✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

झोपडपट्टीतले दिवस: भाग एक

त
तर्राट जोकर यांनी
गुरुवार, 10/22/2015 - 00:25  ·  लेख
लेख
आम्ही तेव्हा झोपडपट्टीत राहायचो, रेल्वेच्या जागेत अतिक्रमण झालेली अठरापगड जातींच्या सरमिसळीची गोधडी. एक मोठा निळा फडका आणि बाकीचे छोटे छोटे रंगीबिरंगी ठिगळ असलेली. शहराच्या आजूबाजूच्या शेकडो गावांतून इथे दोन-चार, दोन-चार करत आलेली, मोलमजुरी, हमालीचं काम करणारी बिर्हाडं. आवसेला न चुकता डडंग-डंग...चिक...डडंड-डंग....डडंग-डंग...चिक...डडंड-डंग करत येणारा स्वच्छ कपड्यातला, अगदी वारकरी वाटणारा मांग. परिसरात मेलेली जनावर ओढायचं, त्यांचं कातडं काढून विकायचं काम करणारे महार, कुठे कोणाच्या घरी धुणी-भांडी करणार्‍या बाया, दोन-तीन बकर्‍या घेऊन चरायला जाणारी अल्पवयीन बालकं, घराच्या लिंपणासाठी कायम चुन्याची माती शोधत असणार्‍या मुली. जयंत्या-महानिर्वाणाच्या दिवशी वाजणारे भयाण आवाजातले भोंगे, कुणाच्या पाचव्या वाढदिवशी अमक्यामामाने 'चिरंजी सिद्दार्त'ला सपरेम भ्येट दिलेले २ रुपये - अमेरिकेने युगांडाला मदत केल्याच्या थाटात - कोकलून कोकलून सांगणारे अनाउंसर. कुठे कुठे वीज पोचली होती. पण बराच भाग घासलेटच्या दिव्यांवर रात्रीचा अंधार गडद करत असे. शहरात, अगदी झोपडपट्टीच्या सीमारेषेपासून पुढे सूखवस्तूंची वसाहत सुरु होत होती. तिथे सगळा झगमगाट असे. त्या सीमारेषेवरच आमचं घर होतं. रेल्वेची जागा आहे असे ठणकावून सांगणारा मोठा दगड, आमच्या घराच्या अंगणाच्या एका कोपर्‍यात रुतलेला होता. रेल्वेची अतिक्रमित जागेची, पर्यायाने त्या दोन किमी आडव्या पसरलेल्या गोधडीची किनार, व आमच्या घराच्या अंगणाची सीमा दाखवणारा तो दगड कालांतराने जमीनीखाली गेला. भक्तांना दृष्टांत द्यायला देवाचे दगड वर येतात. आम्हाला अभय द्यायला तो दगड खाली पुरला गेला. आमचं घर, कुडाचं, पक्कं नाही. पण हवेशीर. झोपडी नाही. मोठ्या बल्ल्यांनी मजबूत बांधलेले, मातीने लिपलेल्या जाड भिंती असलेलं दहा-बाय दहा च्या दोन खोल्या असलेलं... उंच व मजबूत होतं, प्रशस्त नव्हतं, गरजेपुरतं. जागा फारशी नाही एकूण हजार-बाराशे फूट. पण झोपडपट्ट्यांमधे नसलेल्या अनेक गोष्टी आमच्या घरात होत्या. काही दिवस अंधारात, व स्टोव्हवर स्वयंपाक केल्यावर अण्णांनी खटपट करून वीज कनेक्शन व गॅस सिलेंडर कनेक्शन मिळवलं. थोडे पैसे घालून दारात बोअर मारून, हातपंप वाली कमनीय बांधा असलेली हिरवी जलदेवता उभी केली. आमच्या घरासमोर कुठलीही झोपडी नव्हती, निदान सुरुवातीचे अनेक वर्षे. दूर नजर जाईल इतपर्यंत मोकळे मैदान होते. सुखवस्तूंची वसाहत डाव्या बाजूला. उजव्या बाजुला सरकारी खात्याची जमीन. एकुण ८-१० वर्षाच्या मुलासाठी तो आजच्या काळातला स्वर्गच होता. वीज, पाणी आल्याने आम्ही खूप फेमस झालो. आमच्या हापशी-हातपंपावरून लोक रोज पाणी भरायला लागले, अतिशय गोड आणि दर्जेदार पाणी होतं. तिथे आजुबाजूला दोन-तीन हापशा होत्या. त्यातली एक आमची. हिचं पाणी, आमचा स्वभाव दोन्ही गोड. सकाळ-संध्याकाळ नुसती रीघ असायची. गर्दी फार व्हायला लागली, २४ तास. मग एका कुटुंबाकडून, पाणी भरायचे, आम्ही दहा रुपये महिना प्रमाणे पैसे घ्यायला लागलो. आमच्या घरातून वीज नसलेल्या झोपड्यांमधे वीज दिली गेली. आजूबाजूच्या किमान साठ-सत्तर घरांमधे आमच्या घरातून वीज दिली जात होती. एक तर घर चांगले सात-आठशे फुटांवर होते. इतक्या लांब वीज वाहून नेणे, त्यांच्या वायरी सांभाळणे, बरेच उद्योग होते. पैसे मिळायचे पण त्यापेक्षा महत्त्वाचे आपण ज्या लोकांमधे राहतो त्यांना कशी का होईना आपल्यातर्फे थोडी मदत होत होती. असून असून लोकांकडे एखादा बल्ब, टेबल-फॅन असायचा. वीस-पंचवीस रुपये महिना. नंतर हळूहळू सरकारी निर्बंध शिथिल होऊन राजमान्यता मिळाल्यावर सगळ्यांकडे स्वतःचे वीज कनेक्शन आले. वाढत्या वॅटेजवाल्या अप्लायंसेसनी आमच्याही घरचे फ्युज नेहमी उडायला लागले होते. एकदा तर सगली वायरींग जळली. तो धंदा आम्ही बंद केला. परिस्थिती फिरते. जिथे फुले वेचली तिथे गोवर्‍याही वेचायची वेळ आमच्यावरही आलीच, पुढे आम्हालाही काही दिवस दुसर्‍यांचे कडून महिना पन्नास-शंभर रुपये देऊन वीज घेऊन राहावे लागले. सतत उपसा होऊन आमची जलदेवता रुष्ट झाली. कपडे धुण्याइतकेही चांगले पाणी तिच्यातून मिळत नव्हते. आम्हाला दुसर्‍यांच्या हापशांवर जाऊन दहा रुपये महिन्यानी पाणी भरायला लागले. आम्ही त्याठिकाणी राहिलो उणीपुरी १२ वर्षे. घर, आणि परिस्थिती मोडकळीस आली. बहिण वयात यायला लागली तेव्हा तिथे थांबणं चुकीचं वाटू लागलं. अण्णांनी ज्या परिस्थितीत हे स्वतःचं घर मिळवलं होतं ती परिस्थिती सतत आठवून त्यांना ते विकायचे नव्हते. आम्ही हट्टाला पेटलो होतो. स्वत:च्या मोठ्या घरातून टीन-पत्र्याच्या दिडशे फुटाच्या भाड्याच्या खोलीत जाणे त्यांच्या स्वाभिमानी मनाला पटत नव्हते. इथल्या आलेल्या किमतीत चांगल्या वस्तीत घर घेणे शक्यच नव्हते. आमच्या सततच्या धोशाने वडिलांना ते घर विकणे भाग पडले. ते घरही नंतर बरेच ढेपाळले होते. ती झोपडपट्टी आणि तिथल्या बारा वर्षांनी खूप अनुभव दिले. आठवले तसे लिहितो. पण फार जास्त नाही लिहिणार. काही अजूनही आठवणारे.... असेच मनावर परिणाम करून गेलेले. काही लोक, काही वस्तू, काही घटना.... झोपडपट्टीतले दिवस. क्रमशः (सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन. प्रथम प्रकाशनः मिसळपाव.कॉम. दिनांकः २२ ऑक्टोबर २०१५) झोपडपट्टीतले दिवसः भाग दोन
  • झोपडपट्टीतले दिवसः भाग दोन

Book traversal links for झोपडपट्टीतले दिवस: भाग एक

  • झोपडपट्टीतले दिवसः भाग दोन ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
इतिहास
समाज
जीवनमान
राहणी
राहती जागा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
71934 वाचन

💬 प्रतिसाद (191)

प्रतिक्रिया

+१११११

ट्रेड मार्क
गुरुवार, 10/29/2015 - 20:03 नवीन
साधारण १९५० -१९६० च्या दशकात बरेच लोक गावांमधून शहरात स्थलांतरित झाले, अजूनही होत आहेत. मुख्य कारण होते ते नशीब आजमावायला, याचाच दुसरा अर्थ गावांमध्ये फारश्या संधी नव्हत्या. बहुतेक सगळे गरीब घरातून आलेले होते आणि शहरात येण्याचा उद्देश होता कि पैसे कमावून गावाकडे पाठवता येतील. पण म्हणून सगळेच झोपडपट्ट्यांमध्ये राहत होते असं नाही. माझे वडील पण ६० च्या दशकात एका खेडेगावातून मुंबईत आले. कोणी ओळखीचं नाही की मदतीला नाही. पण ते एका चाळीत paying guest म्हणून राहिले आणी तिथून पुढे प्रगती केली. त्यांनाही तेव्हा परवडत नव्हतंच, नोकरी मिळण्यासाठी धडपड, स्वताच्या खाण्याची भ्रांत आणी त्यात वर गावाकडे पैसे पाठव म्हणून त्यांच्या आई वडीलांची अपेक्षा. त्यांनाही झोपडपट्टीत राहता आलं असतं कारण आमच्या चाळीच्या खालीच झोपडपट्टी होती. पण त्यांनी निवड केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुढे झोपडपट्ट्यांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा TV/ फ्रीझ वगैरे आले. पुढे त्यांना सरकारी योजनेत पक्की घरं देण्यात आली तर ती घरं भाड्यानी देवून हे लोक परत झोपडीत राहायला. असो. सगळा दोष सरकारवर टाकून मोकळं होता येत नाही आणी होवू ही नये. सरकारने झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रयत्न केले नाहीत असं नाहीये, परंतु मानसिकता बदलणे मात्र सरकारला जमले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

+१११११मानसिकता बदलणे मात्र

सुबोध खरे
गुरुवार, 10/29/2015 - 20:31 नवीन
+१११११ मानसिकता बदलणे मात्र सरकारला जमले नाही हीच परिस्थिती माझ्या वडिलांची होती. १७ व्या वर्षी म्याट्रीक झाल्यावर एक वर्ष कोकणात घरी बसून काढलं. १८ व्या वर्षी माटुंग्याच्या रेलवे कार्यशाळेत कामगार म्हणून लागले. PAYING GUEST म्हणून एका खोलीत राहून मग भाड्याने घर घेतले. मधल्या काळात नोकरी आणी कोलेज करून त्रिपदवीधर- तीन पदव्या बी ए, एल एल बी, आणी डी बी एम( जमनालाल बजाज मधून) झाले.हे करत असताना भावांची शिक्षणे आणी बहिणींची लग्नेही केली. गावाला पैसे पाठवणे परवडत नव्हते म्हणून आईवडिलांना त्याच घरात बोलावून घेतले. एका घरात दोन खोल्यात १० माणसे राहत.तेथेच माझा आणी भावाचा जन्म झाला.शेवटी स्वतःचे घर झाले.तेही ५६० चौ फुट च.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

आता मात्र धागाकर्त्याने

चित्रगुप्त
गुरुवार, 10/29/2015 - 20:42 नवीन
आता मात्र धागाकर्त्याने वडिलांनी कोणत्या कारणाने झोपडपट्टीत रहाणे पसंत केले, तो इतिहास लिहिला पाहिजे, म्हणजे या वर्गफुटाच्या प्रकरणाचा एकदाचा निकाल लागेल .
  • Log in or register to post comments

>>

दत्ता जोशी
गुरुवार, 10/29/2015 - 23:33 नवीन
<<<<<आता मात्र धागाकर्त्याने वडिलांनी कोणत्या कारणाने झोपडपट्टीत रहाणे पसंत केले, तो इतिहास लिहिला पाहिजे>>> का अन्याय करताय त्यांच्यावर? <<<अधिक अभ्यासासाठी कालच त्या वस्तीला भेट देऊन आलोय. >>> असं स्पष्ट लिहिलंय न त्यांनी. त्यांना कशाला झोपडपट्टीत राहायला पाठवता? ते फक्त अभ्यासासाठी गेले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

फाय्जे तेवळी मस्ती कर बाळा

तर्राट जोकर
गुरुवार, 10/29/2015 - 23:42 नवीन
फाय्जे तेवळी मस्ती कर बाळा इकडे.... पण तोडा भेजाभी साथ्मे रकनेका... काम आता है. वयाची ६ ते १८ ही वर्षे तिकडे गेलीयेत. ते जग सोडून आता १८ वर्षे होतायत. अगदी सुरुवातीच्या घडामोडी म्हणजे ५ ते १० वयोगटातल्या घडल्यालाही आता ३० वर्षे झालीयेत. एवढ्या लहान वयात इतके सगळे डिट्टेल लक्षात ठेवून मिपावर लेखमालिका लिहिणार आहे हे ठरवून जन्म घेतला नव्हता.... सो अपना लॉजिक पेहनके चलो. और उसमें किदर छेद नहिं हैना इस्का पैले खात्री करनेका... बाकी वेन्जाय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी

काही समजत नाही बुवा..तुमचा वय

दत्ता जोशी
गुरुवार, 10/29/2015 - 23:56 नवीन
काही समजत नाही बुवा..तुमचा वय ३५ आहे कि ४०? दुसर्या धाग्यांवर ३५ लिहिल्याच आठवतयं . ३५ असेल तर १०व्य वर्षी घडलेल्या घटनाना ३० वर्षे कशी झाली? ३५ व्या वर्षी स्वतःचे लहानपण हे "खणून " आणि अभ्यास करून काढावे लागते? माझा वय ४५ आहे. मला माझ्या मोन्तेसरी पासूनच्या सगळ्या महत्वाच्या घटना आठवतात म्हणून मला तसा वाटला असावा. असो तर मग चीत्रगुप्तांची मागणी रास्त आहे. पु भा शु आणि प्र. लिहा..लिहा.. बाय द वे अचानक एकेरी वर.. फारच मनाला लावून घेतलीत वाटत मोहरमची चर्चा. असो होतं असं कधी कधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

त्याचं असंय भाऊसाहेब,

तर्राट जोकर
Fri, 10/30/2015 - 00:22 नवीन
त्याचं असंय भाऊसाहेब, तुम्हाला तुमच्या मोन्तेसरीपासूनच्या 'तुमच्या लेखी महत्त्वाच्या' सर्व घटना आठवत असतील. पण तुमच्या वयाच्या पाचव्या वर्षी तुमच्या वडीलांनी केलेले मोठे व्यवहार, घेतलेले कटू निर्णय, त्यांच्यासोबत झालेले प्रसंग, त्यांच्यासोबत व्यवहार केलेल्या लोकांची नावे, त्यांची पार्श्वभूमी, राहणीमानातले बदल, त्याची कारणे, सगळं एकदम डीट्टेलमदे तीस वर्षांनी आठवत असेल एवढी दिव्य स्मरणशक्तीचे, आकलनशक्तीचे वरदान देवाने तुम्हास दिले असेल. किंवा तुमच्या वडिलांनी तुम्हाला त्या वयातच त्यांनी घेतलेले निर्णय नीट समजावून सांगितले असतीलही... दुर्दैवाने हे सगळं माझ्यासोबत घडलं नाही. जेवढं आठवतं तेवढं वर लिहिलंय. डिट्टेलमधे रंगवून सांगायचं तर जरा जुन्या लोकांना भेटावं लागतं, त्या आठवणी जागवाव्या लागतात, ते दिवस परत जगून पहावे लागतात, काही प्रश्नांची उत्तरे शोधलेलीच नसतात (कारण गरज नसते) ती मिळवावी लागतात, काही कहान्या आपल्यासोबतच घडलेल्या पण आपल्यालाच माहित नसतात. असो. म्हणून म्हटलं लॉजिक साथ में रखो. और आगे पढते जाओ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी

लवकर येऊ द्या

चित्रगुप्त
Fri, 10/30/2015 - 01:28 नवीन
लवकर लिहा पुढचे भाग . आतुरता वाढली आहे .
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय, मला तरी चुकीच्या

शब्दबम्बाळ
Fri, 10/30/2015 - 02:12 नवीन
छान लिहिलंय, मला तरी चुकीच्या गोष्टींचे समर्थन करण्याचा उद्देश दिसला नाही लेखनात. मुंबईच्या बर्याच लोकांना घराची जागा डोळ्यात भरलेली दिसतेय! :D पण असो तुम्ही पुढे लिहा... शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

आपण आपला संयम सोडून एकही

असंका
Fri, 10/30/2015 - 19:45 नवीन
आपण आपला संयम सोडून एकही वावगा शब्द काढलेला नाही हे मान्यच करायला लागेल. त्याबद्दल आपलं अभिनंदन!! आजच्या आपल्या प्रतिसादांमुले लेखमालेबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. पुलेशु. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

सर्व सदस्यांचे पुनश्च आभार.

तर्राट जोकर
Tue, 01/26/2016 - 17:44 नवीन
सर्व सदस्यांचे पुनश्च आभार. पुढच्या भागाच्या तयारीला लागतो.
  • Log in or register to post comments

पुढच्या भागाच्या तयारीला लागतो.

होबासराव
Mon, 04/11/2016 - 15:05 नवीन
ये ना चॉलबे ! खरडवहित सुद्धा विनंति पाठवलि होति पुढिल भागा बद्दल ;)
  • Log in or register to post comments

अतिक्रमण केलेल्या जागेत लाईट

हेमंत लाटकर
Mon, 04/11/2016 - 23:48 नवीन
अतिक्रमण केलेल्या जागेत लाईट व पाणी विकून केलेल्याचुकीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न !
  • Log in or register to post comments

फुकटचे म्हणायचं राहिलं

ट्रेड मार्क
Tue, 04/12/2016 - 00:10 नवीन
लाटकर साहेब "फुकटचे" म्हणायचं राहिलं. त्यांनी तिथे फुकटची जागा वापरलीच परत फुकट मिळालेलं लाईट आणि पाणी विकून पैसे पण मिळवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

hold your horses, boys. there

तर्राट जोकर
Tue, 04/12/2016 - 00:24 नवीन
hold your horses, boys. there is a long way to go before we jump on conclusions.
  • Log in or register to post comments

छान पुढचा भाग आहे का ?

मराठी कथालेखक
Tue, 04/12/2016 - 11:13 नवीन
छान पुढचा भाग आहे का ?
  • Log in or register to post comments

झोपडपट्टीत राहणे ही मानसिकता

हेमंत लाटकर
Tue, 04/12/2016 - 15:04 नवीन
झोपडपट्टीत राहणे ही मानसिकता आहे ही समजूत चुकीची आहे. झोपडपट्टीतील शिकूण मोठ्या पदावर गेलेले कितीजण झोपडपट्टीत राहतात.
  • Log in or register to post comments

सुंदर लेखन व संयत प्रतिसाद

स्वधर्म
Tue, 04/12/2016 - 16:11 नवीन
तजो, पुढचा भाग लवकर टाका.
  • Log in or register to post comments

अतिक्रमित घर विकून दुसरे घर

हेमंत लाटकर
Tue, 04/12/2016 - 17:22 नवीन
अतिक्रमित घर विकून दुसरे घर विकत घेतले. छान !
  • Log in or register to post comments

तटस्थ लिखाण आवडले.

सोनुली
Fri, 04/15/2016 - 11:20 नवीन
तटस्थ लिखाण आवडले.
  • Log in or register to post comments

पुढला भाग?

निशांत_खाडे
Wed, 05/04/2016 - 01:49 नवीन
पुढला भाग?
  • Log in or register to post comments

पुढील भाग येण्यास उशीर होणार

आरोह
Wed, 05/04/2016 - 21:07 नवीन
प्रतिसाद बघता आता कहानी मी ट्विस्ट....थोडा वेळ लागेल आता...
  • Log in or register to post comments

असं का वाटलं तुम्हाला?

तर्राट जोकर
Wed, 05/04/2016 - 21:14 नवीन
असं का वाटलं तुम्हाला? टिकाकारांना घाबरुन सत्याची मोडतोड करेल असे वाटले का? वेळ लागण्याचे कारण मूड पाहिजे हे आहे. जे आहे ते मांडायला आधीही घाबरलो नाही आणि पुढेही घाबरणार नाही. स्वतःची लक्तरे वेशीवर टांगायला जिगर लागते. बिनकामाचे खोचक टोमणे मारायला लागत नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आरोह

जे आहे ते मांडायला आधीही

शलभ
Wed, 05/04/2016 - 21:58 नवीन
जे आहे ते मांडायला आधीही घाबरलो नाही आणि पुढेही घाबरणार नाही. स्वतःची लक्तरे वेशीवर टांगायला जिगर लागते.
+१ तुमच्यात ती जिगर आहे. मूड पाहिजे हे खरच आहे पण वांझ वादविवाद कमी केलेत तर मूड लवकर येईल लिहायचा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

हां ना राव. काही दिवस शांतपणे

तर्राट जोकर
Wed, 05/04/2016 - 22:17 नवीन
हां ना राव. काही दिवस शांतपणे बसायला लागेल बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ

:):):)

नाव आडनाव
Wed, 05/04/2016 - 22:21 नवीन
:):):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

स्वगत

ट्रेड मार्क
Wed, 05/04/2016 - 22:23 नवीन
अतिक्रमण केलेल्या जागेवर घर, त्याच्या मागे पूढे भरपूर मोकळी जागा, फुकट मिळालेले वीज आणि पाणी विकून पैश्याची कमाई. आयला याला लक्तरं म्हणतात होय? जाउदे उगाच मोठ्याने नको बोलायला उगाच खोचक टोमणे मारतो असा आरोप होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

स्वगतः

तर्राट जोकर
Wed, 05/04/2016 - 22:29 नवीन
मोकळ्या जागेमुळे बर्‍याच जणांच्या बुडाला आग लागलेली दिसतेय. जाउदे उगाच मोठ्याने बोलायला नको. राज्य येतं मग =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

थोडी सुधारणा

ट्रेड मार्क
Wed, 05/04/2016 - 22:48 नवीन
"फुकट" मिळालेल्या मोकळ्या जागेवरून - असे पाहिजे. राज्य तर तुमच्यावर आधीपासूनच आहे. हा धागा काढल्यापासून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

तुम्हाला कसं कळलं ही जागा

तर्राट जोकर
Wed, 05/04/2016 - 22:53 नवीन
तुम्हाला कसं कळलं ही जागा "फुकट" मिळाली ते? नको तिथे फार डोकं चालवायची गरज नाही ट्रेड मार्क. ऐकून घेतो म्हणून काहीही ऐकुन घेणार नाही. आधीच सांगितलंय पुढचे भाग येईस्तोवर दम धरा. तुमच्या असल्या प्रतिक्रियांनी तुमचंच पितळ उघडं पडतंय. आधीच लिहिलंय ह्या धाग्यावर > जो जसा आहे तशा प्रतिक्रिया देईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

शिरजोरी

ट्रेड मार्क
Wed, 05/04/2016 - 23:48 नवीन
अतिक्रमण केलेल्या सरकारी जागेचे तुम्ही पैसे दिले होते होय. हे नवीनच आहे. विकत घेतली होती का भाडं भरत होतात? कोणाला पैसे देत होतात ते? सरकारला का एखाद्या सरकारी नोकराला का तिथल्या गुंडाला? मी कुठे डोकं चालवायचं हे पण तुम्ही सांगणार का? एक तर सरकारी जमीन, वीज पाणी वापरलं वर त्यावर पैसेपण मिळवले आणि त्यावर मला धमकी पण देताय. घाबरलो बरं का मी. इतर धाग्यांवर प्रामाणिकपणाचा डंका पिटता. तुम्हीच वर म्हणलात जे आहे ते मान्य करतो. मग आता कशाला त्रास होतोय? पुढचे भाग येऊस्तोवर थांबू म्हणताय, तर थांबतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

स्कोअर सेटलिंग करण्यावर

तर्राट जोकर
Wed, 05/04/2016 - 23:55 नवीन
स्कोअर सेटलिंग करण्यावर तुम्ही उतरलात ह्यातंच काय ते आलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

यात कसलं स्कोअर सेटलिंग?

ट्रेड मार्क
गुरुवार, 05/05/2016 - 00:11 नवीन
मी स्कोअर कार्ड वापरत नाही त्यामुळे मी कोणाविरुद्ध किती स्कोअर केला आणि माझ्याविरुद्ध कोणी किती स्कोअर केला ह्याची पण नोंद ठेवत नाही. मी जरा जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो नक्की काय आहे ते. त्या दुसर्या धाग्यावर तुम्ही जेव्हा म्हणालात की देशाचे कुठल्याही प्रकारे नुकसान करणाऱ्याला शासन झाले पाहिजे तेव्हा तुमचा अभिमान वाटला होता समस्त मिपाकरांना (माझ्यासकट). पण इथे मात्र जे तुम्ही सांगताय ते देशाचे नुकसान कसे नाही ह्याची संगती लावण्याचा प्रयत्न करत होतो. पण जर का तुम्हाला अडचणीचे वाटत असेल तर राहुदे. पुढच्या लेखांमधून मी समजून घ्यायचा प्रयत्न करीन. त्यावर काही प्रश्न उद्भवले तर विचारायला हरकत नसावी तुमची अशी अशा करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

नको साळसूदपणाचा आव आणायला.

तर्राट जोकर
गुरुवार, 05/05/2016 - 00:26 नवीन
नको साळसूदपणाचा आव आणायला. गरज नाही त्याची. जे अजून पुढे यायचे आहे त्याचे अंदाज लावणे त्याचीही आवश्यकता नाही. आले की समजेलच. तसेच टोनही कळतो तुमच्या प्रतिसादांचा. तुम्ही आधीच्या प्रतिसादात जे प्रश्न विचारलेत त्याबद्दल तर मी कित्येक महिने आधीच्या प्रतिसादात लिहिले आहेच. इथे तुम्ही जाब विचारल्यासारखे प्रश्न मांडत आहात, ज्याची तुम्हाला काय गरज आहे तुमचं तुम्हाला माहिती. बाकी मला काही अडचणीचे आहे किंवा नाही हे तुम्हीच परस्पर कसे ठरवता? गंमत आहे बॉ. शहाजोगपणा कळतो हो. वेड पांघरुन पेडगावला जाणारे छप्पन पाहिलेत. नवल नाही वाटत आजकाल. आधीच्या प्रतिसादांमधे कैक वेळा लिहिले आहे. की पुढच्या भागांमधे डिटेल्स येतील. तरी तेच तेच खोचकपणे विचारणे ह्यात तुमचाच स्वभाव दिसत आहे. दुसरे असे की, ज्या उद्देशाने ही लेखमाला लिहायला घेतली तो उद्देश इतका गढुळ करुन टाकलाय आता लोकांनी की बास रे बास. सगळे त्या मोकळ्या जागेभोवती घिरट्या घालत आहेत. असो. जैसी जिसकी सोच. "शांतता कोर्ट चालू आहे" ची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

जाउदे

ट्रेड मार्क
गुरुवार, 05/05/2016 - 01:53 नवीन
याच लेखातील कितीतरी प्रतिसाद तुमच्या उत्तरांच्या प्रतीक्षेत पडून आहेत गेले ६ महिने. जास्त प्रश्न विचारत नाही उगाच पुढचा भाग उशिरा टाकण्याबद्दल मला दोषी धरलं जाईल. मी तुम्हाला हे प्रश्न अडचणीचे आहेत असं विधान अजिबात केलं नाही. मी म्हणतोय की तुम्हाला अडचणीचे वाटत असेल तर राहू दे. नसेल वाटत तर उत्तर दिलेत तरी चालेल. थोडक्यात तुमच्यावर आहे. पुढे काय असेल याचा अंदाज लावायला पण बंदी करताय तुम्ही आता. कमाल आहे. थोडे स्पष्टीकरण
दुसरे असे की, ज्या उद्देशाने ही लेखमाला लिहायला घेतली तो उद्देश इतका गढुळ करुन टाकलाय आता लोकांनी की बास रे बास. सगळे त्या मोकळ्या जागेभोवती घिरट्या घालत आहेत. असो. जैसी जिसकी सोच.
आता कुठलंही पांघरून न घेता सरळ सांगतो. झोपडपट्टी म्हणलं की बहुतेक वाचकांच्या डोळ्यासमोर मुंबईतील बकाल झोपडपट्टी येते. ज्यात फार तर ५०-१०० फूट जागा (जरा जास्तच सांगतोय का?), पाणी नाही, विजेचं चोरून कनेक्शन, उघडी गटारं, घाण वास, रात्रीचे विविध उद्योग, गुंडागर्दी या गोष्टी येतात. तुमच्या लेखात काही वाक्य अशी आहेत की ज्यावरून परिस्थिती एकदम विरुद्ध आहे असं वाटतंय. हजार बाराशे चौ फूट मध्ये झोपडी, ती सुद्धा चांगलं बांधकाम असलेली, हे माझ्यासारखा मुंबईत राहिलेला मनुष्य कल्पनेत सुद्धा आणू शकत नाही. इतर काही वाक्यांमुळे वाटतं की दुसरीकडे राहणे शक्य असून तुम्ही इथे रहायचात कारण जागा(?) वीज पाणी ई गोष्टी फुकट होत्या. विदा. १. खटपट करून वीज कनेक्शन व गॅस सिलेंडर कनेक्शन मिळवलं. थोडे पैसे घालून दारात बोअर मारून, हातपंप वाली कमनीय बांधा असलेली हिरवी जलदेवता उभी केली. २. एकदा तर सगली वायरींग जळली. तो धंदा आम्ही बंद केला. ३. परिस्थिती फिरते. जिथे फुले वेचली तिथे गोवर्‍याही वेचायची वेळ आमच्यावरही आलीच. ४. आम्ही त्याठिकाणी राहिलो उणीपुरी १२ वर्षे. घर, आणि परिस्थिती मोडकळीस आली. ई ई. असो.ही माझी समजूत झाली आणि कदाचित इतरही काही सदस्यांचीपण (प्रतिसादांवरून तसं वाटतंय). चुकीचीही असेल. परिस्थिती कोणाची कशी असते हे सांगता येत नाही. तुमचा लिहिण्याचा उद्देश मला वाटला तसा नक्कीच नसावा. वर एके ठिकाणी म्हणल्याप्रमाणे आमच्या चाळीखालीच झोपडपट्टी होती. तेथील लोकांनी केलेली वीज चोरी, पाणी चोरी, रात्रीचे उद्योग ई मुळे झालेले त्रास आठवले. बाकी काही नाही. जैसी जिसकी सोच हे खरंच आहे. पण तुम्ही लिहित रहा. पुलेशु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

हम्म्म्म, धन्यवाद.

तर्राट जोकर
गुरुवार, 05/05/2016 - 02:07 नवीन
हम्म्म्म, धन्यवाद. ही मुंबईतली झोपडपट्टी नाही हे स्पष्ट केलंय आधीच. "हजार बाराशे फूट जागा" वाचून हाडाच्या मुंबईकरांची चलबिचल झाली हे माहित आहे. त्याबद्दलही प्रतिसादांमधे नीट विवेचन केलंय. आता इतके प्रतिसाद दिलेले की मी परत तुम्हाला त्या सगळ्यांची लिंक नाही देऊ शकत. जमत असेल तर वाचून घ्या. आणि खरंच प्रश्न विचारायचे थांबाल तर पुढच्या कथनाचा योग्य आस्वाद घेता येईल. अंदाज बांधून उपयोग नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

तजो भाय

ईश्वरसर्वसाक्षी
Wed, 05/04/2016 - 21:21 नवीन
उनकु छोडो मिया...हम लोगा कबसे किरकिरि कर्रेले है यारो कब लिखोगे २ रा भाग.
  • Log in or register to post comments

आयेगा जल्दी. इष्टार्ट करता

तर्राट जोकर
Wed, 05/04/2016 - 21:27 नवीन
आयेगा जल्दी. इष्टार्ट करता अबी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश्वरसर्वसाक्षी

माझ्या मते जेव्हा जमिनीचे भाव

वैभव जाधव
गुरुवार, 05/05/2016 - 02:02 नवीन
माझ्या मते जेव्हा जमिनीचे भाव अगदी च बाद होते, लोक जाताजाता एखाद्या ला दोन खोल्या राहायला द्यायचे तेव्हाच्या काळात अनधिकृत वस्त्या हळू हळू उभ्या होणं हे सामान्य होतं. पारशी लोकांचे दक्षिण मुंबई मधले बंगले असो, राव रेड्डी लोकांच्या आंध्रा मधल्या जमिनी असोत, अनेक पाटलांच्या पच्चिम महाराष्ट्रातल्या जमिनी असोत किंवा कोकणातल्या अनेक वाड्या असोत, एकतर कवडी मोलानं , काही कर्ज आणि त्यावर चं भरमसाट व्याज किंवा 'तशाच' घेतल्या गेल्या आहेत. त्यामुळं 'आतातरी' कलकलाट न करता तर्राट जोकर ने फुडची चाल खेळावी ही णम्र ईनंती ह्याठिकानी मी करीत आहे. (न खेळल्यास होनाऱ्या परीनामांना आणि दिल्या जानाऱ्या श्या ना आमी जबाबदार नाही!)
  • Log in or register to post comments

=)) =))

तर्राट जोकर
गुरुवार, 05/05/2016 - 02:08 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव जाधव

નિપક્ષ લેખ

लालगरूड
Fri, 05/06/2016 - 18:35 नवीन
નિપક્ષ લેખ
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा