✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

योगी पावन मनाचा

ध
धन्या यांनी
Tue, 01/07/2014 - 17:41  ·  लेख
लेख
मुक्ता, नावाप्रमाणेच मुक्त असलेली निवृत्ती, ज्ञानदेव आणि सोपानाची ही सर्वात धाकटी बहिण. वयाने धाकटी असली तरी मोठमोठयांचा नक्षा आपल्या ज्ञानाच्या अधिकारावर क्षणात उतरवून टाकणारी ती तेजस्वी मूर्ती होती. अश्विन शुद्ध प्रतिपदा शके १२०१ साली शुक्रवारी म्हणजेच इ. स. १२७९ ला जणू काही आदिशक्ती मुक्तेच्या रुपाने इंद्रायणीतिरी सिद्धबेटावर जन्माला आली. ज्ञानाने लखलख करणारी आकाशीची वीजच जणू चांदण्यांचा शीतल साज लेवून आपल्या ज्ञानी भावंडांना साथ देण्यासाठी भूतलावर अवतरली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता या चार भावंडांमध्ये मुक्ता सर्वात धाकटी. परंतू आळंदीच्या ब्राम्हणांच्या सांगण्यानूसार जेव्हा त्यांच्या आई बाबांनी त्रीवेणी संगमात देहत्याग केला, तेव्हापासून या असाधारण कुटुंबाचे गृहिणीपणाची जबाबदारी मुक्तेवर पडली. त्यामुळे खेळण्या बागडण्याच्या बालवयातच मुक्ताई प्रौढ गंभीर, सोशिक समंजस बनली. हळव्या निरागस वयात जीवनाच्या वास्तव सत्याकडे आणि कठोर स्वरूपाकडे निर्लीप्तपणे पाहण्याचे प्रगल्भ प्रौढत्व तिच्यात आले. मुक्तेने आपल्यापेक्षा मोठ्या भावंडांना मायेची पाखर दिली. वात्सल्याने सावरले व प्रसंगी जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने फटकारले देखील. म्हणुनच तर पाठची बहीण असूनही जगावर रुसुन बसलेल्या आपल्या ज्ञानदादाला तिने अधिकारवाणीने समजावले. संत कोणाला म्हणावे, संताची वागणूक कशी असावी हे ज्ञानदादाचा मनावर बिंबवले. ही समजूत घालत असताना मुक्तेने उस्फुर्तपणे जे अभंग गायले तेच पुढे ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध झाले. ताटीच्या अभंगात मुक्तेचे हळुवार, समंजस, प्रसंगावधानी, उच्च पातळीवरचे व्यक्तिमत्व साकार झाले आहे. त्यात मुक्तेने जी संतत्वाची लक्षणे सांगितली आहेत ती मूर्तिमंत तिच्या व्यक्तित्वात दिसून येतात. -- १ -- संत जेणें व्हावें । जग बोलणे साहावें ॥ तरीच अंगी थोरपण । जया नाही अभिमान ॥ थोरपण जेथे वसें । तेथे भूतदया असें ॥ रागें भरावे कवणाशी । आपण ब्रम्ह सर्वदेशी ॥ ऐशी समदृष्टी करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- २ -- योगी पावन मनाचा । साही अपराध जनाचा ॥ विश्व रागें झाले वन्ही । संती सुखें व्हावें पाणी ॥ शब्द शस्त्रें झालें क्लेश । संती मानावा उपदेश ॥ विश्व पट ब्रह्म दोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ३ -- सुखसागरी वास झाला | उंच नीच काय त्याला ॥ अहो आपण जैंसे व्हावें | देवें तैसेंचि करावें ॥ ऐसा नटनाटय खेळ | स्थिर नाही एकवेळ ॥ एकापासुनी अनेक झाले | त्यासी पाहिजे सांभाळिले ॥ शून्य साक्षित्वें समजावें | वेद ओंकाराच्या नावें ॥ एकें उंचपण केले | एक अभिमानें गेलें ॥ इतकें टाकुनी शांती धरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ४ -- वरी भगवा झाला नामें | अंतरीं वश्य केला कामें ॥ त्याला म्हणूं नये साधू | जगीं विटंबना बाधू ॥ आपआपणा शोधून घ्यावें | विवेक नांदे त्याच्या सवें ॥ आशा दंभ अवघें आवरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ५ -- संत तेचि जाणा जगीं । दया क्षमा ज्यांचे अंगी ॥ लोभ अहंता न ये मना । जगी विरक्त तोची जाणा ॥ इह परलोकीं सुखी । शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखीं ॥ मिथ्या कल्पना मागें सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ६ -- एक आपण साधू झाले । येर कोण वाया गेले? ॥ उठे विकार ब्रह्मी मूळ । अवघे मायेचें गबाळ ॥ माय समूळ नुरे जेव्हां । विश्व ब्रह्म होइल तेव्हां ॥ ऐसा उमज आदिअंतीं । मग सुखी व्हावे संती ॥ चिंता क्रोध मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ७ -- ब्रह्म जैसें तैशा परी । आम्हा वडील भूतें सारी ॥ अहो क्रोधें यावें कोठे । अवघे आपण निघोटे ॥ जीभ दातांनी चाविली । कोणें बत्तीशी तोडीली? ॥ मन मारुनी उन्मन करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ८ -- सुखसागर आपण व्हावें । जग बोधें निववावें ॥ बोधा करुं नये अंतर । साधू नाहिं आपपर ॥ जीव जीवासी पैं दयावा । मग करुं नये हेवा ॥ तरणोपाय चित्तीं धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ९ -- सांडी कल्पना उपाधी । तीच साधूला समाधी ॥ वाद घालावा कवणाला । अवघा द्वैताचा हो घाला ॥ पुढे उमजेना काय । उडत्याचे खाली पाय ॥ एक मन चेष्टा करी । भूतें बापुंडी शेजारी ॥ अवघी ईश्वराची करणी । काय तेथें केलें कोणीं ॥ पुन्हा शुद्ध मार्ग धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- १० -- गिरीगव्हारे कशासाठीं । रागें पुरवीली पाठी ॥ ऐसा नसावा संन्यासी । परमार्थाचा जो कां द्वेषी ॥ घर बांधिलें डोंगरीं । विषया हिंडे दारोदारीं ॥ काय केला योगधर्म । नाही अंतरी निष्काम ॥ गंगाजळ ह्रदय करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ११ -- अहो क्रोधे यावें कोठें । अवघे आपण निघोटे ॥ ऐसें कळलें उत्तम । जन तेची जनार्दन ॥ ब्रीद बांधिलें चरणीं । नये दावितां करणीं ॥ वेळे क्रोधाचा उगवला । अवघा योग फोल झाला ॥ ऐशी थोर दृष्टी धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- १२ -- अवघी साधन हातवटी । मोलें मिळत नाही हाटीं ॥ शुद्ध ज्याचा भाव झाला । दुरी नाही देव त्याला ॥ कोणी कोणास शिकवावें । सार साधुनिया घ्यावें ॥ लडिवाळ मुक्ताबाई । जीव मुदल ठायीचे ठायीं ॥ तुम्ही तरुनी विश्व तारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ ज्ञानियांच्या राजाची समजूत घालण्याच्या निमित्ताने ताटीच्या अभंगांमधून जगाला ईतका मोलाचा संदेश देणारी चिमुरडी मुक्ता तेव्हा जेमतेम नऊ दहा वर्षांची असेल. मुक्ता अतिशय स्पष्टवक्ती होती. एकदा ज्ञानदेवादी भावंडं पंढरपूरला गेली असताना तिथं त्यांना संत नामदेव भेटतात. त्यांना ज्ञानदेव नमस्कार करतात पण नामदेव त्याना नमस्कार करीत नाहीत. आपण ज्येष्ठ भक्त असल्यानं ज्ञानदेवांनी आपल्याला नमस्कार करणं योग्यच आहे, असं नामदेवाला वाटतं. ही गोष्ट मुक्ताईला रुचत नाही. ती नामदेवाला म्हणते - अखंड जयाला देवाचा शेजार । कां रे अहंकार नाही गेला? मान अपमान वाढविसी हेवा। दिवस असतां दिवा हातीं घेसी।। परब्रह्मसंगे नित्य तुझा खेळ। आंधळ्याचे डोहळे का बाट जाले? कल्पतरुतळवटी इच्छिली ते गोष्टी। अद्यापि नरोटी राहिली कां? घरी कामधेनू ताक मागूं जाये। ऐसा द्वाड आहे जगामाजी।। अशी नामदेवांची कानउघाडणी करुनच मुक्ताई थांबत नाही तर नामदेवांना भक्तीचं खरं मर्मच कळलं नाही, त्यासाठी योग्य गुरुपाशी जाऊन उपदेश आणि मार्गदर्शन घ्यायला हवं असा सल्लाही ती देते - झालासी हरिभक्त तरी आम्हा काय? आंतुली ती सोय न ठाउकी। घेउनि टाळदिंडी हरिकथा करिसी। हरिदास म्हणविसी श्रेष्ठपणे।। गुरुवीण तुज नव्हेचि गा मोक्ष। होशील मुमुक्षु साधक तूं। तुझ रुप तुवां नाही ओळखिलें। अहंतेतें धरिले कासयासी? मुक्तेने केलेल्या या कानउघाडणीनंतर नामदेवरायांचा अहंकार निवला. त्यांनी विसोबारायांना आपला गुरु केले. जी गत भक्तराज नामदेवांची, तीच गत योगिराज चांगदेवांची. योगसामर्थ्याने चौदाशे वर्ष जगणार्‍या चांगदेवाचं कोरं पत्र पाहताच ती उद्गारली, "अरेरे... एव्हढी चौदाशे वर्ष जगूनही हा चांगदेव योगी कोरडाच राहीला.". याच कोर्‍या कागदावर ज्ञानदेवांनी पासष्ट ओव्या लिहून चांगदेवाला पाठविल्या. आणि या चौदाशे वर्ष म्हातार्‍या बाळाने चिमुरडया मुक्ताईला आपला गुरु केलं. मुक्तेने केलेल्या अभंगांची संख्या मोजकीच असली तरी तिची अभंगरचना अतिशय प्रासादिक आणि रसाळ आहे. तिच्या अभंगांच्या ओळीओळीतून, शब्दाशब्दांमधून तिचा अध्यात्मामधील अधिकार, तिचे योगसामर्थ्य, तिची प्रौढ आणि प्रगल्भ जाण, तिचा आत्मविश्वास जाणवतो. इ. स. १२९६ मध्ये ज्ञानदेव आणि सोपानांनी एकामागोमाग समाधी घेतल्यानंतर निवृत्तीनाथ आणि मुक्ताई व्याकुळ झाले. दोघेही तिर्थाटनास निघाले. उत्तर महाराष्ट्रात तापी नदीच्या तीरावर मेहून येथे ते आले असताना सोसाटयाचे वादळ आले. जोराची वीज कडाडली आणि निवृत्तीनाथांची सर्वात छोटी बहीण मुक्ताई गुप्त झाली. आदीशक्ती आपल्या मुळ स्वरुपात विलीन झाली.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
33268 वाचन

