मोठ्यांचे मोठेपण आणि त्यांची विनम्रता!
विश्वविहार करताना नारद मुनी एकदा वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात पोहोचले.निरनिराळ्या वयातील विद्यार्थी तिथे बसून अभ्यास करत होते. त्यातील काही विद्यार्थी ७०-७५-८० वर्षांचे होते. ते पाहून नारदांना गम्मत वाटली. ते वसिष्ठ ऋषींना म्हणाले, "माझा शिष्य ध्रुव (ध्रुव तारावाला) याला तर मी थोड्याच काळात अढळ पदावर पोहोचवले पण तुमचे हे शिष्य संपूर्ण आयुष्य घालवून काहीच मिळवू शकले नाहीत. गुरु म्हणून तुम्ही त्यांना काय मिळवून दिले?"
वसिष्ठ ऋषीं त्यांना नम्रपणे म्हणाले, "आपण देवर्षी नारद आहात, तुमची आणि माझी बरोबरी कशी बरे होऊ शकेल?"
हे संभाषण संपता संपता संध्याकाळ झाली. वसिष्ठ ऋषीं आणि नारद नदीवर संध्येकरता गेले. परत येताना जंगलातील वाटेत नारदांना अतिशय सुंदर वास आला. त्यांनी वसिष्ठ ऋषींना त्याविषयी विचारले पण वसिष्ठ ऋषीं म्हणाले की मला हा वास कुठून आणि का येत आहे याबद्दल काहीच कल्पना नाही. दोघांनी त्या सुवासाचा मागोवा घ्यायचे ठरवले. मागोवा घेत घेत ते एका गुहेजवळ पोहोचले. त्या गुहेतून तो सुवास येत होता. त्या सुवासाबरोबरच त्या गुहेतून तेजस्वी प्रकाशही बाहेर पडत होता.
नारदांना आश्चर्य वाटले. त्या दोघांनी गुहेत प्रवेश केला. गुहेमध्ये आत लांबवर एक मनुष्य झोपलेला त्यांना दिसला आणि त्याच्या शरीरामधून तो प्रकाश आणि सुगंध बाहेर पडताना त्यांना दिसले. अजून जवळ गेल्यावर त्या मनुष्याच्या शेजारी अजून एक मनुष्य झोपलेला त्यांना दिसला. त्याशेजारी अजून एक, त्याशेजारी अजून एक असे करता करता त्यांना ९९ जण झोपलेले दिसले. त्या प्रत्येकाच्या शरीरामधून तेज आणि सुगंध येत होता.
चालत चालत ते पहिल्या मनुष्याजवळ पोहोचले आणि त्यांना तो मनुष्य मृत असल्याचे आढळले. पाहता पाहता सगळे ९९ मृतदेह असल्याचे त्यांना आढळले. हे सर्व मृतदेह तेजस्वी आणि सुगंधित कसे हा प्रश्न नारदांनी वसिष्ठ ऋषींना केला.
वसिष्ठ ऋषी नम्रपणे म्हणाले, "ज्या ध्रुवाला एका जन्मात तुम्ही अढळपद मिळवून दिले त्याच धृवाचे हे त्याआधीचे ९९ जन्म आहेत. आणि त्या सर्व ९९ जन्मांमध्ये तो माझा शिष्य होता.
कथेचा स्त्रोत: ह.भ.प. दीनानाथ गंधे, नाशिक यांचे १५-२० वर्षांपूर्वी ऐकलेले कीर्तन
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चांदोबा स्टाईल आहे पण आवडली.
आवडली.
मस्त कथा आवडली.
सहमत!
कथा आवडली