✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

किल्ला चित्रपटाच्या निमित्ताने

प
पैसा यांनी
गुरुवार, 06/02/2016 - 23:20  ·  लेख
लेख
1 रविवारी "किल्ला" (२०१५) पाहिला. अतिशय सुंदर अनुभव देणारा चित्रपट. १०/११ वर्षांचा चिनू आणि त्याची आई चिनूचे वडील नुकतेच गेल्यावर आयुष्याशी तडजोड करत आहे ती परिस्थिती स्वीकारायला शिकतात, त्यांच्या आयुष्यातल्या साधारण एका वर्षातल्या घडामोडीं या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतात. चित्रपट प्रदर्शित होऊन आता बरेच दिवस झालेत त्यामुळे कथेचा काही भाग इथे त्यानिमित्ताने मनात आलेले विचार लिहिताना आला तर तो स्पॉयलर ठरू नये. चित्रपटात फोनचा वापर, मुलांचे सुटीतले उद्योग आणि एका प्रसंगात ऑडिओ कॅसेट्सच्या टेपचा गुंतवळ सोडवणे हा प्रकार पाहता चित्रपट कथा १९९४-९५ च्या दरम्यान घडत असावी असे वाटते. चिनूच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे आणि त्याच्या आईची बदली पुण्याहून गुहागरसारख्या एका लहान गावात झाली आहे. तिला ऑफिसात तिच्या स्वतःच्या अडचणी आहेत. चिनूला नवीन जागेत कोणी मित्र नाहीत. मामा आणि मामेभाऊ यांच्या ओळखीच्या सुरक्षित जगातून तो एकदम नव्या जागेत वेगळ्या वातावरणात येऊन पडला आहे. आपल्या मुळापासून उखडले जाणे आणि एकाकीपणा याचा त्याला आयुष्यात प्रथमच सामना करावा लागल्याने तो भांबावतो आणि आणि आपली नाराजी 'हे आवडत नाही, ते आवडत नाही' असे करून आईला दाखवून देतो. दोघांनाही या परिस्थितीशी जुळवून घेणे अवघड जाते आहे. शाळेतल्या काही टग्या मुलांच्या ग्रुपशी चिनूची मैत्री जमू पाहते. तो स्वभावाने तसा थंड आहे, त्या मुलांनी कुत्र्याना त्रास देणे वगैरे प्रकार त्याला आवडत नाहीत. पण दुसरे कोणी मित्रही नाहीत. त्या मुलांशी काहिसे जमते तोपर्यंत त्या मुलांसोबत एका निर्जन किल्ल्यावर गेलेला असताना वादळ पावसात ते मित्र त्याला एकटा सोडून जातात आणि या प्रकाराने तो पुरता हादरून जातो. एकदा वेळ घालवण्यासाठी एका मासेमारी लाँचवरून तो खोल समुद्रात जातो. तिथे आणि किनार्‍यावर शेकोटीपाशी त्या मासेमारासोबत चिनूचा तुटपुंजा संवाद त्याला घरी आई आहे, सगळेच हरवले नाही याची जाणीव करून देतो आणि चिनू घरी येऊन आईला घट्ट गळामिठी मारतो तो हलवून टाकणारा क्षण आहे. तेव्हाच बंड्या हा त्याचा उनाड मित्र त्याला दिवसभर शोधत होता हे समजून येते आणि चिनू विरघळतो. परीक्षा संपताना त्यांची मैत्री पक्की होते आणि मग पुढचे काही दिवस ते खूप मजेत घालवतात. नेमके तेव्हाच चिनूच्या आईची पुन्हा गुहागरहून सातार्‍याला बदली होते. सिनेमाच्या सुरुवातीला आईला "ही बदली रद्द नाही का होणार?" असे विचारणारा चिनू पुन्हा तोच प्रश्न विचारतो. मात्र यावेळी तो तेवढा उदास नाही. सातार्‍याला जाऊन बासरी शिकेन असे तो आईला सांगतो आणि सामान आवरायला उत्साहाने मदतही करतो. आपल्याला सतत असे विस्थापित होऊन दुसरीकडे जावे लागेल हे कदाचित त्याला आता उमजले आहे. आधीच समजूतदार असलेला चिनू अधिकच शांत झाला आहे. चित्रपटाच्या शेवटच्या भागात चिनूला मित्र खर्‍या अर्थाने मिळतात मात्र त्याना सोडून त्याला लगेच पुढे जावे लागते. प्रत्यक्षात सुरुवातीला ज्या किल्ल्यावर वादळ पावसात त्याचे मित्र त्याला एकटा सोडतात त्या किल्ल्यावर चिनू पुन्हा जाऊ शकत नाही पण चित्रपट संपताना त्याच्या मनातल्या किल्ल्यावर मात्र वादळाचा मागमूस नाही. फुलं, पक्षी आणि लख्ख ऊन असलेल्या किल्ल्यात त्याचे मित्र मजेत बसलेले आहेत. आयुष्य पुढे निघून गेलं तरी त्याच्या मनातले त्याचे मित्र तिथेच तसेच असतील. एक प्रसंग दीपगृह पाहण्याचा. त्याचे वर्णन चिनू मित्रांकडे करतो ते मुळातून ऐकण्यासारखे. दीपगृहाच्या पायर्‍या चढताना खूप त्रास होतो मात्र वर पोचल्यावर छान वाटते, एखादी बोटही दिसते; हेच सूत्र किल्ल्याच्या प्रसंगातही वापरले आहे. किल्ल्यातल्या भुयारात असताना चिनू प्रकाशाच्या दिशेने जायला निघतो पण विजेच्या कडकडाटाला घाबरून पुन्हा मागे पळतो आणि मग मित्रांपासून दुरावतो. शेवट मात्र त्याच भुयारातून वर आल्यावर त्याला त्याचे मित्र आपल्याच नादात बसलेले दिसतात. तीच जागा आणि तेच मित्र. फरक फक्त पायर्‍या चढून येण्याचा आहे. मात्र आता ते मित्र त्याला पाठमोरे असतात. कदाचित आपल्याशिवाय त्यांचे आयुष्य पुन्हा पहिल्यासारखे सुरू आहे याची चिनूला जाणीव होते. शेवट चिनू सातार्‍याला जायला निघतो तो त्याने माया लावलेला भटका कुत्रा आणि सायकल बंड्यापाशी सोडून. एरवी कुत्र्यांचा कर्दनकाळ असलेला बंड्या आता मात्र त्या कुत्र्याच्या डोक्यावरून हात फिरवताना दिसतो. हा चिनूमुळे त्याच्यात घडून आलेला बदल आहे. कदाचित कुत्रा आणि सायकल हे दोन दुवे मित्रासोबत कायम ठेवून चिनू सातार्‍याला जातो आहे, कदाचित तो त्यांच्यानिमित्ताने पुन्हा कधीतरी गुहागरला येईलही. चिनूच्या आधीच्या आठवणींमधे आता किल्ला आणि गावातले मित्र यांची भर पडली आहे. आयुष्यातल्या अनेक थांब्यांवर आपण आपल्या आठवणी अशाच कोणाजवळ ठेवून पुढे जातो, आपल्याला जावे लागते आणि त्यांच्या आठवणी फक्त आपल्यासोबत येतात. सबंध चित्रपटात एक उदासवाणे वातावरण भरून राहिले आहे. पाऊस आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गातला ओळखीचा निसर्ग ही या चित्रपटातली पात्रेच आहेत. चिनूची भूमिका करणारा अर्चित देवधर, बंड्या झालेला पार्थ भालेराव आणि अमृता सुभाष आपापल्या भूमिका अक्षरशः जगले आहेत. पण चित्रपटातल्या इतर कलाकारांनीही अतिशय नैसर्गिक अभिनय केला आहे. हे यश दिग्दर्शक अविनाश अरूण याचे. त्याचा पहिलाच चित्रपट आहे हे ऐकल्यावर खूपच कौतुक वाटले. प्रत्येक दृश्यात त्याच्यातला सिनेमॅटोग्राफर दिसतो. दुर्दैव की या चित्रपटाला डिस्ट्रिब्युटर्स मिळत नव्हते. बर्लिन चित्रपट महोत्सवात यश मिळाल्यानंतर चित्रपट वितरित होऊ शकला. चित्रपटाच्या स्थळ-काळाचा विचार करता चित्रपटातली बोलीभाषा आणि काही पात्रांच्या कपड्यांचा नीट विचार करून वापर करणे अपेक्षित होते. पण नवीन दिग्दर्शकाचा पहिलाच चित्रपट असल्याने तेवढ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येते. त्याचवेळी चित्रपटातले अनेक प्रसंग पाहताना त्याला दाद दिल्याशिवाय रहावत नाही. वेळ घालवण्यासाठी चिनूने ऑडिओ कॅसेट्सच्या टेपचा गुंतवळ सोडवून पुन्हा कॅसेटमधे गुंडाळण्याचा प्रसंग पाहून एकाच वेळी हसू येत होते आणि भावुकही व्हायला होत होते. प्रत्येकाला आपल्या आयुष्यातल्या आठवणींच्या किल्ल्यावर परत नेणारा हा चित्रपट पाहताना कितीदा डोळे भरून आले सांगता येणार नाही. अशाच अर्ध्या कच्च्या वयातल्या काही समांतर आठवणी, अनुभव गाठीला असल्याने सहजच चिनूच्या व्यक्तिरेखेशी स्वतःला जोडू शकले. केवळ लहान वय असल्याने तेव्हा खूपशा मायेच्या नात्यांकडे पाठ फिरवून गाव सोडून रत्नागिरीला जाऊन राहिले होते. आता ते इतके सहज शक्य होईल असे वाटत नाही. सिनेमा बघून चार दिवस झाले तरी जिथे आयुष्याचा एक तुकडा सोडून आले त्या रत्नागिरीजवळच्या एका खेड्यात पुन्हा पुन्हा मनानेच पोचते आहे. या माझ्या आठवणींच्या किल्ल्यात प्रत्यक्षात जावेसेही खूप वाटते. पण काळाच्या निष्ठूर हाताने या किल्ल्यात काय बदल झाले असतील याची भीतीही वाटते. स्वप्नातून जागे होण्यापेक्षा आठवणींचा किल्ला तसाच आहे तिथे राहू दे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
12189 वाचन

💬 प्रतिसाद (80)

प्रतिक्रिया

लेख सुबक, पण परिचय काहीसा

सस्नेह
Fri, 06/03/2016 - 10:59 नवीन
लेख सुबक, पण परिचय काहीसा अस्वस्थ करून गेला. चित्रपट आवर्जून पाहावा, असं परिचय वाचून नाही वाटलं. पैताईचे लेखन फारच कमी असते पण दर्जेदार.
  • Log in or register to post comments

छान परीक्षण. मीहि पाहिला

शान्तिप्रिय
Fri, 06/03/2016 - 11:00 नवीन
छान परीक्षण. मीहि पाहिला टीव्हीवर आवडला. कथा जरा जटील वाटते.पण "विहिर" चित्रपटाइतका अनाकलनीय नक्कीच नाही.
  • Log in or register to post comments

विहीर तर अजिबातच झेपला नव्हता

मराठी कथालेखक
Fri, 06/03/2016 - 11:23 नवीन
विहीर तर अजिबातच झेपला नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शान्तिप्रिय

'विहीर' भयंकर आवडला होता.

जव्हेरगंज
Fri, 06/03/2016 - 18:00 नवीन
'विहीर' भयंकर आवडला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

मलाही विहीर फार आवडला होता पण

रेवती
Sat, 06/04/2016 - 07:10 नवीन
मलाही विहीर फार आवडला होता पण एका मर्यादेनंतर बंद केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

छान परीक्षण. मीहि पाहिला

शान्तिप्रिय
Fri, 06/03/2016 - 11:01 नवीन
छान परीक्षण. मीहि पाहिला टीव्हीवर आवडला. कथा जरा जटील वाटते.पण "विहिर" चित्रपटाइतका अनाकलनीय नक्कीच नाही.
  • Log in or register to post comments

सुंदर समीक्षा

मारवा
Fri, 06/03/2016 - 11:06 नवीन
सुंदर वेध घेतलाय सिनेमाचा लेख वाचतांना नकळत लेखिकेची संवेदनशीलता व चित्रपटाच्या अनुभवाशी झालेली समरसताही जाणवत राहते. हे त्या भौगोलिक परीसराशी असलेल्या जवळिकीमुळे देखील होत असावे का ? हा चित्रपट बघायला हवा
  • Log in or register to post comments

एक प्रश्न पडला

मारवा
Fri, 06/03/2016 - 11:12 नवीन
तो वरीलच प्रश्न असा की समजा एक शिवाजी महाराजांवरील चित्रपट आहे. व त्यात सह्याद्री गड किल्ले यांच चित्रीकरण आहे. तर एक महाराष्ट्रीयन प्रेक्षक असेल व त्याच्या ते चांगल परीचयाच असेल व तो हा चित्रपट पाहत असेल तर ती बॅकग्राउंड त्याच्या चित्रपट पाहतांनाच्या अनुभवावर कसा प्रभाव टाकते व एक समजा इटालियन माणुस आहे या सर्वांशी अपरीचीत तर त्यावर कसा प्रभाव पडत असेल ? तो मग कथानकात फोकस होत असेल काय होत असेल
  • Log in or register to post comments

मला वाटते

पैसा
Fri, 06/03/2016 - 11:18 नवीन
तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. आपले जुने अनुभव नव्या अनुभवांवर प्रभाव टाकतात. सिनेमात दृश्य संवाद अभिनय दिग्दर्शन याचा समतोल असेल तर तो सगळ्यांना आवडेल. पण तसे नसेल तर ज्यांना असे काही समांतर अनुभव असतील त्याना सिनेमा जास्त भावेल. काहीजणांना जवळचे अनुभव नसतील तर त्यातली सुंदर दृश्ये किंवा नाट्यमयता याचा तुकड्या तुकड्यानी जास्त प्रभाव पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

लहान मुलांचे भावविश्व वगैरे

मराठी कथालेखक
Fri, 06/03/2016 - 11:21 नवीन
लहान मुलांचे भावविश्व वगैरे दाखविणारे चित्रपट बघण्यात रस नसल्याने किल्ला पाहिला नाही.. मराठीत असे चित्रपट खूपच मोठ्या संख्येने येतात आणि एलिझाबेथ एकादशी वगैरे कंटाळवाणे चित्रपट पाहून आता असे चित्रपट बघायची इच्छा नाही. तुमचा लेख चांगला आहे.
  • Log in or register to post comments

पहायचा आहे अजुन.

उल्का
Fri, 06/03/2016 - 11:26 नवीन
छान लिहिले आहेस. शेवटच्या वाक्यातील 'आठवणींचा किल्ला' हा शब्द्प्रयोग खास आवडला.
  • Log in or register to post comments

एलिझाबेथ एकादशी आवडला.

सतिश पाटील
Fri, 06/03/2016 - 12:46 नवीन
एलिझाबेथ एकादशी आवडला. पण किल्ला ने अपेक्षाभंग केला.
  • Log in or register to post comments

अशा चित्रपटांचे कथानक,

सतिश गावडे
Fri, 06/03/2016 - 13:09 नवीन
अशा चित्रपटांचे कथानक, त्यातली पात्रं, प्रसंग प्रेक्षकांच्या व्यक्तीगत आयुष्याशी कितपत रेझोनेट होतात यावरुन चित्रपट आवडतो किंवा आवडत नाही. आमच्या एका मित्राला "फाईंडिंग फॅनी" आवडला होता. कारण त्या चित्रपटातील ख्रिश्चन माई त्याच्या बालपणीच्या आठवणींशी रेझोनेट झाली. खुद्द या धाग्याच्या लेखिकेने हा चित्रपट तिच्या व्यक्तीगत आयुष्याशी रेझोनेट होत असल्याचे म्हटले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश पाटील

सुंदर सिनेमा आणि तेवढाच सुंदर

अनुप ढेरे
Fri, 06/03/2016 - 13:42 नवीन
सुंदर सिनेमा आणि तेवढाच सुंदर लेख!
  • Log in or register to post comments

छान लेख

मित्रहो
Fri, 06/03/2016 - 14:30 नवीन
चित्रपट बघितला नाही आता बघायला हवा. मला स्वतःलाही तरी असा अनुभव आला नाही. कधी कधी वाटायचे आपण पण वेगळ्या गावात वगेरे का जात नाही. माझ्या दहा वर्षाच्या मुलाने गावातल्या गावात घर बदलायला नकार दिला. अवांतरः लहान मुलांच्या मनातल्या भावना, त्यांच्या गरजा हा विषय सतत येतोय असे वाटते. येनारा गणवेष तसाच वाटतो, २० म्हणजे २० पण मुलांची शाळा वगेरे त्यातच मोडनारा.
  • Log in or register to post comments

सरकारी नोकरी असल्यामुळे

पूर्वाविवेक
Fri, 06/03/2016 - 15:24 नवीन
सरकारी नोकरी असल्यामुळे माझ्याही आई-बाबांच्या बदल्या व्हायच्या. मला कळते यातली वेदना. झाड रुजायला लागल की त्याला उपटून दुसरीकडे न्यायचं, असाच हा प्रकार आहे काहीसा.
  • Log in or register to post comments

किल्ला आवडला होता.

किसन शिंदे
Fri, 06/03/2016 - 15:38 नवीन
चित्रपटाची ओळख अगदी नेमक्या भाषेत दिलीये.
  • Log in or register to post comments

रिलीज झाला त्याच वीकेंडला

सूड
Fri, 06/03/2016 - 15:48 नवीन
रिलीज झाला त्याच वीकेंडला जाऊन पाह्यला होता. ह्याबद्दल काय वाटलं ते शब्दात सांगणं कठीण आहे.
  • Log in or register to post comments

लेख सात वेळा वाचून झाला आहे.

एस
Fri, 06/03/2016 - 22:52 नवीन
लेख सात वेळा वाचून झाला आहे. 'फारच छान' - टाईप लिहिण्यापेक्षा नंतर प्रतिक्रिया देईन सविस्तर. तूर्तास मनातल्या किल्यात फेरफटका मारून येतो जरा.
  • Log in or register to post comments

आवडलेला चित्रपट पण अगदी

अभ्या..
Sat, 06/04/2016 - 10:11 नवीन
आवडलेला चित्रपट पण अगदी मनापासून असे नाही. बरा वाटला. काहीतरी कमीय हे जाणवत होते. काय ते कळले नाही. प्रदीपदांच्या प्रतिसादाने थोडासा अंदाज आला पण परत पाहू शकणार नाही हा चित्रपट.
  • Log in or register to post comments

छान परीक्षण, मस्तं लिहिले

सानिकास्वप्निल
Sat, 06/04/2016 - 10:16 नवीन
छान परीक्षण, मस्तं लिहिले आहेस. चित्रपट पाहिलाय, बरा वाटला फारसा रूचला नव्हता,पण तुझा लेख उत्तम आहे, आठवणींचा किल्ला हे फार आवडले.
  • Log in or register to post comments

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 06/04/2016 - 18:54 नवीन
चित्रपट परिक्षण पोहचलं. धाग्यावरचे प्रतिसादही चांगले आले आहेत. चित्रपट मी थेट्रात पाहिलाय मला आवडलाय चित्रपट. लिहित राहा. हल्ली तुमचं लेखन कमी झालंय, अशी तक्रार करतो. पुलेशु. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

परीक्षण आवडलं.

भरत्_पलुसकर
Sun, 06/05/2016 - 11:15 नवीन
परीक्षण आवडलं.
  • Log in or register to post comments

सुरेख परिचय.पिक्चर बघतेच आता.

अजया
Sun, 06/05/2016 - 22:19 नवीन
सुरेख परिचय.पिक्चर बघतेच आता.
  • Log in or register to post comments

आवडलं

सखी
Mon, 06/06/2016 - 08:34 नवीन
परीक्षण आवडलं होतच पैताई, आज वेळ मिळताच पाहीला हा चित्रपट. उदास वातावरण असलं तरी काहीतरी सकारात्मक पाहतेय असं जाणवत होतं कदाचित तो आईच्या भूमिकेतला अटीट्युड मुलामध्ये आला असावा. मला ते दीपगृहाचे वर्णन तसेच सागराची कविताही खूप आवडली.
  • Log in or register to post comments

छान परीक्षण.

मार्मिक गोडसे
Mon, 06/06/2016 - 12:39 नवीन
छान परीक्षण. लो बजेट व लो लाइटमध्ये क्लोज अप शॉट घेणे हे तांत्रिकदृष्ट्या कठीण काम असते. क्लोजअप लेन्स नसेल तर टेली लेन्सनी क्लोज अप शॉट फोकस करणे फार त्रासदायक असते. मिडिअम शॉटमुळे चेहर्‍यावरील हावभावाबरोबर पात्रांची देहबोलीही टिपता येते. चेहर्‍यावरील सु़क्ष्म हावभाव दाखवण्याचा नादात बर्‍याचदा शॉटमधील सलगपणास बाधा येते. क्लोज अप शॉटमुळे प्रेक्षकापर्यंत हावभाव थेट पोचतात परंतू मिडिअम शॉटमुळे प्रेक्षकाला हावभाव, संवाद व पात्रांची देहबोली टिपणे थोडे जिकिरीचे होते.
  • Log in or register to post comments

बघायचा राहिलाच. आधीही आत्ताही

वेल्लाभट
Mon, 06/06/2016 - 13:13 नवीन
बघायचा राहिलाच. आधीही आत्ताही. बघायला हवा पण.
  • Log in or register to post comments

चित्रपट आवडलाच, आणि हे

मनिष
Mon, 06/06/2016 - 23:12 नवीन
चित्रपट आवडलाच, आणि हे लिखाणही मस्त झालंय!!!
अशाच अर्ध्या कच्च्या वयातल्या काही समांतर आठवणी, अनुभव गाठीला असल्याने सहजच चिनूच्या व्यक्तिरेखेशी स्वतःला जोडू शकले
माझेही तसेच झाले. त्यामुळेच मला लिहीता नाही येणार याविषयी....तुम्ही खूप छान लिहिलंय!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

पैसा
Wed, 06/08/2016 - 13:48 नवीन
सर्व वाचक आणि प्रतिसादकांना मनापासून धन्यवाद! 'किल्ला' सिनेमा पाहिल्यानंतर फेसबुकवर एक छोटी पोस्ट लिहिली होती. ती लोकांना आवडली, पण माझे मात्र समाधान झाले नव्हते. तिच्यात भर घालून मिपावर लिहिले आणि त्याला इथे उत्तम प्रतिसाद मिळाला. सिनेमा थोडा उदास, गंभीर असला तरी आशावादी शेवट आहे. ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी जरूर बघा!
  • Log in or register to post comments

लेखन आवडले. किल्ला पहिल्या

संदीप डांगे
Sat, 06/11/2016 - 13:24 नवीन
लेखन आवडले. किल्ला पहिल्या फटक्यात आवडला नव्हता. तिसर्‍यांदा आत "उतरला". माझी दोन्ही मुले ( वय ६ + २ ) लॅपटॉपवर पाहतात बरेचदा. त्यांना काय आवडतं त्यात हा प्रश्न मला पडतो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा