Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मार्गी on Wed, 10/21/2015 - 14:09
लेखनविषय (Tags)
जीवनमान
तंत्र
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
आस्वाद
से ह वा ग! वीरेंदर सेहवाग! खराखुरा वीरोत्तम! क्रिकेटशी परिचित असलेल्यांना सेहवागबद्दल काहीही सांगायची गरज नाही. पण इथे सेहवाग एक क्रिकेटर म्हणून नव्हे तर एक अभिव्यक्ती म्हणून विचार करूया. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून त्रिशतक करणारा एकमेव फलंदाज (तेही दोन त्रिशतके!); अत्यंत जलद गतीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये फलंदाजी करणारा आणि आश्चर्यकारक प्रकारे सातत्य दाखवणारा (२००९- १० मध्ये शिखरावर असताना ५४ ही कसोटी सरासरी सलामीवीर म्हणून) आणि सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, गांगुली, लक्ष्मण अशा ता-यांच्या समोरही स्वत:चा वेगळा प्रभाव निर्माण करणारा असा हा वीरू! सेहवाग हा खरोखर मूळ स्वभावाचा फलंदाज आहे (Indigenous). ज्याप्रमाणे महाभारतात कृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं, की हा पाहा सूर्य आणि हा जयद्रथ; त्याच प्रकारे सेहवाग फक्त ही बॅट, हा बॉल आणि ही सीमारेषा इतकंच बघायचा! सेहवाग केवळ गुणवान फलंदाज म्हणून किंवा काही अजरामर खेळ्या केलेला विक्रमवीर म्हणूनच महान नाहीय. सेहवाग ही खरं तर एक विचारधारा आहे. त्याचं मन नेहमी अखंड- uncluttered ठेवून तो खेळायचा. अगदी स्वत:च्या शैलीमध्ये खेळत जायचा. पिच, मॅचची स्थिती, अन्य घटक हे त्याला दिसायचेच नाहीत. त्या बाबतीत तर तो जराही न डगमगणारा होता. १९५ वर असताना सिक्स मारून आऊट झाल्यावरही त्याच्या चेह-यावरचं हसू कायमच! आणि गंमत म्हणजे त्याने पहिलं त्रिशतकही २९५ वरून सिक्स मारूनच पूर्ण केलं. ही जिद्द, ही विजिगिषू वृत्ती! स्वत:वर इतका प्रचंड आत्मविश्वास! अर्थात प्रचंड आत्मविश्वासासोबत अंगाशी येणारी अवास्तव जिद्दही असतेच. सिक्स मारायचा म्हंटला की अनेक वेळेस सीमारेषेवर झेलबाद होणं ही अपरिहार्यता बनते. पण सेहवाग स्वत:च्या शैलीवर नेहमी ठाम राहिला आणि खेळावर विलक्षण परिणाम करून गेला. सेहवाग हे एक प्रतिक आहे- सिस्टीमच्या विरुद्ध जाणा-यांचं. सेहवागवर नेहमी टीका व्हायची की, त्याला फूटवर्क नाही; तो पाय हलवत नाही; तो शास्त्रशुद्ध खेळू शकत नाही इ. इ. ही वस्तुस्थिती‌ होती. पण त्यामुळे फरक काय पडला? काहीही नाही. इथे एक वेगळा मुद्दा येतो. आपण कशाला जास्त महत्त्व द्यायचं- जे पुस्तकी पद्धतीने खेळतात; तंत्रशुद्ध- निर्दोष प्रकारे खेळतात त्यांच्या खेळाला की, जे चाकोरीबाहेर आहेत, पण जे अधिक प्रभावी खेळतात- जे अधिक परिणामकारक ठरतात आणि एक सकारात्मक प्रेरणा देऊन जातात- त्यांना? अगदी क्वचित वेळेस सेहवागने पुस्तकी पद्धतीनेही खेळ्या केल्या आहेत. एडलेटमध्ये १५१ रन्स केले ती खेळी अगदी असेहवाग पद्धतीची होती! पण मुळात तो एक इंपॅक्ट प्लेअर आहे नव्हे होता; एक विस्फोटक प्लेअर होता. आणि तो नेहमी वीरू म्हणूनच राहिला. अगदी निवृत्तीची घोषणा करतानाही त्याने स्वत:ची शैली सोडली नाही- 'मला सल्ले देणा-यांचे विशेष आभार मानतो आणि माफीही मागतो, कारण मी ते सल्ले कधीच ऐकले नाहीत; माझी पद्धत दुसरी होती.; म्हणून सेहवाग एक स्वपथगामी आहे- स्वत:च्या विचारांनी जगणा-यांचं उदाहरण आहे. परिस्थिती कितीही विपरित असो; त्याच्यावर त्याचा परिणाम व्हायचा नाही. आज सगळं जग स्टिरिओटाईपिंगच्या मार्गावर आहे. लोक आज म्हणतात की, यशस्वी व्हायचं असेल तर हे हे करावं लागेल; अमुक अमुक कोर्स करावे लागतील; अशा परीक्षा द्याव्या लागतील; असे क्लासेस द्यावे लागतील इ. इ. पण सेहवाग आपल्याला अशा मानसिकतेमधून बाहेर जाण्याचा मार्ग दाखवतो. प्रत्येकामध्ये कमतरता असतातच. सेहवागमध्ये असंख्य तांत्रिक त्रुटी होत्याच. पण तरीही त्याने जिद्दीने मोठ्या खेळ्या उभ्या केल्या. लोक त्याला नेहमी सांगायचे की, तुझं तंत्र तू सुधार. पण त्याने त्याच्यावर लक्ष देण्यापेक्षा त्याच्या जमेच्या बाजूंकडेच लक्ष दिलं. हँड आय कोऑर्डीनेशन- सटिक नजर- फटके मारण्याची शक्ती आणि जिद्द ह्यावर लक्ष दिलं आणि तो यशस्वी झाला! असा हा वीरू आपल्याला स्वत:च्या मार्गावर जाण्याची प्रेरणा देतो. जसा क्रिकेटमध्ये सेहवाग आहे- नव्हे होता- त्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये सेहवागसारख्या लोकांची अत्यंत आवश्यकता आहे. सगळे लोक एकाच सिस्टीममध्ये जात राहिले तर त्यातली मजा जाते. सौंदर्य जातं. त्याउलट स्वत:च्या पद्धतीने काही करण्यात खूप जास्त समाधान मिळतं. सेहवाग त्यासाठीचा आदर्श प्रेरणास्रोत आहे. करिअरचं दडपण; भविष्यातल्या अपेक्षांचं ओझं, निराशा अशा गर्तेत अडकलेल्या तरुणाईला किंबहुना प्रत्येकाला सेहवागची खेळी प्रेरणा देऊन जाते. रिक्वायर्ड रन रेट कितीही असो; सेहवाग आहे ना; मग काही चिंता नाही. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात वीरूसारख्या लोकांची गरज आहे. संपूर्ण करिअरमध्ये त्याच्या तांत्रिक दोषांमुळे त्याच्यावर टीका करणारे टीकाकार आज त्याचं कौतुक करत आहेत. मॉडर्न विव्ह रिचर्डस; क्रिकेटमधला द लास्ट समुराई; क्रिकेटमधला आधुनिक झेन मास्टर अशा शब्दांत त्याचं कौतुक करत आहेत. कारण त्याचं कर्तृत्वही तितकंच आहे. सचिनसारखा तेजोनिधी समोर असताना जिथे द्रविडही झाकोळला; तिथे सेहवागने त्याचा ठसा निर्माण केला. आकाश चोप्राने म्हंटल्याप्रमाणे आधुनिक कसोटी क्रिकेटच्या सलामी फलंदाजीसंदर्भात बीफोर सेहवाग आणि आफ्टर सेहवाग असा फरक पुढे करावा लागेल! सचिन, द्रविड, लक्ष्मण आणि आता झहीरनंतर सेहवागने घेतलेली निवृत्ती! सचिन निवृत्त झाला तेव्हा बालपण संपलं असं क्षणात जाणवलं. सेहवाग निवृत्त होतोय म्हणजे तारुण्याचे दिवस संपले, असं वाटतंय आता! एक पोकळी. एक शून्यता! आपण ज्यांच्यासोबत जीवनातले अविस्मरणीय क्षण शेअर केलेले असतात, त्यांच्या जाण्याने एक पोकळी तर जाणवतेच; पण त्यात एक संधीही असते- त्या मार्गावर- त्या दिशेने स्वत:चा शोध घेण्याची. . .
  • Log in or register to post comments
  • 5682 views

प्रतिक्रिया

Submitted by वेल्लाभट on Wed, 10/21/2015 - 14:24

Permalink

उत्तम लेख झालाय....

उत्तम लेख झालाय.... येस. ही इज नॉट जस्ट अ क्रिकेटर; ही इज अ‍ॅन अनशेकेबल अ‍ॅटिट्यूड.
अगदी निवृत्तीची घोषणा करतानाही त्याने स्वत:ची शैली सोडली नाही- 'मला सल्ले देणा-यांचे विशेष आभार मानतो आणि माफीही मागतो, कारण मी ते सल्ले कधीच ऐकले नाहीत; माझी पद्धत दुसरी होती.;
कडक! धिस सम्स हिम अप आय बिलीव्ह. पण आहे; नव्हे होता... हे वारंवार आलेलं पद खटकलं. होता; नव्हे आहे, आणि राहीलच. असं हवं.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 10/21/2015 - 14:39

Permalink

उत्तम लेख! सेहवागच्या

उत्तम लेख! सेहवागच्या निवृत्तीमुळे निराश झालोय. अजून काही काळ तरी त्याची तडाखेबंद फलंदाजी बघायची इच्छा होती.
  • Log in or register to post comments

Submitted by जगप्रवासी on Wed, 10/21/2015 - 14:57

Permalink

उत्तम लेख

सर्व फलंदाज सेट झाले की सिक्सर मारतात हा आधी सिक्सर मारायचा मग सेट व्हायचा. भारताची फलंदाजी असेल तर पहिल्या बॉलवर सिक्स किंवा फोर मारणारा फक्त सेहवाग. न्यूझीलंड सिरीज मध्ये पहिल्या ओवरमध्ये त्याने लागोपाठ ३ सिक्स मारले होते. विल मिस्ड यु लॉट.
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on Wed, 10/21/2015 - 16:15

Permalink

केवळ हँड-आय कॉर्डीनेशनवर अचाट

केवळ हँड-आय कॉर्डीनेशनवर अचाट खेळ करणारा खेळाडु सेहवागसारख्या फलंदाजाची उणीव आता चांगलीच जाणवत आहे. सेहवागला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 10/21/2015 - 16:22

Permalink

मस्त...

समयोचित लेख.... आवडला....
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 10/21/2015 - 16:58

Permalink

सेहवागची अजून एक आठवण म्हणजे

सेहवागची अजून एक आठवण म्हणजे २०११ मधील विश्वचषकात प्राथमिक फेरीतील ६ सामन्यांपैकी पहिल्या ५ सामन्यात भारताची फलंदाजी सुरू झाल्यावर सेहवागने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला होता. उपांत्य फेरीतही पाकड्यांच्या उमर गुलच्या दुसर्‍याच षटकात त्याने ५ चौकार मारल्याने उमर गुलची गोलंदाजी थांबविली होती.
  • Log in or register to post comments

Submitted by याॅर्कर on Wed, 10/21/2015 - 17:08

Permalink

दोन त्रिशतकी खेळ्या

आणि एक 291 धावांची खेळी म्हणजे जरा कमी तीन त्रिशतकेच म्हणायची कि! शिवाय काही द्विशतकी खेळ्या ह्या आहेतच(टेस्टमध्ये) आणि वनडे मध्ये एक द्विशतक. सचिनपेक्षा सेहवागला फार घाबरत असत,विशेषकरून पाकिस्तानची टीम!
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Wed, 10/21/2015 - 18:15

In reply to दोन त्रिशतकी खेळ्या by याॅर्कर

Permalink

सचिन म्हणजे डोळ्यासमोर येतो

सचिन म्हणजे डोळ्यासमोर येतो तो एखादा स्नायपर. वेळ घेऊन ट्रिगर ओढणारा आणि अचूक वेध घेणारा. सेहवाग म्हणजे डोळ्यासमोर येतो तो आर्नॉल्ड. एकेका हातात एक एक मशीनगन घेऊन सरळ समोर येणारा.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 10/21/2015 - 18:19

In reply to सचिन म्हणजे डोळ्यासमोर येतो by वेल्लाभट

Permalink

सचिन म्हणजे डोळ्यासमोर येतो तो एखादा स्नायपर. ...+ १

सेहवाग म्हणजे डोळ्यासमोर येते ती बझूका......
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 10/21/2015 - 19:07

Permalink

जबरदस्त फ़लंदाज.

जबरदस्त फ़लंदाज. बिग फ़ाईव्ह मधला शेवटचा आता खऱ्या अर्थाने निवृत्त.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Wed, 10/21/2015 - 19:50

Permalink

कर्टन आॅन क्लास आॅफ २०००

ही जी महापराक्रमी बॅच होती - सचिन, दादा, द्रविड, लक्ष्मण आणि सेहवाग - त्यांच्यातला शेवटचा सेहवाग. ज्यांच्याबद्दल गोलंदाजांना भीती वाटायची अशांपैकी एक.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Fri, 10/23/2015 - 09:52

In reply to कर्टन आॅन क्लास आॅफ २००० by बोका-ए-आझम

Permalink

+१

आम्ही भाग्यवान यांना खेळताना पाहू शकलो. आता टी २० च्या रेट्यात कितीसे कसोटी आणि एक दिवसीय क्रिकेट शिल्लक राहील तेच माहीत नाही.आणि खेळाडूंच्या दिर्घ सातत्याबद्दलही साशंकता आहेच. सेहवाघचा ही पंखा नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by चाणक्य on Wed, 10/21/2015 - 20:36

Permalink

+१

उत्तम लेख.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Wed, 10/21/2015 - 20:41

Permalink

वीरू

आवडत्या क्रिकेटरांपैकी एक! बेबाक, दबंग खेळाडू! स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Wed, 10/21/2015 - 20:47

Permalink

वेगळा

मी 1966 पासून क्रिकेटच्या प्रेमात आहे अनेक खेळताना पाहिले पण इतका फ़्लूएंट स्ट्रोक मेकर मी तरी पाहिलेला नाही .मला आशा होती तो परत येईल पण असो .वीरू वी विल मिस यू !
  • Log in or register to post comments

Submitted by अवतार on Wed, 10/21/2015 - 21:07

Permalink

उत्तम लेख

मनातील सर्व भावना तंतोतंत उतरल्या. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by मित्रहो on Wed, 10/21/2015 - 22:29

Permalink

सेहवाग

हा सेहवाग होता आणि तो तसाच राहीला. स्वतःच्या नियमाने चालनारा. खरे सांगायचे तर दोन पैशे मिळतात म्हणून काहीही बरळनाऱ्यांचे ऐकायची गरज नाही. तसेही क्रिकेट हा धावा आणि विकेटचा खेळ आहे. तंत्र वगरे साधने आहेत साध्य नव्हे. विकेट पडली म्हणून स्लो खेळायला कोणी सांगितले. शेवटी सेहवाग ही प्रवृत्ती आहे फक्त व्यक्ती नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 10/22/2015 - 00:16

Permalink

का कुणास ठाऊक पण फारसा आवडला

का कुणास ठाऊक पण फारसा आवडला नाही कधी. भरवशाचा वाटला च नाही कधी. आहे तोवर आहे नाहीतर गेला. खेळायला वाघ पण. मुलतान का सुलतान. सुरुवातीला सचिन खेळतोय की काय असं वाटण्या इतपत स्टान्स सारखा. सचिनचं सौम्य सभ्य शांत रूपडं नि हा त्या तुलनेत कुठंच न रूचण्या सारखा. सचिनमुळं क्रिकेट टीम मध्ये दाखल होण्याची स्वप्नं बघितलेला हा दिल्ली का हरयाणा मधला पहाटे पासून क्रिकेट खेळायला धावपळ करायचा म्हणे. नंतर लग्नानन्तर केसांबरोबर ज़रा फॉर्म गेल्यासारखा झाला. नंतर तो आयपीएल नामक तमाशा सुरु झाल्यावर क्रिकेट मधून मन च उडालंय. आवडत नसला फारसा तरी स्मरणात नक्की राहील तो या त्रिशतकी खेळयांमुळे, याबरोबर 2003 च्या फाइनल मध्ये एकटाच बऱ्यापैकी लढलेला म्हणून देखील. एन्जॉय रिटायर लाइफ वीरू!
  • Log in or register to post comments

Submitted by द-बाहुबली on गुरुवार, 10/22/2015 - 11:26

In reply to का कुणास ठाऊक पण फारसा आवडला by प्यारे१

Permalink

हेच बोल्तो.

  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on गुरुवार, 10/22/2015 - 03:15

Permalink

लेख आवडला. मस्त जमलाय!

लेख आवडला. मस्त जमलाय!
  • Log in or register to post comments

Submitted by फारएन्ड on गुरुवार, 10/22/2015 - 03:32

Permalink

सुंदर!

सुंदर लिहीले आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 10/22/2015 - 06:35

Permalink

छान लिहिलं आहे.

विरुसारखा स्फोटक फलंदाज आता नजिकच्या भविष्यात भारताकडून बघायला मिळेल असे वाटत नाही. "गोलंदाजी ही फोडून काढण्यासाठीच असते" या मंत्राचा इतका सढळ बॅटने वापर क्वचितच दिसतो. त्याच्या ह्या उत्स्फूर्त खेळीमुळे सहाजिकच एक बेभरवशाची धाकधूक सतत मनात असायची की हा कधी औट होतोय पण ती नाण्याची दुसरी अपरिहार्य बाजूच! गुडलक वीरु, वी विल मिस यू!! :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 10/22/2015 - 07:38

Permalink

मस्त लेख...

मस्त लेख... मला वाटतं एकदा मी मॅच पाहत होतो... त्यावेळी रिलायन्स इंडिया मोबाइलची जाहिरात फार लागायची. सेहवाग की मां का फोन ही जाहिरात प्रचंड जोरात चालायची. ही जाहिरात संपली आणि सेहवाग आऊट झाला. मी वैतागलो... म्हणालो खरचं फोन आलेला दिसतोय ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राम गुण बे लडी रे... :- Pandit Madhup Mudgal
  • Log in or register to post comments

Submitted by मार्गी on गुरुवार, 10/22/2015 - 12:58

Permalink

सर्वांना धन्यवाद!

वा! मस्त चर्चा रंगली आहे! सेहवागवर छान लेख येत आहेत सध्या. एका लेखात त्याच्या कोचांनी म्हंटलं आहे, 'सेहवागने फोर मारला तर मी त्याला विचारायचो सिक्स का मारला नाही? मग तो ग्राउंड बाहेरच्या इमारतीचे मजले टारगेट करायचा. For him, it was not matter of converting ones into twos, but fours into sixes! मी एकच गोष्ट केली की मी त्याच्या मूळ स्वभावाला अजिबात बाधा येऊ दिली नाही.' अजून काही आठवणी- किस्से असतील तर जरूर शेअर करावेत! :)
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Fri, 10/23/2015 - 11:46

Permalink

(No subject)

Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com