आजोळ

श्वेताली कुलकर्णी's picture
श्वेताली कुलकर्णी in जनातलं, मनातलं
1 May 2016 - 1:36 am

साधारणपणे आमची परीक्षा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात संपली कि आजोबा आम्हाला घेऊन जाण्यासाठी आलेलेच असणार , उन्हाळ्याची सुट्टी म्हणले कि आमचे ठरलेले ठिकाण येळावी माझे आजोळ . कवठे महांकाळ ते येळावी दीड दोन तासाचा प्रवास , तासगाव मधून गाडी बदलावी लागत असे मी एकीकडे आजोबा मध्ये आणि दीदी दुसरीकडे असा आमचा प्रवास .

गाव तसे लहान होते पण आजोबांना मानणारे लोक खूप , त्यामुळे जोशीबुवांची नातवंडे म्हणून आमचीही मजा असे . तिथे उतरले कि स्टेंड वरच ओळखीचे एक दुकान होते तिथून आम्हला खूप गोळ्या बिस्किटे मिळत , तोपर्यंत आजोबा त्यांची सायकल घेऊन यायचे आणि आमचा प्रवास आमच्या मळ्याकडे , गावापासून २-३ किलोमीटर आतमध्ये आमचा मळा , जाताना दोन्ही बाजूने झाडे त्यामुळे उन्हाळा आहे असे वाटतच नसे .
घर जवळ आले कि सायकलची घंटी वाजवून आजीला सांगणार कि आम्ही आलो , पण ती त्याआधीच दृष्ट काढायचे समान हातात घेऊन उभी असे . "किती वाळल्या ग माझ्या पोरी ?" संधी (माझी आई संध्या ) नेहमी पोरांच्या मागे असते नुसती , असे म्हणून गालावर मायेने हात फिरवायची .
गेल्या गेल्या चुलीत भाजलेल्या कैरीचे मस्त पन्हे प्यायला मिळायचे , आम्ही येणार म्हणून आजीची तयारी खूप जोरदार असायची , त्यात खास कैरीची चटणी , बाटाचे आणि साधे लोणचे , मुरंबा ,साखरांबा सगळी नुसती धमाल …
आम्ही येणार म्हणून आधीच प्रत्येकासाठी झोपाळे बांधून तयार असायचे , गोष्टीची पुस्तके आणि सोबत अभ्यासही असे , याबाबतीत आजोबा खूप कडक होते त्यांना रोज पाढे म्हणून दाखवावे लागत आणि शुद्धलेखनसुद्धा यात कोणतीही तडजोड नसे .
आमचे दुपारचे जेवण शक्यतो आमराईत असे वरती लटकलेल्या कैऱ्या , आजूबाजूला जांभूळ ,आवळा, सोनचाफा , मोगरा , अशी कितीतरी झाडे यात आमचे जेवण … आमची दुपारची छोटी डुलकीही तिथेच होई,
तिन्हीसांजेला आजोबा आमच्याकडून शुभं करोति , अथर्वशीर्ष , रामरक्षा ,मारुती स्तोत्र म्हणून घेत . रात्रीची जेवणेसुद्धा अंगणात होत … चांदण्यात आजी जवळ कुशीत झोपताना तिने शिवलेल्या गोधडीची ऊब जास्त कि तिच्या कुशीची ? या विचारात आणि गोष्टी ऐकत निद्रादेवी भूल घालत असे .
सकाळी उठले कि चुलीसमोर जाऊन बसायचे , आजीची धार काढणे यात हळूच कधीतरी जाऊन तिला मदत करायची , शेणाने सारवायचे असे उद्योगधंदे , हे दुध तापवल्यावर खाली राहिलेली साय आजी साखर घालून खरवडून द्यायची काय लाजवाब चव तिची … दुपारचे आजीचे काम झाले कि ती मातीची खेळणी करून द्यायची माझा आणि दिदीचा भातुकलीचा डाव रंगायचा … कधी कधी आजोबांसोबत सगळ्या शेतात भटकायचे .
हळू हळू कैरीला पाड येऊ लागतो मग आमच्या सगळ्याचे लक्ष तिकडे आजोबा स्वतः झाडावर चढून कैऱ्या उतरवायचे. आम्ही त्यांना मदत करत असू . घरात एक छोटी खोली होती तिथे पोती घालून त्यावर या कैऱ्या पिकायला ठेवायच्या . सगळ्या घरात नुसता आंब्याचा वास दरवळत असे . आम्ही तर त्या खोलीच्या शेजारीच झोपत असू , रोज उठले कि आज किती आंबे पिकले याची मोजदाद . आमरस साठी वेगळे , कापून खायचे वेगळे , चोखून खायला वेगळे असे त्यांचे वर्गीकरण …… असे करता करता मे महिना संपत आलेला असे आणि आई बाबा आम्हाला घेऊन जाण्यासाठी येत , दिवस किती लवकर सरले याचे इतके वाईट वाटायचे
पण ……
आजी न चुकता सगळ्या बरण्या आईला द्यायची , आमची परत एकदा पाणावलेल्या डोळ्यांनी दृष्ट काढून मग आम्हाला निरोप .

मला या आंब्याच्या जातीमधले काही कळत नाही , हापूस , पायरी ,शेपू आणि कुठलाहि असो पण एक नक्की आहे कि आजही आंबे खाताना त्याला आजोबांनी उतरवलेल्या आंब्याची सर येत नाही ……

मुक्तकजीवनमानराहणी

प्रतिक्रिया

लेखन आवडले. आणखी सविस्तर असते तरी आवडले असते.

चांगले लिहिलेय. पुलेशु.

मुक्त विहारि's picture

1 May 2016 - 7:34 am | मुक्त विहारि

"त्यांना रोज पाढे म्हणून दाखवावे लागत आणि शुद्धलेखनसुद्धा यात कोणतीही तडजोड नसे."

रोज लिहातचा कंटाळा यायचा मग मी एकाच दिवशी ३-४ दिवसांचे लेखन करून टाकत असे.

असो,

गेले ते दिन गेले.

नाखु's picture

2 May 2016 - 2:20 pm | नाखु

रोज लिहातचा कंटाळा यायचा मग मी एकाच दिवशी ३-४ दिवसांचे लेखन करून टाकत असे.

अन तो वेळ कट्ट्याला स्त्कारणी लावत असे.

अता पहिली गोष्टः मुक्तक छान आहे..

उल्का's picture

1 May 2016 - 2:24 pm | उल्का

आजोळच्या आठवणी म्हणजे मनातील हळुवार व अत्यंत लाडका कप्पा.

काय सुरेख वर्णन. एकदम असं वाटत होतं की आम्चंच लहानपण कुणीतरी समोर आणून ठेवलंय!

धन्यवाद!

मराठी कथालेखक's picture

2 May 2016 - 2:42 pm | मराठी कथालेखक

आजीची धार काढणे

??
आजोबांनी शुद्धलेखनासोबत व्याकरणाचे धडेही द्यायाला हवे होते

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 May 2016 - 3:05 pm | राजेंद्र मेहेंदळे

तुम्ही तेव्ह्ढे सोडुन वाचा.

बाकी लेख मस्त. जरासा मुपीछाप वाटला.

मराठी कथालेखक's picture

2 May 2016 - 3:08 pm | मराठी कथालेखक

नावीन्यपूर्ण असे काही वाटले नाही. असो.

सस्नेह's picture

2 May 2016 - 3:57 pm | सस्नेह

भाग्यवान आहात.
इतकं सुरेख आजोळ आणि रम्य बालपण मिळालं तुम्हाला !

सविता००१'s picture

2 May 2016 - 4:44 pm | सविता००१

मस्तच लिखाण.

श्वेताली कुलकर्णी's picture

2 May 2016 - 11:26 pm | श्वेताली कुलकर्णी

धन्यवाद !!! मिपावर लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता …

एक एकटा एकटाच's picture

3 May 2016 - 6:28 am | एक एकटा एकटाच

चांगल लिहिलय

सुधीर कांदळकर's picture

4 May 2016 - 7:10 am | सुधीर कांदळकर

माझ्याही आजोळी लाडाकोडासोबत वैतागवाडी परवचा होत्या. २ ते २९ पाढे आणि पावकी निमकी देखील. पण त्यामुळेच उच्चार स्पष्ट झाले आणि बोलण्याच्या स्वरातले चढउतार परिणामकारक झाले.

सारे सारे जागवलेत, धन्यवाद.

छान लिहिलं आहे.लिहित रहा अशाच.

श्वेताली कुलकर्णी's picture

7 May 2016 - 4:46 am | श्वेताली कुलकर्णी

आपल्या सगळ्याच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!