✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आजोळ

श
श्वेताली कुलकर्णी यांनी
Sun, 05/01/2016 - 01:36  ·  लेख
लेख
साधारणपणे आमची परीक्षा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात संपली कि आजोबा आम्हाला घेऊन जाण्यासाठी आलेलेच असणार , उन्हाळ्याची सुट्टी म्हणले कि आमचे ठरलेले ठिकाण येळावी माझे आजोळ . कवठे महांकाळ ते येळावी दीड दोन तासाचा प्रवास , तासगाव मधून गाडी बदलावी लागत असे मी एकीकडे आजोबा मध्ये आणि दीदी दुसरीकडे असा आमचा प्रवास . गाव तसे लहान होते पण आजोबांना मानणारे लोक खूप , त्यामुळे जोशीबुवांची नातवंडे म्हणून आमचीही मजा असे . तिथे उतरले कि स्टेंड वरच ओळखीचे एक दुकान होते तिथून आम्हला खूप गोळ्या बिस्किटे मिळत , तोपर्यंत आजोबा त्यांची सायकल घेऊन यायचे आणि आमचा प्रवास आमच्या मळ्याकडे , गावापासून २-३ किलोमीटर आतमध्ये आमचा मळा , जाताना दोन्ही बाजूने झाडे त्यामुळे उन्हाळा आहे असे वाटतच नसे . घर जवळ आले कि सायकलची घंटी वाजवून आजीला सांगणार कि आम्ही आलो , पण ती त्याआधीच दृष्ट काढायचे समान हातात घेऊन उभी असे . "किती वाळल्या ग माझ्या पोरी ?" संधी (माझी आई संध्या ) नेहमी पोरांच्या मागे असते नुसती , असे म्हणून गालावर मायेने हात फिरवायची . गेल्या गेल्या चुलीत भाजलेल्या कैरीचे मस्त पन्हे प्यायला मिळायचे , आम्ही येणार म्हणून आजीची तयारी खूप जोरदार असायची , त्यात खास कैरीची चटणी , बाटाचे आणि साधे लोणचे , मुरंबा ,साखरांबा सगळी नुसती धमाल … आम्ही येणार म्हणून आधीच प्रत्येकासाठी झोपाळे बांधून तयार असायचे , गोष्टीची पुस्तके आणि सोबत अभ्यासही असे , याबाबतीत आजोबा खूप कडक होते त्यांना रोज पाढे म्हणून दाखवावे लागत आणि शुद्धलेखनसुद्धा यात कोणतीही तडजोड नसे . आमचे दुपारचे जेवण शक्यतो आमराईत असे वरती लटकलेल्या कैऱ्या , आजूबाजूला जांभूळ ,आवळा, सोनचाफा , मोगरा , अशी कितीतरी झाडे यात आमचे जेवण … आमची दुपारची छोटी डुलकीही तिथेच होई, तिन्हीसांजेला आजोबा आमच्याकडून शुभं करोति , अथर्वशीर्ष , रामरक्षा ,मारुती स्तोत्र म्हणून घेत . रात्रीची जेवणेसुद्धा अंगणात होत … चांदण्यात आजी जवळ कुशीत झोपताना तिने शिवलेल्या गोधडीची ऊब जास्त कि तिच्या कुशीची ? या विचारात आणि गोष्टी ऐकत निद्रादेवी भूल घालत असे . सकाळी उठले कि चुलीसमोर जाऊन बसायचे , आजीची धार काढणे यात हळूच कधीतरी जाऊन तिला मदत करायची , शेणाने सारवायचे असे उद्योगधंदे , हे दुध तापवल्यावर खाली राहिलेली साय आजी साखर घालून खरवडून द्यायची काय लाजवाब चव तिची … दुपारचे आजीचे काम झाले कि ती मातीची खेळणी करून द्यायची माझा आणि दिदीचा भातुकलीचा डाव रंगायचा … कधी कधी आजोबांसोबत सगळ्या शेतात भटकायचे . हळू हळू कैरीला पाड येऊ लागतो मग आमच्या सगळ्याचे लक्ष तिकडे आजोबा स्वतः झाडावर चढून कैऱ्या उतरवायचे. आम्ही त्यांना मदत करत असू . घरात एक छोटी खोली होती तिथे पोती घालून त्यावर या कैऱ्या पिकायला ठेवायच्या . सगळ्या घरात नुसता आंब्याचा वास दरवळत असे . आम्ही तर त्या खोलीच्या शेजारीच झोपत असू , रोज उठले कि आज किती आंबे पिकले याची मोजदाद . आमरस साठी वेगळे , कापून खायचे वेगळे , चोखून खायला वेगळे असे त्यांचे वर्गीकरण …… असे करता करता मे महिना संपत आलेला असे आणि आई बाबा आम्हाला घेऊन जाण्यासाठी येत , दिवस किती लवकर सरले याचे इतके वाईट वाटायचे पण …… आजी न चुकता सगळ्या बरण्या आईला द्यायची , आमची परत एकदा पाणावलेल्या डोळ्यांनी दृष्ट काढून मग आम्हाला निरोप . मला या आंब्याच्या जातीमधले काही कळत नाही , हापूस , पायरी ,शेपू आणि कुठलाहि असो पण एक नक्की आहे कि आजही आंबे खाताना त्याला आजोबांनी उतरवलेल्या आंब्याची सर येत नाही ……
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
जीवनमान
राहणी

प्रतिक्रिया द्या
4783 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

लेखन आवडले. आणखी सविस्तर असते

रेवती
Sun, 05/01/2016 - 02:02 नवीन
लेखन आवडले. आणखी सविस्तर असते तरी आवडले असते.
  • Log in or register to post comments

चांगले लिहिलेय. पुलेशु.

एस
Sun, 05/01/2016 - 05:43 नवीन
चांगले लिहिलेय. पुलेशु.
  • Log in or register to post comments

आमचे पण आजोबा असेच होते....

मुक्त विहारि
Sun, 05/01/2016 - 07:34 नवीन
"त्यांना रोज पाढे म्हणून दाखवावे लागत आणि शुद्धलेखनसुद्धा यात कोणतीही तडजोड नसे." रोज लिहातचा कंटाळा यायचा मग मी एकाच दिवशी ३-४ दिवसांचे लेखन करून टाकत असे. असो, गेले ते दिन गेले.
  • Log in or register to post comments

किंचीत दुरुस्ती

नाखु
Mon, 05/02/2016 - 14:20 नवीन
रोज लिहातचा कंटाळा यायचा मग मी एकाच दिवशी ३-४ दिवसांचे लेखन करून टाकत असे.
अन तो वेळ कट्ट्याला स्त्कारणी लावत असे. अता पहिली गोष्टः मुक्तक छान आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मस्त!

उल्का
Sun, 05/01/2016 - 14:24 नवीन
आजोळच्या आठवणी म्हणजे मनातील हळुवार व अत्यंत लाडका कप्पा.
  • Log in or register to post comments

काय सुरेख वर्णन. एकदम असं

असंका
Mon, 05/02/2016 - 12:39 नवीन
काय सुरेख वर्णन. एकदम असं वाटत होतं की आम्चंच लहानपण कुणीतरी समोर आणून ठेवलंय! धन्यवाद!
  • Log in or register to post comments

आजीची धार काढणे

मराठी कथालेखक
Mon, 05/02/2016 - 14:42 नवीन
आजीची धार काढणे
?? आजोबांनी शुद्धलेखनासोबत व्याकरणाचे धडेही द्यायाला हवे होते
  • Log in or register to post comments

जौ द्या हो!!

राजेंद्र मेहेंदळे
Mon, 05/02/2016 - 15:05 नवीन
तुम्ही तेव्ह्ढे सोडुन वाचा. बाकी लेख मस्त. जरासा मुपीछाप वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

नावीन्यपूर्ण असे काही वाटले

मराठी कथालेखक
Mon, 05/02/2016 - 15:08 नवीन
नावीन्यपूर्ण असे काही वाटले नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

भाग्यवान आहात.

सस्नेह
Mon, 05/02/2016 - 15:57 नवीन
भाग्यवान आहात. इतकं सुरेख आजोळ आणि रम्य बालपण मिळालं तुम्हाला !
  • Log in or register to post comments

छान

सविता००१
Mon, 05/02/2016 - 16:44 नवीन
मस्तच लिखाण.
  • Log in or register to post comments

धन्यवाद !!! मिपावर लिहिण्याचा

श्वेताली कुलकर्णी
Mon, 05/02/2016 - 23:26 नवीन
धन्यवाद !!! मिपावर लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता …
  • Log in or register to post comments

चांगल लिहिलय

एक एकटा एकटाच
Tue, 05/03/2016 - 06:28 नवीन
चांगल लिहिलय
  • Log in or register to post comments

छान ........

सुधीर कांदळकर
Wed, 05/04/2016 - 07:10 नवीन
माझ्याही आजोळी लाडाकोडासोबत वैतागवाडी परवचा होत्या. २ ते २९ पाढे आणि पावकी निमकी देखील. पण त्यामुळेच उच्चार स्पष्ट झाले आणि बोलण्याच्या स्वरातले चढउतार परिणामकारक झाले. सारे सारे जागवलेत, धन्यवाद.
  • Log in or register to post comments

छान लिहिलं आहे.लिहित रहा अशाच

अजया
Wed, 05/04/2016 - 11:15 नवीन
छान लिहिलं आहे.लिहित रहा अशाच.
  • Log in or register to post comments

आभारी आहे !!

श्वेताली कुलकर्णी
Sat, 05/07/2016 - 04:46 नवीन
आपल्या सगळ्याच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा