✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक होतं गाव .....

प
प्राची अश्विनी यांनी
Fri, 10/16/2015 - 19:02  ·  लेख
लेख
गावाचं नाव विचारू नका. पण गाव अर्थातच कोकणातलं. तिथल्या प्रत्येक गावाची कुठची ना कुठची गोष्ट असतेच. तीही साधीसुधी नाही तर भुताखेताची. ही कथा सुद्धा त्यापैकीच. आता तुमचा विश्वास नसेल तर नका बापडे ठेऊ . काही सक्ती नाही . पण गोष्ट वाचायला काय जातं ? इथे पूर्वापार चालत आलेली जमीनदारीची परंपरा होती आणि त्या सोबतीनं नांदणारी गरिबी. एक प्रकारची पिळवणूकच होती ती. कदाचित काही जण सन्माननीय अपवाद असतीलही. पण ते खरोखर अपवादापुरते. जवळपासच्या पंधरा वीस गावांची देखभाल(?) करण्याची जबाबदारी यांच्याकडे असे. त्यांचा मोठ्ठा वाडा असे. हाताखाली बरेच गडी, त्यावर देखरेख करणारा आणि मालमत्तेचा हिशोब ठेवणारा मुनीम किंवा कारकून. शिवाय ठेवलेल्या बायका वगैरे वगैरे मोठं प्रस्थ असे. तर या गावाची वसुली करणारे देखील एक जमीनदार होते. जवळच्या दुसऱ्या गावात त्यांचं घर कम महाल कम वाडा होता.( तो अजूनही आहे. पूर्वीच वैभव अर्थातच नाही राहिलं पण त्या वाड्याकडे पाहून थोडीफार कल्पना येते.) ते होते आमचे नातेवाईक. आणि आजोबा वकील असल्यानं त्यांचे पक्षकार देखील. एक दिवस आजोबांना कुण्या खात्रीच्या व्यक्तीकडून बातमी कळली की गावातले तरुण, जमीनदारावर चिडलेत. त्यांच्या खुनाचा कट शिजतोय. आजोबांनी ताबडतोब वाड्यावर निरोप पाठवला, जमिनादाराना बोलावून घेतलं. दिवस वाईट आहेत जरा काही दिवस वसुलीला वगैरे जाऊ नका असा सल्ला दिला . पण जमीनदारांचा काही विश्वास बसेना. " ही एकजात भित्री माणसं. मी जमिनी कसायला दिल्यात म्हणून यांना निदान खायला मिळतं. ती माझ्याविरुद्ध उठणं शक्यच नाही. " या ठाम विश्वासानं त्यांनी आजोबांचा सल्ला धुडकावून लावला. आणि काही दिवसातच ते त्या गावी वसुलीला गेले. वसुली हा भयंकर प्रकार असायचा. दर तीन किंवा चार महिन्यानी जमीनदार, त्याचा मुनीम , कारकून हे दुपारच्या वेळेला गावात पोचायचे. त्या त्या गावात त्यांचं एखाद घर किंवा खोली असायची. गावातलेच लोक त्यांच्या सामिष जेवणाची व्यवस्था करायचे. संध्याकाळी गावातली त्यांची कुळं येउन, पैसे , नारळ, तांदूळ कुळीथ वगैरे देऊन जायची. त्या सगळ्याचा हा भला मोठा ढीग जमायचा. मात्र निळू फुलेंनी मनात ठसवलेल्या दुष्ट जमीनदारांपेक्षा कोकणातले जमीनदार बरेच सौम्य होते. तरी वसुलीचा वाटा न देणाऱ्याला थोडी दमदाटी केली जात असणारच. तर त्या दिवशीदेखील हा सगळा व्यवहार पार पडला. यावेळी जमीनदारांच्या बरोबर त्यांचा आठ वर्षांचा मुलगा सुद्धा होता. रात्री कंदिलाच्या प्रकाशात सगळे जेवून झोपले. आणि मध्यरात्री कधीतरी काही जण घरात शिरले . जमीनदाराला , मुनिमाला पकडून ठार केलं. त्या गोंधळात तो छोटा मुलगा नारळाच्या ढिगाआड लपला म्हणून वाचला. नोकर घबरून पळून गेला. तो नंतर कधी सापडलाच नाही . तोही त्या मारेकऱ्यांना सामील होता की काय हे कधी कळलं नाही. पोलिसांना दोन दिवसानंतर बाजूच्या जंगलात काठीला बांधलेलं कपडे काढलेलं जमीनदाराच प्रेत मिळालं . मुनिमाचं प्रेत त्याच्या बाजूलाच पडलेलं होतं . पूर्ण जिल्ह्यात या घटनेनं खळबळ माजली. पोलीस आले . १९३०-३५ चा काळ असावा . त्यामुळं ब्रिटीश राजचा जमाना होता. त्यात फौजदारी खटला. भराभर संबधीत गावकऱ्यांना पकडलं. तेव्हा थर्ड डिग्री ट्रीटमेंट हा प्रकार सर्रास होत असे. त्यामुळे बहुतेक सगळेच मारेकरी पकडले गेले. गरिबीला, जुलुमाला वैतागलेली, बिचारी साधीसुधी माणसं होती. तरुण रक्त होतं. जमीनदारांच्या बाजूनं सरकारी वकील आणि या आरोपींच्या बाजूनं डॉ बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले. पण सर्वच पुरावे जमीनदारांच्या बाजूनं होते . बाबासाहेबांनी "जंगलात वाघानं मारलं" असा क्षीण प्रतिवाद केला . पण "वाघ माणसाचे कपडे काढायला आणि काठीला दोरीने बांधायला कधी शिकला" या प्रश्नाला त्यांच्याकडं उत्तर नव्हतं . सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली. पुढे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला. तेव्हा अनेक राजबंद्याना सोडून देण्यात आलं. हे सर्व सुद्धा सुटले . गावात बरीचशी त्यांची, त्यांच्या भावकीतली घरं होती. त्यामुळं वाजतगाजत मिरवणूक काढून या वीरांचे स्वागत केलं गेलं. नंतर क्रांतीकारी कूळ कायदा आला. जमीनदारी अर्थातच संपली. पण गरिबी कशी संपणार हा प्रश्नच होता. त्यामुळे त्यातले काहीजण मुंबईला गिरण्यांमध्ये कामाला लागले. चाकरमानी झाले. त्यांची लग्न झाली, संसार चालू झाले. मी सांगणार असलेली गोष्ट यानंतर सुरु होते. मुख्य आरोपीला सहा मुलगे आणि एक मुलगी होती. काही वर्षानंतर त्याचा तरुण मुलगा अचानक गेला. म्हातारपणानंतर मृत्यू हा येतोच. दु:ख होतेच पण अकाली मृत्यू फारच दु:खदायक असतो. त्यानंतर काही वर्षांच्या अंतराने एकेक करत ते सहाही मुलगे काही न काही कारणानं गेले. गावातल्या इतर घरातही तरुण माणसांच्या मृत्युचं प्रमाण वाढू लागलं. निदान अशी लोकांना शंका येऊ लागली . जन्म मृत्यू नोंदीचा अभ्यास करून वगैरे केलेलं हे अनुमान निश्चितच नव्हतं. पण लोक कुजबुजत्या स्वरात काही बाही बोलू लागले. ९०- ९५ सालानंतर हळूहळू गावाकडच्या जमिनींना किंमत येऊ लागली. बऱ्याच लोकांनी गावाला घर बांधायला म्हणून जमिनी विकत घेतल्या. आमच्या काही ओळखीच्यानी , काही नातेवाईकांनी या गावातल्या जमिनी इतर जागांपेक्षा स्वस्त म्हणून विकत घेतल्या. कुणाची तिथे न्याहारी निवास सुरु करायची इच्छा होती. कुणी हॉटेल काढणार होतं. तर कुणी स्वेच्छानिवृत्तीनंतरचं आयुष्य तिथे शांतपणं घालवायचं म्हणून बाग बगिचा उभा करत होतं. ( हे सर्व एकाच वेळी नाही तर दोनचार वर्षांच्या अंतराने .) एकाचा मुलगा सैन्यात होता . कारगील युद्धावर शूरपणे लढता लढता तो कामी आला .(तो त्या मुख्य आरोपीच्या मुलीचा एकुलता एक मुलगा .) तर दुसऱ्याचा सतरा वर्षाचा मुलगा एका अतिशय वाईट अपघातात मृत्यू पावला. तिसऱ्याला बागेत काम करत असताना अचानक हार्ट अटॅक आला. खुनाची घटना वगैरे आम्हाला अर्थातच माहिती होती. त्या तिथे जागा घेतल्यानंतर घडलेले हे काही मृत्यूही माहित होते . पण हा संबंध वगैरे आधी डोक्यातही आलं नव्हतं. अजूनही तिथं कधी गेलं तर अनेक घरं अर्धवट बांधून सोडून दिलेली किंवा पूर्ण बांधूनही न रंगवताच ओस पडलेली दिसतात. अलीकडेच जवळचं कुणीतरी तिथे विकत घेण्यासाठी जागा बघायला गेलं . तेव्हा ' त्या गावात जागा लाभत नाही, का ते माहित नाही " असं कुणीसं बोललं. आणि अचानक ही जुनी घटना आठवली. आणि त्यामागून हे सर्व म्रुत्यू. भले यावर विश्वास ठेवायचा नाही किंवा ठेवत नाही असं कितीही जरी आपण म्हटलं तरी आपलं मन भित्रं असतं. तो व्यवहार काही पूर्ण झाला नाही. मी खरतर कर्मकांड, भूतप्रेत वगैरे यावर विश्वास न ठेवणारी. पण त्या गावात किंमत कमी असून देखील जागा घ्यायची माझी हिम्मत नाही हे कबूल करते. मी सांगितलेली जमीनदाराच्या खुनाची घटना अगदी १००टक्के खरी. आता असं खरच आहे का? असेल तर गाव कुठंच? वगैरे मला विचारू नका. मागे जसं कोणीतरी त्या जत्रेवाल्या देवीच नाव सांगितलं तसं कुणी आताही सांगेल. काय माहित? मी तर बुवा आधीच म्हटलेलं , विश्वास ठेवायचा की नाही ते तुम्हीच ठरवा.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
6689 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

मस्त कथा....

मुक्त विहारि
Fri, 10/16/2015 - 19:37 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

तुमच्याकडे शैली आहे चांगली.

बिपिन कार्यकर्ते
Fri, 10/16/2015 - 19:42 नवीन
तुमच्याकडे शैली आहे चांगली. लिहित राहा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

प्राची अश्विनी
Sat, 10/17/2015 - 09:03 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

जर वेगळी माहिती आहे याच्यात .

अभिजित - १
Fri, 10/16/2015 - 19:45 नवीन
जर वेगळी माहिती आहे याच्यात .. असू दे कि ..
  • Log in or register to post comments

आवडली, कोकणी कथा अश्याच

विवेकपटाईत
Fri, 10/16/2015 - 20:12 नवीन
आवडली, कोकणी कथा अश्याच आशयाचा असतात का?
  • Log in or register to post comments

सगळ्या नाही पण बऱ्याच आहेत

प्राची अश्विनी
Sat, 10/17/2015 - 09:06 नवीन
सगळ्या नाही पण बऱ्याच आहेत खरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

खतराच आहे!

मांत्रिक
Sat, 10/17/2015 - 09:11 नवीन
खतराच आहे! अजून सांगा काही खास कोकणी भयकथा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

कथा आवडली.

अजया
Sat, 10/17/2015 - 09:11 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments

दिवाळी अंकातही वाचायला आवडेल

अजया
Sat, 10/17/2015 - 09:12 नवीन
दिवाळी अंकातही वाचायला आवडेल तुमचे लिखाण.घ्या मनावर!
  • Log in or register to post comments

नाही हो अजयाताई , मी फार

प्राची अश्विनी
Sat, 10/17/2015 - 17:28 नवीन
नाही हो अजयाताई , मी फार लिहीत वगैरे नाही . काही अनुभव सांगितले इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

लिखाण आवडले!

जव्हेरगंज
Sat, 10/17/2015 - 09:13 नवीन
लिखाण आवडले!
  • Log in or register to post comments

कथा आवडली.

जगप्रवासी
Sat, 10/17/2015 - 11:41 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments

गाावाचं नाव सांगून टाका की.

दमामि
Sat, 10/17/2015 - 12:19 नवीन
गाावाचं नाव सांगून टाका की.
  • Log in or register to post comments

दुरुस्ती घ्या करवून आणि आमचे

प्यारे१
Sat, 10/17/2015 - 12:48 नवीन
असे प्रकार कोकणात जास्त आढळतात. एकंदरच मानसिकता तशी असते की काय अशी शंका येण्याइतपत. लवकर सामसूम, लहान गावं, बाहेर असलेलं सापासारख्या प्राण्यांचं भय यामुळे अशा गोष्टी मनात घर करतात. काही योगायोग असतील सुद्धा. लेखन शैली आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

खरे आहे. पण आजकाल गावं वाढली,

प्राची अश्विनी
Sat, 10/17/2015 - 17:20 नवीन
खरे आहे. पण आजकाल गावं वाढली, वस्ती वावर वाढला. इतर चिंचेखली भूत असल्याचे मानणे, अन्गात येणे प्रकार कमी झालेत. पण या इथे प्रत्यक्ष म्रुत्यूची भिती असल्याने लोक शहनिशा करायला जात नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

चांगली कथा आहे. तुमची

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 10/17/2015 - 12:45 नवीन
चांगली कथा आहे. तुमची लिहिण्याची पद्धतही स्पष्ट आणि प्रवाही आहे ! लिहीत रहा.
  • Log in or register to post comments

तुमच्या मनात सरांजमा विरुद्ध

पाटीलअमित
Sat, 10/17/2015 - 13:13 नवीन
तुमच्या मनात सरांजमा विरुद्ध राग आहे का ?
  • Log in or register to post comments

सरंजामशाही विरुद्ध नाही ,

प्राची अश्विनी
Sat, 10/17/2015 - 17:24 नवीन
सरंजामशाही विरुद्ध नाही , लोकांच्या केल्या जाणार्‍या पिळ्वणुकीबद्दल संताप येतो, ते सरंजामशाहीत होते, आता नेते करतात . पुर्वी मुठभर लोक करायचे आता ती संख्या प्रचंड वाढलीय इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित

तुमच्या मनात सरांजमा विरुद्ध

सतीश कुडतरकर
Mon, 10/19/2015 - 15:45 नवीन
तुमच्या मनात सरांजमा विरुद्ध राग आहे का ?>>>> या प्रश्नाचे प्रयोजन नाही कळले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित

कथा नसून प्रत्यक्षातली गोष्ट

सस्नेह
Sat, 10/17/2015 - 16:08 नवीन
कथा नसून प्रत्यक्षातली गोष्ट आहे असे वाटले. असे काही असते का खरेच ?
  • Log in or register to post comments

हं. खरोखरच कुणीतरी

प्राची अश्विनी
Sat, 10/17/2015 - 17:26 नवीन
हं. खरोखरच कुणीतरी स्टॅटिस्टिशिअनच्या मदतीने संशोधन करावे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

इथे स्टॅटिस्टिशिअनचे काय काम?

बॅटमॅन
Tue, 10/20/2015 - 18:37 नवीन
इथे स्टॅटिस्टिशिअनचे काय काम?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

जर कुणाला कुठलेही संख्यात्मक

प्राची अश्विनी
Tue, 10/20/2015 - 19:23 नवीन
जर कुणाला कुठलेही संख्यात्मक संशोधन करायचे असेल तर सॅम्पल साइझ,कंट्रोल ग्रूप ई साठी स्टॅटिस्टिशिअनची मदत लागेलच नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हं. ते ठीक आहे. पण

बॅटमॅन
Wed, 10/21/2015 - 15:04 नवीन
हं. ते ठीक आहे. पण भुताखेतांच्या घटना खर्‍याच असतात की नाही हे व्हेरिफाय करायला यचा उपयोग नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

+१

शिव कन्या
Sat, 10/17/2015 - 17:31 नवीन
गप्पा मारत असल्यासारखी ओघवती शैली. भारीय. पण भ्याsssss पण वाटलं....
  • Log in or register to post comments

अपमृत्यूंची साखळी

चलत मुसाफिर
Sat, 10/17/2015 - 17:47 नवीन
कोकणातील आमच्या विस्तारित कुटुंबात मागच्या तीसएक वर्षात तरण्याताठ्या पाच ते सहा मुलग्यांचे अपमृत्यू झालेले आहेत. 'विधिलिखित' यापलीकडे त्यांचे काहीच कारण सांगता येत नाही. जमिनीशी संबंध नसावा, कारण फारशी जमीनच कुणाकडे नाही आणि पूर्वीही नव्हती. मोठमोठ्या पंडित-साधूंना विचारून झाले. देवाला कौल लावून झाला. नागबळी देऊनबिऊन झाले. प्रत्येक मृत्यूनंतर वडीलधारी मंडळी हे सर्व काही नव्याने करतात. मग पाचसहा वर्षे 'सुखात' जातात. चला, अरिष्ट टळले असे म्हणेपर्यंत पुन्हा उरस्फोड दुःखाचे ताट वाढून समोर येते. कारण कळत नाही.
  • Log in or register to post comments

आपण लिहिलेले कथा आवडली.

Sanjay Uwach
Sun, 10/18/2015 - 08:22 नवीन
आपण लिहिलेले कथा आवडली. लिहण्याचा पध्दत देखील खूप छान आहे, असेच लिहित रहा
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

प्राची अश्विनी
Mon, 10/19/2015 - 10:18 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments

मस्त

नाखु
Mon, 10/19/2015 - 14:20 नवीन
कथाही आणि हातोटीही. आणि हे फक्त लिखाणाबद्दलच आहे उगा इथे फुकटची "पाटीलकी"नको ! खुलासे दार नाखु अखिल मिपा उत्तम साहीत्य आस्वादक, निरर्थक फाट्यावर मारणे संघाचा क्रियाशील कार्यकर्ता. अवांतर : अळंबी निर्मूलनासाठी जेपी उपाय्योजना सांगणे.
  • Log in or register to post comments

छान लिहिले आहे.

सतीश कुडतरकर
Mon, 10/19/2015 - 15:48 नवीन
छान लिहिले आहे. पहिल्यांदाच ऐकल, गावाच नाव शोधाव म्हणतो!
  • Log in or register to post comments

जवळच आहे , तुम्हाला नक्की

प्राची अश्विनी
Mon, 10/19/2015 - 16:04 नवीन
जवळच आहे , तुम्हाला नक्की सापडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर

शोधतो…. … :-)

सतीश कुडतरकर
Mon, 10/19/2015 - 16:38 नवीन
शोधतो…. … :-) बोर्डवे, ता. कणकवली गावाचा खोत वसुली करायला आला कि आमच्याच घरी मुक्काम करायचा. त्यावेळेस कोकणात गरिबी खूपच असल्याने लोकांकडे देण्यासारखे काही नसायचेच मुळी. वडील सांगतात, जेंव्हा खोत वसुलीसाठी गावात येणार असल्याची बातमी यायची तेंव्हा हि लोक बिचारी रानात पळून जायची. काही घरांमध्ये तर अक्षरशः रानात शिकार मिळाली तरच जेवण नशीब व्हायचं. हि परिस्थिती साधारण मागील २५-३० वर्षांपर्यंत तरी होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

शोधा, शोधा, ते अंगणातलं तर हे

प्राची अश्विनी
Tue, 10/20/2015 - 10:59 नवीन
शोधा, शोधा, ते अंगणातलं तर हे अगदी पडवीतलं आहे.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर

छान लिहिलंय!

पैसा
Tue, 10/20/2015 - 17:22 नवीन
छान लिहिलंय!
  • Log in or register to post comments

आवडली कथा! मस्त लिहलय!

रातराणी
Wed, 10/21/2015 - 00:41 नवीन
आवडली कथा! मस्त लिहलय!
  • Log in or register to post comments

तडकडताई हा असाच एक प्रकार आहे .

सिरुसेरि
Mon, 11/09/2015 - 14:02 नवीन
तडकडताई हा असाच एक प्रकार आहे .तडकडताई च्या भयानक मुखवट्याला घाबरुन लहान मुले बरेचदा झोपेतुन दचकुन उठतात . तडकडताई च्या सुपाच्या फटक्यांना घाबरुन सैरावैरा धावत सुटतात .
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा