काहीतरी करण्याची जिद्द
जिद्द, आत्मविश्वास या गोष्टी शोधायच्या असतील तर थोरांची आत्मचरित्रच वाचावी लागतात, त्यांचे शब्द ऐकावे लागतात असं नाही. अगदी साध्या सोप्या माणसांशी केलेल्या संवादातूनही अशा मूल्यांची ओळख होते. असाच एक माणूस मला भेटला. हा माणूस म्हणजे आमच्या कँटीन स्टाफ मधला एक जण.
अगदी ४-५ महिनेच झाले असतील त्याला कँटीन मधे लागून. इथे एका केटरर चं कंत्राट आहे, ज्याच्याकडे हा कामावर आहे. तसेही कँटीनमधले चेहरे नियमितपणे बदलत असतात त्यामुळे सुरुवातीला 'आणखी एक नवीन चेहरा' म्हणून त्याच्याकडे फार लक्ष दिलं नाही कुणी आणि मीही. पण जेंव्हा जेंव्हा नाश्ता, जेवण घ्यायला जायचो तेंव्हा हा एकच माणूस अतिशय शुद्ध हिंंदीत बोलायचा. त्याच्या बोलण्यात अदब असायची, वाढण्यात आदळआपट नसायची. त्यामुळे तो इतर कँटीन स्टाफपेक्षा वेगळा वाटू लागला.
कँटीनबॉइज, ऑफिसबॉइज यांच्याशी माझं नेहमीच कंपनीतल्या इतर कुणाहीपेक्षा चांगलं जमतं. मला यांच्याशी बोलायला आवडतं. त्यामुळे, या सवयीनुसार मी दर टी ब्रेकला हळू हळू या माणसाशी बोलू लागलो. त्याची वृत्ती फार चौकस आहे. एक दिवस मी मोबाईलवर काहीतरी करत चहा पीत होतो, तेंव्हा हा माझ्या बाजूला येऊन बसला. दोन मिनिटं शांत राहून म्हणाला, 'आपके मोबाईल में.... वो.... जो रहता है...... वो.... नक्शा है?' (तो असा प्रत्येक वाक्य तोडून तोडून म्हणतो. 'मैने जो है.... एक दिन..... ऐसा किया था' असं काहीसं.) 'मॅप्स???' मी म्हटलं, 'हां है ना. देखना है?' असं म्हणून मी मॅप्स उघडले. 'क्या दिखाउं? कौनसा नक्शा?', मी विचारलं. 'सर... वो... मुझे है ना.... मुंबई का नक्शा देखना है. माने, हम जिस जगह अभी है, और हमारे इर्द-गिर्द क्या है, कहां से कैसे जाए, ये सब देखना है'. 'अच्छा.... मुंबई का मॅप. ओके. ये देखो.', असं म्हणून मी भारतापासून झूम इन करत करत एक एक दाखवायला सुरुवात केली. हा भारत... हा कच्छ चा आकार, इथून खाली आलं की मुंबई, हे कसं बेट आहे, दक्षिण मुंबई कुठे, चर्चगेट कुठे, गेटवे कुठे असं करत करत कर्जत कसारा डहाणू पर्यंत दाखवून झालं. मग तो अजून नेमकं बोलता झाला. त्याला मुंबईतली प्रसिद्ध देवळं फिरायची होती. मुंबईत येऊन चारच महिने झाले होते त्यामुळे नीट काही माहित नव्हतं. मग एक्स्टेन्डेड टी ब्रेक मधे हे सगळं जमेल तसं मी त्याला सांगितलं. दुस-या दिवशी गूगल मॅपचा प्रिंटआउटही आणून दिला.
असाच एक किस्सा. एक दिवस अगदी वरच्याप्रमाणेच, मी मोबाईल बघत असताना बाजूला येऊन हा माणूस बसला. 'बोलिये, कहां कहां घूमें इस शनिवार रविवार?' मी मागचा संदर्भ घेत विचारलं. उत्तर इंग्रजीत आलं. लेहजा हिंदीचाच. 'आय.... वेन्ट... दॅट.... बाबुलनाथ. देन... ओलसो... महालक्ष्मी.' 'वाह! इंग्लिश?' 'येस सर' (हसत म्हणाला). 'आय वान्ट टू नो... हाउ मच फार... इज... नासिक.' 'नाशिक?? क्यूं? कुंभ जाना है क्या?', मी अजूनही हिंदी ट्रॅकवर होतो. 'येस सर. आय गो देअर, टेक शाही स्नान', इंग्लिशच बोलायचं होतं याला. मग मीही सुरू केलं हळू वेगात. 'इफ यू गो बाय ट्रेन, इट विल टेक थ्री अवर्स टू रीच नाशिक. देअर आर बसेस अवेलेबल अॅज वेल. अनदर वे इज टू गो कसारा ऑन सेन्ट्रल लाईन अँड टेक अ शेअर टॅक्सी.' इट विल बी इकॉनोमिकल टू.' याची पुन्हा एकदा उजळणी त्याने केली आणि ओके सर, थेंक यू म्हणून कामाला गेला.
या दोन प्रसंगानंतर मला त्याच्या कँटीनमधे काम करण्याबाबत शंका यायला लागली. इंग्लिश येतं म्हणजे हा शिकलेला आहे हे नक्की. मग इथे काय करतोय? हा प्रश्न पडला. काही दिवसानंतर पुन्हा जेंव्हा असाच टी ब्रेक ला गेलो, तेंव्हा हा एकटा बसलेला होता सगळं काम आटपून. या वेळी मी त्याच्या बाजूला जाऊन बसलो. त्याला विचारलं, '(इंग्लिश चं लक्षात होतं.) सो...हाउ वॉज कुंभ?' 'नाईस सर' 'आय डिड शाही स्नान, देन वेंट टू ....दॅट...त्रिंब्केश्वर (मधलंच अक्षर असं अर्ध करणं हा अॅक्सेंट चा भाग आहे). देन... आय... ऑल्सो वेन्ट टू.... द.... ब्रम्ह् गिरी. जहां... गोदाव्री जो है.. उसका... जो है... उगमस्थान है.' 'वा आप तो बहोत घूमे. मस्त.' 'जी सर. आय केम बॅक फोर थर्टी इन द मॉर्निंग.' 'ओह. सही है सही है'. मग मी माझी शंका विचारली, 'वैसे आप हो कहांसे, और यहां कैसे आना हुआ?'
उत्तरादाखल कळलेली त्याची संक्षिप्तशी वाटचाल चकित करून गेली. तो मूळचा आसामचा. शिक्षण बीए फर्स्ट क्लास. मी कसा मॅट्रिक आणि बीए झालो हे तो अभिमानाने सांगतो. मैं पढा लिखा हूं सर... हे सांगतानाची त्याची कळकळच त्याला कँटीनचं काम करताना होणा-या मनस्तापाचा अंदाज देते. त्याने चौदा वर्ष शिक्षक म्हणून काम केलं आसाम मधल्याच एका छोट्या शहरात. काही वर्ष शिकवण्या घेतल्या आणि काही वर्ष एका कॉन्व्हेंट मधे गणित विषय शिकवला. 'मगर मुझे बडे शहर में कुछ करना था, अपना नाम कमाना था. इसलिये मैं यहां आया, मुंबई. ये मजबूरी है के मैं आज ये काम कर रहा हूं.' या माणसाला काँप्यूटर येतो. काँप्यूटर च्या केलेल्या कोर्स चं नाव, अभ्यासक्रम त्याने सांगितला. तरीही मला विचारलं, ये जो है... एम एस... सी... आय... टी... ये करूंगा तो सर अच्छा जॉब मिलेगा यहां?... मी म्हटलं नाही रे बाबा, प्रामाणिकपणे, तू जो कोर्स केलायस त्यात सगळं आलंय. एमएससी आयटी काही वेगळं नाही.
यानंतर चार दिवसांनी मला त्याने विचारलं, 'ये जो टॅब होता है.... कितनेमें आएगा? 'आपको लेना है? किसलिये?' 'नही अब जो कंप्यूटर सिखा हूं... उसको प्रॅक्टिस करना है. वर्ड एक्सेल इंटरनेट सब.' 'ओह... फिर आप टॅब पे वो सब इतने अच्छेसे नही कर पाओगे, जितना डेस्क्टॉप या लॅपटॉप पे कर पाओगे.' तो विचारात पडला. 'अच्छा, आपका बजेट कितना है?' 'सर पंधरा....तक है.' 'ओके, तो एक काम करो, सेकंड हँड लॅपटॉप देखो या डेस्क्टॉप.', मी सुचवू लागलो. त्याला काही फॅक्ट्स सांगितल्या, लॅमिंगटन रोड बद्दल सांगितलं, आणि निर्णय तू घे म्हटलं. वाटल्यास थोडं थांब आणि लॅपटॉप घे एन्ट्री लेव्हल पुरेल तुला इत्यादी इत्यादी.
हे सगळे प्रसंग सांगण्याचा हेतू इतकाच की त्या माणसाची चौकस वृत्ती, जिद्द, काहीतरी करून दाखवण्याची इच्छा या गोष्टी वरील संभाषणांतून मला जाणवत गेल्या, आणि त्याच्याबद्दल एक वेगळं कौतुक वाटत राहिलं. परवा जेंव्हा ऑफिसजवळच्या देवळात मी गेलो तेंव्हा तिथे हा मी यायच्या एक क्षणापूर्वी तरातरा चालत आला होता आणि त्याचा चेहरा लाल लाल आणि रडवेला झालेला होता. 'क्या हुआ?' 'कुछ नही सर... हमें ये काम नही करना.' 'कोई कुछ बोला क्या?' 'हा... किचकिच हुआ. हमें पता था ये होगा. ये जो अबक है ना वो हमेंशा ऐसाही करता है. हमेशा मुझे झूठा बताता है. वो सब समझतेहै के हम ## है पर हम को सब समझता है. बोलके आया हूं अब्भी सेठ को, के नही करना है मुझे काम', तो काप-या आवाजात माझ्याशी (की स्वतःशीच) बोलत होता. 'अछा...' 'सर यहां मुझे और अच्छा काम मिल सकता है ना? नही तो मैं अपने गांव चला जाऊंगा' मला काय बोलावं कळत नव्हतं. तो अतिशय अगतिक झाला होता. 'हां मिलेगा ना. लेकिन थोडा समय लग सकता है इसलिये ये कहूंगा के हडबड में कोई निर्णय मत लो. अब आपने यहां पेपर दे दिया है तो ठीक है. नया ढूंढना चालू करो. मिलना मुश्किल नही है पर प्रयास अच्छा करना होगा. टेन्शन मत लो.' थोडं बोलून मी तिथून निघालो.
आज तो मला म्हणाला मैं सोच रहा हूं, क्या मुझे टीचर का जॉब मिल सकता है? मी म्हटलं टीचर होना है तो बी एड होना जरूरी है. खास करके अगर मुंबई की स्कूल में पढाना है तो, वो भी अच्छे स्कूल में. अच्छा.... थोडा वेळ विचार केला त्याने, आणि म्हणाला, 'बस सर ये मेरा लक्ष्य है अब के मुझे बी एड करना है.' दरम्यान बी एड आणि लागणारा अवधी, पुढच्या संधी याबद्दल थोडं आणखी तपशीलवार बोलणं झालं, ते इथे लिहीत नाही. पण तो म्हणाला की शायद तबतक किसी अच्छे होटल में काम करूंगा, या जो भी मिलेगा वो करूंगा, पर मुझे बी एड बनना है. मुझे १४ साल का टिचिंग का एक्स्पिरियन्स है. और मुझे आगे जाके किसी अच्छे स्कूल में पढाना है.
त्याला मुंबई विद्यापीठ, इग्नोऊ, वायसीएमओयू बद्दल सांगून आलोय. फोन नंबर पत्ते कागदावर लिहून देऊन आलोय.
झोपडपट्ट्यात शौचालयं, व्हॉट्सॅप मेसेज वर पहारा, एक्सप्रेसवे वर अपघात, सिंचन घोटाळा अशा अनेक उद्विग्न करणा-या विषयांवर लिहायचं टाळलं आणि म्हटलं या माणसाबद्दल मला जे कळलं, वाटलं ते लिहावं. त्याला कदाचित कुठली गणेश लेखमाला मिळायची नाही आपला प्रवास लिहायला. आणि कदाचित मिळेलही; त्याहून मोठं व्यासपीठ, आणि ख-या अर्थाने प्रेरणा घेणारा श्रोतावर्ग. खोटं वाटेल, पण मला त्याचं नाव हे वाक्य लिहीपर्यंत ठाऊक नव्हतं. हे लिहायच्या आधी एका दुस-या व्यक्तीला आडून विचारलं मी त्याचं नाव. पण तरीही लिहावसं वाटत नाही. कारण जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी अशा गोष्टींना नावाचं कोंदण नसतं.
टीपः नवीन कळलेल्या माहितीनुसार लेखात एक दोन तपशील बदलले आहेत. त्या माहितीमुळे या व्यक्तीबद्दलच्या कौतुकात आणिक भरच पडली आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कौतुक आहे त्या व्यक्तीचे आणि
क्या बात है
सगळ्यांना मनापासून अनेक
सदर धाग्यातील व्यक्तीची पुढची वाटचाल
__/\__
अपडेट बद्धल धन्यवाद, वेल्लाभट!