💬 प्रतिसाद (139)

प्रतिक्रिया

स्वतःला सामान्य जाहिर

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 01/08/2014 - 21:37 नवीन
स्वतःला सामान्य जाहिर करण्यामागे बर्‍याचदा विनय दडलेला असतो... आणि स्वतःची ज्ञानी म्हणून जाहिरात करण्यामागे बर्‍याचदा आंधळे अहंकारी अज्ञान दडलेले असते... असे म्हणतात. स्वतःला अज्ञानी समजणार्‍याचे मन त्यात पडलेल्या शब्दबीजाचा विचार करायला तयार असते... त्याच्यातल्या अर्थाचा शोधबोध घ्यायला तयार असते, म्हणून ते बीज रुजून वाढण्याची शक्यता असते. मी सर्वज्ञानी आहे म्हटले तर अधिक ज्ञानची काय गरज ?... मग नविन कोणत्याही शब्दांचा विचाराविना अव्हेर होतो. म्हणजे ते शब्दांची स्थिती खडकावर पडलेल्या बीजाचीच नाही काय? असो. स्वतःला अज्ञानी समजून स्वतःचे ज्ञान वाढवत रहावे का सर्वज्ञानी समजून अचल डबके व्हावे हा ज्याच्यात्याच्या जाणीवेचा प्रश्न आहे. तेव्हा असोच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बर्फाळलांडगा

हे विषयांतर का हां मुख्य प्रश्न आहे कारण....

बर्फाळलांडगा
Wed, 01/08/2014 - 21:54 नवीन
सामान्यपणाची व्याख्या अस्तित्वापुढ़े तत्वज्ञान चुलीत घालणे ही आधीच स्पष्ट केल्या गेले आहे... आपण जर यात इनपुट्स देऊन वेगळेच वळ्न देणार असाल तर बुध्दिबळातिल बंड्या ठराल. अर्थात मी कोण हरकत घेणारा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

वळण??? मी तर "सरळ" अर्थ, जो

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 01/08/2014 - 22:04 नवीन
वळण??? मी तर "सरळ" अर्थ, जो मी पहिल्यापासून म्हणत होतो तोच अधिक स्पष्ट करायची गरज पडली म्हणून केला. पण बुध्दिबळातिल बंड्या वगैरे वरून तुमचे वाचन बरेच दिसतेय... म्हणजे अजूनही काही शब्द वाचताय... हे छानच आहे. म्हणजे याच्यापुढे उगाच चर्चा चालू ठेवून घाई करण्याची गरज नाही असे दिसते. रामराम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बर्फाळलांडगा

व्यासंगाबाबत माझा हुच्च अधिकार इतका मोठा आहे की

बर्फाळलांडगा
गुरुवार, 01/09/2014 - 02:32 नवीन
त्याची कशाची तुलनाच नको. तेंव्हा थांबुयाच. Allthough I strongly believes in and respect the differences between people.... it just I can't stand those who can't do the same.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

(No subject)

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 01/09/2014 - 12:53 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बर्फाळलांडगा

You are an Ace uncle ! definitely an Ace no doubt.

बर्फाळलांडगा
Fri, 01/10/2014 - 19:37 नवीन
पण चुकीच्या उतारीवर खेळलेला एक्का हमखास वाया जातो हा उपमर्द आपल्या बाबत घडू नये म्हणुनच थांबलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

वरील पूर्ण प्रतिसादाशी सहमत.

प्यारे१
Sat, 01/11/2014 - 03:17 नवीन
वरील पूर्ण प्रतिसादाशी सहमत. थोडं दोन पैसे माझ्या अल्प माहितीप्रमाणे, आपण ज्ञानेंद्रिय नि कर्मेंद्रियं ह्या मार्फत मिळवतो ती माहिती नि त्याचं ठराविक वेळी ठराविक प्रकारे केलं जाणारं उपयोजन म्हणजे ज्ञान होय. प्रचंड माहिती मिळवणं हे हल्ली आवश्यक होत चाललं आहेच. किमान आपल्या क्षेत्रात आवश्यक असले ली माहिती वेळोवेळी अपडेट करत राहणं हे गरजेचंच बनलेलं आहे. मात्र त्या माहितीचा नेमका नि नेटका वापर कसा व्हावा ह्याबाबत आवश्यक विचार कधी कधी असतो, बर्‍याचदा नसतो अथवा उलट. (व्यावसायिक पातळीवर असतो, वैयक्तिक पातळीवर नसतो. हे झालं व्यावहारिक बाबतीत. सर्वज्ञानी अथवा सर्वज्ञ ह्या शब्दाचा खरा अर्थ जे जाणलं असता सर्व काही जाणलं गेलं असं काही जाणणाराला सर्वज्ञ / सर्वज्ञानी म्हणावं. उदाहरणार्थ : जगातले यच्चयावत प्रकारचे, कलाकुसरीचे, वेगवेगळ्या नक्षीचे, सोन्याचे दागिने एका व्यक्तीला पहायला मिळणं शक्य नाही, शक्य झालं तरी (सगळे एकत्र आणलेच समजा तर) काल मर्यादेमुळे आवाक्यातलं नाही. मात्र सोने हा धातू आहे. ह्यापासून त्याप्रकारचे सगळे दागिने बनतात असं ज्यानं जाणलं त्याला सोन्याच्या बाबतीत सर्वज्ञ म्हणता येऊ शकतं. सोनाराच्या दृष्टीनं अथवा चोराच्या दृष्टीनं (दागिना कुठला हे पाहत नाहीत, त्यातलं सोनं बघतात.) सोनं 'जाणणं' हे सर्वज्ञ पणाचं लक्षण आहे. तपशीलापेक्षा तत्त्वाकडं जास्त लक्ष दिलं जाणं अभिप्रेत. एक धातू म्हणून सोनं. तसेच सगळे धातू असा विचार करता बराचसा भाग एका 'हेडींग' खाली येतो. लोखंड धातू नि सोने, प्लॅटिनम सुद्धा धातू. तसंच हे धातू, अधातू नि इतर सगळे 'मूलद्रव्य' प्रकारात गणले जावेत. असं करत करत एका लार्जर स्केलवर सगळ्याला आणून बसवलं तर त्याचं नाशिवंतपण लक्षात येतं. कधीतरी हे संपणार आहे, आपण ज्याचं मूल्या फार मानतो ते तसंच खरं आहे का असा विचार होतो नि आपलं हवं नको पण कमी कमी होत जातं. एखाद्या ग्रहावर हिरे, पाचू वाळूसारखे पसरलेले असले तर तिथं वाळू सारखा उपयोग केला जाण्याची शक्यता नाकारावी का? तिथं त्याची किंमत अगदी नगण्य असेल. (कदाचित हास्यास्पद वाटेल पण विपुलता ते दुर्मिळता हा एक महत्त्वाचा पात्रतानिकष लावला जातो) इ ए म्हणतात तसं व्यावहारिक पातळीवर ज्ञान मिळवण्यासाठी आवश्यक ते परिश्रम केलेच पाहिजेत. मात्र त्या व्यतिरिक्त असणारी माहितीची अकारण वखवख कधीतरी थांबावी जेणेकरुन आपण स्वतःकडे पाहू शकू असा विचार वरच्या 'खर्‍या' सर्वज्ञपणामध्ये आहे. त्याचं डबकं करुन घेणं अथवा आळशीपणा ला मुलामा खचितच नव्हे. अध्यात्म शब्दाचा अर्थच शरीराला धरुन/ शरीरात दडून राहिलेला आत्मा असा आहे. त्या दृष्टीनं सर्वज्ञानी अथवा सर्वज्ञ शब्दाचा वापर व्हावा. - १०० पूर्ण करण्याच्या हेतूनं टंकलेला प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

(No subject)

प्रचेतस
Sat, 01/11/2014 - 07:09 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आपण गीता प्रेस गोरखपुर ची बरीच पुस्तके वाचता वाटते ?

बर्फाळलांडगा
Sat, 01/11/2014 - 14:20 नवीन
चान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

एक सुचवणी...

धन्या
Sat, 01/11/2014 - 14:33 नवीन
मी गीता प्रेस गोरखपूरची खुप पुस्तकं वाचली आहेत. प्यारेंची लेखनशैली त्या पुस्तकांपेक्षा खुपच उजवी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बर्फाळलांडगा

लेखनशैली मरु द्या.

प्यारे१
Sat, 01/11/2014 - 15:15 नवीन
लेखनशैली मरु द्या. सेन्च्युरी काढून दिली. चेकचं बोला का रोख देताय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

क्षमस्व...

धन्या
Sat, 01/11/2014 - 19:28 नवीन
मी प्रतिसादांसाठी लिहीत नाही. प्रतिसाद मिळाले तर उत्तम नाही मिळाले तर त्याहून उत्तम. मी जे जे लिहितो त्यामगे काहीतरी "ट्रीगर" असतो. हा ट्रीगर माझ्याकडून लिहून घेतो. त्यामुळे माझं बरंचसं लेखन प्रासंगिक असतं. कुणी लिही म्हटलं की माझी प्रतिभा माझ्यावर रुसुन बसते. याच कारणामुळे कुठल्याही विशेषांकात माझं लेखन नसतं. एव्हढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद जय भारत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

__/\__

अत्रुप्त आत्मा
Sat, 01/11/2014 - 20:03 नवीन
__/\__ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

(No subject)

प्यारे१
Sat, 01/11/2014 - 20:11 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

धन्याशेट,

प्रसाद प्रसाद
Wed, 01/08/2014 - 13:34 नवीन
धन्याशेट, लेख अत्यंत सुंदर लिहिला आहे. दरवेळी ताटीचे अभंग वाचताना मुक्ताईच्या विचारक्षमतेचे आणि सोशिकतेचे एकूणच आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. भावंडं काहीतरी अद्भूत होती हेच खरे!
  • Log in or register to post comments

सुरेख

हासिनी
Wed, 01/08/2014 - 14:28 नवीन
सुरेख! सुरेख अन् सुरेखच!! खूप दिवसांनी सुंदर काही वाचायला मिळाल. धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments

धन्या.. रसाळ आणि सुंदर

गवि
Wed, 01/08/2014 - 14:38 नवीन
धन्या.. रसाळ आणि सुंदर लिहिलंयस. मला मात्र मुक्ताईच्या कथा ऐकताना आणि तिची पार्श्वभूमी (जी इथेही उल्लेखलेली आहे) वाचून हे सर्व एक आदर्श बोधपर तत्वज्ञान न वाटता एका बालपण हरवलेल्या मुलीविषयीचा करुण भावच दाटत राहतो. उदा. वयाच्या दहाव्या वर्षीच बालविवाह होऊन संसाराच्या चरकात ओढली गेलेली बालिका.. आणि ती अकराव्या वर्षी कितीही उत्तम स्वयंपाक करायला लागली असली तरी त्या पदार्थाने खाणार्‍या संवेदनशील माणसाच्या जिभेवर चव येण्यापेक्षा घशात आवंढाच जास्त यावा तसं. आपल्या पोरांनी लहान वयातच काय पण वयाच्या सत्तराव्या वर्षीही असे आणि इतके प्रौढ अन पोक्त विचार करु नयेत अशी इच्छा मनात भरुन येते.
  • Log in or register to post comments

बिंगो!

बर्फाळलांडगा
Wed, 01/08/2014 - 14:47 नवीन
मला कारुण्यभावाचि सातत्याने वाटणारी नेमकी हीच आहे की जो व्यथित आहे तोच करुण होउ शकतो... अन जो व्यथित आहे तो देव न्हवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

ambiguity नको म्हणुन पुढे स्पष्ट करतो

बर्फाळलांडगा
Wed, 01/08/2014 - 15:05 नवीन
जो व्यथित आहे तो देव न्हवे तर केवळ मनुष्यप्राणी होय.... आणि जो व्यथित मनुष्य आहे तोच मी फक्त विनोदी वाचतो अन गोष्टी सोप्या करतो म्हणता म्हणता म्हणता या धाग्यातिल करुण रसावर अंतर्मुख होतो अन दाद देतो ती ही तितक्याच खुळचट पणाची असते जितका खुळचटपणा तो चेस मधील खेळात कार्लसन बाबत प्रेडिक्शन करणे असो वा काळ अनुभवत असताना अस्तित्वात नाही याची टिमकी बडवताना दाखवत असतो. मनुष्याला ईश्वराची गरज अन अस्तित्व पटेल तोच खरा सुदिन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बर्फाळलांडगा

असहमत.

प्यारे१
Wed, 01/08/2014 - 14:50 नवीन
असहमत. भावना पोचतेय पण बालपण हरवणं वगैरे सापेक्ष आहे. एवढंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

का असहमत ?

बर्फाळलांडगा
Wed, 01/08/2014 - 16:18 नवीन
सामान्य आहात ना मग लहानाग्यांच्या अस्तित्वावर आलेला घाला पाहून आपले मन द्रवणार नाही हे मान्य.... पण त्यातही महान पणाची जी तत्वे ताटिच्या अभंगात विषद केली आहेत त्यांचा सोस का , जी तुम्हाला पाळावयाची नाहित ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

लिंगभेदादारित निपक्ष पाती वक्तव्ये सहन करण्याची क्षमता नसणारे

बर्फाळलांडगा
Wed, 01/08/2014 - 16:34 नवीन
जेंव्हा इथ मला भाऊ असं भाऊ तसं या धाग्याच्या तत्वाद्न्यानासंदर्भात म्हनतात तेव्हां इथला भाऊ म्हणुन घ्यायची शरम बाळगावी की त्यांच्या निपक्श पाती नसलेल्या मातीची कीव करावी याचा गोंधळ उडतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बर्फाळलांडगा

आपले म्हणणे वाक्यरचना

प्यारे१
Wed, 01/08/2014 - 16:47 नवीन
आपले म्हणणे वाक्यरचना व्यवस्थित असेल तर थोडंफार अशुद्धलेखन असून देखील मांडल्यास चालून जाईल. वर आपल्याला नक्की काय म्हणायचंय ते २-३ वेळा वाचून देखील मला उमजलेलं नाही. इथेच अथवा खरड/व्यनि मार्फत मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत करायला हरकत नाही. आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बर्फाळलांडगा

भावना पोचतेय पण बालपण हरवणं

धन्या
Wed, 01/08/2014 - 16:46 नवीन
भावना पोचतेय पण बालपण हरवणं वगैरे सापेक्ष आहे. एवढंच.
त्या चार भावंडांकडे "अवतार" म्हणून न पाहता माणसं म्हणून पाहा. तुम्हालाही त्यांचं हरवलेलं बालपण दिसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

बरं.

प्यारे१
Wed, 01/08/2014 - 17:23 नवीन
बरं. मात्र त्यातून साध्य काय होईल??? सगळं अनुकूल असताना देखील वेगळेपणानं प्रकाशणारी मुलं आज नाहीत का? सचिन तेंडुलकरचं बालपण रमाकांत आचरेकरांनी हरवलं? मारिया शारापोव्हा, विलियम्स भगिनी ह्यांची बालपणं हरवली? १४व्या वर्षी कास्पारोव्ह्च्या विरोधात खेळणारा आत्ताचा वर्ल्ड चॅम्पियन (कार्लसन ना?)त्याचं बालपण हरवलं? हे सापेक्ष आहे असं म्हणणं आहे. नथिंग मोअर. असहमती त्याहून जास्त वाटत असलेल्या अनाठायी करुणेला आहे. माणूस म्हणून विचार करता त्यांचं महानपण अजून जास्त अधोरेखित होतं. उत्तुंग प्रतिभा लाभलेली चार भावंडं असं म्हणा हवं तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

अवतार म्हणून पाहून नुस्त्या

बॅटमॅन
Wed, 01/08/2014 - 17:41 नवीन
अवतार म्हणून पाहून नुस्त्या व्यक्तिपूजेतून तरी काय साध्य होणारे? ज्ञानेश्वर काय किंवा मुक्ताबाई काय, चारही भावंडे अलौकिक प्रतिभावान होती. पुढं काय? नुस्ते उसासे सोडून हाती काहीच लागणार नाही. बाकी सचिन काय आणि कार्लसन काय, यांची तुलना ज्ञानेश्वरांच्या बालपणाशी अतिशय हास्यास्पद आहे. त्यांच्या आयुष्यात काय प्रसंग आले होते की ते उघड्यावर पडावेत? मेहनत हा एक भाग वगळला तर अन्य कुठल्याही पोरापेक्षा त्यांचं जीवन वेगळं नव्हतं, शिवाय फ्यामिलीचा भक्कम सपोर्ट होता त्यांना. ज्ञानेश्वरादि लोकांना होतं का असं काही? आईवडील नाहीत, समाज नुस्त्या शिव्या घालतोय अन जिवावर उठलाय. या परिस्थितीत त्यांनी असामान्य धैर्य दाखवले. पण म्हणून त्यांच्या बाल्याबद्दल कुणाला करुणा वाटली तर तिला हास्यास्पद ठरवणे हे अवतार अवतार म्हणून होणार्‍या व्यक्तिपूजेइतकेच हास्यास्पद आहे. पुढं काय हा प्रश्न तर कुठल्याही बाबतीत विचारता येतो. ततः किम्??????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मी त्यांना अवतार मानतो पण इथं

प्यारे१
Wed, 01/08/2014 - 18:25 नवीन
मी त्यांना अवतार मानतो पण इथं तसं जात्याच म्हटलं नाही. वरच्या प्रतिसादात तसा कुठलाही उल्लेख नाही. निव्वळ पूजा करुन काहीही होणार नाही ह्याची पूर्ण कल्पना आहे. एखादा रोग असेल तर तो मलाच औषध घेऊन नि पथ्य सांभाळून (योग्य व्यक्तीच्या सल्ल्यानं) बरा करावा लागेल ना की डॉक्टरच्या फोटोच्या दहा वेळा पाया पडून तसं. प्रत्येक माणूस प्रतिभावान तसा होऊ शकणार नाही कदाचित मात्र जशी ह्या चार भावंडांची अंतःस्थिती होती तशी मिळवू शकतो/ किंबहुना ती तशी होऊ शकते असं मानायला हरकत नाही. मुळात असहमती होती मुळात बालपण हिरावलं जाण्याबद्दल नि असं काही होऊच्च नये ह्या करुणेबाबत. ह्याचं कारण म्हणजे असं बालपण हरवलं जाणं नि तशी प्रगल्भता आल्याबद्दल कळवळणं हे आपल्याला आपल्या नजरेतून, आपल्या पातळीवरुन दिसणार्‍या गोष्टी आहेत. म्हणूनच ही सापेक्ष गोष्ट आहे असं म्हणालो. २१ वर्षांच्या संपूर्ण चरित्रामध्ये एकदाच हा माणूस समाजावर रुसला नि त्याची समजूत मुक्ताईनं काढली. इतर प्रसंगां मधून असं कधीही जाणवत नाही. वरील चौघे ही लहान वयातच ह्या सगळ्याच्या पल्याड गेले होते असंच वरील अभंगांतून दिसतंय. आत शांतता नांदत असल्याशिवाय प्रतिभेचं इतकं उच्च दर्जाचं प्रगटन शक्य नाही/नसतं. रेड्यामुखी वेद वदवल्याच्या चमत्कारानंतरच नमस्कार मिळणार्‍या समाजामध्ये अशा आईवडील नसणं, उघड्यावर पडणं ह्या घटनांतून 'आगीतून निघाल्यावर सोनं जास्त झळाळतं नि त्या सोन्याला जास्त किम्मत असते ( समाजाच्या दृष्टीनं )असं म्हणतात तशाच प्रकारचं काहीसं झालं हे निश्चित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ते चौघेही जात्या अवतार मानले

बॅटमॅन
Wed, 01/08/2014 - 18:53 नवीन
ते चौघेही जात्या अवतार मानले काय किंवा कुठल्यातरी एका वरिजिन पॉइंटनंतर मानले काय, फरक काहीच नाही. ते एक असोच.
मुळात असहमती होती मुळात बालपण हिरावलं जाण्याबद्दल नि असं काही होऊच्च नये ह्या करुणेबाबत. ह्याचं कारण म्हणजे असं बालपण हरवलं जाणं नि तशी प्रगल्भता आल्याबद्दल कळवळणं हे आपल्याला आपल्या नजरेतून, आपल्या पातळीवरुन दिसणार्‍या गोष्टी आहेत. म्हणूनच ही सापेक्ष गोष्ट आहे असं म्हणालो.
२१ वर्षांच्या संपूर्ण चरित्रामध्ये एकदाच हा माणूस समाजावर रुसला नि त्याची समजूत मुक्ताईनं काढली. इतर प्रसंगां मधून असं कधीही जाणवत नाही. वरील चौघे ही लहान वयातच ह्या सगळ्याच्या पल्याड गेले होते असंच वरील अभंगांतून दिसतंय. आत शांतता नांदत असल्याशिवाय प्रतिभेचं इतकं उच्च दर्जाचं प्रगटन शक्य नाही/नसतं.
हीच तर मजा आहे. आज इतक्या वर्षांनंतर आपल्यासमोर फक्त ज्ञानेश्वरांचं वाङ्मय आणि काही पारंपरिक माहिती इतकंच उपलब्ध आहे. त्यांना त्रास थोडाही झाला नसेल याची ग्यारंटी काय आहे? जे आपल्याला वाटतं ते सर्व लोक आहे तस्सं कधी लिहितात का? किंबहुना जे जे काही वाटतं ते तरी पूर्णपणे लिहितात का? संत झाले तरी 'सामान्य' लेबलवाल्या भावनांपासून साधकदशेत माणूस पूर्णपणे अलिप्त असतो असं नाही, उदा. तुकारामांच्या अभंगांतून वैफल्यात्मक वाटावेत असेही काही थोडे विचार आहेत. तुकाराम महान ठरले कारण ते वैफल्य उगाळत बसले नाहीत आणि पुढे गेले. हे आपल्याला कळतं कारण त्यांचे तसे अभंग आपल्यासमोर आहेत. ज्ञानेश्वर किंवा अजून कोणाचे तसे अभंग आपल्यासमोर नाहीत याचा अर्थ ती मधली फेज कधी आलीच नसेल असं आजिबात नाही. त्यामुळे कुणाला कणव आली तर ती अस्थानी आहे असं मला वाटत नाही. शेवटी व्यक्तिपूजक धारणेतून "कणव आली, ततः किम्" असा प्रश्न आलाच तर तोही तितकाच निरर्थक आहे. त्या चौघांचं कौतुक करायचं की तितकं डेरिंग दाखवण्याची कुणावर वेळ न येवो अशी इच्छा व्यक्त करायची? माझ्या मते दोन्ही योग्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

म्हणूनच भावना पोचतेय पण

प्यारे१
Wed, 01/08/2014 - 19:31 नवीन
म्हणूनच भावना पोचतेय पण सापेक्ष गोष्ट आहे(प्रत्येकाच्या दृष्टीकोनातून वेगवेगळी दिसणारी गोष्ट) असं म्हणतोय. बाकी वरचे ताटीचे अभंग थोडंसं साधक दशेचाच अनुभव देतात असं धारिष्ट्य करुन म्हणतो. रामदासांची करुणाष्टकं साधकदशेचंच वर्णन करवतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या उपलब्ध ऑथेंटिक चरित्र नि विपुल साहित्यामध्ये -ज्ञानेश्वरी, हरिपाठ, अमृतानुभव, वरील प्रसंगाव्यतिरिक्त इतर ठिकाणी वैफल्याची पुसटशी जाणीव दिसून येत असेल तर कृपया कळवावे. भावनांचं भावामध्ये दृढीकरण केलेले हे लोक आहेत. तो वेगळा विषय आहे. अवतार मानण्यामागे देखील पूर्वकर्म नि संचिताचा भाग असतो. तो देखील वेगळा विषय आहे. मानवी पातळीवर विचार करताना सुद्धा गविंनी उगाच करुणेचा सूर लावलेला दिसला म्हणून बोललो होतो. ही कणव अस्थानी वाटते कारण गविंचा दृष्टीकोन पूर्णपणे भिन्न आहे. (त्यांनी उदाहरणाद्वारे ते दाखवलं आहे.) परिस्थितीवशात अत्यंत तडजोड करुन लग्न झालेली मुलगी नि मुक्ताई ह्यांची तुलना अस्थानीच आहे. ह्यानंतर प्रतिसाद देईनच असं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

माझा मुद्दा साधा आहे. अमुक

बॅटमॅन
Wed, 01/08/2014 - 19:40 नवीन
माझा मुद्दा साधा आहे. अमुक एका गोष्टीचं वाङ्मयात प्रतिबिंब दिसत नाही असे म्हणायला आधार काय? ज्ञानेश्वरांबद्दल रिलायबल म्हणावी अशी जी माहिती आहे ती फार थोडी आहे. करुणेचा सूरही उगाच लावला असं वाटलं नाही. संतांकडे पाहताना अमुकच एका दृष्टिकोनातून पाहण्याची जबरदस्ती कशाला? ज्ञानेश्वरी काय नि अमृतानुभव काय, तिथे पर्सनल अनुभव येण्याचा स्कोपच मुळात कमी आहे. वामनपंडितांनी तिथेही जळजळ ओकलेली आहे ते एक सोडून देऊ पण आय होप यू गेट द पॉइंट. उपलब्ध चरित्रावरून अंदाज लावण्याला अंत नाही कारण आपल्याला जवळपास काहीच माहिती नाही. मुक्ताबाई आणि परिस्थितीवशात लग्न करावे लागलेली मुलगी यांची तुलना मुद्दा कळावा म्हणून केलेली आहे. ती अस्थानी वाटत नाही.
ह्यानंतर प्रतिसाद देईनच असं नाही.
बरं मग????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

>>> बरं मग????

प्यारे१
Wed, 01/08/2014 - 20:00 नवीन
>>> बरं मग???? वंदे मातरम म्हणायचं, सतरंज्या गुंडाळायच्या नि संघ विकीर! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

http://www.misalpav.com

बॅटमॅन
Wed, 01/08/2014 - 20:11 नवीन
http://www.misalpav.com/comment/543797#comment-543797
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

>>त्या चार भावंडांकडे "अवतार"

सूड
Wed, 01/08/2014 - 17:24 नवीन
>>त्या चार भावंडांकडे "अवतार" म्हणून न पाहता माणसं म्हणून पाहा. तुम्हालाही त्यांचं हरवलेलं बालपण दिसेल. सहमत. मला वाटतं ज्यांचं स्वतःचं बालपण अवेळी हरवलं असेल त्यांना जितकं हे प्रकर्षाने जाणवेल तितकं इतरांना जाणवायची शक्यता कमी आहे. अर्थात तितकं संवेदनक्षम असेल एखाद्याचं मन तर जाणवेलही पण शक्यता कमी आहे. ब-याचदा मोठेपण वाटणार्‍या गोष्टी वास्तविक पाहता त्या वेळी त्या व्यक्तीने आल्या प्रसंगाला तोंड द्यायला घेतलेला पवित्रा असतो. इतरांच्या दृष्टीने तो नंतर मोठेपणा होऊन जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

ऑ?

स्पा
Wed, 01/08/2014 - 14:57 नवीन
आपल्या पोरांनी लहान वयातच काय पण वयाच्या सत्तराव्या वर्षीही असे आणि इतके प्रौढ अन पोक्त विचार करु नयेत अशी इच्छा मनात भरुन येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

सहमत आहे. करुण कथा तर आहेच.

बॅटमॅन
Wed, 01/08/2014 - 16:07 नवीन
सहमत आहे. करुण कथा तर आहेच. पण
आपल्या पोरांनी लहान वयातच काय पण वयाच्या सत्तराव्या वर्षीही असे आणि इतके प्रौढ अन पोक्त विचार करु नयेत अशी इच्छा मनात भरुन येते.
बळंच? सत्तराव्या वर्षी पोक्त विचार करणार नैतर काय करणार ;) असो. भावना समजली पण अकाली प्रौढत्व न येवो यापलीकडे काही दिसले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

भावना समजली पण अकाली प्रौढत्व

गवि
Wed, 01/08/2014 - 16:13 नवीन
भावना समजली पण अकाली प्रौढत्व न येवो यापलीकडे काही दिसले नाही.
मेल्या.. काय हवंय आणि यापलीकडचं दिसायला..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ते "सत्तराव्या" शब्दामुळे

बॅटमॅन
Wed, 01/08/2014 - 16:18 नवीन
ते "सत्तराव्या" शब्दामुळे एकदम "पालक अलर्ट" लागला ओ बाकी कै नै ;) म्हण्णार होतो आलोकनाथ अलर्ट, पण मला मिपावर राहायचंय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

चरकात कोण नाही?

कवितानागेश
Wed, 01/08/2014 - 18:27 नवीन
चरकात कोण नाही? प्रत्येकजण कमीजास्त प्रमाणात भरडला जातोच. पण भरडलं जाण्याचा आणि "शहाणपणाचा/ ज्ञानाचा" काय संबंध? कुणी भरडलं जाउन गुन्हेगार होतं, तर कुणी करुणा जागी होउन ज्ञानी होतं.... कोण कुठल्या परिस्थितीवर कशी reaction देइल हेदेखिल कुणालाच माहित नसतं. ते random आहे. मग कुणीही पोक्त= ज्ञानी होउ नये आणि प्रत्येकानी बालपणातच रहावं असं का? शेवटी "शहाणपण" हीदेखिल मनुष्याचे एक less probable नैसर्गिक अवस्थाच आहे. तिला विरोध का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मस्त !!

धन्या
Wed, 01/08/2014 - 18:34 नवीन
कोट ऑफ द डे म्हणण्याईतका चांगला आहे विचार. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

+१

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/08/2014 - 18:51 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

+१

अवतार
Wed, 01/08/2014 - 20:07 नवीन
सहमत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

धागाक्र्त्याला विचारण्यात आलेला

बर्फाळलांडगा
Wed, 01/08/2014 - 20:31 नवीन
हा सर्वोत्कृष्ट प्रश्न आहे असे धाडस दाख्व्ल्याबद्द्ल अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

बालपण.

अर्धवटराव
Wed, 01/08/2014 - 22:36 नवीन
अकाली पोक्तपणा संभाजी आणि काहि प्रमाणात शिवाजीच्या नशिबी सुद्धा आला. मंगेशकर भावंडं देखील अशीच काहिशी भरडली गेली. वाईट परिस्थिती कोणावर, कुठल्या वयात दगड भिरकावेल याचा नेम नाहि. ते टाळता येणं देखील शक्य नाहि. पण हे दगड चुकवणे, परतवणे, किंवा त्यापासुन उपयोगी वस्तु तयार करण्याचं शहाणापण पहिले एक दोन दगड पडल्याबरोबर ( किंवा दगड अंगावर पडण्यापुर्वी) येणं गरजेचं नाहि का? संकटं येऊच नये हि सद्भावना म्हणुन ठीक आहे पण संकटाला तोंड देण्याचं सामर्थ्य मनात उपजणे हि गरज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

सुंदर

विटेकर
Wed, 01/08/2014 - 14:55 नवीन
आवडले !!
  • Log in or register to post comments

धन्या.. रसाळ आणि सुंदर

बर्फाळलांडगा
Wed, 01/08/2014 - 15:18 नवीन
धन्या.. रसाळ आणि सुंदर लिहिलंयस.
अलबत! पण एखादी गोष्ट लिखित आहे हा ती वास्तवअसाण्याचा बेस नसतो रे...... कारण लार्ड ऑफ़ द रिंग्ज सुध्दा लिखीत आहे
  • Log in or register to post comments

माझ्या प्रतिसादातून क्वोट

गवि
Wed, 01/08/2014 - 16:07 नवीन
माझ्या प्रतिसादातून क्वोट केल्याने माझ्यापुरते सांगणे आले: मी रसाळ आणि सुंदर म्हटलं आहे. वास्तव नव्हे. लिहिलंयस असं म्हणावंच लागणार कारण ते लिहिलेलं आहे. बोलत असता तर रसाळ सुंदर बोलतोयस असं म्हटलं असतं. लिखित म्हणजे नेसेसरिली वास्तव नव्हे हे म्हणणं एकदमच योग्य आहे.. त्याविषयी काही म्हणणं नाही, पण इथे या त्रिकालाबाधित ऑब्व्हियस लॉजिकल विधानाचा संबंध त्या क्वोटेड वाक्याशी जोडल्याने हे लिहिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बर्फाळलांडगा

लेख मुक्ताईच्या ताटीच्या

बाळ सप्रे
Wed, 01/08/2014 - 15:36 नवीन
लेख मुक्ताईच्या ताटीच्या अभंगांइतकाच रसाळ आहे.. कोवळ्या वयात मुक्ताइचे इतके थोर विचार आणि इतक्या रसाळ शब्दात मांडण्याचे सामर्थ्य खचितच कौतुकास्पद आहे!! अशा कथा रंगवायला १४०० वर्षाचे चांगदेव वगैरे अतिशयोक्तिची खरंतर गरजच पडु नये. या वयात वादळात वीज पडुन झालेला तिचा अंत फार करुण आहे.. त्या घटनेला आदिमायेत विलिन वगैरे न वाटता एका महान प्रतिभेच्या व्यक्तिचा अकाळी झालेला शेवट वाटतो..
  • Log in or register to post comments

अशा कथा रंगवायला १४०० वर्षाचे

धन्या
Wed, 01/08/2014 - 16:24 नवीन
अशा कथा रंगवायला १४०० वर्षाचे चांगदेव वगैरे अतिशयोक्तिची खरंतर गरजच पडु नये.
सहमत. मी हे टाळू शकलो असतो.
या वयात वादळात वीज पडुन झालेला तिचा अंत फार करुण आहे.. त्या घटनेला आदिमायेत विलिन वगैरे न वाटता एका महान प्रतिभेच्या व्यक्तिचा अकाळी झालेला शेवट वाटतो..
मुक्ता आदिमायेत विलीन झाली असं सांगणं हा कथाकारांच्या कथा सांगण्याचा भाग झाला. ज्ञानदेवांचं आयुष्य एकवीस वर्षांचं होतं. त्यामुळे मुक्तेचा जेव्हा वीज पडून अंत झाला तेव्हा ती सतरा-अठरा वर्षांपेक्षा मोठी नसेल. वयाच्या नऊ दहाव्या वर्षी ताटीच्या अभंगांसारखं काव्य लिहिणार्‍या व्यक्तीमत्वाचं असं अकाली जाणं ही दुर्दैवी घटना होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

माऊली

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 01/08/2014 - 15:59 नवीन
__/\__!
  • Log in or register to post comments

आवडले...!

रुमानी
Wed, 01/08/2014 - 16:58 नवीन
आवडले...!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा