एक होतं गाव .....
गावाचं नाव विचारू नका. पण गाव अर्थातच कोकणातलं. तिथल्या प्रत्येक गावाची कुठची ना कुठची गोष्ट असतेच. तीही साधीसुधी नाही तर भुताखेताची. ही कथा सुद्धा त्यापैकीच. आता तुमचा विश्वास नसेल तर नका बापडे ठेऊ . काही सक्ती नाही . पण गोष्ट वाचायला काय जातं ?
इथे पूर्वापार चालत आलेली जमीनदारीची परंपरा होती आणि त्या सोबतीनं नांदणारी गरिबी. एक प्रकारची पिळवणूकच होती ती. कदाचित काही जण सन्माननीय अपवाद असतीलही. पण ते खरोखर अपवादापुरते. जवळपासच्या पंधरा वीस गावांची देखभाल(?) करण्याची जबाबदारी यांच्याकडे असे. त्यांचा मोठ्ठा वाडा असे. हाताखाली बरेच गडी, त्यावर देखरेख करणारा आणि मालमत्तेचा हिशोब ठेवणारा मुनीम किंवा कारकून. शिवाय ठेवलेल्या बायका वगैरे वगैरे मोठं प्रस्थ असे.
तर या गावाची वसुली करणारे देखील एक जमीनदार होते. जवळच्या दुसऱ्या गावात त्यांचं घर कम महाल कम वाडा होता.( तो अजूनही आहे. पूर्वीच वैभव अर्थातच नाही राहिलं पण त्या वाड्याकडे पाहून थोडीफार कल्पना येते.) ते होते आमचे नातेवाईक. आणि आजोबा वकील असल्यानं त्यांचे पक्षकार देखील. एक दिवस आजोबांना कुण्या खात्रीच्या व्यक्तीकडून बातमी कळली की गावातले तरुण, जमीनदारावर चिडलेत. त्यांच्या खुनाचा कट शिजतोय. आजोबांनी ताबडतोब वाड्यावर निरोप पाठवला, जमिनादाराना बोलावून घेतलं. दिवस वाईट आहेत जरा काही दिवस वसुलीला वगैरे जाऊ नका असा सल्ला दिला . पण जमीनदारांचा काही विश्वास बसेना. " ही एकजात भित्री माणसं. मी जमिनी कसायला दिल्यात म्हणून यांना निदान खायला मिळतं. ती माझ्याविरुद्ध उठणं शक्यच नाही. " या ठाम विश्वासानं त्यांनी आजोबांचा सल्ला धुडकावून लावला. आणि काही दिवसातच ते त्या गावी वसुलीला गेले.
वसुली हा भयंकर प्रकार असायचा. दर तीन किंवा चार महिन्यानी जमीनदार, त्याचा मुनीम , कारकून हे दुपारच्या वेळेला गावात पोचायचे. त्या त्या गावात त्यांचं एखाद घर किंवा खोली असायची. गावातलेच लोक त्यांच्या सामिष जेवणाची व्यवस्था करायचे. संध्याकाळी गावातली त्यांची कुळं येउन, पैसे , नारळ, तांदूळ कुळीथ वगैरे देऊन जायची. त्या सगळ्याचा हा भला मोठा ढीग जमायचा. मात्र निळू फुलेंनी मनात ठसवलेल्या दुष्ट जमीनदारांपेक्षा कोकणातले जमीनदार बरेच सौम्य होते. तरी वसुलीचा वाटा न देणाऱ्याला थोडी दमदाटी केली जात असणारच. तर त्या दिवशीदेखील हा सगळा व्यवहार पार पडला. यावेळी जमीनदारांच्या बरोबर त्यांचा आठ वर्षांचा मुलगा सुद्धा होता. रात्री कंदिलाच्या प्रकाशात सगळे जेवून झोपले.
आणि मध्यरात्री कधीतरी काही जण घरात शिरले . जमीनदाराला , मुनिमाला पकडून ठार केलं. त्या गोंधळात तो छोटा मुलगा नारळाच्या ढिगाआड लपला म्हणून वाचला. नोकर घबरून पळून गेला. तो नंतर कधी सापडलाच नाही . तोही त्या मारेकऱ्यांना सामील होता की काय हे कधी कळलं नाही. पोलिसांना दोन दिवसानंतर बाजूच्या जंगलात काठीला बांधलेलं कपडे काढलेलं जमीनदाराच प्रेत मिळालं . मुनिमाचं प्रेत त्याच्या बाजूलाच पडलेलं होतं .
पूर्ण जिल्ह्यात या घटनेनं खळबळ माजली. पोलीस आले . १९३०-३५ चा काळ असावा . त्यामुळं ब्रिटीश राजचा जमाना होता. त्यात फौजदारी खटला. भराभर संबधीत गावकऱ्यांना पकडलं. तेव्हा थर्ड डिग्री ट्रीटमेंट हा प्रकार सर्रास होत असे. त्यामुळे बहुतेक सगळेच मारेकरी पकडले गेले. गरिबीला, जुलुमाला वैतागलेली, बिचारी साधीसुधी माणसं होती. तरुण रक्त होतं. जमीनदारांच्या बाजूनं सरकारी वकील आणि या आरोपींच्या बाजूनं डॉ बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले. पण सर्वच पुरावे जमीनदारांच्या बाजूनं होते . बाबासाहेबांनी "जंगलात वाघानं मारलं" असा क्षीण प्रतिवाद केला . पण "वाघ माणसाचे कपडे काढायला आणि काठीला दोरीने बांधायला कधी शिकला" या प्रश्नाला त्यांच्याकडं उत्तर नव्हतं . सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली.
पुढे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला. तेव्हा अनेक राजबंद्याना सोडून देण्यात आलं. हे सर्व सुद्धा सुटले . गावात बरीचशी त्यांची, त्यांच्या भावकीतली घरं होती. त्यामुळं वाजतगाजत मिरवणूक काढून या वीरांचे स्वागत केलं गेलं. नंतर क्रांतीकारी कूळ कायदा आला. जमीनदारी अर्थातच संपली. पण गरिबी कशी संपणार हा प्रश्नच होता. त्यामुळे त्यातले काहीजण मुंबईला गिरण्यांमध्ये कामाला लागले. चाकरमानी झाले. त्यांची लग्न झाली, संसार चालू झाले.
मी सांगणार असलेली गोष्ट यानंतर सुरु होते. मुख्य आरोपीला सहा मुलगे आणि एक मुलगी होती. काही वर्षानंतर त्याचा तरुण मुलगा अचानक गेला. म्हातारपणानंतर मृत्यू हा येतोच. दु:ख होतेच पण अकाली मृत्यू फारच दु:खदायक असतो. त्यानंतर काही वर्षांच्या अंतराने एकेक करत ते सहाही मुलगे काही न काही कारणानं गेले. गावातल्या इतर घरातही तरुण माणसांच्या मृत्युचं प्रमाण वाढू लागलं. निदान अशी लोकांना शंका येऊ लागली . जन्म मृत्यू नोंदीचा अभ्यास करून वगैरे केलेलं हे अनुमान निश्चितच नव्हतं. पण लोक कुजबुजत्या स्वरात काही बाही बोलू लागले.
९०- ९५ सालानंतर हळूहळू गावाकडच्या जमिनींना किंमत येऊ लागली. बऱ्याच लोकांनी गावाला घर बांधायला म्हणून जमिनी विकत घेतल्या. आमच्या काही ओळखीच्यानी , काही नातेवाईकांनी या गावातल्या जमिनी इतर जागांपेक्षा स्वस्त म्हणून विकत घेतल्या. कुणाची तिथे न्याहारी निवास सुरु करायची इच्छा होती. कुणी हॉटेल काढणार होतं. तर कुणी स्वेच्छानिवृत्तीनंतरचं आयुष्य तिथे शांतपणं घालवायचं म्हणून बाग बगिचा उभा करत होतं. ( हे सर्व एकाच वेळी नाही तर दोनचार वर्षांच्या अंतराने .) एकाचा मुलगा सैन्यात होता . कारगील युद्धावर शूरपणे लढता लढता तो कामी आला .(तो त्या मुख्य आरोपीच्या मुलीचा एकुलता एक मुलगा .) तर दुसऱ्याचा सतरा वर्षाचा मुलगा एका अतिशय वाईट अपघातात मृत्यू पावला. तिसऱ्याला बागेत काम करत असताना अचानक हार्ट अटॅक आला.
खुनाची घटना वगैरे आम्हाला अर्थातच माहिती होती. त्या तिथे जागा घेतल्यानंतर घडलेले हे काही मृत्यूही माहित होते . पण हा संबंध वगैरे आधी डोक्यातही आलं नव्हतं. अजूनही तिथं कधी गेलं तर अनेक घरं अर्धवट बांधून सोडून दिलेली किंवा पूर्ण बांधूनही न रंगवताच ओस पडलेली दिसतात. अलीकडेच जवळचं कुणीतरी तिथे विकत घेण्यासाठी जागा बघायला गेलं . तेव्हा ' त्या गावात जागा लाभत नाही, का ते माहित नाही " असं कुणीसं बोललं. आणि अचानक ही जुनी घटना आठवली. आणि त्यामागून हे सर्व म्रुत्यू. भले यावर विश्वास ठेवायचा नाही किंवा ठेवत नाही असं कितीही जरी आपण म्हटलं तरी आपलं मन भित्रं असतं. तो व्यवहार काही पूर्ण झाला नाही.
मी खरतर कर्मकांड, भूतप्रेत वगैरे यावर विश्वास न ठेवणारी. पण त्या गावात किंमत कमी असून देखील जागा घ्यायची माझी हिम्मत नाही हे कबूल करते.
मी सांगितलेली जमीनदाराच्या खुनाची घटना अगदी १००टक्के खरी. आता असं खरच आहे का? असेल तर गाव कुठंच? वगैरे मला विचारू नका. मागे जसं कोणीतरी त्या जत्रेवाल्या देवीच नाव सांगितलं तसं कुणी आताही सांगेल. काय माहित? मी तर बुवा आधीच म्हटलेलं , विश्वास ठेवायचा की नाही ते तुम्हीच ठरवा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त कथा....
तुमच्याकडे शैली आहे चांगली.
धन्यवाद!
जर वेगळी माहिती आहे याच्यात .
आवडली, कोकणी कथा अश्याच
सगळ्या नाही पण बऱ्याच आहेत
खतराच आहे!
कथा आवडली.
दिवाळी अंकातही वाचायला आवडेल
नाही हो अजयाताई , मी फार
लिखाण आवडले!
कथा आवडली.
गाावाचं नाव सांगून टाका की.
दुरुस्ती घ्या करवून आणि आमचे
खरे आहे. पण आजकाल गावं वाढली,
चांगली कथा आहे. तुमची
तुमच्या मनात सरांजमा विरुद्ध
सरंजामशाही विरुद्ध नाही ,
तुमच्या मनात सरांजमा विरुद्ध
कथा नसून प्रत्यक्षातली गोष्ट
हं. खरोखरच कुणीतरी
इथे स्टॅटिस्टिशिअनचे काय काम?
जर कुणाला कुठलेही संख्यात्मक
हं. ते ठीक आहे. पण
+१
अपमृत्यूंची साखळी
आपण लिहिलेले कथा आवडली.
धन्यवाद!
मस्त
छान लिहिले आहे.
जवळच आहे , तुम्हाला नक्की
शोधतो…. … :-)
शोधा, शोधा, ते अंगणातलं तर हे
छान लिहिलंय!
आवडली कथा! मस्त लिहलय!
तडकडताई हा असाच एक प्रकार आहे .