✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सैराट - याड लागलं!

स
समीरसूर यांनी
Mon, 05/09/2016 - 14:35  ·  लेख
लेख
'सैराट'वर सध्या बरीच चर्चा होतेय. माझे मत नोंदवण्याचा मोह आवरत नाहीये म्हणून हा लेख-प्रपंच! आता हा विषय चघळून कंटाळा आला असल्यास क्षमस्व. लेख उडवला तरी नो हरकत! काल 'सैराट' पाहिला. काही लोकांकडून अफाट स्तुती ऐकली होती तर काहींनी बेक्कार नाके मुरडली होती. अतिशय टोकाची मते 'सैराट'विषयी ऐकायला मिळत होती. 'सैराट'ने मराठी चित्रपटाच्या उत्पन्नाचे सगळे विक्रम मोडले असं ऐकलं होतं. चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात जोरात चालू आहे. इतकंच नव्हे तर अमेरिकेतदेखील काही चित्रपटगृहात 'सैराट' प्रदर्शित झालेला आहे आणि तुफान गर्दी खेचतो आहे असे दिसते. एका अमेरिकास्थित मित्राने फेसबुकवर तिथल्या चित्रपटगृहातील दृश्याचा फोटो टाकला होता. ऑन पब्लिक डिमांड, 'झिंगाट' त्या चित्रपटगृहात दोनदा वाजवण्यात आले होते आणि जनता बेभान होऊन नाचत होती. 'सैराट'ने एक निराळीच जादू तमाम महाराष्ट्रावर केली आहे हे नक्की. 'सैराट'ने दुष्काळात होरपळून निघणार्या महाराष्ट्राला तीन तासाचे सज्जड मनोरंजन देऊन रणरणता मे महिना थोडा का होईना सुसह्य करण्याचे पुण्य कमावले आहे हे निश्चित. मी गेल्या आठवड्यातील मंगळवारपासून (ता. ३ मे २०१६) 'सैराट'च्या तिकिटांसाठी प्रयत्न करत होतो. कामाच्या दिवशीदेखील 'सैराट' संपूर्ण पुण्यातल्या चित्रपटगृहांमध्ये (मोजकी कॉस्मो भागांतली चित्रपटगृहे वगळता) सगळ्या खेळांना हाऊसफुल चालू होता. या आठवड्यातदेखील तशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे. शेवटी कसेबसे मला माझ्या आवडत्या नीलायमचे दुपारच्या ३;१५ च्या खेळाचे तिकिट मिळाले. नीलायमला अभूतपूर्व अशी गर्दी होती. चित्रपट बहुजन समाजाच्या पार्श्वभूमीचा असल्याने आणि दिग्दर्शक स्वत: त्या समाजाचा असल्याने ९५% जनता बहुजन समाजाची होती. जवळच्या निम्नस्तरीय वसाहतीमधून येणारी जनता मोठ्या प्रमाणावर होती. 'सैराट' मला बघायचाच होता. १ जानेवारी २०१६ (शुक्रवार) या दिवशी मी 'नटसम्राट' पाहिला होता आणि मध्यंतरामध्ये 'सैराट' ची झलक दाखवली होती. भन्नाट चित्रीकरण, मधुर संगीत, रांगडा नायक आणि तिखट तरीही मोहक अशी अर्ची - 'सैराट' बघणे मस्ट होते. 'सैराट' मला आवडला. अगदी मनापासून आवडला. नागराज मंजुळेचं दिग्दर्शन आणि कथा असलेला 'सैराट' प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालण्यात कमालीचा यशस्वी होतो आणि माझ्या मते हेच 'सैराट'चं यश आहे. सुरुवातीपासून 'सैराट' वास्तवाला धरून चालतो. ग्रामीण महाराष्ट्रात रंगणारे क्रिकेटचे सामने, तिथलं राजकारण, तिथल्या तरुणांच्या जीवन जगण्याच्या संकल्पना, जातीच्या उतरंडीवर आधारलेले समाजजीवन, शाळा-महाविद्यालयात मुला-मुलींना एकमेकांविषयी वाटणारे नैसर्गिक आणि गोड असे आकर्षण, त्यातून जन्माला येणार्या प्रेमकहाण्या, त्यातून निर्माण होणारे सामाजिक प्रश्न, आणि संबंधित कुटुंबांनी अशा कहाण्यांची आपापल्या सामाजिक, आर्थिक, वैचारिक कुवतीनुसार आणि सोयीने लावलेली भली-बुरी तड हे वास्तव आपल्यासाठी नवीन नाही. आपल्या आसपास आपण नेहमीच हे वास्तव बघत असतो. मंजुळेंनी मोठ्या हुशारीने आणि कल्पकतेने हे वास्तव मांडले. कुठेही जातीचा उल्लेख न करता केवळ वास्तववादी चित्रणातून मंजुळेंनी 'सैराट'मध्ये जाती-जातींमधल्या भक्कम भिंती अतिशय प्रगल्भपणे अधोरेखित केल्या. ऊस, कुटुंबाचे आडनाव, त्या कुटुंबाचे राजकारणमधले महत्वाचे स्थान, घरात असणारी आमदारकी, घराच्या भिंतीवर असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी तसबीर, कुटुंबातल्या पुरुष सदस्यांची मग्रुर वागणूक, स्वत:च्या ऐश्वर्याची आणि सत्तेची वागण्या-बोलण्यातून ओसंडून वाहणारी धुंदी अशा कित्येक डिटेल्समधून मंजुळे एका सुस्थापित आणि राज्यकर्त्या असणार्या कुटुंबाची ओळख करून देतात. त्याचबरोबर खोपटासारखे घर, उन्हातान्हात मासेमारी करणारे कुटुंब, चेहऱ्यावरचे दीन भाव यातून मंजुळे शोषित जातीचे आणि त्यांच्या डळमळीत अस्तित्वाचे चित्रण करतात. बहुजन समाजाला कितीतरी दशकांपासून महाराष्ट्रातल्या या सामाजिक, राजकीय, आणि आर्थिक दरीचा प्रचंड राग आहे आणि तो रास्तही आहे. 'सैराट'शी ही जनता लगेच कनेक्ट होऊ शकली. 'सैराट'चा सुरुवातीचा एक-सव्वा तास हा धमाल मनोरंजनाचा आहे. नुकतीच महाविद्यालयात जाऊ लागलेली पोरे आणि त्यांचे रेशमी भावविश्व या भागामध्ये दाखवले आहे. कुठल्याही प्रेक्षकाने छातीवर हात ठेवून सांगावं की 'सैराट'मधल्या पर्श्यासारखं किंवा अर्चीसारखं त्यांना त्यांच्या शाळा-महाविद्यालयातल्या दिवसांत वाटलं नाही. असा प्रेक्षक असणं जवळ-पास अशक्य आहे. चित्रपटाचा हा भाग पाहतांना मला माझ्या शाळेतले दिवस आठवत होते. आपल्याला आवडणार्या मुलीला बघण्यासाठी पायपीट करणं, वाट्टेल ते बहाणे शोधणं...हे मी शाळेत असतांना केलं होतं. नंतर महाविद्यालयात गेल्यानंतर त्या मुलीला दुसऱ्या गावात जाऊन भेटून आलो होतो आणि नंतर एक भेट-कार्डदेखील पाठवलं होतं. त्या भेट-कार्डामुळे पुढे रामायण झालं आणि आमची ती एकतर्फी प्रेमकहाणी अस्थिविसर्जनाचा एखादा कलश डुबूक करून नदीत बुडावा तशी जगरहाटीच्या विशाल नदीत बुडाली. नंतर बराच काळ वर बुडबुडे येत राहिले पण तोपर्यंत समोरच्या पार्टीला एका थर्ड पार्टीने टेक ओव्हर करून टाकलं होतं. हे सारं 'सैराट'चा पहिला तास-दीड तास बघतांना आठवत होतं. एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यात जर आकर्षण निर्माण झालं तर ते (कितीही चुकीचं असलं किंवा वाटत असलं किंवा त्रासदायक वाटत असलं किंवा खरोखर समस्या निर्माण करणारं असलं तरी) मोहकच वाटतं. ते चोरटे कटाक्ष, एकमेकांना बघण्याची ओढ, चिठ्ठ्या-चपाट्या, मुलाने मुलीच्या मागे फिरणं...नैसर्गिकच असतं हे सगळं. आणि म्हणूनच हजारदा बघूनदेखील ताजं वाटतं, गोड वाटतं. 'सैराट'मध्ये हा भाग रंगला आहे. आजचा मराठी तरुण या भागाशी लगेच कनेक्ट होऊ शकला. नंतरचा जग आणि वास्तव प्रखरपणे समोर आल्यानंतरचा प्रवास वास्तवावर आधारलेला असला तरी श्वास रोखून धरायला लावणारा आहे. प्रेक्षक नकळत नायक-नायिकेच्या बाजूने उभे राहतात. काही प्रसंगांमध्ये डोळ्याच्या कडा हलकेच ओलावतात. शेवट माझ्या मते एका खर्या घटनेवर आधारित आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी बहुधा सातारा की कुठल्याशा जिल्ह्यात अगदी अशीच घटना घडली होती. तो प्रसंग जसाच्या तसा चितारला आहे. अभिनयाच्या बाबतीत सगळेच अव्वल आहेत. पण जीव ओवाळून टाकावा अशी एकच आणि ती म्हणजे अर्ची म्हणजेच अकलूजची रिंकू राजगुरू! काय जबरदस्त अभिनय केलेला आहे या मुलीने म्हणून सांगू! मी तर पंखाच झालो. आणि दिसते पण सुरेख! प्रत्येक फ्रेममध्ये जो अभिनय रिंकूने केलेला आहे त्याला तोड नाही. पाटलाच्या घरची पोरगी कशी असावी? बिनधास्त, तिखट, झणझणीत, ठसकेबाज, देखणी, बेडर...अर्ची अशीच आहे. पाहताक्षणी आवडणारी, हृदयावर राज्य करणारी, जीव लावतांना जीव ओवाळून टाकण्याची तयारी ठेवणारी, प्रेमासाठी जीव घ्यायलादेखील तयार असणारी, धाडसी अशी ही अर्ची रिंकूने अविस्मरणीय करून ठेवलेली आहे. तिची कॅमेराची समज अफलातून आहे. तिचं स्मित कातिल आहे. तिचे डोळे विशाल आणि बोलके आहेत. टपोर्या डोळ्यांमधून ती लज्जा, प्रेम, संताप, लाचारी, खोडसाळपणा लीलया व्यक्त करते. ती सहजपणे बुलेट आणि ट्रेक्टर चालवते. मोठ्या विहिरीत धाडकन उडी टाकते. अवघ्या महाराष्ट्राला अर्चीनं याड लावलंय ते उगीच नाही. अर्ची हा 'सैराट'चा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. परश्या पण काही कमी नाही. परश्या म्हणजेच आकाश ठोसर कोवळा आहे, बुजरा आहे पण धाडसी आहे. एका उच्च घराण्यातल्या मुलीवर प्रेम करण्याची आणि तिच्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्याची तयारी आहे. आकाश ठोसरने नीट समजून अभिनय केला आहे. त्याचे मित्र प्रदीप (तानाजी गलगुंडे), सल्या ऊर्फ़ सलीम (अरबाज शेख) यांनी शंभर नंबरी अभिनय केलेला आहे. अगदी १००% खरे वाटावेत असे हे मित्र यांनी वठवले आहेत. अर्चीच्या मुजोर भावाच्या म्हणजेच प्रिन्सच्या भूमिकेत सूरज पवारने दृष्ट लागण्याजोगे काम केले आहे. राजकारणी घराण्यातला, सत्तेचा, पैशाचा, जमीनदारीचा अशक्य कोटीतला गुंठामंत्री-छाप माज असलेला प्रिंन्स सूरज पवारने पुरेपूर उतरवला आहे. अर्चीचा बाप एक नंबर जमला आहे. नागराज मंजुळेंचा अभिनय दाद देण्यासारखा आहे. अजय-अतुल यांचे संगीत चांगले आहे. गाणी नीट प्रवाहात येतात. झिंगाट गाणे खूप हिट झालेले आहे. चित्रपट्गृहात या गाण्यावर प्रचंड शिट्ट्या होत होत्या आणि बर्याच प्रेक्षकांनी हे गाणे सुरु झाल्यावर आपले पारंपारिक (पतंग, नागीन, गणपती वगैरे शास्त्रोक्त नृत्य) नृत्य करण्याचा मनसोक्त आनंद लुटला. 'सैराट' मधून दिग्दर्शक एका महत्वाच्या सामाजिक विषयाला हात घालतो परंतु त्यावर मत देण्याचं टाळतो. आणि मत देण्याचं टाळलेलं असतांना आजच्या वाढलेल्या जातीभेदावर एक घणाघाती आघात करण्याचं मात्र दिग्दर्शक विसरत नाही. ऑनर किलिंग ही गेल्या वीस वर्षातली संकल्पना. काळ जसा जसा पुढे सरकतो तसे तसे समाजाने अधिकाधिक प्रगल्भ आणि खेळकर होणं अपेक्षित असतं. दुर्दैवाने महाराष्ट्रात हा प्रवास उलट्या दिशेने सुरु आहे. महाराष्ट्राच्या मातीतून ऑनर किलिंगसारख्या हिडीस प्रकारावर चित्रपट निघेल असं कधी स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं. दुर्दैवाने तशी वेळ आज येऊन ठेपलेली आहे. बोधामृत, मेसेज, योग्य-अयोग्य वगैरे भानगडीत न पडता जे सत्य आहे ते दिग्दर्शकाने अतिशय समर्थपणे आणि रंजक पद्धतीने समोर ठेवलं आहे. कुणाला काय धडा घ्यायचा तो ज्याने त्याने घ्यावा. अशा प्रकारचे स्फोटक प्रेम करून समस्या निर्माण करायच्या की धाडसाने प्रेम करून समस्यांना तोंड देऊन आपले प्रेम सिद्ध करून दाखवायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे. हा निर्णय सर्वस्वी प्रेक्षकांचा. अशा प्रेमाला समाजाने कसे रिएक्ट व्हायचे हे देखील विचारपूर्वक ठरवण्याची नितांत गरज दिग्दर्शक ठासून सांगतो. बर्याच लोकांनी चित्रपटावर आक्षेप घेतले. हा चित्रपट बघून मुले बिघडतील असाही आक्षेप मी ऐकला. या विधानात काही तथ्य आहे असे मला वाटत नाही. चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. जे समाजात घडते ते चित्रपटात दाखवतात. आणि चित्रपट नव्हते तेव्हादेखील अशी प्रेमप्रकरणे होतच असत. पालकांच्या मार्गदर्शनाखाली मुले या चित्रपटाचा आस्वाद नक्कीच घेऊ शकतात. त्यांना त्यातून नक्कीच शिकायला मिळेल. आणि शेवटी चित्रपट हे मनोरंजनाचे साधन आहे. त्याचा वाईट परिणाम मुलांवर होणार नाही असे संस्कार मुलांवर असणे आवश्यक आहे. आज घरोघरी टीव्हीवर पाहिले जाणारे कार्यक्रम किती सोवळे असतात हे आपण सगळेच जाणतो. मोबाईल, इंटरनेट, व्हिडिओ गेम्स या माध्यमांमधून मुले काय बघतात आणि शिकतात आणि यावर पालकांचे किती नियंत्रण आहे हादेखील एक प्रश्न आहेच. अर्थात कुठले चित्रपट बघायचे आणि कुठले टाळायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हे तितकेच खरे! मला मात्र एक गंभीर विषय रंजक पद्धतीने हाताळणारा सशक्त चित्रपट म्हणून 'सैराट'चे कौतुक वाटते. अगदी काहीच नाही तर आपापल्या मनातली रेशमी आठवणीत जपून ठेवलेली अर्ची किंवा आपापल्या मनातला सुगंधी कुपीत जपून ठेवलेला परश्या पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी तरी 'सैराट' बघा असे सांगावेसे वाटते. अर्चीच्या डोळ्यातील मस्ती पाहून हा शेर मनात रुंजी घालतोय: मैं तेरी मस्त निगाही का भरम रख लुंगा होश आया भी तो कह दुंगा मुझे होश नही ये अलग बात हैं साकी के मुझे होश नही वरना मैं कुछ भी हूं एहसान फरामोश नही
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
समीक्षा

