मुळ्याची पालेभाजी

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in पाककृती
30 Jan 2015 - 12:11 am

मिपावर बरेच जण पाकृ टाकतात. मग "आम्हीच का मागे रहावे ?" असे आम्हाला सारखे वाटत राहिले तर त्यात नवल काय ?

याच मेंदूभृंगाने छळल्यामुळेच केवळ घरात नेहमी आवडीने केली जाणारी आमच्या आवडीची मुळ्याची पालेभाजी जरूर सर्व त्या साभार अनुमत्या-परवानग्या घेऊन टाकत आहे. यात धाग्यात आमचा हक्क फक्त भारवाही हमालाचा आहे असे आम्ही अगोदरच झायीर करत आहोत, गैरसमज नसावा. :)

साहित्य :

आठ-दहा मध्यम आकाराची मुळ्याची पाने + १ मध्यम आकाराचा मुळा
२ मोठ्या मिरच्या
४ लसणीच्या पाकळ्या
१ मध्यम आकाराचा कांदा
१० ते १५ ग्रॅम गूळ
१/२ वाटी खवणलेले ओले खोबरे
२ चमचे गोडेतेल
चवीनुसार मीठ

 ..

कृती :

१. पाने व मुळा धुऊन घ्या. पाने बारीक चिरा. मुळा किसून घ्या.

२. कांदा, मिरची आणि लसूण बारीक चिरून घ्या.

 ..

३. कढईत २ चमचे तेल तापवून घ्या. त्यात मिरची आणि लसूण चांगले परता.

४. त्यात कांदा घाला आणि तो लालसर होईपर्यंत परता. नंतर चिरलेला मुळ्याचा पाला आणि किसलेला मुळा घाला व दोन मिनिटे परता.

 ..

४. आता मीठ घालून एक खोलगट झाकण ठेवा. झाकणात थोडे पाणी घाला यामुळे मुळ्याला सुटलेले पाणी वाफेच्या रूपाने बाहेर न जाता परत कढईतच पडते. अश्या तर्‍हेने मुळा स्वतःच्या पाण्यातच पाच मिनिटे शिजू द्या. मिठाने पाल्यास पाणी सुटते त्यामुळे भाजीत अधिक पाणी घालण्याची गरज नाही.

५. गूळ फोडून भाजीत घाला आणि परत २ ते ३ मिनिटे झाकणाखाली शिजू द्या.

६. झाकण काढून २-३ मिनिटे भाजी परता व थोडी सुकी झाल्यावर खवणलेले अर्धे ओले खोबरे परतून नीट मिसळवा.

 ..

७. उरलेले खोबरे भाजी सजवायला वापरा.

गरम गरम भाजी नुसती चपाती/पोळी बरोबर खा...

अथवा नेहमीच्या जेवणातली पालेभाजी म्हणून वाढा...

...आणि ताव मारा, अजून काय ?

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

30 Jan 2015 - 12:18 am | मुक्त विहारि

झक्कास..

तोंपासु...

आमच्या कडे ह्या भाजीत मुगडाळ वापरतात.

शिद's picture

30 Jan 2015 - 4:18 am | शिद

आमच्या कडे ह्या भाजीत मुगडाळ वापरतात.

असेच म्हणतो.

काय मस्त फोटू आलेत! पाकृही झकास, घरगुती आहे. अशीच भाजी फक्त कांदा न घालता करत असते. आता याप्रकारे करून पाहीन.
अगदी परवाच भारतीय दुकानात फक्त पाला विकायला ठेवला होता म्हणून घेतला नाही व दुसरे दिवशी हामेरिकन दुकानात फक्त मुळा दिसला. दोन्ही जोडीने विकायला यांचे काय जाते ते एक देवास ठाऊक!

अगदी अगदी ! मी पाक्रु वाचताना हाच विचार करत होते की २ खेट्या घालून मुळा आणायला लागणार. पण मी आणणार , माझी आजी कराय्ची ही भाजी पण तेन्व्हा कधी पाक्रु विचारली नाही. तुम्ही आता दिली तर नक्की करणार :)
फोत्टो साधे आणि म्हणून च सुन्दर :)

आजानुकर्ण's picture

30 Jan 2015 - 12:29 am | आजानुकर्ण

शेपू, मुळा, कांद्याची पात, कोबी वगैरे उग्र वासाच्या सगळ्या भाज्या आवडतात. सोबत मूगडाळ घालतो.

अत्रुप्त आत्मा's picture

30 Jan 2015 - 12:31 am | अत्रुप्त आत्मा

ही खाह्हाल्ली येकदोन्दा,
पन
आमाले निस्त्याच मुळ्याची भाजी आवडती ना बे!

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jan 2015 - 1:35 am | डॉ सुहास म्हात्रे

मलाही अगोदर आवडत नसे. पण या प्रकारे करून पहा, आवडेल.

आनन्दिता's picture

30 Jan 2015 - 3:17 am | आनन्दिता

आमच्या इथे फार्मर्स मार्केट मध्ये मस्त मिळतात मुळ्याची पाने.. नक्की करुन बघणार..

पिवळा डांबिस's picture

30 Jan 2015 - 3:41 am | पिवळा डांबिस

फोटो मस्त आहेत. पाककृतीही झकास असणार.
पण काय आहे की आमच्याकडे मुळा फक्त एकाच कामासाठी वापरतात.
चिरून तुकडे डाळीच्या आमटीत घालायला!
राग नसावा.

अवांतरः बाकी वाफाळणारा भात ह्या मुळा घातलेल्या डाळीच्या आमटीत कालवून सोबतीला नुकत्याच तव्यावरून उतरलेल्या तळलेल्या बांगड्याबरोबर काय झक्कास लागतो! :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jan 2015 - 12:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

तो बेत आमच्याकडेही आवडता आहे :)

पण शाकाहारी जेवणात ही पालेभाजी मजा आणते.

श्रीरंग_जोशी's picture

30 Jan 2015 - 5:58 am | श्रीरंग_जोशी

गेली अनेक वर्षे ही भाजी खाल्ली नाही.

या लेखनापासून प्रेरणा घेऊन मुळ्याची पालेभाजी करून बघीन.

मस्त पाकृ.दोन्ही घरात उगवलेलं पडलं आहे,मुळा कोण खाणार म्हणून!करुन पाहीन.

प्रचेतस's picture

30 Jan 2015 - 9:26 am | प्रचेतस

मस्त झालीय पाकृ.

पदम's picture

30 Jan 2015 - 12:22 pm | पदम

ह्या शनिवारि नक्कि

सानिकास्वप्निल's picture

30 Jan 2015 - 1:09 pm | सानिकास्वप्निल

मस्तं दिसतेय भाजी.
आमच्याकडे ह्यामध्ये गुळ न घालता त्यात सुके बोंबिल घालून , परतलेली भाजी फार आवडते.
इथे ही पाला असलेला मुळा मिळतच नाही, लाल छोटे मुळे मिळतात त्याचे आणि पांढर्‍या मुळयाचे पराठेच जास्तं बनतात घरी.
फोटो आवडला आहे, खासकरून चवळीच्या उसळीसाठी ;) अगदी फेव्हरीट उसळ :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jan 2015 - 4:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे वा. चवळीची उसळ माझीही अत्यंत आवडती आहे !

पैसा's picture

30 Jan 2015 - 1:58 pm | पैसा

पाकृ आणि सादरीकरण झकास! मात्र या भाजीत मी गूळ आणि लसूण घालत नाही. एकदा घालून बघेन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jan 2015 - 4:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

जरूर करून पहा. गूळ आणि लसणीने मुळ्याची तीव्र चव कमी होते आणि भाजी जास्त चवदार बनते.

विटेकर's picture

30 Jan 2015 - 2:19 pm | विटेकर

फोटो झकास !
विटुकाकू पण करते .. पन मला ही भाजी जरा चरबट लागते म्हणून आवडत नाही. मी मुळा नुस्ताच तोंडी लावायला घेतो. भाकरी आणि कोणतीही अन्य फळभाजी सोबत कच्चा मुळा ताटात स्वर्ग आण्तो ( मला ते काप केलेले आवडत नाही , तसाच तोडत तोडत खायचा, मज्जा येते )

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jan 2015 - 4:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

पाकृत दिलेले पदार्थ विषेशतः गूळ व ओले खवणलेले खोबरे यांच्यामुळे चव मस्त होते. झाकणावर पाणी ठेऊन शिजवण्याच्या पद्धतीमुळे भाजीला चरबटपणा येत नाही... उघड्या भांड्यात शिजवलेली भाजी तशी होते.

करून पहा. तुम्हाला कच्चा मुळा आवडतो म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे केलेली भाजी नक्कीच आवडेल.

मधुरा देशपांडे's picture

30 Jan 2015 - 2:27 pm | मधुरा देशपांडे

पाकृ आणि सादरीकरण आवडले. आता इथे मुळ्याचा पाला शोधायला हवा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jan 2015 - 4:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे धन्यवाद !

उमा @ मिपा's picture

30 Jan 2015 - 4:13 pm | उमा @ मिपा

दर आठवड्याला बनणारी भाजी. छान लागते. ओल्या खोबऱ्याचा सढळ हस्ते वापर असल्याने घरात सर्वांची आवडती.
फोटो छान आलेत, विशेषतः साहित्याच्या फोटोत लसूण ठेवण्याची स्टाईल आवडली.
चवळीची भाजी कशी केलीय तेही सांगा.

भाकरी आणि मुळ्याची भाजी एकदम झक्कास बेत असतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jan 2015 - 4:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

सहमत ! तांदळाची भाकरी आणि मुळ्याची भाजी... वाह् !!! *pleasantry*

मुळ्याची भाजी घरी सहसा करतात, पण मी तिच्या वाटेला उग्र वास असल्याने जात नाही. एकदा प्रयत्न करुन बघावा म्हणतो.. खाण्याचा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jan 2015 - 11:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

वरची पाकृ वापरून करा. उग्र वास निघून जातो आणि चवदार भाजी होते.

या पद्धतीनं केल्यावर मुळ्याचा उग्र वास जातो म्हणता ?
मग करून पहायलाच हवी ..

मुळ्यात गुळ जरा नवीन वाटले. वाघाच्या गळ्यात घंटा बांधून मांजर कशाला बनवायचे राहू दे ना वाघ्या.

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jan 2015 - 2:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

पहिले मलाही तसेच वाटले होते. पन यकडाव तशी करून बगा... कायकी बा, पन आवडंल बी एखांद्या येळंला :)

आरोही's picture

31 Jan 2015 - 11:02 am | आरोही

छान रेसिपी .सुंदर फोटो

डोळे (स्वःताचेच चोळून दोनदा खात्री करुन घेतली आहे). असो भाजी फर्मास दिसतेय. ईथे सुद्धा नुसताच पांढरा भाग मिळतो. आता पाला शोधणे आले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jan 2015 - 11:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

मग !

आमच्या हाताला चव नाही... पण जीभेला चोचले आहेत ना !!

शिवाय किचनात शिजवायची नाही पण नस्त्या डायरेक्टरगिर्‍या करण्याची आवड आहे ;)