✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दन दन दनाट झिंगाट सैराट..

स
सस्नेह यांनी
Tue, 05/17/2016 - 14:35  ·  लेख
लेख
मराठी चित्रपटांच्या वाटेला मी मुळीच जात नाही याची एक नाही अनेक कारणं. वास्तवाशी फारकत घेतलेलं टेलरमेड कथानक. स्टुडीओतलेच नव्हे तर कित्येकदा चक्क स्टेजवर मागे पडदे रंगवलेले सीन. आउटटेकिंग मधले दारिद्र्य. सेटिंगचे दारिद्र्य. कृत्रिम ढंगाचे लाडिक संवाद आणि अतिशय बोल्ड, नको इतका ठसठशीत अभिनय, ओव्हरअ‍ॅक्टिंग. प्रेक्षक हा जणू एक मठ्ठ धोंडा आहे अशा थाटात सर्व पात्रे आपले अभिनय-पियुष त्याच्यावर संततधारेने ओतत असतात. यामुळे मराठी चित्रपट बघण्यापेक्षा एखादा अ‍ॅनिमेशन चित्रपट बघितलेला बरा. पण इथे ‘सैराट’ ची लैच चर्चा चालली तसं कुतूहल उड्या मारू लागलं. मराठी चित्रपटांचे वर दिलेले सगळे पैलू सहन करून हा चित्रपट बघणेबल असेल का याचा साधक बाधक विचार करून अखेर ठरवले, चित्रपट बघायचा. पण चित्रपट बघितला आणि अहो आश्चर्यम ! यापैकी एकही पैलू टोचला नाही. ना नाटकी कथानक, ना रंगवलेले पडदे, ना पुस्तकी थाटाचे संवाद. आणि अभिनयाबद्दल काय बोलावं ? पडद्यावरची ष्टोरी आपण बघत नसून तुमच्या आमच्या आजूबाजूला घडणारा रोजच्या बघण्यातलाच किस्सा वाटून गेला राव. तर, ‘सैराट’ भन्नाट आवडला. आता का आणि कसा याचा पंचनामा करायचा म्हणजे त्यातली मज्जा घालवण्यासारखंच. पण तरीसुद्धा काही प्लस मायनस इथे मांडल्याशिवाय राहवत नाही. विशेषत: ‘सैराट’ फ्यान क्लबसाठी  पाटलाची लाडकी लेक अर्ची आणि कोळ्याचा झिंगाट पोर परशा यांची ही जमिनीवरचीच प्रेमकथा. पाटलाची दहशत अतिशय सूचकपणे दाखवली आहे. त्या दहशतीची जाणीव नायक आणि नायिका दोघेही बाळगून आहेत. कोवळ्या वयात फुलणारे प्रेम त्या दहशतीने कोमेजून न जाता त्यातूनच वाट शोधत जाते. दोघांमधली सामाजिक आणि आर्थिक विषमता पावलोपावली प्रेक्षकांच्या समोर येत राहते आणि तरीही प्रसंगांचे वळण कुठे खटकत नाही. अखेरीस अर्ची आणि परशा ठेचा खात खात पळून जाण्यात यशस्वी होतात. हा पूर्वार्ध अतिशय रोचक झाला आहे. उत्तरार्ध बऱ्याच जणांना भावला नाही. पण तोसुद्धा पूर्वार्धाप्रमाणेच वास्तवाशी इमान राखून आहे. एकीकडे कुटुंबाबद्दलची घराबद्दलची ओढ आणि परशाबद्दलचे नैसर्गिक आकर्षण यात होणारी रस्सीखेच रिंकू राजगुरू या नवोदित मुलीने अतिशय प्रगल्भपणे दाखवली आहे. संपन्न घरात वाढलेली असल्याने विपन्न्तेचा, बकालतेचा सामना करताना हरणारी हिम्मत शर्थीने सावरून धरणारी अर्ची रिंकूने अगदी समर्थपणे उभी केली आहे. त्यामानाने उत्तरार्धात आकाशचा अभिनय तिच्यापुढे काहीसा फिका पडलासा वाटते. पडत झाडत, ठेचा ठोकरा खात अखेर त्या दोघांचे प्रेम सगळ्या कसोट्यांना पुरून उरते हा भाग खरोखर बघण्यालायक झाला आहे. आणि शेवट मात्र पूर्ण कलाटणी देणारा. केवळ सुन्न ! हा शेवट म्हणजे रुढीप्रियतेच्या मानसिकतेवर आणि ती सहन करणाऱ्या समाजमनावर सन्नकन मारलेली चपराक आहे ! ! ! ग्रामीण ष्टुरी असूनसुद्धा सैराट मध्ये ‘ग्राम्य’पणा अधोरेखित केलेला नाही. शहरी लोकांच्या कल्पनेतले ‘ग्राम्य’ वातावरण मुद्दाम निर्माण केलेले नसून खरोखरच्या ग्रामजीवनातले सरळ चित्रण आहे. कथानक सहज पुढे जात राहते. कुठेही कृत्रिम चढ-उतार, नाट्यमय झटके दिलेले नाहीत. पात्रे कृत्रिम वाटत नाहीत. तरीही प्रेक्षकांच्या मनातली उत्कंठा सातत्याने राखून ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत. नायिका अर्चना उर्फ अर्ची ही सरासरी मराठी चित्रपट नायिकेच्या परंपरेला धक्के देणारी आहे. तरीही बोल्ड वाटत नाही. ओढूनताणून आणलेला शहरी सुधारकपणा तिच्यात नाही. पण तरीही कुठल्याही हिंदी चित्रपटाच्या नायिकेपेक्षासुद्धा ती मॉड आहे. तिचा बिनधास्तपणा कसल्याही सो कॉल्ड मॉडर्नपणा पेक्षा आकर्षक आहे. सौंदर्याचे कुठलेही पारंपारिक निकष तिला लागू होत नसूनही ती सुंदर वाटते यात निवळ कॅमेर्‍याचे यश नसून तिची अदा, अंदाज आणि दिग्दर्शकाचे कौशल्य यांचाही मोठा वाटा आहे. नायक परशा हासुद्धा पारंपारिक नायकाच्या चौकटीत बसत नाही. धाडसी असूनही काहीसा बुजरा. त्याच्या वावरण्यात ष्टाईल आहे पण ‘अ‍ॅक्शन’ नाही. धीटपणा आहे पण कसलेही ग्लॅमर नाही. आणि तरीसुद्धा अर्चीचे त्याच्याकडे आकर्षित होणे अगदी नैसर्गिक वाटते. आकाश ठोसरने परशा अगदी यथार्थ उतरवला आहे. एकूणच मांडणीमध्ये कुठेही भडकपणा नाही इतकेच नाही तर साधेपणासुद्धा कुठेच ‘अधोरेखित’ केलेला नाही. चित्रपट मांडण्याचा हा सहजपणाच मला भावून गेला. आणखी एक अतिशय उल्लेखनीय विशेष म्हणजे व्हायोलन्सच्या सर्व प्रसंगात पार्श्वसंगीत शून्य आहे ! ना कर्णकर्कश्श वाद्यमेळ ना तारस्वरातील किंचाळ्या ना ड्रम्सचा टिपेचा धडधडाट. पण कोणताही बटबटीत म्युझिक इफेक्ट न देताही त्यातली हिंसा जाणिवांना हादरवून जाते. अजय अतुल यांचे सुश्राव्य आणि मधुर संगीत ‘याड’ लावून जातं. सर्वच गीते अतिशय मेलोडियस आणि हार्मनीयुक्त आहेत. एक ‘झिंगाट’ सोडलं तर इतर कुठलेही गीत प्रत्यक्षपणे नायक नायिकेच्या मुखी उमटलेले नाही. पण त्या त्या प्रसंगातील नायक नायिकेच्या भावना संगीत आणि दृश्य माध्यमातून अगदी चपखलपणे उतरल्या आहेत. मात्र एक विसंगती मला खटकली. चित्रपटातून वेगळी काढून डोळे मिटून ही गाणी इन्स्ट्रुमेन्ट्ल मोडमध्ये ऐकली तर ती खरंच अवीट गोडी देतात. पण संगीताचा पाश्चात्य धर्तीचा बाज आणि वाद्यमेळ यांच्यामुळे ग्रामीण मराठी शब्द त्यात ‘फिट्ट’ होत नाहीत. खऱ्या अर्थानं ही ‘गावाकडची गाणी’ वाटतच नाहीत. सुमधुर असूनही ही गाणी चित्रपटात वरून दिलेल्या देखण्या पॅचेससारखी वाटतात. तसेच अर्चीच्या घराचे वातावरण प्रतिगामी असूनही एकट्या अर्चीलाच बुलेट, ट्रॅक्टर चालवणे, कधीही कुठेही भटकणे हे स्वातंत्र्य दिलेले आहे. तसेच परशा आणि अर्ची यांची प्रेमकहाणी आख्ख्या गावाला दिसत असूनही अर्चीच्या घराच्या लोकांना समक्ष दिसेपर्यंत समजत नाही. या किरकोळ चित्रपटीय विसंगती सोडल्या तर बाकी सर्व चित्रपट जवळ जवळ वास्तवाला धरून आहे. एकूण, सगळी बेरीज-वजाबाकी करूनही मला ‘सैराट’ भन्नाट आवडला आहे. आणि सैराट फ्यान क्लबच्या आग्रहास्तव इथे माझंबी मत लिवलं आहे. :)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
आस्वाद
माध्यमवेध
मत

प्रतिक्रिया द्या
42126 वाचन

💬 प्रतिसाद (158)

प्रतिक्रिया

सहमत !!

खटपट्या
Wed, 05/18/2016 - 01:10 नवीन
सहमत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

हास्यास्पद.....

अभिदेश
Wed, 05/18/2016 - 06:13 नवीन
पहिला परिच्छेद वाचला आणि वाटले की लेखिका परग्रहावर Sorry परदेशात राहतात की काय ? पण नाही ह्या तर महाराष्ट्रातच राहणाऱ्या निघाल्या . असं वाटण्याचं कारण , ज्या प्रकारे त्यांनी लिहिलंय त्यावरून त्यांना एकूण आजुबाजूला काय घडतंय ह्या बद्दल काही माहिती आहे असं वाटलं नाही . मराठी चित्रपट जरी बघत नसला तरी गेल्या १५ वर्षांत मराठी चित्रपट एवढे गाजातायात त्याबद्दल थोडी तरी माहिती आपण किमान वर्तमानपत्रे वाचून , T.V. बघितला तरी समजली असती . आपण तर आंतरजाल हि भरपूर वापरता असं दिसतंय तरी तुम्हांला काहीच माहिती नाही हे बघून आश्चर्य वाटलं . माझा आपण मराठी चित्रपट बघा असा मुळीच आग्रह नाही आणि आपण बघत नसाल तरी काही आक्षेप नाही . आक्षेप आहे तो तुमच्या चुकीच्या गृहितकांना. आजकाल कोणताही अगदी टुकार मराठी चित्रपट जरी असला तरी स्टेजवर मागे पडदे रंगवलेले सीन , आउटटेकिंग मधले दारिद्र्य. सेटिंगचे दारिद्र्य आढळत नाही. तुम्ही अजून सुर्यकांत , चंद्रकांत (I hope you know them , कारण तुम्ही मराठी चित्रपट बघत नाहीत ना .....रच्याने दोघेही तुमच्या गावाचे ) च्या जमान्यांत आहात वाटत . गेल्या १०-१५ वर्षांच्या राष्ट्रीय पुरस्कारांवर नुसती नजर जरी टाकली तरी हे सिद्ध होईल कि मराठी चित्रपट आता कुठे पोहोचलाय ते . मला वाटते कि एवढे सगळे सैराटवर लेख आल्यावर आपणही एक लिहिलाच पाहिजे ह्या भावनेतुन हा लेख लिहिला गेला आहे आणि सुरुवातीलाच असं काहीतरी लिहून आपली हुच्च अभिरुची कशी आहे हे दाखवण्यापाई आपण असं लिहिलं असावं पण ते हास्यास्पद झालं आहे . मी बरर्याच वर्षांत मराठी चित्रपट बघितला नाही … असे जरी लिहिले असते तरी चालले असते. गेली कित्येक वर्षे परदेशी राहूनही मराठी चित्रपट बघणारा आणि आवडणारा …… अभिदेश
  • Log in or register to post comments

बॉलिंग टाकायला स्टार्टअप

रमेश भिडे
Wed, 05/18/2016 - 10:01 नवीन
बॉलिंग टाकायला स्टार्टअप घ्यायला लागतो. लेखातला स्टार्टप थोडा boundary बाहेर गेलाय एवढंच. तेवढं चालतं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश

श्रीयुत अभिदेश,

सस्नेह
Wed, 05/18/2016 - 10:45 नवीन
तुमचे मत तुमच्या परीने खरे आहे आणि माझे माझ्या परीने. अखेरीस प्रत्येकाची अभिरुची वेगवेगळी असते. एक लिहायचे राहिले की, लेखात लिहिलेले माझे मत सरसकट सर्व मराठी चित्रपटांबद्दल नसून किंवा कलात्मक मराठी चित्रपटांबद्दल नसून केवळ व्यावसायिक चित्रपटांबद्दल आहे. अर्थात सर्वच मी पाहिले आहेत असा दावा नाही. पण गाजलेले नक्कीच पाहिले आहेत. अगदी अलीकडचेसुद्धा. गेल्या पंधरा नव्हे, पस्तीस वर्षांपासून आजअखेर मी मराठी चित्रपट पहात आले आहे. शिरीष कणेकरांच्या लेखणीतून उतरलेल्या मराठी चित्रपटांच्या परीक्षणांमधून माझी चित्रपटविषयक अभिरुची बनत गेली आहे. त्याकाळीसुद्धा ‘पिंजरा’ आणि शांतारामांचे अनेक चित्रपट वास्तवाशी रिलेट होत होते. नाट्यमयता आणि इनडोर टेकिंग असूनसुद्धा ! नंतर दादा कोंडकेंच्या सुरुवातीच्या चित्रपटांनीही चांगली दर्जात्मक अभिव्यक्ती दिली. उदा. पांडू हवालदार. लोकप्रियता मिळाली तसा कोंडके यांच्या चित्रपटांचा दर्जा घसरला. यानंतर अशोक सराफ, महेश कोठारे इ.चा काल. त्यांच्या चित्रपटांनी करमणूक दिली, धंदा चांगला केला. पण सहज मांडणी, नैसर्गिक अभिनय आणि वास्तवाशी नाते या तिन्ही बाबतीत ते पुअर होते. त्यानंतर जब्बार पटेल यांच्या दिग्दर्शनाने आणि स्मिता पाटील यांच्या अलौकिक अभिनयाने मराठी चित्रपटांच्या दर्जाला उर्जितावस्था दिली. पण एक ‘उंबरठा’चा अपवाद सोडला तर हा भाग केवळ कलात्मक मराठी (आणि हिंदी ) चित्रपटांपुरता मर्यादित राहिला. आपण कोणत्या पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपटांबद्दल लिहिता आहात ते कळले तर बरे होईल. अगदी अलीकडचे ‘ फँड्री’ आणि ‘श्वास’ सारखे कलात्मक चित्रपट मी पहिले नाहीत हे खरे आहे. पण 'देऊळ', 'कट्यार काळजात घुसली', 'दुनियादारी' यासारखे काही व्यावसायिक चित्रपट मी पाहिले आहेत आणि त्यांच्याबद्दलही माझे मत फारसे वेगळे नाही. ‘देउळ’मध्ये चित्रपटीय मसाला भरपूर आहे, टेकिंगही चांगले आहे पण अजूनही तो वास्तवाशी रीलेट होतोय असे मला वाटत नाही. तसेच जवळजवळ सर्व पात्रांचे अभिनय अभिनिवेशयुक्त आणि बोल्ड आहेत. ‘कट्यार’ कथानक भावुक असले तरी चित्रपटावरील आणि एकूण प्रसंगाच्या चित्रणातील नाटकाची छाप लपत नाही. चित्रपटात घेता येणारे स्वातंत्र्य घेण्यात कुचराई झालेली आहे. ‘दुनियादारी’ तर केवळ काचेच्या कुंडीतील कॅक्टस हे माझे सुरुवातीपासूनचे इंटरप्रिटेशन झाले. नायक आणि नायिका यांचे अभिनय एकूण प्रसंगांचा प्रवाह, यात कुठे सहजता, नैसर्गिकता नाही. अगदी ‘थ्री इडियट्स’सुद्धा वास्तवाशी चांगल्यापैकी नाते राखून आहे, पण ‘दुनियादारी’ तिथे फेल गेला आहे. यासाठीच मी अलीकडे मराठी चित्रपट पहायचे बंद केले आहे. आणि याचा अर्थ सर्व हिंदी चित्रपट पाहते असेही नाही. माझ्या अभिरुचीला मानवतील तेच पाहते. या पार्श्वभूमीवर मला ‘सैराट’ या सर्व कसोट्यांना उतरणारा वाटला, माझ्या अभिरुचीला मानवला. अर्थात हे माझे मत आहे. आणि मला त्याच्याबद्दल काहीही शंका नाही. प्रतिसादासाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश

>>>>शिरीष कणेकरांच्या

रमेश भिडे
Wed, 05/18/2016 - 11:31 नवीन
>>>>शिरीष कणेकरांच्या लेखणीतून उतरलेल्या मराठी चित्रपटांच्या परीक्षणांमधून माझी चित्रपटविषयक अभिरुची बनत गेली आहे. भावना पोचल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

शिरीष कणेकरांच्या लेखणीतून

मराठी कथालेखक
Wed, 05/18/2016 - 14:42 नवीन
शिरीष कणेकरांच्या लेखणीतून उतरलेल्या मराठी चित्रपटांच्या परीक्षणांमधून माझी चित्रपटविषयक अभिरुची बनत गेली आहे.
हसावे की रडावे हेच कळत नाही. कणेकर हे मुख्यतः विनोदी लेखक आहेत आणि त्यांच्या क्रिकेट वा चित्रपटाच्या परीक्षणांना विनोदाचा भरपूर तडका दिल्याशिवाय त्यांना राहवत नाही. एकीकडे तुम्हाला 'चित्रपट वास्तववादी' आवडतात आणि दुसरीकडे परीक्षण मात्र अतिरंजित चालतात (की आवडतात ?) .. धन्य आहे. बाकी तुम्हाला वास्तवाशी रिलेट होणारे चित्रपट आवडतात तरी तुम्ही श्वास पाहिला नाही म्हणजे आश्चर्य आहे...(कोर्ट पाहिला का ?) देऊळ तुम्हाला वास्तवाशी रिलेट न होणारा वाटला !! माझ्या मते तरी तो वास्तवाशी चांगल्यापैकी रिलेट होणारा पण चित्रपटाच्या भाषेत मांडलेला सुंदर चित्रपट आहे (जसे क्राईम प्रेट्रोल हे वास्तविक घटनांचे नाट्यरुपांतर आहे) झालेच तर चित्रपटाची कथा वास्तववादी असणे/नसणे वेगळं आणि चित्रपटाचं सादरीकरण तद्दन फिल्मी/नाटकी असणं ही गोष्ट वेगळी. दूनियादारी, दे धक्का, दगडीचाळ यांच्या कथा वास्तवपूर्ण नाहीतच पण त्यांचे सादरीकरण अतिरंजित फिल्मी आहे असं नाही.
अगदी ‘थ्री इडियट्स’सुद्धा वास्तवाशी चांगल्यापैकी नाते राखून आहे
हा तर आश्चर्याचा धक्का आहे.. यात वास्तवाशी काय नात राखलंय ? शर्मन जोशीने हृदयाचा त्रास होत असल्याचे भासवून विमान थांबवणे, त्या चतुरने बदललेल्या शब्दांसकट भाषण वाचणे आणि इतरांनी ते वाचू देणे, अमिर खानने खोट्या नावाने इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवणे, मेडिकलचा गंध नसणार्‍या मुलांनी व्ह्यक्युम क्लिनरची मदत घेत एका स्त्रीची प्रसुती करणे ...सांगा यातलं काय काय वास्तवाच्या जवळ जाणारं आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

सहमत

चांदणे संदीप
Wed, 05/18/2016 - 15:00 नवीन
हा तर आश्चर्याचा धक्का आहे.. यात वास्तवाशी काय नात राखलंय ? शर्मन जोशीने हृदयाचा त्रास होत असल्याचे भासवून विमान थांबवणे, त्या चतुरने बदललेल्या शब्दांसकट भाषण वाचणे आणि इतरांनी ते वाचू देणे, अमिर खानने खोट्या नावाने इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवणे, मेडिकलचा गंध नसणार्‍या मुलांनी व्ह्यक्युम क्लिनरची मदत घेत एका स्त्रीची प्रसुती करणे ...सांगा यातलं काय काय वास्तवाच्या जवळ जाणारं आहे ?
अगदी सहमत आहे..... एक चित्रकृती म्हणून 3 Idiots भन्नाट वाटतो! 'सैराट' लाटेत काहीही वाहून यायला लागलंय! :) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

किल्ला, अस्तु हेही सुरेख

यशोधरा
Wed, 05/18/2016 - 15:02 नवीन
किल्ला, अस्तु हेही सुरेख मराठी सिनेमा आहेत, देवराई आणि नितळ ही अजून दोन नावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

मला तर धूमधडाका, थरथराट,

प्रचेतस
Wed, 05/18/2016 - 15:05 नवीन
मला तर धूमधडाका, थरथराट, धडाकेबाज आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

धूमधडाका मलापण आवडला! मज्जा

यशोधरा
Wed, 05/18/2016 - 15:08 नवीन
धूमधडाका मलापण आवडला! मज्जा आली होती बघायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

व्हीहीऽऽऽऽऽऽ...व्हुहूऽऽऽऽ..

खालीमुंडी पाताळधुंडी
Wed, 05/18/2016 - 20:33 नवीन
व्हीहीऽऽऽऽऽऽ...व्हुहूऽऽऽऽ...व्हाआऽऽऽ.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

किल्ला, अस्तु, देवराई आणि

सस्नेह
Wed, 05/18/2016 - 15:14 नवीन
किल्ला, अस्तु, देवराई आणि नितळ याबद्दल ऐकलं नाही. बघायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हायला! अस्तु वगळता तीनही

यशोधरा
Wed, 05/18/2016 - 15:22 नवीन
हायला! अस्तु वगळता तीनही सिनेमे टीव्हीवर पण दाखवले की कितीदा! हां, आता तुमास्नी टीव्हीचा पडदा चालत नसल तर मंग कसं वो? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

हे हे,

सस्नेह
Wed, 05/18/2016 - 15:25 नवीन
टीव्ही बघायला तरी कुठं वेळ असतो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

वास्तुपुरुष हाही एक उत्कृष्ट

प्रचेतस
Wed, 05/18/2016 - 15:26 नवीन
वास्तुपुरुष हाही एक उत्कृष्ट चित्रपट होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

कुणाचा ? कलाकार कोण ?

सस्नेह
Wed, 05/18/2016 - 15:30 नवीन
कुणाचा ? कलाकार कोण ? माफी असवी, मी तर लैच अडाणी हाय ओ मराठी पिच्चरबद्दल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सुमित्रा भावे-सुनिल सुकथनकर

प्रचेतस
Wed, 05/18/2016 - 15:31 नवीन
सुमित्रा भावे-सुनिल सुकथनकर कलाकार- रविंद्र मंकणी, अतुल कुलकर्णी, देविका दफ्तरदार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

धन्यवाद.

सस्नेह
Wed, 05/18/2016 - 15:38 नवीन
तुम्ह्ची ट्युशन लावावी म्हणते मराठी चित्रपटांसाठी ! घ्याल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मातीमाय, अजून एक जबरदस्त

यशोधरा
Wed, 05/18/2016 - 15:41 नवीन
मातीमाय, अजून एक जबरदस्त मराठी सिनेमा. डीव्हीडीही मिळते ह्या सिनेमाची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

थोडा संथ वाटला. पण कथानक

मराठी कथालेखक
Wed, 05/18/2016 - 15:46 नवीन
थोडा संथ वाटला. पण कथानक चांगलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

नै. मी आधीच मराठी चित्रपट

प्रचेतस
Wed, 05/18/2016 - 16:14 नवीन
नै. मी आधीच मराठी चित्रपट नगण्य बघतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

अस्तू कुठे पहायचा? आमच्याकडे

रेवती
Wed, 05/18/2016 - 17:34 नवीन
अस्तू कुठे पहायचा? आमच्याकडे आला नाही व जालावरही मिळाला नाही. किल्ला पहावासा वाटला नाही पण स्नेहा, नितळ व देवराई पाहण्याची संधी सोडू नकोस. नितळ हा शिनेमा किमान आठवेळा पाहिलाय दरवेळी काहीतरी वेगळं दिसतं. दिग्दर्शक चांगला असणं म्हणजे काय? किती अवघड काम आहे, किती लहानसान गोष्टींचे भान ठेवावे लागते वगैरे कळून येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

अशी ही बनवाबनवी

समीरसूर
Wed, 05/18/2016 - 15:28 नवीन
अशी ही बनवाबनवी जबरदस्त! माझा ऑल टाईम फ़ेवरेट...कुठूनही बघा, कितीही वेळा बघा, कंटाळा येणारच नाही. धूमधडाका पण असाच एवरग्रीन! अशोक सराफ, शरद तळवलकर यांची जुगलबंदी एक नंबर! गंमत जंमत पण भारी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

वळू खुसखुशीत तर एक डाव धोबी

मराठी कथालेखक
Wed, 05/18/2016 - 15:44 नवीन
वळू खुसखुशीत तर एक डाव धोबी पछाड हे खास मनोरंजक हसून हसून पुरेवाट.. मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, अशोक सराफ सगळ्यांची जुगलबंदी केवळ भन्नाट.. हा ओरिजिनल आहे की नाही माहीत नाहि. पण आहे मस्त...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

हीहीही. दादा, मी आईविना पोर

रेवती
Wed, 05/18/2016 - 17:35 नवीन
हीहीही. दादा, मी आईविना पोर हाये. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

सुंबरान - मला सगळ्यात जास्त

मराठी कथालेखक
Wed, 05/18/2016 - 15:39 नवीन
सुंबरान - मला सगळ्यात जास्त आवडलेला ...कोणत्याही हिंदी सिनेमापेक्षाही जास्त आवडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मला नारबाची वाडी पण आवडलेला.

अभ्या..
Wed, 05/18/2016 - 15:50 नवीन
मला नारबाची वाडी पण आवडलेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

मी पण...

चांदणे संदीप
Wed, 05/18/2016 - 15:59 नवीन
मला "काकस्पर्श" आवडलेला! :) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

माझ्या एका भडजी मित्राने मला

सतिश गावडे
Wed, 05/18/2016 - 20:05 नवीन
माझ्या एका भडजी मित्राने मला मंगलाला "टपाल" सिनेमा दाखवला. आवडला. मित्राच्या पैशाने पाहिला म्हणून नव्हे, मनापासून आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

जगप्रसिध्द्द मिसळ खाल्लि कि नाहि ?

ईश्वरसर्वसाक्षी
Wed, 05/18/2016 - 21:34 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

भडजी शब्द काळजाला भिडल्या

खटपट्या
Wed, 05/18/2016 - 21:57 नवीन
भडजी शब्द काळजाला भिडल्या गेला आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

खरंच आवडला काय? अहो काय भिकार

पुंबा
गुरुवार, 05/19/2016 - 13:38 नवीन
खरंच आवडला काय? अहो काय भिकार पिक्चर आहे तो. नाग्रीक नावचा असाच एक तद्दन फालतु आणि overrated पिक्चर. हे दोन्हीही टॉकीजला जाउन पाहीले याचं दु:ख अजुन जात नाही.. अर्थात प्रत्येकाची आवड वेगळी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

परस्पविरोधी ……

अभिदेश
गुरुवार, 05/19/2016 - 04:08 नवीन
एकीकडे तुम्ही म्हणता " लेखात लिहिलेले माझे मत सरसकट सर्व मराठी चित्रपटांबद्दल नसून किंवा कलात्मक मराठी चित्रपटांबद्दल नसून केवळ व्यावसायिक चित्रपटांबद्दल आहे." आणि दुसरीकडे तुम्ही असंही म्हणता "अगदी अलीकडचे ‘ फँड्री’ आणि ‘श्वास’ सारखे कलात्मक चित्रपट मी पहिले नाहीत हे खरे आहे. " तसंच तुमचं लेखाचं पाहिलंच वाक्य असं आहे "मराठी चित्रपटांच्या वाटेला मी मुळीच जात नाही याची एक नाही अनेक कारणं" ह्याचा अर्थ तुम्ही मराठी चित्रपट बघतच नाही . पण प्रतिसादात मात्र असं म्हणता "गेल्या पंधरा नव्हे, पस्तीस वर्षांपासून आजअखेर मी मराठी चित्रपट पहात आले आहे." सगळाच गडबडगुंडा ..... हे वाचून मला म्हणावसं वाटत , तुमच्याच मते वास्तवाशी चांगल्यापैकी नाते राखून असलेल्या ‘थ्री इडियट्स' मधला डायलॉग ….. "आखिर कहेना क्या चाहते हो ……. " बाकी तुमच्या बाकीच्या प्रतिसादाला अनेक लोकांनी योग्य उत्तर दिलेलं आहेच , त्यामुळे अधिक लिहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

हा हा !

सस्नेह
गुरुवार, 05/19/2016 - 10:33 नवीन
अहो, मराठी चित्रपट अलीकडे पहायचे बंद केले त्याची कारणे सांगितलीयेत मी. तसं तर मग लेखाची पहिली दोन वाक्येच बाद ठरतात. कारण चित्रपट पाहिल्याशिवाय त्यातल्या तंत्राबद्दल कसे लिहिता येईल, नाही का ? शब्दच्छल नका करू बॉ ! भावनाओंको समझो भई !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश

सहमत! :)

शब्दबम्बाळ
Wed, 05/18/2016 - 10:54 नवीन
सहमत! :) पहिला परिच्छेद झेपलाच नव्हता वाचल्यावर! :) कमी budget असणारे चित्रपट हि अत्यंत सुंदर बनू शकतात हे गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांकडे पाहून कळून येत! "टपाल" हा सिनेमादेखील असाच साधा सरळ होता पण तो पाहताना माझ्या मराठी न कळणाऱ्या मित्राला देखील गहिवरून आल होत... आणि अभिनयाच म्हणाल तर सुदैवाने बरेच मराठी अभिनेते हे उत्तम अभिनय करतात! जर कोणी फक्त भरत जाधव किंवा मकरंद चे चित्रपट पहात असेल तर मात्र काही सांगू शकत नाही! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश

"टपाल" हा सिनेमादेखील असाच

सतिश गावडे
गुरुवार, 05/19/2016 - 23:08 नवीन
"टपाल" हा सिनेमादेखील असाच साधा सरळ होता पण तो पाहताना माझ्या मराठी न कळणाऱ्या मित्राला देखील गहिवरून आल होत...
मी हा चित्रपट पाहताना चित्रपटगृहात रडलो होतो. अगदी आत जाऊन भिडतो हा चित्रपट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

मकरंद देशपांडे का? की

असंका
Fri, 05/20/2016 - 15:09 नवीन
मकरंद देशपांडे का? की अनाजपुरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

प्रचन्ड सहमत

रघुनाथ.केरकर
Wed, 05/18/2016 - 11:26 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश

परीक्षण पेक्षा रसग्रहण म्हणणे

पूर्वाविवेक
Wed, 05/18/2016 - 11:06 नवीन
परीक्षण पेक्षा रसग्रहण म्हणणे योग्य ठरेल.... मला आवडले. तंत्रशुद्धता आणि वास्तव ग्रामीण वातावरण दाखवण्यात 'सैराट' यशस्वी झालाय. अगदी बॉलीवूड प्रमाणे चकचकीत आणि प्रेझेंटेबल. कथा, गाणी, सादरीकरण सगळाच अप्रतिम. काही मोजके सन्मानीय अपवाद वगळता मराठी चित्रपट हे सगळ्याच आघाड्यावर मागास असतात/होते. हल्ली त्या मानाने बरेच नवीन प्रयोग व्हायला लागले आहेत. चांगले आशादायक बदल घडू लागले आहेत. जुन्या तमाशापटांतले ग्रामीण वातावरण खरे वाटायचे. पण नंतर लक्ष्या, कोठारे, सुषमा शिरोमणी वै. च्या चित्रपटातील ग्रामीण वातावरण तद्दन खोटे, भंपक होते. तू म्हणतेस तसं पडदे-बीडदे लावून केलेले सीन, अतिशय वाईट चित्रीकरण आणि सादरीकरण, टुकार गाणी, पांचट- द्विअर्थी विनोद. 'ओ पावन' अश्या हाका मारत फिरणारी स्कर्ट सारखा तोकडा परकर आणि पोलका अशी वेशभूषा, बकवास केशभूषा आणि भडक मेकप मधील सतत किलकिलाट करणारी नायिका. असह्य......! 'सासू-सून-हळद-कुंकू-चुडा' सारखे रडके चित्रपट घेवून अलका ताई आणि कं. आल्या. काय काय सहन कराव लागल ग या मराठी माय-बाप प्रेक्षकाला. 'मुंबई-पुणे-मुबई' मध्ये स्वप्नील जोशी चांगला वाटला तर नंतर सगळ्या चित्रपटात तोच. हे देवा, किती सहन कराव त्याला.
  • Log in or register to post comments

हो गं

सस्नेह
Wed, 05/18/2016 - 11:18 नवीन
'मुंबई-पुणे-मुंबई' हाही अतिशय आवडला होता. त्याचाही उल्लेख करायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पूर्वाविवेक

ओवरहाईप पण ...

नंदा
Wed, 05/18/2016 - 13:51 नवीन
जरा ओवरहाईप झालं आहे . पण आजकालच्या मार्केटिंगच्या जमान्यात हे चालणारच. चित्रपटातली प्रेमकथा नवीन नाही. अखेरही नवीन नाही . Old wine in a new bottle आहे . पण या नवीन बाटलीला रिअलिझमची झळाळी आहे. मराठी मातीचा वास आहे. सादरीकरण आणि दिग्दर्शन मराठी चित्रपटसृष्टीतल्या अग्रेसर अशा काही चित्रपटांपैकी एक म्हणता येईल. मनोरंजन करताना डोके बाजूला ठेवायची आवश्यकता नसते असा एक निश्चित दृष्टीकोन प्रत्येक प्रसंगातून दिसतो. मला हा चित्रपट पुढील मुद्द्यांमुळे विशेष वाटतो: - जशी अे. आर. रेहेमानची गाणी त्याचीच गाणी म्हणून ओळखली जातात - सर्वसाधारणपणे गाणारे कोण हे फारसे कोणाला माहित नसते, तसे ह्या दिग्दर्शकाचे आहे. तस पाहिल तर हा फँड्रीचाच पुढचा भाग आहे (जर फँड्रीतल्या जब्याच प्रेम उच्चवर्णीय शालूनी स्वीकारल असत तर काय होऊ शकल असत हे आपण सैराट मध्ये बधतो). पण फँड्रीतले कलाकार इथे वापरले नाहीत . या मागची कारण व्यापारी असतीलही, पण नागराजच्या पुढच्या चित्रपटात आकाश ठोसर किंवा रिंकू राजगुरू आपल्याला पुन्हा दिसतील ही शक्यता कमीच. ही स्टार सिस्टिमची अखेर जवळ येण्याची चिन्हे आहेत. एका जमान्यातली गाणी आपण लता किंवा आशाबाईंची म्हणून ओळखत असू. त्या गाण्यांमागले संगीतकाराचे किंवा गीतकाराचे नाव सामान्य रसिकांना माहितही नसायचे. ती एक प्रकारची स्टार सिस्टिम होती. ती अे. आर. रेहेमान सारख्यांनी मोडून काढली . चित्रपट हे मुख्यत: दिग्दर्शकाचे सृजनमाध्यम असते. अभिनेत्यांचे काम हे निमित्यमात्र असते. त्यासाठी स्टार्सची आवश्यकता नाही. हे नागराज आपल्याला फँड्री आणि सैराट मधल्या अतिशय नवख्या कलाकारांतून उत्तम काम करवून घेऊन दाखवतो आहे. स्टार सिस्टिमवरचा खर्च कमी होऊन या मुळे आपल्याला जर उत्तमोत्तम चित्रपट पाहायला मिळणार असतील तर ते नागराजचे सैराटपलीकडचे यश. - मराठी माध्यमांवर जे पुणे - मुम्बई आणि पश्चिम महाराष्ट्राचे सांस्कृतिक वर्चस्व दिसते त्याचा सैराटमध्ये खास इन्कार आहे . पात्रांची बोली मध्य महाराष्ट्री आहे . पुण्या मुंबईतले शहरी कलाकार ग्रामीण लहेजा घेऊन बोलत आहेत असा नाटकीपणा नाही. वर उल्लेखलेल्या मराठी मातीचा वास तो हा. उदारणार्थ, मुक्ता बर्वेनी आर्ची केली असती तर इतकी अस्सल वाटली नसती (पण गिरीश कुलकर्णीचा देउळ मधला केश्या चांगला उतरला होता). लोकेशन्स पुणे - मुम्बई आणि पश्चिम महाराष्ट्राबाहेरची आहेत . महाराष्ट्राच्या या भागाला बऱ्याचदा पुण्या-मुम्बईपेक्षा हैदाराबाद / तेलंगण जवळचे वाटते . त्या दृष्टीकोनातून नायक नायिकेचे मुंबई (पळून जाणाऱ्यांचे खास डेस्टिनेशन) ऐवजी हैदाराबादला जाणे योग्यच. नागराजकडून महाराष्ट्रातल्या अशा दुर्लक्षलेल्या लोकांच्या / भागाच्या / जीवनपद्धतीच्या कथा सैराट सारख्या निर्मितीमूल्यांसह सर्वांसमोर येत राहतील ही अपेक्षा. - लैला मजनू / रोमिओ जुलिएट / वासू सपना यांच्यासारखी तरूण प्रेमीजीवांना आदर्श वाटावी अशी आर्ची परशाची खास मराठमोळी ट्रेजिरोमंटिक जोडी मिळाली अजय अतुलच्या संगीतात मेलडी थोडी पण प्रभावी असते, तालाच वर्चस्व अधिक. आणि ओर्केस्ट्रेशन / अरेंजमेंट अति असते. त्यामुळे अकलूजपासून सिलिकॉन व्हलीपर्यंतचा सैराटचा तरुण प्रेक्षक झिंगाट वर पिटात न नाचता तर नवल. पण लॉस अन्जेलीस जाऊन करून आणलेली सिंफ़ोनिक अरेंजमेंट अनावश्यक आणि विरूप . त्यावर निळ्या डोळ्यांची सोनेरी केसांची एखादी गौरवर्ण युवती डेझी फुललेल्या कुरणामधून बागडती बघायला योग्य वाटले असते. आर्ची परश्याच्या ऊसातल्या शेतातील स्लो मोशन धावांसाठी आम्हाला सतारीचा एखादा फ्युजन तुकडा चालला असता.
  • Log in or register to post comments

सहमत.

सस्नेह
Wed, 05/18/2016 - 13:56 नवीन
यथार्थ प्रतिसाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदा

आपली प्रतिक्रिया

झेन
Wed, 05/18/2016 - 15:37 नवीन
आपले रसग्रहण __/\__ सटीक, ते पण वेगळा धागा न काढता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदा

मस्त प्रतिसाद

साहेब..
Wed, 05/18/2016 - 14:35 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

आणखी एक अतिशय उल्लेखनीय विशेष

भिंगरी
Wed, 05/18/2016 - 15:58 नवीन
आणखी एक अतिशय उल्लेखनीय विशेष म्हणजे व्हायोलन्सच्या सर्व प्रसंगात पार्श्वसंगीत शून्य आहे ! ना कर्णकर्कश्श वाद्यमेळ ना तारस्वरातील किंचाळ्या ना ड्रम्सचा टिपेचा धडधडाट. पण कोणताही बटबटीत म्युझिक इफेक्ट न देताही त्यातली हिंसा जाणिवांना हादरवून जाते. या शांततेमुळेच तो प्रसंग आपल्याला स्तब्ध करून टाकतो.
  • Log in or register to post comments

एखादी मुलगी जास्त आवडली

धनंजय माने
Wed, 05/18/2016 - 16:01 नवीन
एखादी मुलगी जास्त आवडली म्हणून दुसरीला नावं का ठेवतात लोक कोण जाणे? आमच्या कथेबाबत काही जाणवलं का? उगाचच कुठल्याही प्रकारचा अतिरंजित प्रकार आम्ही केलेला नाही. दोन घटका विरंगुळा मायबाप प्रेक्षकांना मिळावा एवढीच इच्छा. - आपलाच धनंजय माने
  • Log in or register to post comments

छन लिहिलय

पथिक
Wed, 05/18/2016 - 16:29 नवीन
छन लिहिलय
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय

पथिक
Wed, 05/18/2016 - 16:29 नवीन
छान लिहिलंय
  • Log in or register to post comments

जरा कन्फ्युजन झाल्यासारखं वाटतंय

समीरसूर
Wed, 05/18/2016 - 16:36 नवीन
जरा कन्फ्युजन झाल्यासारखं वाटतंय. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक काळ असा होता की काही 'बरे' अपवाद सोडले तर बाकी मराठी चित्रपटांच्या नावाने आनंदच होता. मला वाटते ८० आणि ९० चे दशक वाईट होते. 'घनचक्कर', 'इना मीना डिका', 'धुमाकूळ', 'चल गंमत करू', 'घोळात घोळ', 'सासरचं धोतर', 'माहेरची साडी', 'हळद रुसली कुंकू हसलं', 'वाहिनीच्या बांगड्या', ''येडा की खुळा', 'शेम टू शेम', 'डॉक्टर डॉक्टर', 'डोक्याला ताप नाही', 'आता होती गेली कुठे?' ही प्रातिनिधिक उदाहरणे पाहिली तर त्या काळात ९०% चित्रपट अत्यंत भिकारच असायचे. या काळात मराठी चित्रपट चित्रपटगृहात खूप कमी चालायचे. लेखात म्हटल्याप्रमाणे ढिसाळ पटकथा, चुकीचे गावरान उच्चार, भडक आणि संतापजनक अभिनय, आक्रस्ताळ्या आया, सासवा, नायिका, कृत्रिम रांगडा नायक, गचाळ चित्रण, अतिशय टुकार आणि पाचकळ कथा अशा कित्येक दोषांमुळे मराठी चित्रपट मरणासन्न झाला होता. अर्थात अपवाद होते पण ते अगदीच कमी होते. 'सवत माझी लाडकी', 'अशी ही बनवाबनवी', 'धूमधडाका', 'गंमत जंमत', 'धडाकेबाज' वगैरे मोजके अपवाद होते. त्यामानाने देमार चित्रपटांची संख्या खूपच जास्त होती. या कालखंडात आणि नंतरही मराठी चित्रपटांकडे हजारो प्रेक्षकांनी पाठ फिरवली. पैसे मोजून जर भिकार दर्जाचे मनोरंजन मिळणार असेल तर का चित्रपटगृहात जाऊन वेळ आणि पैसे दवडा असा सरळ हिशेब होता. 'श्वास' (२००४) आल्यानंतर चित्र किंचित बदलले. 'श्वास' हा गंभीर चित्रपट होता. राष्ट्रीय पुरस्कार जरी त्याला मिळाला असला तरी लोकाश्रय त्याला लाभला नाहीच. ऑस्करसाठी त्याची रवानगी झाली याचा 'ऑस्करला गेला' म्हणजे नॉमिनेशन मिळालं असा चुकीचा अर्थ काढण्यात आला. ऑस्करसाठी भारताने 'बीवी नं. १' देखील पाठवला होता. पुणे - मुंबई आणि थोडा शहरी भाग वगळता 'श्वास' हा मुख्यत्वेकरून ट्रॉफी मूव्हीच बनून राहिला. त्यानंतर मराठी चित्रपटांनी झटकन कात टाकली आणि मराठी चित्रपटाची पताका जगभर फडकू लागली हे जरा अतिशयोक्त आहे असे वाटते. 'श्वास' इतका नक्कीच लोकप्रिय नव्हता. त्यानंतर २००५ मध्ये आलेला 'डोंबिवली फ़ास्ट' खर्या अर्थाने खूप लोकप्रिय ठरला. एव्हाना तांत्रिक सफाई आलेली होती परंतु आशयामध्ये आणि सादरीकरणामध्ये तितकीशी सफाई दिसत नव्हती. याबाबतीत थोडा उजवा ठरला 'काय द्याचं बोला' पण तो 'माय कझिन विनी'ची कॉपी होता. मला वाटते 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' ने (२००९) ती आशयाची आणि पैशाची श्रीमंती मराठी चित्रपटांमध्ये आणली. हा चित्रपट तुफान चालला. २०१० मध्ये आलेल्या 'नटरंग'ने मराठी चित्रपटांना एक आगळाच दर्जा मिळवून दिला. 'अगं बाई अरेच्चा' 'सावरखेड एक गाव' (२००४) पासून मराठी चित्रपटातली गाणी हिट व्हायला लागली होती. थोड्या-फार फरकाने मराठी चित्रपटांमधली गाणी ही २००४ पासूनच लोकप्रिय व्हायला सुरुवात झाली. त्या आधी मराठी चित्रपट संगीत तितके लोकप्रिय नव्हते. वास्तवतेशी नातं सांगणारा, तद्दन फिल्मी वगैरे विषय तूर्तास बाजूला ठेवून चित्रपटाचे मनोरंजन मूल्य, गुणवत्ता, आणि त्या आधारावर चित्रपटाला मिळालेली लोकप्रियता आणि त्याद्वारे होणारी कमाई फक्त याच घटकांचा विचार करता 'डोंबिवली फास्ट'ने मराठी चित्रपटांना ऊर्जितावस्था देण्यात मोलाचा वाटा दिला असे मला वाटते. आणि आतादेखील दर्जेदार आणि लोकप्रिय मराठी चित्रपटांच्या तुलनेत सुमार मराठी चित्रपटांची संख्या कमी नाही. जवळपास ८०% च्या वर मराठी चित्रपट अजूनही सुमार, बाळबोध, आणि कंटाळवाणे असतात हे वास्तव आहे. नुसती तांत्रिक सफाई असून चालत नाही हे या चित्रपटनिर्मात्यांना कळत नाही. अर्थात यात अनुदान, काळ्या पैशाचे पांढऱ्या पैशात रुपांतर करणे अशी बरीच समीकरणे असतात हा भाग वेगळा. 'निशाणी डावा अंगठा', 'बीपी', 'टाईमपास', 'मुंबई पुणे मुंबई', 'नटरंग', 'बालगंधर्व', 'कट्यार...', 'नटसम्राट', 'काकस्पर्श' असे मोजके चित्रपट सोडले तर बाकी अजूनही आनंदीआनंदच आहे. एकेका आठवड्यात चार-चार मराठी चित्रपट प्रदर्शित होतात. कधी येतात आणि कधी जातात कळत देखील नाही. 'लावू का लाथ', 'टाटा बिर्ला आणि लैला', 'कमिंग सून', 'नवरा अवली, बायको लवली', 'चल धर पकड, 'चाहतो मी तुला', 'मराठी टायगर्स', जस्ट गंमत', 'सासूचं स्वयंवर', वांण्टेड बायको नं. वन', 'वाजलाच पाहिजे', 'दगडाबाईची चाळ', 'बाई गो बाई', 'ऊर्फी' आणि असे बरेच सुमार, भिकार चित्रपट मराठीत कधी आले आणि कधी गेले कळलंच नाही. अजूनही अशा चित्रपटांची संख्या एकूण मराठी चित्रपटांच्या ८०-९०% सहज असावी. थोडक्यात काय तर चित्रपट नुसता चकचकीत झाला म्हणजे चित्रपटांनी उत्तुंग झेप घेतली असे नाही. एकूण संख्या खूप वाढली आणि दर्जेदार, वेगळ्या धाटणीच्या, आशयसंपन्न तरीही मनोरंजक अशा मराठी चित्रपटांची संख्यादेखील निश्चितच वाढली आहे आणि त्यामुळे मराठी सिनेमा जगभर पोहोचला आहे, मराठी चित्रपटात सुखद असे ग्लेमर आणि पैसा आलेला आहे, मराठी चित्रपट आता दीन वाटत नाही हे मात्र १००% खरे! आणि अभिमानास्पददेखील!
  • Log in or register to post comments

हे पाहा

मराठी कथालेखक
गुरुवार, 05/19/2016 - 18:11 नवीन
१) It was the film Shwaas in 2004 which reignited the spark and everything began to change and a handful of films achieved commercial success, including Harishchandrachi Factory, Natrang, Vihir, Zenda, Jhing Chik Jhing and Mee Shivajiraje Bhosale Boltoy http://www.boxofficeindia.co.in/aamcha-cinema/ २) Shwaas was acknowledged as a "significant turn for Marathi cinema" which had been going through a low patch. After its success, it was released in Hindi, Bengali and Tamil languages. https://en.wikipedia.org/wiki/Shwaas
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा