मुंबई ते काश्मीर सायकलनामा - भाग 2

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
13 Feb 2015 - 12:08 am

मुंबई ते काश्मीर सायकलनामा - भाग 2
भाग 2
इंदूर – देवास - सारंगपूर

अरूण वेढीकर सायकलवरून मजल दर मजल करत मध्य प्रदेशात येतात तेंव्हाच्या कथा भागातील मजा मजा सादर...
पान 60 इंदूर
... मध्य प्रदेशाची राजधानी होती. इंदूरवर अस्सल मराठी छाप दिसते. भाषेचा गोडवा कानात साठवावा असा. मराठीला उर्दू-हिन्दी शब्दांची खमंग फोडणी... ‘अरे यार माजरा काय आहे? खमखा चिल्लावून राहिलाय ? इतका शोर मचून का राहिलाय?...
... इंद्रेश्वर मंदिरामुळे याला इंद्रपूर म्हणत. पुढे इंदूर - इंदौर असा अपभ्रंश झाला...राजवाड्या पुढच्या गोयल मंदिरा शेवटी खास मिठाईची गल्ली आहे. तिथे गोड पदार्थ, भांगघोटा वगैरेची अनेक दुकाने दिसतात. फुफाट्यात भाजलेले किंवा तुपात तळलेले कणकेचे गोळे म्हणजे दालबाटी. तर तळलेले मसालेदार कंद म्हणजे गराडू...
पान 64 ... देवास
देवास मागे पडलं, मी माझ्या नादात होतो. इतक्यात उजवीकडच्या शेतातून एक क्रुद्ध झालेला एक बैल माझ्या रोखाने एवढा अचानक उधळला... त्याला चुकवण्याच्या प्रयत्नात मी त्याच्या सरळ रेषेत आलो आणि पुढच्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकले. मातीने भरलेल्या त्याच्या कणखर मस्तकाची निसटती धडक बसून मी सायकल सकट उडालो. ...त्याचं शिंग माझ्या बरगडीत अडकण्या ऐवजी कॅरियर वरील बॅगेत अडकल्यामुळे ती लांब जाऊन पडली. माझ्या डाव्या गुडघ्यावर मात्र या प्रसंगानं चांगलचं शिक्कामोर्तब केलं होतं. अर्थात लोकांची सहानुभूती व पाहुणचारही घडवला. ...
अर्ध्या घटके नंतर पुन्हा मार्गस्थ झालो. परंतु भलं मोठं वशींड हालवीत फेसाळलेल्या तोंडानं खेटून गेलेलं ते वृषभाचं धूड माझ्या कायमचं लक्षात राहिलं.... मी नदीकाठच्या मृत बैलाच्या शिंगावर माझी अंडरवेअर वाळत घातली होती.. ते या बैलाला कसं कळलं ते मला अजूनही कळलेलं नाही. ते काहीही असो. पण बंधू प्रेम असावं तर असं...!
... रात्रीचे 8.30 झाले होते. सायकल व सामान चक्क रस्त्याकडेच्या वाळूत ढिगाजवळच ठेऊन मी समोरच्या शेतात असलेल्या वऱ्हाडाकडे वळलो. काळोखातून ठेचकाळत निर्लज्जपणे पंक्तीच्या एका टोकाला फोल्डींग चेयर मिटावी तसा मटकन खाली बसलो.... ‘बंबय से आया हूं’ ह्या पुस्तीनं जादू केली. एवढ्यात एक पत्रावळ टाकून, ‘आवी मुसाफिर भाय, खाना खाव’... कुणीतरी तोंड वेंगाडत म्हणाले. काही जण हेंगाडी हेलात मराठी सुद्धा बोलत होते. तिथ इतकं उष्ट खरकट पडलं होतं माझ्यासारखे आणखी तार जण जेवून उठले असते.... मी सक्त मजूरीच्या कैद्यासारखा जेवू लागलो. गवताळ मैदानामुळं भरपूर ग्रास हॉपर्स होते. गॅसबत्यावरून ते जेवणातही पडत होते. परंतु हे अत्यंत तुकतुकीत पोपटी रंगाचे नि स्वच्छ असतात. त्यामुळे झुरळांसारखी त्यांची शिसारी येत नव्हती. उलट त्यांना आरामात काढताना ‘अशँ पलायचं नई बशीत. भाज्येल ना... लशापण तिकट हाये.’... असे मनांत म्हणत होतो.... सर्कसच्या तंबू सारखा घोळ असलेले झगे घातलेल्या अस्तव्यस्त बायका, काही अत्यंत रेखीव, कमनीय पण गचाळ, लोक बसल्या जागेवरून तंबाखूचा लाळ पचकन थुंकत होते. त्यांच्याकडे बघणं म्हणजे घशातला घास उलटण्याचीच भिती... आयुष्यात निदान जेवताना तरी मी अशी किडेगिरी कधी केली नव्हती. ...
...दिवसा जबरदस्त ऊन आणि रात्री भरमसाठ थंडी. निसर्गाच्या मनमानी स्वभावातला तो मोठा दुर्गूण होता. म्हणजे असं की रात्री मी निजत होतो कूलर मधे आणि दिवसा शिजत होतो तो कुकर मधे..
सारंगपूर
हे ठिकाण देवास पासून 16 किमीवर होतं. आता वृषभमुद्रांकित गुडघा छान ठणकू लागला होता. इथून अदमासे वीस एक किमीपर्यंत पोपटांच्या झुंडीच्या झुंडी पहायला मिळाल्या. त्यांच्या गतीत स्वातंत्र्यामुळं चापल्य होतच पण कुणाची लाचारी नसल्याने स्वरातही कर्कश्यपणा होता. वाटेत एका म्हशीच्या पाठीवर चक्क सात गायबगळे ओळीनं बसलंलं पाहिले. पटकन जमेल तसा फोटो काढावा म्हणून थांबलो. तेवढ्यात ते उडून पसार झाले...!
...पान 72 ... दोन एकशे फुटांच्या उंच टेपाडावरची एक आदिवासी गढी दिसली... आपला रस्ता चुकल्याची पक्की खात्री झाली. चुकलो खरा... तेवढ्यात गढीवर गलका झाला. पाठोपाठ 3-4 शिकारी कुत्री जंगल दणाणून सोडत माझ्या मागे लागली. माझं क्षणात पाणी पाणी झालं. विचार करायला क्षणभर उसंत नव्हता... जीव मुठी धरून मी सायकल पिटाळली. मगाचा चढाव आता माझ्या मदतीला आता घसरगुंडीसारखा धावून आला. तिथं मला वाचवणारे कुणीच नसल्यामुळे, दगड धोंडे, खड्डे, बरोबरचं सामान कश्शाचही भान न ठेवता मी धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखा निघालो. कुत्री ही फुटलेल्या धरणातून सुटलेल्या पाण्याच्या लोंढ्यासाऱखी मागे होतीच! सायकलचा आरसा रथावरील निष्णात सारथ्याप्रमाणे मला सूचना देत होता. तेवढाच आधार...!
अर्धा किमी तंगड्या उडवूनही हा द्विपाद प्राणी आपल्या तडाख्यात सापडत नाही असं पाहून त्या श्वान चौकडीचा आवेश मावळला. त्यातल्या एका दोघांनी आपापल्या पसंतीच्या दगडांना सलाम केल्यावर ते टोळकं माझा नाद सोडून पुन्हा गढीकडे वळलेलं दिसलं. कदाचित ती त्यांची हद्द असावी. तसं असेल तर हद्द संपली म्हणून नाहीतर मीच संपलो असतो...!
मगाशी मी – ‘रस्त्यावर कुण्णी कुत्रं ही नाही’ काय म्हटलं तर साली कुत्री मागे लागावी...
घामान थबथबून मी पुन्हा मुख्य रस्त्यावर आलो. एवढ्यात इंदूरकडे जाणाऱ्या एका सरदाराच्या मोटरसायकलवरून कसलं तरी पुडकं पडलं. मी जोरात शीळ मारून थांबवलं. तो वळून परतला. ‘ये संभालये’ मी ते त्याच्या हातात देत म्हटलं. त्यात काय होतं कळलं नाही पण तो मध्यमवयीन ग्रहस्थ इतका खूष झाला की त्यानं चक्क 10 रुपयाची नोट जबरदस्तीनं माझ्या टी शर्टाच्या खिशात कोंबली! (त्यावेळी 10 रुपये म्हणजे सुद्धा चंगळ होती!) त्याच्या दाढीधारी चेहऱ्यावरून कृतज्ञता ओसंडत होती. त्याचं नाव त्यान सुरजीत सिह परमार असं सांगितलं....
पान 74...
... उन आणि पडछायेच्या कललेल्या एकटेपणाला मी आधीच कंटाळलो होतो. मी त्या तरुतली पोहोचलो. तिथं आष्टा, जंगली बदाम,शाल्मली, करंज, पांढऱ्या फुलांनी नटलेला बुचाचा वृक्षही होता. तिथे उतरलेल्या लोकांची अवस्था मात्र रानटी होती. दाट जंगलात टोळ्या टोळ्यांनी राहणाऱ्या फासेपारधी वंशाचे ते लोक, मागासलेले असूनही खरे खुरे रसिक होते. भाले बर्च्या धनुष्य-बाण, जमिनीवरचे तसेच झाडावरचे फास त्याच बरोबर कुत्र्यांचा त्यांच्या शिकारीत महत्वाचा वाटा होता. अदिवासींच्या मानाने हे लोक खूपच बोल घेवडे होते!....
संध्याकाळी 5च्या सुमारास सारंगपूर इथं पोचलो.( बाझ बहाद्दर आणि राणी रुपमती या प्रसिद्ध प्रेमी जोडीमधल्या रूपमतीचा जन्म जिथं झाला तेच हे सारंगपूर!)...
... पुढे माऊ गावाजवळ एका देवळात थांबलो. गाभाऱ्यात खोलगट जागी महादेवाची अक्षरशः तडा गेलेली पिंड होती. इथं थांबावं की नाही असा विचारात असताना मी जे पाहिलं त्यानं माझ्या अंगावर सरसरून काटा आला. 6-7 फुटावर एका खांबापाशी भल्या मोठ्या नागाचं एक पिवळं जर्द वेटोळं फुटभर फणा काढून बसलं होतं! एरवी सर्पाची भिती न बाळगणारा मी या क्षणी इतका हादरलो की माझं मलाच नवल वाटलं...
... बैलगाडीखालीच चादर अंथरून पडण्याचा विचार मी अंमलात आणला. पेंढ्याचा एक गठ्ठ्या आरामात उशाखाली घेतला. विळ्याच्या पात्यासारखी दिसणारी चतकोर चंद्रकोर क्षितिजाकडे निघालेली पाहून पांढऱ्या ढगांच्या टारगट झुंडी तिला लगट करत होत्या. आणि आभाळाचं काय? ...
आबाळ होतं थकलं... वाकलं होतं पाठीत
गुपचुप मग झोपलं... चांदण्याच्या मिठीत!

......
भाग 3

मांडणीआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

रेवती's picture

13 Feb 2015 - 1:02 am | रेवती

वाह! छान उतारे आहेत.
हे खरे देशाटन आहे. चित्रविचित्र अनुभवांचे भांडार!

तुम्हाला आणि दुचाकी लेखकास धन्यवाद.

खटपट्या's picture

13 Feb 2015 - 2:14 am | खटपट्या

खूप छान !!

श्रीरंग_जोशी's picture

13 Feb 2015 - 5:57 am | श्रीरंग_जोशी

वेचक अनुभवकथन आवडले.

पदम's picture

13 Feb 2015 - 11:10 am | पदम

खूप मस्त

शशिकांत ओक's picture

13 Feb 2015 - 11:15 am | शशिकांत ओक

भोचक्या विवस्त्र ललनांचे सचैल स्नान?

रेवती's picture

13 Feb 2015 - 6:18 pm | रेवती

नको, वाचणार नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Feb 2015 - 11:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

घाबरू नका. ऐन वेळेला त्यांचा आणि आपल्या मधून एक लांsssssssssबलचक मालगाडी जाते. ती जाइपर्यंत त्यांचे स्नान संपून कपडे वगैरे घालून झालेले असते +D

शशिकांत ओक's picture

14 Feb 2015 - 9:56 am | शशिकांत ओक

मित्रांनो,
आपला सायकल पटू मित्र अरूण वेढीकर इतका सरदारजी नाही की तोच तोच ओलेता सीन पहायला पुन्हा पुन्हा थेटरात जाईल, या आशेने की कधीतरी ट्रेन उशीरा येईल...

शशिकांत ओक's picture

17 Feb 2015 - 11:01 pm | शशिकांत ओक

सरदारांच्या राज्यात....बाईक वरून जाणाऱ्रया सरदाराची स्त्यात पडलेली पर्स व महत्वाची कागदपत्रे परत करताना ...
10 रुपयाची नोट मिळवतो....
पुढील भागात

पैसा's picture

1 Mar 2015 - 6:24 pm | पैसा

खूपच छान लिहिलं आहे अरूण यांनी.