MIDC
लंच संपवून डेस्क वर येऊन बसतो.
अर्थहीन लंच-चा टॉपिक- त्याहून जास्त अर्थहीन असतो.
"शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफीची गरज असते का?"
एकजण शहरातला त्यात ताड़-ताड़ बोलत असतो. सगळ्यांना सपशेल निरुत्तर करुन सोडतो. म्हणतो-
ते गरीब तिकडं राना-ऊना-पावसात राबतात, कधी लाईट नसते, तर कधी पाणी. तरी आपलं खायचं अन्न पिकवतात. त्यांना हवी ती मदत सरकारने करायलाच हवी. बायोस्कोपची 'बैल' कथा बघुन रडलो होतो मी.
मला त्याचं पटतं. (--ती कथा भक्कम होती.) हा शहरातला असून याला कळवळा किती असं मी मनाला म्हणतो. तर मन म्हणतं -खरंय तुझं. ऐकताना मलापण असंच वाटलं याच्याबद्दल. हा चिन्मय तन्मय असून खेड्यासाठी एवढा जागरूक वगैरे आहे.
या डिस्कशनच्या विचारात मी आराम-खुर्चीवर गढुन गेलेलो असतो. एका कॉल ने तंद्री भंग होते.
( अननोन नंबरचा कॉल बघताना आताशा पूर्वीची अस्वस्थता असत नाही. कशाने संपली??)
समोरचा विशी बाविशीतल्या खेड़ूत आवाजाचा मुलगा म्हणतो,
आ तुमी सचिन दादा बोलताय का? मी रमेश मोड़के बोलतोय मसल्यावरणं. गणु भैय्यानं तुमचा थेट नंबर दिलता.
(गणु म्हणजे माझा आठवीतनं शाळा सोडलेला इपितर चुलत भाऊ)
मी म्हणतो:
हाँ बोल. अन सॉरी, जरा पटकन बोलतो का. माझी एक मीटिंग आहे रे 15 मिनटात. सॉरी.
तो म्हणतो. बर बर.
मला जॉब लावता का तुमी तुमच्या कंपनीत??. माझा कॉम्पुटर डिप्लोमा झालाय. तुमची कंपनीबी कॉम्पुटर मधेच काम करते. लावा तुमी. तुमच्या हाता-ताय सगळं. मला गरज पण हाय आता जॉबची.
मी म्हणतो.
अरे बाबा असा नसतो जॉब लागत. आमच्या कंपनीत तर नाहीच. फ्रेशरला घेतच नाहीत. अन engg सोडून दुसऱ्या कोनाला तर नाहीतच.
तो:
गणु म्हणला तुमच्या आता वळकी भरपुर झाल्यात पुण्यात. कुठंतरी चिटकवा म्हणून सांगीतलंय त्यांनं. तुमाला बायोडाटा दिलं की झालंच काम म्हणला. मी बायोडाटा पाठवतो. तुमी ईमेल id पाठवा. पण जॉब लावा मला.
मी: अरे त्या गण्याला काई कळत नाई. तेजं काय आयकु नको. कायपण सांगतं ते. माझ्या हातात वगैरे काहीच नसतं. बघू तरीपण दुसरीकडं कुठं काई असलं तर सांगतो. पण काई गॅरेंटी नाही बघ.
(अनेकांचे CV मी परत मेल वरुन PC वर सुद्धा घेतलेले नाहीत, म्हटलं त्याच्या समाधानासाठी हा घेऊन ठेवावा, पडूनच राहणार शेवटी.
पण हाच विचार करताना मला माझी माझ्या जॉबच्या वेळची 'सेम' निरक्षर चरचर आठवली. अन छाती दड़पुन गेली)
तो: आवो मला मार्क 78 टक्के पडले डिप्लोमाला. गवर्मेंट कॉलेजला 2 रा नंबर आला. मग इंजिनीरिंगला एडमिशन घेतलं. पण सोडलंय आता ते. गेल्या महिन्यात वडील वारले. बारके शेतकरी होते. आता घरी काही पैशे येत नाहीत. म्हणून मला जॉब पायजे. शिकायचं होतं. पण आता शक्य नाही. मला तुमी जॉब वर घ्या.
मी: हहम. (ऐकून थोड़ी कळवळ वाटली. डेस्क वरणं उठून गॅलरीत गेलो.) त्याला म्हटलं
अरं मग पुण्यात ये ना, हिथं कोर्स लाव टेस्टिंग-बिस्टिंग चा. तिथं गावात राहून काय होणाराय?? एवढे मोठे engg पडून आहेत हिथं ऑलरेडी. तुझा डिप्लोमाचा कसा मेळ लागायचा.
तो महटला:
आलतो मी तिकडं पुण्याला जॉब बघायला.
हिंजवडीत फिरलो दिवसभर. पण तिथं काही समजलं नाही कसा जॉब लागायचा ते. पैशे पण नव्हते- आठवड्यात माघारी आलो. बघू थोड़े पैशे साटल्यावर येतो अजुन. कोर्स ला लय पैशे लागले तर अवघडाय मग.
मी म्हणलो: साठवून ये. होईल काहीतरी.
............
बाकी सध्या गावाकडं काय करतो मग?
तो म्हटला
हितून दारफळ जवळाय आमाला. तिथं जातो MIDCत कामाला. मी आई बहिन. मला 300 अन त्यांला 250, 250 हाजरी हाय दिवसाची.
(गण्यानं आट.वी सोडली होती मधेच.. तो ही तीथंच कामाला जातो.)
---------------------------------------------------------
माझ्या डोक्यात कितीतरी वेळ त्याचं ते अज्ञानी वाक्य घुमत होतं ''हिंजवाडीत आलतो. फिरलो. पण जॉब कसा लागायचा काही कळलं नाही.''
---------
हिंजवडीत आता कुणीही गावच्या चेहरयाचं रोडवर हिंडताना दिसलं की मला उगीचंच अकारण अपराध्यासारखं वाटायला होतं...............वऱचेवर संवेदना संपूर्ण बोथट होत चाललीय की उलट अजुनच जास्त तीक्ष्ण होत चाललिय-- हे सुदधा समजेना झालंय......
अशे अजुन किती रमेश मोड़के सध्या गावाकडं खेड़ोपाडी या क्षणी पडून असतील.....??. गायडंस सुद्धा करण्याच्या पलिकडचं वाटतं मला हे सगळं...
खेड्यातल्या पोरांचे असे हाल बघुन विनाकारण ,, काहीही दोष नसताना मला शहरातल्या पोरांचा राग येतो. मी चुकतोय हे माहीत असून. खुप राग येतो. खुप. खुप जास्त. माफ़ करा मित्रांनो...
प्रतिक्रिया
भिडली...
कंपन्यांबाहेर सिमकार्डाची
शेतकी साहित्य निर्माण
ओके.
खेडूत यांच्या
पैसे कसे कमवावेत हे.............
खेडूत यांच्या तंत्रशिक्षणाच्या सद्यस्थितीवरील लेखमालेची आठवण झाल
खरे गरजू
आवडले
खूप वाईट वाटलं वाचून. मी तर
या देवी सर्व भूतेषु
मनापासून आवडलं !
पंचवीस वर्षांपूर्वी आम्ही
डिप्लोमानंतर डिग्री करणे
पुण्याच्या बाजारात गरजेपेक्षा
सद्ध्या ह्या प्लेसमेंट
डोळ्यांपुढचा अनुभव
मी येमेन्शीत आहे.
फ्रेशर्सची अवस्था खरेच कठीण आहे.
>>> ज्यांना कॉलेज कॅम्पस मधून
वाचून खरंच वाईट वाटलं, वरचे सगळे प्रतिसाद मान्य, पण....
प्लेसमेंट एजन्स्यांचं पेव ??
होय!! आणि कितीतरी वेळा अगदी
भयानक!