प्रतिक्रिया द्या
24665 वाचन

💬 प्रतिसाद (106)

प्रतिक्रिया

छान ....!

रुमानी
Mon, 05/09/2016 - 14:54 नवीन
आवड्ले आपले वेड....!
  • Log in or register to post comments

हे परिक्षणही आवडले.

प्रचेतस
Mon, 05/09/2016 - 14:55 नवीन
हे परिक्षणही आवडले.
  • Log in or register to post comments

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/09/2016 - 15:12 नवीन
परीक्षण आवडलं. फक्त- ''चित्रपट बहुजन समाजाच्या पार्श्वभूमीचा असल्याने आणि दिग्दर्शक स्वत: त्या समाजाचा असल्याने ९५% जनता बहुजन समाजाची होती. जवळच्या निम्नस्तरीय वसाहतीमधून येणारी जनता मोठ्या प्रमाणावर होती'' आवडलं नाही. अशी श्रोत्यांची विभागणी वाचून आश्चर्य वाटलं, विचार करण्याची कमाल वाटली, सुशिक्षित माणूस किती हळवा, संवेदनशील, झालाय त्याचा उत्तम नमूना वाटला. पण याही मताचा मी आदर करतो. पुलेशु. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सहमत.

प्रचेतस
Mon, 05/09/2016 - 15:22 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रोत्यांची विभागणी

सूड
Mon, 05/09/2016 - 15:50 नवीन
श्रोत्यांची विभागणी
गायन, भाषण ऐकायला येतात ते श्रोते; पाहायला येतात ते प्रेक्षक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चूक झाली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/09/2016 - 15:52 नवीन
लिहितांना चूक झाली. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अशी प्रेक्षकांची विभागणी

समीरसूर
Mon, 05/09/2016 - 15:51 नवीन
अशी प्रेक्षकांची विभागणी व्हावी हे तितकसं रुचणारं नाही हे खरय पण ते तसं बर्यापैकी प्रमाणात आहे हे ही वास्तव आहेच. 'टाईमपास'चा क्राऊड वेगळा, 'लोकमान्य'चा वेगळा, 'बालगंधर्व'चा वेगळा, 'टाईमपास २' चा वेगळा...हे नेहमीच होत असते. मी 'कट्यार' देखील नीलायमला पाहिला होता. त्यावेळेसचा क्राऊड आणि 'सैराट'चा क्राऊड यात जमीन-आसमानचा फरक होता. आणि 'आपला माणूस' म्हणून नागराजविषयी फेसबुकवर पोस्ट्सदेखील पाहिले. 'सैराट'बद्दल नाके मुरडणारे लोक्स निराळे आहेत. हा फरक निश्चितच आहे. आणि तो फरक लगेच जाणवतो इतका निश्चितच असतो. आणि त्यात चुकीचे काहीच नाही. एवढा मोठा व्ह्युअर बेस असल्यामुळे 'सैराट' इतका गाजतोय. अगदी खेडोपाडी देखील! नाहीतर मराठी चित्रपट फार क़्वचितच खेड्यांमध्ये चालतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत.

सस्नेह
Mon, 05/09/2016 - 15:56 नवीन
गर्दीवर एक नजर टाकली तरी 'मॉबॅलिटी' चा अंदाज येतो. नाटकाचा प्रेक्षक आणि सिनेमाचा प्रेक्षक नुसत्या नजर टाकण्यावरून लक्ष्क्षत येतो, तसंच कोणत्या सामाजिक वर्गातला प्रक्षक हे लक्षात येणं साहजिक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

काय राव...मानसिक त्रास आहे हा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/09/2016 - 16:06 नवीन
चित्रपट गृहात प्रेक्षकांची आसन क्षमता 'अमुक अमुक' लोकांची असेल तर दिग्दर्शकाच्या जातीचे प्रेक्षक १०० लोक होते, चित्रपटात पाटील आहे म्हणून पाटलांचे प्रतिनित्व करणा-या प्रेक्षकांची संख्या १०० होती, कोळ्यांचा नायक म्हणून तरुण मुले, पालक, आणि कोळीनीची संख्या १०० होती, सल्ल्या फिटर होता म्हणून फिटर पोरं ४५ होती, सल्ल्याची आई बांगड़या भरणारी होती म्हणून कासार समाज प्रेक्षकांची संख्या १२५ होती, लंगड़या प्रेक्षकांची संख्या १०० होती, अंदाजे १२५ प्रिंसचे प्रतिनिधी होते, आणि स्वत:ची जात विसरुन नीव्वळ चित्रपट बघायला आलेल्यांची संख्या २५ होती, एवढेच आता वाचायचं राहिलं आहे. असो, मी थांबतो. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

प्रेक्षकांचा एक ढोबळ कल कळतो

समीरसूर
Mon, 05/09/2016 - 16:14 नवीन
:-) प्रेक्षकांचा एक ढोबळ कल कळतो. अर्थात इतके डिटेल्स कळत नाहीत. पण असे असते हे नक्की. हे मी स्वत: कित्येकदा अनुभवले आहे. आपल्या समाजाची जडण-घडणच जाती आणि समूहधिष्ठीत आहे त्याला काय करणार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

परीक्षण आवड़लंच आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/09/2016 - 16:49 नवीन
मला चित्रपट खूप आवडला आहे आणि मिपा परीक्षणही आवडली आहेत, अजुन एक दोन परिक्षण आणि नवी मतंही वाचायला आवडतील, आपलंही चित्रपट परीक्षण आवडलं, बाकी समाज अधिक जातीनिष्ठ होत चालला आहे त्याच्याशी सहमत. पण मोकळेपणाने जे आवडलं नाही, ते लिहिलं. बाकी, बोला अजुन काय नवं विशेष ? :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

धन्यवाद!

समीरसूर
Tue, 05/10/2016 - 12:04 नवीन
धन्यवाद, डॉक्टरसाहेब. हम्म, आवडत मलादेखील नाही पण काय करणार? तेच आजचं कडूजार वास्तव आहे. खाली एका प्रतिक्रियेत टाकलेल्या एका रिंकूच्या संदर्भातल्या पोस्टवरून जात-समूह भावना किती घट्ट आहे हे दिसून येते. आणि असे बरेच पोस्टस मी पाहिलेले आहेत. असो. बाकी चालू आहे निवांत. 'सैराट' पुन्हा बघावा असं वाटतंय. बघू कधी जमतंय. अर्चीची आठवण येतेय परत. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय राव...मानसिक त्रास आहे हा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/09/2016 - 16:06 नवीन
चित्रपट गृहात प्रेक्षकांची आसन क्षमता 'अमुक अमुक' लोकांची असेल तर दिग्दर्शकाच्या जातीचे प्रेक्षक १०० लोक होते, चित्रपटात पाटील आहे म्हणून पाटलांचे प्रतिनित्व करणा-या प्रेक्षकांची संख्या १०० होती, कोळ्यांचा नायक म्हणून तरुण मुले, पालक, आणि कोळीनीची संख्या १०० होती, सल्ल्या फिटर होता म्हणून फिटर पोरं ४५ होती, सल्ल्याची आई बांगड़या भरणारी होती म्हणून कासार समाज प्रेक्षकांची संख्या १२५ होती, लंगड़या प्रेक्षकांची संख्या १०० होती, अंदाजे १२५ प्रिंसचे प्रतिनिधी होते, आणि स्वत:ची जात विसरुन नीव्वळ चित्रपट बघायला आलेल्यांची संख्या २५ होती, एवढेच आता वाचायचं राहिलं आहे. असो, मी थांबतो. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

सहमत,

नीलमोहर
Mon, 05/09/2016 - 16:08 नवीन
प्रेक्षकांची विभागणी हा प्रकार असतोच आणि त्यात चुकीचे काही नसावे, ज्याची त्याची आवड शेवटी . बालगंधर्व, काकस्पर्श इ.चा प्रेक्षकवर्ग सैराटकडे वळेल कदाचित, पण व्हाइसवर्सा होणे कठीण असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

वरील विभागणी खटकत असेल तर

सूड
Mon, 05/09/2016 - 16:09 नवीन
वरील विभागणी खटकत असेल तर कलाकारांबद्दल केलेल्या ह्या विभागणीबद्दल मत वाचायला आवडेल. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

असे बरेच पोस्ट्स मी नेहमी पाहतो.

समीरसूर
Mon, 05/09/2016 - 16:20 नवीन
असे बरेच पोस्ट्स मी नेहमी पाहतो. त्यात मला फारसे चुकीचे काही वाटत नाही. ही अशी विभागणी हे कालचे, आजचे, आणि उद्याचे वास्तव आहेच. अशी विभागणी करूनच तर राजकारणी आपला डाव साधतात हे भारतीय जनतेला नवीन आहे काय? :-) रिंकू राजगुरू ही बौद्ध समूहाची आहे हे नाहीतर जनतेला कसे कळले? गुगल वर रिंकू राजगुरू सर्च करतांना 'रिंकू राजगुरू कास्ट' असे ऑटो-सजेशन येते. ते पाहून मला आश्चर्य वाटले होते पण हे आपले वास्तव आहे. हम उसे नकार नाही सकते.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तुम्हाला नाही हो, प्राडाँना

सूड
Mon, 05/09/2016 - 16:26 नवीन
तुम्हाला नाही हो, प्राडाँना लिहीलंय. त्यांना खटकलंय ना? आम्हाला नाही बुवा खटकत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

तुम्हाला नाही

समीरसूर
Mon, 05/09/2016 - 16:50 नवीन
तुम्हाला नाही हा प्रतिसाद सूडराव...डॉक्टरसाहेबांनाच आहे...आपल्या प्रतिसादाला मी दुजोराच दिला आहे. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हे प्रक्रण तर इतकं फेसपाम

तर्राट जोकर
Mon, 05/09/2016 - 16:26 नवीन
हे प्रक्रण तर इतकं फेसपाम झालं की बास. अरे इथंही जात शोधून काढलीच? काय उपयोग त्या मंजुळेच्या पराक्रमाचा? सब गोबर कर दियेस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

+१

टवाळ कार्टा
Tue, 05/10/2016 - 14:47 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

अगदी अगदी..

ब़जरबट्टू
Mon, 05/09/2016 - 16:01 नवीन
९५% जनता बहुजन समाजाची होती. ह्या वाक्यावर तर जोरदार शिट्ट्या आहे राव. काय नजर आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एखाद्याला बघून तो अभिजन्

टवाळ कार्टा
Tue, 05/10/2016 - 14:49 नवीन
एखाद्याला बघून तो अभिजन्/बहुजन अश्या कोणत्या क्याटेगरीत येतो याचा अंदाज??? आणि त्यासाठी शिट्ट्या???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

प्रांजळ परीक्षण

सस्नेह
Mon, 05/09/2016 - 15:06 नवीन
प्रांजळ परीक्षण
  • Log in or register to post comments

+१

सिरुसेरि
Mon, 05/09/2016 - 15:14 नवीन
"अर्चीचा बाप एक नंबर जमला आहे." --------- पुढे कधी जर 'सैराट'चा हिंदीत रिमेक झाला तर या रोलमध्ये प्रकाशराज शोभुन दिसेल .
  • Log in or register to post comments

+१

अनिरुद्ध प्रभू
Mon, 05/09/2016 - 15:24 नवीन
अगदिच कोण नाय तर डॅनी....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

छान लिहलंय

_मनश्री_
Mon, 05/09/2016 - 15:18 नवीन
छान लिहलंय दोनदा बघितला सैराट तरीही परत पहायचा आहे
  • Log in or register to post comments

सैराट गाजले अन एकेक दमदार

कंजूस
Mon, 05/09/2016 - 15:25 नवीन
सैराट गाजले अन एकेक दमदार मिपाकर लेखक समोर येऊ लागलेत. भिडलं. बाकी अर्चिस म्हणजे पहाटेपुर्वीची पहाट ना?
  • Log in or register to post comments

अर्ची = अर्चना.

तर्राट जोकर
Mon, 05/09/2016 - 15:27 नवीन
अर्ची = अर्चना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अर्चिस- प्रकाशकिरण किंवा

प्रचेतस
Mon, 05/09/2016 - 15:29 नवीन
अर्चिस- प्रकाशकिरण किंवा सूर्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

आम्हाला आर्चिस म्हनलं की एकतर

अभ्या..
Mon, 05/09/2016 - 15:31 नवीन
आम्हाला आर्चिस म्हनलं की एकतर ग्रीटींग्ज कार्ड कंपनी किंवा गॅस बर्नरची कंपनी आठवते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ह्या इमेल क्रांतीनं आर्चिजला

प्रचेतस
Mon, 05/09/2016 - 15:33 नवीन
ह्या इमेल क्रांतीनं आर्चिजला संपवलं. आता व्हाटसअपच्या जमान्यात ग्रीटींग्सकार्ड औषधाला देखील मिळत नाही (कार्पोरेट्सचा अपवाद सोडून)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

लेख आवडला.

एस
Mon, 05/09/2016 - 15:39 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

दीड शंका

मराठी कथालेखक
Mon, 05/09/2016 - 15:56 नवीन
पहिली :
चित्रपट बहुजन समाजाच्या पार्श्वभूमीचा असल्याने आणि दिग्दर्शक स्वत: त्या समाजाचा असल्याने ९५% जनता बहुजन समाजाची होती.
हे कसं काय कळालं हो ? फक्त चेहरा बघूनच समजतं ? दुसरी अर्धी :) अनेक समीक्षणातून 'रिंकू राजगुरु' ही सुंदर, सुरेख, गोड ई ई असल्याचे म्हंटले आहे, मला तरी घरातील टीवीच्या (आधी १९" आणि आता ३२") स्क्रीनवर ती सुंदर वगैरे वाटली नाही, मोठ्या पडद्यावर वेगळी दिसते का हो ?
  • Log in or register to post comments

रुढार्थाने ती सुंदर नाही.

तर्राट जोकर
Mon, 05/09/2016 - 16:02 नवीन
रुढार्थाने ती सुंदर नाही. तसेच प्रत्येक सीनमधे वेगळी दिसते. बट शी हॅज गॉट द एक्स फॅक्टर. तिच्या डोळ्यांत तिचे सर्व सौंदर्य एकवटले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

अगदी.

समीरसूर
Mon, 05/09/2016 - 16:23 नवीन
अगदी. ती सुंदर आहे असे नाही म्हणवणार पण उसमे कुछ बात जरूर है...अन्यथा तिने असं वेड नसतं लावलं. :-) ते संपूर्ण चित्रपट पाहिल्यावर लक्षात येईल बहुधा...मला तर लैइच आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

क्या नजर देती है बॉस्स ;)

टवाळ कार्टा
Tue, 05/10/2016 - 14:49 नवीन
क्या नजर देती है बॉस्स ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

एवढं कळतं की राव आता. :-)

समीरसूर
Mon, 05/09/2016 - 16:28 नवीन
>> हे कसं काय कळालं हो ? फक्त चेहरा बघूनच समजतं ? एवढं कळतं की राव आता. खेड्यात राहिलो-वाढलो. डोक्यावर केसांनी गद्दारी केलीये. चार लोकांशी बोललोय. चार जागा बघितल्या आहेत. थोडं माफक का असेना कळतं. :-) सैराटमध्ये नाही का, हैदराबादच्या हॉटेल मेनेजरला ही मराठी पोरं पळून आलेली आहेत हे न सांगताच कळतं आणि तो रूम नाही म्हणून सांगतो...तसंच थोडं-फार... :-) बाकी रिंकूला तुम्ही बघून तुम्हीच ठरवा. सांगून कसं कळणार? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

अडगूलं-मडगूल बघितला का हो

मराठी कथालेखक
Mon, 05/09/2016 - 17:33 नवीन
अडगूलं-मडगूल बघितला का हो तुम्ही ? नसेल बघितला तर खरंच बघा. तसाही सैराट , फॅड्री ई चित्रपट जस भाष्य करतात तसंच काहीस (विषय थोडा वेगळा आहे) भाष्यं मस्त खुसखुशीत ढंगाने हा चित्रपट करतो. बाकी सुबोध भावे अप्रतिम, गिरिजा ओकचा अभिनय पण झकास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

!

सस्नेह
Mon, 05/09/2016 - 16:02 नवीन
मला तरी घरातील टीवीच्या (आधी १९" आणि आता ३२") स्क्रीनवर ती सुंदर वगैरे वाटली नाही, मोठ्या पडद्यावर वेगळी दिसते का हो ?
तुम्हाला त्यांचे मत पटत नसेल तर तुम्हीच बघून ठरवा ना ! शिवाय सुंदर इ. ची व्याख्या सापेक्ष आहे. तुम्हाला सुंदर नाही वाटली तर त्यांना वाटू नये असे थोडेच आहे ?
  • Log in or register to post comments

तुम्हाला त्यांचे मत पटत नसेल

मराठी कथालेखक
Mon, 05/09/2016 - 16:17 नवीन
तुम्हाला त्यांचे मत पटत नसेल तर तुम्हीच बघून ठरवा ना !
मला वाटतंय मी शंका विचारली होती. आणि काही कलाकारांच्या बाबतीत टीवी स्क्रीन व मोठा पडदा यांवर बराच फरक जाणवतो.
शिवाय सुंदर इ. ची व्याख्या सापेक्ष आहे. तुम्हाला सुंदर नाही वाटली तर त्यांना वाटू नये असे थोडेच आहे ?
असं म्हंटल होतं का मी ? उगाच चिडून प्रतिक्रिया देण्यात काय अर्थ आहे ? असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

उगाच चिडून प्रतिक्रिया

सस्नेह
Mon, 05/09/2016 - 17:38 नवीन
उगाच चिडून प्रतिक्रिया देण्यात काय अर्थ आहे ?
:) मी चिडून प्रतिक्रिया दिली असं तुम्हाला का वाटलं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

जाऊ द्या हो

समीरसूर
Mon, 05/09/2016 - 16:34 नवीन
जाऊ द्या हो. मत आपण अनुभव घेऊन बनवायचं असतं. तुम्ही बघा आणि ठरवा गर्दी कशी आहे आणि रिंकू कशी आहे ते...मी चुकलो असेल तर मग सांगा...एवढं काय मनावर घेताय. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

माझा वरील प्रतिसाद मराठी कथालेखक यांच्यासाठी आहे.

समीरसूर
Mon, 05/09/2016 - 16:37 नवीन
माझा वरील प्रतिसाद मराठी कथालेखक यांच्यासाठी आहे. स्नेहांकिताजींचा प्रतिसाद खरंच समतोल असतो. त्यामुळे नको त्या विषयावरून कशाला उगीच भांडण. रिंकू कशी ही असली तरी आपल्याला काय फरक पडतो...बरोबर ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

माझा प्रश्न सरळ होता...

मराठी कथालेखक
Mon, 05/09/2016 - 17:27 नवीन
माझा प्रश्न सरळ होता... तुम्हाला sarcastic वाटला ला ? :) मला खरंच असंच विचारायचं होतं की या नायिकेच्या दिसण्याबाबत टीवी आणि पडद्यात मोठा फरक वाटतो का ? (काही कलाकारांबाबत तसा जाणवतो असं मला वाटतं)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

वा वा .. जे लिहिले आहे, ते

गणेशा
Mon, 05/09/2016 - 16:14 नवीन
वा वा .. जे लिहिले आहे, ते तंतोतंत माझे मत आहे असेच वाटले.. अर्ची मस्तच .. पर्श्या पण ... बर्याच दिवसानी तुमचे परिक्षणवपाहिले आणि काम बाजुला ठेवुन वाचलेच .. लिहित रहा... वाचत आहे ...
  • Log in or register to post comments

बाकी सैराट झालं जी गाणज्खुप

गणेशा
Mon, 05/09/2016 - 16:17 नवीन
बाकी सैराट झालं जी गाणज्खुप आवडले .. कितिदा तरी मोबाईल मध्ये ऐकले.. आत गं बया का बावरल पण मस्त .. पण ते जास्त कोठे टीव्ही ला दिसत नाही.. संगित .. गाण्याचे स्वर .. मस्त.. मस्त म्हणजे माझ्या भाषेतील.. म्हणुन जास्त घर करुन गेले ..
  • Log in or register to post comments

सिविल वाँर भारीये बाकी

स्पा
Mon, 05/09/2016 - 17:18 नवीन
सिविल वाँर भारीये बाकी
  • Log in or register to post comments

काडी प्रयत्न क्षिण आहे बाकी ;

तर्राट जोकर
Mon, 05/09/2016 - 17:38 नवीन
काडी प्रयत्न क्षिण आहे बाकी ;) असो. शिवील वॉरवर परिक्षणं आली न्हाय अजून? कसं काय ब्वॉ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

सिविल वाँर भारीये....

मुक्त विहारि
Mon, 05/09/2016 - 17:41 नवीन
ह्या सिनेमाबाबत माझ्या मुलांचे पण म्हणणे हेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

तुमचा आयडी मुवी ऐवजी चित्रपट

लालगरूड
Mon, 05/09/2016 - 18:14 नवीन
तुमचा आयडी मुवी ऐवजी चित्रपट असता तर मराठी सिनेमा पण आवडला असता. ह घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा