मला वाटते लहानपणापासून तालाचे आणि आपले नकळत नाते जुळत असते. बाळाला झोपवताना एका विशिष्ठ लयीत वर खाली होणारी मांडी, अंगाई म्हणताना पाठीवर थोपटताना दिलेला ताल ह्या सर्व गोष्टी बाळाला शांत करतात ह्या त्यातील स्पर्शामुळे व लयीमुळे. बरेचदा मी असे ऐकले आहे की बायकोची झोपमोड होते जर का नवऱ्याने घोरण्याची लय बदलली तर ! काय असतो हा ताल किंवा लय? ज्याला इंग्रजीत आपण rhythm म्हणतो. एका विशिष्ठ वेळेने परत परत होणारी गोष्ट म्हणजे ताल. प्रामुख्याने ह्याचा संबंध आपण फक्त संगीताशीच लावतो. पण असे नाहीये. आपल्या आजूबाजूला हा ताल सगळीकडेच सापडतो. आपल्या छातीत होणारी धडधड ही तालबद्ध असणेच हिताचे असते. कधी हिचा ठोका चुकला तर काय होते ह्याची तुम्हाला माहिती आहेच. दिवस रात्रीचा क्रम, विशिष्ठ कालावधीने येणारे ॠतू हे सगळे तालचक्रातच फिरत असतात. असा हा ताल आपल्या घराला घरपण देण्यात हातभार लावतो. कसा ते आपण बघू.
डिझाईनचे “ ताल / rhythm” हे तत्व सजावटीत वापरणे खूप सोपे आणि हमखास उठाव देणारे आहे. जसे गाण्यामध्ये प्रत्येक कडव्यानंतर आपण धृवपदावर येतो, तसेच खोलीमध्ये जेव्हा थोड्या थोड्या अंतराने आपल्याला एखादा रंग, टेक्चर, आकृती किंवा एखादी विशिष्ठ प्रकारची रेघ भेटते तेव्हा सजावटीत “ताल” तयार होतो. सजावटीत ह्या गोष्टी ध्रुवपदा सारख्या काम करतात. ह्यामुळे होते काय की सजावटीत visual flow तयार होतो. एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीकडे नजर विनासायास फिरते. वर्तूळ पूर्ण झाल्याने सजावटीत एकप्रकारची स्थिरता येते.
तालाचे हे तत्व समजण्यास अतिशय सोपे असल्याने बहुतांशी लोकांची ह्याला पसंती असते. ह्यामध्ये रचना व्यवस्थित दिसते. तुमच्या खोलीतील सर्वात महत्वाच्या गोष्टीला केंद्र भागी ठेवून त्याच्या आजूबाजूला बाकीची मांडणी करावी. समजा तुमच्याकडे सुंदर नक्षीकाम केलेला अॅन्टिक पलंग आहे, त्यावरील ती नक्षी जर का तुम्ही कपाटाच्या हॅन्डल्सवर, आरशाच्या एका कोपऱ्यात कोरून घेतली तर आपली नजर पलंग, हॅन्डल्स, आरसा अशी फिरती राहील. त्याचप्रमाणे प्रसिद्ध चित्रकाराचे एखादे पेंटिंग संग्रही असणे म्हणजे केव्हढीतरी अभिमानाची गोष्ट. पण ते पेंटिंग तेव्हाच चांगले दिसेल जेव्हा आजूबाजूची सजावट त्याला उठाव देईल. अशावेळी ह्या पेंटिंग मधील एखादा रंग, चादर- पडदे किंवा फुलदाणीवर घेतला तर खोली लयबद्ध दिसेल. संगीत सोडून खोलीसाठी “लयबद्ध” हा शब्दप्रयोग एखादे वेळेस खटकेल. पण लय ही फक्त ऐकण्याची नाही तर अनुभवायची, दिसण्याचीसुद्धा गोष्ट आहे हे तुम्हाला लवकरच जाणवेल.

तुम्ही संगीतकार रावेल ह्यांचे “ बोलेरो” हे अफलातून संगीत ऐकले आहे? नसेल तर युट्युबवर जरूर ऐका. सुरवात होते ती अतिशय मंद सुरावटींनी. एवढी मंद, की आपण आवाज फुल्ल करतो. पण हळू हळू १७ मिनिटे वाजणारी ती एकच धून आपल्याला इतकी कमालीच्या उंचीवर नेऊन ठेवते की, पुढची काही मिनिटे आपण त्या सुरावटीतून बाहेरच पडू शकत नाही. लोकं म्हणतात “बोलेरो” ची न आवडणारी गोष्ट म्हणजे हे संगीत १७ मिनिटांनी संपते ही! इथे ह्याचा उल्लेख करायचा उद्देश्य म्हणजे ज्याप्रमाणे ह्या संगीतात progression किंवा चढत्या /उतरत्या भाजणीचा( मंद सुरावटीपासून तारसप्तकापर्यंत) उपयोग केला आहे त्यामुळे सूर तेच राहून नाविन्य प्राप्त झाले आहे. असाच ताल किंवा rhythm आपण सजावटीत वापरू शकतो. जेव्हा आपण पुनरावृत्ती म्हणतो तेव्हा एखादी गोष्ट जशीच्या तशी परत परत मांडत जाणे गृहीत धरतो. पण एखादी वस्तू छोट्या पासून मोठ्यापर्यंत मांडल्यास सजावट जास्त आकर्षक दिसते. माझ्या एका बहिणीला घुबड म्हणजे जीव की प्राण. त्याचा आकार, त्याचे ते मोठाल्ले डोळे ह्यांच्या आकंठ प्रेमात आहे ती. तिच्या घरात प्रवेश द्वारापासून बाल्कानीपर्यंत लाकूड, दगड, कापडापासून बनवलेली छोटी मोठी घुबडे शेल्फवर, टेबलाच्या खालती आधारासाठी , सोफ्याच्या बाजूला टीकोस्टरवर अतिशय कलात्मकतेनी ठेवलेली आहेत. त्यामुळे तिच्या घरी गेल्यावर सर्व जगानी अशुभ ठरवलेल्या ह्या पक्ष्याच्या गोल गोल डोळ्यांत आपण देखील हरवून जातो. ही सजावट आपल्यालापण ह्या पक्ष्याच्या प्रेमात पाडते. बऱ्याच लोकांना गणपती, टेराकोटाच्या मूर्ती, मेणबत्त्या ,शंख शिंपले जमा करायचा नाद असतो. हा तुमचा संग्रह छोट्यापासून मोठ्यापर्यंत कौशल्याने मांडल्यास नक्कीच तुमचे घर बाकीच्या घरांपेक्षा हटके दिसेल.
तर हे झाले आपल्या सजावटीत rhythm किंवा ताल कसा आणायचा ह्या संदर्भात. जसे संगीतामध्ये व पोशाखात काळानुसार बदल होत गेले, तसेच बदल सजावटीतपण होत गेले. साधारण २०व्या शतकाच्या शेवटी शेवटी एक नवा डिझायनर लोकांचा कंपू तयार होऊ लागला. ह्या लोकांनी वर्षानुवर्षे चालत आलेल्या साचेबद्ध सजावटींना फाटा द्यायला सुरुवात केली. महागड्या सागवानी टेबलाला प्लॅस्टिकच्या खुर्च्या का नकोत, सोफे एकाच रंगाचे का पाहिजेत, व्हिक्टोरियन प्रकारच्या पलंगावर चित्त्याच्या कातडीचे प्रिंट का नको असे प्रश्न त्यांना पडायला लागले. आणि ह्याचे उत्तर शोधता शोधता त्यातून पुढे आलेली शैली म्हणजे “फ्युजन”. ह्या शैलीत सगळी बंधने गळून पडली. तुम्ही काहीही करू शकता, अट फक्त एकच होती ती म्हणजे “ सुसंगती किंवा harmony “ सांभाळणे. प्रत्येक गोष्ट एकमेकाशी अशी जुडली गेली पाहिजे की जेणेकरून संपूर्ण रचना “एक” वाटेल. ह्यावरून तुम्हाला जिगसो पझलची आठवण आली असेल. प्रत्येक तुकडा वेगळा. पण चित्र तेव्हाच पूर्ण होते जेव्हा सगळे तुकडे अचूक जागच्या जागी बसतात. आधी लोक ह्या प्रकाराला “कशावरही काहीही” म्हणून हिणवायचे. पण वरकरणी सोप्पी वाटणारी ही शैली खरतर खूप अवघड आहे.

सजावटीत अनेक मार्गांनी आपण हार्मनी आणू शकतो. जसे आकार, रंग, टेक्चर व माल-ज्या पासून त्या वस्तू बनवल्या आहेत. पण ह्या प्रकारात डिझायनरला सर्वात जास्त काळजी घ्यावी लागते ती proportions किंवा एक दुसऱ्याशी असलेल्या प्रमाणबद्धतेची . ह्या प्रकारात डिझायनरचे कसब सर्वात जास्त पणाला लागते. सजावटीत “सुसंगती” आणायला समतोल साधणे सर्वात महत्वाचे. एकाही गोष्टीची पुनरावृत्ती न करता वेगवेगळ्या आकारांची , रंगाची सांगड घालणे हे खायचे काम नाही. जसे आपटेंच्या घरात नेनेंच्या समान संस्कृतीमधून आलेल्या मुलीचे फारसे कौतुक होणार नाही. पण तेच पूर्ण वेगळ्या background च्या , वेगळ्या संस्कारात वाढलेल्या, पण आपटेंच्या घरात पूर्ण एकरूप झालेल्या बॅनर्जींच्या मुलीचे जास्त कौतुक होईल. हे तसेच आहे. ज्याला आपण unity in variety म्हणतो तसे.
तर अशी ही सजावटीची दोन तत्वे. एक ताल व दुसरे सुसंगती. कोणाची मदत न घेता तुमची तुम्हाला सजावट करायची झाल्यास “ताल” तत्वानुसार करू शकता. पण तुम्हाला तुमची गृहसजावट संतुलन / harmony ह्या तत्वावर आधारीत करायची झाल्यास कोणा तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेतल्यास जास्त चांगले. नाहीतर सजावटीचे “फ्युजन” होण्याऐवजी “कन्फ्युजन” व्हायला वेळ लागणार नाही.
प्रतिक्रिया
8 Jun 2016 - 11:59 am | किसन शिंदे
छान लेख
8 Jun 2016 - 12:44 pm | अत्रन्गि पाउस
पुन्हा नीट वाचले पाहिजे ....
पुलंचे उद्गार आठवले ...
चित्रकाराला सूर सापडतो आणि गायक 'रंग' भरतो
8 Jun 2016 - 2:22 pm | सिरुसेरि
इंटिरिअर डिझाईनबद्दल सुरेख माहिती .
8 Jun 2016 - 2:27 pm | मारवा
अत्यंत सुंदर लेख आहे. तुमच्या सौंदर्यदृष्टी ची जाणीव लेख वाचतांना होत राहते.
बाय द वे तुमच्या बहीणीला सांगा की सर्व जग घुबडाला अशुभ मानत नाहीत.
त्यासाठी लक्ष्मीचा घुबडाशी असलेला संबंध व ग्रीक मायथॉलॉजी ची घुबडाप्रती मान्यता पॉझीटीव्ह आहे
या कीमान दोन बाबी सांगा तिला.
8 Jun 2016 - 10:48 pm | एस
छान लेख आहे. वास्तुरचनाशास्त्र वा अंतर्गत सजावटीमधले सौंदर्यशास्त्र छान मांडले आहे.
8 Jun 2016 - 11:02 pm | लॉरी टांगटूंगकर
खूप इन्ट्रेस्टींग! मस्त कल्पना आणि तितकीच सुंदर मांडणी.
धन्यवाद.