✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझा मिपाविश्व प्रवेश

स
संत घोडेकर यांनी
Sun, 07/17/2016 - 16:31  ·  लेख
लेख
साधारण ७-८ वर्ष झाली असतील, ऑफिसमध्ये काम करीत होतो. कंटाळा आला म्हणून शेजारी बसलेल्या सहकाऱ्याशी गप्पा माराव्या म्हणून त्याच्या डेस्क जवळ गेलो. तो हि बहुतेक कंटाळला असावा कारण त्याच्या संगणक पडद्यावर तो एक pdf उघडून कुठली तरी कथा वाचत बसला होता. “ काय रे, हे काय?”, मी विचारले. “अरे छान कथा आहे, अगदी उत्कंठावर्धक. तुला पाठवतो वाचून सांग कशी आहे ते”. त्याने उत्तर दिले. ठीक आहे म्हणून त्याने पाठविलेल्या कथा वाचनात मी गुंग झालो. खरोखरच उत्तम अशी ती कथा होती. “कुठून मिळाली रे कथा, खरेच छान आहे की”. दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये मी त्याला विचारले. “अरे एक मराठी संस्थळ आहे xyz नावाचे तिथे प्रकाशित झाली आहे”. तो पर्यंत असे काही संस्थळ असते आणि त्यावर कथा प्रकाशित होतात याबद्दल मी घोर अज्ञानी होतो. त्यावेळी आमच्याकडे कार्यालयीन वेळेत इंटरनेट वापरावर संपूर्ण बंदी होती. “कसे काय उघडले रे संस्थळ?” मी सहकाऱ्याला विचारले. “अरे माझा भाऊ त्याच्या ऑफिस मध्ये उघडून, pdf तयार करून मला पाठवितो”. त्याने माहिती पुरविली. “वा छान! यापुढे तुला आलेल्या कथा मला पाठवीत जा”. मी त्याला विनंती करून कार्यालयीन वेळ सत्कारणी लावण्याची सोय करून घेतली. बरेच दिवस सहकाऱ्याचा भाऊ जमेल तश्या कथा पाठवीत होता आणि आम्ही दोघे जमेल तसे त्याचा फडशा पाडत होतो. नंतर बऱ्याचदा कामात व्यस्त असल्यावर ऑफिस मध्ये वाचनास वेळ पुरेनासा झाला. घरी इंटरनेट असल्यामुळे तो ही प्रश्न निकालात निघाला. घरी आता मी बऱ्यापैकी निवांतपणे कथा वाचत होतो. “तू तो अमुक तमुक लेखकाचा प्रवास वर्णनाचा लेख वाचलास का?” एके दिवशी सहकाऱ्याने मला विचारले. “नाही, कधी झाला प्रकाशित?” मी आश्चर्याने विचारले. “कालच मिसळपाव वर झाला आहे प्रकाशित”. “मिसळपाव?” एखादे खाद्यपदार्थाचे नाव असलेले संस्थळ पाककृती साठी नसून कथा, कविता लिहिण्यासाठी असू शकेल यावर माझा विश्वास बसत नव्हता. “ठीक आहे आज घरी गेल्यावर वाचतो”. असे बोलून आम्ही आमच्या कामाला लागलो. संध्याकाळी घरी इंटरनेट उघडल्यावर सहकाऱ्याने सांगितलेल्या लेखाची मला आठवण झाली. पण छे माझ्या स्मरणशक्तीने मला दगा दिला होता. सकाळी सांगितलेले नाव मी साफ विसरून गेलो होतो. काय बरे नाव होते? बहुतेक काहीतरी खाण्याच्या पदार्थाचे नाव होते एवढे आठवले. त्यावरून मी गुगलबाबांच्या मदतीने शोध घेऊ लागलो. ‘वडापाव’ असे टंकून मी शोध सुरु केला. त्यावर नेहमीप्रमाणे गुगलबाबांनी असंख्य पाककृती आणि फोटो दाखविले. त्याचवेळी सौ. संगणकाच्या पडद्यावर काय आले आहे हे पाहण्यासाठी डोकावल्या. त्यावरील वडापावचे फोटो पाहून आज इंटरनेट पाककृतीच्या सहाय्याने मी सर्वांसाठी वडापाव तयार करणार असा तिचा गैरसमज झाला. “आज आमचे भाग्यच उजळले म्हणायचे”. नेहमीप्रमाणे संधी साधून सौ. ने टोमणा मारला. झालं, गैरसमज दूर करण्यासाठी मला हॉटेलचा भुर्दंड पडला. अशा प्रकारे मिसळपाव च्या मायाजालात माझा पहिला प्रवेश सशुल्क झाला. यानंतर मी नियमित वाचनमात्र मिपाकर झालो. तसे इतरही संस्थाळांवरील वाचनही चालू होतेच. त्यामुळे विविध प्रकारचे माहितीपूर्ण लेख, कविता, प्रवास वर्णने इ. चा रतीब चालू होऊन माझी वाचन प्रकृती दिवसेंदिवस सुधारू लागली. असेच एक दिवस मिपावर एका कट्ट्याचा सचित्र वृतांत वाचनात आला. कट्ट्याचे फोटो पहात असताना एक ओळखीचा चेहरा फोटोत दिसला. प्रथम आश्चर्य वाटले कारण तो माझा अत्यंत जवळचा स्नेही होता आणि सार्वजनिक जीवनात तो एवढा पुढे गेला असेल असे वाटले नव्हते. “अग जरा इकडे ये, हा फोटो बघ”. मी सौ. ना हाक मारली. “हा आपला xxx आहे असे वाटते ना?” तिने फोटो बघून “अय्या ! खरच की”. म्हणून म्हणण्याला दुजोरा दिला. मी तत्काळ त्याच्या मोबाईलवर फोन लावला आणि खात्री करून घेतली. सदर गृहस्थ एक अत्यंत लोकप्रिय (?) आणि प्रचंड वाचनीय लेख लिहिणारा मिपाकर असेल असे मला कधी वाटलेही नव्हते. त्याची लिहिण्याची शैली एवढी सुंदर असेल हे एवढे वर्ष त्याच्या सोबत राहून कधी जाणवलेही नाही. तो ज्या क्षेत्रातील लेख लिहित असे त्यातील त्याचे ज्ञान पाहून मी खरोखरच थक्क झालो होतो. आता माझे मिपावरील वाचन वाढू लागले होते. सर्व लेख मी बऱ्यापैकी बारकाईने वाचत असे. विशेषतः त्यावरील प्रतिसाद वाचून चांगलीच करमणूक हि होत असे. माझा स्नेही कधी लेख लिहितोय आणि मी तो वाचून संपवतोय असे व्हायचे. लेख वाचल्यानंतर त्याला फोन करून मी माझा प्रतिसाद कळवीत असे. प्रत्येक लेखकाची वेगळी लेखनशैली आणि त्यातून मिळणारी नानाविविध माहिती यामुळे मन प्रसन्न होत असे. सर्व लिखाण वाचनीय असे, पण काही लेखकांचा आवर्जून उल्लेख करावा वाटतो. प्रचेतस यांचे लेख अगदी दगडधोंड्यांमध्ये हि सौंदर्य असते हे दाखवून देत. डॉ. खरे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवांवरील सोप्या भाषेतील लेख अनेक उपयुक्त माहिती देत असतात. मुक्त विहारी यांचे विविध विषयावरील माहितीपूर्ण लेख, डॉ. म्हात्रे यांचे जगातील विविध देशातील प्रवास वर्णनांवरील सचित्र लेख., बोका-ए-आझम यांच्या गुप्तहेर कथा, इ. अनेक लेखक, सर्वांचा उल्लेख येथे करत नाही, अशी रत्ने मिपा चे ‍‌वांङमयीन सौंदर्य वाढवीत आहेत असे माझे मत होऊ लागले. हळूहळू आपणही मिपा परिवाराचा एक घटक होऊ शकतो का असा विचार मनात येत असे. पण दुसऱ्या क्षणी वाटे अरे आपली प्रतिभा एवढी कुठली, आपण म्हणजे शामभटाची तट्टाणी, आपला काय टिकाव लागतोय. याला आणखी एक कारण म्हणचे मिपाकरांचे भयानक आयडी. इतर संस्थाळांवरील आयडी कसे सोज्वळ वाटत. पण टवाळ कार्टा, अतृप्त आत्मा, चौकटराजा, इस्पिकचा एक्का, विक्षिप्त आदिती, पैसा अशी नावे वाचून उरात धडकी भरत असे. आपण लेख लिहिला तर अशा नावाचे आयडी आपल्याला कोपऱ्यात घेऊन आपल्या लेखाचे वस्त्रहरण करतील अशी हि एक भीती मनात होती. त्यामुळे मिपा एक टवाळखोरांचा अड्डा असावा असा (गैर)समज बरेच दिवस मनात होता. बोका-ए-आझम सारखे आयडी आपल्याला ताटाखालचे मांजर बनवतील आणि आपल्याला जॅक डॅनियल ला शरण जावे लागेल कि काय असे वाटता राही. पण हे गैरसमज दूर होण्यास मोठा हातभार लागला तो मिपा कट्ट्यांचे वृतांत वाचून. बरेच आयडी हे एकमेकांना कधी भेटले हि नसत तरी जुने मित्र असल्यासारखे लिखाणाला प्रतिसाद देणे, कितीही वादविवाद झाले तरी कट्ट्यावर एकमेकांच्या गळ्यात गळे घालणे ह्या सारख्या गोष्टी हीच मिपा ची मोठी शक्तीस्थळे आहेत याची खात्री पटू लागली. इतर संस्थळांच्या कट्ट्यामध्ये कंपूबाजी असते असे कानावर येत असे. पण येथे असे नक्की नसेन(?) असे फोटो आणि वृतांत वाचून वाटू लागले. वाशी येथे झालेला कट्टावृतांत वाचून आपणही सामील व्हावे असे आता तीव्रतेने वाटू लागले. चला, काठावरून गम्मत बघण्यापेक्षा आपणही पाण्यात उडी मारू, नाही आले पोहोता तर तुम्ही सर्वजण आहातच हा विचार करून मी मिपासागरात प्रवेश केला आहे. पाहूया आणि तो पर्यंत पोहुया. -एक नवमिपाकर
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
10083 वाचन

💬 प्रतिसाद (76)

प्रतिक्रिया

लोल!

आदूबाळ
Mon, 07/18/2016 - 12:46 नवीन
लोल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

छान.

रातराणी
Mon, 07/18/2016 - 11:51 नवीन
छान.
  • Log in or register to post comments

मेरा प्यारा घोडा वापस आया रे.

सनईचौघडा
Mon, 07/18/2016 - 15:07 नवीन
मेरा प्यारा घोडा वापस आया रे.
  • Log in or register to post comments

मेरा प्यारा घोडा वापस आया रे.

संजय पाटिल
Tue, 07/19/2016 - 13:02 नवीन
मेरा प्यारा घोडा वापस आया रे.>>>> असं आहे होय? बर बर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सनईचौघडा

मिपावर स्वागत !!

मराठी कथालेखक
Mon, 07/18/2016 - 15:34 नवीन
मिपावर स्वागत !!
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय ..

चिनार
Mon, 07/18/2016 - 15:38 नवीन
छान लिहिलंय .. मिपावर स्वागत...!
  • Log in or register to post comments

मिपावर स्वागत ;)

मितभाषी
Mon, 07/18/2016 - 16:22 नवीन
मिपावर स्वागत ;) बाकी ते पिडिएफ वाले आणि कट्टेकर कोण तेही जाहीर करा.
  • Log in or register to post comments

खर्‍या अर्थाने ....

प्रसाद गोडबोले
Mon, 07/18/2016 - 16:32 नवीन
खर्‍या अर्थाने .... मिपा जन्मदिवसाच्या शुभेच्छा , मोठ्ठे व्हा =))))
  • Log in or register to post comments

हाफशेंच्युरी निमीत्त श्री.संत

जेपी
Mon, 07/18/2016 - 19:05 नवीन
हाफशेंच्युरी निमीत्त श्री.संत घोडेकर यांचा सत्कार एक 'जुना संत'ची बाटली,एक जिबीचा नेटपॅक आणी एक अरबी तट्टु देऊन सत्कार करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम मिपा कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

ही पण द्या!

सूड
Mon, 07/18/2016 - 19:25 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

आवळा सुपारी.

अत्रुप्त आत्मा
Mon, 07/18/2016 - 19:35 नवीन
आवळा सुपारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

असं नाइ अस नाई

अभ्या..
Mon, 07/18/2016 - 19:38 नवीन
असं नाइ अस नाई विथ यमक पायजे. . आवळा सुपारी, भर दुपारी किंवा आवळा सुपारी, सकाळच्या पारी वगैरे वगैरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

तं जल्लं आमच्या बागंतलं आवलं

सूड
Mon, 07/18/2016 - 19:38 नवीन
तं जल्लं आमच्या बागंतलं आवलं काडलं नाय मांगच्या येलंला? त्याजी बनवली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

_/\_

संत घोडेकर
Mon, 07/18/2016 - 19:18 नवीन
आभारी आहे
  • Log in or register to post comments

च्यायला नवीन आयडी. तेबी इतका

अभ्या..
Mon, 07/18/2016 - 19:33 नवीन
च्यायला नवीन आयडी. तेबी इतका वाजत गाजत? कुणाच्या वशिल्याने आलाय?
  • Log in or register to post comments

इतकी वेचून वेचून जुन्या

कंजूस
Mon, 07/18/2016 - 19:50 नवीन
इतकी वेचून वेचून जुन्या लोकांची नावं घेतलीत की शिआइडी लगोलग कामाला लागलेत.आंबेगावपासून कासारवाडी फाटकापर्यंत बंदोबस्त लावलाय.
  • Log in or register to post comments

=)

नीलमोहर
Mon, 07/18/2016 - 20:04 नवीन
सब घोडे बारा टके, असं सर्वच ठिकाणी नसतं.
  • Log in or register to post comments

टक्याचा काय संबंध नै हो इथे.

सूड
Mon, 07/18/2016 - 20:31 नवीन
टक्याचा काय संबंध नै हो इथे. बाराचा नक्कीच असू शकेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

घोडेकर, दोनचार लेख पाडा

खटपट्या
Mon, 07/18/2016 - 21:23 नवीन
घोडेकर, दोनचार लेख पाडा म्हंजे लगेच वळख पटल...तसंबी वळखलं हायच म्हना...उधळा काय घोडे उधळायचे ते...
  • Log in or register to post comments

बापरे!

संत घोडेकर
Mon, 07/18/2016 - 22:21 नवीन
लेखात लिहिल्याप्रमाणेच विचित्र आयडी घेतल्यामुळे काय होऊ शकते हे आलेल्या प्रतिक्रियांवरून अनुभवता आले
  • Log in or register to post comments

डुआयडीची पण शंका घेत आहेत लोक

मोहनराव
Tue, 07/19/2016 - 13:49 नवीन
डुआयडीची पण शंका घेत आहेत लोक.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संत घोडेकर

वेगळंच नाव घेतलं आहे.

उडन खटोला
Tue, 07/19/2016 - 14:55 नवीन
वेगळंच नाव घेतलं आहे. पब्लिसिटी साठी काय? आम आदमी पार्टी शी संबंधित असावेत काय?
  • Log in or register to post comments

इतकं लिहून सुध्दा माझ्या पदरी

Anand More
Sat, 07/23/2016 - 19:58 नवीन
इतकं लिहून सुध्दा माझ्या पदरी शेवटी उपेक्षाच आली... हाय रे दैवा... या संताजीला हा घोडा दिसूच नये?
  • Log in or register to post comments

छान लिहील आहे

ज्योति अळवणी
Sat, 07/23/2016 - 20:07 नवीन
संत महाराज सुरवातीला इथेले id बघून मी देखील गोंधळले होते. जे काही थोड फार लिहिते ते इथे टाकले आणि त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाले. इथली कौतुकाची भाषा समजून घ्यायला वेळ लागतो हो. पण हळू हळू जमायला लागले आहे. छान लिहिला आहात लेख.
  • Log in or register to post comments

वसंत घोडेकर...?

संदीप डांगे
Sun, 07/24/2016 - 11:02 नवीन
वसंत घोडेकर...?
  • Log in or register to post comments

स्वागत आहे. थोडा जोर लावा

अभिजीत अवलिया
Sun, 07/24/2016 - 16:21 नवीन
स्वागत आहे. थोडा जोर लावा घोडेकर. पहिल्याच धाग्यात शतक मारल्यास मिपा परिवारातर्फे विशेष सत्कार करण्यात येतो शनिवारवाड्यावर.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा