स्टालिनग्राड भाग-१

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
14 Apr 2016 - 7:56 pm

कबूल केल्याप्रमाणे मॉस्कोवर लिहिलेल्या लेखानंतर स्टालिनग्राडच्या युद्धावर हा लेख टाकत आहे. मातृभूमीसाठी रशियन सैनिकांनी काय काय पणाला लावले होते हे वाचल्यावर आपली बोटे तोंडात जातात. ( रशियात त्याच्या देशाला ते मातृभूमीच म्हणतात म्हणून असे लिहिले आहे) ज्यांना युद्धातील छायाचित्रे पहावत नाही त्यांनी हा लेख वाचू नये किंवा वाचलाच तर स्वतःच्या जबाबदारीवर वाचावा. ज्यांना युद्धाच्या कथा मराठीत वाचण्यास आवडतात त्यांना हाही लेख आवडेल अशी आशा आहे....तर ...

स्टॅलिनग्राड :
मानवाच्या इतिहासात जी काही युद्धे लढली गेली त्यात सगळ्यात जास्त जीवावर उदार होऊन लढले गेलेले कुठले युद्ध असेल तर ते स्टॅलिनग्राडचे. या लढाईत जर्मनीची सहावी आर्मी एका भीषण युद्धात ओढली गेली. ब्लिट्झक्रीगची सवय असलेल्या जर्मन सैन्याला हे युद्ध फारच कठीण गेले. ही लढाई रस्त्यात, घराघरातून, इमारतींमधून, प्रत्येक आडोशामागे लढली गेली. पहिल्या महायुद्धात ज्याप्रमाणे शत्रूला गलितगात्र करून ठेचायचा प्रयत्न झाला त्याच प्रमाणे येथेही शत्रूला मिळेल तेथे ठेचून त्याची ताकद कमी करून त्याला पराभूत करायचे प्रयत्न होत होते. याचाच दुसरा अर्थ हा होता की ही लढाई लवकर संपणारी नव्हती आणि शेवटचा सैनिक उरेपर्यंत ती लढली जाणार होती. स्टॅलिनग्राड शहर पंचवीस मैल लांब पसरलेले आहे (त्या वेळी) व एका बाजूला पश्‍चिमेला व्होल्गा नदीला भिडलेले आहे. (याला चुकीने उजवा किनारा असे संबोधले जाते कारण ही नदी दक्षिणेला वाहते). आज जर आपण व्होल्गोग्राडला (म्हणजे पूर्वीचे स्टॅलिनग्राड) भेट दिली तर जर्मन सैन्याला या युद्धभूमीवर कुठल्या अडचणींना तोंड द्यावे लागले असेल याची आपल्याला लगेचच कल्पना येऊ शकते. या शहरात उत्तरेला तीन अवाढव्य औद्योगिक वसाहती आपल्याला दिसतील. सगळ्यात उत्तरेला आहे झिरन्स्की ट्रॅक्टर फॅक्टरी, त्याच्या खाली क्राज्नी ऑक्टोबर फॅक्टरी व बरिकाड आर्मस् फॅक्टरी. शहराच्या मध्यभागी एक ३०० फूट उंचीचे एक टेकाड आहे ज्याचे नाव आहे मामायेव्ह कुरगान (हे टेकाड तार्तार ड्यूक मामायेव्हची दफनभूमी आहे). दक्षिणेकडून शहरात येणार्‍या सर्व रस्त्यावरून उंच कॉक्रीटचे धान्य साठवणारी एक इमारत नजरेत भरते. ही इमारत स्टॅलिनग्राडच्या लढाईत नेहमीच रशियन फौजांच्या ताब्यात होती. ही इमारत अनेक गल्ल्या व खंदकांनी व्होल्गा नदीला जोडलेली असल्यामुळे व्होल्गा नदीतून होणार्‍या रसद पुरवठ्याने तग धरून होती. या असल्या सगळ्या इमारती काबीज करून जर्मन फौजांना स्टॅलिनग्राड जिंकायचे होते. हे काम किती अवघड असेल याची कल्पना आपल्याला आली असेल.

स्टालिनग्राड...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जर्मन सैन्याची मॉस्कोच्या दिशेने होणारी आगेकूच रशियन हिवाळ्याने अक्षरश: गोठविली. अशी गोठवली की चुलीवरचे सूप वाडग्यामधे ओतल्याबरोबर काही सेकंदातच गोठू लागले. असे म्हणतात गेल्या १४० वर्षात अशी थंडी पडली नव्हती. लोण्याचे करवतीने तुकडे करावे लागत होते ( त्या थंडीत असे झाले असेल याची मला खात्री आहे कारण मी असा अनुभव चक्क सिंहगडावर घेतलेला आहे. मी कॉलेजमधे असताना आम्ही काही मित्र रात्री सिंहगडावर गेलो होतो तेव्हा आम्ही बरोबर नेलेले लोणी असे गोठले होते की आम्हाला ते खाता आले नव्हते. शेकोटीवर धरल्यास त्याचा फक्त वरचा थर वितळत असे पण आत ते दगडासारखे घट्ट झाले होते. साल होते १९७१/७२). मांस तोडताना करवती व सुरे तुटत होते. हजारो रणगाडे, ट्रक्स जर्मन सैनिकांनी तशाच सोडून दिल्या ज्या एका रात्रीत बर्फाच्या ढिगार्‍याखाली नाहीशा झाल्या. काही जर्मन सैनिकांना अक्षरश: वेड लागले व त्यातच त्यांचा मृत्यु झाला. वर्षाअखेर हिमदंशाच्या एक लाख तक्रारी दाखल झाल्या आणि दुर्दैवाने त्यातील १४,००० सैनिकांचे अवयव कापून टाकावे लागले.

गोठविणारी थंडी...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

निसर्गाने जर्मन सैन्याचा असा छळ मांडलेला असताना मॉस्कोवर जाणार्‍या जर्मन सैन्यावर रशियन सैन्याचे प्रतिआक्रमण झाले. त्यांच्या नशिबाने रशियन आक्रमण तुलनेने विस्कळीत होते. रशियन सैन्याचे सूत्रसंचालन प्रत्यक्ष क्रेमलिनमधून होत होते. अर्थात याचा फायदा होण्याऐवजी तोटाच झाला कारण तेथे रशियन सुत्रधारांच्या कार्यपद्धतीत स्टॅलिन व त्याच्या राजकीय पिल्लावळींचा सतत हस्तक्षेप होत होता. त्यांच्या सेनेने जर्मन सैन्यावर समोरुन हल्ले चढविले आणि गंमत म्हणजे ते जर्मनसेनेच्या ताकदवान आघाडीवर सतत हल्ले करत होते. ते हे विसरले किंवा त्यांच्या हे लक्षात आले नाही की साखळीची सगळ्यात जास्त ताकद ही त्या साखळीतील सगळ्यात कमकुवत कडीएवढीच असते. पण त्यांनी हे तत्व वापरले नाही हे खरे (गोल्डरॅटचे तत्व). रशियन सेनेच्या पहिल्या झंजावातात जर्मन सैन्य हादरले खरे पण हिटलरच्या ‘माघार नाही’ या आदेशाला जागून त्यांनी लगेचच रशियन सेनेला रोखण्याची पराकाष्ठा चालविली. पण हिटलरने ज्या जनरल्सने त्याच्या या आदेशाला विरोध दर्शवला, त्या सगळ्यांना घरी बसवले व सर्व सूत्रे स्वत:च्या हातात घेतली. जर्मनीचे सगळ्यात मोठे दुर्दैव हे होते. रशियन सेनेने जेमतेम चाळीस मैल रुंदीचा पट्टा आपल्या ताब्यात घेतला. रशियन सेनेने कॅलिलिन, क्‍लिन, कालुगो व मोझाइस्क वर हल्ले चढविले व यश मिळवले. पण रशियन सैन्याचे मुळ उद्दिष्ट होते, ऑरेल, रेव्ग व व्याझमा. त्या युद्धभूमीवर मात्र जर्मन सेनेने त्यांना सगळ्याच आघाड्यांवर थोपवले.

या लढाया होत असताना जर्मन सैन्याचे सर्वात मोठे नुकसान होत होते. ते या युद्धआघाड्यांवर नाही तर त्यामागे खुद्द हिटलरचा हात होता. त्याने वर लिहिल्याप्रमाणे त्याच्या धोरणांना विरोध करणार्‍या सर्व अनुभवी सेनाधिकार्‍यांना घरी बसवले. १९४२ च्या फेब्रुवारीमधे हिटलरची “माघार नाही” हे धोरण बरोबर ठरते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. रशियन सेनेचे आक्रमण विस्कळीत झाले व हिटलरने एक शेवटचा तडाखा देण्याची योजना आखली. त्याला खात्री होती की ही लढाई शेवटची असेल व रशियन सैन्य यात नामशेष होणार. लवकरच बर्फ नाहीसे झाले व जमिनीचा पृष्ठभाग टणक झाला. या योजनेमधे स्टॅलिनग्राड काबीज करण्यात येणार होते किंवा भयंकर बाँबवर्षावात नष्ट करण्यात येणार होते. यामुळे एकतर स्टलिनग्राड व आसपासच्या भागातील उद्योग हलविणे शत्रूला भाग पडले असते आणि दुसरे म्हणजे रशियाच्या उत्तर व दक्षिण विभागाच्या दळणवळणाचे कंबरडे मोडले असते. हिटलरच्या योजनेनुसार एकदा का स्टॅलिनग्राड हातात आले की तसेच वर जाऊन मॉस्कोला वेढा घालणे शक्य होते. हे आक्रमण चालू असतानाच दुसरी आर्मी कॅस्पियन समुद्राच्या बाकूच्या तेलविहिरी ताब्यात घेऊन कॉकेशसवर ताबा मिळवून पर्शिया व तुर्कस्तानला कमीतकमी निर्माण झालेली परिस्थिती मान्य करायला लावायची किंवा ते तटस्थ राहतील याची सोय करायची अशी हिटलर महाशयांची योजना होती.

जर्मन सैन्याचे यासाठी दोन विभाग करण्यात आले. आर्मी ग्रुप ए व आर्मी ग्रुप बी. या दोन्हीचे नेतृत्व एका अनुभवी सेनानीला देण्यात आले. त्याचे नाव होते फिल्ड मार्शल फिडॉर फॉन बॉक. आर्मी “ए” दिली गेली फिल्ड मार्शल लिस्टच्या हाताखाली तर “बी” फिल्ड मार्शल वाईस याच्या. या आर्मीकडे रशियाचा अंतीम पाडाव करण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती. या आर्मीमधेच जर्मनांची सगळ्यात ताकदवान अशी फौज होती - सहावी आर्मी. याचा प्रमुख होता फिल्ड मार्शल फ्रेडरिक पौलस. पौलसचे सैन्य शत्रूच्या छातीत धडकी भरवणारेच होते. यात कडवे पॅन्झरच्या व पायदळाच्या काही डिव्हिजन्स व चौथी पँझर आर्मी व दुसरी आर्मी एवढे सैन्य होते. याच्या तुलनेत आर्मी बी चे स्वरुप थोडेसे राखीव सैन्यासारखे होते. यात पहिली पँझर डिव्हिजन व सतरावी इंन्फट्री होत्या. उरलेल्या फौजेत रुमानिया, इटली व हंगेरी या देशांची सेनादले होती. पहिल्या पँझर डिव्हिजनचा प्रमुख होता अत्यंत तर्‍हेवाईक असलेला फिल्ड मार्शल क्‍लिस्ट. अर्थात हा हिटलचा अत्यंत लाडका सेनापती होता. का हे त्यालाच माहीत. एका मुलाखतीत हाइटलर या माणसाबद्दल म्हणाला होता की हा माणूस व त्याची पहिली पँझर डिव्हिजन म्हणजे माझ्या म्यानातील झळाळती तलवार आहे व लवकरच ते रशियाच्या तेल विहिरींवर कबजा करुन रशियाचे हालचालींचे प्रयत्न हाणून पाडतील व सगळे तेल जर्मन फौजांकडे वळवतील. तेलाची जर्मन फौजांना कधीच कमी पडणार नाही.

जर्मन सैनिकांच्या संख्येत वाढ झाली होती पण ती हंगेरी व रुमानी फौजांची. तुलनेने हे सैन्य जर्मनसैन्यापेक्षा खालच्या दर्जाचे होते. शिवाय जर्मन सैन्याला व सैनिकांना आता कळून चुकले होते की रशियन सैनिक त्यांच्या तोडीसतोड होते. त्यांची आयुधे जर्मन आयुधांएवढीच चांगली होती. काही तोफा व रणगाडे जर्मन सैनिकांनी पाहिलेही नव्हती. उदा. जर्मन सेनेकडे रशियाच्या टी-३४ रणगाड्याला उत्तर नव्हते तर कात्युषासारखे मल्टिपल रॉकेट लाँचर जर्मनांनी पाहिलेही नव्हते. त्यांना हेही कळून चुकले होते की जर्मन सैन्य आता अजिंक्य राहिले नव्हते व या युद्धात काहीही होऊ शकते.

सर्वसामान्य जर्मन सैनिक ज्याची बदली रशियाच्या आघाडीवर झाली होती, त्याची छाती तो अवाढव्य पसरलेला प्रदेश पाहून दडपून गेली. त्यातच भर पडली जर्मन सैनिकांच्या अत्याचारांची. स्त्रीया, वृद्धांसकट लहान मुलांच्या रोज होणार्‍या सामुहीक कत्तली, याचे काळे सावट त्यांच्या मनावर पडले. हे युद्ध संपले तेव्हा रशियाचे १,९८१,००० सैनिक युद्धकैदी जर्मन छावण्यात मेले व अजून १,३०८,००० नंतर त्यांची जी अमानुष वाहतूक करण्यात आली त्यात ठार झाले. ( पानिपतवर दोन्ही बाजूचे मिळून जास्तीत जास्त दोन एक लाख मृत्यू झाले. यावरुन आपल्याला या युद्धाची व्याप्ती कळेल.) हे सगळे अत्याचार हा सामान्य सैनिक पहात होता. जर्मन सैन्य युद्ध हरले तर रशियन सैनिक त्यांचे काय करेल या कल्पनेनेच त्यांच्या छातीत धडकी भरत होती.

रशियन सैन्याला चिलखती दलांच्या युद्धाला लागणार्‍या युद्धसाहित्याची चणचण भासत होती. रणगाडे तयार करणारे ऑरेल व खार्कॉव्ह येथे असणारे त्यांचे अवाढव्य कारखाने जर्मनीच्या पँझर डिव्हिजन्सने काबीज केले होते. तीच गोष्ट डोनेट यथे असणार्‍या रणगाड्यांना लागणार्‍या सुट्ट्या भांगांच्या कारखान्यांची होती. लेनिनग्राडच्या वेढ्यापुढे रणगाड्यांचे कारखाने हतबल झाले होते व हे युद्धसाहित्य निर्माण करायला लागणार्‍या धातूंचा पुरवठा निम्म्यावर आला होता. एवढेच नव्हे तर या कारखान्यात काम करणार्‍या माणसांच्या अन्नात चाळीस टक्के कपात झाली होती.

जरी अमेरिका व ग्रेट ब्रिटन कडून रणगाडे मिळायला सुरुवात झाली असली तरी रशियन सैन्याला हे रणगाडे जर्मन पँझरच्या तुलनेत फारच जुनाट वाटत होते. त्यांनी ते प्रत्यक्ष रणगाड्यांच्या युद्धात उतरवले नाहीत. त्यांनी या रणगाड्यांना पायदळाच्या रक्षण करण्यासाठी तैनात केले. याच काळात स्टॅलिनला जपानच्या सीमेवरुन जर्मन सैन्यासमोर आणता आल्या. शिवाय जवळजवळ पाच लाख राखीव दलातील सैनिकही त्याच्या दिमतीस होते. हे सैनिकांचेही फार चांगले प्रशिक्षण झालेले नसले तरीही युद्धात भाग घेण्याइतके निश्‍चितच झाले होते. त्यात बरेच अनुभवी सैनिकही होते. या सैन्याने मिळवलेल्या प्राथमिक यशाने हुरळून जाऊन स्टॅलिनने हल्ल्याच्या योजना आखल्या. त्यातील पहिली त्याने ९ एप्रिलला आमलात आणली. यात कर्चच्या चिंचोळ्या प्रदेशावर आक्रमण केले. या आक्रमणाच्या योजनेचे नाव ठेवण्यात आले होते “ऑपरेशन स्टॅलिन” दुर्दैवाने हे आक्रमण तीन दिवसांच्या आतच रोखण्यात फिल्ड मार्शल मानस्टिनच्या सदर्न आर्मीला यश आले. या सैन्याला नुकतीच विमानांची व रणगाड्यांची कुमक मिळाली होती. त्यांनी रशियन सैन्याला नुसते रोखलेच नही तर त्यांचे १००,००० सैनिक युद्धबंदी केले.

स्टॅलिन व त्याच्या सेनानींना लवकरच युद्धाचे धडे मिळणार होते. सायबेरियन रायफल्सच्या काही डिव्हिजन्स लेनिनग्राडच्या मदतीस जात असतानाच त्यांच्यावर जर्मन सैन्याने हल्ला चढवला. पाच दिवसात माघार घेण्यास परवानगी नसल्यामुळे या रशियन सैन्याचे अतोनात नुकसान झाले. रशियन फौजांचा तिसरा हल्लाही जर्मन फौजांनी परतवून लावला. मार्शल टिमोशेंकोने खारकॉव्हवर त्याला मिळू शकणार्‍या ६०० रणगाड्यांबरोबर हल्ला चढविला. या आक्रमणास सुरवातीला नेत्रदीपक यश मिळाले कारण त्यांच्या समोर होती रुमानियाची सहावी आर्मी. क्रास्नोग्राडचा शज पाडाव झाला व असे वाटत होते की आता खारकॉव्ह त्यांच्या ताब्यात येणार. पण या रशियन सैन्याने जर्मन सेनेच्या पोलादी सापळ्यात प्रवेश केला होता. उत्तरेकडून पौलसची सहावी आर्मी आणि दक्षिणेकडून फिल्ड मार्शल क्‍लिस्टच्या सेनेनी हा फास आवळत आणला. मार्शल टिमशेंकोसारख्या अनुभवी सैनिकाला यातील धोका लागलीच ओळखू आला पण स्टॅलिनने त्यांचे आक्रमण तसेच सुरु ठेवण्याचा आदेश दिल्यावर त्याचेही काही चालले नाही. मे महिन्याच्या २३ तारखेला रशियन सैन्याच्या मागे या फासाची गाठ बसली. झालेल्या लढाईत रशियाचे सगळे रणगाडे नष्ट झाले व जवळजवळ अडीच लाख सैनिक मारले गेले किंवा युद्धातून बाहेर फेकले गेले.

ही लढाई झाल्यावर जर्मन सैन्याच्या आक्रमणासाठी या युद्धनाट्याचा पुढचा भाग चालू झाला ज्यात जर्मन सेना आक्रमण करणार होती. काहीच तासात तो भूप्रदेश रणगाड्यांच्या हालचालींनी उठणार्‍या धुळीच्या लोटांनी भरुन गेला. हा प्रदेश ना खडकाळ होता, ना त्यात दलदली होत्या, ना जंगले होती ना डोंगर होते. त्या सपाट भूभागावरुन जर्मन रणगाडे सुसाटत पुढे जात होते. शेकडो मैलोनमैल होता फक्त खुरटे गवत उगवलेला सपाट प्रदेश. एखाद्या वावटळीसारखे जर्मन पँझर भागातून जात असताना त्यामुळे उठणारे धुळीचे लोट ६० मैलांवरुनही दिसत होते असे म्हणतात. या रणगाड्यांनी उध्वस्त केलेल्या इमारती जळत होत्या व त्यातून उठणार्‍या काळ्याकुट्ट धुरामुळे सारे आकाश काळवंडून गेले. रस्त्यात लागणार्‍या गावांना जगबुडीचा अनुभव मिळत होता.

जर्मन फौजांची ही हालचाल हे एक मोठे आक्रमण होते हे सहज समजण्यासारखे होते पण रशियन सेनाधिकार्‍यांना मॉस्कोची काळजी वाटत होती आणि जी काही राखीव फौज होती ती त्यांनी मॉस्कोच्या रक्षणासाठी ठेवली. मार्शल टिमोशेंकोला रोस्टॉव्ह व व्होरोनेझ लढविण्याचा सक्त आदेश मिळाला होता. पण वेगवान पँझरपुढे तो काही करु शकला नाही.डोनेटच्या खोर्‍यात व डॉननदीच्या वळणावर जर्मन सेना एखाद्या पुराच्या पाण्यासारखी पसरली. व्होरोनेझनंतर ही सेना येलेट व टुलाला वेढा घालेल या भितीने रशियन सैन्याने व्होरोनेझपाशी एक आघाडी उघडली. यावेळी मात्र मॉस्कोच्या रक्षणासाठी ठेवलेल्या राखीव सेनेपैकी काही सेना या आघाडीवर पाठविण्यात आली. या सेन्याच्या प्रमुखपदी नेमण्यात आले मार्शल व्हाटुटिनकडे. हा आधेमधे कोणाचे आदेश न घेता प्रत्यक्ष मुख्यालयाचे आदेश घेत होता.

लवकरच व्हेरोनेझच्या औद्योगिक शहरामधे व आसपासच्या प्रदेशात लढाईला तोंड फुटले. डोनेटच्या दक्षिणेस हीच परिस्थिती उद्भवली. फिल्ड मार्शल बॉकला रशियन भूभागावर कब्जा करण्यापेक्षा रशियन सैन्याचा नाश करणे जास्त महत्वाचे वाटत असल्यामुळे त्याने रशियन सैन्याला पेचात पकडून त्यांचा विनाश चालवला. त्याला त्याच्या बाजूस कुठल्याही रशियन सेनेचा धोका नको होता. अर्थात योजनेत हेच ठरले असल्यामुळे त्याला थांबण्याचे काही कारण नव्हते पण हिटलर साहेबांच्या मनात काही वेगळेच होते. आज ना उद्या या अक्रमणात अंतीम विजय त्यांचाच होणार आहे या भ्रमात राहून हिटलरने फिल्ड मार्शल बॉकला डच्चू दिला व मूळ योजना बदलली. त्याने बॉकच्या हाताखाली असलेल्या दोन आर्मी स्वतंत्र केल्या. आर्मी ग्रुप ए चे अधिपत्य देण्यात आले जनरल लिस्टला. त्याला कॉकेशसच्या तेलविहिरी ताब्यात घेण्याचा आदेश देण्यात आला. आर्मी ग्रुप बी देण्यात आला फिल्डमार्शल वाईसच्या हाताखाली. या ग्रुपला सरळ स्टालिनग्राडवर हल्ला चढविण्याचा आदेश देण्यात आला. यांनी स्टालिनग्राड ताब्यात घेऊन, तेथील रशियन फौजांचा नाश करुन डॉन व व्होल्गामधील चिंचोळा प्रदेश ताब्यात घ्यायचा होता. विचार केला तर फिल्डमार्शल बॉकची योजना जास्त व्यवहारी होती. त्याने ठरविले होते की हॉथच्या सेनेला स्टालिनग्राडचा करण्यास विध्वंस पाठवायचे व त्याच वेळी पौलसच्या सैन्याने व्होरोनेझ काबीज करायचे व नंतर हॉथच्या सैन्याकडून स्टालिनग्राडचा ताबा घ्यायचा व हॉथच्या रणगाड्यांनी राखीव सैन्य म्हणून माघार घ्यायची. पण दुर्दैवाने जर्मन मुख्यालयाकडून आलेल्या आदेशाने पौलसच्या सहाव्या आर्मीला स्टालिनग्राडवर पाठविण्यात आले आणि तेही रणगाड्यांच्या संरक्षणाशिवाय.

जनरल पोलस....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

प्रामाणिकपणे सांगायचे तर क्‍लिस्टच्या पँझर्सना डॉन पार करण्यासाठी कुठल्याही मदतीची आवश्यकता नव्हती. त्यांना प्रतिकार करणार्‍या रशियन सैन्याची संख्या लक्षणीय वेगाने कमी होत चालली होती. लवकरच त्यांनी नदीपलीकडे असलेले प्रोलेटरस्काया घेतले व तशीच पुढे मुसंडी मारुन साल्स्क, स्टाव्रपॉल, आर्माविर व माईको काबीज केले. ही घटना होती ९ ऑगस्टची. त्या जागेवरुन त्यांना तेलाच्या विहिरी अस्पष्ट का होईना दिसत होत्या. इकडे पौलसच्या सहाव्या आर्मीने स्टालिनग्राडवर कूच केले. पण हे अंतर होते २०० मैल त्यामुळे हे आक्रमण गुप्त राहणे शक्यच नव्हते त्यामुळे अचानक हल्ला इ.इ. असले काही होणार नव्हते. स्टालिनग्राडला जमेल तसे जमेल तितके सैन्य जमविण्याचा रशियन सेनाधिकार्‍यांनी सपाटाच लावला. सगळ्यात महत्वाचा निर्णय झाला तो म्हणजे मॉस्कोसाठी राखीव ठेवलेले सैन्य स्टालिनग्राडच्या संरक्षणासाठी वापरण्याचा.

एका रशियन सेनाधिकार्‍याला स्टालिनग्राडला त्याच्या सैन्यासह त्वरित जाण्याचे आदेश मिळाले. याचे नाव होते जनरल व्हॅसिली चुईकॉव्ह. याने त्याच्या अधिपत्याखाली असलेल्या चार इन्फंट्री डिव्हिजन, दोन चिलखती दलाच्या ब्रिगेड व दोन जलद हालचाली करणार्‍या राखीव सैन्यातील ब्रिगेड (मोटोराईझ्ड ब्रिगेड), एवढे सैन्य स्टालिनग्राडला हलविण्याचे ठरवले. हे एक मोठे आव्हानच होते. कारण कुठल्याही क्षणी हे सैन्य जर्मन सेनेच्या विळख्यात सापडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. शिवाय स्टालिनग्राडला या सैन्याची नितांत आवश्यकता होती.

वॅसिली चुईकॉव्ह
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

इकडे जनरल पौलसच्या सैन्याने जनरल चुईकॉव्हचे सैन्य स्टालिनग्राडला पोहोचण्यापूर्वी हल्ला चढविण्यासाठी आटोकाट प्रयत्न चालवले. एक लक्षात घेतले पाहिजे यावेळी पौलसच्या सैन्याला रणगाड्यांची पुरेशी सोबत नव्हती. जसे जसे जर्मन सैन्याने हल्ले चढविले तसे तसे त्यांना येणार्‍या रशियन रसदीमुळे प्रखर प्रतिकार होऊ लागला. आक्रमणास धार यावी म्हणून जनरल पौलसने जनरल हॉथच्या चवथ्या पँझर आर्मीची मदत मागितली. हे रणग़ाडे उत्तरेला वळोन स्टालिनग्राडमधे दक्षिणेकडून घुसणार होते. त्यांना कसलाही अडथळा नव्हता. पण त्यांच्या दुर्दैवानेत्यांना रशियाच्या ६४व्या आर्मीशी सामना करावा लागला. यामुळे पौलसच्या सैन्याला होणार्‍या प्रतिकाराची प्रखरता थोडी कमी झाली. जेव्हा पौलसने शेवटचा दणका देण्यासाठी त्याच्या फौजा एकत्र केल्या तेव्हा रिश्टोफेनच्या चवथ्या एअर कोअरने स्टालिनग्राडवर तुफानी बाँबवर्षाव केला. त्यांना प्रतिकार करणार्‍यांचे मनोधैर्य नष्ट करायचे होते. १९ ऑगस्टला स्टालिनग्राडवर हल्ले सुरु झाले.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

२३ तारखेला जर्मन सैन्य व्होल्गाच्या किनार्‍यावर पोहोचले. पण आत्तापर्यंतच्या लढाईनंतर जर्मन सैनिकांच्या लढाऊ वृत्तीत बराच फरक पडलेला आपल्याला दिसतो. हे युद्ध संपुष्टात येण्यास काहीच दिवस राहिले अशी समजूत करुन दिल्यामुळे जर्मन सैनिकांना घराची ओढ लागली होती आणि घरी जाणार्‍या सैनिकांना स्वत:च्या प्राणाची नेहमीच काळजी वाटते. ते नसता धोका पत्करत नाहीत त्यामुळे त्यांच्या हातून अचाट कामे होत नाहीत हे सत्य आहे. असो. व्होल्गाच्या किनार्‍यावर पोहोचलेल्या जर्मन सैन्याला त्याच वेळी एका इन्फंट्री कोअरची कुमक मिळाली. शिवाय व्होल्गावरील एक अत्यंत महत्वाचा रेल्वेचा पूल या सैनिकांच्या तुफांच्या टप्प्यात आल्यामुळे आता रशियन ६२व्या आर्मीची बाजू लंगडी होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. तशातच त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी जर्मन वायुदलाला स्टालिनग्राडवर दिवसरात्र तुफान बांबवर्षाव करण्याचा आदेश देण्यात आला.

२३ ऑगस्टला व्होल्गा नदीवर पोहोचल्यावर जर्मन सेनेनी पहिल्यांदा शहरातील तेलाच्या टाक्यांवर तुफानी बाँबवर्षाव केला. त्या टाक्यांना आग लागल्यावर जे दृश्य दिसत होते त्याचे वर्णन ‘क्राज्न्या झिवेझदा’ वर्तमानपत्राच्या एका व्हॅसिली ग्रॉसमन नावाच्या रशियन पत्रकाराने असे केले आहे,
‘आगीच्या ज्वाळा हजारो फूट आकाशाच्या दिशेने झेप घेत होत्या. त्या ज्वाळांबरोबर तेलाच्या वाफेचे ढगही वर जात होते व वर जाऊन फुटत होते. ही आग इतकी प्रचंड होती की त्यात असणार्‍या हायड्रोकार्बनच्या कणांना जळण्यासाठी आवश्यक असणारा प्राणवायूचा पुरवठा कमी पडून काळ्याकुट्ट धुराचा एक जाड थर आकाश आणि जमिनीला अलग करायचा. त्या धुराच्या दाट आवरणातून तेल ठिबकताना बघणे हा एक भयानक अनुभव होता........

क्रमशः
ही लेखमालिका माझ्या युद्धाचे वादळ या अप्रकाशित भाषांतरीत पुस्तकावर व ग्रेट बॅटल्स ऑफ वर्ल्ड वॉर टू या पुस्तकावर आधारित आहे. सर्व छायाचित्रे इंटरनेटवरुन किंवा माझ्याकडे असलेल्या काही जुन्यापुराण्या पुस्तकातून.
जयंत कुलकर्णी.

इतिहासलेख

प्रतिक्रिया

भंकस बाबा's picture

14 Apr 2016 - 8:21 pm | भंकस बाबा

पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत,

बोका-ए-आझम's picture

14 Apr 2016 - 8:45 pm | बोका-ए-आझम

स्टॅलिनग्राड हे दुस-या महायुद्धातल्या सर्वात थरारक, भीषण आणि अटीतटीच्या लढायांपैकी एक. जयंतकाकांच्या लेखणीतून या लढाईतले आजवर न उलगडलेले पैलू पाहायला उत्सुक आहे.

तुषार काळभोर's picture

16 Apr 2016 - 9:47 am | तुषार काळभोर

थरारक वृत्तांत

सुबोध खरे's picture

14 Apr 2016 - 8:51 pm | सुबोध खरे

जयंतराव
आपले लेखन ओघवते आणी खिळवून टाकणारे आहे. पुस्तक लिहिण्याचे मनावर घ्या अशी आग्रहाची विनंती आहे

सुबोध खरे's picture

14 Apr 2016 - 8:54 pm | सुबोध खरे

लिहिण्याचे नव्हे प्रकाशित करण्याचे मनावर घ्या असे लिहायचे होते.
क्षमस्व.

एस's picture

14 Apr 2016 - 8:57 pm | एस

पुभाप्र.

लालगरूड's picture

14 Apr 2016 - 9:34 pm | लालगरूड

vasilli zeitsev... enemy at the gate...

भंकस बाबा's picture

16 Apr 2016 - 11:43 am | भंकस बाबा

एक थरारक जुगलबंदी अनुभवली या सिनेमात!

> " हे युद्ध संपले तेव्हा रशियाचे १,९८१,००० सैनिक युद्धकैदी जर्मन छावण्यात मेले व अजून १,३०८,००० नंतर त्यांची जी अमानुष वाहतूक करण्यात आली त्यात ठार झाले. ( पानिपतवर दोन्ही बाजूचे मिळून जास्तीत जास्त दोन एक लाख मृत्यू झाले. यावरुन आपल्याला या युद्धाची व्याप्ती कळेल.) "

पानिपतावरचे सर्व मृत्यु एकाच दिवशी झाले, त्यामुळॅ त्याची भीषणता वेगळीच आहे.

पैसा's picture

15 Apr 2016 - 6:55 pm | पैसा

!!!!

जव्हेरगंज's picture

15 Apr 2016 - 7:15 pm | जव्हेरगंज

याचीच वाट बघत होतो.
मस्त सुरुवात!

पुभाप्र.

खटपट्या's picture

16 Apr 2016 - 12:44 am | खटपट्या

फोटो दीसत नाही...

कपिलमुनी's picture

16 Apr 2016 - 10:44 am | कपिलमुनी

छान सुरुवात

नाना स्कॉच's picture

16 Apr 2016 - 11:14 am | नाना स्कॉच

अंगावर सरसरून काटा आला सर!

आपली शैली जब्राट आहे!

धन्य तो सैनिकी पेशा अन धन्य त्यांची निष्ठा!

पुभाप्र

___/\____

धनावडे's picture

16 Apr 2016 - 1:15 pm | धनावडे

माझा एक प्रश्न आहे दोन्ही महायुद्धात जर्मन पराभूत
झाले असले तरी सामान्य जर्मन सैनिक फारच
शैर्याने लढला कदाचित बाकीच्यांपेक्षा थोडा सरसच
मग जर्मनीमध्ये त्यांची युद्ध स्मारके आहेत का? आणि
इंग्लड फ्रांस सारखी त्यांच्यासाठी एक सैनिक म्हणुन सामान्य
लोक आणि सरकारच्या मनात सन्मानाची भावना आहे का?

जर्मन सेना बदनाम झाली. अर्थात त्यांनीही पूर्णपणे clean war केलं होतं असं नाही. पण फील्ड मार्शल रोमेल, हाईन्झ गुडेरियन, फाॅन मानस्टेन यांच्यासारखे मोजके अधिकारी दोस्त राष्ट्रांतील सेनाधिका-यांच्या आदराला पात्र झाले होते. रोमेलचं कौतुक स्वत: चर्चिलनी केलेलं आहे. रोमेलचं चरित्र इंग्लंडचे प्रसिद्ध लष्करी इतिहासकार बेसिल लिडेल हार्ट यांनी संपादित केलं आहे. अशा सेनाधिका-यांचा सन्मान झाला पण कायटेल, जोडल, डोनिट्झ, रीडर यांच्यासारख्या सेनाधिका-यांचं पुनर्वसन झालं नाही. कायटेल आणि जोडल तर फासावर लटकले.

धनावडे's picture

17 Apr 2016 - 12:20 am | धनावडे

धन्यवाद
दुसऱ्या महायुद्धाच ठिक पण पहिल्या महायुद्धातील
सैनिकांची तरी आठवण ठेवली आहे का,कदाचित
तुलना चुकीची असेल पण जस आपल्याला १९६२ मध्ये
पराभूत होउन पण आपल्याला आपल्या त्या युद्धात
लढलेल्या सैन्याबद्दल अभिमान आहे जरी नेतृत्व कितीही
पुचाट असल तरी

बोका-ए-आझम's picture

17 Apr 2016 - 9:31 am | बोका-ए-आझम

एकच उदाहरण. पहिल्या महायुद्धात जर्मनीचे सेनापती असलेले पाॅल फाॅन हिंडेनबर्ग हे हिटलर जर्मनीचा Chancellor झाला तेव्हा जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष होते. म्हणजेच सैन्य पराभूत झालं असलं तरी सेनापतीला पार राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वीकारलं गेलं होतं. पहिल्या महायुद्धात तुर्कस्तानही जर्मनीच्या बाजूने लढला होता. त्यांची ब्रिटनबरोबर झालेली गॅलिपोलीची लढाई प्रसिद्ध आहे. त्याचं स्मारक तुर्कस्तानात आहे. मीना प्रभूंच्या तुर्कनामा या पुस्तकात त्याचं फार छान वर्णन केलेलं आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Apr 2016 - 9:00 am | कैलासवासी सोन्याबापु

रशियन शौर्याला सन्मान देणारी ही लेखमाला ती पण जयंत काकांच्या हातून म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे निव्वळ!!.

जर्मन ब्रिटिश अमेरिकन फौजा असतील शुर पण रशियन फौजांची बातच वेगळी होती! हिवाळ्याने कायम त्यांची गाथा गारेगार बर्फाखाली दाबली पण अश्या लेखमाला त्यांना त्यांचे श्रेय देतात !

वीर वसीली झायेतसेव असो वा मार्शल झुकोव रशियन फौजा असल्याच काटक असतात अन होत्या असे वाटते

साधा मुलगा's picture

17 Apr 2016 - 11:01 am | साधा मुलगा

पुढील भागाच्या प्रतीक्षेत!

साधा मुलगा's picture

17 Apr 2016 - 11:01 am | साधा मुलगा

पुढील भागाच्या प्रतीक्षेत!

जयंत कुलकर्णी's picture

17 Apr 2016 - 2:44 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांचे आभार !

नया है वह's picture

18 Apr 2016 - 11:59 am | नया है वह

पुढील भागाच्या प्रतीक्षेत!

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Apr 2016 - 10:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

थरारक सुरुवात ! तुमच्या ओघवत्या भाषेची तारीफ करावी तेवढी कमीच !

पुभाप्र.

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Apr 2016 - 3:10 pm | राजेंद्र मेहेंदळे

पुभाप्र!!