतरराष्ट्रीय राजकारणात आपली बाजू भक्कम करून ठेवण्यात आली. दुसऱ्या बाजूला लष्कराला तयारी करण्याची सूचना देऊन ठेवलीच होती. 3 डिसेंबर 1971 रोजी भारताच्या हवाई हद्दीचा भंग करून पाक विमानांनी अमृतसर, अंबाला आणि इतर ठिकाणी बॉम्बिंग केलं आणि युद्धाला सुरवात केली. पूर्व पाकिस्तान मधून निर्वासितांचे लोंढे भारतात येत होते. त्यातल्याच तरुण मुलांना ट्रेनिंग देऊन 'बांगलादेश मुक्ती वाहिनी' तयार केली. अश्या सगळ्या पार्श्वभूमीवर, भारतीय लष्कराला आदेश दिले की पाकिस्तानात शिरा. तेरा दिवस! तेरा दिवसात पाकिस्तान ला पाणी पाजून भारतीय सेना विजयी झाली आणि नवा बांगलादेश जन्माला आला. ही भारताच्या इतिहासातील सर्व बाजूंनी तयारी करून योग्य संधीची वाट पाहून खेळलेली एकमेव खेळी. जिंकल्याची वार्ता मंत्रिमंडळाला सांगताना इंदिराजी म्हणतात, "गत हजार सालोंका युद्ध हमने जित लिया है".

आपल्या मंत्रिमंडळातून इंदिराजींनी सिंडिकेट ग्रुप ला तर काढून फेकलंच होतं. परत त्यांना कुणी गुंगी गुडीया बोललं नसेल. गुजरात आणि बिहार मध्ये भ्रष्टाचारविरोधी विद्यार्थी आंदोलन सुरू असताना भ्रष्टाचाराला पाठिंबा असल्यासारखी काही विधानं त्यांच्याकडून झाली आणि इथे निगेटिव्ह इम्पॅक्ट पडायला सुरुवात झाली. राजनारायण यांनी दाखल केलेल्या खटल्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल आला आणि इंदिराजींवर 6 वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घातली गेली. ही बंदी पण झुगारून राजीनामा न देता इंदिराजींनी 25 जून 1975 रोजी आणीबाणी जाहीर केली आणि सुरु झाला भारताच्या इतिहासातील काळं पर्व. एकछत्री अंमल, कडक सेन्सॉरशिप इत्यादी. याच कालावधीत देशातल्या लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले.

1977 साली इंदिराजींनी पुन्हा निवडणुका जाहीर झाल्या आणि 30 वर्षात प्रथमच केंद्रात काँग्रेस ची सत्ता गेली. जनता पार्टी ला लोकांनी प्रचंड प्रमाणात मतदान केलं. याच जनता पक्षाच्या अंतर्गत कलहामुळे इंदिराजी 1980 साली पुन्हा निवडून आल्या. 'गरिबी हटाव' च्या मुद्द्यावर त्या पुन्हा पंतप्रधान झाल्या.

काही दिवसातच पुन्हा एका काळ्या पर्वाला त्यांना सामोरं जावं लागलं. ते म्हणजे ऑपरेशन ब्लु स्टार. सुवर्ण मंदिरात लपून बसलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कराला हेव्ही आर्टिलरी चा वापर करावा लागला आणि पवित्र सुवर्णमंदिरात रणगाडे घुसवल्याने शिखांच्या भावना दुखावल्या गेल्या. याचिच परिणीती दंगलींमध्ये झाली.

फेब्रुवारी 1984 मध्ये, ज्यांच्या नावावरून पुण्यात पूल आहे, ते लंडन मधील भारतीय अधिकारी रवींद्र म्हात्रे यांचं 'जम्मू काश्मीर लिब्रेशन फ्रंट' च्या अतिरेक्यांनी अपहरण केलं आणि मकबूल भट या त्यांच्या म्होरक्याला सोडण्याची मागणी केली. इंदिराजींची भूमिका तीच, दहशतवादासमोर झुकणार नाही. दोन दिवसात रवींद्र म्हात्रे यांचं टॉर्चर केलेलं प्रेत सापडल्याची बातमी भारतात आली, आणि 4 दिवसात स्पेशल ऑर्डर काढून इंदिराजींनी मकबूल भट ला फासावर लटकावला!

31 ऑक्टोबर 1984 ला याच ऑपरेशन ब्लु स्टार चा रोष मनात ठेवून इंदिराजींची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या करण्यात आली आणि एक झंझावात अखेर थंड झाला.

देशांतर

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

20 Nov 2016 - 6:06 pm | जव्हेरगंज

धावता आढावा छान जमलाय.
अजून विस्तृत लिहावे.

जॉनी's picture

20 Nov 2016 - 8:17 pm | जॉनी

धन्यवाद _/\_
इंदिराजींच्या कारकिर्दीतील ठळक गोष्टीच लिहिल्या आहेत फक्त. बाकी त्यांची कामगिरी खूप मोठी आहे.
:)

पंतप्रधान या मालिकेच्या ७,८,९,१०,११,१२ या भागामध्येसुद्धा इंदिरा गांधी यांचा कार्यकाल वर्णन आहे.पण आणीबाणी च्या काळातील व कलम बदलांविषयी फारच कमी माहिती.

सर टोबी's picture

20 Nov 2016 - 7:48 pm | सर टोबी

इंदिराजींच्या कार्याची हि थोडक्यात जंत्री:

१. बँकांचे राष्ट्रीयीकरण: या मूळे छोटे उद्योग आणि सर्व सामान्य जनता यांना पतपुरवठा होऊन रोजगाराची निर्मिती होण्यास मदत झाली.
२. हरितक्रांती: धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्न्न तोड नाही. अन्नधान्याचे रेशनिंग ज्यांनी अनुभवले आहे त्यांना याचे महत्व वाटल्या शिवाय राहणार नाही.
३. अणु ऊर्जा आणि अवकाश संशोधन: आज आश्चर्य वाटेल परंतु आपल्या सारख्या गरीब देशाला या गोष्टींची काय गरज आहे असे त्या काळीं विरोधी पक्ष आणि काही लोक देखील विचारात असत. आज आपण त्या गोष्टींचे फायदे अनुभवत आहोत.
४. अणु स्फोट: हे तंत्र देशात विकसित करून त्यांनी एक प्रकारचा दरारा आणि आदर निर्माण केला.
५. सुंस्थानिकांचे भत्ते रद्द करणे: देशाच्या तिजोरी वरील मोठा भर त्यांनी हलका केला.
६. स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन: या मूळे अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार मिळाला.
७. रशिया बरोबर मैत्री संबंध: आज जेंव्हा आपली सर्व शेजारी राष्ट्रांकडून कोंडी होत आहे तेंव्हा रशिया सारखा मित्र असण्याची गरज समजते. भारत पाक युद्धात जरब बसविणे, भारता बरोबर रुपया वापरून आयात निर्यात करणे, क्रायोजेनिक तंत्रज्ञान भारता बरोबर शेअर करणे असे अनेक पदर होते या मैत्रीचे.

जॉनी's picture

20 Nov 2016 - 8:02 pm | जॉनी

मस्त सर

गॅरी ट्रुमन's picture

21 Nov 2016 - 12:00 pm | गॅरी ट्रुमन

इतर मुद्द्यांविषयी नंतर लिहितो. पण आताच---

सुंस्थानिकांचे भत्ते रद्द करणे: देशाच्या तिजोरी वरील मोठा भर त्यांनी हलका केला.

मला वाटते की संस्थानिकांचे भत्ते रद्द करणे हा थोडासा पॉप्युलिझमचा आणि राजकारणाचा भाग होता. पॉप्युलिझमचा का? कारण इंदिराजींनी स्वतःला गरीबांची मसिहा/तारणहार म्हणून लोकांपुढे आणले होते.बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि संस्थानिकांचे भत्ते रद्द करणे हे दोन निर्णय त्याचा एक भाग होते. बँकांच्या राष्ट्रीयीकरणाविषयी माझ्याच मिपावरील दुसर्‍या जन्मातून लिहितो.संस्थानिकांचे भत्ते रद्द करून आपण राजेरजवाड्यांच्या (पक्षी श्रीमंतांच्या) विरोधात आहोत हे दाखवायची उत्तम संधी इंदिरा गांधींकडे होती.हा झाला पॉप्युलिझमचा भाग. यात आणखी राजकारण कुठे आले? तर बरेच संस्थानिक विरोधी स्वतंत्र पक्षात सामील झाले होते. स्वतंत्र पक्ष १९६० च्या दशकात काँग्रेसला एक समर्थ पर्याय म्हणून पुढे येत होता. १९६७ मध्ये स्वतंत्र पक्षाने लोकसभेत ४४ म्हणजे जनसंघापेक्षाही जास्त जागा जिंकल्या होत्या. तेव्हा बरेच संस्थानिक त्या पक्षात सामील झाले याचा राग असावा काय? अगदीच अशक्य नाही.

संस्थानिकांच्या भत्त्यांमुळे सरकारी तिजोरीवर फार मोठा भार पडत होता असे नाही. सरदार पटेलांनी संस्थाने विलीन केली त्यावेळी साम-दाम-दंड-भेद या चारही मार्गांचा वापर केला. त्यातील हा दाममार्गाचा भाग होता.१९४७ मध्ये यासाठी सरकारचे दरवर्षी ६ कोटी खर्च होत होते. ही रक्कम पुढील पिढ्यांना कमी केली गेली होती त्यामुळे १९७० पर्यंत हा आकडा ४ कोटींवर आला होता. याविषयी अधिक माहिती इथे. १९४७ मध्ये ६ कोटी ही मोठी रक्कम असली तरी १९७० मध्ये ४ कोटी ही फार मोठी रक्कम होती असे नाही. या लेखातील इतर मुद्देही विचार करण्याजोगे आहेत. संस्थानिकांना भत्ते द्यावेत यासाठी स्वतः सरदार पटेल आग्रही होते आणि त्याचा उल्लेख राज्यघटनेत उल्लेख व्हावा यासाठीही ते आग्रही होते. जर का भारत सरकारने अमुक इतके पैसे दरवर्षी देऊ असे संस्थानिकांना आश्वासन दिले असेल पण नंतर त्याला हरताळ फासला असेल तर त्याला breach of sovereign guarantee असे का म्हणू नये?

जयंत कुलकर्णी's picture

21 Nov 2016 - 12:08 pm | जयंत कुलकर्णी

संस्थानिकांचे भत्ते रद्द करणे हा निव्वळ पोरखेळ होता ज्याने सामान्य मानसाच्या डोळ्यात धुळ फेकली गेली. कारण संस्थानिकांची नावे सात बार्‍यावरुन निघाली नाहीत. पण ना सरदार पटेलांनी त्यावर विचार केला ना इंदिरा गांधींनी. मोदींनी प्रथम हे काम केले असते तर फार बरे झाले असते. हे काम मोदीच करु शकतात. हे जर झाले तर सरकारला त्यांच्या उपक्रमासाठी जमिनीची कमतरता भासणार नाही... भत्ते इ इ फार किरकोळ संपत्ती आहे. जर भत्ते रद्द करणे न्याय्य असेल तर हा विचार जास्त फायद्याचा होता...

अनुप ढेरे's picture

21 Nov 2016 - 12:11 pm | अनुप ढेरे

स्वतंत्र पक्ष एकमेव उघड आर्थिक उजवा पक्ष असावा भारतातला.
रच्याकने, संस्थानिकांचे राजकारणात उतरणे, निवडणुकांमध्ये यश मिळवणे आणि नंतर भत्ते क्यांसल होणे याचा उल्लेख गुलाल चित्रपटात आहे. केकेच्या एका भाषणात.

गॅरी ट्रुमन's picture

21 Nov 2016 - 12:44 pm | गॅरी ट्रुमन

स्वतंत्र पक्ष एकमेव उघड आर्थिक उजवा पक्ष असावा भारतातला.

हो आणि स्वतंत्र पक्षाने पिलू मोदी, मिनू मसानी, एन.जी.रंगा यांच्यासारखे ज्येष्ठ संसदपटूही दिले. १९६० च्या दशकात उघडउघडपणे लायसेन्स-परमीट राज बंद करा ही मागणी करणे त्या वेळच्या वातावरणात इतके सोपे नव्हते. ते स्वतंत्र पक्षाने केले होते.

श्रीगुरुजी's picture

21 Nov 2016 - 3:29 pm | श्रीगुरुजी

जयपूरच्या संस्थानिक असलेल्या राजमाता गायत्रीदेवी या स्वतंत्र पक्षातर्फे दोनवेळा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत राजस्थान विधानसभेच्या एका निवडणुकीत स्वतःत्र पक्ष सर्वाधिक मोठा पक्ष ठरला होता व त्यांना बहुमतासाठी जेमतेम ८-१० जागा कमी पडत होत्या. अशा वेळी राज्यपालांच्या सहाय्याने इंदिरा गांधींनी रडीचा डाव खेळून विधानसभा स्थापन होऊन ने देता स्थगित करायला लावली. नंतरच्या ६ महिन्यात आमदारांची पुरेशी फोडाफोडी करून काँग्रेसकडे बहुमत जमविले व नंतर स्थगिती उठवून राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन केले.

इंदिरा गांधींनी रडीचा डाव खेळून

फारच औचित्यपुर्ण शब्दयोजना!!!

अणुऊर्जा आणि त्यासंदर्भात खरंच कोणाला श्रेय द्यायचे असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपले माजी स्व. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि होमी भाभा ह्यांनाच द्यावे लागेल... उगं कोणाची पण बिलं कोणाच्यापण नावे फाडू नयेत... वैमगैन...

मिल्टन's picture

21 Nov 2016 - 2:06 pm | मिल्टन

बँकांचे राष्ट्रीयीकरण: या मूळे छोटे उद्योग आणि सर्व सामान्य जनता यांना पतपुरवठा होऊन रोजगाराची निर्मिती होण्यास मदत झाली.

बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले आणि त्यानंतर खेडोपाडी बँकांच्या शाखांचे जाळे विणले गेले, गरीबांना त्यांचे बँकखाते उघडणे सोपे झाले इत्यादी गोष्टी कोणीच नाकारू शकत नाही. पण बँकांच्या राष्ट्रीयीकरणाच्या बाबतीत काही मुद्दे लक्षात घेतले जात नाहीत.

१. बँकांनी गावांमध्ये शाखा उघडाव्यात असे वाटत असेल तर रिझर्व्ह बँकेने नियम बदलून ते चालणार्‍यातले नव्हते का? म्हणजे शहरांमध्ये एक नवी ब्रँच हवी असेल तर गावांमध्ये तीन नव्या ब्रँच उघडायला हव्यात अशा स्वरूपाची अट घालून पाहिजे तो परिणाम साध्य करता आला नसता का? आज विमान उद्योग क्षेत्रात डी.जी.सी.ए ही लहान विमानतळांवर सेवा पुरवली पाहिजे अशी सक्ती विमानकंपन्यांना करतेच. अन्यथा सगळ्या विमान कंपन्या मुंबई, दिल्ली, बंगलोर, हैद्राबाद, गोवा, जयपूर इत्यादीच मार्गांवर विमानसेवा पुरवतील आणि हुबळी, लखनौ इत्यादी ठिकाणी विमान कंपन्या सेवा पुरवणार नाहीत. तसे नियम रिझर्व्ह बँकेला इतर बँकांना सक्तीचे करता आले असतेच. आजही जनधन योजनेअंतर्गत झीरो बॅलन्सवाले अकाऊंट उघडायचे हा नियम आल्यानंतर सगळ्या बँकांनी निमूटपणे त्याचे पालन केलेच की. म्हणजे गावांमध्ये बँकांच्या शाखा वाढाव्यात असा उद्देश असेल तर त्यासाठी राष्ट्रीयीकरण करणे गरजेचे होते का?

२. सरकारला बँकिंग बिझनेसमध्ये शिरकाव करायचा असेल तर सरकारला नव्या बँका चालू करायला कोणी रोखले होते? त्यासाठी खाजगी बँका जबरदस्तीने ताब्यात घेणे कसे काय समर्थनीय आहे?

३. वरील मुद्द्याशीच संबंधित-- सरकारने १९६९ मध्ये बँका ताब्यात घेतल्या तेव्हा त्या देशातील १४ सर्वात मोठ्या बँका होत्या.त्यातच धोंडूमामा साठे आणि इतरांनी कष्टपूर्वक उभी केलेली महाराष्ट्र बँकही होती तसेच टी.ए.पै आणि इतरांनी उभी केलेली सिंडिकेट बँकही होती. हे पाऊल उचलून सरकारने नक्की कोणते संकेत दिले? तुम्ही कितीही कष्ट करा, प्रयत्नपूर्वक आपला उद्योग उभा करा आणि एक दिवस सरकार येईल आणि तुम्हाला कवडीमोल रक्कम देऊन तुमचा उद्योग ताब्यात घेईल!! भारतातील entrepreneurial spirit वर मोठाच धक्का लावणारा हा प्रकार होता. याला काय अर्थ आहे? उद्या कोणी दरोडेखोर आला आणि डोक्याला बंदूक लाऊन 'बर्‍या बोलाने तुझ्याकडचे पैसे माझ्या ताब्यात दे नाहीतर गोळी घालीन' असे म्हणत असेल आणि पैसे लुबाडून घेऊन जात असेल तर त्याच्यात आणि सरकारच्या या कृतीमध्ये फरक काय?

वर म्हटल्याप्रमाणे बँकेच्या राष्ट्रीयीकरणानंतर बरेच फायदे झाले हे कोणीच नाकारू शकत नाही.पण त्यासाठी राष्ट्रीयीकरण करणे गरजेचे होते का? हे एक पाऊल उचलून गरीबांचा तारणहार ही प्रतिमा लोकांपुढे उभे करून इंदिरांना पक्षांतर्गत विरोधकांना (मोरारजी देसाई आणि इतर सिंडिकेट) धाराशायी करायची मात्र संधी मिळाली.

चंबा मुतनाळ's picture

20 Nov 2016 - 8:14 pm | चंबा मुतनाळ

जाॅनीसर, छान विवरण केलय

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Nov 2016 - 8:38 pm | कैलासवासी सोन्याबापु

आझाद हिंद सेनेच्या निवृत्त अधिकारी/जवानांना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा देऊन पेन्शन सुरु करणाऱ्या सुद्धा बहुतेक इंदिरा होत्या .

इंदिरा गांधींची धडाडी स्तिमित करणारी होती. त्यांना सलाम! प्रोजेक्ट टायगर सुरू करून वाघांची संख्या वाचवण्याचे त्यांचे कार्य अमूल्य आहे.

इंदिरा गांधींची धडाडी स्तिमित करणारी होती. त्यांना सलाम! प्रोजेक्ट टायगर सुरू करून वाघांची संख्या वाचवण्याचे त्यांचे कार्य अमूल्य आहे.

आज लोकसत्ता आणि मटा मध्ये पण चांगले लेख आले आहेत त्यांच्याबद्दल . वाचण्यासारखे .

जॉनी's picture

20 Nov 2016 - 8:50 pm | जॉनी

बांगलादेश युद्धावेळी इंदिराजींनी जेव्हा फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांना सैन्याच्या तयारीबद्दल विचारलं, तेव्हा त्यांचं उत्तर जबरदस्त होतं

"आय एम ओलवेज रेडी, स्वीटी"

हाच फरक आहे, वडील आणि मुलगी... भारत चीन युद्धवेळेसचे नेहरू आणि ह्या... जमीन अस्मान...

हे विधान बरोबर आहे का ?
मी काहितरी वेगळच वाचलय.

हे विधान बरोबर आहे का ?
मी काहितरी वेगळच वाचलय.

इंदिरा गांधींना सलाम, त्यांचं संपूर्ण जीवन हे व्हाइट किंवा ब्लॅक शेड मध्ये न पाहता ग्रे शेड मध्ये पाहिलं पाहिजे, त्यांचे काही निर्णय चुकीचे आणि राजकीय होते मात्र काही निर्णयाने देशाचं भविष्य बदलण्यास मदत झाली हे नक्की. मूळ लेखात तसेच प्रतिसादात आलेल्या चांगल्या गोष्टीत थोडी भर
1. सिक्कीम भारतात आणायचं काम इंदिरा गांधींच्या कार्यकाळात झालं.
2. बहुतांश तेल कंपन्यांचा सरकारीकरण आणि स्थापना इंदिरा च्या काळी झाली
त्यांच्या बाबत च एक वाक्य नेहमी आवडत " The only man in her cabinet" त्याचा बाबतीत अस म्हंटल तरी वावगं ठरणार नाही " She was the only man prime minister india got till now " (इथं man चा अर्थ शब्दशः न घेता खंबीर असा घ्यावा)

.जानेवारी 1971 मध्ये आपलं जम्मू ते श्रीनगर विमान हायजॅक करून लाहोर ला उतरवण्यात आलं आणि अतिरेक्यांनी काही मागण्या केल्या. इंदिराजींनी ठाम भूमिका घेऊन दहशतवादासमोर झुकण्यास ठाम नकार दिला. अतिरेक्यांना प्रवाश्यांना सोडावं लागलं पण त्यांनी विमान पेटवून दिलं. तरी इंदिराजींनी पाकिस्तानी विमानांना आपल्या आकाशात बंदी घातलीच.

या बाबतीत एक थेअरी (माझ्या मते सत्य) प्रचलित आहे की इंदिरानी हे सर्व घडवून आणलं जेणे करून भारताला राजनैतिक लाभ मिळेल (जास्त माहिती जालावर सापडेल)

अनुप ढेरे's picture

20 Nov 2016 - 9:54 pm | अनुप ढेरे

मस्तं. अजून काही योगदान इंदिराजींच,
१. राजकीय फायद्यासाठी भिंद्रनवालेला प्रोत्साहन. नंतर तेच अंगाशी
२. आणिबाणी आणि त्यातले अत्याचार
३. पक्षांतर्गत विरोधकांना शत्रू समजून त्यांचा नि:पात
४. न्यायव्यवस्थेची मोडतोड. आपल्याला लॉयल जज सुप्रीम कोर्टावर नेमून.
५. स्वतंत्र भारताच्या एकमेव हुकुमशहा
६. राजकारणात हायकमांड कल्चर
७. शिवसेनेसारख्या गुंड पक्षांच्या वाढीला हातभार
८. ९७% पर्यंत आयकर. काळ्या पैशाला हातभार.
९. संविधानाची मोडतोड.

खूप सॉलिड काँट्रिभ्युशन आहे राव...

10.राजकीय भ्रष्टाचाराची जननी
11.गरिबी हटावच्या नावाखाली दमनकारी समाजवादाचा अंगीकार
12.घराणेशाही

श्रीगुरुजी's picture

21 Nov 2016 - 3:32 pm | श्रीगुरुजी

इंदिरा गांधींनी आपल्या हयातीतच घराणेशाहीला मोठ्या प्रमाणात उत्तेजन दिले. पूर्वी नेहरूंच्या कारकीर्दीत इंदिरा गांधींचा प्रभाव फारसा नव्हता. परंतु नंतर स्वतःच्या कारकीर्दीत इंदिरा गांधींनी स्वतःच्या मुलांना (आधी संजय गांधी व नंतर राजीव) पक्षाच्या सर्वोच्च निर्णयप्रक्रियेत स्थान दिले व ती उच्च परंपरा नंतर पक्षातील सर्वांनीच सुरू केली व इतर बहुतेक पक्षांनी त्याचे अनुकरण केले. म्हणूनच सद्या सोनिया पक्षाध्यक्ष तर चिरंजीव राहुल उपाध्यक्ष, मुलायम पक्षाध्यक्ष तर चिरंजीव अखिलेश मुख्यमंत्री इ. फळे दिसत आहेत.

जॉनी's picture

21 Nov 2016 - 9:03 am | जॉनी
जॉनी's picture

21 Nov 2016 - 9:03 am | जॉनी
जॉनी's picture

21 Nov 2016 - 9:04 am | जॉनी

शिवसेनेसारख्या गुंड पक्षांच्या वाढीला हातभार

बाब्बौ

गॅरी ट्रुमन's picture

21 Nov 2016 - 11:33 am | गॅरी ट्रुमन

बरेचसे मुद्दे मान्य. नेहरूंच्या काळात राजकारणात काही प्रमाणात तरी नैतिकतेला महत्व होते. ते इंदिरांच्या काळात बर्‍याच अंशी लयाला गेले. पण

८. ९७% पर्यंत आयकर.

९७% मार्जिनल टॅक्स रेट हा १९७३-७४ या वर्षात लावण्यात आला होता. त्या वर्षी सरकारी कर्मचार्‍यांचा महागाई भत्ताही देण्यात आला नव्हता.याचे कारण १९७१ मध्ये जवळपास एक कोटी बांगलादेशी निर्वासित आले होते त्यामुळे सरकारचा खर्च वाढला होता, तसेच पुढे १९७१ चे बांगलादेश युध्द, १९७३ मध्ये मध्यपूर्वेतील युध्द आणि गोल्ड स्टँडर्ड बंद होणे इत्यादींमुळे आलेली अनिश्चितता हे होते. पण १९७६-७७ मध्ये तो दर सी.सुब्रमण्यम अर्थमंत्री असताना ६६% पर्यंत खाली आणला गेला. याविषयी अधिक इथे . १९८० पर्यंत अगदी अमेरिकेतही ७०% इतका सर्वात जास्त आयकर होता.१९८० च्या दशकात अमेरिकेत रॉनाल्ड रेगन यांनी तो ५०% पर्यंत खाली आणला. त्याप्रमाणेच भारतातही १९८५-८६ मध्ये वि.प्र.सिंग अर्थमंत्री असताना तो ५०% पर्यंत खाली आणला होता. तेव्हा कदाचित इतका जास्त कराचा दर असणे त्या काळाची गरज होती किंवा फॅशन होती असे दिसते.

अनुप ढेरे's picture

21 Nov 2016 - 12:09 pm | अनुप ढेरे

आह, अमेरिकेतदेखील इतका ट्याक्स असे हे माहिती नव्ह्तं. धन्यवाद.

जॉनी's picture

21 Nov 2016 - 11:27 pm | जॉनी

गॅरी सर, काही प्रश्न
1.97 % टॅक्स म्हणजे मी कमावलेल्या 100 रुपयांमागे 97 रुपये टॅक्स भरायचा?
2.असं असेल तर हीच काळा पैसा वाढायची सुरवात म्हणता येईल का?
3.प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन 70 च्या दशकातच होतं का आपल्याकडे?

गॅरी ट्रुमन's picture

22 Nov 2016 - 10:54 am | गॅरी ट्रुमन

1.97 % टॅक्स म्हणजे मी कमावलेल्या 100 रुपयांमागे 97 रुपये टॅक्स भरायचा?

य नव्हते. आज समजा वर्षाला ५ कोटीवरील उत्पन्नावर ९७% कर लावला तर ५.५ कोटी उत्पन्न असलेल्याला पहिल्या ५ कोटीवर जितका कर येईल तितका अधिक वरच्या ५० लाखच्या ९७% म्हणजे ४८.५ लाख इतका कर भरावा लागेल. त्यावेळी टॅक्सेशनच्या स्लॅब काय होत्या ते बघायला हवे. आंतरजालावर कुठेतरी माहिती मिळेलच.

2.असं असेल तर हीच काळा पैसा वाढायची सुरवात म्हणता येईल का?

नक्कीच. वर दिलेल्या उदाहरणाप्रमाणे ५ कोटीवरच्या उत्पन्नावर ९७% कर असेल तर कोणालाही ५ कोटीपेक्षा जास्त कमावायचा इन्सेन्टिव्ह राहणार नाही. त्यामुळे एकतर आपले उत्पन्न कमी दाखवून करचुकवेपणा करणे आणि ते जमत नसेल तर ५ कोटीच्या वर कमावायला जायच्या भानगडीत न पडणे हेच दोन मार्ग लोकांपुढे होते.

3.प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन 70 च्या दशकातच होतं का आपल्याकडे?

हो अगदी पहिल्यापासून प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन आहे.

गॅरी ट्रुमन's picture

22 Nov 2016 - 10:56 am | गॅरी ट्रुमन

काही कारणाने पहिले वाक्य उडले. पहिले वाक्यः ९७% टॅक्स म्हणजे सर्वांना सरसकट ९७% कर असे नव्हते. तर ९७% हा सर्वाधिक कराचा दर होता. सर्वात कमी स्लॅब १०% होती आणि सर्वाधिक स्लॅब ९३% होती आणि विविध सरचार्ज इत्यादी मिळून तो ९७% पर्यंत जात असे.

मृत्युन्जय's picture

21 Nov 2016 - 11:00 am | मृत्युन्जय

इंदिरा गांधी एक फार धडाडीची बाई. भारतीय राजकारणातले त्यांचे योगदान दुर्लक्षुन चालणार नाही. त्यांच्या कारकीर्दीत अनेक धाडसी निर्णय घेतले गेले जे घेण्यासाठी निधडी छाती लागते. दुर्दैवाने त्यांची कारकीर्द जितक्य्या उल्लेखनीय गोष्टींनी झळाळली तितक्याच किंबहुना त्याहुन कैक पटींनी जास्त कलंकित निर्णयांनी झाकोळली गेली.

खासकरुन ज्या लोकशाहीचा आपण गर्व बाळगतो त्याची सर्वात जास्त मोडतोड बाईंनीच केली. देशातली एकमेव हुकुमशाही त्यांच्या नावावर आहे. असे असताना त्यांची उज्ज्वल बाजु बघुन् त्यांचे गुणगान करावे की नाही याबद्दल संभ्रम निर्माण होतो.

उचित लेख. मृत्युंजय यांच्याशी सहमत ! 'भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व' असे इंदिराजींचे वर्णन केले तर उचित ठरेल.

गॅरी ट्रुमन's picture

21 Nov 2016 - 2:35 pm | गॅरी ट्रुमन

दोन दिवसात रवींद्र म्हात्रे यांचं टॉर्चर केलेलं प्रेत सापडल्याची बातमी भारतात आली, आणि 4 दिवसात स्पेशल ऑर्डर काढून इंदिराजींनी मकबूल भट ला फासावर लटकावला!

मकबूल बटला इंदिरा गांधींनी असे तडकाफडकी फासावर लटकविले असे नेहमी म्हटले जाते. पण त्यात तितकेसे तथ्य नाही असे मला वाटते.लोकशाही पध्दतीत असे रविंद्र म्हात्रेंना मारले म्हणून मकबूल बटला असे तडकाफडकी फासावर लटकवायचा अधिकार पंतप्रधानांकडे नसतो.

मकबूल बटला १९६६ (की १९६९) मध्ये अमीर चंद या जम्मू-काश्मीर पोलिसदलातील अधिकार्‍याची हत्या केल्याचा आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने आधीच फाशीची शिक्षा सुनावली होती.तो १९६८ मध्ये तुरूंगातून पळालाही होता आणि १९७१ मधल्या लाहोर विमान अपहरण प्रकरणात (लेखात उल्लेख केलेल्या) सहभागी होता. १९७४ मध्ये त्याला काश्मीरमध्ये परत पकडण्यात आले होते.त्याने राष्ट्रपतींकडे फाशीच्या शिक्षेसंदर्भात दयेचा अर्ज केलाही होता. तो अर्ज राष्ट्रपती झैलसिंग यांनी फेटाळला. इंदिरा गांधींनी सांगितले तर आपण झाडू मारायलाही तयार होऊ असे जाहिरपणे झैलसिंग यांनी म्हटले होते तेव्हा या बाबतीत झैलसिंग यांनी स्वतःच्या मताने निर्णय घेतला असायची शक्यता कमीच. कदाचित म्हात्रे हत्याप्रकरणामुळे इंदिरांनी झैलसिंगना दयेचा अर्ज फेटाळा असे सांगितले असेल तर त्याबद्दल इंदिरांना योग्य ते श्रेय द्यायलाच हवे. पण तरीही रविंद्र म्हात्रेंना काश्मीरी दहशतवाद्यांनी ठार मारले म्हणून ताबडतोब इंदिरांनी मकबूल बटला फासावर लटविले हे म्हणणे तथ्याला धरून नाही कारण त्याला फाशीची शिक्षा न्यायालयाने आधीच ठोठावली होती.

२००४ मध्ये धनंजय चॅटर्जीला फाशी दिले होते त्यावेळी वाचल्याचे आठवते की फाशी द्यायची तयारी काही दिवस आधीपासूनच चालू होते. म्हणजे दोराला पिकलेली केळी चोळून कैद्याच्या मानेवरून तो सहजपणे स्लाईड होईल, तसेच कैद्याच्या वजनाचा आणि उंचीचा पुतळा घेऊन मॉक फाशी दिली जाते इत्यादी इत्यादी. या सगळ्याला काही दिवस जातात.रविंद्र म्हात्रेंचे अपहरण केले १ फेब्रुवारी १९८४ रोजी आणि त्यांचा मृतदेह सापडला ४ फेब्रुवारी १९८४ रोजी इंग्लंडमधील वेळेनुसार संध्याकाळी (म्हणजे भारतात रात्री). तर मकबूल भटला फाशी दिले ११ फेब्रुवारी १९८४ रोजी. शक्यतो फाशी पहाटेच दिले जाते. त्यामुळे म्हात्रेंची हत्या केली म्हणून मकबूल बटला फासावर चढवायचे असेल तर त्यासाठी ५ ते १० फेब्रुवारी हे ६ दिवसच होते.त्या ६ दिवसात सगळी तयारी करायला पुरेसा वेळ होता की मकबूल बटला फासावर लटकवायचा निर्णय आधीच झाला होता आणि त्यातच हे रविंद्र म्हात्रे प्रकरण घडले हे समजायला मार्ग नाही.

मृत्युन्जय's picture

21 Nov 2016 - 2:48 pm | मृत्युन्जय

ज्या तडफदारीने बाईंनी ते प्रकरण हाताळले त्याची प्रशंसा केलीच पाहिजे. " ज्युडिशियल किलिंग " ची बोंबाबोंब तेव्हाही झाली होती असे ऐकुन आहे.

गॅरी ट्रुमन's picture

21 Nov 2016 - 2:58 pm | गॅरी ट्रुमन

ज्या तडफदारीने बाईंनी ते प्रकरण हाताळले त्याची प्रशंसा केलीच पाहिजे.

हो बरोबर. जेवढे श्रेय द्येय आहे तेवढे द्यायलाच हवे. पण अनेकांंना असे वाटते की म्हात्रे प्रकरण घडले म्हणून मकबूल बटला फाशी दिली. प्रत्यक्षात मकबूल बटला फाशी अमीर चंद हत्या प्रकरणी दिली गेली. म्हात्रे प्रकरणानंतर सूत्रे जोरात हलली असतील तर त्याचे श्रेय इंदिरांना द्यायलाच हवे पण त्याचवेळी रविंद्र म्हात्रेंना मारले म्हणून मकबूल बटला इंदिरांनी फासावर लटकवले असे म्हटले जाते ते योग्य नाही इतकेच.

" ज्युडिशियल किलिंग " ची बोंबाबोंब तेव्हाही झाली होती असे ऐकुन आहे.

असणारच. असल्या उदारमतवाद्यांची किड भारताला फार पूर्वीपासून लागलेली आहे.

" ज्युडिशियल किलिंग " ची बोंबाबोंब तेव्हाही झाली होती असे ऐकुन आहे.

असहिष्णुतेचा साक्षात्कार, पुरस्कार वापसी, अल्पसंख्यांकांच्या मतांची गळचेपी वगैरे प्रकार झाले नाहीत का नंतर..?

मार्मिक गोडसे's picture

21 Nov 2016 - 5:58 pm | मार्मिक गोडसे

आणिबाणीचे समर्थन करताना आजही त्यांच्या पक्षाच्या लोकांची फेफे होते.

१९७१ च्या पाकीस्तान युद्धावेळी भारतातील परदेशी तेल कंपन्यांनी मिलिटरीसाठी राखीव तेलसाठा उपलब्ध करुन देण्यास नकार दिल्यामुळे त्या तेल कंपन्यांचे इंदीरा गांधींनी राष्ट्रीयीकरण केले हे खरं आहे काय? ह्या तेल कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केल्याने भारताचा फायदा झाला की तोटा?

इंदीरा गांधींना खरंच आपल्या जीवाची पर्वा नव्हती असे त्यांच्या शेवटच्या भाषणातील हे वाक्य ऐकल्यावर वाटते.

मार्मिक गोडसे's picture

21 Nov 2016 - 7:26 pm | मार्मिक गोडसे

इंदीरा गांधींना खरंच आपल्या जीवाची पर्वा नव्हती असे त्यांच्या शेवटच्या भाषणातील हे वाक्य ऐकल्यावर वाटते.

गामा पैलवान's picture

21 Nov 2016 - 6:51 pm | गामा पैलवान

लोकहो,

इंदिरा गांधींचं विवाहपश्चात नाव मैमुना बेगम होतं हे सगळ्यांना माहित आहे. त्यांच्या नवऱ्याचं नाव फिरोज खान होतं. मोहनदास करमचंद गांधींनी त्याला स्वत:चं आडनाव घेयायची सूचना केली होती! सत्याचे मेरुमणीच जणू!!

सांगायचा मुद्दा काये की नेहरू-गांधी घराणं मुळातून मुस्लिम असून नावालाच हिंदू आहे. १९७१ साली बांगलादेशच्या युद्धात भारताने पाकिस्तानची ९३००० डुकरं कैद केली होती. त्यांना पोटंभर बिर्याण्या चारून परत पाठवण्यामागे काय कारण असेल ते लक्षात आलं असेलंच.

विनोबा भाव्यांनी आणीबाणीला पाठींबा दिला तो गोहत्याबंदीच्या आश्वासनावर विसंबून. अर्थात मैमुनाबाईंनी नंतर विनोबांच्या तोंडाला पानं पुसलीच. कारण लक्षात आलं असेलंच.

१९८० सालानंतर बाईसाहेबांनी अकाली दलाला शह देण्यासाठी भिंद्रनवाल्याला वर चढवण्याचं धोरण पत्करलं. मात्र त्यातून त्याने सुवर्णमंदिराचा कब्जा घेतला. आता परिस्थिती हाताबाहेर जातेय हे पाहून सुवर्णमंदिरात सैन्य घुसवलं. सैन्य धाडण्याबद्दल आक्षेप नाही, पण जो दिवस निवडला त्या दिवशी सणासुदीची गर्दी होती. त्यामुळे निरपराध भाविकांची नृशंस कत्तल झाली. तिथे लालफुल्लीसही प्रवेश नव्हता. तुलनेने कमी गर्दीचा दिवस का निवडला नाही यामागील कारण लक्षात आलं असेलंच.

येथपर्यंत आपण इंदिरा गांधींच्या मुस्लिम पार्श्वभूमीमुले हिंदूंची झालेली हानी बघितली. आता एक वेगळा परिणाम बघूया.
लोकहो,

इंदिरा गांधींचं विवाहपश्चात नाव मैमुना बेगम होतं हे सगळ्यांना माहित आहे. त्यांच्या नवऱ्याचं नाव फिरोज खान होतं. मोहनदास करमचंद गांधींनी त्याला आपलं स्वत:चं आडनाव देऊ केलं! सत्याचे मेरुमणीच जणू!!

सांगायचा मुद्दा काये की नेहरू-गांधी घराणं मुळातून मुस्लिम असून नावालाच हिंदू आहे. १९७१ साली बांगलादेशच्या युद्धात भारताने पाकिस्तानची ९३००० डुकरं कैद केली होती. त्यांना पोटंभर बिर्याण्या चारून परत पाठवण्यामागे काय कारण असेल ते लक्षात आलं असेलंच. तसंच युद्धानंतर पूर्व बंगाल भारतात समाविष्ट व्हायला हवा होता. त्याऐवजी बांगलादेश हा वेगळा देश म्हणून का उदयाला आला याचं कारणही कळलं असेलंच.

विनोबा भाव्यांनी आणीबाणीला पाठींबा दिला तो गोहत्याबंदीच्या आश्वासनावर विसंबून. अर्थात मैमुनाबाईंनी नंतर विनोबांच्या तोंडाला पानं पुसलीच. कारण लक्षात आलं असेलंच.

१९८० सालानंतर बाईसाहेबांनी अकाली दलाला शह देण्यासाठी भिंद्रनवाल्याला वर चढवण्याचं धोरण पत्करलं. मात्र त्यातून त्याने सुवर्णमंदिराचा कब्जा घेतला. आता परिस्थिती हाताबाहेर जातेय हे पाहून बाईंनी सुवर्णमंदिरात सैन्य घुसवलं. सैन्य धाडण्याबद्दल आक्षेप नाही, पण जो दिवस निवडला त्या दिवशी सणासुदीची गर्दी होती. त्यामुळे निरपराध भाविकांची नृशंस कत्तल झाली. तिथे लालफुल्लीसही प्रवेश नव्हता. तुलनेने कमी गर्दीचा दिवस का निवडला नाही यामागील कारण लक्षात आलं असेलंच.

येथपर्यंत आपण इंदिरा गांधींच्या मुस्लिम पार्श्वभूमीमुळे हिंदूंची झालेली हानी बघितली. आता एक वेगळा परिणाम बघूया.

'आम्हाला ५००० वर्षांचा विजयाचा इतिहास आहे' हे बाईंचं युद्धापूर्वीचं वक्तव्य मोठं महत्त्वपूर्ण आहे. हिंदूंचा पाठींबा मिळावा म्हणूनच उच्चारलेलं आहे याबद्दल शंका नाही. मात्र याचा पाकिस्तानवर विपरीत परिणाम झाला. एका मुसलमान बाईला हिंदूंचा इतिहास आपलासा वाटतो, आणि हीच बाई पुढे पाकिस्तानाचा तुकडा पाडून हिंदूंना विजय मिळवून देते. हा वेगळ्या पाकिस्तानच्या संकल्पनेवर झालेला मर्माघात आहे. आपली मुळं नक्की कशात आहेत याचं उघड व/वा छुपं विचारमंथन पाकिस्तानात सुरू झालं असावं. भुत्तो सत्तेवर होता तोवर त्याने दुर्लक्ष केलं, पण झिया सत्तेवर आल्यावर त्याला निर्णय घेणं भाग पडलं असावं. त्यातून पाकिस्तान्यांनी आपली मुळं अरबांमध्ये शोधायचा प्रयास केला असावा असं दिसतंय. अल-बाकीस्तान मागे अप्रत्यक्षरीत्या मैमुना बेगम कारणीभूत ठरल्या असाव्यात. असं माझं मत आहे.

आ.न.,
-गा.पै.

वाचकहो, वरील प्रतिसादातला काही भाग कापला जाऊन सुरुवातीस परत चिकटला आहे. हे कशामुळे झालं ते माहित नाही. बहुतेक प्रतिसाद पूर्ण करतांना बराच खंड पडला. तस्मात सांभाळून घ्यावे ही विनंती.
आ.न.,
-गा.पै.

संदीप डांगे's picture

21 Nov 2016 - 7:48 pm | संदीप डांगे

बाकी काही असो, तुमच्या प्रतिसादाचं कारण लक्शात आलंच!

गामा पैलवान's picture

21 Nov 2016 - 8:32 pm | गामा पैलवान

आरं वा, संदीप डांगे! लै हुश्शार झालात की वं तुमी राव. हबीणंडण.
आ.न.,
-गा.पै.

वटवट's picture

21 Nov 2016 - 8:39 pm | वटवट

गा. पै...
फार मोठा घाव घातला आहे आपण, मुळावरच... आता येतीलच मुघल...

संदीप डांगे's picture

21 Nov 2016 - 9:46 pm | संदीप डांगे

तुमच्यासारखे लोक अवतीभवती असतांना हुशार न होऊन कसं व्हईल... ??? =))

उदाहरणातल्या काल्पनिक ट्रकच्या वीस लाखाचे पुरावे मागणारे प्रत्यक्ष होऊन गेलेल्या एका राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्याबद्दलच्या तुम्ही पुरवलेल्या माहितीबद्दल पुरावे मागतात काय हे पाहणे रोचक असेल. म्हणजे कसे, मलाही 'विश्वासार्ह' माहीती मिळेल ना! =))

गामा पैलवान's picture

21 Nov 2016 - 11:09 pm | गामा पैलवान

संदीप डांगे,

अगदी बरोबर बोललात पहा. आता हेच बघा ना, मैमुना बेगम नावाच्या मुसलमान स्त्रीस हिंदूंचा गौरवशाली इतिहास आपलासा वाटतो. त्यामुळे ती पाकिस्तानला पराभूत करून त्याचे दोन तुकडे करते. यावरून हिंदू धर्माच्या सहवासाची महती कळते.

माझ्या सहवासात राहून तुमची हुशारी वाढली आहे, ती याच धर्तीवर बरंका. ही वार्ता संतोषजनक आहे. अशीच उत्तरोत्तर प्रगती चालू राहू द्या.

आ.न.,
-गा.पै.

विजुभाऊ's picture

28 Dec 2016 - 8:39 pm | विजुभाऊ

ना, मैमुना बेगम नावाच्या मुसलमान स्त्रीस हिंदूंचा गौरवशाली इतिहास आपलासा वाटतो. त्यामुळे ती पाकिस्तानला पराभूत करून त्याचे दोन तुकडे करते. यावरून हिंदू धर्माच्या सहवासाची महती कळते.

यावरुन गामा यांचे डोके ठिकाणावर नाही किंवा ते सनातनी झालेले असावेत अशी खात्री पटायला लागली आहे. इतके मूर्खासारखे विधान करत सुटला आहात की पुरावे वगैरे गोष्टी तुमच्यासाठी कधीच महत्वाच्या नसतात हे ओघाने आलेच.
बाकी या तोडलेल्या अकलेच्या तार्‍यांपुढे नभाम्गणही फिक्के पडेल

प्रदीप's picture

22 Nov 2016 - 1:56 pm | प्रदीप

उदाहरणातल्या काल्पनिक ट्रकच्या वीस लाखाचे पुरावे मागणारे प्रत्यक्ष होऊन गेलेल्या एका राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्याबद्दलच्या तुम्ही पुरवलेल्या माहितीबद्दल पुरावे मागतात काय हे पाहणे रोचक असेल. अन्यत्र, वेगळ्या संदर्भात तुमच्या विधानापुष्ट्यर्थ काही पुरावे तुम्हाला काही जणांनी मागितले, त्यांनी डोळ्यात तेल घालून, मिपावर ठणठणपाळासारखे वावरले पाहिजे, आणि कुणीही कसलीली विधाने केली म्हणजे पुरावे मागितलेच पाहिजेत, हे काही समजत नाही.

इथे तुम्ही मागताय ना? मग तेव्हढे पुरेसे आहे की! आणि गामांनी तसे दिले नाहीत, तर त्यावरून काय जो निष्कर्ष काढायचा, तो सर्व वाचक काढतीलच की!

संदीप डांगे's picture

22 Nov 2016 - 2:05 pm | संदीप डांगे

नाही समजले ना? असू द्या मग. प्रत्येक गोष्ट समजलीच पाहिजे हे योग्यही नाही.

प्रदीप's picture

22 Nov 2016 - 2:24 pm | प्रदीप

'समजले नाही' असे मी केवळ औधत्य टाळण्यासाठी म्हटले होते. तुमचे 'लॉजिक' गंडले आहे, असे म्हणायचे होते.

असो. तुमचे चालूंदे.

संदीप डांगे's picture

22 Nov 2016 - 3:22 pm | संदीप डांगे

उद्धट उतर??

व्यनीतून बोलूया...

प्रदीप's picture

22 Nov 2016 - 3:28 pm | प्रदीप

करा मला व्यनि.

अप्पा जोगळेकर's picture

22 Nov 2016 - 2:19 pm | अप्पा जोगळेकर

तुमच्या आवडत्या पक्षाच्या पंतप्रधान नाहीत म्हणून काहीही 'बेसलेस' लिहित सुटायचे का ?
भारताच्या शत्रूराष्ट्राचे २ तुकडे करण्यात यांचे योगदान फार मोठे आहे.
बाकी, फिरोज गांधी पारशी होते आणी उत्कॄष्ट संसदपटू होते. त्यांची उत्तर क्रिया सुद्धा बहुधा अलाहाबाद येथे पारशी स्मशानात झाली आहे.
इंदिराजी मोदींपूर्वीच्या सर्वात धडाडीच्या पंतप्रधान असाव्यात.

इंदिरा गांधींचं विवाहपश्चात नाव मैमुना बेगम होतं हे सगळ्यांना माहित आहे. त्यांच्या नवऱ्याचं नाव फिरोज खान होतं

हे सर्वात मोठ्ठे विनोदी विधान आहे.
सनातनी लोकानी वारंवार केलेल्या धादांत खोट्या विधानामुळे हल्ली लोकांना हे ठार खोटे विधान खरे असावे अशी शंका येतेय.

मॅकीयव्हॅलीच्या स्वप्नातील प्रिन्सला इंदिराजी हे भारतीय उत्तर आहे असे वाटते. अफाट लोकप्रियता, वचक त्याचबरोबर realpolitic ची समज या बळावर इंदिरा गांधींनी भारतावर अक्षरश: राज्य केले.
माझ्या मते, त्यांचे भारताच्या प्रगतीसाठीचे सर्वात मोठे योगदान: बांगला देश युद्ध आणि operation ब्लू स्टार आणि हरित क्रांती

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Nov 2016 - 2:12 pm | कैलासवासी सोन्याबापु

शब्दशः सहमत मला सुद्धा इंदिरा नाव ऐकले की पहिले निकोलो मॅकियावेली आठवतो अन द प्रिन्स सुद्धा

अप्पा जोगळेकर's picture

22 Nov 2016 - 2:21 pm | अप्पा जोगळेकर

धवल क्रांती राहिले का ?

पुंबा's picture

22 Nov 2016 - 3:11 pm | पुंबा

धवल क्रांती देखील काही प्रमाणात..

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Nov 2016 - 3:12 pm | कैलासवासी सोन्याबापु

कश्याबाबत बोलताय अप्पा? ऑपेशन फ्लड म्हणजे दुग्धक्रांती बद्दल का?

पाटीलभाऊ's picture

22 Nov 2016 - 1:55 pm | पाटीलभाऊ

धावत आढावा आवडला.
अजून येऊ द्या.

नुकतच ब्लड टेलीग्राम वाचल.
इतर लोकांनीहि वाचाव..
बर्याच गैरसमज दुर होतील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Nov 2016 - 2:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

आणीबाणी आणि जोरजबरदतीचे राजकारण असे काळे डाग असले तरी त्याबरोबरच इंदिराजींचे भारतीय राजकारणातले भारतासाठी असलेले सकारात्मक भागही मानावेच लागतील...

१. केवळ नेहरूंची मुलगी या सर्टिफिकेटवर नाहि तर काँग्रेसमधल्या जुन्या धेंडांना धूळ चारून त्या सत्तेवर आल्या होत्या. त्यांनी "मी नेहरूंची मुलगी आहे. त्यांनी देशासाठी किती त्याग केला होता पहा. म्हणुन मला मते किंवा महत्व द्या." अशी भीक मागितली नाही.

२. १९७१ च्या बांगलादेश युद्धाअगोदर जगभर फिरून 'पाकिस्तानच्या क्रूर कारवाया व त्यामुळे भारतात येणारे विस्थापित' यामुळे ते युद्ध कसे अटळ आहे हे महत्वाच्या देशाना पटवून देण्यात त्यांनी जी मुत्सद्दीगिरी दाखवली होती ती अप्रतिम होती यात शंका नाही.

३. ते झाल्यावर, प्रत्यक्ष युद्ध छेडण्याचा आदेश देण्यात दाखवलेला राजकिय इच्छाशक्तीचा कणखरपणाही प्रशंसनीय होता.

या वरच्या गोष्टींमुळे काही काळ तरी भारतिय लोकांना अभिमान आणि परदेशात भारताबद्दल अभिमानाची जाणीव निर्माण झाली होती.

पुंबा's picture

22 Nov 2016 - 3:01 pm | पुंबा

+++111

मला वाटतं बऱ्याच प्रमाणात इंदिराजींचं version of secularism खूप चांगलं होतं. अल्पसंख्यांकांचं लांगुलचालन करणं हा भाग यात नव्हता, म्हणजे ब्लू स्टारच्या वेळेला सुवर्णमंदिराच्या ऐवजी मशीद असती तरीही त्यांनी तोच निर्णय घेतला असता. शिवाय उगाचच ममता बनर्जींसारखी मुस्लिमांच्या समोर जाताना ओढणी ओढ वगैरे प्रकार नसत. ते चंद्रास्वामी वगैरे प्रकार होते म्हणा. पण, तुमच्या शीख अंगरक्षकांना बदला असा सल्ला दिला असता 'aren't we all secular' असे उत्तर देणे मला तरी ग्रेट उदाहरण वाटते.

श्रीगुरुजी's picture

22 Nov 2016 - 3:28 pm | श्रीगुरुजी

असहमत. इंदिरा गांधींची धर्मनिरपेक्षता म्हणजे काँग्रेसच्या इतर नेत्यांप्रमाणे मुस्लिम लांगूलचालनच होते. १९७० च्या दशकात एकदा सौदी अरेबियात मुस्लिम राष्ट्रांची कसलीतरी परीषद होती. भारताचा त्या परीषदेशी काहीही संबंध नसताना, भारतात मुस्लिमांची संख्या बरीच जास्त आहे हे कारण पुढे करून इंदिरा गांधींनी निमंत्रण नसताना सुद्धा आपला प्रतिनिधी त्या परीषदेला पाठविला होता. त्याला पाकिस्तानने आक्षेप घेऊन बराच आरडाओरडा केल्यावर भारताच्या प्रतिनिधीला परीषदेत सहभागी होऊन न देता निरीक्षक असे स्थान देऊन परीषदेला उपस्थित राहून दिले होते.

फक्रुद्दिन अली अहमद यांच्या सारख्या सामान्य व्यक्तीला राष्ट्रपती बनविण्याचे काम इंदिरा गांधींचेच होते.

महाराष्ट्रात सुद्धा अंतुलेच्या रूपाने मुस्लिम मुख्यमंत्री लादण्याचे काम इंदिरा गांधींचेच.

ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या वेळी सुवर्णमंदीराच्या ऐवजी मशीद असती तर इंदिराजींनी तिथे सैनिक कधीच पाठविले नसते. मुळात ऑपरेशन ब्लू स्टार जून १९८४ मध्ये केले त्यामागे शीख अतिरेक्यांना हुसकून लावण्याऐवजी डिसेंबर १९८४ मधील लोकसभा निवडणुक इंदिरा गांधींच्या डोळ्यासमोर होती.

१९७९ मध्ये बिहारमधील पांडे बंधूंनी ईंडिअन एअर लाईन्सच्या विमानाचे अपहरण करून ते श्रीनगरला नेले होते व इंदिरा गांधींवरील खटले काढून टाकावेत अशी त्यांची मागणी होती. याच पांडे बंधूंविरूद्ध कोणताही खटला दाखल न करता इंदिरा गांधींनी त्यांना बिहार राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्री केले होते.

१९७१ मधील नगरवाला प्रकरणसुद्धा इंदिरा गांधींच्या कारकीर्दीतच घडले होते. दिल्लीतील स्टेट बँकेला एक दिवस अचानक एक फोन आला. फोन करणार्‍याने आपण पंतप्रधान कार्यालयातून बोलत असून इंदिराजींना तातडीने ६० लाख रूपये हवे असल्याचे सांगितले. काही वेळाने नगरवाला नामक व्यक्ती येऊन ६० लाख रूपये घेऊन गेला. तो माणूस व ६० लाख रूपये आजतगायत सापडलेले नाहीत.

१९७९ मध्ये बिहारमधील पांडे बंधूंनी ईंडिअन एअर लाईन्सच्या विमानाचे अपहरण करून ते श्रीनगरला नेले होते व इंदिरा गांधींवरील खटले काढून टाकावेत अशी त्यांची मागणी होती. याच पांडे बंधूंविरूद्ध कोणताही खटला दाखल न करता इंदिरा गांधींनी त्यांना बिहार राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्री केले होते.

बिहार नाय वो... उत्तर प्रदेश.

१९७१ मधील नगरवाला प्रकरणसुद्धा इंदिरा गांधींच्या कारकीर्दीतच घडले होते. दिल्लीतील स्टेट बँकेला एक दिवस अचानक एक फोन आला. फोन करणार्‍याने आपण पंतप्रधान कार्यालयातून बोलत असून इंदिराजींना तातडीने ६० लाख रूपये हवे असल्याचे सांगितले. काही वेळाने नगरवाला नामक व्यक्ती येऊन ६० लाख रूपये घेऊन गेला. तो माणूस व ६० लाख रूपये आजतगायत सापडलेले नाहीत.

इथे काहीतरी वेगळी माहिती आहे गुरूजी.. - https://en.wikipedia.org/wiki/1971_Nagarwala_scandal

श्रीगुरुजी's picture

23 Nov 2016 - 2:16 pm | श्रीगुरुजी

बिहार नाय वो... उत्तर प्रदेश.

बरोबर. ते उत्तर प्रदेशचे होते.

इथे काहीतरी वेगळी माहिती आहे गुरूजी.. - https://en.wikipedia.org/wiki/1971_Nagarwala_scandal

विकिपिडीआच्या माहितीवर पूर्ण भरवसा ठेवता येत नाही. हे प्रकरण जवळपास ४५ वर्षांपूर्वी घडल्याने याविषयी फारशी माहिती प्रसिद्ध झालेली नाही.

जॉनी's picture

22 Nov 2016 - 7:02 pm | जॉनी
जॉनी's picture

22 Nov 2016 - 7:02 pm | जॉनी
जॉनी's picture

22 Nov 2016 - 7:04 pm | जॉनी
जॉनी's picture

22 Nov 2016 - 7:07 pm | जॉनी

प्रतिसाद नीट प्रकाशित होत नाहीये राव.

सौदी प्रकरण म्हणजे तेलासाठी चालवलेला खटाटोप असावा असं दिसतं.

lakhu risbud's picture

22 Nov 2016 - 3:12 pm | lakhu risbud

७१ चे युद्ध जिंकले असताना, ९३ हजार युद्धकैदी पकडले असताना पाकिस्तान नावाच्या कर्करोगाचे मुळातून निर्दालन करता आले असते. Demilitarisation आणि काश्मीर प्रश्नाचे भारतासाठी समाधानकारक उत्तर मिळवता असते, ते न करता सिमला कराराचे हाडूक मात्र गळ्यात अडकून घेतले.या मुद्द्यांवर चर्चा होताना का दिसत नाही ते इंदिराजींनाच ठाऊक असावे बहुधा.

आर्थिक निर्णयांबद्दलही बोलावे. MRTP (Monopolies and Restrictive Trade Practices) नामक एक महाभयंकर (draconian) आर्थिक कायदा आणण्याचं श्रेयही त्यांच्याच नावावर आहे. या कायद्याचा हेतू हा कुठल्याही उद्योगाला मक्तेदारी किंवा monopoly बनण्यापासून रोखणं हा होता, पण त्यामागचं तर्कशास्त्र फार अजब होतं. समजा बजाज आॅटोच्या एका प्लँटची क्षमता दिवसाला १,००,००० स्कूटर्स बनवायची आहे, तर बजाज आॅटो बाजारात मक्तेदारी निर्माण करु शकते. साधं अार्थिक तर्कशास्त्र वापरलं गेलं नाही, की निव्वळ उत्पादन करुन कुणीही मक्तेदारी बनू शकत नाही. त्यासाठी ते बाजारात विकलंही गेलं पाहिजे. पण निव्वळ उत्पादन करण्याच्या क्षमतेवरुन हे ठरवलं गेलं आणि अशा कंपन्यांना कोटा ठरवून देण्यात आला. परिणामी त्यांची वाढ खुंटली. त्यांना जर इतरत्र कुठे प्लँट काढायचा असेल तर सतराशेसाठ परवानग्या. त्यातून भ्रष्टाचार वाढला. धीरूभाई अंबानींसारख्या लोकांनी यात स्वतःचा फायदा करुन घेतला. कंपन्यांनी किती भांडवल उभारावं यावर नियंत्रण आलं. सर्वात मोठा तोटा म्हणजे खाजगी क्षेत्रातलं job creation थंडावलं. आणि हे सगळं समाजवदाच्या आणि गरिबी हटाओ च्या नावावर बरं का!राजीव गांधींनी आणि त्यांचे पहिले अर्थमंत्री (आणि नंतर विरोधक आणि प्रतिस्पर्धी) विश्वनाथ प्रताप सिंग यांनी त्यात थोडीशी सुधारणा केली, पण १९९१ चं नरसिंह राव- मनमोहन सिंग कृत उदारीकरण सुरु होईपर्यंत त्यात काही ठोस सुधारणा झाल्याच नव्हत्या. मनमोहन सिंग अर्थमंत्री म्हणून तितकेच जबरदस्त होते जितके पंतप्रधान म्हणून निष्प्रभ होते. MRTP ची उचलबांगडी होऊन Competition Act आला, ज्याने अनेक आमूलाग्र बदल घडवून आणले. आणि हे सगळं इंदिरा गांधींनी केव्हा केलं - जेव्हा दुष्काळाने देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती आणि उत्पादन वाढवण्याची गरज होती तेव्हा. नेहरूंच्या सरकारने अर्थव्यवस्थेत ढवळाढवळ सुरु केली होती, पण खाजगी क्षेत्राला स्वातंत्र्य होतं. इंदिरा गांधींनी ते स्वातंत्र्य काढून घेतलं. आणि का - तर आपले समाजवादी credentials दाखवून त्याचा राजकीय फायदा उठवण्यासाठी. एक प्रकारे काँग्रेसने उदारीकरणाचं धोरण आणणं हा काव्यगत न्याय होता, कारण आपली अर्थव्यवस्था हा जो mess झाला होता त्याला निस्तरणं ही नक्कीच काँग्रेसची जबाबदारी होती. तेही डाॅ.सिंग यांच्यासारख्या non-political अर्थमंत्र्यामुळे शक्य झालं. त्याबद्दल पी.व्ही.नरसिंहराव या माणसाचं ऋण या देशाने मानलं पाहिजे.

मिल्टन's picture

22 Nov 2016 - 4:46 pm | मिल्टन

कोटा राजचे कारण होते की विविध रिसोर्सेसची टंचाई असताना एखाद्या कंपनीने जास्त रिसोर्सेस वापरले तर इतर कंपन्यांना कमी रिसोर्सेस वापरायला मिळतील आणि त्यातून इतरांची अडचण होईल. कोटा राज नेहरूंच्या काळातही होते. १९५६ च्या औद्योगिक धोरणात खाजगी कंपन्यांना परमिट लागेल आणि उत्पादन वाढवायचे 'लायसेन्स' जर त्या वाढलेल्या उत्पादनाची देशाला गरज असेल तरच देण्यात येईल असे म्हटले होते. म्हणजे एका अर्थी अमुक एका मर्यादेपेक्षा उत्पादन करण्यावर बंदीच होती आणि त्याचे कारण वर म्हटल्याप्रमाणे टंचाई हे असावे.

प्रश्न इतकाच की इंदिरा गांधींच्या काळापर्यंत तितकी टंचाई राहिली होती का? तसे असेल तर इंदिरांनाच लायसेन्स-परमीट-कोटा राज कमी करता आले असते. किंबहुना त्यांनी ते कसे करायला हवे होते हे गुरचरण दास यांच्या इंडिया अनबाऊंड सारख्या पुस्तकात म्हटलेही आहे. त्याउपर इंदिरांनी एम.आर.टी.पी सारखा कायदा आणलाच पण अनेक उद्योगांमध्येही सरकारचे स्थान वाढविले.

कुठल्यानाकुठल्या कारणावरून राष्ट्रीयीकरण करणे हा तर स्वातंत्र्योत्तर भारतात स्थायिभाव होताच. खाजगी विमा कंपन्यांमध्ये भ्रष्टाचार चालतो म्हणून नेहरूंच्या काळात विमा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण झाले. इंदिरांनी 'सामाजिक न्याय' या गोंडस नावाखाली बँकांचे राष्ट्रीयीकरण केले हे वर लिहिलेच आहे. कोळसा कंपन्या कामगारांचे शोषण करतात म्हणून कोळसा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केले आणि कोल इंडिया लिमिटेड स्थापन केली.त्याचबरोबर वीजनिर्मिती क्षेत्रात त्यापूर्वी राज्य सरकारे असायची पण १९७० च्या दशकात केंद्रही त्यात आले आणि एन.टी.पी.सी, एन.एच.पी.सी इत्यादी कंपन्यांची स्थापना झाली. इंदिरांच्याच काळात १९६७ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना झाली. हीच कंपनी पूर्वीच्या काळी असलेला "इसी" टिव्ही बनवत असे. इंदिरांच्या काळात सरकारचा हस्तक्षेप सगळ्या क्षेत्रात वाढलाच आणि अचानक राष्ट्रीयीकरण होऊ शकेल ही भिती entrepreneurial spirit ला नक्कीच मारक होती. एकूणच इंदिरांची कारकिर्द म्हणजे आर्थिक आघाडीवर एक "वाया गेलेला काळ" होता.

गॅरी ट्रुमन's picture

22 Nov 2016 - 5:05 pm | गॅरी ट्रुमन

तेरा दिवसात पाकिस्तान ला पाणी पाजून भारतीय सेना विजयी झाली आणि नवा बांगलादेश जन्माला आला.

बांगलादेश युध्दाविषयी मला नेहमी एक प्रश्न पडतो.१९७१ चे युध्द होणे क्रमप्राप्तच होते. किंबहुना ते युध्द व्हावे या दृष्टीनेच इंदिरांची पावले पडत होती. आता पश्चातबुध्दीने वाटते की आपण तसे करायला नको होते. पाकिस्तानने हल्ला केला तर तो परतावून लावायची क्षमता आपल्याकडे नक्कीच होती. युध्द आपण नुसता हल्ला परतावून लावण्यापुरते सिमीत ठेवले असते आणि पूर्वेत थेट ढाक्क्यापर्यंत घुसून बांगलादेश निर्माण केला नसता तर बरे झाले असते. तशीही बांगलादेशातील जखम ठसठसत होतीच आणि १९७१ नाही तर कदाचित १९७६-१९७७ पर्यंत बांगलादेश वेगळा झालाच असता. पण पाकिस्तानच्या अंगातील ती जखम आणखी काही काळ ठसठसत राहिली असती तर ते आपल्याला चांगले झाले असते. त्याऐवजी झाले असे की पूर्व पाकिस्तान ही शत्रूच्या अंगातील कॅन्सरची गाठ कापून देण्यात आपण मदत केली. त्यापेक्षा ती कटकट पाकिस्तानच्या डोक्याला आणखी काही वर्षे लागली असती तर बरे झाले असते.

त्यावेळी हे इंदिरांच्या लक्षात आले नसेल असे वाटत नाही.पण एक सामान्य माणूस आणि १९७१ मध्ये पडद्यामागे नक्की काय चालू होते याची केवळ विविध लेखांमधून माहिती मिळवून एक पश्चातबुद्धी म्हणून मला हे नक्कीच वाटते.

जॉनी's picture

22 Nov 2016 - 6:57 pm | जॉनी

पाक सैनिकांच्या दडपशाही ला कंटाळून हजारो निर्वासित भारतात येत होते. हे एक कारण म्हणून पुढे येतं. अर्थात नंतर हि ते येत राहिलेच म्हणा..

गॅरी ट्रुमन,

बांगलादेश वेगळा काढायचं एक (माझ्या मते महत्त्वाचं) कारण म्हणजे अमेरिकेचा हिंदी महासागरात वावर वाढला होता. तसंच चीनही पाकिस्तानस मदत करंत होता. जर पूर्व पाकिस्तान तसाच राहू दिला असता तर भारतीय नौदलास पूर्व बंगालच्या सागरी सीमा पाळाव्या लागल्या असत्या. बांगलादेश वेगळा झाल्याने त्याच्याशी स्वतंत्र करार करून भारतीय नौदलास बंगालचा उपसागर मोकळा मिळवून दिला.

हे युद्ध भारत विरुद्ध पाक एव्हढंच सीमित नाही. अमेरिका आणि चीन दोन्हींना एकत्रितरीत्या पराभूत केलं गेलं आहे. इंदिरा गांधींना आंतरराष्ट्रीय राजकारणाची खोलवर जाण होती.

आ.न.,
-गा.पै.

जनरल झिया-उल-हक यांनी पाकिस्तानचं इस्लामीकरण केलं. तारेक फतेह यांच्या म्हणण्यानुसार ते भुत्तोंच्या तुलनेने उदारमतवादी विचारसरणीला उत्तर म्हणून झियांनी राबवलं कारण भुत्तोंच्या अशा धोरणामुळे पराभव झाला असं त्यांना हेतुपुरस्सर पसरवायचं होतं. अाय.एस.आय. चा वापर करुन भारतात अशांतता माजवणं झियांच्या काळात अजून आक्रमकरीत्या सुरु झालं. पंजाब आणि काश्मीर ही दोन उदाहरणं. याला भुत्तो सिंधी आणि झिया पंजाबी असल्याचाही पैलू आहे. १९७१ च्या निर्णायक पराभवामुळे पाकिस्तान covert operations कडे वळला असं आज आपण म्हणू शकतो. त्यावेळी अर्थातच इंदिरा गांधींच्या मनात असा विचार आला नसावा. नाहीतर भिंद्रनवाले नावाचा भस्मासूर त्यांनी निर्माण केला नसता.

गामा पैलवान's picture

28 Dec 2016 - 11:41 pm | गामा पैलवान

विजुभाऊ,

इतके मूर्खासारखे विधान करत सुटला आहात की पुरावे वगैरे गोष्टी तुमच्यासाठी कधीच महत्वाच्या नसतात हे ओघाने आलेच.

मी मूर्ख आहे तर काय झालं. तुम्ही शहाणे आहात ना! मग तुमच्या शहाण्या मेंदूस कामाला लावा आणि खालील प्रश्नांची उत्तरं द्या :

१. फिरोझ गांधींची कबर हे काय प्रकरण आहे? पारशी लोकांत कबर बांधतात का?

२. अलिगड मुस्लिम युनिव्हार्सिटीत विद्यार्थिनींसाठी इंदिरा गांधी हॉल आहे. इंदिरा गांधी मुस्लिम असल्याशिवाय कोणी हे नाव ठेवेल का?

३. संजय गांधीची सुंता झाली होती. (संदर्भ : जॉन मथाई यांचं पुस्तक) तर सुंता कोणत्या पंथात करतात?

४. मी एका हिंदूशी लग्न करायचा विचारही करू शकंत नाही. - इति इंदिरा गांधी. संदर्भ : जॉन मथाई यांचं पुस्तक. इंदिरा गांधीला हिंदूशी विवाह करण्यात कसला कमीपणा वाटंत होता?

तूर्तास इतकं पुरे.

आ.न.,
-गा.पै.