✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कातरवेळ

प
प्रचेतस यांनी
गुरुवार, 05/26/2016 - 22:20  ·  लेख
लेख
कातरवेळ,सूर्यास्तानंतर मिट्ट काळोख होईपर्यंतची ही वेळ, तशी जेमतेम पाऊण एक तासाची. पण ही वेळ कशी जीवघेणी असू शकते ह्याचा अनुभव मी क्षणोक्षणी घेत असतो. एकदा सुधागडला गेलो होतो. गडावर जायचा आजचा जो प्रचलित मार्ग आहे तो आहे पाच्छापुराहून. औरंगजेबाचा पुत्र शहजादा अकबर शहेनशहाशी बगावत करून आला होता ते संभाजीराजांचे साह्य घेण्यासाठी तेव्हा राजांनी त्याच्या सोय गडाच्या पायथ्याला असणाऱ्या एका लहानशा वाडीत केली होती. तेव्हापासून अकबराच्या छावणीमुळे ते ओळखलं जाऊ लागलं पाच्छापूर ह्या नावाने. आज ह्या मार्गावर एक भक्कमशी शिडी लावलीय. तेव्हा ती नव्हती. नाडसूरच्या एसटीने उतरलो ते धोडसे गावात. साधारण पाच साडेपाचच्या सुमारास. गडाचा पूर्वीचा राजमार्ग हा धोडसे गावातूनच जातो. गाव कसलं , लहानशी वाडी आहे. वाडीबाहेरचं एक लहानसं मंदिर आहे. रात्रीतून गड सर करायचा टाळून मंदिरातच पथार्‍या टाकायचा विचार केला. जेवायला बराच अवकाश असल्याने मंदिराच्याच ओसरीवर येऊन बसलो. मंदिरासमोरच काही अवशेष आहेत, फार वर्ष झाली असल्याने आता ते नेमके आठवत नाहीत. सूर्यास्त नुकताच होऊन गेला होता. मंदिराच्या डाव्या बाजूने किल्ला तर समोरच घनदाट झाडी. धुकट अंधार पडायला लागला. एक दोघे जण चुलाणासाठी काटक्या गोळा करायला गेले होते. ओसरीवर मी एकटाच. निरव शांतता पसरलेली, अचानक एक रितेपण मनी दाटून आलं. त्या कातरवेळी एकटक समोरच्या काळोख्या दाटीत दिठी लावून बसलो. जसाजसा अंधार गडद होत जावा तसतसा विचारही शुन्यवत होत गेले. पलीकडच्या झाडीतून भेकरांची भूंकणं वर चढायला लागलं. ह्यातच किती वेळ गेला कुणास ठाऊक? इतक्यात सोबतीही परत आले, उत्साहही परत येउ लागला पण कातरवेळेची शांतता काही मनातनं जाईना. दुसरा दिवस होता २६ जानेवारी. चांगलाच आठवतोय. त्या दिवसाची एक कहाणीच आहे. गडावर जायचा रस्ता चुकलो, इतका चुकलो की जवळपास ८ तास त्या बंबाळ्या रानात आम्ही फिरत होतो. एकदा एक डोंगर ओलाडून गेलो तर थेट समोर तैलबैला धडकी भरवत उभा ठाकला, एकदा एक्या मार्गे गेलो तर डोक्यावर थेट सुधागडाचा बोलका कडा, वाट इतकी चुकलो की एकदा गडाच्या राजमार्गाला लागलो अगदी मार्गावर थडी वैगरे होती तरिही वाट सापडेना. पाण्यावाचून अगदी हालहाल झाले. जाऊ दे, नंतर कधीतरी ते. भर उन्हाळ्यात एकदा जीवधनला निघालो. जुन्नरचा हा प्रदेश माझ्या खूप आवडीचा. जवळपास दोनेकशी लेणी, असंख्य किल्ले, प्राचीन घाटवाटा ह्या परिसरात आहेत. जीवधन किल्ला हा त्यातलाच. नाणेघाटाचा संरक्षक दुर्ग. घाटवाटेच्या संरक्षणासाठी गडाचा हा पुराण पहारेकरी तटाचं पागोटे लेवून, बुरुजांचे बाजूबंद बांधून, छातीपर्यंत उघडा, काळाकभिन्न असा पदरातल्या हिरवीगार झाडीची तुमान नेसून आणि वानरलिंगीरुपी धारदार भाला हाती घेऊन जवळपास २२०० वर्षांपासून उभाच आहे. आजही तुम्ही जीवधन ह्या बाजूने पाहा. तो तुम्हाला अगदी असाच भासेल. तर तेव्हा मुक्काम केला होता ते घाटघरला. कारण असं संध्याकाळीच तिथे पोचलो होतो. जीवधन रात्रीतून सर करण तसं थोडं फसवं आहे कारण घाटघरची वाट जाते ते ओढ्यातून ती शोधणं रात्रीतून तसं अवघड कारण पायवाट अशी नाही तर दुसरा मार्ग आहे नाणेघाटाच्या बाजूने. पदराच्या दाट झाडीने तो मार्ग जणू गिळलेला आहे. दिवसाही इथनं अचूक वाट सापडणं तसं मुश्किल पण एकदा झाडीतनं ती वाट मिळाली तर पुढे चुकण्याची शक्यता शून्य. गडावरुन उतरताना मात्र ह्या वाटेने अगदी सहजी येता येतं. वाहवत जातो ते म्हणतात ते असं. तर घाटघरला मुक्काम होता. गावाच्या अगदी सुरुवातीलाच ग्रामपंचायतीची एक शाळा आहे. तिथेच मुक्काम करायचं ठरवलं. घाटघर गावात तशी झाडी कमी. शाळेच्या मागेही तसं बरंच मोकळं रान. पथार्‍या टाकून पाय मोकळे करायला जरा बाहेर पडलो. सूर्यास्त होऊन अंधार पडतंच होता. अजनावळे फाट्यावर आलो. घाटघर/अंजनावळे येथे येणारी एसटी इथेच थांबत असते. समोरच्या वर्‍हाड्या डोंगरावर आत्ताआत्तापर्यंत असलेला लालिमा काळोखीत रुपांतरीत होऊ पाहात होता. एक दोन चुकार चांदण्या हळूच उगवू पाहात होत्या. अंजनावळेला जात असलेला रस्ता काळ्याशार सर्पाप्रमाणे वळसे घेत जाताना दिसत होता. हे ही वातावरण विलक्षण शांत. किती वेळ असाच नजर रोखून होतो कुणास ठाऊक. मनात एक खिन्नपण दाटलं होतं. अशा वातावरणात उगाचच एक औदासिन्याची पुसटशी छटा मनावर का चढू लागते समजत नाही. जणू एका स्थिर जलाशयात अवचित काही तरंग पसरावेत तसेच मनात विविध विचारांचे काहूर उठत होते. हे असं का होतं समजत नाही, कधी शून्य विचार असतात तर कधी विचारांच्या लाटांनी मन व्यापून गेलेलं असतं. हा वातावरणाचा परिणाम असेल का? सगळ्याच कातरवेळा अशाच जीवघेण्या असतात असंही नाही. रायगडावर बाजारपेठेच्या पुढे डावीकडे दरी आहे. टकमकीचा खळगा म्हणतात त्याला. म्हणजे गडांतर्गत खोल खळगा, त्याच्याही पुढे तटबंदी व त्याच्या पुढे गडाचे सरळसोट तुटलेले कडे. रायगडाच्या पठाराची सर्व बाजू निवडुंगाचा खळगा, सातविणीचा खळगा, माडाचा खळगा, बारा टाकीचा खळगा, काळखाईच्या खळगा, महादरवाजाचा खळगा आणि हा टकमक व बाजारपेठेच्या दरम्यान खोलवर असलेला टकमकीचा खळगा अशा विविध खळग्यांनी परिपूर्ण आणि निसर्गत:च संरक्षित केलेली आहे. तर सांगायची गोष्ट म्हणजे बाजारपेठेच्या पुढेच ह्या खळग्याच्या भोवती हलकसं रेलिग लावलंय. बर्‍याच वेळा भवानी टोकावरुन इथे येइस्तोवर आसमंत मावळलेलं असतं. इथे क्षणभर टेकून समोरचे दृश्य बघणं विलक्षण आनंददायक झालेलं असतं. मी इथेच टेकून उभा राहतो. जसंजसं अंधारुन यायला लागतं तसंतसं खाली रायगडवाडीत मिणमिणते दिवे लागायला सुरुवात होत असते. मधूनच घुळघुळते टाळ आणि घणघणत्या घंटा आइकू यायला लागतात. कधी भजनी मंडळाचा सप्ता सुरु झालेला असतो, मधूनच त्यांच्या वाद्यांचे सुर वार्‍यावर हलकेच तरंगत इकडे तिकडे पसरु लागलेले असतात. समोरच्या पहाडांवर चंदेरी प्रकाश हळूहळू झरु लागलेला असतो. आभाळी बघावं तर पश्चिम क्षितिजावर शुक्राची तेजस्वी चांदणी उमलू लागलेली असते. निव्वळ सुख असतं असा अनुभव घेणं म्हणजे. मनातले सर्वच विचार दूर झालेले असतात. हे रितेपण विलक्षण आनंददायी असतं. गडाचं अस्तित्व महाराजांनी भारलेलं आहे. त्या भारीत वातावरणाचा हा परिणाम असेल का? a जीवघेण्या कातरवेळी म्हणता मला सर्वाधिक आठवतात त्या माथेरानच्या कातरवेळा. माथेरानला असंख्य वेळा जाणं झालंय. तिथली गर्द झाडी, लालभडक मातीचे रस्ते, तिथल्या वेगवेगळ्या ठिकाणांहून होणारं सह्याद्रीचं आगळंवेगळं दर्शन. प्रेमात आहे मी माथेरानच्या. माथेरानचं एक बरं आहे. वर गाड्यांना मज्जाव आहे. त्यामुळे प्रदुषणमुक्त वातावरण. माथेरानचे विविध पॉइन्ट्स खूप लांब लांब आहेत. त्यामुळे बरीच तंगडतोड करावी लागते. सूर्यास्त पाहून येताना तर अ़क्षरश्: धावतपळत यावे लागते नाहीतर इथल्या काळोखात कुठे हरवून जाऊ अशी भिती असते. इथे अंधार फारच लवकर पडतो. जणू बर्फ उन्हात आणल्यावर वेगाने वितळावा तसा इकडचा प्रकाश वेगाने वितळत जाऊन अंधःकारात विलिन व्हायला आतुर झालेला असतो. ही वेळ मला विलक्षण अस्वस्थ करणारी वाटते. इथे रातकिड्यांचा आवाज भयंकर. अंधार पडला की त्यांची किर्रकिर्र सुरु झालेली असते. मनात पुन्हा पुन्हा ते खिन्नपण दाटून येत असतं. एकदा तर माथेरानच्या भर बाजारपेठेत असताना अशीच एक कातरवेळ झालेली. एकंदर वातावरणातच तसं औदासिन्य दाटून आलेलं. हिंडून फिरुन थकलेले लोक दिसत होते. दुकानदारांचीही लगबग तशी थंडावलेली होती. माझंही मन असंच उदासवाणं होत होतं. एकदा तिथे आमच्या रूमबाहेरच्या सज्जांतल्या खुर्च्यांवर बसून गप्पा मारत बसलेलो. हे असंच मळभ दाटून आलेलं. पावसाचे सुरुवातीचे दिवस होते तेव्हा. उजेड तसाही दिवसभर नव्हताच. अंधारी कुंद वातावरण. हाडं गोठवत जाणारा वारा. मधूनच हलकासा शिडकावा. फारं जीवघेणं वाटतं अशावेळी. अर्थात हा ब्लॉक तात्पुरता असतो. रात्र जसजशी वर चढत जाते तसातसा गेलेला उत्साहही परत यायला लागलेला असतो. मनावर पसरलेलं निराशेचं मळभ हळूहळू दूर होत जाऊन आनंदाची पुटं मनावर परत चढू लागलेली असतात. मग आळसावलेला मी चालू पडतो त्या गर्द अंधारात बुडून जायला. अंधाराची अनुभूती घ्यायला. a
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
32393 वाचन

💬 प्रतिसाद (91)

प्रतिक्रिया

सुरेख लिहिलंय वल्ली.

यशोधरा
गुरुवार, 05/26/2016 - 22:26 नवीन
सुरेख लिहिलंय वल्ली. अवांतरः काय(च) खरं नाय.
  • Log in or register to post comments

+1

स्पा
गुरुवार, 05/26/2016 - 22:32 नवीन
गाॅण केस लाडेतस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

तुफान लिहीलं आहे.

लॉरी टांगटूंगकर
गुरुवार, 05/26/2016 - 23:15 नवीन
नेमके कसे गिअर बदललेले आहेत कायच कळेना झालंय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

+1

sagarpdy
Fri, 05/27/2016 - 12:17 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

सुरेख

मधुरा ashay
गुरुवार, 05/26/2016 - 22:36 नवीन
सुरेख..
  • Log in or register to post comments

:(

सतिश गावडे
गुरुवार, 05/26/2016 - 22:42 नवीन
:(
  • Log in or register to post comments

आह, अप्रतिम लिहिलेय अगदी,

अभ्या..
गुरुवार, 05/26/2016 - 22:43 नवीन
आह, अप्रतिम लिहिलेय अगदी, बाकी गडी दगडाकडून हिरवाई कडे वळला हेही नसे थोडके. आम्हाला कातरवेळ म्हणजे क्वाटरवेळ.
  • Log in or register to post comments

आम्हाला कातरवेळ म्हणजे क्वाटरवेळ.

मुक्त विहारि
Fri, 05/27/2016 - 10:32 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मग

चौकटराजा
Fri, 05/27/2016 - 11:49 नवीन
मङा होउन जाउ द्या गाणे या क्वार्टरवेळी .... पाहिजेस तू जवळी फसफसत ये ग बाई रसरसत घशात जाई असो विदेशी की ग गुळी ....... पाहिजेस तू जवळी मत्त तू गे मस्त मी ही भिनत जा गे शरीरगेही मीच शहाणा दुनिया ही खुळी...... पाहिजेस तू जवळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

सुंदर

चाणक्य
गुरुवार, 05/26/2016 - 22:58 नवीन
मस्त लिहीलंयस. गडांवरच्या कातरवेळा खरच बेचैन करतात. मला दरवेळी विचार येतात मनात की त्यावेळी कशी वर्दळ असेल, मशाली वगैरे लागल्या असतील, दरवाजे बंद करून पहारेकरी जरा निवांतपणे बोलत असतील एकमेकांशी थोडा वेळ...वगैरे वगैरे.
  • Log in or register to post comments

:-)

जेपी
गुरुवार, 05/26/2016 - 23:11 नवीन
:-)
  • Log in or register to post comments

सध्या स्वत:लाच एक चीमटा काढून

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/26/2016 - 23:13 नवीन
सध्या स्वत:लाच एक चीमटा काढून बघतो आहे!
  • Log in or register to post comments

आगे देखो होता है क्या

चौकटराजा
Fri, 05/27/2016 - 07:20 नवीन
स्वतः ला चिमटे काढून काढून बेजार व्हाल.. एल निनो चा प्रभाव संपत असून आता बारीशच बारीश होणार आहे.. !!! बुवा तुम्हाला छाळायचा हा नवा प्रकार आहे ..... दुसरं काय ? परचु काका लेख मस्त .... ती पायवाट लय भारी.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

काकाश्रींस

नाखु
Fri, 05/27/2016 - 09:53 नवीन
सहमत. आम्च्या कडून ही दोन गाणी कथानायकासाठी... पहिले दुसरे स्वगतः बुवांना "भाव" विश्वला नायक मिळाला काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

बुवा आणि शिष्य

चौकटराजा
Fri, 05/27/2016 - 11:52 नवीन
अय्या म्हण्जे काय? काय म्हण्जे इश्य ? बुवा सांगतील गुरू म्हणून आता अगोबा शिष्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

लेख पुन्हा वाचला , आणी अजून

अत्रुप्त आत्मा
Sun, 06/12/2016 - 12:34 नवीन
लेख पुन्हा वाचला , आणी अजून एक चिमटा काढुन पाहिला. सदर लेखन लिहीणारी व्यक्ति तीच असली , तरी तिच्यात बराच आत्मबदल झालेला आहे.. असे न्रिक्षान् णोंदवतो! (ल्लूल्लूल्लूल्लूल्लू ! Image removed. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

लेख पुन्हा वाचला , आणी अजून

अत्रुप्त आत्मा
Sun, 06/12/2016 - 12:34 नवीन
लेख पुन्हा वाचला , आणी अजून एक चिमटा काढुन पाहिला. सदर लेखन लिहीणारी व्यक्ति तीच असली , तरी तिच्यात बराच आत्मबदल झालेला आहे.. असे न्रिक्षान् णोंदवतो! (ल्लूल्लूल्लूल्लूल्लू ! Image removed. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अप्रतिम ! लिहित रहा !!

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 05/26/2016 - 23:13 नवीन
अप्रतिम ! लिहित रहा !!
  • Log in or register to post comments

सुरेख लिहिलंय!

रातराणी
गुरुवार, 05/26/2016 - 23:39 नवीन
सुरेख लिहिलंय!
  • Log in or register to post comments

लेख वाचता वाचता वर जाऊन 3

रमेश भिडे
गुरुवार, 05/26/2016 - 23:56 नवीन
लेख वाचता वाचता वर जाऊन 3 वेळा लेखकाचं नाव वाचलं. आवडलं हे वे सां न ल.
  • Log in or register to post comments

सुरेख!

सखी
Fri, 05/27/2016 - 00:23 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

-

वपाडाव
Fri, 05/27/2016 - 00:26 नवीन
इतक रोमेंटिक लिहिलय... जीव धानी धानी झाला वाचुन...
  • Log in or register to post comments

भारी...अम्हाला तुम्च्या

टवाळ कार्टा
Fri, 05/27/2016 - 00:42 नवीन
भारी...अम्हाला तुम्च्या चाहत्यांत स्थाण द्या ना गडे :)
  • Log in or register to post comments

प्रचेतस भाऊ लेख व बदल दोन्ही

राघवेंद्र
Fri, 05/27/2016 - 01:13 नवीन
प्रचेतस भाऊ लेख व बदल दोन्ही आवडले.
  • Log in or register to post comments

आवडला लेख.

खटपट्या
Fri, 05/27/2016 - 02:33 नवीन
आवडला लेख. मधेच वाटलं स्पा कडून दीक्षा घेतली का कै... :)
  • Log in or register to post comments

शिका शिका फोटोग्राफरांनो

कंजूस
Fri, 05/27/2016 - 07:04 नवीन
शिका शिका फोटोग्राफरांनो अंधाराचा फोटो घ्यायला."मनावर पसरलेलं निराशेचं मळभ हळूहळू दूर होत जाऊन आनंदाची पुटं मनावर परत चढू लागलेली असतात. मळाची पुटं अंगावर ऐकली आहेत पण आनंदाची पुटं मनावर? शिका शिका मनोविकारतज्ञांनो.
  • Log in or register to post comments

लेख आवडला. संगीता जोशी यांची

प्राची अश्विनी
Fri, 05/27/2016 - 07:35 नवीन
लेख आवडला. संगीता जोशी यांची कविता आठवली. "अशा काजळवेळेला जो तो फक्त ज्याचा त्याचा काठ राहिलेला दूर खोल पाय बुडत्याचा..."
  • Log in or register to post comments

वा!

चांदणे संदीप
Fri, 05/27/2016 - 07:37 नवीन
सुरेख लिहिलयं!! अगदी या सकाळी मी कातरवेळ असल्याचा अनुभव घेतला मग बायकोच्या, "अहो, अंघोळ करून घ्या लवकर" ने माझी रोज सकाळची ऑफिसघाई सुरू झाली! ;) कातरवेळ + प्रचेतस = सुरेख ललित! चला, यानिमीत्ताने कुठलीतरी "स्कीम" जाहीर करून टाका! Sandy
  • Log in or register to post comments

लेख आवडला. दोन्ही

कानडाऊ योगेशु
Fri, 05/27/2016 - 08:25 नवीन
लेख आवडला. दोन्ही प्रकाशचित्रे उत्तमच. कातरवेळ ह्या दृष्टीकोनातुन पाहीले कि एक हुरहुर वाटली पण नंतर सूर्योदयापूर्वी काढलेली चित्रे हा विचार करुन पाहीली तर एकदम प्रसन्न वाटले. बाकी वल्लींच्या मनाचा बुलंद दरवाजा हळुहळु उघडायला लागला आहे असे वाटू लागले आहे आता. :) और आने दो!
  • Log in or register to post comments

"वल्लींच्या मनाचा बुलंद

कंजूस
Fri, 05/27/2016 - 08:30 नवीन
"वल्लींच्या मनाचा बुलंद दरवाजा हळुहळु उघडायला लागला आहे असे वाटू लागले आहे आता. :)" किल्ल्याला सात दरवाजे आणि खंदक असतात आणि पासवर्ड परवलीचा शब्द " कातरवेळ"?
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलंय !!

मेघना मन्दार
Fri, 05/27/2016 - 10:19 नवीन
मस्त लिहिलंय !!
  • Log in or register to post comments

सुंदर लेख

जगप्रवासी
Fri, 05/27/2016 - 10:19 नवीन
सकाळी सकाळी मिपा वर आलो आणि इतकं सुंदर वाचायला मिळाल, वाह काय मस्त सुरुवात आहे दिवसाची. प्रचेतस ग्रेट आहात, काय भारी लिहिलंय आणि त्यावर तो पायवाटेचा फोटो आहाहाहाहा……
  • Log in or register to post comments

कातरवेळ अंगावर येवू द्यायची नसेल तर......

मुक्त विहारि
Fri, 05/27/2016 - 10:29 नवीन
एखादी डार्लिंग बघा....
  • Log in or register to post comments

सुरेख!

पैसा
Fri, 05/27/2016 - 10:40 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

विश्वास बसेना वल्ल्या हे तू

किसन शिंदे
Fri, 05/27/2016 - 10:55 नवीन
विश्वास बसेना वल्ल्या हे तू लिहिलेयंस यावर. महाराजांचा राजगड समोरून दिसतो बुलंद, बेलाग, अतिशय बळकट, पण त्यावर भटकताना त्याच्या अंतरंगात खोलवर आत काहीतरी दडलेलं दरवेळेला भासतं. तुझ्या बाबतीत ते मला पहिल्यांदाच भासतंय मित्रा.
  • Log in or register to post comments

अच्च जाल्ल किश्नु

स्पा
Fri, 05/27/2016 - 10:55 नवीन
अच्च जाल्ल किश्नु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

@अच्च जाल्ल किश्नु››› हल कट

अत्रुप्त आत्मा
Sat, 05/28/2016 - 09:14 नवीन
@अच्च जाल्ल किश्नु››› हल कट दू दू पांडूऊऊऊऊऊऊ! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

तसं बरंच काही काही दडलेलं

प्रचेतस
Sat, 05/28/2016 - 08:22 नवीन
तसं बरंच काही काही दडलेलं असतं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

छान लिहिलंय.

सस्नेह
Fri, 05/27/2016 - 11:05 नवीन
फोटो म्हणजे नुसत्या काळ्या खिडक्या दिसताहेत. मॅटर वरून फोटो सुंदर असावेत असे वाटते.
  • Log in or register to post comments

सुंदर

सुमीत भातखंडे
Fri, 05/27/2016 - 12:31 नवीन
सुंदर लिहिलय.
  • Log in or register to post comments

प्रिय मित्र प्रचेतस,

प्रसाद गोडबोले
Fri, 05/27/2016 - 13:08 नवीन
प्रिय मित्र प्रचेतस, स.न.वि.वि , निव्वळ अप्रतिम लेखन केले आहेस मित्रा ! फक्त कातरवेळाच नव्हे तर ट्रेकर्स चे भटक्यांचे सारेच अनुभव विलक्षण असतात तेही प्रत्येकाच्या मनःस्थितीनुसार बदलणारे. खरं तर प्रत्येक भटक्याने लिहित रहावं असं वाटतं पण सगळ्यांनाच तुमच्या सारखे हे असले शब्द सापडत नाहीत.
धुकट अंधार काळोख्या दाटीत दिठी लावून बसलो. बंबाळ्या रानात हिरवीगार झाडीची तुमान नेसून दोन चुकार चांदण्या प्रकाश वेगाने वितळत जाऊन अंधःकारात विलिन व्हायला आतुर झालेला अंधारी कुंद वातावरण. आनंदाची पुटं मनावर परत चढू लागलेली असतात.
मग असे भटके कुठे तरी मनातच असे अनुभव साठवुन ठेवत रहातात अन कधी कधी गिनिदांची दुर्गभ्रमण गाथा किंवा कोणा एकाची भ्रमणगाथा सारखे काही वाचताना असे सारे अनुभव मनातुन बाहेर पडतात. आज तुझा लेख वाचताना तसेच काहीसे झाले ! कित्येक कातरवेळा , किर्र्र्र्र्र संध्याकाळी अजिंक्यतार्‍याच्या पायर्‍यांवरुन उतरताना अनुभवल्या आहेत , त्या आठवणींनी डोके बाहेर काढले! लिहित रहा मित्रा ! शुभेच्छा! कळावे लोभ असावा आपला विनम्र प्रगो
  • Log in or register to post comments

धन्यवाद प्रगो.

प्रचेतस
Sat, 05/28/2016 - 08:23 नवीन
धन्यवाद प्रगो. अजूनही असे बरेच अनुभव आहेत निरनिराळे, निरनिराळ्या ठिकाणी येणारे. लिहिन कधीतरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

still not able to type in

mahesh d
Fri, 05/27/2016 - 13:14 नवीन
still not able to type in Marathi, just went through the writeup, a very different from the older writing of the author, a really blessed person mr.prachetas is, having such a love for the forts and the era that has gone by. now about the writeup, had been gone through condition for many times before I got married, and now the emptiness is filled in with many other things like joy and excitement, possessive ness and so... keep writing prachetas..
  • Log in or register to post comments

आवडले...

ब़जरबट्टू
Fri, 05/27/2016 - 16:33 नवीन
मस्तच.. बाकी फसलेल्या प्रेमप्रसंगात कातरवेळ खुपदा अंगावर येते.. तुमचे असे काही झालेय का लहानपणी ? किशोरअवस्थेत ?
  • Log in or register to post comments

हे काय नवीन

नाखु
Fri, 05/27/2016 - 16:37 नवीन
किशोरअवस्थेत (फसलेल्या) प्रेमप्रसंगात.
बुवा-बॅट्यानी यावर प्रकाश झोत टाकावा ही विणंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

तुमचे असे काही झालेय का

अभ्या..
Fri, 05/27/2016 - 16:41 नवीन
तुमचे असे काही झालेय का लहानपणी ?
जंबोलोल, हत्तीलोल, एरावतलोल. . . इतकी उत्तरे सुचायलीत ना बबट्टू साहेब. उगी वल्ल्याचा हात जोरदार लागतय म्हणून गप्प बसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

आम्हाला अकरावीला मराठीला

सतिश गावडे
Fri, 05/27/2016 - 18:40 नवीन
आम्हाला अकरावीला मराठीला कातरवेळ नावाची कथा होती. लेखक बहुधा अरविंद गोखले. त्यातल्या नायकाला (किंवा नायिकेला) कातरवेळी आपल्या प्रेमपात्राची आठवण येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

नायिकेला आठवण येते !

जव्हेरगंज
Fri, 05/27/2016 - 19:44 नवीन
नायिकेला आठवण येते ! जबरा कथा होती! इतिहासाच्या पुस्तकातून पाठवलेली चिठ्ठी !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

उम्म्म. तसं प्रत्येकाच्याच

प्रचेतस
Sat, 05/28/2016 - 08:28 नवीन
उम्म्म. तसं प्रत्येकाच्याच आयुष्यात काहीतरी लपलेलं असतं. कधी वर येतं तर कधी दडूनच राहतं कायमचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

लेख मस्तच ... सुंदर लिहिले

गणेशा
Fri, 05/27/2016 - 16:50 नवीन
लेख मस्तच ... सुंदर लिहिले आहे.. कातरवेळ आमच्या खुप आवडीची पण.. खिन्न पणा फक्त तेंव्हाच यायचा जेंव्हा प्रेयसी निघुन जाण्या च्या गोष्टी करायची
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा