से ह वा ग!
से ह वा ग!
वीरेंदर सेहवाग! खराखुरा वीरोत्तम! क्रिकेटशी परिचित असलेल्यांना सेहवागबद्दल काहीही सांगायची गरज नाही. पण इथे सेहवाग एक क्रिकेटर म्हणून नव्हे तर एक अभिव्यक्ती म्हणून विचार करूया. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून त्रिशतक करणारा एकमेव फलंदाज (तेही दोन त्रिशतके!); अत्यंत जलद गतीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये फलंदाजी करणारा आणि आश्चर्यकारक प्रकारे सातत्य दाखवणारा (२००९- १० मध्ये शिखरावर असताना ५४ ही कसोटी सरासरी सलामीवीर म्हणून) आणि सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, गांगुली, लक्ष्मण अशा ता-यांच्या समोरही स्वत:चा वेगळा प्रभाव निर्माण करणारा असा हा वीरू! सेहवाग हा खरोखर मूळ स्वभावाचा फलंदाज आहे (Indigenous). ज्याप्रमाणे महाभारतात कृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं, की हा पाहा सूर्य आणि हा जयद्रथ; त्याच प्रकारे सेहवाग फक्त ही बॅट, हा बॉल आणि ही सीमारेषा इतकंच बघायचा!
सेहवाग केवळ गुणवान फलंदाज म्हणून किंवा काही अजरामर खेळ्या केलेला विक्रमवीर म्हणूनच महान नाहीय. सेहवाग ही खरं तर एक विचारधारा आहे. त्याचं मन नेहमी अखंड- uncluttered ठेवून तो खेळायचा. अगदी स्वत:च्या शैलीमध्ये खेळत जायचा. पिच, मॅचची स्थिती, अन्य घटक हे त्याला दिसायचेच नाहीत. त्या बाबतीत तर तो जराही न डगमगणारा होता. १९५ वर असताना सिक्स मारून आऊट झाल्यावरही त्याच्या चेह-यावरचं हसू कायमच! आणि गंमत म्हणजे त्याने पहिलं त्रिशतकही २९५ वरून सिक्स मारूनच पूर्ण केलं. ही जिद्द, ही विजिगिषू वृत्ती! स्वत:वर इतका प्रचंड आत्मविश्वास! अर्थात प्रचंड आत्मविश्वासासोबत अंगाशी येणारी अवास्तव जिद्दही असतेच. सिक्स मारायचा म्हंटला की अनेक वेळेस सीमारेषेवर झेलबाद होणं ही अपरिहार्यता बनते. पण सेहवाग स्वत:च्या शैलीवर नेहमी ठाम राहिला आणि खेळावर विलक्षण परिणाम करून गेला.
सेहवाग हे एक प्रतिक आहे- सिस्टीमच्या विरुद्ध जाणा-यांचं. सेहवागवर नेहमी टीका व्हायची की, त्याला फूटवर्क नाही; तो पाय हलवत नाही; तो शास्त्रशुद्ध खेळू शकत नाही इ. इ. ही वस्तुस्थिती होती. पण त्यामुळे फरक काय पडला? काहीही नाही. इथे एक वेगळा मुद्दा येतो. आपण कशाला जास्त महत्त्व द्यायचं- जे पुस्तकी पद्धतीने खेळतात; तंत्रशुद्ध- निर्दोष प्रकारे खेळतात त्यांच्या खेळाला की, जे चाकोरीबाहेर आहेत, पण जे अधिक प्रभावी खेळतात- जे अधिक परिणामकारक ठरतात आणि एक सकारात्मक प्रेरणा देऊन जातात- त्यांना? अगदी क्वचित वेळेस सेहवागने पुस्तकी पद्धतीनेही खेळ्या केल्या आहेत. एडलेटमध्ये १५१ रन्स केले ती खेळी अगदी असेहवाग पद्धतीची होती! पण मुळात तो एक इंपॅक्ट प्लेअर आहे नव्हे होता; एक विस्फोटक प्लेअर होता. आणि तो नेहमी वीरू म्हणूनच राहिला. अगदी निवृत्तीची घोषणा करतानाही त्याने स्वत:ची शैली सोडली नाही- 'मला सल्ले देणा-यांचे विशेष आभार मानतो आणि माफीही मागतो, कारण मी ते सल्ले कधीच ऐकले नाहीत; माझी पद्धत दुसरी होती.;
म्हणून सेहवाग एक स्वपथगामी आहे- स्वत:च्या विचारांनी जगणा-यांचं उदाहरण आहे. परिस्थिती कितीही विपरित असो; त्याच्यावर त्याचा परिणाम व्हायचा नाही. आज सगळं जग स्टिरिओटाईपिंगच्या मार्गावर आहे. लोक आज म्हणतात की, यशस्वी व्हायचं असेल तर हे हे करावं लागेल; अमुक अमुक कोर्स करावे लागतील; अशा परीक्षा द्याव्या लागतील; असे क्लासेस द्यावे लागतील इ. इ. पण सेहवाग आपल्याला अशा मानसिकतेमधून बाहेर जाण्याचा मार्ग दाखवतो. प्रत्येकामध्ये कमतरता असतातच. सेहवागमध्ये असंख्य तांत्रिक त्रुटी होत्याच. पण तरीही त्याने जिद्दीने मोठ्या खेळ्या उभ्या केल्या. लोक त्याला नेहमी सांगायचे की, तुझं तंत्र तू सुधार. पण त्याने त्याच्यावर लक्ष देण्यापेक्षा त्याच्या जमेच्या बाजूंकडेच लक्ष दिलं. हँड आय कोऑर्डीनेशन- सटिक नजर- फटके मारण्याची शक्ती आणि जिद्द ह्यावर लक्ष दिलं आणि तो यशस्वी झाला! असा हा वीरू आपल्याला स्वत:च्या मार्गावर जाण्याची प्रेरणा देतो.
जसा क्रिकेटमध्ये सेहवाग आहे- नव्हे होता- त्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये सेहवागसारख्या लोकांची अत्यंत आवश्यकता आहे. सगळे लोक एकाच सिस्टीममध्ये जात राहिले तर त्यातली मजा जाते. सौंदर्य जातं. त्याउलट स्वत:च्या पद्धतीने काही करण्यात खूप जास्त समाधान मिळतं. सेहवाग त्यासाठीचा आदर्श प्रेरणास्रोत आहे. करिअरचं दडपण; भविष्यातल्या अपेक्षांचं ओझं, निराशा अशा गर्तेत अडकलेल्या तरुणाईला किंबहुना प्रत्येकाला सेहवागची खेळी प्रेरणा देऊन जाते. रिक्वायर्ड रन रेट कितीही असो; सेहवाग आहे ना; मग काही चिंता नाही. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात वीरूसारख्या लोकांची गरज आहे.
संपूर्ण करिअरमध्ये त्याच्या तांत्रिक दोषांमुळे त्याच्यावर टीका करणारे टीकाकार आज त्याचं कौतुक करत आहेत. मॉडर्न विव्ह रिचर्डस; क्रिकेटमधला द लास्ट समुराई; क्रिकेटमधला आधुनिक झेन मास्टर अशा शब्दांत त्याचं कौतुक करत आहेत. कारण त्याचं कर्तृत्वही तितकंच आहे. सचिनसारखा तेजोनिधी समोर असताना जिथे द्रविडही झाकोळला; तिथे सेहवागने त्याचा ठसा निर्माण केला. आकाश चोप्राने म्हंटल्याप्रमाणे आधुनिक कसोटी क्रिकेटच्या सलामी फलंदाजीसंदर्भात बीफोर सेहवाग आणि आफ्टर सेहवाग असा फरक पुढे करावा लागेल!
सचिन, द्रविड, लक्ष्मण आणि आता झहीरनंतर सेहवागने घेतलेली निवृत्ती! सचिन निवृत्त झाला तेव्हा बालपण संपलं असं क्षणात जाणवलं. सेहवाग निवृत्त होतोय म्हणजे तारुण्याचे दिवस संपले, असं वाटतंय आता! एक पोकळी. एक शून्यता! आपण ज्यांच्यासोबत जीवनातले अविस्मरणीय क्षण शेअर केलेले असतात, त्यांच्या जाण्याने एक पोकळी तर जाणवतेच; पण त्यात एक संधीही असते- त्या मार्गावर- त्या दिशेने स्वत:चा शोध घेण्याची. . .
प्रतिक्रिया
उत्तम लेख झालाय....
उत्तम लेख! सेहवागच्या
उत्तम लेख
केवळ हँड-आय कॉर्डीनेशनवर अचाट
मस्त...
सेहवागची अजून एक आठवण म्हणजे
दोन त्रिशतकी खेळ्या
सचिन म्हणजे डोळ्यासमोर येतो
सचिन म्हणजे डोळ्यासमोर येतो तो एखादा स्नायपर. ...+ १
जबरदस्त फ़लंदाज.
कर्टन आॅन क्लास आॅफ २०००
+१
+१
वीरू
वेगळा
उत्तम लेख
सेहवाग
का कुणास ठाऊक पण फारसा आवडला
हेच बोल्तो.
लेख आवडला. मस्त जमलाय!
सुंदर!
छान लिहिलं आहे.
मस्त लेख...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राम गुण बे लडी रे... :- Pandit Madhup Mudgalसर्वांना धन्यवाद!
(No subject)