मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाप्पाचा नैवेद्यः आंबा मोदक

अनन्न्या · · लेखमाला
1 . साहित्यः आटवलेला आंब्याचा रस एक वाटी, साखर दोन वाट्या, वेलची पावडर, पाणी, मोदकाचा साचा . 1 . कृती: दोन वाट्या साखर कढईत घ्या. त्यात एक वाटी पाणी घाला. मध्यम गॅसवर ठेवून ढवळत रहा. साखरेचा गोळीबंद पाक करायचा आहे. एका वाटीत अर्धी वाटी पाणी घ्या. पाकाचा थेंब पाण्यात टाकून पाहा. पाकाची घट्ट गोळी झाली की गॅस बंद करा. आता या पाकात चिमूटभर वेलची पावडर घाला आणि लगेच रसाचा गोळा मिसळा. खाली उतरून घोटत राहा. चांगला गोळा झाला की मोदकाच्या साच्यात घालून मोदक करा. याच्या वड्या करायच्या असतील तर गोळा झाल्यावर ताटाला तूप लावून त्यात गोळा थापा आणि वड्या पाडा. आमरसाचा सुंदर स्वाद आणि रंग येतो या मोदकांना! . 1

वाचने 22621 वाचनखूण प्रतिक्रिया 45

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 05/09/2016 - 08:49
जब्रा....आवडले मोदक. -दिलीप बिरुटे

प्रभाकर पेठकर 05/09/2016 - 09:23
चविष्ट दिसताहेत. मस्तच.

नाखु 05/09/2016 - 09:27
मुख्य म्हणजे जमण्यासारखे.. ता.क. आटवलेला रस म्हणजे "देसाई बंधूंचा " विजय पलप समान काही का? नक्की काय नावाने मागायचा दुकानात? (अगदी बाळबोध प्रश्न आहे पण निराकरण व्हावे म्हणून विचारले. वरील प्रश्न देसाई बंधूंची जाहीरात नाही हे समजून घेणे.. जाहीर आत नाखु

In reply to by नाखु

अनन्न्या 05/09/2016 - 15:20
देसाई बंधू माझ्या माहेरच्या गावचे पण त्यांच्याकडे कोणत्या नावाने मिळतो हे नाही माहित. रस आटवलेला असावा पण त्यात वरून पिठीसाखर मिसळलेला नको. आटवलेला रस विचारल्यावर कळेल देसाईबंधूना!

In reply to by पैसा

रुस्तम 05/09/2016 - 21:52
अनन्न्या ताई तुम्ही आटवलेला आंब्याचा रस घरी कसा बनवता ?

In reply to by रुस्तम

अनन्न्या 06/09/2016 - 00:06
चुलीवर मोठ्या पराती ठेऊन त्यात आंब्याचा रस काढून आटवत ठेवला जातो हा रस खूप उडतो म्हणून लांब दांडयाचे लाकडी उलथे वापरतात. रस आटत आला की त्यात साखर घालून परत आटवतात. घट्ट होत आला की गार करायला ठेऊन मग गोळे करून ठेवतात. हे गोळे वर्षभर चांगले टिकतात. माझ्या माहेरी असा आटवलेला रस करून विकायला ठेवतात तो मी आणते.घरी करताना कढईत थोड्या प्रमाणात करता येतो पण मी मे महिन्यात माहेरी जाऊन तिथून करून आणते.

मोक्षदा 05/09/2016 - 11:27
अनन्या , छान झाले आहेत मोदक फोटो चांगले,

मदनबाण 05/09/2016 - 12:31
थाळीतले मधले मोदक मी फस्त केले आहेत असे समजुन घ्यावे, बाकीचे उरलेले प्रसाद म्हणुन वाटण्यास हरकत नसावी ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- माझा गणपती... :- मी येतोय

दिपक.कुवेत 05/09/2016 - 14:44
गणेश उत्सवाच्या खुप खुप शुभेच्छा आणि आंबा मोदक खासच झाले आहेत. तोंपासू फोटो

अनन्न्या 05/09/2016 - 15:22
या सर्वांनी गणपती बघायला आणि मोदक खायला!

स्वाती दिनेश 05/09/2016 - 16:35
मोदक सुरेखच दिसत आहेत. पाकॄ तर छानच! बाप्पाच्या नैवेद्याची सुरूवात झकास! स्वाती

सविता००१ 05/09/2016 - 16:49
अनन्या, मस्तच दिसताहेत मोदक. मस्त सुरुवात नैवेद्यासाठी.

केडी 05/09/2016 - 17:53
।।गणपती बाप्पा मोरया।। सुंदर आहे पाकृ.

सस्नेह 06/09/2016 - 11:50
सुरेख आणि नाजूक नैवेद्य !

मास्टरमाईन्ड 06/09/2016 - 12:06
तोंडाला पाणी सुटलं ना!! आख्खं ताट भरून आंबा बर्फी संपवू शकेन (एका वेळेस बास होतील कदाचित) मस्त! आवडलं.

सूड 06/09/2016 - 15:41
सुंदरच!! सध्या उकडीच्या मोदकाच्या सारणात नारळाचा चव+आमरस असं करण्याचा विचार चालू आहे. बघू कसं जमतंय.

In reply to by सूड

स्वाती दिनेश 06/09/2016 - 18:12
फार सुरेख लागतात रे असे मोदक. हवे तर उकडीत किंचित केशरी रंगही घाल. फार सुरेख दिसतेही आणि चव तर भन्नाटच येते. तसेच नारळाच्या सारणात गुलकंद घालूनही छान होतात. उकडीचे,तळणीचे मोदक, करंज्याही.. :) स्वाती

सुमीत भातखंडे 06/09/2016 - 15:51
तोंपासु :)

स्रुजा 07/09/2016 - 21:02
फार, फार सुरेख. तुझ्या सगळ्याच पाकृ अप्रतिम असतात आणि मला तुझं त्यातलं साधेपणातलं सौंदर्य फार भावतं.

अनन्न्या 07/09/2016 - 22:55
एवढ्या साध्या पाकृला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल! माझी आई हे मोदक करून विकायची गणपतीत, त्यामुळे मी देणारच नव्हते.

In reply to by अनन्न्या

पिलीयन रायडर 08/09/2016 - 09:06
साधी?!! अगं तुझ्या पाकृ पाहुन असं वाटतं की हे जमेल आपल्याला! खुप काही तरी फॅन्सी बघायला भारी वाटलं तरी पटकन करावं वाटत नाही. पण तुझ्या पाकृ मात्र अगदी आईनेच समजावुन सांगितलंय असं वाटतं! साधं.. सोपं.. आणि सुंदर!