मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संग - भाग 5

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
28 Feb 2015 - 9:04 pm

भाग 5
फुकट फजिती!
“... प्रवास असे दुचाकीचा । रम्य तरीही धकाधकीचा। अशात बादशाही थाटाचा । बडेजाव कशाला? ।। या विचारानुसार निवडलेली आडवाटेवरची देवळं, छोटे खानी हॉटेलं, डेरेदार वृक्ष, शेतातील माच, भटक्या जमातींचे तंबू हीच माझी विश्रांती अन् निवाऱ्याची ठिकाणं होती. अकस्मात घडणाऱ्या घटनांचा सूक्ष्म थरार होता. साहसाची अशी ही एक भावना होती की जिला उघड्यावरच्या रात्रींची ओढ होती. मोकळ्या हवेत ठोकलेल्या माझ्या या तंबूला चांदण्यानी सजलेलं छतही होतं मेघांची तलम झालरही होती. स्वर्गाच्या वेशीवरून उधळलेल्या ताऱ्यांची रुपेरी ओंझळ सुद्धा मला या छताकडून भेटीदाखल मिळत होती....”
उधमपूर नंतरची पोटसफाई!

1

माझी पोटाची तक्रार वाढत होती. मात्र काहीतरी हालचाल करणं भाग होतं. प्रसंग मोठा विनोदी होता. सर्वजण रस्त्याकडेच्या रेस्टॉरंटमधे जेवणात गुंतले होते. तोवर कार्यक्रम उरकता येईल म्हणत वॉटर बॅग सांभाळत मी रेस्टॉरंटच्या पार्श्वभागाकडे निघालो. घोट्याइतके गवतातील चिखल-पाणी तुडवीत मी झाडाझुडपांनी भरलेल्या त्या अवघड जागेकडं निघालो. प्रश्नही अवघड जागेचाच...!
सर्वत्र निसरडं होतं कुणीतरी मंत्र टाकून खेचून घ्यावं तसा मी पुढे सरकलो. गवतामुळे अंदाज आला नसावा. पण चार पावलं चालून गेलो नसेन, अचानक बुटाचे तळवे चिकचिक जागेवरून निसटले. आणि लोण्यासारख्या चिखलातून मी त्या उतरत्या घळी मधेच घसतर गेलो!. एका क्षणात माझं भविष्य मला दिसलं! पण त्याच्या ही आधी प्रतिक्षिप्त हालचाल झाली होती. मधे आलेल्या झाडाची फांदी मी केंव्हा पकडली ... कशी पकडली, ते मला आजही आठवत नाही! परंतु मी स्वतःला तात्पुरतं थोपवून धरलं होतं. सोईस्कर जागेच्या फंदात मी एकाएकी भलत्याच अडचणीत आलो होतो. भीतभीत खाली डोकावलं तर मृत्यू जिभल्या चाटत काही फुटांवरच उभा होता!.... तशा थंडीतही मला घाम फुटला!
वर येण्यास कुठूनही सोपा रस्ता दिसत नव्हता. होता तो दरीकडेच जाणारा. मधल्या खडकावरून वाट आहे का हे पहायला तारेवरची कसरत करून मी त्या चिंचोळ्या टोकाकडे गेलो. आणि भक्कम पाईन वृक्षाचा आधार घेत खाली वाकलो, ...मला भोवळच आली. कारण पुढे पाय ठेवायलाही जागा नव्हती हाताचा चिखल पाईनच्या खोडाला पुसून मी मागे वळलो. आणि पुन्हा प्रत्नाला लागलो. पण आधार मिळेना.
चिखलमिश्रीत अपयशाखेरीज हातात काहीच आल्यानं भयचकीत झालो. निसर्गानं दिलेल्या या हाकेत एवढं संकट असेल असं वाटलं नव्हतं. खूप मोठ संकट आलं की कुणालाही देव आठवतो... तसा तो चक्क मलाही आठवला!. कुणातरी दिव्यनेत्रीनं तो जळी स्थळी, काठी, पाषाणी किंवा आपल्याच ठायी असतो, असं म्हटलय. मग कितीही निरपराधी माणसांना जेंव्हा बेवासरशी कुत्रापेक्षाही वाईट मरण येत तेंव्हा त्यांच्यातला हा देव कुठं असतो? शेवटी अशा प्रसंगी आपले अथक प्रयत्न हीच आपली खरी शक्ती असते! पौराणिक सिनेमात दाखवतात तसा कुठलाही देव-बीव अचानक अवतरून संकटमुक्त करण्यासाठी येणार नसतो. मला वाचवणारा माझा मीच होतो. हा श्रेष्ठत्वाचा अहंकार नव्हता. केवळ प्रयत्नाच यश आशेचा किरण ह्यावर दृढ विश्वास होता!
बाजूची दरी काळराक्षसाप्रमाणे अजस्त्र जबडा आऽऽऽ वासून पसरली होती. तर त्यातून बाहेर आलेल्या उताराची गिळगिळीत जीभ मला आत ओढू पहात होती. तो चिखलमय उतार इतका बुळबुळीत होता की तिथुन वर चढणं बोटांच्या चिमटीत पारा पकडण्यासारखं होतं! “धोक्याचे स्वरूप जेवढं गंभीर तेवढा या साहसाचा आनंद” अधिक या वाक्यातील वेडपट अतिशयोक्ती मला प्रथमच समजत होती. पुन्हा पुन्हा त्याच जागेवरचा चिखल तुडवण्यापलिकडे मी काहीच करू शकत नव्हतो. अंगाला बारीक कंप सुटला शेकडो मैल जिद्दीनं कापले असताना ही याक्षणी समोरचं 15-20 फुट अंतर तोडण्यात आपण असमर्थ ठरत आहोत... ही जाणीव दात काढलेल्या सर्वपाला काठीनं डिवचावं, तशी मला टोचू लागली.
त्यात कहर म्हणजे पोट शूळ केंव्हातरी आपोआपच थांबला होता! त्यामुळं आता घसरून पडण्याचं दुःख कमी होऊन विनाकारण कारण अडकून पडल्याचा संताप वाढला होता! यपूर्वी डोंगर चढायचे अनुभवांचे दोर तिथल्या चिखलात कुचकामी ठरत होते. ओहोटीच्या पाण्यासारखा मी पुन्हा मागे जात होतो. या चिखलात आता आपली परतीची पावले कधीच उमटणार नाहीत! या धसक्यानं रडवेला झालो! तरीही कुठल्याही अज्ञात शक्तीचा धावा वगैरे करायला मी जाम तयार नव्हतो! जवळच्या चाकूनं एक वेल तोडून वरच्या झुडपात अडकवून वर चढताना ती वेलच तुटल्यानं मी पुहा फरपटत गेलो. तसा भडकलोच! आपण इथं अडकून पडलो तर बस निघून जाणार, .. मग सायकल, सामान, पैशाचं काय? पुन्हाते सारं मिळवायचा आटापिटा वगैरे गोष्टींचं भान होऊन अंगावर वीज पडावी तसा पेटून उठलो! माझ्यातला माणून क्षणात रानटी झाली. त्या असहाय्य अवस्थेची एवढी चीड आली की यात्यापुढं यमराजानंही एक पाऊल मागे घेतलं असावं. देव (मरण) पावला होता.
चिखलात चाकून खड्डे करत त्वेशानं अधिकाधिक वर आलो. तेवढ्यात मुठीजवळ चाकूचे दोन तुकडे झाले!... आता कपाळावर हात मारावा तरी चिखल शेवटी दात ओठ खात तुटक्यापात्याचे घाव करीत खुरट्या गवताला धरून वर आलो. पाय लटलटत होते. बुटात चिखल अडकला होता. कपड्यांचाही अवतार झाला होता. तसाच घाईघाईनं निघालो. मी जर त्या दरीत कोसळोच असतो तर तिथल्या सदर गिधाडींना अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचा खाना मिळाला असा. एवढं नक्की.पंधरा मिनिटांची ती अनपेक्षित गड जिंकून हॉटेल जवळ परतलो. तेंव्हा बस न निघण्याच्या तयारीत होती. एव्हाना बस चा हॉर्न वाजू लागला. ‘ओ पापाजी वो पहलवान कित्थे ग्या?’ एक सरदार ओरडत होता. ‘ओय कहां गिया था एन्ना टैम?’ मी ही मन बोलता मी V करून दाखवला. ती माझ् विजयाची खूण होती ते त्या बापड्याला कसे कळणार!
विशेष खबरदारी घेऊनही एका प्रवाशाला चिखल लागल्यामुळं माझ्यावर गावठी कुत्र्याप्रमाणं भुकायला सुरवात केली. तो मधेच, ‘क्याशूस करान ए वत्सा’ असं काहीतरी काश्मिरीत बडबडला.... मी ‘सॉरी’ या स्वस्त शब्दाचा शिळापाव त्याच्या समोर टाकून त्याला कसंबसं गप्प केलं आणि माझ्याजागेवर येऊन बसलो. तोंडाला घाण वास येणारा तो प्रवासी जरा लांबच बसावा, ही माझी इच्छा चिखलाचे डाग पडलेल्या माझ्या कपड्यांनीच पूर्ण केली होती....!

मांडणीआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

एस's picture

28 Feb 2015 - 9:34 pm | एस

वा! चित्तथरारक!

श्रीरंग_जोशी's picture

28 Feb 2015 - 10:59 pm | श्रीरंग_जोशी

या संकटाचे वर्णन वाचून अंगावर काटा उभा राहिला.

शशिकांत ओक's picture

1 Mar 2015 - 11:32 am | शशिकांत ओक

अरूण वेढीकर च्या शेवटच्या वाक्याशी दोस्ती झाली असेल, ज्यांना श्रीनगरचा प्रवास अशासारखा बसेस मधून करायला लागला असेल. अशा माझ्या सकट सर्वांना गलिच्छ काश्मिरींचा अनुभव आला असेल.

रेवती's picture

1 Mar 2015 - 5:56 pm | रेवती

वाचतिये.