Skip to main content

भोजन : रसपरिपोष आणि उत्सव !

लेखक विवेक ठाकूर यांनी शुक्रवार, 12/02/2016 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
१. देहभार भोजन हा देहभाराशी कमालीचा निगडीत पैलू आहे. त्या नित्यक्रमाचा उत्सव कसा करावा, याविषयी लेखमालेतला हा दुसरा लेख सादर करत आहे. आहार, विहार, निद्रा, उत्सर्ग आणि प्रणय हे निसर्गानं सर्वांना बहाल केलेले पाच आनंद आहेत. नैसर्गिक याचा अर्थ, ते मिळवायला कोणत्याही शिक्षणाची किंवा कौशल्याची गरज नाही. ते आपल्याला जन्मतःच प्राप्त आहेत आणि सदैव उपलब्ध आहेत. हे सर्व आनंद एकमेकांशी निगडित आहेत. विहारानं शरीर दमलं नाही तर आहाराचा आनंद मिळणार नाही. मनसोक्त विहार आणि तृप्त करणारा आहार यात निद्रेचं सौख्य लपलंय. आणि उत्सर्गाच्या आनंदाची, 'आहार, विहार आणि निद्रा' त्रिसूत्री आहे.... आणि सरते शेवटी प्रणयासाठी लागणारी ऊर्जा या चारही प्रक्रियांवर अवलंबून आहे. त्यामुळे भोजनाचा विचार हा (प्रणय वगळता) इतर तीन आनंदांशी संबंधीत आहे. ____________________ भोजनाचा आनंद दुर्लभ होण्याचं मुख्य कारण भूक लागल्यावर न जेवता, `वेळ झाल्यावर' जेवण्याची लावून घेतलेली सवय आहे. मुळात वेळ ही कल्पना आहे आणि भूक ही संवेदना आहे त्यामुळे भोजनासाठी भूक लागणं महत्त्वाचं आहे. सर्व मानवी जीवनाची मुख्य दिशा अर्थप्राप्ती असल्यामुळे, भोजनाचा आधार भूकेऐवजी वेळ झालाय. भूक लागो न लागो, सर्वांनी एकाच लंच टाइमला जेवणं, यामुळे भोजन केवळ उपचार राहिला आहे. त्यात आनंद वगैरे उरला असेल तर तो फक्त सुट्टीच्या दिवशी किंवा मग सणासुदीला! भुकेची संवेदना प्रखर होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट विहार आहे. काय वाटेल ते झालं तरी सकाळी सहाच्या आत उठून तीन प्रकारच्या शारीरिक हालचाली झाल्या पाहिजेत. एक) पोटावर दाब येईल अशी योगासनं. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे वज्रासनात बसून, कपाळ समोर जमिनीला टेकवणं आणि ते करत असताना हाताच्या मुठी क्रमाक्रमानं, नाभी जवळ, पोटाच्या मध्य भागी आणि मांडीवर ठेवल्या तर पोटाला उत्तम मसाज होऊन पचन क्रियेत कमालीची सुधारणा होते. कपाळ जमिनीवर टेकवताना श्वास सोडणं आणि वर येताना श्वास घेणं या क्रिया इतक्या सहजतेनं होतात की त्यामुळे श्वसनाचा जोम वाढून तो पोटापर्यंत पोहोचायला लागतो. उत्तम श्वसन आणि पोटाची लवचीकता हे भूक, उत्सर्ग आणि सर्वांगीण शरीर स्वास्थ्य एकाच वेळी साधतात. दोन) सुप्त वज्रासनात झोपून, ओटीपोटापासून ते छातीपर्यंत, दोन्ही हातानी केला मसाज. . त्याचबरोबर, नाभीच्या चार बोटं खाली ते छातीच्या मध्यापर्यंत अशी सरळ रेष कल्पिली, तर त्या रेषेवर दोन्ही हातांच्या चारही बोटांनी दिलेला दाब. यामुळे पँकरियाज सक्रिय होतात, पाठीचा कणा लवचिक होतो आणि हृदयक्रिया नियमीत होते. तीन) दोन्ही पायांची लवचीकता आणि स्नायूंचा जोम यावर शारीरिक चापल्य आणि उत्साह अवलंबून आहे. त्यासाठी सर्वांगासन आणि हलासन ही दोन आसनं अत्यंत उपयोगी आहेत. . एकदा शरीरात पुरेशी लवचीकता आली की टेकडी चढणं किंवा टेबल टेनिस सारखा खेळ खेळणं ही संपूर्ण दिवसाची अत्यंत विधायक सुरुवात आहे. उत्तम उत्सर्गासाठी सर्वात महत्त्वाची पण संपूर्ण दुर्लक्षित गोष्ट म्हणजे उत्छ्वासाचा जोम आहे. प्राणायामाच्या पाच महत्त्वाच्या प्रक्रियांवर या लेखमालेत पुन्हा केंव्हा लिहीन पण भस्त्रिका, कपालभाती आणि अनुलोम-विलोम या प्राणायामांचा श्वसनाचा जोम वाढायला आणि डिटॉक्सिकेशनसाठी अपरिमित उपयोग आहे. __________________________ उत्तम भुकेचं एकमेव लक्षण म्हणजे काय खावं ते आतनं उमगणं आहे. भूकच तुम्हाला शरीराला काय हवंय ते सांगते. ही संवेदना रस स्वरूप असते म्हणजे : आंबट, गोड, तिखट या तीन प्रमुख आणि तुरट, खारट आणि कडू या दुय्यम रसांपैकी नक्की कोणता रस किती प्रमाणात सेवन करावा हे तुम्हाला कळतं. सुरुवाती सुरुवातीला जरी आवेगानं जे समोर येईल ते खावं असं वाटलं तरी सकाळी लवकर उठण्याचा दिनक्रम जसजसा नियमित होत जाईल तशी रस संवेदना प्रगल्भ होत जाईल आणि नेमका आहार घेण्याकडे कल होत जाईल. कोणीही दिग्गजानं या विषयावर काहीही लिहिलं असलं तरी, अन्नाच्या घटक पदार्थांच्या विश्लेषणापेक्षा, 'स्वाद' हा भोजनातला नि:संशय निर्णायक घटक आहे. स्वाद म्हणजे चव आणि गंध यांचा संयुक्त परिणाम. सर्व सजीव सृष्टी स्वाद हीच संवेदना, अन्न ग्रहणासाठी प्रमाण मानते. अन्नाच्या घटक पदार्थांचं विश्लेषण हे कितीही सायंटिफिक असलं तरी तृप्ती आणि शरीर स्वास्थ्य साधू शकत नाही. कारण स्वाद ही संवेदना आहे आणि विश्लेषण निव्वळ वैचारिक आहे. भोजनाचा आनंद निष्कासित करणारं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे स्वादाऐवजी विश्लेषणाला दिलेलं महत्त्व आहे तस्मात, जेवण हे नेहमी रसपरिपोष करणारं हवं. जेवण रसपरिपोषक करतंय की नाही हे समजण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, जेवताना साधलेली तन्मयता (तुम्ही जेवताना बोलूच शकत नाही!). ते सुरू राहावं अशी चित्तदशा. आणि त्यानंतर येणारी तृप्ती आणि कृतज्ञता! भुकेनं जेवताना येणारा एक अफलातून अनुभव म्हणजे जेवण कितीही रसपूर्ण असलं तरी केव्हा थांबावं याची होणारी जाणीव. ती जाणीव एका थ्रेशोल्ड पॉंईंट सारखी असते. तुम्ही तिच्याकडे सहज दुर्लक्ष करू शकता पण एकदा त्या पॉंईंटला थांबायची मजा कळली की तुम्हाला कोणतंही डाएट करावं लागत नाही. ती जाणीव हाच सर्वोत्तम डाएट पॉंईंट आहे. _________________________ संपूर्ण शरीर हे अन्नाचं रूपांतरण आहे त्यामुळे उत्तम भोजन, उत्तम शरीर स्वास्थ्य, उत्तम निद्रा, उत्तम उत्सर्ग आणि उत्तम ऊर्जा अशी साखळी आहे. आयुर्वेदाचं सूत्रंच असं आहे की योग्य आहार कोणताही शारीरिक दोष दूर करतो. त्यामुळे केव्हा खाऊ नये (उपवास) आणि नक्की कोणता आणि किती आहार घ्यावा हे एकदा साधलं की, कोणत्याही औषधाची जरूर नाही. अन्न हेच सर्वोत्तम औषध आहे. ________________________________ माझा असा व्यक्तीगत अनुभव आहे की पहाटे प्रसन्न चित्तदशेनं उठल्यावर, शरीराची लवचीकता आणि उत्साह साधलेला असताना, मनसोक्त विहार केल्यावर लागलेली भूक तुम्हाला काय खावं हे 'दाखवते'. तुम्हाला तो पदार्थ, ती रेसिपी 'दिसते'. सुरुवातीला मला या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं पण मग नंतर लक्षात आलं, की ही निसर्गाची अंतर्निहित योजनाच आहे. माणूस सोडला तर सर्व सजीव सृष्टी आपलं अन्न याच पद्धतीनं शोधते. कारण निसर्गाशी एकरूप असल्यानं त्यांना एकाच वेळी अन्न, आणि ते कुठे आहे ती दिशा यांचा बोध होतो. प्रगल्भ भुकेचा अत्यंत सहज आणि आपसूकपणे येणारा दुसरा पैलू म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या अन्नाची कमीतकमी प्रयासात होणारी उपलब्धता! याचं कारणही तितकंच नैसर्गिक आहे. निसर्गच भूक निर्माण करत असल्यानं तिच्या तृप्तीची योजना निसर्ग स्वयेच करत असतो. इतर सजीव सृष्टीला जाणीवेची प्रगल्भता नसल्यामुळे भोजनाचा न गवसू शकणारा, पण मानवाला आनंदित करणारा तिसरा पैलू म्हणजे कृतज्ञता! आपण भूक, तिच्यामुळे होणारं अन्नाचं दर्शन (द व्हिज्युअल साईट ऑफ फूड), रसपरिपोष करणारं भोजन आणि त्यातून निर्माण होणारी तृप्ती यांनी इतके भारून जातो की अन्नाला ब्रह्म का म्हटलंय ते कळतं! भोजन केवळ नित्यक्रम न राहता उत्सव होतं आणि रोजच्या जगण्याला आनंदाचं एक नवं परिमाण उपलब्ध होतं.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6106
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

कबीरांविषयी ओशोंनी काय काय लेखन केलंय हे वाचायला आवडेल. तुमचे महर्षि ओशोविषयक वाचन तितके असल्याने विनंती करत आहे 'लिहा' म्हणून. बाकी कबीरांची कुमारजींनी गाईलेली निर्गुणी भजने अतिशय आवडतात. त्या विषयी पण कधी वेळ मिळाला तर लिहा.

"माझा असा व्यक्तीगत अनुभव आहे की पहाटे प्रसन्न चित्तदशेनं उठल्यावर, शरीराची लवचीकता आणि उत्साह साधलेला असताना, मनसोक्त विहार केल्यावर लागलेली भूक तुम्हाला काय खावं हे 'दाखवते'." असेल असेही असेल... आमच्या बाबतीत थोडे वेगळे आहे.रात्री आम्हाला झोपेत स्वप्ने पडतात.त्यात कधी खिमा-पाव, तर कधी इडली-चट्णी-सांभार, कधी थालीपीठे (अर्थात २-३ प्रकारची लोणची आणि दह्यासकट.आम्हाला थालीपीठावर लोणी आवडत नाही.) तर कधी साबूदाणा वडे दिसतात. आमची सुगरण बायको पण आमच्यासाठी (खरे तर हे पदार्थ तिला पण मनापासून आवडतात.एक नॉन-व्हेज सोडून) करते. असो, थोडक्यात काय तर आम्ही खाण्यासाठी जगतो.

In reply to by कपिलमुनी

नशीब. मुविचाचा उसको डब्बा दे डालो. और मंगताय तो एक तीन थालीवाला नया इस्टील का डब्बा दे डालो. करायला काही नको ठोल्याला. नुसते बुलेटवर फिरायचे आणि खायचे तेवढे बघा मुनीवर.

In reply to by मुक्त विहारि

चर्चगेटला दिनशा वाच्छा रोडवर रेलिश नावाचं एक restaurant आहे. तिथल्या मेनूकार्डवर हे लिहिलेलं आहे - There is no love more sincere than the love for food. कुणाचं आहे आठवत नाही पण १००% मान्य!

In reply to by मुक्त विहारि

मुविकाका एक कट्टा हमारे यहा तो बनता ही हैं... काय करु सांगा? हळद कांद्याची शाबुदाणा खिचडी, कोथिंबीर वडी, फरसाण-कांदापोहे, ढोकळा, गोडी मिसळ, काय काय करावे ब्रे?

In reply to by विजय पुरोहित

आणि पुणे नामक शहरात असाल तर येत्या २-३ मनिन्यात नक्कीच जमवू.

आणि त्यानिमित्तानं लिहीतो. ते तुम्ही किंवा इतर आवांतर करणार्‍यांनी मनावर घेऊ नये. रात्री आम्हाला झोपेत स्वप्ने पडतात.त्यात कधी खिमा-पाव, तर कधी इडली-चट्णी-सांभार, कधी थालीपीठे (अर्थात २-३ प्रकारची लोणची आणि दह्यासकट.आम्हाला थालीपीठावर लोणी आवडत नाही.) तर कधी साबूदाणा वडे दिसतात. झोपेत पदार्थ दिसणं हे दिवसाच्या भोजनातली अतृप्ती दर्शवतं. ते पॉर्न बघून फँटसाइज करण्यासरखं आहे. म्हणजे आहे त्याचा उपभोग घेतला नाही आणि स्वप्नातलं तर उपभोगताच येत नाही. पण बहुतेकांची परिस्थिती अशीच असते, कारण जागेपणी भोजनाची मजा न आल्यानं त्याची परिपूर्ती गप्पा मारुन केली जाते. जे समोर आहे त्याच्या अनुषंगानी जे कल्पनेत आहे त्याच्या गप्पा मारल्या जातात. ओशोंचं एक सुरेख वाक्य आहे : मनका स्वभावही कुछ ऐसा है. उसे जो मिल गया, वह व्यर्थ हो जाता है. समोर उत्तम भोजन आहे पण भूकच लागलेली नाही त्यामुळे स्वादाची मजाच येत नाही, मग इकडे काय चांगलं मिळतं, तिकडे काय भारी असतं अशा चर्चा रंगतात. ते चर्चेतले पदार्थ मनात राहून जातात आणि मग झोप लागली की स्वप्नात दिसतात. याचा अर्थ ते पदार्थ मिळाल्यावर तृप्ती येते असा नाही कारण ते समोर येतात तेंव्हा, एकतर भूक लागलेली असेलच असं नाही आणि दुसरं म्हणजे शरीराला ते हवे असतील असं नाही. त्यामुळे पुन्हा तिसर्‍याच पदार्थांची चर्चा चालू होते. थोडक्यात, पदार्थ स्वप्नात येतात म्हणजे भूकेची जाणीव पार गंडलेली आहे.

In reply to by विवेक ठाकूर

का करे ठाकूरसा, ससुरा हमरा सारा अस्तित्वही गंडा हुवा है. भूक है तो आप केहते भूक नही. नही है तो आप कहते है है. हमरा पेट का ब्राडकास्टींग आपके केबल टीवी पे आत रही का?

In reply to by तर्राट जोकर

ती मला कशी कळणार? घड्याळाकडे बघून भूक लागली किंवा भूकेची वेळ गेली असं ठरवणं, भूकेची जाणीव गंडायला कारणीभूत होतं. वास्तविकात भूकेनं जेवणं अत्यंत नैसर्गिक आहे.

In reply to by विवेक ठाकूर

ओशोंचं एक सुरेख वाक्य आहे : मनका स्वभावही कुछ ऐसा है. उसे जो मिल गया, वह व्यर्थ हो जाता है.
क्या बात __/\__

In reply to by स्पा

पण ते निखालस चुक आहे. मनाला दिलेली कुठलीच गोष्ट वाया जात नाहि. शरिर जसं अन्नातुन रसग्रहण करतं व चोथा फेकुन देतं तसच मन प्रत्येक इन्पुटपासुन संस्कारीत होत असतं...

In reply to by अर्धवटराव

मिळाल्यावर त्याची किंमत राहत नाही असा काही अर्थ?

In reply to by तर्राट जोकर

पुरुष देवाला विचारतो : तू इतक्या एकसोएक युवती घडवतोस आणि पत्नी मात्र नकोनकोशी बनवतोस असं का ? देवः वत्सा, युवती मी घडवतो आणि तिची पत्नी तू बनवतोस ! द पॉइंट इज , प्रत्येक पत्नी ही सुंदर तरूणी असते ( किमान लग्न करणाऱ्यासाठी तरी नक्कीच असते ) पण एकदा प्राप्त झाल्यावर ती सोडून बाकीच्याच भारी वाटायला लागतात !

In reply to by तर्राट जोकर

पण " मनका स्वभावही कुछ ऐसा है. उसे जो मिल गया, वह व्यर्थ हो जाता है." असच वाक्य असेल तर ते चुक आहे. खाल्लेल्या अन्नाची किंमत शरीराला असते का? अन्न तर खाऊन झालय. त्याचा व्हायचा तो परिणाम होईलच. तसच मनाचं आहे. शिवाय मनाने जे काहि भोगलं त्याची त्याला किंमत राहात नाहि असंही नाहि.

In reply to by अर्धवटराव

अहो त्यांना म्हणायचं आहे की , मन म्हणजे "हातचं सोडून पळत्याच्या मागे " लागते . बरोबर का ठाकूर सर ?

In reply to by उगा काहितरीच

'व्यर्थ' म्हणजे हातचं सोडुन... असा अर्थ वाटत तर नाहि. पण मला नेमका कॉण्टेक्स्ट माहित नाहि.

In reply to by अर्धवटराव

जे काहि उपलब्ध आहे त्याचा शक्य तेव्हढा उपभोग घेतल्याशिवाय मन इतर गोष्टींच्या मागे लागत नाहि. असो.

In reply to by अर्धवटराव

वरील उदाहरणाचा लेखाशी सरळ संबंध नाही पण मनाच्या चंचलतेची तुम्हाला कल्पना यावी म्हणून लिहीलंय.

In reply to by विवेक ठाकूर

त्याच उदाहरणासंदर्भात अर्धवटरावांचं मत चुकत नाही.

In reply to by विवेक ठाकूर

एखाद-दोन जोडप्यांच्या तक्रारी म्हणजे नियम नव्हे. मला ज्ञात असलेल्या ऑलमोस्ट सर्व वैवाहीक जोडप्यांचं फार उत्तम सहजीवन सुरु आहे, दिवसेंदिवस ते अधीक गहिरं होत आहे. हे फक्त एक उदाहरण म्हणुन नाहि, तर इन जनरल मनाचा हाच स्वभाव असतो असं ऑब्जर्व्हेशन आहे. प्रत्येक गोष्टीतुन मन शक्य तेव्हढं रसशोधन करतच असतं, काहिच व्यर्थ जात नाहि.

In reply to by विवेक ठाकूर

असेल असेही असेल... व्यक्ती तितक्या प्रकृती आणि घटा घटाचे रूप आगळे. १. तुम्ही तुमची बाजू किंवा मत किंवा विचारसरणी मांडली आणि मी माझी. २. मी फार कमी धाग्यांवर धूडगूस घालतो. हा धागा तुम्ही प्रामाणिकपणे, तुम्हाला नक्की काय वाटते?, हे पाहून काढल्याचे जाणवले, म्हणून प्रतिसाद लिहिला. धुडगूस घालायला नाही. ३. माझ्या स्वप्नात फार लहानपणापासूनच खाण्याचे पदार्थ येतात. ४. प्रत्येक नाण्याला किमान २ बाजू असतात. आणि ५. मनुष्य स्वभाव एका ठराविक चौकटीत बंदिस्त करता येत नाही.असंख्य देव आणि तितकेच रीती-रिवाज हेच दाखवतात. ६. "समोर उत्तम भोजन आहे पण भूकच लागलेली नाही त्यामुळे स्वादाची मजाच येत नाही." अद्याप तरी असे काहीही झालेले नाही.कधी-कधी भरपेट जेवण झाल्यावर पण परत काहीतरी खाल्ले जातेच. उदा, आमचे जेवण झालेले असते आणि नेमके शेजारून गरम गरम छोले-पुरी येते.किंवा आई सुरळीच्या वड्या पाठवते.किंवा मुलगा पुण्याहून कोल्हापुरी तांबडा=पांढरा रस्सा आणतो.त्या वासाने भूक चाळवली की मन मारण्यापेक्षा खावून टा़कतो. असो, आता ह्यापुढे तुमच्या ह्या धाग्यावर मी प्रतिसाद देणार नाही.एकदा प्रत्य्क्ष भेटू आणि ह्या विषयावर चर्चा करू.प्रत्य्क्ष भेटायला तुमची हरकत असेल, तर व्यनि करतो. वादे वादे जायते संवादः

In reply to by मुक्त विहारि

आणि आपल्या सर्वांची जाणीव एक आहे अशी वस्तुस्थिती आहे . तरीही तुमच्या प्रामाणिकपणा आणि दिलदारी विषयी शंका नाही . तस्मात, मीही थांबतो , व्यनितून बोलू .

भूक वगैरे जाणीवांकडे दुर्लक्ष्य करुन इतरत्र सुख शोधण्याच्या नादात माणुस अनेक दु:खांना निमंत्रण देतो. काहि पॅशन्स अगदी तहान भूक हरपायला लावतात. पण ति मानवी मेंदुची करामात आहे... कदाचीत म्हणुनच माणुस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे.

In reply to by बोका-ए-आझम

भोजनाची मजा आहे . पण ज्याला आपण पॅशन म्हणतो ती मानसिक असते , त्यामुळे खाण्याची आवड असणारे नेहेमी ओवरवेट दिसतात . भूकेनं खाणाऱ्यांना खरोखरी पॅशनेटली खाता येतं . ते खाण्यात इतके रममाण झालेले असतात की त्यांना बोलणं डायवर्शन वाटतं ! आणि त्यांना देहाचा कधीही भार वाटत नाही .

In reply to by बोका-ए-आझम

पण पु ल म्हणतात तसं खुप गाणारा म्हणजे गवैय्या नव्हे आणि खुप खाणारा म्हणजे खवैय्या नव्हे. आहाराचं प्रमाण कमि-जास्त कसं असतं हे डॉ. खरेंनी मिपावर उत्तमरित्या सांगितल आहे. अवांतरः प्रचंड खाण्याची प्रचंड पॅशन कॅटॅगरीत आम्हि मोडतो :ड

मस्तच लिहिलं आहे पण ठराविक वेळ पाळणे हे हि गरजेचे आहे , तुमचा आयुर्वेदच असे सांगतो.

In reply to by स्पा

जाणीव प्रत्यक्ष आहे . पण एकदा वेळेवर जेवायची सवय लागली की सायकॉलॉजिकली भूक लागली असं वाटायला लागतं आणि ती वेळ टळली की भूक गेली असं वाटतं . खरी भूक जसा वेळ जाईल तशी सिक्लीकली वाढत जाते , जाणीवेचं पुढचं प्रत्येक आवर्तन तीव्रतर होत जातं . शेवटी एकवेळ अशी येते की जेवल्याशिवाय काही करणंच अशक्य होतं . तस्मात , भोजनाचा उत्सव होण्यासाठी ,भूकेनं जेवायची नवी सवय लावून घेणं अत्यंत आगत्याचं आहे .

पुर्वग्रह न ठेवता वाचला तर लेख चांगला आहे . (हा कुणालाही टोमणा नाही . कुणाला स्वतःलाच हा टोमणा वाटत असेल तर माझा नाइलाज आहे.;-)

मेरेकू आवड्या जो भी लिखा है वो. समझा बी. मै हुशार हुवा थोडासा. बादवे छान लिहिलेय ठाकूरसाब. मला भूक आणी झोप मात्र एकदम मस्त लागते बर्का. अन्न हेच औशध ह्यावर माझा ठाम विश्वास आहे.