✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक लघुकथा.....अमान

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Wed, 08/20/2014 - 14:23  ·  लेख
लेख
माझ्या बापाचे नाव ‘नासिर’ माझे नाव बुलू. हे माझे लाडके नाव. खरे नाव माझे मलाच माहीत नाही. आमच्या वस्तीचे नाव पुरा. नर्मदेच्या किनाऱ्यावर या वस्तीच्या आसपास आमच्या जमिनी होत्या. वस्तीवर दहा एक घरे असतील. एकूण लोकसंख्या असेल शंभर ! आब्बाचा मी खूप लाडका होतो. माझा भाऊ ‘अमान’ हा माझा लाडका होता. शेतात दिवसभर उंडारायचे आणि गिळायला घरी अम्माच्या मागे भुणभुण लावायची एवढेच काम आम्ही करीत असू. एकदा एका घोड्याला आम्ही विहीरीत पाडले पण कोणी आम्हाला रागावले नाही. आब्बाने तर माझ्या पाठीत लाडाने गुद्दा घातला. आमचे तसे चांगले चालले होते पण कसे त्याची आम्हाला कल्पना असायची कारण नव्हते. सगळे सातआठ महिने शेतावर काम करीत व उरलेले महिने बाहेर काम शोधत फिरत. आमच्या वस्तीचा प्रमुख होता ‘बुखूतखान’ याला सगळे आदराने ‘जमादार’ म्हणत. हे सगळे बदलले दोन वर्षापूर्वी. दरवर्षी आब्बा मला छोट्या तट्टूवर बसवून त्यांच्याबरोबर हिंडायला न्यायचा. तट्टूचा लगाम असायचा माझ्या चाचाकडे. त्याचे नाव ‘फिरंगी’. मी एकदा आब्बाला विचारले, ‘ आब्बा ! चाचाजानचे नाव फिरंगी कोणी ठेवले ?’ ‘ बुलू एकदा फिरंग्यांनी आपल्या जुन्या वस्तीवर हल्ला चढवला तेव्हा हा तुझा चाचा त्याच्या अम्माच्या पोटात होता. त्या धावपळीत तो या उघड्या जगात आला तेव्हापासून त्याला ‘फिरंग्या‘ हे नाव पडले ! पण तू मात्र त्याला फिरंग्या म्हणू नकोस. नाहीतर थप्पड खाशील. तो तुझा उस्ताद आहे माहिती आहे ना?’ ‘हो अब्बा !’ त्या सफरीत आम्ही चंपानेरपाशी नर्मदा पार केली. गेली दोन् वर्षे मी या सफरीवर येत होतो. पहिल्या वर्षी मी तट्टूवर बसून सगळ्यांच्या मागे उस सोलत आरामात जात असे. पुढे काय चालले आहे याची मला कल्पनाही नसायची. पुढच्याच वर्षी पुढे काय चालले असते त्याची मला झलक दाखविण्यात आली. मला अजूनही ते सगळे स्पष्ट आठवते. एका जाजमावर आब्बा, फिरंगी व अजून दोघे जण गपछप करीत होते. त्या दोघांच्या मागे जमादार व अजून दोघे बसले होते. गप्पांना अगदी जोर चढला होता. तेवढ्यात जमादार मोठ्यांने हसत ओरडला, ‘चलो पान लाओ’. हा इशारा, ज्याला आमच्या भाषेत झिरनी म्हणतात, मिळाल्यावर, त्याच क्षणी त्या दोन उतारुंच्या मानेभोवती रुमाल पडले व आवळले गेले. एकाने त्याचे डोके खाली दाबले. थोड्याच वेळात त्या माणसांचे तडफड करणारे पाय शांत झाले. एवढे झाल्यावर मला लगेचच तेथून हलविण्यात आले. त्या रात्री मी आब्बाला बरेच फालतूचे प्रश्र्न विचारले आणि त्याने त्या सगळ्यांची सविस्तर उत्तरेही दिली. ‘माणसे ठार मारणे वाईट नाही का ?’ ‘माणसाने मारले म्हणून थोडेच कोणी मरतो ? त्याला तर भवानी घेऊन जाते’ माझ्या बापाने उत्तर दिले होते. त्यानंतर गेल्या दोन वर्षात मात्र मी माझ्या आब्बाला, बुखुतखान व फिरंगीचाचाला रुमाल फेकताना अगदी जवळून पाहिले होते. एका वेळी तर मी आब्बाला मदतही केली होती. आज माझ्या इम्तहानचा दिवस होता. पार पडली तर मला रुमाल मिळणार होता. त्या सफरीत आम्ही १४००० रुपये लुटले व जवळजवळ दिडशे माणसांचे मुडदे पाडले. (त्या वेळी रात्री रोज आमच्या तळावर मांजर येत असे. हा आम्ही शुभशकून समजतो) माझा उस्ताद माझ्या कामगिरीवर खुष होता. संध्याकाळी अंधार पडल्यावर भवानीला गुळाचा नैवद्य दाखविण्यात आला व फिरंगीसमोर मला उभे करण्यात आले. त्याने त्याच्या हातातील रुमालाची गाठ सोडविली व त्यातील रुपायाचे नाणे माझ्या हातात दिले व प्रार्थना म्हटली. शेवटी माझ्या हातात एक रुमाल दिला व मला ‘ बरतोत’ म्हणून जाहीर केले. या वर्षी अमानला तट्टूवर बसवून फिरवण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली. मी त्याला सगळ्यांच्या मागे बरेच अंतर सोडून चालवत होतो. त्याची चेष्टामस्करी करत होतो. मधेच ते तट्टू पळवत होतो. अचानक काय झाले ते कळले नाही पण ते तट्टू उधळले व पळून गेले. ते सरळ पुढे आमची माणसे जेथे थांबली होती तेथे जाऊन थांबले. तेथे अमानने जे पाहिले ते व्हायला नको होते. तेथे अब्बा मुडद्यांचे पाय गुढघ्यात तोडत होता व फिरंगी एका मुडद्याच्या गळ्याभोवतालचा रुमाल सोडवत होता. गुडघ्यात पाय तोडून ते उलटे मुडपण्यात येत म्हणजे पुरायला कमी जागा लागत असे. पुढे जे घडले ते भयानक होते. अमान ते बघून थरथरु लागला व एक सारखा किंचाळू लागला. त्याला कोणी हात लावला की तो अधिकच तारस्वरात किंचाळू लागे. आब्बा तर त्याला नजरेसमोरही नको होता. त्याला शेवटी फेफरे भरले. त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. सगळ्यांनी त्याला धरण्याचा बराच प्रयत्न केला पण त्याच्या अंगात बारा रेड्यांची शक्ती संचारली होती. तो हात हिसाडून पळून जाई व परत धाडकन जमिनीवर पडे.... शेवटी संध्याकाळी अमानला सडकून ताप भरला व त्यातच त्याचा अंत झाला. तळावर आता स्मशान शांतता पसरली. आब्बाने घरी परत जायची तयारी चालविली. तो सारखा अम्माची आठवण काढत होता. असे यापूर्वी कधी झाले नव्हते. सगळ्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण शेवटी त्याचीही वाचा बसली. अब्बाला मी तर त्याच्या नजरेसमोरही नको होतो...शेवटी तो परत गेल्यावर फिरंगीने मला जवळ घेतले. मी कावराबावरा हो़ऊन केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे बघू लागलो... ‘बुलू तू हा धंदा सोड.’ ‘पण आब्बाला काय झाले ? ‘अमान त्याचा रक्ताचा मुलगा होता...तू तर रस्त्यावरुन उचलून आणलेला पोर आहेस्....एका मुडद्याचा !.’ मी निपचित पडलेल्या अमानकडे एक नजर टाकली. मी आमची ठगांची टोळी सोडली व तडक तसाच मुंबई इलाख्याला निघून गेलो..... जयंत कुलकर्णी.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
23682 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

सुन्न

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 08/20/2014 - 14:31 नवीन
सुन्न गोष्ट चांगली आहे असे तरी कसे म्हणु? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

डोक सुन्न झाल आहे........

युगन्धरा@मिसलपाव
Wed, 08/20/2014 - 15:20 नवीन
डोक सुन्न झाल आहे........
  • Log in or register to post comments

......

प्यारे१
Wed, 08/20/2014 - 15:34 नवीन
...... :(
  • Log in or register to post comments

धस्स्स...!

प्रभाकर पेठकर
Wed, 08/20/2014 - 15:50 नवीन
काळजाचा ठाव घेणारी कथा. खरी नसू दे एव्हढीच मनोमन इच्छा व्यक्त करतो.
  • Log in or register to post comments

काही अंशी काल्पनिक (!)

तुमचा अभिषेक
Wed, 08/20/2014 - 16:11 नवीन
काही अंशी काल्पनिक (!) आवडली कथा
  • Log in or register to post comments

सुन्न!! पण आवडली! मूळ गोष्ट

मनिष
Wed, 08/20/2014 - 16:36 नवीन
सुन्न!! पण आवडली! मूळ गोष्ट कुठल्या भाषेत आहे?
  • Log in or register to post comments

मी लिहिलेली असल्यामुळे मुळ

जयंत कुलकर्णी
Wed, 08/20/2014 - 16:41 नवीन
मी लिहिलेली असल्यामुळे मुळ गोष्ट मराठीतच आहे......
  • Log in or register to post comments

:-)

जयंत कुलकर्णी
Wed, 08/20/2014 - 16:44 नवीन
मी लिहिली नाही असे तुम्हाला वाटले असल्यास, ही कथा बर्‍यापैकी जमली आहे असे मी समजतो....:-)
  • Log in or register to post comments

नाही हो. मस्तच जमली आहे!

मनिष
Wed, 08/20/2014 - 16:55 नवीन
नाही हो. मस्तच जमली आहे! अंगावर शहारा आणणारी आहे - तुम्ही आधीही अनुवाद केले असल्यामुळे मला ही अनुवादीत असेल असे वाटले. काही दिवसांपुर्वीच कुठेतरी अशा टोळ्यांविषयी वाचले (कुठे ते आठवत नाही आता) - भारत पाकिस्तानच्या सीमेवर होत्या/आहे म्हणे. म्हणून तिथलीच एखादी प्रादेशिक कथा आहे का असे वाटले.
  • Log in or register to post comments

पुर्वी असे ठग होते.यापेक्षा

एसमाळी
Wed, 08/20/2014 - 17:00 नवीन
पुर्वी असे ठग होते.यापेक्षा जास्त क्रुरकथा वाचल्या आहेत. हि पण आवडली.
  • Log in or register to post comments

इरफान आणि नवाझुद्दीन सिद्दीकी

मनिष
Wed, 08/20/2014 - 17:08 नवीन
इरफान आणि नवाझुद्दीन सिद्दीकी यांची 'बायपास' ही शॉर्टफिल्म पाहिली होती. त्याचीही आठवण झाली - https://www.youtube.com/watch?v=f_TOOsJ5EHY
  • Log in or register to post comments

कथा तर सुन्न करणारी आहेच पण

शिद
Wed, 08/20/2014 - 19:01 नवीन
कथा तर सुन्न करणारी आहेच पण तुम्ही दिलेली हि शॉर्ट्फिल्म देखील तेव्हढीच अंगावर येणारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

हो. ही फिल्म अंगावर येणारी

मनिष
Wed, 08/20/2014 - 22:59 नवीन
हो. ही फिल्म अंगावर येणारी आहे खरंच. दोघेही कसलेले कलावंत अंगवर काटा आणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

.....................

अनन्न्या
Wed, 08/20/2014 - 17:19 नवीन
..........................
  • Log in or register to post comments

सुन्न!!

सूड
Wed, 08/20/2014 - 17:21 नवीन
सुन्न!!
  • Log in or register to post comments

कथा आवडली काका.

धन्या
Wed, 08/20/2014 - 17:23 नवीन
कथा आवडली काका.
  • Log in or register to post comments

कथा आवडली..

काव्यान्जलि
Wed, 08/20/2014 - 18:06 नवीन
कथा आवडली... डोक सुन्न झाल आहे.... ;(
  • Log in or register to post comments

पेंढाऱ्यावर एक कादंबरी आली

मीता
Wed, 08/20/2014 - 18:26 नवीन
पेंढाऱ्यावर एक कादंबरी आली होती जी कुमार सप्तर्षींच्या सत्याग्रही मध्ये प्रकाशित व्हायची .मला वाटतंय "ठगाची जबानी " अस काहीसं नाव होतं. वाचून काटा आला होता.
  • Log in or register to post comments

बापरे! भयानक गोष्ट आहे.

रेवती
Wed, 08/20/2014 - 18:35 नवीन
बापरे! भयानक गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments

खतरनाक कथा. मान गये!

बॅटमॅन
Wed, 08/20/2014 - 18:36 नवीन
खतरनाक कथा. मान गये!
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
Wed, 08/20/2014 - 20:42 नवीन
थोडक्यात आणि परिणामकारक! लघुकथा आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

थरारक !

सस्नेह
Wed, 08/20/2014 - 19:12 नवीन
जयंतकाका फार दिवसानी येणे केले तेही असे हादरा देत...
  • Log in or register to post comments

बापरे!

इनिगोय
Wed, 08/20/2014 - 22:54 नवीन
बापरे!
  • Log in or register to post comments

नुकतेच कुठेतरी रुमाल टाकून

मनिष
Wed, 08/20/2014 - 22:58 नवीन
नुकतेच कुठेतरी रुमाल टाकून हत्या करणार्‍या अशा ठगांच्या टोळीविषयी नुकतेच कुठेतरी वाचले...पण आठवत नाहीये आता, आणि अशक्य तगमग होतेय! :(
  • Log in or register to post comments

बरोबर, एका ठगाची जबानी/कबुली

खटपट्या
गुरुवार, 08/21/2014 - 00:46 नवीन
बरोबर, एका ठगाची जबानी/कबुली असा एक लेख आला होता लोकसत्ता मध्ये. स्वत: एका ठगाने त्यांच्या कार्य पद्धतीविषयी माहिती दिली होती. आता या टोळ्या बंद झाल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

कृपया लेखाची लिंक द्याल का?

मनिष
गुरुवार, 08/21/2014 - 10:00 नवीन
कृपया लेखाची लिंक द्याल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

शोधतोय !!

खटपट्या
Fri, 08/22/2014 - 00:22 नवीन
शोधतोय !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

मस्त कथा...

मुक्त विहारि
Wed, 08/20/2014 - 23:38 नवीन
आवडली...
  • Log in or register to post comments

कथा आवडलीच.

चित्रगुप्त
गुरुवार, 08/21/2014 - 01:52 नवीन
कथा आवडलीच, ठगांविषयी आणखी माहितीपर धागाही येऊ द्यावा.
  • Log in or register to post comments

http://www.marathivishwakosh

खटपट्या
गुरुवार, 08/21/2014 - 04:19 नवीन
http://www.marathivishwakosh.in/khandas/khand9/index.php?option=com_content&view=article&id=9932&Itemid=2&limitstart=1 "ठगाची जबानी" - प्रा. वा. शी. आपटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

जालावरून साभार

खटपट्या
गुरुवार, 08/21/2014 - 04:28 नवीन
जालावरून साभार Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

सुन्न करणारी कथा

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 08/21/2014 - 05:37 नवीन
सुरुवात वाचून कथा पुढे असे वळण घेईल वाटले नव्हते. यावरून आठवले - पेंढार्‍यांपासून संरक्षाणासाठी माझ्या शहरात अनेक पिढ्यांपूर्वी उभारलेला परकोट अजुनही सुस्थितीत आहे.
  • Log in or register to post comments

सर्वांना धन्यवाद !

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 08/21/2014 - 07:54 नवीन
सर्वांना धन्यवाद !
  • Log in or register to post comments

कर्नल स्लीमन ह्याने ठग

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 08/21/2014 - 08:40 नवीन
कर्नल स्लीमन ह्याने ठग लोकांचा बंदोबस्त केला हे नेहमी वाचायाचो!! पण एका रात्रीत १५० मुडदे?? होली शिट!!!! बाप रे बाप!!!! ब्रिटिश सी आय डी (त्यांची त्या काळची गुप्तहेर संघटना) ह्या लोकांस एजेंट्स म्हणून रिक्रूट करत असे असंही एके ठिकाणी वाचले होते!! ज़रा वेगळा पर्सपेक्टिव बघायला मिळाल तुमच्या कथेतुन
  • Log in or register to post comments

रात्रीत नाही सफरीत

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 08/21/2014 - 08:58 नवीन
त्या सफरीत १५० मुडदे पाडल्याचा उल्लेख आहे. सफर नेमकी किती दिवसांची होती हे लिहिलं नाहीये. पण एका रात्रीची नक्कीच नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

श्रीरंग जी , बरोबर!!!

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 08/21/2014 - 10:09 नवीन
श्रीरंग जी , बरोबर!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

हा लेख वाचा

एस
गुरुवार, 08/21/2014 - 11:40 नवीन
कारवाईपेक्षा निर्धार हवा! ह्या सुरेश खोपडे यांच्या लेखात ठगांबद्दल आणि मेजर जनरल विल्यम हेन्‍री स्लीमन याने ठगांच्या केलेल्या बंदोबस्ताबद्दल छान माहिती दिली आहे.
ठगांच्या एखाद्या टोळीला प्रवाशांचा समूह दिसला, तर ते त्यांच्याशी मैत्री वाढवीत व सगळ्या प्रकारची मदत करून त्यांचा विश्‍वास संपादन करीत. प्रवाशांना संशय आला तर ठगांचा पहिला गट पुढे निघून जात असे आणि दुसरा गट त्यांची जागा घेत असे. ठगांच्या गटात संगीतकार व गायक असत. ते प्रवाशांचा शीण हलका करीत. विश्‍वास संपादन केल्याची खात्री पटल्यानंतर प्रशिक्षित ठग पुढे जाऊन निवांत आणि योग्य जागा शोधीत. बाजूलाच खोल खड्डे खणलेले असत. प्रवाशांना त्या जागी मुक्काम करण्याचा आग्रह केला जाई. दमलेल्या व भागलेल्या प्रवाशांसाठी गायनाचा कार्यक्रम सुरू होई. बाकीचे ठग हे प्रत्येक प्रवाशाच्या जवळ येऊन योग्य पवित्रा घेऊन तयारीत बसत असत. ठगांच्या टोळीचा प्रमुख "तमाकू खा लो" असं मोठ्यानं ओरडल्याबरोबर प्रत्येक प्रवाशाच्या गळ्याभोवती रुमाल आवळले जात. पाठीत लाथ मारून मणके मोडले जात आणि काही मिनिटांच्या आत सगळ्या प्रवाशांचे मुडदे जमिनीवर पडत. त्यांच्याजवळची सगळी चीजवस्तू लुटली जाई. मृत-अर्धमृत प्रवाशांचे सगळे सांधे मोडून प्रेतं खड्ड्यात पुरली जात. निरुपयोगी वस्तू जाळून पुरावा नष्ट केला जाई.
तो संपूर्ण लेखच वाचनीय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

राईट!! हाच लेख वाचला होता मी.

मनिष
गुरुवार, 08/21/2014 - 12:12 नवीन
राईट!! हाच लेख वाचला होता मी. २० जुलै २०१४ तारीख आहे - म्हणजे इतक्यातच आहे. मी सकाळच्या साईटवर शोधले, पण मला बहुतेक तो उत्तम कांबळेंचा लेख आहे असे वाटत होते, म्हणून त्यांचे सप्तरंगवरचे सगळे लेख शोधले पण मला नाही सापडला. उगाचच तगमग होत होती, आत बरे वाटतेय. ही लिंक दिल्याबद्द्ल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

लेख विचार करायला लावणारा आहे.

इनिगोय
Mon, 08/25/2014 - 08:05 नवीन
लेख विचार करायला लावणारा आहे. विशेषतः पुराव्यासंदर्भातला तोच कायदा आजही लागू आहे, शिवाय तांत्रिकदृष्ट्या त्या काळापेक्षा आज खूपच प्रगती झाली आहे, असे असूनही आज मात्र गुन्हेगारांची 'पुराव्याअभावी निर्दोष सुटका' होते, याला काय म्हणावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

न्यायव्यवस्था....

प्रभाकर पेठकर
Mon, 08/25/2014 - 10:23 नवीन
शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एकाही निरपराधाचा बळी जाऊ नये अशी आपल्या न्यायव्यवस्थेची धारणा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

अरे बापरे!

पैसा
गुरुवार, 08/21/2014 - 09:23 नवीन
काय जबरदस्त कथा आहे! वातावरणनिर्मिती अगदी सुरेख जमली आहे. काटा आला अंगावर. पोटापाण्याचे हे असलेही व्यवसाय असतात! :(
  • Log in or register to post comments

कथा आवडली

mbhosle
गुरुवार, 08/21/2014 - 09:49 नवीन
कथा आवडली
  • Log in or register to post comments

.

सुहास..
गुरुवार, 08/21/2014 - 09:55 नवीन
.
  • Log in or register to post comments

प्रायवेट इंडीया..

तुषार काळभोर
गुरुवार, 08/21/2014 - 18:35 नवीन
अश्विन संघीच्या या नव्या पुस्तकात मागच्याच आठवड्यात "ठग" परंपरेचा संदर्भ वाचला होता.
  • Log in or register to post comments

....अगदी नेहमीप्रमाणे परिणामकारक उत्तम लेख....!!

विनोद१८
गुरुवार, 08/21/2014 - 23:39 नवीन
'पारंपारिक ठग' किंवा 'कालचे ठग' म्हणजे काय ?? व त्यांची कार्यपद्ध्तीविषयी आज नेमकेपणाने समजले. एखादी जमात या अशा पद्धतीने आपली उपजिवीका करत असे...!!! विस्मयकारक. या 'कालच्या ठ्गांचा' नायनाट करुन इंग्रजांनी आपल्यावर उपकारच केले म्हणायचे, पण 'आजच्या ठगांचा' बंदोबस्त.... ??? धन्यवाद..श्री. ज. कुलकर्णी
  • Log in or register to post comments

ज ब रा ट !

मदनबाण
Fri, 08/22/2014 - 12:12 नवीन
ज ब रा ट !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis
  • Log in or register to post comments

खलास !

वेल्लाभट
Fri, 08/22/2014 - 16:52 नवीन
काटाच अंगावर !!!!!! काहीच्या काही गोष्ट. काहीच्या काहीच. चांगल्या अर्थी म्हणतोय बरं का. अफाट. अंगावर येणारी. बर राग मानणार नसेल कुणी तर, शीर्षकातला घू दुसरा आहे तो चुकीचा आहे. लघुकथा. असं असायला हवं ते.
  • Log in or register to post comments

राग कसला आमची तशी व्याकरणाची

जयंत कुलकर्णी
Fri, 08/22/2014 - 17:10 नवीन
राग कसला आमची तशी व्याकरणाची बोंबच आहे.....घेतो दुरुस्त करुन...
  • Log in or register to post comments

_/\_

वेल्लाभट
Fri, 08/22/2014 - 23:57 नवीन
:) थँक्स
  • Log in or register to post comments

अप्रतिम

पिंपातला उंदीर
Sat, 08/23/2014 - 10:10 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा