✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पुण्यनगरी !

च
चिनार यांनी
गुरुवार, 03/12/2015 - 12:39  ·  लेख
लेख
पुण्यात नवीन होतो तेंव्हाची गोष्ट. मित्रासोबत कोथरूड डेपोपासून चांदणी चौकात जायचे होते. एका गृहस्थाला रस्ता विचारला. ते चांदणी चौकाकडे बोट दाखवून म्हणाले," तुम्ही इथून खाली जा." समोरचा रस्ता बघून मित्राने अतिशय निरागसपणे विचारले, "मामा, रस्ता तर वर चाललाय हो ! खाली कसं जायचं?" ते गृहस्थ चिडून म्हणाले," मला मामा बनवू नको. जायचं असेल तर जा मुकाट्याने" आम्हा दोघांनाही कळत नव्हतं की नेमकं काय चुकलं. प्रश्न की नातं ? काही दिवसांनी आमच्या रूमवर स्वयंपाक करायला येणाऱ्या 'मावशी' जरा उशीरा आल्या. त्यावेळी तोच मित्र त्यांना म्हणाला," बाई, जरा लवकर येत जा." हे ऐकून त्या तावातावाने म्हणाल्या," मी बाई दिसते होय रे तुला ?" मित्र परत तितक्याच निरागसतेने म्हणाला," तुम्ही बाईचं तर दिसताय. एव्हढं काय झालं?” बाईंचा राग काही शांत होईना. त्या म्हणाल्या," मावशी म्हणायचं. उद्यापासून येणार नाही बाई म्हणणार असशील तर!" मित्र तेंव्हा शांत बसला पण ती घराबाहेर जाताच माझ्यावर उखडला," त्यादिवशी त्या भयकान्याले मामा म्हटलं तं बोंबलला अन इले मावशी काऊन म्हणायचं बे? प्रश्नाचं उत्तर तसं माझ्याजवळ नव्हतं. पण मी वेळ मारून नेण्यासाठी म्हणालो," अबे पुण्यात बाईले 'बाई' नसते म्हणत. मावशी म्हना लागते. बाईचा अर्थ वेगळा होते इथं!" त्यानंतर तो जे बोलला ते इथे सांगण्यासारखं नाही ! ही गोष्ट अधूनमधून मला आठवतंच असते. कारण पुण्यात आल्यापासून आमच्या भाषेचा आणि प्रांताचा उद्धार झाल्याशिवाय एकही दिवस जात नाही. पुढच्या लिखाणात "आम्ही" / "आमचं" वैगेरे शब्द जास्त आढळले तर आश्चर्य वाटू देऊ नका. हे दोन शब्द पुण्यात "मी" / माझं" च्या ऐवजी सर्वनाम म्हणून वापरण्यात येतात. इथेच खरी गम्मत आहे. एरवी चहासुद्धा कोणी शेयर करणार नाही पण "आमचं" वैगेरे शब्द हमखास वापरतील. असो. तर या उद्धार वैगेरे प्रकाराला आता आम्ही चांगलेच सरावलो आहोत. समोरच्याचा उद्धार करायला सुद्धा आता आम्ही मागेपुढे पाहत नाही. तसं वाद घालणं आम्हाला फारसं आवडत नाही. पण परप्रांतात गेल्यावर तिथली भाषा, चालीरीती शिकून घेतल्या पाहिजेत असं म्हणतात. या उद्देशाने पुण्यात आल्यावर आम्ही वाद घालणं शिकून घेतलं. आता वाद कोणत्याही विषयावर होऊ शकतो. आता हेच बघा ना, इथल्या लोकांना आमच्या प्रांताची ओळख म्हणजे "शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रांत" अशी आहे. आणि त्यांच्यासाठी तो चेष्टेचा विषय आहे. "आत्महत्या का करतात रे तुमच्या इथले शेतकरी?", कंपनीतल्या एका बाईंनी( मावशींनी असं वाचा!) मला विचारलं. मला वाटलं त्या गांभीर्याने विचारत असतील. मी म्हणालो," सतत दुष्काळ असतो तिकडे. पीक फारसं येत नाही. पिकलं तर भाव मिळत नाही. कर्जबाजारी होतात बिचारे. दुसरा काही पर्याय दिसत नाही त्यांना. मग करतात आत्महत्या" यावर त्या म्हणाल्या," पुण्यातही घर घेताना कर्जबाजारी व्हावे लागते. म्हणून काय सगळे आत्महत्या करतात का ? मूर्ख आहात तुम्ही लोकं! कधी बाहेरचं जग बघितलेलं नसते." उत्तरादाखल मी त्यांच्यासमोर एका कोऱ्या कागदावर महाराष्ट्राचा नकाशा काढला. आणि त्यांना म्हणालो, " तुम्ही खूप जग बघितलेलं दिसतंय. या नकाशावर पुणं सोडून इतर किमान दहा जिल्हे तरी दाखवा !" थोडा विचार केल्यावर त्यांनी मुंबई दाखवलं. बाकी वाद अजूनही सुरूच आहे. ह्यात त्यांची काहीच चूक नव्हती. कारण पुण्यातल्या लोकांना कधी नकाशा बघण्याची गरजच पडत नाही. त्यांच्या लेखी येरवड्याच्या पलीकडे मराठवाडा आणि हडपसरच्या पलीकडे दक्षिण भारत सुरु होतो ! त्यामुळे नकाशात कशाला पाहायचं? एका सदाशिवपेठी पुणेकराने तर मला सांगितले होते की , अलका चित्रपटगृहाचा चौक, स्वारगेट आणि शनिवारवाडा हे ३ शिरोबिंदू जोडून जो त्रिकोण तयार होतो तेच खरे पुणे. या त्रिकोणाच्या संदर्भात पुण्याच्या सीमारेषा म्हणजे मुठा नदी, लकडी पूल, टिळक रस्ता आणि शिवाजी रस्ता. मी त्यांना म्हटलं," काका ,या हिशोबानी तर पुणे महानगर पालिका भवन सुद्धा पुण्यात येत नाही मग पुण्याला खेडेगाव म्हणून घोषित करून टाका ना!" त्यादिवसापासून ते मला भेटलेच नाहीयेत. आता तुम्ही म्हणाल की पुण्यातले लोकं मुळातच संकुचित विचारांचे आहेत वगैरे वगैरे . पण म्हणतात ना , दिसतं तसं नसतं. संकुचित तर सोडाच पुण्यासारखी खुल्या दिलाची लोकं पृथ्वीच्या पाठीवर कुठेही सापडणार नाहीत. समोरच्याचा अपमान सुद्धा ते खुल्या दिलाने करतात. अपमान करताना मुक्तहस्ताने शब्दांचा वापर करणे तर पुण्यातच शिकावं. आता हेच बघा ना,समजा एखाद्या पुणेकराच्या घरासमोर तुम्ही गाडी पार्क केलीये. तर फक्त चाकातली हवा सोडून तो शांत बसणार नाही. गाडीवर एखादी चिट्ठी लिहून ठेवेल. " पुढल्यावेळी गाडी घरासमोर नव्हे तर समोरील मोकळ्या जागेत पार्क करा अन्यथा चाकातील हवा सोडून जागा मोकळी करण्यात येईल" पुण्यात आल्यावर आणखी काही गोष्टी शिकायला मिळाल्या. एक म्हणजे, विषय कोणताही असो त्याचा शेवट नेहमी "आम्ही" / "आमचं" असं करून स्वत:च कौतुक करून घेणे! जागतिक विषयसुद्धा हे लोकं वैयत्तीक पातळीवर आणू शकतात. उदा. काश्मीर सीमाप्रश्नावर जर चर्चा सुरु असेल तर शेवटी," म्हणूनच घर भाड्यानी देताना आम्ही लेखी करार करून घेतो. उद्या उठून भाडेकरयाने घरावर हक्क सांगायला नको." असं ऐकू येतं. दुसरी म्हणजे , स्वाभिमान या शब्दाच्या अर्थावर पुणेकरांच एकमत आहे. 'दुसर्याशी भांडताना कामात येतो तो स्वाभिमान'. याविषयी एका पुणेरी मित्राने मला सांगितलं होतं,"आम्हाला अन्याय सहन होत नाही रे. आणि तुम्हाला वाटतं आम्ही भांडतोय. जी गोष्ट आमची आहे त्यावर तुम्ही हक्क सांगू नका". आता ही चर्चा कंपनीत मी त्याच्या खुर्चीवर बसलो होतो यावरून सुरु होती. अन्यायाची इतकी व्यापक परिभाषा टिळकांना पण उमगली नसेल!! पुणेकरांच खाद्यप्रेम तर सर्वश्रुत आहेच. पण त्यातही स्वाभिमान डोकावू शकतो. उदा. आम्ही आणलेला आंबा हाच अस्सल हापूस आहे हे सिद्ध केल्याशिवाय त्यांना हापूस गोड लागतंच नाही. कुछ भी करनेका लेकिन इगो हर्ट नही करनेका हा संवाद पुणेरी पगडीतल्या सुपीक डोक्यातुनच आला असेल. काहीही असो. पण आमच्या दोन वेळच्या भाजी - भाकरीची सोय केलेल्या या पुण्यनगरी विषयी आम्हाला अतिशय आदर आहे. आता आम्ही राहतो तो भाग पुण्यात येतो की नाही किंवा भाकरी फक्त पुण्यातच कशी चांगली मिळते हे वादाचे विषय होऊ शकतात. पण त्यासाठी पुणेकर आहेतंच. तूर्तास भाकरी गोड मानून घेणे एवढेच आमच्या हातात आहे!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राहती जागा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
36473 वाचन

💬 प्रतिसाद (157)

प्रतिक्रिया

दोन्ही शहरांशी जवळचं नातं

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 03/21/2015 - 10:42 नवीन
दोन्ही शहरांशी जवळचं नातं असल्यानी दोन्ही शहरांची बाजु घ्यावी लागते. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

चुकून 'बाजु' वाचलंच नाही :ड

काळा पहाड
Sat, 03/21/2015 - 12:57 नवीन
चुकून 'बाजु' वाचलंच नाही :ड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

नाही वाचलं तरी चालेल.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 03/21/2015 - 14:18 नवीन
=)) नाही वाचलं तरी चालेल. वेळप्रसंगी घ्यावीही लागते =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

मलाही नेहमी हाच प्रश्न पडतो

जयन्त बा शिम्पि
Tue, 03/24/2015 - 03:06 नवीन
मलाही नेहमी हाच प्रश्न पडतो कि पुण्यात काय चांगले आहे ? हवामान ? ( आता प्रदूषण आणि काँक्रिटचे जंगल ) , भंगार बसेस , मुजोर चालक व वाहक आणि भंगार वाह्तूक व्यवस्था , ज्यांचा अजिबात धाक नाही असे पोलिस मामा , सिग्नल ला अजिबात न जुमाणता " हाण तिच्यायला ! " अशा गुर्मित चालणारे बाइक वीर , यादी केली तर पानेच्या पाने भरतील! ! लेख चांगला आहे. पुलं च्या " तुम्हाला कोण व्हायचे आहे ? मुंबैकर, पुणेकर कि नागपुरकर ? " या लेखाची आठवण झाली रसिकांनी जरूर वाचावा , पुलं ची एक चारोळी आहे " मी रहातो पुण्यात , म्हणजे विद्वत्तेच्या ' ठाण्यात ', यातच सर्व काही आले!
  • Log in or register to post comments

असा प्रश्न कोणत्याही

कहर
Wed, 03/25/2015 - 09:25 नवीन
असा प्रश्न कोणत्याही शहराबाबतीत पडू शकतोच कि … मुंबईत काय चांगले ? प्रदूषण आणि काँक्रिटचे जंगल, झोपडपट्टी, दहशतीचे जगणे, UP आणि MP ची घुसखोरी… नागपुरात 'गरमी', अमेरिकेत उदात्त स्वातंत्र्याच्या नादात बिघडलेली पिढी … बघण्याचा दृष्टीकोन असा असेल तर जगात काहीच चांगले दिसणार / मिळणार नाही राव तुम्हाला *diablo*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयन्त बा शिम्पि

प्रस्तुत लेख , लोकप्रभा मध्ये

चिनार
Mon, 05/04/2015 - 11:04 नवीन
प्रस्तुत लेख , लोकप्रभा मध्ये प्रकाशित झाला आहे. खालील दुवा बघावा ! http://epaper.lokprabha.com/488897/Lokprabha/08-05-2015#dual/54/2
  • Log in or register to post comments

अभिनंदन. एका मिपाकराचा लेख

मृत्युन्जय
Mon, 05/04/2015 - 12:31 नवीन
अभिनंदन. एका मिपाकराचा लेख लोकप्रभात छापुन आला याचा आनंद आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा