आंबा कलाकंद

तळ्यात मळ्यात's picture
तळ्यात मळ्यात in पाककृती
20 Jul 2015 - 9:19 am

आंबा कलाकंद

आंबा कलाकंद

आंब्याचा सिझन संपून गेलाय खरा, पण हल्ली मँगो पल्प तर वर्षभर मिळतो आणि मिपावरची माझी पहिली रेसिपी गोड असावी म्हणून आजचा मान आंब्याला!

हे हलवाई कशा बाई एवढ्या सुंदर बर्फी तयार करतात असं लहानपणी वाटायचं. पण स्वैपाकघरात वावर रोजचा सुरु झाला आणि रेसिपी कमी पडू लागल्या. नेहेमीचीच पक्वान्नं करण्यापेक्षा असे वेगळे प्रयोग सुरु झाले. हे अशक्य वाटणारे पदार्थ यशस्वी झाल्याचा केवढा आनंद असतो नाही का! तर आता ह्या सोप्प्या रेसिपीकडे वळते.

साहित्यः

  • १ १/२ वाटी पनीर
  • १/२ - ३/४ वाटी साखर
  • १ वाटी आंब्याचा पल्प
  • १/४ वाटी साय
  • केशर
  • बदाम पिस्त्याचे काप
  • तूप

कृती:
पनीर शक्यतो घरीच करा. छान मऊ आणि ताजं पनीर असलं की बर्फीही मऊसुत होते.
१ लीटर दुधाला २ चमचे लिंबू रस असं प्रमाण मी पनीर करण्यासाठी घेते.
छानपैकी बांधून, पाणी काढलेलं पनीर हलकं मळून, मोकळं करुन घ्या.
कढईमध्ये २ चमचे तूप तापवून पनीर आणि आंब्याचा रस परतायला घ्या.
साखर आणि साय घाला आणि जरा घट्टपणा येईपर्यंत कमी आचेवर परता.
कलाकंद जरा मऊच असतो त्यामुळे खूप वेळ परतू नका नाहीतर पनीर होईल चिवट आणि बर्फीच्या टेक्स्चरची बोंब!
आता चौकोनी ट्रेमध्ये गरम मिश्रण थापून घ्या.
थोडं गार झालं की वड्या पाडा.
बदाम पिस्त्याचे काप आणि केशर लाऊन सजवा.
अलगद डब्यात भरा आणि रेफ्रिजरेट करा.

आंबा कलाकंद

मलई कलाकंद असाच करू शकता. फक्त आंब्याचा रस वगळा आणि साखर १ ते १ १/४ वाटी घ्या

रेसिपी गोड करुन घ्या आणि चूकभूल माफ करा हो मंडळी! :)

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

20 Jul 2015 - 9:25 am | श्रीरंग_जोशी

आंबा घातलेलं सर्वच आवडत असल्याने ही पाकृ अधिकच आवडली.
कृती वाचायला एकदम सुटसुटीत वाटली :-) . फोटो आणि सादरीकरण आवडले.

मिपावर एकदम चवदार सुरुवात झाली आहे लेखनाची. पुढील वाटचालीस शुभेच्छा!!

नाखु's picture

20 Jul 2015 - 12:06 pm | नाखु

तंतोतंत.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jul 2015 - 10:10 am | अत्रुप्त आत्मा

दुत्त दुत्त :-\

क्या बात है! गोड पाककृती आहे! :-)

पद्मावति's picture

20 Jul 2015 - 11:11 am | पद्मावति

पाककृती आणि लिहिण्याची शैली दोन्हीही फार आवडले.

यशोधरा's picture

20 Jul 2015 - 11:20 am | यशोधरा

फोटो मस्त आहे, रेसिपी पण करण्याजोगी. माझ्याकडे थोडा आंब्याचा पल्प उरलाय फ्रीझ केलेला. करुन पाहीन.

तुषार काळभोर's picture

20 Jul 2015 - 11:20 am | तुषार काळभोर

दुत्त दुत्त!!
फोटू दाखवून जळवतात..
a

अमृत's picture

20 Jul 2015 - 11:32 am | अमृत

सोपी पाकृ. नक्किच करून बघणार. सहज म्हणून विचारतोय आंब्याऐवजी रोज, चॉकोलेट, वॅनिला इसेंस वापरूनसुद्धा ही बर्फी करता येइल काय?

तळ्यात मळ्यात's picture

21 Jul 2015 - 6:47 am | तळ्यात मळ्यात

नेहमीच्या मलई कलाकंदमध्ये रोझ इसेन्स वापरतात बऱ्याच वेळा. वॅनिलाही चांगला वाटेल. चॉकलेट बद्दल साशंक आहे. तुम्हीच प्रयोग करुन का नाही सांगत ;)

मितान's picture

20 Jul 2015 - 11:44 am | मितान

व्वा ! सुरेख !
आजच पनीर केलंय. बर्फी करून बघते.

मितान's picture

20 Jul 2015 - 11:44 am | मितान

व्वा ! सुरेख !
आजच पनीर केलंय. बर्फी करून बघते.

नाव आडनाव's picture

20 Jul 2015 - 11:57 am | नाव आडनाव

असे फटू बघून कायम वाटतं - टेक्नोलॉजी अजून थोडी पुढे जाऊन, जसा काही सेकंदात पैसे ऑनलाईन ट्रांसफर करण्याचा ऑप्शन आहे, तसा जे आता फोटोत दिसतंय ते ट्रांसफर करण्याचा ऑप्शन आला पाहिजे. दिसलं कि १ सेकंदात खायला मिळालं पाहिजे :)

तळ्यात मळ्यात's picture

21 Jul 2015 - 6:49 am | तळ्यात मळ्यात

अगदी अगदी. मलाही लोकांनी टाकलेले फोटो बघून असं वाटतं!

नूतन सावंत's picture

20 Jul 2015 - 12:06 pm | नूतन सावंत

मिपा पाककृती विभागात स्वागत.
नाव आडनाव यांच्याशी सहमत.
अतिशय सुरेख दिसतेय बर्फी.सांगण्याची पद्धतही आवडली.

बर्फी सुरेखच.
मिपावर स्वागत

बर्फी सुरेखच.
मिपावर स्वागत

ब़जरबट्टू's picture

20 Jul 2015 - 1:18 pm | ब़जरबट्टू

स्वागत आहे..

जमल्यास कृतीचे पण फ़टू डकवा. :)

तळ्यात मळ्यात's picture

21 Jul 2015 - 7:04 am | तळ्यात मळ्यात

नक्की :)

पैसा's picture

20 Jul 2015 - 11:04 pm | पैसा

मस्त पाकृ आणि फोटो!

रेवती's picture

20 Jul 2015 - 11:10 pm | रेवती

गोड पाकृ व फोटू.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2015 - 11:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

आंबा आवडता आहेच... फोटो बघून लगेच गट्टम करावा असा पदार्थ दिसतोय !

स्वाती दिनेश's picture

20 Jul 2015 - 11:26 pm | स्वाती दिनेश

आंबा कलाकंद फार छान दिसतो आहे,
स्वाती

रुपी's picture

21 Jul 2015 - 1:16 am | रुपी

फोटोमधूनच बर्फी उचलून खाविशी वाटत आहे!

पहिलेच लेखन इतके छान आणि शुद्ध लिहिल्याबद्दल खूप धन्यवाद!

तळ्यात मळ्यात's picture

21 Jul 2015 - 7:00 am | तळ्यात मळ्यात

:)

बेष्टाड बेष्ट दिसतंय प्रकरण.
आंबा आणि पनीर वाचून कुणाचीच आठवण नाही आली ब्वा!

पाकृ सोपी दिसत आहे. फोटोही छान आला आहे.

तळ्यात मळ्यात's picture

21 Jul 2015 - 6:57 am | तळ्यात मळ्यात

मीच माझी पाठ थोपटून घेतली बरं! सगळ्यांचे एकत्रित आभार मानते :‍‌D

वाव काय सुंदर दिसतोय कलाकंद.. लगेच उचलुन खावेसे वाटतेय. :)

सानिकास्वप्निल's picture

21 Jul 2015 - 3:41 pm | सानिकास्वप्निल

यम्मी!! आंबा कलाकंद खूप सुंदर दिसत आहे, एकदम टेंपटींग :)

स्वाती२'s picture

21 Jul 2015 - 9:40 pm | स्वाती२

व्वा! अगदी उचलून खावासा वाटतोय! पाकृ देखील आवडली.

दीपा माने's picture

23 Jul 2015 - 1:53 am | दीपा माने

मस्तच! पार्टीसाठीही देखणा पदार्थ दिसतोय.

कविता१९७८'s picture

23 Jul 2015 - 6:06 am | कविता१९७८

मस्तच, आत्ताच खावीशी वाटते

उमा @ मिपा's picture

23 Jul 2015 - 10:59 am | उमा @ मिपा

खूप छान! नक्की करून पाहीन.
म्हणजे आता मस्त मस्त पाककृतींचा अजून एक खजिना खुला होतोय तर... शुभेच्छा!

तळ्यात मळ्यात's picture

23 Jul 2015 - 8:58 pm | तळ्यात मळ्यात

भगिनीमंडळाचे :)

रॉजरमूर's picture

25 Jul 2015 - 11:44 am | रॉजरमूर

मिपावर जोरदार एन्ट्री केलीत की .
पहिल्याच चेंडूवर सिक्सर .
हार्दिक स्वागत …

छान दिसतेय कलाकंद …!
मस्तच एकदम .

दिपक.कुवेत's picture

26 Jul 2015 - 3:15 pm | दिपक.कुवेत

एकदम टेम्टींग....मागे मी सुद्धा आंबा-पनिर बर्फी केलेली.

barfi1

टक्कू's picture

29 Jul 2015 - 12:14 am | टक्कू

तोंडाला पाणी सुटले. आंबा आणि पनीर दोन्ही प्रचंड आवडतं. नक्की करून बघेन.

झंप्या सावंत's picture

29 Jul 2015 - 3:25 pm | झंप्या सावंत

स्वर्गीय सुख

मदनबाण's picture

29 Jul 2015 - 3:42 pm | मदनबाण

आहाहा... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Infosys, Wipro & TCS lose over 1,00,000 people in last four quarters as automation kicks in

काय रसरशीत रंग आलाय बर्फीला?
मस्तच. करणार!